किशोरवयीन मुलग्यांमध्ये शारीरिक बदलांमुळे भिन्नलिंगी आकर्षण वाढत असतानाच पुरुषत्वाच्या चुकीच्या कल्पना पक्क्या होत जातात. या टप्प्यावर त्यांच्यासमोर निकोप मत्री, संवेदनशीलता, लैंगिकतेविषयीचं नेमकं भान देणारा सकस विचार देण्याच्या विचारातून मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्यूजअर्थात (मावा’) या संघटनेने  युवामत्रीहा उपक्रम हाती घेतला. आज दहा वर्षांनंतर हा उपक्रम पुण्यासह मुंबई, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, भंडारा, नागपूर, धुळे आणि जळगाव अशा नऊ जिल्ह्य़ांमध्ये पोहोचला आहे. सुमारे ७०० संवादक, प्रशिक्षक आणि दोन लाखांहून अधिक तरुणांनी या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला असून आजही ही प्रक्रिया सुरू आहे. यंदा २५ वर्षे पूर्ण करणाऱ्या, पुरुषभान जागृत करणाऱ्या मावाया संघटनेविषयी व  या उपक्रमाविषयी..

प्रश्न तसे नेहमीचेच असतात. की आताच किचन ओलांडून आपल्या खोलीत गेलेले आपले वडील पाण्याच्या ग्लाससाठी आईला का हाका मारताहेत? स्वत:च ते घेण्यात कोणता कमीपणा असतो? माहेरपणाला आलेल्या बहिणीला नुसताच आराम करताना पाहून भावांची इतकी का चिडचिड होते, कधीमधी हळवं होऊन आसवं ढाळणं मर्दानगीच्या व्याख्येत बसत नाही हे कोणत्या काळी, कुणी ठरवलं? आणि मुलींना पुढच्या घरात पाठविण्यासाठी सर्वगुणांनी संपन्न असं घडवलं जात असताना त्यातल्या एकाही ‘आदर्श’ गुणाचे संस्कार आपल्यापर्यंत कसे काय पोहोचत नाहीत? प्रश्न नवे मुळीच नसतात. पण ते तिथे आहेत हेच मुळात माहीत नसताना अचानक ते दिसू लागले की तिथे थांबता येत नाही. त्यांची मूळं खणत खणत मग पार कुटुंब व्यवस्थेतली िलगाधारित श्रमविभागणी, कुटुंब जातिधर्मातील पुरुषप्रधान व्यवस्था, त्यामागचं सत्ताकारण इथवर जावंच लागतं आणि एकदा ही संगती लागली की बदलाच्या दिशेनेही पुढे पाऊल टाकावं लागतं. कौतुकाची गोष्ट अशी की ‘मावा’ संघटनेनं गेली दहा र्वष युवक आणि किशोरवयीन मुलग्यांसाठी सातत्याने चालवलेल्या िलगभानविषयक प्रकल्पांमध्ये सहभागी झालेली, होत असलेली मुलं मोठय़ा उमदेपणाने या प्रश्नांना सामोरी जात आहेत. आणि यंदा पंचविसाव्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या या संघटनेने सतत जोपासलेला संवेदनशील, लोकशाहीवादी, खऱ्या अर्थाने पुरोगामी माणूस बनण्याचा संदेश सर्वदूर पोहोचवणारी तरुण फळीच या निमित्ताने तयार झाली आहे.

 सुरुवात मावाची आणि युवामत्रीची

वर्तमानपत्रात आलेल्या एका ‘छोटय़ाशा’ आवाहनाला दिलेला प्रतिसाद म्हणून १९९३ मध्ये या स्वयंसेवी संघटनेची सुरुवात झाली. बाईला मारण्यात पुरुषार्थ नसतो, असं मानणाऱ्या पुरुषांनी एकत्र येऊन त्याविरोधात काही पावलं उचलावीत, असं ते आवाहन होतं. त्याला प्रतिसाद देणाऱ्या २०४ पुरुषांपकी मुंबईतील ३० जणांनी स्त्रीप्रश्नांवर संघटितपणे काहीतरी काम करण्याचा विचार केला आणि त्यातून ‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अँड अब्यूज’ अर्थात (‘मावा’) संघटना स्थापन झाली. स्त्रियांच्या समस्यांना कारणीभूत ठरणारा परंपरावादी, दमनकर्ता पुरुष नव्हे तर तिच्या प्रश्नांच्या सोडवणुकीतला साथीदार म्हणून उभा राहणारा पुरुष घडविण्याचं उद्दिष्ट या गटाच्या डोळ्यांसमोर होतं. सुरुवातीच्या काळात या संघटनेचा भर प्रामुख्याने स्त्री-पुरुषांसाठी समुपदेशन, िलगभाव, िलगभेद या विषयांवर चर्चासत्रं, कार्यशाळा, पथनाटय़ आयोजित करणं, ‘पुरुष स्पंदन’सारखा वेगळ्या विचारांचा दिवाळी अंक प्रसिद्ध करणं, महिला दिन अभिनव पद्धतीने साजरा करताना पुरुषांनाही त्यात सहभागी करून घेणं अशा उपक्रमांवर होता. दीप्ती खन्ना अ‍ॅसिड हल्ला प्रकरण किंवा विद्या प्रभुदेसाई प्रकरणातून ऐरणीवर आलेला एकतर्फी आकर्षणातून होणाऱ्या िहसेचा विषय, भंवरी देवीचा लढा, शाळांतून लैंगिक शिक्षणाला त्या काळी झालेला विरोध, हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या अशा तत्कालीन अनेक विषयांवर सतत आपलं मत सक्रियपणे व्यक्त केलं. त्यामुळे या संघटनेबद्दल सामाजिक क्षेत्रात विशेषत: स्त्रीप्रश्नांवर काम करणाऱ्या संस्थांच्या मनात असलेली साशंकता दूर होत गेली. ‘मावा’च्या कामासोबत त्या जोडल्याही गेल्या. ‘मावा’चे संस्थापक सदस्य हरीश सदानी सांगतात.

मात्र या सर्व प्रयत्नांच्या जोडीला तरुणाईला सोबत घेऊन काहीतरी दीर्घकालीन परिणाम करणारं काम व्हायला हवं अशी गरज या मंडळींना वाटत होती. विशेषत: किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक बदलांमुळे भिन्नलिंगी आकर्षण वाढत असतानाच पुरुषत्वाच्या चुकीच्या कल्पना पक्क्या होत जातात. या टप्प्यावर त्यांच्यासमोर निकोप मत्री, संवेदनशीलता, लैंगिकतेविषयीचं नेमकं भान देणारा काहीतरी सकस विचार देणं खूप गरजेचं वाटत होतं. २००६ मध्ये ‘पॉप्युलेशन काउन्सिल’ या दिल्लीस्थित संस्थेच्या फेलोशिपच्या निमित्ताने ही संधी ‘मावा’ला मिळाली. त्यातूनच प्रथम पुणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांतील ३३ मुलांना घेऊन ‘युवामत्री’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. मुलांना िलगभाव, लैंगिक विषमता, स्त्रियांचे प्रश्न, मर्दानगीसारख्या पुरुषपणाच्या साचेबद्ध व्याख्या अशा विषयांशी ओळख करून द्यावी, या विषयांच्या सामाजिक, आर्थिक, ऐतिहासिक बाजू त्यांनी तपासून पाहाव्यात आणि आपला अनुभव समवयीन इतर मुलांनाही सांगावा असा हेतू त्यामागे होता. या गोष्टींचा अंतर्भाव असलेला अभ्यासक्रम डॉ. रवींद्र रु. पं., प्रा. संजीव चांदोरकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता विजय चौहान आणि डॉ. चित्रा रेडकर या चौघांनी तयार केला. ३३ जणांपैकी बरीच मुलं पुण्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागांतील महाविद्यालयांतून आली होती, तर काही सामाजिक शिक्षण संस्थांमधून कार्यानुभवासाठी म्हणूनही आली होती. दोन र्वष चाललेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून विषयाचा सखोल अभ्यास, वाचन, संबंधित संस्था, संघटनांना दिलेल्या भेटी यातून त्यांच्या विचाराचा पाया भक्कम झाला, मुलग्यांना समुपदेशनाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या ‘मावा’ हेल्पलाइनच्या निमित्ताने तरुणांचे प्रश्न जाणून घेण्याची संधी या मुलांना मिळाली. या साऱ्याचा परिणाम म्हणजे त्या पायलट प्रकल्पाची दोन र्वष संपल्यानंतर तिथेच न थांबता या मुलांनी युवामत्रीचं रोप इतर जिल्ह्य़ांमध्ये नेऊनही रुजवलं. आज दहा वर्षांनंतर हा उपक्रम पुण्यासह मुंबई, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, भंडारा, नागपूर, धुळे आणि जळगाव अशा नऊ जिल्ह्य़ांमध्ये ‘युवा संवाद’, ‘मानुष’, ‘युवा-तरंग’ अशी वेगवेगळी नावं घेऊन पोहोचला आहे. सुमारे ७०० संवादक, प्रशिक्षक या प्रक्रियेतून तयार झाले आहेत आणि दोन लाखांहून अधिक तरुणांनी या उपक्रमांतर्गत होणाऱ्या चर्चा, कार्यशाळेत सहभाग घेतला आहे. आजही ही प्रक्रिया सुरू आहे.

नवी नजर, नवा दृष्टिकोन

अशा प्रकारच्या सखोल प्रशिक्षणाचे थेट आणि तात्काळ फायदे खूपच झालेले दिसतात. मनात साचलेल्या ज्या विषयांवर बोलण्यासाठी मुलग्यांना एरवी कुठलाच मार्ग नसतो, त्यावर इतकी सुस्पष्ट आणि सर्वागाने चर्चा खूपसे गरसमज दूर करणारी ठरते. भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल विशिष्ट वयात वाटणारं आकर्षण, स्त्री-पुरुषांच्या शरीरांची रचना, लैंगिकता, प्रजननाची प्रक्रिया, मासिक पाळी या गोष्टींभोवतीचं गूढ नाहीसं होऊन मोकळेपणा येतो. या नव्या जाणिवेबरोबर त्यांच्या रोजच्या वागण्यात बरेच बदल घडतात. ‘मासूम’च्या डॉ. रमेश अवस्थी यांनी या मुलांच्या मुलाखतींतून त्यांना दिसून आलेली अशी अनेक निरीक्षणं मांडली आहेत. साध्या साध्या गोष्टी, जसं जेवणानंतर ताट उचलणं, आपले कपडे धुणं, केर काढणं यातला कमीपणा गेला. आक्रस्ताळेपणा, शिवीगाळ, मारामारी आणि झगडे यांच्याभोवतीचं आकर्षणाचं वलय निघून गेलं आणि वागण्यात सौम्यपणा आला. मग मुलींची छेडछाड, विनाकारण कॉमेन्ट्स करणं यावरही आळा आला. मुलींशी बोलण्यातलं अवघडलेपण दूर झालं आणि निकोप मत्रीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. पथनाटय़ांच्या सादरीकरणातून आत्मविश्वास वाढला, असं या निरीक्षणांतून दिसलं आहे.

या मुलांशी बोलताना हे बदल आणखी स्पष्ट दिसतात. साताऱ्यात नाटकाचा छोटासा ग्रुप घेऊन काम करणारा अमित परिहार २०१० पासून या उपक्रमाशी जोडलेला आहे. तो सांगतो, ‘घरात बायकांना होणारी मारहाण, दिली जाणारी अपमानकारक वागणूक, पुरुषांचं दारू पिणं सगळं बघतच होतो आजूबाजूला. पण त्याबद्दल प्रश्न कधी पडले नव्हते. पण ‘मावा’च्या एका कार्यशाळेला हजेरी लावली आणि दृष्टीच बदलली. तेव्हा जाणवलं की कुटुंबव्यवस्थेत स्त्रीला सततच आपल्या इच्छाआकांक्षा मारून जगावं लागतं. लहानसहान निर्णयही तिच्या हातात नसतात. मग आणखी खोल विचार केला तेव्हा जाणवलं की फक्त मुलीच नाहीत तर मुलगेही साचेबद्ध चौकटीत अडकलेत. हे समजून घेताना फक्त स्त्री-पुरुष या दोन गटांचेच नव्हे तर तृतीयपंथी, समिलगी यांच्या जगण्यातले पेचही समजून घ्यायला शिकलो. अधिक व्यापक दृष्टीने या प्रश्नाकडे पाहू लागलो.’ अमितने ‘अनोळखी’ नावाची समलैंगिकतेचा प्रश्न मांडणारी एकांकिका अलीकडेच बसवली. त्याच्या मते जुन्या मंडळींची मतं बदलणं कठीण असलं तरीही तरुण वर्गासमोर या गोष्टी नेल्यास त्या स्वीकारल्या जाऊ शकतात. विशेषत: चच्रेमधून खूप काही साधलं जाऊ शकतं.

 लिंगाधारित उतरंडीची संगती

मात्र प्रारंभिक टप्प्यावर होणारे हे वागण्याबोलण्यातले बदल पुढच्या सत्रांमध्ये अधिक मूलगामी व्हावेत यासाठीही या कार्यशाळांतून आवर्जून प्रयत्न केले जातात. यात अनेक विषयांचा ऊहापोह होतो. या उपक्रमाशी सुरुवातीपासून जोडले गेलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्रे मििलद चव्हाण सांगतात, ‘फक्त जेंडर नाही तर लिंग आणि लिंगभाव यांच्यातील भेद, लिंगाधारित सामाजिक उतरंड, सत्ताकारण, त्यातही जात, धर्म, कुटुंबव्यवस्था यांच्या चौकटी याचे परस्परांशी संबंधित प्रश्न स्पष्ट करून सांगणं खूप गरजेचं असतं. पॉवर वॉक (सत्तेचा खेळ) बॉडी मॅिपगसारख्या खेळांतून हे परस्परसंबंध नेमकेपणाने त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्यातून मग स्त्रियांवर कोणती नियंत्रणं असतात, त्यांच्या श्रमातून मिळणाऱ्या उत्पादनावर कोणाचा हक्क असतो, मुलं होऊ देण्याबाबतच्या निर्णयावर कोणाचा हक्क, स्त्रीने कितीही कर्तृत्व गाजवलं तरीही घरकामाची जबाबदारी अखेर तिचीच का मानली जाते हे स्पष्ट करून सांगितलं जातं. संचारस्वातंत्र्य, लैंगिक स्वातंत्र्य, मालमत्तेवरील हक्क या सर्व बाबतीत स्त्रीचं स्थान मागेच राहिलेलं दिसतं. इथे मग स्त्रीिलगाचा गर्भपात, जातीच्या इभ्रतीसाठी ऑनर कििलग, कुटुंबव्यवस्थेत होणारं शोषण, बलात्कारासारख्या गुन्ह्य़ांमागची मानसिकता या समस्यांच्या मुळापर्यंत जाता येतं. या साऱ्याला असलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेचा भक्कम भौतिक पाया उघड दिसू लागतो. फक्त बाई किंवा पुरुष असणं नव्हे तर पुरुषत्व आणि स्त्रीत्वाच्या भूमिकांशी जोडलेली सत्ता सगळ्याच नात्यांचा अविभाज्य घटक बनून गेली आहे. या चौकटीत प्रत्येक वरचढ व्यक्ती दुसऱ्यावर सत्ता गाजवू बघते. खेळांतून, बरंचसं त्यांच्या अनुभवकथनांतून, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या प्रक्रियेतून हळूहळू या गोष्टी त्यांना कळत गेलेल्या दिसल्या. हे काम पुरुषविरोधी नाही तर पुरुषी सत्ताकारणाच्या विरोधात आहे हे त्यांच्या लक्षात यऊ लागलं.

‘मावा’च्या कार्यशाळांमध्ये सहभागी होणारी मुलं ही सारी गुंतागुंत आपापल्या पद्धतीने समजून घेत आहेत. प्रत्येकाची सामाजिक पाश्र्वभूमी वेगळी असली तरीही प्रत्येकाच्या घरात, समाजात िलगभेद कधी उघड तर कधी छुपेपणाने हजर आहेच. तो डोळसपणे हुडकून काढण्याचा प्रयत्न ती करत आहेत. त्यासाठी जुन्या चौकटींना प्रश्न विचारत आहेत. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस ‘टीस’मधून समाजसेवेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला सूरज पवार हा मूळचा विदर्भातील कट्टर िहदू घरातला मुलगा. स्वत:शी भरपूर झगडा केल्यानंतर जगण्यातली जातिधर्माच्या पसाऱ्याची ही ‘समृद्ध अडगळ’ आपण काढून टाकल्याचं तो सहज सांगतो. ‘हे असं सगळं सांगणारी माणसं नरकातच जाणार यावर माझा पक्का विश्वास होता. घरचं धार्मिक वातावरण, पूजापाठ, पठण त्यातून पाप-पुण्य, स्वर्ग-नरक वगरेंवर मग माझा ठाम विश्वास होता. स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक भूमिकांबाबतही तसेच सनातन विचार होते. मुलींकडे बघणंही पाप मग मत्री तर दूरच. पण शिकण्यासाठी पुण्यामध्ये आल्यानंतर काही उदारमतवादी मंडळींच्या संपर्कात आलो आणि खूप प्रश्न पडायला लागले. बाईला देवी मानणाऱ्या रूढीवादी घरांमध्ये बाईला मारहाण होतेच हे दिसू लागलं. मुलींशी मोकळेपणाने बोलण्यात काहीच वावगं दिसत नसताना त्याला पाप का म्हटलं जातंय. या काळात भरपूर वाचनही केलं आणि हळूहळू तो पगडा दूर झाला. आता ‘मावा’साठी संवादक म्हणून काम करताना सूरज आता आपल्याला दिसलेले अंतर्विरोध नव्या मुलांच्या समोर मांडतो, त्यांचे वैयक्तिक अनुभव खणून काढतो आणि विचार करायला भाग पाडतो. बाहेर कुणी पत्नी, मत्रिणीला कुणी मारहाण करताना दिसल्यास पाहत बसण्याऐवजी प्रसंगी हस्तक्षेप करण्याचं धाडस आल्याचं तो सांगतो.

हा आत्मविश्वास अधिकाधिक मुलांपर्यंत पोहोचण्याची गरज धुळ्यातील आयएमआरएडी मॅनेजमेंट संस्थेच्या संचालक वैशाली पाटील यांना वाटते. त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या संस्थेतील मुलांसाठी या कार्यशाळा घेतल्या तेव्हा हे प्रश्न आपलेच आहेत हे मुलग्यांच्या गावीही नव्हतं असा अनुभव त्या सांगतात. ‘सुरुवातीच्या चर्चासत्रात मुलीही सहभागी झाल्या होत्या. त्या धीटपणे प्रश्न विचारत होत्या. पण मुलं बोलत नव्हती. ती अंतर्मुख मात्र झाली. त्यांना अशा संवादाची गरज असल्याचं त्यांच्या फीडबॅक फॉम्र्समधून आम्हाला कळलं. मग धुळ्यातल्या १० महाविद्यालयांतील निवडक मुलांचं निवासी शिबीर झालं. तिथे अशा काही उत्सुक मुलांना आम्ही पाठवलं. तिथे मात्र ती खुलली. मोकळी झाली. त्यानंतर शिरपूरमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी पथनाटय़ं सादरही केली. पण अजूनही इतर मुलांसमोर िलगभाव, मर्दानगी वगरे विषयांवर बोलताना ती संकोचतात. इतर मुलांची प्रतिक्रिया काय असेल याबद्दल साशंक दिसतात. पण अशा मुलांची संख्या वाढली तर त्यांना नक्की बळ मिळेल असं वाटतं. हा संकोच जायचा तर चर्चा हेच उत्तम माध्यम असल्याचं अमोल काळेला वाटतं. सध्या धुळे-जळगाव इथे, ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या मदतीने सुरू असलेल्या युवा-तरंग या उपक्रमाचा समन्वयक आहे. २००६च्या ‘युवामत्री’पासून जोडल्या गेलेल्या अमोलनं वस्ती पातळीवरील किशोरवयीन मुलांबरोबर भरपूर काम केलं आहे. या दरम्यान या मुलांशी बनलेलं नातं हे आपलं संचितच असल्याचं तो मानतो. आताही तरुण संवादकांची नवी फळी तयार करताना त्यांनी आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल सतत संवाद साधत राहावं याबाबत तो आग्रही असतो. त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर िलगभेद व इतर सामाजिक प्रश्नांवर सतत चर्चा होत राहावी यावर त्याचा कटाक्ष असतो. उदाहरणार्थ ‘िपक’ चित्रपटाच्या निमित्ताने स्त्रीच्या नकाराच्या अधिकारावर या ग्रुप्सवर भरपूर चर्चा झाली. आमच्या ग्रुप्सवर इथे मुलगे आणि मुलीही अगदी बिनधास्त बोलतात.

गेल्या दहा वर्षांत समाज बदललाय. तंत्रज्ञान कधी नव्हे इतकं सहज हातात आलंय. अगदी ग्रामीण भागातही आहे. पण त्यातून मिळणाऱ्या माहितीतलं काय घ्यायचं माहीत नाही. पोर्नोग्राफीसारख्या गोष्टी उघडपणे दिसत असताना ते बरोबर की चूक, त्यावर आपली प्रतिक्रिया काय असायला हवी हे सांगणारं कुणी नाहीये. नातेसंबंधामधली गुंतागुंत वाढते आहे. ती कशी सोडवायची कळत नाहीये. तिथे या विषयांवर मोकळेपणाने बोलणं आवश्यक आहे. ‘मावा’चा ब्लॉग डवळऌाडफॅएठऊएफएदवअछकळ.डफॅ  तरुणांना तसा मंच मिळवून देत आहे. आपले प्रश्न हक्काने त्याच्याकडे घेऊन येणाऱ्या तरुणांना अमोल आपुलकीने काही समंजस मार्ग काढून देतो. त्यातलं आव्हान त्याला कामाचा नवा उत्साह मिळवून देतं.

‘मावा’च्या या प्रयत्नांची दखल सर्व स्तरांवर घेतली गेली आहे. ‘अशोका चेंजमेकर्स’ हा आंतरराष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार पथदर्शी प्रकल्पाच्या टप्प्यावरच मिळाला होता. महाराष्ट्र फाउंडेशनने पुरस्काराबरोबरच या प्रकल्पासाठी आíथक मदतही देऊ केली आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील सँडविक इंडिया या संस्थेतर्फे ‘जेंडर डायव्हर्सटिी’साठीचा पुरस्कार ‘मावा’ला मिळाला आहे. गेल्याच वर्षी हार्वर्ड युनिव्हर्सटिी, साउथ एशिया इन्स्टिटय़ूट आणि टाटा ट्रस्ट्स यांनी मिळून या सगळ्या प्रयत्नाचं दस्तावेजीककरण केलं आहे. चंद्रपूर जिल्ह्य़ामध्ये शंभर शाळांमध्येही याच धर्तीवर स्त्रीजाणीवविषयक संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीचा प्रयोग अलीकडेच ‘युनिसेफ’ व ‘यशदा’ यांनी केला आहे. पुणे व उत्तर भारतातील काही राज्यांत अशा विषयांवर काम करणाऱ्या पुरुषांसोबत काम करणारे नवनवे गट-संघटना तयार होत आहेत हेही आश्वासक आहे. तरीही आपल्याला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे याचं भान या तरुणांना आहे.

विचारांच्या पातळीवर झालेले बदल प्रत्यक्षात उतरवताना आपल्या कुटुंब, समाजव्यवस्थेला प्रश्न विचारावे लागणार आहेत. त्यातून उद्भवणारे संघर्षही अटळ असणार आहेत याची जाणीवही आहे. पण स्त्री-पुरुषपणाच्या रूढ चौकटी तोडून मुक्त माणूसपणाच्या दिशेने चालण्याचं बळ इथवरच्या प्रवासाने त्यांना दिलंच आहे.

 

चैताली भोगले – रेडकर

chaitalib6@gmail.com