27 May 2020

News Flash

स्काय इज द लिमिट..

जेव्हा कधी विमानांच्या प्रतिकृती तिला दिसायच्या, तिची पावलं तिथंच थबकायची

जंगलाजवळच राहणाऱ्या आणि अवघ्या तीन वर्षांपूर्वी ती वेस ओलांडून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर होण्याचं स्वप्न घेऊन नागपुरात प्रवेशकरणाऱ्या अदिवासी समाजातल्या मेघा नैतामने तयार केलेल्या भारतीय वायुसेनेच्या मालवाहू विमानाच्या प्रतिकृतीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. तिच्या या वेगळ्या करिअरविषयी आणि प्रवासाविषयी..

एरो मॉडेलिंगनं तिचं कुतूहल जागृत केलं होतं, पण त्यातलं विमान चालवणं हे तिचं ध्येय कधीच नव्हतं, ते कसं बनतं याची उत्सुकता मात्र होती. म्हणूनच जेव्हा कधी विमानांच्या प्रतिकृती तिला दिसायच्या, तिची पावलं तिथंच थबकायची. छोटय़ाश्या आदिवासींच्या गावातील, शिक्षणाचा तसा गंध नसलेल्या समाजातील मुलींनी गावाची वेस कधी ओलांडलीच नव्हती. तिनं मात्र ही वेसच ओलांडली नाही, तर स्वत:चं आगळं वेगळं स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं.
जंगलाशेजारीच राहणाऱ्या आणि अवघ्या तीन वर्षांपूर्वी ती वेस ओलांडून नागपूर शहरात प्रवेशकर्ती झालेल्या मेघा नैतामने तयार केलेल्या भारतीय वायुसेनेच्या मालवाहू विमानाच्या प्रतिकृतीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. अवघ्या दोन-चार गुणांनी तिचा पहिला क्रमांक हुकला तरी तिची प्रतिकृती नावाजली गेली.
जंगलाशेजारी राहणारी आदिवासी जमात म्हणजे शिक्षण तर कोसो दूरच, शिवाय ना शहरी भाषेचा गंध, ना शहरी जगण्याचा ढंग! आता बऱ्याच अंशी ही परिस्थिती सुधारली असली तरीही जंगलाच्या आतील गावांमध्ये अजूनही परिस्थिती तशीच कायम आहे. भंडारा जिल्ह्य़ातील साकोली या गावातला मेघाचा जन्म! ती लहान असतानाच वडिलांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गाव सोडून नागपूर जिल्ह्य़ातील खापरखेडय़ात पाय ठेवला आणि अवघ्या काही दिवसांतच उत्कृष्ट हलवाई म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. आईसह कुटुंबातली इतर मंडळी साकोलीतच राहिली, परंतु इतर आदिवासी कुटुंबांप्रमाणे मागासलेपणाच्या खाईत मेघा लोटली गेली नाही. मुळातच अभ्यासात हुशार असल्यामुळे वडिलांचा शिक्षणासाठी जबरदस्त पाठिंबा मिळाला. त्या पािठब्याच्या बळावर तिनं विज्ञान विषयात बारावी पूर्ण केलं आणि इतरांप्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर होण्याचं स्वप्न घेऊन तिनं नागपुरात पाऊल ठेवलं.
अनेकदा जे ठरवलं ते होत नाही आणि त्याच्या विपरीत काही तरी आपल्याला खुणावतं, मेघाच्या बाबतीतही अस्संच झालं. ज्या वाटेने चालायला ती आली होती, ती वाट तिनं मोडली आणि विमानांनी तिला मोहात पाडलं. आकाशात उडणारी विमानं जरा जास्त जवळून तिनं इथं पहिल्यांदाच पाहिली होती. यातून उंच भरारी घेण्यापेक्षा ते बनतं कसं याची उत्सुकता तिला अधिक वाटू लागली. आधी आकाशातली खरी खरी विमानं, नंतर दुकानांमध्ये असलेल्या विमानांच्या हुबेहूब प्रतिकृतीनी तिचं कुतूहल चाळवलं गेलं. नागपुरातील रस्त्यांवरून सहजपणे पायी फेरफटका मारताना तिला नागपूर विद्यापीठाजवळ असलेल्या एनसीसी विंगच्या कार्यालयाने खुणावलं. एरो मॉडेलिंग विभागाच्या प्रात्याक्षिक खोलीत काही मुलं सँडपेपर हातात घेऊन लाकडाचे ठोकळे घासत होती. प्रतिकृती पाहिल्या असल्यानं तिला त्याचा अंदाज आला आणि ती पुन्हा पुन्हा तिथं येऊ लागली. लाकडाच्या ठोकळ्यांनी विमानाच्या पंखांचा, शेपटाचा आकार घेतलेला पाहून तिची उत्सुकता आणखीच वाढली. संपूर्ण भारतात एरो मॉडेलिंगच्या कौशल्याने साऱ्यांना चकीत करणारे आणि रिमोटवर विमानांच्या चित्तथरारक कवायती सादर करणारे एरो मॉडेलर राजेश जोशी यांनी तिच्यातलं औत्सुक्य हेरलं आणि विमान प्रतिकृतींच्या जगात मेघानं पहिलं पाऊल टाकलं.
मेघानंही हातात सँडपेपर आणि लाकडाचे ठोकळे घेतले खरे, पण वाटलं तितकं हे काम सोपं नाही हे तिला त्याच क्षणी जाणवलं, पण तिच्यातली जिद्द, चिकाटी आणि मेहनतीनं या कठीण कामावर मात केली. तिच्या हातून लाकडी ठोकळ्यांना पहिल्यांदा विमानाच्या पंखांचा, नंतर शेपटाचा आकार येऊ लागला. राजेश जोशी यांनी तिच्यातली जिद्द आणि मेहनत हेरली व तिला शिष्य म्हणून स्वीकारलं. गुरूला हवे असलेले गुण शिष्यात दिसले तर गुरू शिष्याला घडविण्यासाठी अधिक मेहनत घेतो. नेमकं तेच राजेश जोशी आणि मेघा नैतामच्या बाबतीत घडलं. कारखान्यातील यंत्रात सलग एक पदार्थ टाकल्यानंतर हव्या तेवढय़ाच आकाराचा ठोकळा त्यातून बाहेर पडतो, साच्यात एखादा द्रवपदार्थ ओतल्यानंतर त्याच आकाराची प्रतिकृती बाहेर पडते. अशा वेळी तो ठोकळा किंवा ती प्रतिकृती व्यवस्थित झाली की नाही ते पाहावं लागत नाही. हेच काम दोन हातांनी केलं तर मात्र निश्चितच त्याचा आकार ऊकार पाहावा लागतो. दोन नाजूक हात हे कौशल्य पार पाडत असतील तर मग अजूनच त्याची पारख केली जाते. मेघाच्या बाबतीत अशी काही परीक्षा घ्यावीच लागली नाही. कारण सँडपेपरने लाकडी ठोकळा घासल्यानंतर त्यातून तयार होणारे विमानाचे सुटे भाग अगदी खरेखुरे वाटावे असेच होते.
तिनं केलेल्या ‘सुखोई’ विमानाच्या पहिल्या प्रतिकृतीनं तिच्यातील उच्च दर्जाचं कौशल्य समोर आलं. दिवसेंदिवस तिच्यात होणारी प्रगती पाहूनच राजेश जोशी यांनी राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या अखिल भारतीय वायुसैनिक शिबिरातील स्पध्रेसाठी तिच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. ही स्पर्धा साधीसुधी नव्हती तर तासन्तास काम करावं लागणार होतं कारण दिलेल्या कालावधीत ती प्रतिकृती पूर्ण करणं गरजेचं असतं अन्यथा नावावर अपयशाचा शिक्का बसणार होता आणि म्हणूनच गुरूचा विश्वास खोटा ठरू द्यायचा नाही या ध्येयाने तिने रात्रंदिवस काम सुरू केलं. तासन्तास आपली प्रतिकृती तंतोतत, निर्दोष करण्याच्या दृष्टीने तिची वाटचाल सुरू झाली.
भारतातील वेगवेगळ्या शहरांत दर वर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पध्रेसाठी प्रत्येक राज्यातून दोन कॅडेट निवडले जातात, पण त्यांचीही निवड सहज होत नाही. त्यासाठी विभाग पातळीवर स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्यांना राष्ट्रीय पातळीवर स्पध्रेसाठी पाठवलं जातं. नागपूर, पुणे, मुंबई विभागात आयोजित स्पध्रेत मेघा पहिली आली आणि राजस्थानमधील जोधपूर येथे ऑक्टोबरमध्ये झालेल्या स्पर्धेत ३६ तासांत भारतीय वायुसेनेच्या विमानाची प्रतिकृती बनवण्याच्या लक्ष्यासाठी ती पात्र ठरली. आधी भंडारा जिल्ह्य़ातील साकोली, नंतर नागपूर आणि एकदम राजस्थानमध्ये झेप घेणाऱ्या मेघासाठी हे वातावरण नवं होतं, तरीही गुरूंचा विश्वास कायम राखून लक्ष्य गाठायचं होतं.
देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये बोटावर मोजण्याइतक्या मुली होत्या. त्यातलीच एक मेघा! तिने तयार
केलेली भारतीय वायुसेनेच्या विमानाची प्रतिकृती या स्पध्रेत लक्षवेधी ठरली. हे लक्ष्य गाठणं सोपं नव्हतंच, पण तासन्तास काम करण्याचा सराव या वेळी तिला उपयोगी ठरला.
एनसीसीच्या स्थापनेपासून पहिल्यांदा एका आदिवासी मुलीने एरो मॉडेलिंगच्या क्षेत्रात एवढी मोठी कामगिरी केल्याचा सार्थ अभिमान तिचे गुरू राजेश जोशी यांनाही आहे. या स्पध्रेसाठी तिने घेतलेली मेहनत, कुणीही नसताना तासन्तास लाकडाचे ठोकळे सँडपेपरने घासून त्याला एका विशिष्ट आकारात आणण्याची एकाग्रता त्यांनी पाहिली आहे. या स्पध्रेसाठी म्हणून सरावादरम्यान तिने भारतीय वायुसेनेच्या विमानाच्या एक-दोन नव्हे तर तब्बल सहा प्रतिकृती तयार केल्या.
एरो मॉडेलिंगमध्ये दोन प्रकार येतात. एक विमानाची प्रतिकृती तयार करणं आणि दुसरं हे विमान रिमोटने उडवणं. या उडवण्याच्याही विविध स्पर्धा असतातच आणि तेही कौशल्याचं काम असतंच. पण सध्या तरी ते उडवण्यात मेघाला फारसं स्वारस्य नाही, तिचं सारं लक्ष विमानं तयार करण्यात गुंतलं आहे.
एरो मॉडेलिंग हा एक प्रयोगच आहे, तो प्रयोग यशस्वी करणंही तुमच्या हातात असतं. ‘स्टॅटिक मॉडेलिंग’ हे मेघाच्या आयुष्याचं ध्येय आहे. त्यातूनच तिला ‘एअरक्राफ्ट’सुद्धा तयार करायचं आहे. ते ती करेलच. एकदा एरो मॉडेलिंगचं क्षेत्र काबीज केल्यानंतर मग काय.. स्काय इज द लिमिट..
rakhi.chavhan@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2015 1:16 am

Web Title: megha naitamane a girl from tribal community made career in aeromodelling
Next Stories
1 कमी जागेतील लागवड
2 होय, मी बंडखोरी केली
3 आहारवेद- पालक
Just Now!
X