‘युनियन ट्रस्ट ऑफ इंडिया’च्या ३२ कोटी रुपयांच्या अफरातफरीच्या गुन्ह्य़ाची उकल, मुद्रांक घोटाळ्यातील तपास, सिने अभिनेत्री रेश्मा ऊर्फ लैला खान हिच्या हत्येचा तपास करणं, २०११ मध्ये हैदराबादहून मुंबईला आलेला १ कोटी ४५ लाख किमतीचे हिरे व सोन्याचा

मुद्देमाल आरोपींसह हस्तगत करणं, दुबईच्या रोशन अन्सारीला नाटय़मय अटक करणं, इतकं नव्हे तर ‘मर्दानी’ चित्रपटासाठी राणी मुखर्जीला तालीम देणं, भ्रूणहत्येच्या विरोधात ११ दिवसांत १३ राज्यांमध्ये ६५८०  किलोमीटर प्रवास चारचाकी वाहनाने करून फास्टेस्ट वूमन म्हणून ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद असणं, अशी भरगच्च कामगिरी केलेल्या २६ वर्षांच्या सेवेनंतर आता गुप्तचर शाखेच्या साहाय्यक आयुक्त ज्योत्स्ना रासम यांच्या असामान्य कामगिरीचा आढावा.

‘‘दु  बईमध्ये आपल्या सावत्र मुलाची हत्या करून  भारतात पळून आलेल्या रोशन अन्सारीचा शोध घेण्याची जबाबदारी केंद्रीय गुन्हे अन्वेषणकडे (सीबीआय) होती. वर्ष होतं, २००२. त्या वेळी ‘सीबीआय’मध्ये कार्यरत असलेल्या नीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली ज्योत्स्ना रासम यांनी काम करण्यास सुरुवात केली होती. तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता रोशन पूर्ण देशात हवाई मार्गाने फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सातत्याने तिचा माग काढत असताना, ती मुंब्य्रात तिच्या आईकडे आल्याची खात्रीलायक माहिती सीबीआयला मिळाली. पथकाने पूर्ण तयारी करून तिथे छापा मारण्याचे ठरवले. पथकातील काही अधिकारी राज्यातले नव्हते, त्यामुळे मुंब्य्रात पोलिसी खाक्या चालणार नाही, हे मी त्यांना सांगितले. तेव्हा, सापळा कसा रचायचा हे सांगण्याची जबाबदारी वरिष्ठांनी माझ्यावरच सोपवली.  माझ्या गुन्हे शाखेतील अनुभवामुळे मुंब्य्रात कारवाई करताना स्थानिकांची मदत मोलाची ठरते हे मला ठाऊक होते. आम्हाला रोशनचे जे घर मिळाले होते, त्या घराच्या आसपासच्या घरांमध्ये आम्ही चौकशी केली, मी वेशांतर करूनच गेले होते. त्यामुळे मीही एखादी सामान्य मध्यमवर्गीय महिला असल्याचेच शेजाऱ्यांना वाटत होते. फरार असलेल्या रोशनजवळ कोणते हत्यार आहे का, तिच्यासोबत कोण आहे, याची काहीच माहिती आम्हाला नव्हती. तसेच, छापा मारताना ती हातातून निसटली तर ती पुन्हा मिळेल की नाही, याचीही खात्री नव्हती. त्यामुळे आपला पूर्ण अनुभव तिथे पणाला लावण्याचे मी ठरवलं. रोशनच्या शेजारच्या माणसाला विश्वासात घेऊन त्याला आम्ही तिथे का आलो, हे सांगितलं. तेव्हा त्यानं सहकार्य करण्याचं तातडीनं कबूल केलं. रात्र झाली की शेजाऱ्याने रोशनच्या आईला हाक मारायची, ओळखीचा आवाज ऐकून दार उघडलं, की धडक मारत रोशनला ताब्यात घ्यायचं, असं नियोजन करण्यात आलं होतं. शेजाऱ्याशी बोलतानाच रोशनच्या घराची रचनाही आम्ही जाणून घेतली, त्यामुळे पळून जाण्यासाठी दरवाजा हा एकच मार्ग असल्याचं स्पष्ट होतं. ठरल्याप्रमाणे शेजाऱ्याने रोशनच्या आईला आवाज दिला. दबा धरून बसलेलं आमचं पथक सतर्क झालं. रोशनच्या आईने शेजाऱ्यांचा आवाज ऐकून निश्चिंतपणे दार उघडलं तेव्हा बेधडक घरात घुसत बेसावध रोशनच्या मुसक्या मी आवळल्या. ती या प्रकाराने काहीशी गोंधळलीच, पण तिला कळून चुकलं की, तिचा खेळ संपला आहे. आमच्या पथकाचं कौतुक सीबीआयकडून तर झालंच, त्याचबरोबर दुबई सरकारनंही आमच्या पथकाचं विशेष कौतुक केलं. महिनाभर केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं तर वाटलंच, पण एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे दुसऱ्या देशानं आपल्या देशाचे आभार मानले, ही बाबही निश्चितच अभिमानास्पद होती..’’

ज्योत्स्ना रासम यांच्या कारकीर्दीत या यशाने मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला. २७ वर्षांपूर्वी पोलीस दलात उपनिरीक्षक पदावर दाखल झालेल्या ज्योत्स्ना विलास रासम आज साहाय्यक आयुक्त म्हणून राज्य गुप्तचर विभागात कार्यरत आहेत. इतक्या वर्षांच्या प्रवासात त्यांनी अनेक कामगिरी फत्ते केल्या. ‘युनियन ट्रस्ट ऑफ इंडिया’च्या ३२ कोटी रुपयांच्या अफरातफरीच्या गुन्ह्य़ाची उकल करून सूत्रधार व इतर आरोपींना पकडून त्यांचे १५ बँका, स्टॉक एक्स्चेंजमध्ये आरोपींनी केलेले व्यवहार शोधून अत्यंत किचकट गुन्ह्य़ाची उकल, मुद्रांक घोटाळ्यातील तपास, सिने अभिनेत्री रेश्मा ऊर्फ लैला खान हिच्या कुटुंबीयांसह ५ व्यक्तींचे सांगाडे दीड वर्षांनंतर हस्तगत करणं, २०११ मध्ये हैदराबादहून मुंबईला आलेले सोने व हिरे असलेले सुमारे १ कोटी ४५ लाख किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्यानंतर त्याचा अविरत तपास करून आरोपींना अटक करत पूर्ण मुद्देमाल हस्तगत करणं यांसारख्या अनेक कामगिरी त्यांनी बजावल्या. त्या पोलीस अधिकारी म्हणून कौतुकास्पद आहेतच, पण एक स्त्री अधिकारी म्हणूनही महत्त्वाच्या. स्त्री कुठल्याच क्षेत्रात मागे नाही यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणाऱ्या ठरल्या आहेत.

याची सुरुवात झाली त्या वेळी त्या २२ वर्षांच्या होत्या. त्या सांगतात, ‘‘दोन वर्षांपूर्वीच पोलीस उपनिरीक्षक पदावर मुंबई पोलीस दलात रुजू झाले होते. त्या वेळी मुंबई पोलीस दलाच्या गिर्यारोहण मोहिमेत मी सहभागी झाले. १७ हजार ते १९ हजार फूट उंचीच्या तीन शिखरांवर चढाई करण्याची ही मोहीम होती. सात जणांच्या या मोहिमेत मी एकटी स्त्री होते. माझे वय, माझे बाई असणं मुळीच आड आलं नाही. १९९१ मध्ये हनुमान तिब्बा (१९४५० फूट), शितीधर (१७३४० फूट) आणि फ्रेंडशिप (१७१०० फूट) या तीन शिखरांना आमच्या चमूने यशस्वीपणे गवसणी घातली. मुंबई पोलीस दलासाठी ही कमालीची अभिमानाची गोष्ट होती. अत्यंत खडतर परिस्थितीत सर केलेल्या शिखरांनंतर आतापर्यंतच्या कारकीर्दीत मला कुठलीच मोहीम अवघड वाटली नाही. पोलीस दलातील नोकरी असो की कुटुंबाची जबाबदारी, त्यात कुठेही कमी पडले नाही.’’ आपल्या कारकीर्दीविषयी सांगत असतानाच गुप्तचर विभागात येणारी माहिती हातावेगळी करत, सूचना देत त्या संवाद साधत होत्या..

‘‘आमचे कुटुंब मूळचे राजापूरचे, पण जन्मापासून आतापर्यंतचे आयुष्य मुंबईत गेले. वांद्रे, गांधीनगर भागांत राहणारी असल्याने न्यू इंग्लिश स्कूल, नंतर चेतना महाविद्यालय इथे माझे शिक्षण झाले. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय, वडील छापखान्यात कामाला होते, तर आई घर सांभाळायची; पण खाण्यापिण्यापासून शिक्षणापर्यंत आईवडिलांनी आमची कधीही आबाळ होऊ दिली नाही,’’ ज्योत्स्ना रासम लहानपणीच्या आठवणींमध्ये रमतात. ‘‘उलट, आईने आम्हा तिन्ही बहिणींच्या शिक्षणाचा आग्रह धरला. शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही, हे माहीत असल्याने आम्हीही मन लावून शिकलो. आपल्या मुलींनी केवळ शिक्षण घेऊन न थांबता त्यांचा सर्वागीण विकास व्हावा यासाठी तिने खेळ, एनसीसी यांसारख्या उपक्रमांत मला भाग घेण्यास प्रोत्साहित केले. मलाही खेळांमध्ये गती आहे हे लक्षात येऊ लागले, तर एनसीसीमधील सैनिकी शिस्त, त्यांची होणारी शिबिरे आवडू लागली. एनसीसीच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयात देशातील अनेक ठिकाणी शिबिरांमध्ये मी सहभाग घेतला. त्याच वेळी लष्कर नाही तर पोलीस दलात जायचे हा निर्धार मनाशी पक्का केला. मुलगी असली तरी आईने आम्हाला कधीही मुलांपेक्षा कमी समजले नाही, सातत्याने पाठिंबा दिला.’’ रासम सांगतात तेव्हा आईविषयीची कृतज्ञता त्यांच्या स्वरातून जाणवते. ‘‘वाणिज्य शाखेतून शिक्षण घेत असतानाच पदवीच्या तिसऱ्या वर्षांला असतानाच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी जाहिरात आली होती. घरातून तर पाठिंबा होताच, परीक्षा दिली आणि मी उत्तीर्णही झाले. १९८९ मध्ये नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात असताना तिसऱ्या महिन्यात माझ्या एका बहिणीचा अकाली मृत्यू झाला. पूर्ण कुटुंबच हादरलं. मी घरी आले तेव्हा, अशा अवस्थेत मी काय करावं, हे समजत नव्हतं, पण आईनंच मला मार्ग दाखवला. तिनं मला धीर दिला आणि पुन्हा प्रशिक्षणाला जाण्यास सांगितले. तेव्हापासून आपले कर्तव्य आणि कौटुंबिक दु:खं यांना वेगळंच ठेवण्याची एक सवय लागली.’’ ज्योत्स्ना अगदी सहज बोलून जातात. त्या कार्यरत असलेल्या विभागात तशी पुरुषांची मक्तेदारी, पण तिथे सहजतेनं काम करताना त्यांनी पोलिसी दलाचं हे ब्रीद किती आत्मसात केलं हे स्पष्ट होतं.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईतील विमानतळ सुरक्षा विभागात मी रुजू झाले. एक प्रकारे बंदोबस्ताचेच काम तिथे अधिक होते. डिसेंबर ९२ च्या दंगलीपासून ते मार्च ९३ मुंबई बॉम्बस्फोटापर्यंत सर्वत्र गोंधळ माजला असताना, विमानतळाची सुरक्षा राखण्याचे काम आमच्या विभागावर होते. स्फोटाच्या दिवसापासून तर पुढील आठवडाभर विभागातील एकही कर्मचारी घरी गेला नाही. सर्व जण दिवसरात्र बंदोबस्तात गुंतलो होतो. त्यानंतर मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात माझी नियुक्ती झाली. त्या वेळी पोलीस दलात महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या आतासारखी नव्हती. त्या वेळी पोलीस ठाण्यात मी आणि माझी एक सहकारी अशा दोनच महिला पोलीस ठाण्यात होतो, पण कुठल्याच क्षणी आपल्यामुळे इतर सहकारी अवघडलेत असे वाटले नाही. उलट सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्याचा हात पुढे केला.’’ ज्योत्स्ना ९० च्या दशकातील अनुभव सांगताना उत्साहात येतात. ‘‘पोलीस ठाण्यात प्रवेश केल्या केल्या समोरच असणाऱ्या एका टेबलावर आम्ही बसायचो, पण तो टेबल इतका उंच होता की जेमतेम आमचे डोळे पलीकडून दिसायचे.’’ ज्योत्स्ना हसत हसत सांगतात. पोलीस दलात महिला अधिकारी हा प्रकार पोलीस अधिकाऱ्यांना नव्हे तर जनतेलाही नवीन होता. त्यामुळे त्या वेळचे आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब सकपाळ गस्तीवर निघाले की, आम्हाला यायला सांगायचे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाजारातून आम्ही पायीच गस्त घालायचो तेव्हा सकपाळसाहेब आमची ओळख त्यांच्याशी करून देत. अशा प्रकारच्या प्रोत्साहनामुळे आमचा विश्वास दुणावत होता. सकपाळसाहेब असो की पोलीस ठाण्यातील इतर व्यक्ती कधीही आम्ही स्त्री आहोत म्हणजे वेगळ्या आहोत, असं जाणवू दिलं नाही. पुरुष अधिकाऱ्यांना सांगण्यात येणारी कामे कुठलाही दुजाभाव न करता आम्हाला विश्वासानं सांगण्यात येत.’’

पोलीस दलात दाखल झाल्यानंतर अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. तुम्हाला गोठवून टाकणारा प्रसंग कोणता, असं विचारल्यावर ज्योत्स्ना लगेचच त्यांच्या या पोलीस ठाण्यातील आठवण सांगतात. ‘‘ठाण्यात रुजू होऊन काही महिनेच झाले होते. सायंकाळी एक कॉल आला, एक पूर्णपणे जळालेला मृतदेह सापडला असून तो रुग्णालयात नेण्यात आला आहे. त्याच्या पंचनाम्यासाठी मला जाण्यास सांगण्यात आले. मी आयुष्यात मृतदेह असा कधी जवळून पाहिला नव्हता. त्यात रुग्णालयाच्या शवागारात दाखल झाल्यावर झाकून ठेवलेला तो मृतदेह माझ्यासमोर होता. मी हवालदाराला  मृतदेहावरील चादर बाजूला करण्यास सांगितलं. हवालदार काहीसा चपापला. त्याला हे अपेक्षित नव्हतं. ‘मॅडम, मी पंचनामा करतो, तुम्ही सही करा फक्त’, असं म्हणत त्यानं मला सावरण्याचा प्रयत्न केला. उलट मी त्याला, ‘मी पंचनामा करते, तुम्ही निश्चिंत राहा’, असं निर्धारानं सांगितले. हवालदारानं चादर दूर केल्यावर मात्र मी मुळापासून हादरले. मानवी शरीराची झालेली ती अवस्था पाहून मात्र कसंसंच झालं. अधिकारी असले तरी अवघ्या पंचविशीतल्या माझ्या मनाला क्षणोक्षणी हादरे बसत होते. तरीही कर्तव्यापुढे भावना येऊ द्यायची नाही, असं मनाशी पक्के असल्यानं तो पंचनामा पूर्ण केला आणि मी तिथून बाहेर पडले. रात्रीचे १२ वाजत आले होते, मी लोकलनं घरी निघाले. समोर दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये मला त्या मृतदेहाचा चेहरा दिसत होता. वांद्रे येथे उतरल्यावर मी अक्षरश: घरी पळतच गेले, पण त्या अनुभवाची वाच्यता कुठेही केली नाही. आज ती रात्र आठवली की हसू येतं.’’ त्यानंतर अनेक खून, पाशवी बलात्काराचा तपास ज्योत्स्ना यांनी सक्षमपणे केला, उलट त्यांनी केलेल्या तपासात आरोपींना चांगली शिक्षाही झाली.

‘‘पोलीस दलात दाखल होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्याला बंदोबस्त आणि गुन्हे तपास या दोन्ही पातळ्यांवर काम करावे लागते. गुन्हे तपासात माझा रस वाढत होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गुन्ह्य़ांमध्ये तपासासाठी त्यांना सहकार्य करता आले. त्या वेळी, आपल्याला तपासकामात गती आहे हे उमजत गेले. त्याचाच फायदा मग पुढे गुन्हे प्रकटीकरण शाखेत नियुक्ती झाल्यावर मिळाला. त्यानंतर वांद्रे पोलीस ठाणे, विशेष शाखा आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) येथे मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली.’’ ज्योत्स्ना कृतज्ञतेनं सांगतात. अशीच एक घटना त्यांनी सांगितली.

‘‘९० च्या दशकात गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत असताना एक अजबच गुन्हा विलेपार्ले येथे घडला. एका इमारतीत विजेचे मीटर असलेल्या तळमजल्याच्या ठिकाणी एका पुरुषाचा मृतदेह सापडला होता. या व्यक्तीची हत्या कुणी केली, का केली हे काहीच स्पष्ट होत नव्हतं. त्या व्यक्तीला पत्नी आणि लहानगे मूल होते. अनेकांची चौकशी करूनही हत्येचे कारण, हत्येची पद्धत काहीच स्पष्ट होत नव्हतं; पण न जाणो का मला त्या पुरुषाच्या पत्नीवरच संशय येत होता. किरकोळ शरीरयष्टीची महिला असे काही करू शकेल, असं कुणालाच वरकरणी वाटत नव्हतं; पण चौकशीच्या बहाण्याने किंवा सहज भेटायला म्हणून जाऊन मी त्या महिलेशी संवाद साधत राहिले. त्या बाईला पोलिसी खाक्या दाखवून उपयोग नसल्याचं मला मनातूनच वाटत होतं. त्यामुळे मी तिला सतत तिच्या वैवाहिक आयुष्याविषयी तिच्या मन:स्थितीविषयी बोलत बसे, पण ती काहीच प्रतिक्रिया देत नसे. ही पोलीस अधिकारी तपासासाठी नाही तर आपल्याशी गप्पा मारायला येतेय, असेच तिला हळूहळू वाटू लागलं होतं, तिच्या बोलण्यातून पतीविषयी ती फारशी समाधानी नव्हती याचे मला संकेत मिळू लागले. पतीच्या मृत्यूनंतर १० दिवस उलटेपर्यंत माझा संशय पक्का होत गेला. मी तिला अनेकदा तू हत्या केली असेल तर स्पष्टपणे सांग, उगीच लपवालपवी करू नको, असंही सांगितलं. अखेर पतीचे १२ वे झाल्यानंतर महिला स्वत: पोलीस ठाण्यात गेली आणि तिनं पती झोपल्यानंतर त्याच्या तोंडावर उशी ठेवून मारल्याचं कबूल केलं.’’ त्या बाईनं तुमच्याकडे कबूल करण्याऐवजी पोलीस ठाण्यात कबुलीजबाब दिला, तुमचा एक चांगला तपास हुकला म्हणायचं, असं म्हटल्यावर ज्योत्स्ना मंद स्मितहास्य करत, ‘‘गुन्ह्य़ाची उकल होणं महत्त्वाचं, तो कोणी केला हे नंतर,’’ असं नि:स्वार्थी उत्तर देतात.

ज्योत्स्ना रासम म्हटल्यावर राणी मुखर्जीच्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा उल्लेख होणं अपरिहार्य होतं. तो साराच अनुभव त्यांच्यासाठी आनंदाचा होता. म्हणाल्या, ‘‘तब्बल १५ वर्षे उपनिरीक्षक पदापासून मी एक-एक पायरी चढत वर गेले. गुन्हे प्रकटीकरण शाखेत असताना पोलीस सहआयुक्त हिमांशू रॉय यांचा संदेश मिळाला की, अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या ‘मर्दानी’ चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत असून त्यासाठी तिला मार्गदर्शनाची गरज आहे. त्या वेळी गुन्हे शाखा कक्ष ८ मध्ये मी कार्यरत होते. राणी मुखर्जी यांनी पहिल्याच भेटीत पोलिसांविषयी तिचा आदर व्यक्त करत, चित्रपटाच्या यशापयशापेक्षा भूमिका जास्त चांगली व्हावी, अशी इच्छा असल्याचं मला सांगितलं. पहिल्याच भेटीत राणीनं मला तुम्ही पोलीस एखाद्याच्या श्रीमुखात कशी भडकावता, असं कुतूहलानं विचारलं. मी अक्षरश: त्या वेळी खळखळून हसले होते.’’ ज्योत्स्ना  रासम तो दिवस सांगताना खुलतात. ‘‘मी तिला सांगितलं की, जेव्हा एखाद्याला ठोकायची वेळ येते तेव्हा कठोर व्हावंच लागतं. जेव्हा, ‘माझ्या या सहकाऱ्याच्या कानाखाली मारून दाखवा,’ असं राणी म्हणाली तेव्हा मला तर हसू आवरेना. मी म्हटलं, मी मारलं त्याला तर कवळी बसविण्याचा खर्च करावा लागेल तुम्हाला. चित्रपटात दाखविण्यात येणाऱ्या महिला अधिकाऱ्याचे पात्र २४ तास रणरागिणीचं असतं, तिच्या आयुष्यात येणारे चढउतार, दैनंदिन झगडे कुठेच येत नाही. ते यावेत, अशी अपेक्षाही मी राणीकडे बोलून दाखवली. देहबोलीपासून प्रसंगी चौदावं रत्न दाखविण्याची प्रात्यक्षिके राणी मुखर्जी यांनी आत्मसात केली. आम्हा पोलिसांना सहसा चित्रपट पाहायला वेळच मिळत नाही, परंतु तरी ‘मर्दानी’ चित्रपट वेळात वेळ काढून मी पाहिला. कुठेही भडकपणा आणि अतिरंजित नसलेली महिला पोलीस अधिकाऱ्याची भूमिका मला अत्यंत भावली, राणीनं आम्हा महिला पोलिसांना न्याय दिला,’’ असं ज्योत्स्ना खुलेपणानं मान्य करतात.

थरारक अनुभवांचे वेड असलेल्या ज्योत्स्ना यांनी त्यांची मैत्रीण संपदा रांगणेकर यांच्यासह ११ दिवसांत १३ राज्यांमध्ये ६५८०  किलोमीटर प्रवास स्वर्णीय चतुर्भुज महामार्गावरून चारचाकी वाहनाने पूर्ण केला. या प्रवासादरम्यान त्यांनी स्त्री भ्रूणहत्येविषयी जागृती केली, त्यासाठी त्यांची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये फास्टेस्ट वूमन अशी झाली. या अनुभवाविषयी विचारल्यावर म्हणाल्या, ‘‘संपदाशी गप्पा मारताना कुठे तरी फिरायला जाऊ असे ठरले, पण जर फिरायलाच जायचेय तर काही ध्येय घेऊन बाहेर पडू असे दोघींचेही मत पडले. मग या वेगळ्या मोहिमेची आम्ही आखणी केली. आपण, प्रवास करतोय त्यादरम्यान मार्गात येणाऱ्या प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन आपण किती वाजता पोहोचलो, याची नोंद घ्यायची होती. मग पोहोचल्यावर फक्त सही घेऊन पुढे जाण्याऐवजी पुढील थांब्यावर कुठल्या स्वयंसेवी संस्थेशी बोलता येईल, महिलांशी कुठे संवाद साधता येईल याची पूर्वतयारी करून आम्ही निघत होतो. अवघ्या ११ दिवसांत हा प्रवास संपविताना वेळप्रसंगी १८ तासही आम्ही गाडी चालवली. खूपच प्रेरणादायी आणि रोमांचित करणारा तो अनुभव होता.’’ ज्योत्स्ना सांगतात. १३ राज्यांमधल्या स्त्रिया आमचा प्रवास पाहून कुतूहलाने बोलायला येत, त्यांना ही मोहीम नवलाईची वाटत होती. दोन स्त्रिया इतक्या मुक्तपणे कशा फिरू शकतात, असा प्रश्न अनेकांना पडे. या प्रवासात हजारो स्त्रियांना आम्ही आत्मविश्वास दिला. तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता, हा संदेश पोहोचवला.’’ या मोहिमेसाठी तुमची नोंद ‘लिम्का..’ मध्येही झाली ही खूपच कौतुकाची बाब आहे, असे म्हटल्यावर, ‘‘रेकॉर्डपेक्षा प्रवासात भेटलेल्या स्त्रियांनी दिलेला प्रतिसाद मला महत्त्वाचा वाटतो,’’ असं त्या नम्रपणे सांगतात.

गप्पा सुरू असतानाच त्यांना मुलीचा फोन येतो, अवघ्या ३० ते ४० सेकंदात पूर्ण विचारपूस होऊन फोन ठेवला जातो. मग कुटुंबाच्या विषयाला सुरुवात होते. संपूर्ण प्रवासात कुटुंबीयांची साथ कशी मिळाली असे विचारल्यावर, ‘‘देवाच्या कृपेने आईवडील असो की माझे पती सर्वानीच मला मनापासून साथ दिली. पोलिसाला त्याच्या कुटुंबीयांना कधीच वेळ देता येत नाही. अर्थात तो प्रकार माझ्याही बाबतीत झाला. लग्न, समारंभ, वाढदिवस यांना हजेरी लावायला नेहमीच जमते असे नाही. अडीच दशकांच्या कारकीर्दीत सर्वात मोठी सुट्टी म्हणाल तर गाडीतून मोहिमेसाठी निघालेले ११ दिवस हीच. पण, घरी एक तासही असले तरी मी त्यांनाच तो पूर्ण वेळ देते,’’ हे सांगताना समोर आलेल्या फाइलवर त्या शेरा मारत असतात. ‘‘आईचे काळीज असल्याने मुलांना काय हवे-नको ते पाहिल्याशिवाय मन भरत नाही. पण, अनेकदा त्यासाठीही वेळ मिळत नाही. अशा वेळी माझे पती विलास यांचीही मला मोलाची साथ मिळते,’’ असे त्या सांगतात. मोठी मुलगी सिद्धी आता आर्किटेक्चर करत असून लहान मुलगा राजस पाचवीत आहे. मुलांनी लहान असताना तक्रार केली असेलच तुमच्या गैरहजेरीची, या प्रश्नावर ‘‘आपली आई पोलीस आहे, तिला समाजासाठी वेळ अधिक द्यावा लागतो, हे कळाल्यापासून त्यांनी कधी तक्रार केली नाही. उलट ते अधिक निश्चिंत राहतात. कितीही थकून घरी गेले तरी त्यांना पाहिल्यानंतर पुन्हा एक वेगळी ऊर्जा शरीरात संचारते, पोलीस असले म्हणून काय झाले, घरच्या जबाबदाऱ्या थोडीच नाकारता येतात,’’ हसत हसत ज्योत्स्ना सांगतात. मग घरी मुलांना रागे भरताना पोलीस खाक्या बाहेर येतो की नाही, यावर खळाळून हसत सांगतात, ‘नाही त्याची गरज कधी पडतच नाही,’ ज्योत्स्ना यांच्या भ्रमणध्वनीवर त्यांच्या कुटुंबीयांचेच छायाचित्र झळकते. कुटुंब ही खूप मोठी शक्ती असते, खासकरून स्त्रीसाठी. ‘‘घरातून पाठिंबा असला की मग कुठल्याही आघाडय़ांवर लढण्याचे बळ मिळते,’’ ज्योत्स्ना निर्धाराने सांगतात.

गप्पा संपत असताना ज्योत्स्ना त्यांच्या कारकीर्दीविषयी समाधान व्यक्त करतात. तब्बल २६ वर्षांच्या सेवेनंतर त्या  गुप्तचर शाखेत साहाय्यक आयुक्त पदावर पोहोचल्या आहेत. ज्योत्स्ना यांची आतापर्यंतची सेवा निष्कलंक असून १२३ चांगल्या नोंदी, ७९ प्रशस्तिपत्रके, पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह त्यांच्या नावावर जमा आहेत. २०१२ मध्ये त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना राज्य सरकारने ‘कर्मयोगिनी’ पुरस्कार देऊन गौरविले. याचे श्रेय निश्चितच कुटुंबीयांपासून माझ्या वाटेत भेटलेल्या प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आहे, असे त्या कृतज्ञतेने सांगतात. पोलीस अधिकारी बनणे म्हणजे केवळ परीक्षा उत्तीर्ण करणे नव्हे तर त्यासाठी तुमच्या शरीरात काही अंगभूत गुण असावेच लागतात. सर्वप्रथम एकत्रित काम करण्याची सवय तुम्हाला असायला हवी, संयम, जिद्द, चिकाटी याला पोलीस खात्यात दुसरा पर्याय नाही. शारीरिक मर्यादांना पार करून सर्वोत्तम देण्याची ज्यांची तयारी असेल त्यांनीच या क्षेत्रात येण्याचा विचार करावा; परंतु तुम्हाला आंतरिक समाधान देणाऱ्या व्यवसायांमध्ये पोलीस खात्याचा क्रमांक सर्वात वरचा लागतो, हे मी ठासून सांगू शकते. आपली मालमत्ता, सोने, पैसे, आप्त गमावलेल्या व्यक्तींना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. जेव्हा अशा गुन्ह्य़ांची उकल होते, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असतो. न्याय मिळालेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावरील समाधान तुम्हाला कृतकृत्य करतो. गुप्तवार्ता विभागानंतर कुठल्या खात्यात आपली नियुक्ती होईल, याविषयी ज्योत्स्ना रासम यांनाही माहिती नाही, पण जिथे नियुक्ती होईल तिथे प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम करत राहायचे, असे त्या आत्मविश्वासाने सांगतात. निरोप घेऊन ज्योत्स्ना पुन्हा कार्यमग्न होतात, सहकाऱ्यांकडून येणाऱ्या नोंदीवरून नजर फिरवत त्याला सूचना देणे पुन्हा सुरू होतं..

अनुराग कांबळे

anuraag.kamble@expressindia.com