काळाची वर्षांत मोजणी करायला सुरुवात केल्यापासून दोन हजार सतरा वर्ष उलटून गेली आहेत. आपण आता सजगपणे स्त्रीकडे पाहतो आहोत. वर्ष लोटली, काळ बदलत गेला, माणसाचं जगणं वेगळं होत गेलं तरी अनेक गोष्टींची पुन:पुन्हा चर्चा करतो आहोत. काही प्रश्न पुन्हा एकदा सतावताहेत. एखादं वास्तव सर्वाच्या लक्षात आलं, सिद्ध झालं, त्याला भक्कम पुराव्याची शास्त्रीय बैठक मिळाली तरी मूळ प्रश्न सुटू नये तसं झालेलं आहे का? म्हणून मग बाईकडे पाहून आपण नव्याने विचार करतो आहोत. पण ही बाई कुठली? आधुनिक जगातली शिकलेली, स्वतंत्र आचार आणि विचार आत्मसात करू पाहणारी की सदैव झगडणारी, पिचून गेलेली आणि तरीही पुन:पुन्हा उभी राहणारी अशी की कानाकोपऱ्यात ढकलून दिलेली, चार भिंतीत बंदिस्त केलेली अशी? कितीतरी तऱ्हेने आपण वेगवेगळी स्त्री पाहू शकतो आहोत. आधुनिक जगात तंत्रज्ञानाने ती शक्यता आपल्यासाठी खुली केली आहे. तशी ती स्त्री नेहमी अगदी निरनिराळ्या रूपात आपल्या आजूबाजूला असते. आपल्याला कधीकधी दिसत नसली तरी असते. तिचं अस्तित्व आपल्याला माहीत असतं.

आपली समजूत होती की शिक्षण मिळून शहाण्या झालेल्या बाईला संधींचे सगळे दरवाजे उघडलेले असू शकतात. अशा जगातली स्त्री स्वत: कमावून तिला हव्या त्या रीतीने बऱ्यापैकी आनंदात जगू शकत असेल. समान संधींसाठी तिने केलेला वर्षांनुवर्षांचा झगडा, त्या लढाईला थोडंफार यश मिळून ती तिला स्वत:ला हवं ते मिळवण्याची धडपड करते आहे. पण या वर्षांत अशा समजुतींना तडा गेला. बरोबरीचे अनेक पुरुष जवळपास सदैव तिच्यावर झडप घालायला टपून बसलेले असतात, असं वास्तव उघडकीला आलं. म्हणजे स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीला इतकी अनेक वर्ष होऊन देखील खूप काही मिळवलं; पण पुरेसं नव्हेच हे लक्षात आलं. म्हणजे बदल झाले खरे पण अर्ध्या जगातच झाले. शिक्षण आणि आधुनिक विचार आणि एकमेकांना देऊ केलेली मान्यता आणि मिळवलेली समानता यात पुरुषाला बाई लैंगिक दृष्टय़ा हवी असणे आणि तिला काय हवंय याचा मुळीच विचारही मनात येऊ  न देता त्यानं बाईच्या शरीरावर पुरुषी हक्क गृहीत धरून तिला त्रास देणे, तिची नाना प्रकारे छळवणूक करणे हे युगानुयुगे सुरूच आहे हे लक्षात आलं आहे. पण विसाव्या शतकात एक नवी जाणीव जागृती झाली असं आपण समजलो. जिकडे तिकडे एका मोकळ्या विचारांचं वारं वाहायला लागलं. शिवाय विज्ञानाने शोध संशोधन केल्यावर स्त्रिया आणि पुरुष एक मानव म्हणून किती सारखे आणि किती वेगळे हेदेखील नीटपणे समजून आलं. आपला विश्वास बसायला लागला की अशी समानता शक्य आहे आणि स्त्रियांना आत्मभान येऊन स्वतंत्रपणे, स्वत:ला जसं हवं तसं जगता येणंही शक्य आहे. निदान काही प्रागतिक, आधुनिक समाजात अधिक प्रमाणात आणि इतरत्र निदान एका स्तरात का होईना पण हळूहळू ते साधता यायला लागलंय.

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
Accused kidnap minor girl
अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला बिहारमध्ये अटक
Increase in average life expectancy of Indians
भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ
Nagpur, Beauty Parlors, Emerging , Hub for Prostitution, 220 Young Women, Trapped, in 4 Years, crime news, marathi news,
ब्युटी पार्लर देहव्यापाराचे मुख्य केंद्र, चार वर्षांत उपराजधानीतील २२० मुली देहव्यापारात

या वर्षभरात प्रागतिक आणि आधुनिक जगातल्या काही ‘यशस्वी’ आणि ‘मान्यवर’ स्त्रियांनी शेवटी धिटाईने आणि कदाचित सहनशीलतेच्या पलीकडे गेल्यामुळे जाहीर केलं की या वाटेवर त्यांना कसली किंमत द्यावी लागलेली आहे. ज्यांची नावं आणि कीर्ती मोठी होती अशा अनेक क्षेत्रातल्या सत्ताधारी पुरुषवर्गाने या स्त्रियांना कसं वागवलं आहे, त्यांचा गैरफायदा घेतला आहे, प्रसंगी जबरदस्ती केली आहे, अशा घटनांची वाच्यता केली. एकजण म्हणाली आणि धीर येऊन दुसऱ्या अनेकजणी बोलायला लागल्या. एका क्षेत्रातल्या एका बाईने तोंड उघडलं  आणि पाहता पाहता निरनिराळ्या क्षेत्रातल्या स्त्रिया भराभर जाहीरपणे सांगायला लागल्या. राजकारण, चित्रपट, माध्यमं, क्रीडा, कॉर्पोरेट ते अनेक तऱ्हेच्या संस्था आणि त्यातले पुरुष यांच्या वागणुकीवर ‘उजेड’ पडायला लागला. अगदी साहित्य संस्थादेखील यात आहेत. विशेषत: अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या अशा घटनांचा उल्लेख व्हायला लागला, नावानिशी! आश्चर्य म्हणजे थोडय़ा का होईना; पण काही पुरुषांनी कबुली दिली. जवळ असलेल्या स्त्रियांच्या शरीराला, अवयवांना स्पर्श करणे, चापटी मारणे, चिमटे घेणे इथपासून प्रसंगी लैंगिक संबंधांची जबरदस्ती करणे इथपर्यंत आपण या स्त्रियांशी असे वागलो हे मान्य केलं. अर्थात ते सहजी मान्य न करणारे पुष्कळजण होतेच. तसं घडलेलंच नाही इथपासून या बायकाच कशा अशा प्रसंगांना जबाबदार असतात ते त्यांनी सांगून पाहिलं. सत्ता-संपत्ती-अधिकार यासाठी बायाच कशा स्वत:चं शरीर वापरू द्यायला तयार असतात तेही हिरिरीने मांडलं. पण एकीमागोमाग दुसरी अशा अनेकजणी मिळून जेव्हा सरसावल्या तेव्हा बहुसंख्य प्रसंगात काय घडतं त्याची सर्वाना नीट जाणीव झालीच.

हे सर्व ऐकून-वाचून धक्के जरूर बसले, पण आश्चर्य वाटलं का? इंग्रजीत ज्याचा ‘शॉकिंग बट नॉट सरप्राइझिंग’ असा उल्लेख केला जातो तशा प्रकारच्या या घटना आहेत. आतापर्यंतचा अभ्यास सांगतो की पुरुषाची लैंगिक इच्छा सदैव जागीच असते, नसेल तेव्हा एवढय़ातेवढय़ा कारणांनी देखील ती जागी होऊ शकते. या शारीर उत्तेजनेला काही एक वेळ, ऋतू, काळ असले अडसर नाहीतच. अगदी लहान वयात किंबहुना जन्मापासून ती प्रेरणा असतेच. ‘वयात’ आल्यावर अधिक जागी होते. दुसरं शरीर हवं वाटतं. स्पर्श करावासा वाटतो. सगळे प्राणी याच प्रेरणा घेऊन जगतात. त्याशिवाय जन्माचे चक्र सुरू राहणार नाही. पण मग केली मागणी शरीराने की लाव हात, झाली जागी प्रेरणा की दिसेल ते, उपलब्ध असेल ते शरीर घे ताब्यात अशा पद्धतीने पुरुष माणूस वागतो का? वागत असेल तर मग का? हा महत्त्वाचा, गहन प्रश्न आहे.

अनेक वर्षांचे अभ्यास असंही सांगतात की लैंगिक हल्ले हे केवळ शारीरिक प्रेरणेने होत नाहीत. यामागे सत्ता आणि अधिकार याचा मोठा सहभाग असतो. केवळ लैंगिक भूक भागवायला पुरुष स्त्रियांवर किंवा मुलामुलींवर हल्ले चढवतात असं नाही तर संधी असते तेव्हा आपली सत्ता शाबित करायला आणि अधिकार गाजवायला शिवाय त्या इतरांना दुर्बल समजून कह्य़ात ठेवायला पुरुष लोक आपल्या लैंगिक प्रेरणेचा उपयोग करतात. म्हणजे एकंदरीने आपले ‘स्थान’ प्रबळ, वरचढ आहे हे दाखवून देणं फार महत्त्वाचं वाटतं पुरुषाला. हे असं अनेक वर्षे, शतके, सहस्रके चालत आलेलं आहे. त्यामुळे ही जणू नैसर्गिक रीत आहे अशीही समजूत पुष्कळ काळ होती, काहीजणांच्या मनात अजून असेल. पण पुन्हा समाजशास्त्रीय संशोधन सांगतं की ती समाजाने, पुरुष लोकांनी अवलंब केलेली पद्धत आहे, रचलेली व्यवस्था आहे. कशासाठी? तर सत्तेसाठी. जमा केलेली संपत्ती आपल्या वीर्याच्या मुलग्याला मिळावी आणि ती रेषा चालू राहावी याकरता तशी समाज व्यवस्था आकाराला आली. लग्नसंस्था, समस्त स्त्री जातीवर अधिकार, निर्बंध अशा गोष्टी ओघाने आल्याच आणि अजून सुरू आहेत. त्यासाठी अर्थात धर्मसत्तेचा मोठाच उपयोग करून घेतला गेला आणि जातो हे आपल्याला माहीत आहेच.

मग एकीकडे स्त्रीच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू होऊन काही दशके उलटली तरी पुरुषवर्गाला बाई ही हवी तेव्हा स्पर्श करण्याची वस्तू वाटते यात, स्वातंत्र्याची जाणीव मान्य झालेल्या आपल्यासारख्या काही लोकांना धक्कादायक वाटत असलं तरी सगळ्या मानवजातीच्या इतिहासाचं भान असताना, आश्चर्य ते काय वाटावं? याचा अर्थ आपण ते निमूट स्वीकारतो असं नव्हे, वाचून आपल्याला त्रास होतोच, उद्विग्नता येते, आपण हे का, कशामुळे, हे शोधायचा प्रयत्न करतो. पण तसल्या साऱ्या घटना नव्यानं घडताहेत असं नाही हे उमजून आश्चर्य वाटत नाही. उलट आपली समजूत की सुधारलेल्या जगात फरक पडलेला असेल, ती कशी खोटी होती हे कळून अस्वस्थता येते.

जगभर हळूहळू एकामागोमाग एक अशा निरनिराळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांनी या विरोधात उघडपणे जाहीर करायला  सुरुवात केली तरी आपल्याकडे तसे आवाज फारसे उमटताना दिसले नाहीत. अर्थात आपल्याकडची स्थिती याहून फारच भयावह, दारूण आहे हेही आपल्याला माहीत आहे. एकंदरीत मुलगी तर जन्माला यायलाच नको असते, आल्यावर तिला सर्व तऱ्हेची कनिष्ठ वागणूक देऊन तिची अस्मिता कशी खच्ची केली जाईल हे पाहिलं जातं आणि इतकं करूनही   ती मोठी झाली तर मग असतेच उपलब्ध सत्ता गाजवायला! ही अशी मुलगी आपल्या देशात, अनेक भागात, केवळ मागासलेल्या वा दुर्गम प्रदेशात नव्हे तर शहरा-गावात-वस्तीतसुद्धा आहे याची आपल्याला जाणीव आहे. एकीकडे अनेक मुली शिकून उत्तम प्रकारे वाढून मोठय़ा झालेल्या दिसत असल्या तरी आणि चांगल्या कर्तबगार स्त्रिया म्हणून अनेक क्षेत्रात काम करताना, स्वतंत्र निर्णय घेताना पाहिल्या असल्या तरीही एक फार मोठा समाज वर्ग असा नाही हे आता आपल्यापर्यंत अनेक प्रकारे, सगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचलेलं आहे.

तेव्हा कामाच्या ठिकाणी पुरुषांकडून अनेक तऱ्हेने त्रास सोसावा लागणे आणि त्यातून शोषण होणे हे आपल्या भोवतालच्या असंख्य स्त्रियांना नवीन मुळीच नाही. उलट कुठल्याही कृतीनं चिडवणे, छेड काढणे, शेरे मारणे, संधी मिळताच वा ती मिळवून शरीराच्या विविध भागांना स्पर्श करणे असल्या पुरुष वृत्तीतून गेली नाही, अशी बाई-मुलगी आपल्याला माहीत असणे शक्य नाही हे वास्तव आहे. यानंतरच्या शोषणाच्या पायऱ्या कितीतरी असतात. असं घडल्यावर कुठे तक्रार करावी वा त्यावर मार्ग निघावा अशी व्यवस्थाच नसते. कितीही कायदे झाले, नियम बनले तरी ते फार मर्यादित राहतात आणि अंमलबजावणी फार कमी किंवा मुळीच होत नाही हेही आपल्याला माहीत आहे. ‘नाही’ म्हटल्यावर, नकार दिल्यावर, प्रतिकार केल्यावर बाईलाच किंमत द्यावी लागते हेही वास्तव असतं. शिवाय काम-नोकरी-पैसा-कुटुंब-मुलेबाळे ही सगळी जबाबदारी बाईवर आणि वर तिचं ‘चारित्र्य’ तिच्या शरीराशी निगडित. म्हणजे ‘अब्रू’ वगैरे काय ती तिनंच सांभाळायची. हल्लेखोर मोठय़ा मानाचा. त्याची चूक वगैरे तर काही नाहीच; पण तो सहीसलामत सुटणार. यातून गेल्यावर शरम आणि लाज वाटणार ती बाईला. त्यासाठी ती तोंड मिटून घेणार, सांगणार नाही आणि सहन करत राहणार.

हा असा उफराटा न्याय कसा काय घडत आला आहे? हे प्रश्न आता आपल्या पडायला लागले आहेत. तसे ते प्रचंड रीतीने सतावायला लागल्यामुळे अनेक भल्या भल्या ‘यशस्वी’ आणि कर्तबगार स्त्रियांनी मोठय़ा आवाजात आता काय घडतं ते सांगायला सुरुवात केली आहे. या सामूहिक आवाजाला या वर्षीची सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणून मान्यता मिळते आहे आणि ही गोष्ट नव्या सुरुवातीसाठी चांगली आशादायक आहे.

पण एक प्रश्न न सुटलेला आहे म्हणा किंवा फार विचारला जात नाहीये म्हणा. अशा गलबल्यात आपण समजत होतो ते ‘चांगले पुरुष’ कुठे आहेत? कुठे गेलेत? ते आहेत यावर तर आपला विश्वास आहेच. अजिबातच ते नाहीत असं म्हणणं वास्तवाला धरून होणार नाही. कारण स्त्रियांच्या चळवळीला पाठिंबा देणारे, त्यात सक्रिय सहभाग घेणारे, समग्र विचार करू शकणारे, ‘वेगळ्या’ वाटेवरचे, स्त्रीवादी विचारांना मान्यता देणारे आणि स्वत:च्या आयुष्यात त्याचा पाठपुरावा करणारे असे ते ‘भले’ पुरुष आहेत हे आपल्याला मान्य करायला लागेल. शिवाय अनेक स्त्रियांना तसा चांगल्या आणि सभ्य पुरुषांचा अनुभवही आलेला असणारच आहे. त्या पुरुषांना लैंगिक प्रेरणा नाहीत असं नाही; पण त्यांनी बाईला पुरेशा समानतेनं वागवलं आहे. निदान तिची ‘संमती’ आणि तिचा ‘नकार देण्याचा अधिकार’ मानला आहे. पण मग आता या स्त्रियांनी जोरात आवाज उठवल्यावर आम्हीही तुमच्याबरोबर आहोत असं म्हणणारे पुरुष कुठे आहेत? असतील तर मग त्यांचा आवाज का ऐकू येत नाहीये? अशा घटना सतत घडत आल्या आहेत हे त्यांना माहीत नसेल असं शक्य आहे का? त्या त्या वेळी अशा ‘चांगल्या’ पुरुषलोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या त्यांच्या भोवतालच्या स्त्रियांना? त्यांच्या आयुष्यात विविध नात्याने येणाऱ्या मुली-स्त्रियांना कशाकशातून जायला लागतं याची कल्पना असते का अशा पुरुषांना? की कधी तशी कल्पना केल्यामुळेच त्यांच्या ‘अधिकारातल्या’ स्त्रियांच्या सुरक्षेच्या आणि सावधानतेच्या नावाखाली त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला जातो त्या पुरुषांकडून? की त्यांच्याही मनात त्याच युगानुयुगे चालत आलेल्या संकल्पना आहेत, की ज्या स्त्रियांच्या वाटेला असे शोषणाचे अनुभव येतात त्या स्त्रियाच त्या अनुभवांना जबाबदार असतात. म्हणजे ‘तसल्या’ बायका वाईटच आणि ‘आपल्या’ बायका म्हणजे स्वत:च्या आया-पत्नी-मुली-मैत्रिणी-नात्यातल्या-समाजातल्या-जातीतल्या बायका मात्र सर्वाहून निराळ्या-निष्पाप-सोवळ्या-पवित्र वगैरे. त्यामुळे ‘मला काय देणं घेणं?’ अशा वृत्तीनं हे सारे ‘चांगले’ आणि ‘सजग’ आणि ‘विचारी’ पुरुष गप्प राहिले? अजून राहतात? अर्थात ते तसे असतील तर मग त्यांना ‘सजग’ कसं म्हणणार?

खरं तर या सगळ्या धडपडीचा उद्देश सारखाच आणि एकच असतो की शेवटी माणसांच्या एकमेकांशी होणाऱ्या व्यवहारात आणि नात्यात एक महत्त्वाची बाब स्पष्ट असायला हवी. ती म्हणजे मान्यता. त्यातून आकाराला आलेली समजूत आणि स्वीकार. या पायावरच ते नातं आणि त्यापुढचा व्यवहार उभा राहायला हवा. दोन व्यक्ती स्त्री वा पुरुष एकमेकांशी समान पातळीवर, माणूस म्हणून एकमेकांच्या मान्यतेचा विचार करतील तेव्हा अधिकार-सत्ता-जबरदस्ती वा शोषण अशा घटकांचा त्यात समावेश असणार नाही. पण ही गोष्ट नैसर्गिकरीत्या सहजपणे घडून येणे कठीण आहे कारण किंवा म्हणून ती आदर्शवत आहे. मानवजातीचा प्रत्यक्ष इतिहास तसं सांगत नाही. सत्तेच्या उतरंडीवरच बहुतेक सगळे समाज उभे असतात असं दिसतं आहे. पण काही वेळा, काही काळ, काही प्रमाणात तसे आदर्श समाज तयार होतातही. व्हायला हवेतच आणि ती शक्यता आहेच. त्यामुळे त्या आदर्श दिशेनं आपल्याला जाण्याखेरीज पर्याय नाही. कारण समग्र इतिहासाचा पुरावा पाहता आपण कितीतरी बदलून गेलो आहोत, आपल्या विचारात क्रांतिकारक म्हणावेत असे बदल झाले आहेत, ज्ञान-विज्ञानानं आपल्याला कुठून कुठे पोचवलं आहे आणि अगदी विलक्षण म्हणाव्यात अशा शक्यतांचा पट उलगडून ठेवला आहे. आपण मानवजात म्हणून काय करायचं आणि कुठले निर्णय घ्यायचे हे आपल्यालाच ठरवायचं आहे.

खरं तर मुलगी म्हणून जन्माला यायचं असेल तर वर्तमानाचा आणि भविष्याचा काळ अधिकाधिक अनुकूल असणार आहे. आताच्या पाश्र्वभूमीवर ही गोष्ट चटकन पटणार नाही, पण पुन्हा समग्र निरीक्षण करताना आपल्या लक्षात येईल की पूर्वीपेक्षा आपण कितीतरी पुढे आलो आहोत. असा कुठला इतिहासाचा काळ आहे जेव्हा स्त्री आताहून अधिक स्वतंत्र आणि सजग असू शकत होती? तशी ती आहे म्हणून तिनं जाहीर केलं आहे. या सगळ्याजणींनी मिळून हा जो आवाज उठवला आहे तो ऐकण्याखेरीज आता पर्याय नाही त्यासाठी काय काय करता येऊ शकतं आणि व्यवस्थेत कुठले बदल घडवता येऊ शकतात हा प्रश्न आता सारे विचारायला लागलेत. त्यात आपण असू. आपल्यासारख्या आणि इतर अनेकजणी आणि ते ‘चांगले पुरुष’ असे सर्व मिळून!

सानिया

saniya1011@gmail.com