20 November 2017

News Flash

आता तरी बोलायला हवंच..

‘‘काय करावं आम्हाला कळत नाहीए. म्हणून तुमचा सल्ला घ्यायचाय.’’

डॉ. शशांक सामक | Updated: July 15, 2017 1:28 AM

स्मार्टफोन, संगणकांमध्ये इंटरनेटने शिरकाव केला तसं प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींबरोबर अनिष्ट गोष्टींचाही शिरकाव झाला. ‘पोर्नोग्राफी’चा व्यवसाय प्रचंड मोठा असल्याने त्याचा प्रचार, प्रसारही मोठय़ा प्रमाणावर होतो आहे. पण याचा सर्वात जास्त परिणाम होतोय लहान मुलांवर. थेट शिक्षिकेलाच अश्लील पत्र लिहिण्यापासून लहान मुलींवर बलात्कार करण्यापर्यंतचे गुन्हे सज्ञान होण्यापूर्वीच मुलांकडून होऊ लागले आहेत. म्हणून समाजस्वास्थ्यासाठी साऱ्याच पालकांनी, शिक्षकांनी आपल्या मुलांशी आता तरी या विषयावर मोकळेपणाने आणि स्पष्टपणे बोलायलाच हवं..

‘‘काय करावं आम्हाला कळत नाहीए. म्हणून तुमचा सल्ला घ्यायचाय.’’ माझ्या समोर बसलेली व्यक्ती एक शिक्षिका होती आणि आपल्या एका विद्यार्थ्यांविषयी बोलत होती. तिच्याबरोबर तिची सहयोगी शिक्षिका होती. ती शिक्षिका एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावी, सातवीच्या विद्यार्थ्यांना शिकवत होती तर तिच्याबरोबरची शिक्षिका त्या पुढील इयत्तेतील विद्यार्थ्यांना शिकवत होती. दोघींनाही विद्यार्थ्यांचे वेगवेगळे अनुभव आल्याने त्यांना या विद्यार्थ्यांना ‘या विषयात’ कसे हाताळावे हे लक्षात येत नव्हते. पहिल्या शिक्षिकेला तिच्या वर्गातील एक विद्यार्थी वर्ग चालू असतानाही इतरांबरोबर जास्त गप्पा मारताना व इतर विद्यार्थी त्याच्या गप्पांमधे जास्त गुंगून जाताना आढळत होते. हे सर्व सहावीतील विद्यार्थी होते. तिने एकदा एका विद्यार्थ्यांला वेगळं नेऊन त्यांच्या गप्पांबद्दल विचारले तेव्हा त्याने सुरुवातीला आढेवेढे घेतले तरी नंतर जोरात विचारल्यावर जे काही सांगितले ते धक्कादायक होते. तो नाठाळ विद्यार्थी वर्गातील इतरांचा ‘लव गुरू’ होता. ते ऐकून शिक्षिकेला धक्काच बसला.

‘‘लव गुरू? म्हणजे?’’ शिक्षिका.

‘‘मॅडम, म्हणजे तो लवसाठी आम्हाला काय, कसं करायचं ते सांगत असतो.’’

‘‘लव? म्हणजे?’’ शिक्षिका.

‘‘मॅडम, म्हणजे मला क्लासमधली रिचा आवडते तर मी पुढे कसं करायचं ते सांगत असतो.’’ सहावीतील विद्यार्थी.

‘‘आँ!’’ शिक्षिका गडबडली म्हणणं अगदी मवाळ वाटेल. ती खरं तर हबकली होती, असं तिनं मला सांगितलं.

मी पण उत्सुकता ताणून ऐकत बसलो. मी छत्तीस वष्रे माझ्या सेक्सॉलॉजी क्षेत्रात असूनही मला दुसऱ्यांनाच काय, स्वत:लाही आवडलेली व्यक्ती पटवायची कशी हे कधी कळलं नव्हतं. आणि हा सहावीतील चिमुरडा? लव गुरू? मला आता कळलं मी ‘लव गुरू’ का नव्हतो. उत्तरं कुठं माहीत होती अशा प्रश्नांची!

‘‘मग? त्या त्याच्या लव गुरूनं काय सल्ला दिला त्याला?’’ माझ्या प्रश्नात उत्सुकता होती.

आता मात्र ती समोरची शिक्षिका जरा सांगायला अडखळली, लाजली. तिच्याबरोबरच्या शिक्षिकेने संभाषणात भाग घेतला. ‘‘सर, हिनं मला सगळं सांगितलंय. त्यानं त्या मुलाला सांगितलं की, अरे तू एकदा तिच्याशी रात्रभर सेक्स कर, मग बघ ती तुला सकाळी ‘आय लव यू’ म्हणते की नाही.’’ मी तीनताड उडालो हे म्हणणं अजिबात अतिशयोक्तीचं ठरणार नाही.

‘‘हो सर.’’ त्या शिक्षिकेला बोलायचा धीर आला.

मी गंभीरपणे विचार करू लागलो. खरं म्हणजे असं ‘लव’ मिळतं याची मलाही फार कल्पना नव्हती.

‘‘तुम्ही मग त्या ‘लव गुरू’शी बोललात?’’ मी.

‘‘पहिल्यांदा मी हिच्याशी आणि मग प्रिन्सिपॉल मॅडमशी बोलले. आम्ही सगळ्यांनी मिळून जरा गंभीरपणे विचार केला. पहिल्यांदा त्याच्याशी व नंतर त्याच्या पालकांशी बोलायचं ठरलं. मी त्याला या प्रकाराची माहिती न देता त्याच्या घरची माहिती घेतली. त्याच्या वह्य़ा तपासल्या आणि पुन्हा प्रिन्सिपॉल मॅडमशी बोलले.’’

‘‘काय झालं मग? काय कळलं तुम्हाला?’’ मी.

‘‘त्याच्याविषयी तुमच्याशी चर्चा करायला मॅडमनी सांगितलं आणि म्हणून आम्ही आलोय. त्याला शाळेतून काढून टाकावा का, असाही विचार त्यांना आला, पण त्या ते तुमच्या सल्ल्यानुसार ठरवणार आहेत.’’ ती शिक्षिका म्हणाली. तिने मग मिळविलेली माहिती मला सांगायला सुरुवात केली.

हा ‘लव गुरू’ त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक व लाडावलेला मुलगा होता. वडील नेव्हीत मोठय़ा हुद्दय़ावर. पण वर्षांतील बराच काळ बाहेर. घरी आई एकटी, पण वातावरण पूर्णपणे मोकळे असल्याने घरी पाटर्य़ा, मित्रमंडळींची वर्दळ, वीकएंडला सहली, ड्राइव्ह, ट्रिप सतत. काही वेळा ती दोघं मुलालाही बरोबर न्यायचे, पण त्या मोठय़ांमध्ये तो रमत नव्हता म्हणून त्याला घरी ठेवूनच जाऊ लागले. बाबा नसले तरी त्याची आई त्या मित्रमंडळींबरोबर पाटर्य़ा, ट्रिप यांना जात होती. मुलाकडे स्मार्टफोन होता. घरी लॅपटॉप होता. डीव्हीडी प्लेअर होता. मुलाचा वेळ आरामात जात होता. एकदा घरचा कॉम्प्युटर बघता बघता त्या मुलाच्या दृष्टीला अचानक एक पोर्नोग्राफिक फिल्म पडली आणि त्याचं विश्वच बदललं. त्याला अचानक त्याच्या वयात येताना जाणवणाऱ्या हुरहुरीचं जणू रहस्यच कळलं. स्त्री-पुरुष संबंध, सेक्स, रोमान्स, स्त्रीचे शरीरज्ञान, पुरुषाचे लगज्ञान याची त्याला सखोल माहिती मिळाली, जी त्याने तत्परतेने आपल्या क्लासमधील ‘उदयोन्मुख’ मित्रमंडळींना पुरवायला सुरुवात केली. त्याच्या स्मार्टफोनचाही वापर तो करू लागला आणि हे गेले कित्येक महिने चाललं होतं. त्याचं फ्रेंड सर्कल वाढत होतं आणि विशेष म्हणजे त्यामध्ये वर्गातील काही मुलीही होत्या. पौगंडावस्थेतील सर्वच उत्सुक. सहावीतील लैंगिक जागृती! त्याच्या आईवडिलांना याचा सुगावाही नव्हता. ते त्यांच्याच विश्वात मश्गूल.

हे सर्व ऐकून पालकांचे आपल्या पाल्याच्या पौगंडावस्थेची कल्पना असणे आणि त्यांना त्यांच्या वागण्यातील जबाबदारीची जाणीव असणे किती आवश्यक असते याची कल्पना शिक्षिकांना, प्रिन्सिपॉलना आली होतीच. मी त्यांना त्या ‘लव गुरू’च्या पालकांशी विस्तृत चर्चा करायला सांगितली. पालकांनी आणि शिक्षिकेनेसुद्धा कसे संवेदनशीलपणे ही स्थिती हाताळायची याविषयी काही सल्ला दिला. कोणीही या गोष्टीचा फार बाऊ न करताच त्या मुलाशी संवाद साधला पाहिजे हे ठासून सांगितले. संवादाचा व मार्गदर्शनाचा अभाव हे त्या मुलाच्या लैंगिकतेच्या विकासातील दोष होते. मुख्य म्हणजे, आतापर्यंत किंवा अजूनही हा विषय फारसा चर्चिला जात नाहीच. मुलं आणि पालकांमध्ये तर आजही या विषयामुळे अंतर पडतं. पण आता सगळ्यांना सांगावंसं वाटतं, या विषयावर आता तरी बोलायला हवंच. मुलांचं तारुण्यसुलभ कुतूहल वेळीच शमवायला हवं. आणखी एक माझ्याकडे आलेलं उदाहरण, एक दाम्पत्य त्यांच्या चार-साडेचार वर्षांच्या मुलाविषयी सल्ला घ्यायला आले होते. सध्या त्याचं वागणं विचित्र झालं होतं. आईच्या अंगाशी सारखं खेळणं, टीव्हीवरील मालिका-चित्रपटातील बायकामुलींच्या अंगाविषयी, विशेषत: छातीविषयी (तो बू बू शब्द वापरायचा) घरातील सर्वासमक्ष बोलणे, तिथे एकटक बघणे. यामुळे ते दोघेही विचित्र मन:स्थितीत अडकले होते. लहान मूल म्हणून सर्व जण दुर्लक्ष करत होते खरे, पण काही तरी विचित्रपणा आहे हे जाणून आणि त्याचे कारण काय हे न कळल्यामुळे हैराणही झाले होते. ज्या वेळी मी माहिती घेऊ लागलो त्या वेळी लक्षात आले की हे कुटुंब ज्या बिल्डगमध्ये राहात होते तिथे काही मुलामुलींबरोबर हा मुलगा गेले काही महिने खेळत होता. ती सर्व मुलंमुली आठ ते तेरा वष्रे वयोगटांतील होती. दोन मुली दहा व बारा तर दोन मुलं आठ व तेरा वर्षांची. त्यांच्यात हा साडेचार वर्षांचा लिंबू टिंबू! त्या मुलांमध्ये हे खेळणं सुरू झाल्यावरच असे बदल झाल्याचे पालकांच्या लक्षात आले होते. शरीराला हात लावणे, लिंगाशी खेळणे या त्याच्या वागण्यामुळे लक्षात आले की, ही सर्व मुलं सध्या अशा प्रकारे खेळून आनंद घेत असावीत आणि त्यांनी याही बच्चूला त्यात सहभागी करून घेतलं असणार.

माहितीवरून कळत होतं की यातील दोन मुली, विशेषत: बारा वर्षांची मुलगी, आता नाजूक पौगंडावस्थेत आहे व मोठा तेरा वर्षांचा मुलगाही तारुण्यसुलभ भावनेने प्रभावित झालेला असणार. त्यांच्या एकत्रपणात या भावनांना वाट करून देण्यासाठी अंगचटीचे खेळ खेळले जात असणार. हे पालक गेले काही महिने आपल्या मुलाचं हे वागणं बघत होते, पण कारण न कळल्याने त्याचे खेळ पोरखेळ म्हणून सहन करत होते. सर्व इत्थंभूत माहिती घेतल्यावर त्यांचा जबाबदार पालक म्हणून असणारा सहभाग समजावून दिला. स्वत: पाल्याकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे आणि घरच्या इतर मोठय़ा व्यक्तींचेही सहकार्य आवश्यक असल्याचे समजावून दिले. त्याच्या कृतींकडे दुर्लक्ष करून त्याला शिक्षा देण्याच्या फंदात न पडता रूटीन चालू ठेवणे महत्त्वाचे आहे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्याच वयोगटातील मंडळींमध्ये, मैदानातल्या खेळात त्याला रममाण होऊ देणे अत्यंत आवश्यक होते हेही ठासून सांगितले.

आणखी एक प्रकरण, गावाकडच्या भागातलं. ‘‘सर, मी एका मुलाला आणि त्याच्या वडिलांना तुमच्याकडे पाठवतोय. मी सांगलीजवळील एका गावामध्ये शिक्षक आहे. ही जरा विचित्र समस्या आहे. हा मुलगा आहे तेरा-चौदा वर्षांचा. अभ्यासात साधारणच आहे. पण गेले एक वर्ष त्याच्याविषयीच्या काही विचित्र तक्रारी माझ्याकडे काही विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. तो मुलींशी विचित्र वागतोय आणि त्याच्या वयात तो फारच फॉरवर्ड झाला आहे.’’ ते शिक्षक मला जरा विषय समजावून देत होते. ही पौगंडावस्थेतील लैंगिकतेची समस्या असणार हे माझ्या लक्षात आले. मला भेटायला दोघेही आले. मुलगा चांगला चुणचुणीत दिसत होता. पण थोडा वयापेक्षा जास्त हुशार, बिलंदरही वाटत होता. त्याच्या वडिलांनी मला जी थोडक्यात माहिती दिली त्यावरून अभ्यासामध्ये तो साधारण होता, वेगवेगळे विषय शिकण्याच्या शिकवण्यांमध्ये तो रस घेत होता असे काही काळ जे त्यांना वाटत होते. त्यांचा भ्रमनिरास काही महिन्यांपूर्वीच्या त्याच्या आलेल्या तक्रारींनंतर शहानिशा करताना झाला. मुलींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणे, त्यांच्या शरीरांना स्पर्श करणे, त्यांच्या शाळेतील टॉयलेटमध्ये डोकावून पाहणे अशा गोष्टी शाळेमध्ये हा मुलगा फार करतोय या तक्रारी गेले काही महिने येत होत्या. शिक्षकांनी दम देऊन, धाक दाखवून, शिक्षा करूनही त्याच्यामध्ये सुधारणा दिसत नव्हती. वडिलांना बोलावून त्यांच्यासमोर त्याचा पाढा वाचून जर तो सुधारला नाही तर त्याला शाळेतून काढून टाकण्यात येईल, अशी शेवटची समजही दिली गेली.

वडिलांना हा सगळा धक्काच होता. या वयात मुलगा असं काही वागतोय यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. मुलाची ‘सखोल’ चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, क्लासेसना दांडय़ा, कुठे तरी टाइमपास करणं हे त्याचे शाळा सोडून रुटीन होते. जास्तच खोलात शिरल्यावर त्याच्याकडून हे बरेच महिने चालले आहे हे त्यांना कळले. ते हादरले. मुलाकडून मी स्वतंत्र माहिती घेऊ लागलो. त्याचा विश्वास जिंकल्यावर तो मनमोकळं बोलू लागला. वेगवेगळे ‘गुगली’ प्रश्न विचारून त्यांच्या उत्तरांची जुळवाजुळव करून त्या मुलाचे विचार व वागणे लक्षात घेतले. त्याच्या लैंगिक वाढीबरोबरच त्याच्या लैंगिकतेची वाढही झपाटय़ाने झाली होती. त्याच्या वयातील इतर मुलांपेक्षा जास्त. त्याच्या अगोदरच्या पिढीला जी माहिती महाविद्यालयीन काळात व्हायची ती त्याला आता आठवीतच झालेली होती. तो जरी गावाकडील होता तरी कुणाच्या तरी मोबाइलमधून ‘क्लिप्स आणि फोटो’ बघून त्याच्या वर्गातील इतरांपेक्षा याचे या विषयात ‘पीएच.डी.’ झाले होते. त्याच्याकडून काही विचित्र गोष्टीही घडल्या हे त्यानेच सांगितले.

सध्याच्या पिढीला तंत्रज्ञानातून नको इतक्या झपाटय़ाने मिळणारी माहिती हे लैंगिकतेच्या जाणिवेमध्ये प्रभावी कारण आहे. परंतु ही मिळणारी माहिती शास्त्रीय नसल्याने या लैंगिक गरज्ञानातून त्यांच्यात निर्माण होणारे लैंगिक मनोगंड व्यक्तिगत तसेच सामाजिकदृष्टय़ा धोकादायक ठरू शकतात हे

या मुलांच्या प्रकरणावरून लक्षात आले असेलच. तीन-चार वेळा समुपदेशनाला त्याला बोलावून त्याच्याशी दीर्घ चर्चा केल्यानंतर जेव्हा तो सहा महिन्यांनंतर आला तेव्हा त्याच्यातील फरक चांगलाच जाणवत होता.

माणसाला लागलेला सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे त्याला स्वत:चा स्वभाव बदलता येऊ शकतो. त्यासाठी महत्त्वाचे औषध असते समुपदेशन. कारण, ते औषध असून ते कानातून मेंदूत जाते व योग्य परिणाम करते. परंतु त्यासाठी कान ते मेंदू हा मार्ग नेहमी स्वच्छ असला पाहिजे. म्हणजेच संबंधित व्यक्तीने स्वत:हून बदल करण्यासाठी येणे आवश्यक असते.

 संवेदनहीनतेचे तत्त्व

ज्या गोष्टीने नुकसान होऊ नये असे वाटते, पण जी गोष्ट अपरिहार्य असते त्या गोष्टीला हळूहळू पण मुद्दामून सामोरे जाणे फायदेशीर ठरते. यालाच संवेदनहीनतेचे वा डीसेन्सिटायझेशनचे तत्त्व असे म्हणतात. ही पद्धत वेगवेगळ्या रोगांच्या लसीकरणाच्या वेळी वापरली जात असते. यासाठी त्याच रोगाच्या जंतूंना त्यांचा मूळ स्वभाव शाबूत ठेवून त्यांची घातकता कमी करून वापरले जाते. त्याचा आयुष्यभर फायदाच होते. लैंगिक शिक्षणाच्या बाबतीत टप्प्याटप्प्याने ते दिले असता त्यातील सामाजिक घातकता उलट कमीच होईल. एवढेच नव्हे तर हे शिक्षण नसतानाही लैंगिक समस्या, एचआयव्ही-एड्स, घटस्फोट यांचे प्रमाण वाढत चाललेच आहे हे वास्तवही सर्वानी लक्षात घेतले पाहिजे. कुठल्याही विषयाच्या शास्त्रीय ज्ञानाने कोणाचेही कधीच नुकसान होत नसते. फायदाच होतो. संवेदनहीनतेचे तत्त्व हे शरीरसंबंधांच्या नसर्गिक ऊर्मीचा आवेग स्वत:च्या अधीन ठेवायला निश्चितच उपयुक्त ठरते, ज्याचीच आत्ताच्या काळात अधिक गरज आहे असे वाटते.

पौगंडावस्थेतील पाल्याची जाणीव पालकांना तसेच शिक्षकांना असणे जरुरीचे असते. सध्याच्या माहितीयुगात इंटरनेट, समाजमाध्यमे यातून वासना चाळवणाऱ्या गोष्टी जेव्हा अशा पाल्यांच्या हाती लागतात तेव्हा या वयातही त्यांच्याकडून काही त्या संदर्भातील आपल्याला नको वाटणाऱ्या गोष्टी घडू शकतात याचे भान समाजातील सर्वानीच ठेवणे नितांत गरजेचे असते.

हल्लीच्या काळात मुला-मुलींची पौगंडावस्था पूर्वीच्या तुलनेत खूप लवकर सुरू होते. अकरा, बारा वर्षांच्या आतच, मग लैंगिक उत्सुकता चाळवली जाते. यातून प्रसंगानुरूप काही लैंगिक गुन्हेही घडू शकतात, घडतातही. म्हणून सध्याचं पालकत्व हे जास्तच जबाबदारीनं हाताळणं गरजेचं झालेलं आहे.

शिक्षण जेव्हा दिले जाते तेव्हा ते घेणारी व्यक्ती त्याविषयी अज्ञानी राहू नये हा उद्देश असतो. शरीरसंबंध वा सेक्स हे मानवामध्ये एक महत्त्वाचे व मूलभूत नाते आहे. केवळ वीर्यविसर्जनाची क्रिया नाही. म्हणूनच शरीरसंबंधांविषयीचे शिक्षण हे स्त्री-पुरुष नातेसंबंधाचे शिक्षण आहे. हे विशेष नाते हे त्रिबंध स्वरूपाचे असते, मानसिक, भावनिक व शारीरिक. याविषयीच्या ज्या समस्या समाजात तीव्रतेने आढळत आहेत त्या शरीरसंबंधांविषयीच्या अज्ञानातूनच नव्हे तर गरज्ञानातूनच जास्त निर्माण होत असतात. त्यामुळे याविषयी शिक्षण देणाऱ्यांच्या पुढे महत्त्वाचा अडथळा असतो तो म्हणजे लोकांना काय माहीत नाही तेवढेच ज्ञान देणे नसून त्यांना जे माहीत आहे ते कसे चुकीचे आहे हे त्यांना पटवून त्यातून परावृत्त करणे. लैंगिक समस्यांची बीजे अज्ञानापेक्षा गरज्ञानातूनच पेरली जात असतात. चुकीच्या माहितीतून निर्माण होणारा विचार हा जास्त अढळ असतो. त्यामुळे गरज्ञान टाळण्यासाठी लैंगिक विषयात योग्य वयापासून योग्य ज्ञान मिळायला लागणे हे आपल्या समाजाचे पुरोगामी लक्षण ठरणार आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या युवावस्थापूर्व लैंगिकता (अ‍ॅडोलेसन्ट सेक्शुआलिटी) व लैंगिक व्यक्तिमत्त्व यांचे सामाजिक महत्त्व मोलाचे आहे.

लैंगिकतेचे नागरिकशास्त्र 

शालेय शिक्षणामधला दुसरी-तिसरीपासूनचा एक विषय म्हणजे नागरिकशास्त्र. जेव्हा एखादी व्यक्ती समाजामध्ये वावरायला लागते तेव्हा ती नागरिक असते आणि त्या व्यक्तीने अशा वेळी पाळायचे नियम यालाच आपण नागरिकशास्त्र म्हणतो. त्या त्या समाजामध्ये कायद्याच्या रूपात हे नागरिकांसाठीचे नियम केलेले असतात. हे नियम ज्या वेळी पाळले जात नाहीत तेव्हा त्यातून समाजामध्ये घडणाऱ्या उपद्रव-कृतीला आपण गुन्हा म्हणतो. दुर्दैवाने लैंगिक वर्तणुकीविषयी असे नागरिकशास्त्र अस्तित्वातच नाही. याची नितांत आवश्यकता असते याची जाणीवच सामाजिक व शासकीय स्तरावर नाही. सामाजिक लैंगिक वर्तणुकीमध्ये काय पथ्ये व नियम पाळली पाहिजेत हे प्रत्येकाला कळणे आवश्यक आहे. लैंगिक गुन्हेगारी टाळण्यासाठी सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये हे फारच आवश्यक आहे. लैंगिक शिक्षणामध्ये म्हणूनच व्यक्तिगत लैंगिकतेच्या ज्ञानाबरोबरच लैंगिकतेतील नागरिकशास्त्राचाही विचार आवश्यक आहे.

लैंगिकतेचा उदय 

अनादी काळापासून शरीरसंबंधांविषयी अपरंपार कुतूहल, उत्सुकता आणि उद्युक्तता सर्व प्राणिमात्रातच असल्याने मनुष्यप्राणी हा काही त्याला अपवाद नाही. निसर्गाने जेव्हा प्राणिजगत निर्माण केले तेव्हा दोन गोष्टींचा पूर्ण विचार केला. त्या ‘प्राण्याचे अस्तित्व’ (इंडिव्हिज्युअल एक्झिस्टन्स) आणि त्याच्या ‘वंशाचे अस्तित्व’ (स्पेशीज एक्झिस्टन्स) हे टिकणे आवश्यक आहे. आणि त्यातूनच त्या प्राण्याच्या वंशात लिंगभेद करून त्यांच्यात एक अनाकलनीय आकर्षण निर्माण केले. त्याची उपजत प्रेरणा (बेसिक इंस्टिंक्ट) त्या प्राण्याच्या मेंदूत नोंदवून निसर्गाने त्यातून आनंददायी घडामोड घडवली, ती म्हणजेच लैंगिकता, शरीरसंबंध वा सेक्स. तहान, भूक, मल-मूत्र विसर्जन, झोप अशा इतर मूलभूत प्रेरणांसारखे या संबंधांचेही विशिष्ट केंद्र मेंदूतील गाभ्यातील ‘हायपोथॅलॅमस’ या भागात निर्माण केले. शरीरसंबंधाची भावना ही प्राणिजगतातील सर्वात बलवत्तर अशी दुसरी मूलभूत प्रेरणा आहे. पहिली म्हणजे स्वरक्षण!

मेंदूतील त्या ‘हायपोथॅलॅमस’मधील सेक्सच्या केंद्रात ठरावीक काळाने काही विशिष्ट रासायनिक प्रक्रिया सुरू होण्याची सोयही निसर्गाने केली. प्राणिजगतातील दोन अतिप्राचीन ‘पेप्टाईड’ रासायनिक द्रव्यसंच आधुनिक मानवातही वारसाहक्काने आलेले आहेत. यात एक ऑक्सीटोसीन-व्हाजोप्रेसीन ग्रुप व सगळ्यात महत्त्वाचे पेप्टाईड रसायन आहे जीएनआरएच. प्राण्यातील लैंगिकतेची सुरुवात  याच रसायनाने होतो. यांच्यामुळेच मनुष्याची लैंगिक अवयवांची वाढ, लैंगिक गुणधर्माचे प्रकटीकरण होत असते. जन्मानंतर विशिष्ट कालावधीनंतर जीएनआरएचचे कार्य पुन्हा एकदा सुरू होते. याच काळाला आपण ‘वयात येणे’, प्युबर्टी असे संबोधतो. स्त्रीमधील या काळाला वैद्यकीय भाषेत याला ‘मिनार्की’ असे म्हणतात. म्हणूनच त्याची ओळख शाळेपासून हवी.

शालेय लैंगिक शिक्षण काय व कसे द्यावे?

आज अनेक शाळांमध्ये या विषयाचे शिक्षण, शारिरीक शिक्षण दिले जाते, मात्र औपचारिक पद्धतीने लैंगिक शिक्षण हा विषय शिकवणे गरजेचे आहे. म्हणून शाळेत हा विषय कसा हाताळावा या संबंधी विचार व्हायला हवा. मुळात इतर शास्त्र विषय शिकवले जातात तसाच शिकवायचा हा विषय आहे. पहिल्यांदा हे लक्षात घ्यावे की, आठवी, नववी व दहावीमध्ये  जीवशास्त्रामध्येच याचा समावेश फायदेशीर ठरू शकतो. लैंगिक शिक्षण म्हणजे संभोगशास्त्र शिकवणे नाही. हा समज ठेवल्यानेच गोंधळ होत आहेत.

आठवी, नववी आणि  दहावीच्या अभ्यासक्रमात टप्प्या टप्प्याने याचा अभ्यास शारीरिक, मानसिक, भावनिक नात्याने व्हायला हवा.  याच काळात प्रेम, प्रेमाचे विविध प्रकार, कोवळे प्रेम, एकतर्फी प्रेम, त्यांचे वैयक्तिक व सामाजिक दुष्परिणाम याचीही जाणीव करून देणे आवश्यकच नव्हे तर अत्यावश्यकही आहे.

या काळात मुलांना इंटरनेट-माध्यमातून, समवयस्कांकडून (पीयर ग्रुप), वाचनामधून या संबंधांची माहिती घेण्याचा कल असतोच. इंटरनेट सर्फिग, चॅटिंग याचीही सवय लागते. म्हणूनच याच सुमारास याची योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोचवली पाहिजे. नाही तर चुकीच्या माहितीतून किंवा उत्तेजनाच्या अनावरपणातून एखादे कृत्य घडल्यास नंतर पश्चात्ताप त्यांना व पर्यायाने पालकांना होऊ शकतो. इट इज बेटर टू प्रीपेअर अ‍ॅण्ड टू प्रीव्हेन्ट रादर टू रिपेअर अ‍ॅण्ड टू रिपेंट, अशी एक म्हणच आहे. ज्ञान देण्याच्या संकोचामुळे उद्भवणाऱ्या नंतरच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक पश्चात्तापापेक्षा शैक्षणिक मोकळेपणाने होणारा सामाजिक फायदा शिक्षणकर्त्यांनी लक्षात घेतला पाहिजे.

पूर्वी ‘सोळावं वरीस धोक्याचं’ मानलं जायचं परंतु ते वय खूपच अलीकडे आले आहे. त्यामुळे परिलगी व्यक्तीशी वागताना वापरायचे तारतम्य ( दोघांनीही) दुसऱ्यांशी वागताना आपण स्वत: पाळायची पथ्ये,  शारीरिक वाढीला मानसिक वाढीची लागणारी जोड याचा सखोल विचार करणे जरुरीचे आहे. आपला समाज पाश्चात्त्यांप्रमाणे स्वकेंद्रित नसून, नातेकेंद्रित असल्याचे मुलांवर ठसवले पाहिजे.

हा विषय हाताळताना अत्यंत प्रगल्भता, संवेदनशीलतेची गरज लागणार असल्याने त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडून अभ्यासक्रम तयार करून प्रथम शिक्षकांना प्रशिक्षित करणे. इतकेच नव्हे तर पालकांसाठीही खास वर्ग आयोजित करणे. कारण पालकांमध्येही हा विषय कसा हाताळायचा याविषयी गोंधळ असतोच त्यामुळे पालक आणि शिक्षक यांचे शरीरसंबंधाविषयीचे गरसमज, गंड दूर झाले तरच हा विषय ते मोकळेपणाने व आत्मविश्वासाने शिकवू शकतील. मुलांशी या विषयावर थेट आणि स्पष्टपणे बोलू शकतील. हे शिक्षण मुलामुलींना जमल्यास एकत्रपणे नाहीतर स्वतंत्ररीत्या दिले तरी ते परिपूर्णच दिले जावे. शरीरसंबंधांच्या अशा प्रकारे देण्यात येणाऱ्या शास्त्रीय ज्ञानाने समाजाचा फायदाच होणार असल्याने पौगंडावस्थेतील सेक्स एज्युकेशनचा विचार अधिक गांभीर्यानेच शिक्षणतज्ज्ञांनी केला पाहिजे. समाजस्वास्थ्यासाठी हे अत्यंत महत्वाचे झाले आहे.

 ‘पोर्नहबया संकेतस्थळाने २०१६ मध्ये केलेले सर्वेक्षण..

 • जगात २०१६ मध्ये ९२ अब्ज पोर्न व्हिडीओ पाहिले गेले.
 • म्हणजे वर्षांत एकूण ४.६ अब्ज तास व्हिडीओ पाहिले गेले.
 • याचा अर्थ जगात दर दिवशी ६४ दशलक्ष किंवा दर मिनिटाला ४४,००० व्यक्ती पोर्न क्लिप्स पाहत होते.
 • अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि भारत या देशांत सर्वाधिक पोर्न व्हिडीओ वा क्लिप्स पाहिल्या गेल्या.
 • जागतिक पातळीवर प्रेक्षकांची लेस्बियन या प्रकाराला सर्वाधिक पसंती होती. गतवर्षीही याच प्रकाराला सर्वाधिक पसंती होती.
 • कॉम्प्युटर डेस्कटॉपपेक्षा मोबाइल फोनवर पोर्न साईट्स पाहण्यात मोठी वाढ.
 • २०१० पासून २०१६ पर्यंत मोबाइल फोनवर पोर्न साईटस् पाहणाऱ्यांच्या संख्येत तब्बल १४२४ टक्के वाढ झाली आहे.
 • जगभरात रात्री १० ते १२ वाजण्याच्या दरम्यान सर्वाधिक पोर्न व्हिडीओ वा क्लिप्स पाहिल्या जातात. सुटीच्या दिवशी ही वेळ रात्री ३ वाजेपर्यंत वाढते.

भारतासंबंधी आकडेवारी..

 • भारतात पोर्न साईट्स पाहणाऱ्यांपैकी ४८ टक्केटीनएजर्स वा पौगंडावस्थेतील मुलं आहेत तर अन्य २५ टक्के २५ ते ३४ या वयोगटातील आहेत.
 • भारतातील सर्वाधिक पोर्न साहित्याचे प्रेक्षक १८ ते २४ या वयोगटातील आहेत.
 • भारतीयांकडून इंडियन हा शब्द पोर्न साइट्सवर सर्वाधिक शोधला जातो. म्हणजे भारतीयांना भारतीय पोर्न व्हिडीयो पाहायला आवडतात.
 • भारत पोर्न साईट्स बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या – पुरुष ७०, स्त्रिया ३० टक्के.
 • जगात पोर्न व्हिडीयो पाहणाऱ्या स्त्रियांची संख्या २०१५ मध्ये
 • २६ टक्के होती. ती २०१६ मध्ये २ टक्क्यांनी वाढली.
 • जगातील सर्वाधिक महिला पोर्न साईट्सचे प्रेक्षक असणारे देश .. जमैका ४८ टक्के, मायक्रोनेशिया ४२ टक्के, बहामा ४२ टक्के, मोल्डोव्हा ४० टक्के.

शरीरसंबंधांविषयीचे शिक्षण हे स्त्री-पुरुष नातेसंबंधाचे शिक्षण आहे. हे विशेष नाते हे त्रिबंध स्वरूपाचे असते. मानसिक, भावनिक व शारीरिक. याविषयीच्या ज्या समस्या समाजात तीव्रतेने आढळत आहे त्या शरीरसंबंधांविषयीच्या अज्ञानातूनच नव्हे तर गरज्ञानातूनच जास्त निर्माण होत असतात. त्यामुळे या विषयी शिक्षण देणाऱ्यांच्या पुढे महत्त्वाचा अडथळा असतो तो म्हणजे लोकांना काय माहीत नाही तेवढेच ज्ञान देणे नसून त्यांना जे माहीत आहे ते कसे चुकीचे आहे हे त्यांना पटवून त्यातून परावृत्त करणे.

सध्याच्या पिढीला तंत्रज्ञानातून नको इतक्या झपाटय़ाने मिळणारी माहिती हे लैंगिकतेच्या जाणिवेमध्ये प्रभावी कारण आहे. परंतु ही मिळणारी माहिती शास्त्रीय नसल्याने या लैंगिक गरज्ञानातून मुलांमध्ये निर्माण होणारे लैंगिक मनोगंड व्यक्तिगत तसेच सामाजिकदृष्टय़ा धोकादायक ठरू शकतात.

‘सोळावं वरीस धोक्याचं’ मानलं जायचं परंतु ते वय खूपच अलीकडे आले आहे. त्यामुळे परिलगी व्यक्तीशी वागताना वापरायचे तारतम्य ( दोघांनीही) दुसऱ्यांशी वागताना आपण स्वत: पाळायची पथ्ये,  शारीरिक वाढीला मानसिक वाढीची लागणारी जोड याचा सखोल विचार करणे जरुरीचे आहे. आपला समाज पाश्चात्त्यांप्रमाणे स्वकेंद्रित नसून, नातेकेंद्रित असल्याचे मुलांवर ठसवले पाहिजे.

‘सोळावं वरीस धोक्याचं’ हे माहीत असल्याने परिलगी व्यक्तीशी वागताना वापरायचे तारतम्य, दुसऱ्यांशी वागताना आपण स्वत: पाळायची पथ्ये,  शारीरिक वाढीला मानसिक वाढीची लागणारी जोड याचा सखोल विचार करणे जरुरीचे आहे. आपला समाज पाश्चात्त्यांप्रमाणे स्वकेंद्रित नसून, नातेकेंद्रित असल्याचे मुलांवर ठसवले पाहिजे.

डॉ. शशांक सामक

shashank.samak@gmail.com

(डॉ. शशांक सामक हे पुण्यातील क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट असून त्यांनी स्वत:ची ‘डॉ. सामक सेक्शुअल फिटनेस थेरपी’ प्रसिद्ध केली आहे. ती एकमेव भारतीय सेक्स थेरेपी असून अमेरिकन व इतर विविध आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. १९८१ पासून लैंगिकशास्त्र क्षेत्रात कार्यरत असून ‘क्रिस’ या संस्थेचे अध्यक्ष व ‘डॉ. सामक अ‍ॅकॅडमी ऑफ सायंटिफिक सेक्शुआलिटी’ या संस्थेचे अध्यक्षीय संचालक आहेत. ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’ या प्रसिद्ध स्टेज शोचे ते जनक व सादरकर्ते आहेत. ‘वैद्यकीय कामशास्त्र’ व ‘नवविवाहितांचे कामजीवन’, ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.)

First Published on July 15, 2017 1:28 am

Web Title: marathi articles on pornography business