News Flash

तंत्रज्ञान ‘तिसऱ्यां’च्या मुक्तीचं

तंत्रज्ञानाचं मोल ‘तिसऱ्यांच्या’ जगात नेमकं काय आहे?

तंत्रज्ञानाचं मोल ‘तिसऱ्यांच्या’ जगात नेमकं काय आहे? तंत्रज्ञान त्यांना मुक्त करतं का? आयेशा, प्राची, खुशी, दिशा अशा कित्येक जणी, स्मार्टफोन आणि समाजमाध्यमामुळे त्यांच्यासाठी पर्यायी उद्योग-व्यवसायाच्या शक्यता निर्माण झाल्यातच, पण त्याहीपेक्षा संबंध तुटलेल्या घरच्या लोकांशी पुन्हा एकदा नातेसंबंध प्रस्थापित झालेत. ‘फेसबुक’मुळे तृतीयपंथीय नसलेल्याच्या मनात त्यांना प्रवेश मिळालाय. त्यांच्याशी संवाद सुरू झाला आहे. इंटरनेटमुळे  त्यांच्याही आयुष्यात बिनभिंतीची शाळा सुरू झालीय, त्याने त्यांना दिलाय आत्मविश्वास, धाडस. त्यांचं कौतुक होतंय, त्यांना स्वीकारलं जातंय.. आधुनिक तंत्रज्ञान ही नवी मानसिकता घडवणारं ठरतंय..

‘हम तो भई जैसे है, वैसे रहेंगे.. अब कोई खुश हो या हो खफा, हम ना बदलेंगे अपनी अदा..’ आयेशाला फोन लावला तेव्हा मला ही कॉलरटय़ून ऐकायला मिळाली. आयेशाची नैसर्गिक ओळख आहे तृतीयपंथी. तिच्या रिंगटोनमधूनही तिला काहीएक म्हणणं मांडायचंय. एक ठाम भूमिका स्वत:सकट इतरांसमोरही ठेवायचीय. तुम्ही-आम्ही सगळेच आधुनिक तंत्रज्ञान वापरतो. कधी कळत-कधी नकळत तंत्रज्ञान आपल्यालाही वापरतं. स्मार्टफोन, इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, यूटय़ूब, ट्विटर असं सगळंच आता आपल्या जगण्याचा भाग झालंय. कदाचित तुमचं अकाउंट नसेलही सोशल मीडियावर, तरीही तुम्ही तिथल्या ट्रेण्ड्स, ट्रोल्स आणि धारणांमुळे प्रभावित होत राहता. स्त्री-पुरुष अशी नैसर्गिक ओळख असलेल्यांचं तंत्रज्ञान आणि ‘तिसऱ्या’ जगातले म्हणवले जाणाऱ्यांचं तंत्रज्ञान यात काही फरक, काही सीमारेषा आहेत का? तंत्रज्ञानाचं मोल या तिसऱ्या जगात नेमकं काय आहे? तंत्रज्ञान त्यांना मुक्त करतं का? अशा सगळ्या प्रश्नांना सामोरं जात काही तृतीयपंथीय मैत्रिणींनी त्यांचे अनुभव खुलेपणानं समोर ठेवले.

आयेशा शेख श्रीरामपूरला असते. मी श्रीरामपूरला गेले होते तेव्हा माझी मैत्रीण दिशानं (ती सुद्धा तृतीयपंथी आहे)आयेशाला फोन केला. ती एका कार्यक्रमाच्या दौऱ्यावर होती. आमची भेट होऊ शकली नाही. मग तिच्या व्यावसायिक लावणी शो ‘साजणा करते तुम्हा मुजरा’चे फोटो आणि व्हिडीओ दिशानं मला मोबाइलवर दाखवले. आयेशाशी फोनवर बोलणं झालं तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी आमच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीत पूर्वी येत-जात असायचे. पूर्णत: प्रवेश घेतला नव्हता. इकडे येण्याआधी दहाएक वर्षांपासून स्मार्टफोन वापरायचे. मग ‘ट्रान्सजेंडर कम्युनिटी’त आले आणि फेसबुक अर्थात ‘एफबी’वर माझ्या बदललेल्या रूपातले फोटो टाकू लागले. पहिल्यांदा लोक बिचकायचे. मग बोलू लागले. ‘एफबी’वर मी आशू शेख नावाने आहे. माझी नृत्याची आवड मी तिथं जाहीर केली.  काही व्हिडीओज्ही तिथं टाकले. काही लोकांनी मला सांगितलं की तू यात अजून पुढे जाऊ शकतेस. मग मी माहिती काढत गेले. लावणीच्या ‘ऑडिशन’ दिल्या. गेल्या दोनेक वर्षांत मी हे केलं. मी आणि खुशी हे मिळून लावणीचे कार्यक्रम करतो. आमच्यातल्याच आंचल आणि रीनाही ‘साइड डान्सर’ म्हणून काम करतात. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, उस्मानाबाद, खानदेश सगळीकडे आम्ही लावणीचे कार्यक्रम करतो. या शोज्ना खूप चांगला प्रतिसाद मिळतो. आधी एक नगरसेवक आमचा कार्यक्रम आयोजित करायचे. पण ते आम्ही तृतीयपंथी असल्याचं लोकांपासून लपवायचे. आम्हाला स्त्री म्हणून सादर करायचे. ते आम्हाला खटकायचं. मग आम्ही स्वत:चा कार्यक्रम सुरू केला. त्याला आता दीड वर्ष झालं. खरं तर मी हॉटेल मॅनेजमेंटची पदविका घेतली आहे. तो केल्यानंतर कम्युनिटीत आले. नोकरी करायची इच्छा पूर्ण झाली नाही. तिथे अजून तरी आमच्या सारख्यांना प्रवेश नाही.’’

‘‘अनेकदा लोक ‘एफबी’वर उगाच त्रासही देतात. पण मी खंबीर आहे. स्वत:चे फोटो टाकले की आम्हाला स्त्रियांपेक्षाही जास्त त्रास होतो. बऱ्याचदा लोक इनबॉक्समध्ये येऊन उगाच असभ्य बोलतात. असं असलं तरी ‘एफबी’चा फायदाच जास्त झाला. माझी ओळख मला पुन्हा घडवता आली. आम्ही कुटुंब सोडून कम्युनिटीत गेलो, की अनेकदा घरचे समाजाला सांगतात, ‘तो मेला. त्याचा अपघात झाला. प्रेतही सापडलं नाही.’ पण आम्ही समाजमाध्यमावर येऊन ‘मी जिवंत आहे अजून आणि माझी ओळख ही आहे.’ असं ठामपणे सांगू शकतो. आम्हीही माणूस आहोत हे ठसवू शकतो. मला स्वयंपाक करणं आवडतं. मग मी कधी कुठली डिश बनवून त्याचा फोटो एफबीवर टाकला की लोक विचारतात, ‘तुम्ही स्वयंपाक करता? घरी जेवता?’ अशा कमेंट्स मी आता मस्त एन्जॉय करते.  मला एकदा माझ्या महाविद्यालयाची आठवण आली. मी मित्रांना ‘एफबी’वर शोधलं. त्यांना माझ्या बदललेल्या ओळखीबाबत सांगितलं. ते म्हणाले, ‘तू का गेला तिकडं? हिजडे खूप वाईट असतात.’ मी त्यांना मग सगळं नीट समजावलं. त्यांचे अनेक गैरसमज दूर केले. तिथं त्यांचंही मन मला कळलं. आता आमचा पुन्हा संपर्क सुरू झालाय.’’ आयेशा समाधानानं सांगते.

स्त्री-पुरुष नातेसंबंधांना मान्यता असलेल्या पारंपरिक समाजात बहुलिंगी म्हणून ओळख असणाऱ्या समूहांची भावनिक-शारीरिक घुसमट होत राहते. ती ‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही’ अशा पद्धतीनं या व्यक्ती वागवत राहतात. अशा वेळी लौकिक आयुष्यात त्यांना सततचा खराखुरा आधार मिळत नसला तरी संवादाचा ‘व्हच्र्युअल’ पूल तरी उभारता येतोय.

खुशीनं आता वयाची तिशी ओलांडलीय. ती सांगते, ‘‘मी ट्रान्सजेंडर कम्युनिटीचा भाग झाले त्याला आता नऊ र्वष झाली. त्या वेळी माझ्याकडे मोबाइल नव्हता. मग मी पैसे जमा करून काही महिन्यांत स्मार्टफोन घेतला. माझी आयडेन्टिटी बदलली होती. मी ‘एफबी’वर आले. तिथं बदललेल्या नावाने, बदललेल्या जेंडरने आले. खूप जुन्या, शाळेतल्या मित्रांना ‘रिक्वेस्ट’ पाठवली. त्यांनी मला सुरवातीला अर्थातच सहज स्वीकारलं नाही. ते बिचकले, दचकले. ‘तू तो छक्का बन गया..’ असं काय काय बोलू लागले. पण मी त्याने थांबले नाही. संवाद चालूच ठेवला त्यामुळे पुढे आमच्यात खूप संवाद होत गेला. मी त्यांच्या हर तऱ्हेच्या प्रश्नांना उत्तरं देत गेले. हळूहळू संवादातली दरी कमी झाली. मला एक लहान भाऊ आहे. मी या कम्युनिटीत आल्यापासून त्याच्याशी बोलणं खुंटलं होतं. मग खूप हिंमत करून त्यालासुद्धा ‘एफबी’वरच मेसेज केला. समोरासमोर बोलण्याचं धाडस नव्हतं. हळूहळू आमचं बोलणं सुरू झालं. त्यानंच एकदा आईशी बोलणं करून दिलं. आता आई-वडील दोघंही व्हिडीओ कॉलवर बोलतात. अजून तरी त्यांना भेटायला गेले नाही. सध्या तरी ते शक्य दिसत नाही. पण असं निदान बोलता-बघता तरी येतं. मी घर सोडल्यापासून तेही मला शोधतच होते..’’

‘‘ ‘एफबी’वर मला लहान-लहान आनंद मिळतात. मला रांगोळी, मेंदी काढायला आवडते. त्याचे फोटो मी ‘एफबी’वर टाकू लागले. त्यातून तर अनेक तृतीयपंथी नसलेले लोक माझे मित्र झाले. एरवी जे लोक प्रत्यक्ष आयुष्यात माझ्याशी कधीच बोलले नसते त्यांनी मला थेट घरी बोलावलं. नवी नाती बनली. ते म्हणाले, ‘तू कुणीही असशील, त्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. आपण भेटत-बोलत जाऊ. मला रांगोळी, मेंदीच्याही ‘ऑर्डर’ येऊ लागल्या. आता अडीच र्वष झाली, मी हे काम व्यावसायिक स्तरावर करते. माझ्या गुरूही मला हे सगळं आनंदानं करू देतात. मी गावच्या मंदिरात उत्सवावेळी रांगोळी काढते. इतकच नाही तर अनेक स्पर्धामध्ये मी परीक्षक म्हणूनही काम केलं. माझे सत्कारही झालेत. हे सगळं फेसबुकमुळेच तर होऊ  शकलं ना! मेंदीच्या सध्या लोकांना आवडणाऱ्या नवीन डिझाइन्स मला यूटय़ूबवर मिळतात. तिथं बघून मी त्या शिकते. एरवी आम्ही एकटे, समाजापासून तुटलेले असतो. आमच्यासाठी तंत्रज्ञान मोठी पोकळी भरून काढणारं काही तरी आहे.’’ खुशी तिच्या आयुष्यातली या आधुनिक तंत्रज्ञानाची करामत उलगडून सांगते.

या सगळ्या जणींच्या फेसबुक ‘वॉल’वर फक्त फोटो नसतात, तर विविध समकालीन विषयांवर स्वत:चं मत सांगणाऱ्या पोस्ट्सही बघायला-वाचायला मिळतात. बहुलिंगी समाजाच्या प्रश्नांचा ऊहापोह वाचायला मिळतो. जसं की, एक मैत्रीण लिहिते, ‘माझ्या पोस्टवर तुमचे लाइक्स माझं लिखाण आवडल्यामुळे, की मी तृतीयपंथी असल्यामुळे? मग त्यावर आलेल्या कमेंट्समध्ये चर्चा सुरू होते त्यातून अनेकांचे गैरसमज दूर करतात. अनेकांची दृष्टी व्यापक बनवतात.

विजयालक्ष्मी गौरी. मुंबईच्या चित्रपट क्षेत्रातली स्ट्रगलर. वय वर्षे अवघं १९. तिची जीवनकथा एखाद्या चित्रपटाहून जास्त ‘फिल्मी’ आहे. विजया सांगते, ‘मी मुंबईतच वाढले. आता घरच्यांसोबतच राहते. माझी बदललेली नवी ओळख घरी सांगितल्यावर स्फोटच झाला. ते सगळे प्रचंड तणावातले दिवस होते. खूप प्रयत्नांनी मी त्यांना समजावलं. आमच्या ट्रान्सजेंडर कम्युनिटीबाबतचे काही माहितीपट भावाला, आईला दाखवले. मला तंत्रज्ञानातून ते बळ मिळालं. चित्रपट क्षेत्रात शिरकाव करण्यासाठीचे संपर्कही समाजमाध्यमातून मिळाले. आजवर अनेक मोठय़ा, नामवंत वाहिन्यांवरच्या मालिकांतून लहान-मोठय़ा भूमिका केल्या. सोबत हिऱ्यावरचं कामं, गणपतीचे दागिने घडवणं हेही मी शिकले. आता घरचे मला अक्षरश: सलाम करतात.’’

‘‘ मी सातेक र्वष झाली, स्मार्टफोन वापरते. ‘एफबी’वर अनेक जण अनेक हेतूने ‘रिक्वेस्ट’ पाठवतात. मी कुणाला टाळत नाही. पण मग पर्सनल मेसेजेसवर प्रत्येकाचे हेतू कळतात. त्यातून समाजातल्या वाईट वृत्तीचा सातत्याने परिचय होतच असतो. पण हेही मान्य करायला हवं की खूप चांगले लोकही भेटतात. मोकळा संवाद करतात, खूप प्रश्न विचारतात. ‘व्हॉट्सअ‍ॅपवर गप्पा मारायला आम्ही ‘व्हॉइस चॅट’ जास्त वापरतो. ते जास्त सोयीचं वाटतं. आमच्यात अनेक लोक कमी शिकलेले असतात. इच्छा असून त्यांना शिकता येत नाही. अक्षरओळखच नसल्यानं टाइपिंग येत नसतं. मग बोलून रेकॉर्ड केलेले मेसेजेस एकमेकांना पाठवतो. आमचे गुरूही हे खूप छान पद्धतीने वापरतात. आमची कोड लँग्वेज असणारी बोलीभाषा, ‘पारुषी’चासुद्धा आम्ही बोलताना वापर करतो. आधुनिक तंत्रज्ञान चांगलंच आहे. तुमचे हेतू कसे आहेत हे महत्त्वाचं ठरतं.’’ विजयालक्ष्मी जाणवलेलं तत्त्वज्ञान मांडते.

‘फेसबुक’वर ताकदीची कवयित्री म्हणून लक्षवेधी ठरलेली दिशा शेख ही माझी मैत्रीण आधुनिक तंत्रज्ञानाकडे खूप वेगळी समज घेऊन पाहते. तिचं फेसबुक अकाऊंट ‘शब्दवेडी दिशा’ या नावानं आहे. स्वत:चा व्यवसाय तिनं लिहिलाय ‘बाजारात मागते’ आणि शिक्षण सांगितलंय ‘दुनियेनं शिकवलं राव’. तिचं रिलेशनशिप स्टेटस म्हणतं, ‘इट्स कॉम्प्लिकेटेड’. दिशा खरोखरच बाजारात ‘मांगती (भिक्षुकी)’ करून उपजीविका भागवते. नव्यानेच आलेल्या ‘फेसबुक लाइव्ह’चा वापर करत तिनं काही दिवसांपूर्वीच तिच्या मांगतीच्या बाजाराची दुनिया थेट समाजमाध्यमावर आणली. हे सगळं ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ असं म्हणत स्वत:सकट तिच्या कम्युनिटीचं जगणं मांडणारं, प्रश्न विचारणारं आहे. तिच्या कविता, लहान-मोठय़ा पोस्ट्स, फोटो आणि त्याला मिळालेल्या कमेंट्स समाजमाध्यमातील लोकांच्या स्वभावातलं केवढं काही अव्यक्त ते व्यक्त करणाऱ्या असतात. सध्या दिशा लिहिती झाली आहे. एका वर्तमानपत्रात तिचं सदर प्रसिद्ध होतंय. मांगतीला बाजारात जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रवासादरम्यान ती मोबाइलवर दीर्घ लेख, कविता असं सगळं लिहीत असते. दिशा सांगते, ‘मला प्राचीनं माझं फेसबुक अकाउंट उघडून दिलं. तिथं भेटणाऱ्या लोकांमध्ये अनेकदा आमच्याबद्दल सहानुभूती असते, प्रोत्साहन असतं, कौतुक असतं. अनेकदा विकृत आकर्षणही असतं. माझी आता छोटीशी का होईना सामाजिक-साहित्यिक ओळख निर्माण झालीय. मी लैंगिक मुक्ततेवर, बंधनांवर गांभीर्यानं बोलते. त्यामुळे अनेक लोक गंभीरपणे चर्चा करतात. पूर्वी माझं अकाऊंट ‘फेक’ होतं. लोकांमध्ये लैंगिक आरोग्याबाबत जागृती आणायला साध्या-सोप्या पद्धती वापरून पोस्ट टाकायचे. त्या वेळीसारखं आताही या प्रोफाइलवर लोक अनेकदा संधी साधू पाहतात. मी अशांना समजावते. त्यातले धोके सांगते. मग सारं काही शांत होतं.’’

‘‘इंटरनेटचा वापर आम्ही करतो, ते जास्तीत जास्त स्वत:ला वाढवावला. जे काही नवं मिळेल ते शिकतो. अलीकडेच सकाळी माझी मैत्रीण मानसी यूटय़ूबवर साडय़ा नेसण्याचे प्रकार शोधत होती. ‘व्हॉइस सर्च’चा वापर करून ते प्रकार शोधले, नव्हे अनेकदा बघून ते ती शिकलीही. आम्ही उपजीविकेसाठी लग्नात गाणी म्हणायला जातो. अनेकदा गाण्यांचे शब्द चुकतात. मग यूटय़ूबवर आम्ही ते शोधतो करतो. गाण्यांचे अचूक शब्द शिकून घेतो. स्वत:ला अपडेट ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा आम्हाला खरंच छान उपयोग होतोय. आमची कम्युनिटी मोठी आहे. महाराष्ट्रभर विखुरलेली. पूर्वी कुणी वारलं तर अनेकदा ‘तेरवी’लाच कळायचं. आता मात्र लगेच  सगळ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये माहिती जाते. आम्ही बाजारात मांगती करण्यासाठी फिरतीवर असतो. कुठलाही निरोप आता लगेच कळतो. या समाजमाध्यमाचा वापर करायला आम्ही स्वत:च शिकतो. आम्ही आधीच तथाकथित असभ्य, अप्रतिष्ठित लोक आहोत. अनेक वाईट अनुभव प्रत्यक्षातही येतात. तसंच समाज माध्यमवरही अनेकदा लोक मुखवटे घेऊन वावरतात. आम्हीही सावधपणेच वागत असतो. तरी याला एक दुसरी बाजू आहेच. कसं आहे ना, की प्रत्यक्ष आयुष्यात आम्ही भावनिक गुंतवणूक कुणात करू शकत नाही.. तसा आमचा भावनिक कप्पा रिकामाच असतो. आमची बदललेली ओळख घेऊन आम्ही नव्यानं कम्युनिटीत दाखल होतो तेव्हा प्रचंड अस्वस्थ असतो. अवतीभवती सगळे प्रश्नच प्रश्न. दाटून आलेलं एकटेपण. आमच्यासारखीच ओळख घेऊन कम्युनिटीत आलेले लोक अवतीभवती असतात. पण नव्या काळात त्यांच्याशी बोलण्यात अनेक अडसर असतात. मग हातात असलेला स्मार्टफोन, त्याच्यावरचं फेसबुक हे सगळं प्रचंड मोलाचं असतं. यातूनच समाजमाध्यमवर अनेकदा एखादा तृतीयपंथी नसलेली व्यक्ती आवडायला लागते. तिच्याशी बोलणं, मन मोकळं करणं होतं. कधी कधी ती व्यक्ती एकदम अकाउंटच ब्लॉक करून टाकते. संवाद थांबवतो. त्यातून आम्हाला नवा धडा मिळतो. आम्ही अनुभवातूनच शिकत जातो. व्हिडीओ कॉलिंगसाठी आयएमओ वापरलं जातं. सगळ्याच नातेसंबंधामध्ये आम्ही हे वापरतो. कारण प्रत्यक्ष भेटण्यात अनेक अडथळे असतात. त्यामुळे ओळख लपवणं भागच पडतं. पण विरोधाभास असा की अनेक तृतीयपंथी नसलेल्या लोकांसाठी आम्ही ‘मन मोकळं करण्याची जागा’ असतो. अनेक स्त्री-पुरुषही त्याचं खासगी आयुष्य आमच्यापुढे उघड करतात. अनेक गोष्टींची कबुली देतात. अनेकदा या लोकांना आम्हाला भेटायचंही नसतं. फक्त ‘ऐकवायचं’ असतं. आम्ही लोक स्त्री आणि पुरुष या दोन्ही रूढ ओळखींच्या पलीकडे जाऊन गोष्टी पाहू शकतो ना, म्हणून असेल कदाचित! आमचं पारंपरिक आयुष्यही वेगळं. तसं इथलं व्हच्र्युअल आयुष्यही कमालीचं वेगळं, युनिक आहे.’’ दिशा आपल्या जगातले एकेक कप्पे उघड करत जाते.

‘‘आमच्यातले अनेक जण निरक्षर आहेत. यूटय़ूबच जास्त वापरतात. त्यांचा ऑडीओ-व्हिज्युअलवर जास्त भर असतो. साहजिकच त्यासाठी ‘इंटरनेट’ जास्त लागतं. नेटपॅक विकत घेण्यातच जास्त पैसे जातात. आता लहान गावातही मोफत वायफाय झोन झालेत. पण तिथं पुरुषच बसलेले असतात. तिथं आम्ही जाऊन बसलो की ते बिचकतात. आता आमच्या कमाईतला विशिष्ट भाग आम्ही नेटपॅकसाठी काढून ठेवतो. आम्ही सगळे प्रीपेडच वापरतो. कारण पोस्टपेडसाठी आवश्यक कागदपत्र नसतातच आमच्याकडे. त्यामुळे बऱ्याच जणांचे सिमकार्डसुद्धा दुसऱ्यांच्याच नावावर आहेत.’’ ती सांगते.

प्राची श्रीरामपूरमध्ये स्वत:ची खोली घेऊन राहते. मी तिला भेटायला गेल्यावर तिच्या खोलीत लावलेल्या चित्रांनी लक्ष वेधलं. तिला विचारल्यावर ती म्हणाली, ‘मीच काढलीत.’ स्वत:च्या संवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबत तिनं सांगितलं, ‘मी ऑर्कुट वापरायचे. पीआर प्लॅनेट रोमिओ या डेटिंग साइटवरही अकाउंट होतं. माझा पहिला फोन मला दिशानंच गिफ्ट म्हणून दिला. मी गेल्या दोन वर्षांपासून स्मार्टफोन वापरते. १०-१२ वर्षांपासून मी इंटरनेट वापरते. त्यासाठी पूर्वी सायबर कॅफेत जायचे. काही लोक फेक अकाउंटवरून त्रास देतात. मी त्यांना सरळ ब्लॉक करते. आमच्या गुरूही व्हॉट्सअपवर आहेत. गुरूंसोबत आम्ही सगळे एकमेकांना समाजमाध्यम वापरण्यात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करतो. त्यांना शेअरइट, ब्ल्यूटूथही वापरायला शिकवतो. मी काही दिवसांपूर्वी माझ्या घरी मालेगावला गेले होते. तिथं मला काही अनोळखी लोक भेटले. म्हणाले, ‘आम्ही तुम्हाला ‘एफबी’वर वाचतो. खूप छान लिहिता तुम्ही.’ एरवी ते तसे बोलले नसते. मी २०११ मध्ये महाविद्यालय सोडलं होतं. माझं चित्रकलेतल्या जी.डी. आर्टचं शेवटचं वर्ष शिल्लक आहे. चित्रकला सुटल्यानं अनेक गोष्टी आठवत नव्हत्या. मग मी यूटय़ूबवर पेंटिंगचे व्हिडीओ पाहू लागले. थांबलेली चित्रकला पुन्हा सुरू केली. आता शेवटच्या वर्षांची परीक्षाही देण्याची इच्छा होते आहे. सोबतच आमच्या लैंगिकतेविषयी माहिती देणारे शास्त्रीय व्हिडीओसुद्धा मी पाहते. खूप गुंते इथं आल्यानं सोडवता येतात. आम्हाला भेटलेले हे अप्रत्यक्ष, न दिसणारे गुरूच आहेत.’’

तृतीयपंथी समाजातून आलेल्या माधुरी सरोदे यांनी नुकताच जय शर्मा यांच्याशी सर्वासमक्ष वाजतगाजत धार्मिक पद्धतीने विवाह केला. अनेक जाणते लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्या सांगतात, ‘तंत्रज्ञानाचे काही वाईट परिणाम असतीलही. पण ते सगळं चांगलं जास्त आहे. आमच्या कम्युनिटीतले वृद्ध लोकही आता तंत्रज्ञान सहज वापरतात. आमची कम्युनिटीही ‘स्मार्ट’ झालीय. तृतीयपंथीयांबाबत गैरसमज, संभ्रम पसरवणारे मेसेजेसही येत असतात. आम्ही ते सगळं चुकीचं आहे हे पण लगेच सांगत असतो. माझाच वैयक्तिक अनुभव सांगायचा तर माझे पती जय शर्मा मला फेसबुकवर भेटले. त्यांना तोपर्यंत तृतीयपंथी लोकांच्या विश्वाची माहिती फारशी नव्हतीच. आमच्या कम्युनिटीत बरेच लोक आपापल्या पार्टनरबरोबर राहतात. मी आणि जयनं एकमेकांची  फेसबुकवरच्या संवादातून माहिती करून घेतली. जय मूळ उत्तर प्रदेशचे. मी मुंबईत वाढलेले. फेसबुक नसतं तर आम्ही भेटलोच नसतो. इंग्लंडमधून निघणाऱ्या एका मासिकातही आमच्याविषयी छापून आलं. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी आम्हा दोघांची प्रेमकहाणी सांगणाऱ्या व्हिडीओला लाखभर ‘व्ह्य़ूज’ मिळाल्या!

स्मार्टफोन आणि समाजमाध्यमांमुळे तर आमच्यासाठी पर्यायी उद्योग-व्यवसायाच्या शक्यता निर्माण झाल्यात. भिक्षुकी, सेक्स वर्क सोडून आता आम्ही काही तरी वेगळं करू शकू असं दिसतंय, ‘डान्सिंग क्वीन’ हा आमचा भारतातला पहिला ‘ट्रान्सजेंडर डान्स ग्रुप’ आहे. हा ग्रुप सुरू होऊन आता नऊ र्वष झाली. आमच्या अंगभूत कलेला यातून उठाव मिळाला. आता साठेक लोक आमच्यासोबत या ग्रुपमध्ये काम करतात.’

पश्चिम बंगालमध्ये उच्च शिक्षण घेत तृतीयपंथी समाजातून पहिल्यांदाच प्राचार्यपदी नियुक्त झालेल्या मानोबी बंदोपाध्याय यांना काही महिन्यांतच हे पद सोडावं लागल्याची बातमी अजून ताजीच आहे. आसपासचा भवताल सहकार्य करत नसल्याचं कारण देत त्यांनी राजीनामा दिलाय.

आयेशा, प्राची, खुशी, दिशा आणि अजून कित्येक जणी आहेत, चार भिंतींच्या प्रस्थापित शिक्षणव्यवस्थेत अजून तरी त्यांना विद्यार्थी म्हणून प्रवेश निषिद्ध आहे. या सगळ्या जणी मात्र निषिद्धतेचा विधायक निषेध करत आपलीच एक समांतर बिनभिंतींची शाळा रुजवू पाहतायत. मनोरंजन, प्रबोधन आणि लोकशिक्षण अशा तीनही प्रवाहात त्या खळाळून वाहतायत. या वाहण्याला  सगळ्यांच्याही सक्रिय सदिच्छा असू देत. समाज म्हणून आपण इतकं तरी नक्कीच करू शकतो.

 

हिजडा बनके जिना सिख

बाई म्हणून जगण्यासाठी

स्वत:तली बाई मारावी लागली

माझ्या हातून तिचा खून केव्हा झाला कळालंच नाही

आणि म्हणणारे अजूनही म्हणतात..

‘‘बेटा औरत मत बन, हिजडा बनके जिना सिख’’

 

संसार तर दूरच,

संसाराचं स्वप्नं पाहणंही गुन्हा

हसतात ते, आणि त्यांच्या वाटय़ाला आलेला शहाणपणा शिकवतात ते पुन्हा

म्हणतात.. ‘‘बेटा औरत मत बन, हिजडा बनके जिना सिख’’

 

हल्ली त्यांचं म्हणणं पटायला लागलंय

डोळ्यांतलं स्वप्न आणि दु:ख डोळ्यांतच आटायला लागलंय

फक्त ही मेलेली बया सारखी डिवचून तोच तो करते गुन्हा,

म्हणते गर्दीतही आहे तुझा हात सुना

पण आता लक्ष द्यायचे नाही असं ठरवलंय मी

कारण डोक्यात तेच फिरतंय जे ते म्हणतात..

‘‘बेटा औरत मत बन, हिजडा बनके जिना सिख’’   – दिशा

 

–     स्वाहा!

तिचे अर्धवट स्त्रीत्व

त्यांच्या चौकटीत बसत नाही म्हणून,

तिला प्रवाहातून बाहेर उभं केलं

सहस्रावधी वर्षांपासून..स्वाहा!

 

कुणीतरी अंखड सौभाग्याचं कुंकू

लावलं भाळावर

तिला देवाच्या स्वाधीन करून..स्वाहा..!

 

कुणी तरी मग त्या देवीपत्नीच्या पायात

घुंगरं बांधली

आणि तिला नाचवलं

गावाच्या मनोरंजनासाठी.. स्वाहा.!

 

तिला त्या अपमानाचं शल्य बोचू नये म्हणून

दैवी घोषित केलं..स्वाहा.!

 

कधी ती देवळात देवीचे

तर कधी जनानखान्यात

राण्यांचे लुगडे धूत होती..स्वाहा..!

 

तिचा जन्म देवाने लोकांच्या

कल्याणासाठी

आनंदासाठी

आणि मनोरंजनासाठी

आखला आहे

असंच तीही मानत होती.स्वाहा.!

 

ती जन्मालाच यायची

पापाची फळं चाखण्यासाठी

पण ते पाप त्यांचं

ती स्वत:च्या भाळावर

घेऊन जगत होती ..स्वाहा.!

 

आज मात्र चित्र बदलले

तिचे नाही, तिच्या शोषण पद्धतीचे..स्वाहा..!

 

कुणीतरी उपभोगून तिचा खून केला

देह गटारात

खाडीत

तर कधी तसाच

अंथरुणावर सोडून दिला.स्वाहा.!

 

परवा ट्रेनमधे

भीक मागणारी ती

चालती ट्रेन सोडताना

कंबरेतून दोन हिश्श्यात

विभागली गेली .. स्वाहा.!

 

समज आली तिला

शिक्षितही झाली ती

पण शोषण अटळ

म्हणून मानसिकरीत्या हरली

आणि कंटाळून फासावर गेली .. स्वाहा.!

 

उमेदीच्या पहाटेसाठी

स्वातंत्र्याच्या क्षितिजासाठी

परत ती नव्याने जन्माला आलीय

पण आत्ता ती

सहस्रावधी वर्षांच्या

या शोषणाच्या यज्ञात

स्वत:ची आहुती द्यायला

नकार देतेय

आत्ता ती आणि तिच्या पिढय़ा

होणार नाहीत..स्वाहा..!               – दिशा

 

 

शर्मिष्ठा भोसले

sharmishtha.2011@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2017 3:48 am

Web Title: marriage beuro facebook youtube
Next Stories
1 लिंगभेदातल्या बदलत्या इमोजीस्
2 व्हा धाडसी, बदलासाठी!
3 कॅलिडोस्कोप
Just Now!
X