07 July 2020

News Flash

‘मी सुद्धा’ची वाढती क्षेत्रं

सध्या ‘मीसुद्धा’ वा ‘मी टू’ असं म्हणत अनेक जणी समाजमाध्यमातून व्यक्त होऊ लागल्या आहेत.

सध्या देशात आणि परदेशातही स्त्रीवादी स्त्रियांमध्ये एक मोठा वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. मुख्यत: समाजमाध्यमातून. हॅशटॅग ‘मीसुद्धा’ म्हणत यातील मुद्दे आणि संवाद/प्रतिसंवाद अटीतटीने खेळला जात आहे. या सर्व वादविवादाला अनेक पदर आहेत म्हणूनच ते समजून घेणे महत्त्वाचे आहेत.

विविध क्षेत्रांतील विविध प्रकारची हिंसा, हे स्त्री-दमनासाठी आणि स्त्रियांना स्वतंत्र नागरिक म्हणून पुढे येण्यास अडसर निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हत्यार आहे, हा स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झालेल्या स्त्रीमुक्ती चळवळीने लावलेला महत्त्वाचा शोध आहे. या चाळीस वर्षांतील स्त्रीवादी चळवळीचे (सक्षमीकरणाचे औपचारिक प्रयत्न नव्हेत.) ठळक टप्पे हे हिंसेच्या विरोधातील लढाईचेच टप्पे म्हणून पुढे येतात. घराबाहेर, रस्त्यावर एकटी दुकटी स्त्री सुरक्षित नाही, हे मथुरा बलात्कार घटनेने दाखवून दिले आणि त्यावरील न्यायप्रक्रियेच्या विरोधात दिलेला लढा हा या लढाईचा पहिला टप्पा. कौटुंबिक हिंसा व त्यासाठी केले गेलेले कायदे व न्यायप्रक्रियेतील बदल हा दुसरा टप्पा व सर्वात महत्त्वाचा व गाजलेला तिसरा टप्पा, ज्याचे वारे अजूनही घोंघावत आहेत तो कामाच्या ठिकाणी होणारा छळ. ज्याच्या विरोधातली लढाई खूप कठीण आहे, असे लक्षात येऊ लागले आहे. स्वतंत्र नागरिक म्हणून जगताना, आकाशाला गवसणी घालताना, आपण निवडलेल्या क्षेत्रातील यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पोहोचणे हे किती अवघड आहे हे अधिकाधिक स्त्रियांना जाणवू लागले आहे. कौटुंबिक बंधनातून, धार्मिक, सांस्कृतिक बंधनातून, बलात्काराच्या भीतीतून बाहेर येऊन आर्थिक स्वातंत्र्याच्या वारूवर आरूढ होण्याची स्वप्ने पाहू लागताना मध्येच ही ठेच लागते असा अनेक जणींचा अनुभव आहे. आणि आता तो अनेक जणी व्यक्त करू लागल्या आहेत, त्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत आणि समाज माध्यम हे त्यासाठीचे एक महत्त्वाचे माध्यम ठरत आहे.

स्त्रियांच्या नोकरी क्षेत्रात ‘ग्लास सिलिंग’ हा शब्द प्रयोग तर फारच सर्रास वापरला जाऊ लागला आहे. प्रत्येकीला आकांक्षा असतेच आणि ती पूर्ण करण्यासाठी लागणारी कुवत, आत्मविश्वास आपल्याजवळ आहे याची खात्री असते आणि तरीही ते स्वप्न अनेकदा पूर्ण होत नाही. याचे कारण ‘पुरुषप्रधान’ समाजाला डोळ्यासमोरची जिवंत स्त्री दिसतच नाही, किंबहुना ती केवळ स्त्री म्हणूनच दिसते. उच्चपदाला न्याय देऊ शकणारा उमेदवार म्हणून तिच्याकडे पाहताच येत नाही अनेकदा. आणि जर या पदी पोहोचायचे वेड मनात घेऊन प्रयत्न करायचे तिने ठरवले तरी खड्डय़ांनी भरलेल्या, काचा पसरलेल्या वाटेने जाण्याशिवाय गत्यंतर नाही याची अनेक उदाहरणे, कथा, कहाण्या वाचायला मिळतात. ऐकिवात येतात. त्यात नवीन काही नाही असे म्हणत सोडून द्यायला निघालो तर सध्या चालू झालेले हे नवे वादळ  समोर उभे राहिले आहे. त्याची दखल घेणे आवश्यकच आहे.

करमणूक क्षेत्रातील स्त्री गुलामीच्या, लैंगिक शोषणाच्या कथा बऱ्याच ज्ञात असतात. अभिनयाची संधी मिळवून प्रेक्षकांसमोर पोहोचायचे आणि आपल्या नाटय़गुणांना पावती मिळविण्याचा प्रयत्न करायचा असेल तर पुरुषांनाही अनेक कठीण परिस्थितीतून जावे लागते हे मान्य, पण स्त्रियांना तर मान सन्मान, शारीर अस्मिता सर्वच तळहातावर घेऊनच वावरावे लागते याचे मुख्य कारण म्हणजे हे क्षेत्रच पुरुषसत्तेने व्यापलेले आहे.

सध्या या विषयावर हिरिरीने चर्चा सुरू असण्याचे कारण आहे, हॉलीवूडमधील बडे प्रस्थ असलेला हॉर्वे वाइन्स्टाइन नावाचा माणूस, ज्याने आजपर्यंत अनेक अभिनेत्रींना पुढे आणले पण किंमत घेऊन. आणि आश्चर्य म्हणजे त्यापैकी आज अनेकजणी प्रतिथयश कलाकार आहेत. स्टार्स आहेत. हळूहळू स्त्रीवाद त्यांच्यामध्ये मुरून त्यांनी बोलायला सुरुवात केली आहे. एकीने सुरुवात केल्यावर दुसरीही पुढे येऊन मीही तुझ्या आरोपपत्रात सामील आहे असा मोहोळ उठायला सुरुवात झाली. पुरुषांचे प्रिव्हिलेज, म्हणजेच विशेष अधिकार असलेले जग, असे असते की कमळाला जसा चिखल चिटकत नाही तसा स्टार, किंवा हिरो पुरुषांनाही स्त्रियांनी केलेले आरोप म्हणजे धुळीच्या कणांसारखे वाटू लागतात, कारण त्यांच्या कीर्तीवर किंवा पैसे मिळविण्याच्या कुवतीवर किंवा कौटुंबिक परिवारामध्ये याचा काहीही परिणाम होणार नाही याची त्यांना खात्री असते.

जग बदललंय, बदलतंय याची चुणूक म्हणजे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचा मुद्दा आता ऐरणीवर घेणे शक्य झाले आहे. स्त्रीमुक्ती चळवळीने काय मिळविले याचा विचार करताना सध्या जे हॉलीवूडमध्ये वातावरण निर्माण झाले आहे त्याचे उदाहरण दाखवता येईल. वाइन्स्टाइन या माणसाला हॉलीवूडमधील सर्वानीच, त्याच्याच पुरुष सहकाऱ्यांनी सुळावर चढविण्याची तयारी केली आहे हे महत्त्वाचे आहे. स्त्रीवादी चळवळीचा हा एक मोठा विजय म्हणता येईल. कारण एक नवे मूल्य, स्त्रीसन्मानाची बूज पुरुषांनी राखणे आवश्यक आहे हे समाजाने स्वीकारले आहे. स्त्रीच्या संमतीशिवाय, बळजबरीने किंवा आमिषे दाखवून मिळविलेली संमती म्हणजे संमती नव्हे. तिच्या स्पष्ट होकाराशिवाय तिच्या शरीराला स्पर्श करता कामा नये हे संमतीचे मूल्य महत्त्वाचे आहे. बलात्काराचा कायदासुद्धा या संमतीच्या तत्त्वावरच उभा राहिलेला आहे.

या निमित्ताने जे मोहोळ उठले आहे त्यातील माश्या भारतीय स्त्रीवादी वर्तुळापर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. राया सरकार मूळची भारतीय, सध्या अमेरिकेत शिकविते. तिने अमेरिकेतील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये शिकत असताना घेतलेल्या लैंगिक छळाच्या अनुभवांचा एक आलेख नावांसकट आपल्या फेसबुकवर प्रसिद्ध केला. तिने आरोप केलेल्या पुरुषांमध्ये मूळ भारतीय असलेले शैक्षणिक तज्ज्ञही आहेत. तिचा मुख्य मुद्दा होता की मनोरंजनाच्या उद्योगामध्ये खूप पैसे मिळू शकतात पण ‘ब्रेकथ्रू’ मिळविणे कठीण असते आणि त्याचा फायदा घेत या उद्योगातील तालेवार मंडळी आकांक्षित स्त्रियांना नमायला लावतात आणि त्याही अळीमिळी गुपचिळी बाळगतात. पण पुरुष असल्याचा हा विशेष अधिकार सर्वच क्षेत्रात वापरला जातो. उच्चशिक्षणात हाताखाली काम करणाऱ्या विद्यार्थिनींना वापरून घेणे हे सहज घडत असते. त्याबद्दल तक्रार करणे फारच थोडय़ांना जमते. एक तर ती प्रक्रिया वेळखाऊ  असते. दुसरे म्हणजे संशोधन चालू असताना तक्रार केली तर पुन्हा दुसरा मार्गदर्शक शोधावा लागतो. विषयही काही वेळा बदलावा लागतो. केलेले सर्व काम वाया जाते. रायाच्या बाबतीत हे घडलेले होतेच. पुन्हा नोकरी मिळताना तुम्ही एक ‘त्रासदायक’ स्त्री आहात अशी तुमच्याबद्दल अफवा पसरविली गेली असेल तर त्याचाही परिणाम निवड समितीवरील पुरुषांवर होण्याची शक्यता असते. गंमत म्हणजे अजून तरी अध्यापनाचे जग हे मुख्यत: पुरुषांचेच राहिले आहे. म्हणूनच तिने एकतर्फी ही नावे जाहीर करण्याची भूमिका घेतली. तिच्या मते हाही न्याय मिळविण्याचा एक मार्ग आहे. अन्यायाचा अतिरेक झाला की असे अतिरेकी मार्ग शोधावे लागतात. त्यामुळे मागून येणाऱ्या तरुण स्त्रियांना सावधगिरीचा इशारा मिळू शकतो आणि त्या प्रतिकाराला तयार राहू शकतात. सहजरीत्या लैंगिक छळाचे सावज बनण्यापासून स्वत:ला वाचवू शकतात.

या भूमिकेवरच आज जोरदार चर्चा चालू आहे. ‘काफिला’ नावाचे वेब पोर्टल आहे. त्यावर निवेदिता मेनन आणि तिच्या सहकारी यांनी अशी भूमिका घेतलेली आहे की, कायदा प्रक्रिया न अवलंबता त्या त्या अपराधी पुरुषाचे नाव अशा रीतीने सार्वजनिक करणे हे न्यायप्रक्रियेत बसत नाही. दोन्ही बाजू ऐकून घेणे आवश्यक आहे, जेवढा मिळेल तेवढा पुरावा, साक्षीदार वगैरे सर्व बाजूंनी तपास होणे आवश्यक आहे. सुदैवाने भारतात यासंबंधी कायदा होऊन लैंगिक छळ समित्यांची स्थापना करण्याचा आदेश सर्व सरकारी व खासगी आस्थापनांना दिलेले आहेत. अशा ‘नियत प्रक्रियेचे’ महत्त्व आपण ओळखले तर स्त्रियांना कांगावखोर म्हणून ओळखले जाणार नाही. शिवाय कित्येकदा पुरोगामी चळवळींमध्ये व स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये सहकारी नात्याने वावरणाऱ्या पुरुषांवरही असे आरोप केले जातात. ते जरी योग्य त्या पुराव्यांशिवाय असले तरी त्यांची नाचक्की होऊन त्याचा फायदा विरोधक घेऊ लागतात आणि ते चळवळींना घातक ठरू शकते. या त्यांच्या भूमिकेवर असंख्य प्रतिसाद समाज माध्यमावर आलेले आहेत.

अशाच एका प्रतिसादामध्ये अनेक स्त्रियांनी आपापल्या छळाचे अनुभव तपशीलवार मांडून न्याय न मिळाल्याचे कळविले आहे. अंतर्गत समितीने आरोपी अपराधी असल्याचे सिद्ध केल्यावरसुद्धा एका तरुणीला न्याय मिळाला नाही. कोणतीही कारवाई केली गेली नाही. ती स्वत: न्यायालयात गेली तर तेथेही महाविद्यालयाच्या कारभारी समितीने, मुख्य म्हणजे जी स्त्री संचालक होती तिनेसुद्धा महाविद्यालयाच्या वकिलाला पाठविले नाही. आरोपी सहज सुटू शकला.

दुसऱ्या एका वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या संस्थेमध्ये या तरुणीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून कोणताही प्रोजेक्ट मिळणार नाही, याची काळजी घेण्यात आली. अशा अनेक तक्रारी खुलेपणे येथे चर्चेसाठी येत आहेत. एका स्त्रीने तर अशा सगळ्या तक्रारींची यादी करून त्या अपराधी पुरुषांची नावे त्यामध्ये सामील केली आहेत आणि ही यादी वितरित करावी, असे आवाहन केले आहे.

दुसऱ्या एका प्रतिसादात, जो दलित व बहुजन स्त्रीवादी संघटनेने केला आहे, म्हटले आहे की, या पुरुष सत्तेच्या अभिव्यक्तीमध्ये पुरुषांना असलेले विशेष अधिकार एवढाच मुद्दा नसून जातिव्यवस्थेमध्ये सवर्ण म्हणून असलेल्या स्थानाचा वापर होऊन दलित तरुणींना हा छळ अधिक अंशी सहन करावा लागतो. त्यांच्या आकांक्षांना वाव मिळण्यासाठी जातीच्या ओझ्याखाली वाकवणे सवर्ण प्राध्यापकांना सहज शक्य होते. याच्या उलट एक प्रतिक्रिया अशी आली आहे की, दलित प्राध्यापक जेव्हा मार्गदर्शक बनतो तेव्हा त्याला सवर्ण विद्यार्थिनीला आपल्या जरबेत आणण्याचा वेगळाच आनंद मिळतो. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आणि अनुभव इथे मांडण्यात आले आहेत. आणि त्याच्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

या वादविवादामध्ये जुन्या स्त्रीवादी अणि नव्या रक्ताच्या वा नव्या पिढीच्या स्त्रीवादी असाही एक विभागणीचा सूर मिसळला जात आहे. ‘डय़ू प्रोसेस’ किंवा नियत प्रक्रिया ही लांबलचक असते आणि  ज्या पुरुषप्रधान व्यवस्थेबरोबर संघर्ष करायची गरज आहे त्याचाच तो अपरिहार्य भाग असेल तर न्यायाची शक्यता कमी असते. त्यामुळे उघड नाव घेऊन त्या पुरुषाची नाचक्की करणे याच मार्गाचा वापर केला पाहिजे, असा अनेक नव्या पिढीच्या स्त्रियांचा सूर दिसतो. जुन्या स्त्रिया फारच मर्यादाशील आहेत व पुरुषसत्तेचा खरा आवाका व तीव्रता त्यांना कळत नाही असे त्यांचे मत आहे. याउलट जुन्या स्त्रीवादी स्त्रियांनी आजवर चाळीस वर्षांमध्ये जे मिळविले आहे ते सर्व स्त्रीजातीसाठी मिळविले आहे तेव्हा त्यांचे सातत्य व चिकाटी मान्य केली पाहिजे व त्यांच्या मताला किंमत देणे आवश्यक आहे. सर्वानी मिळून मार्ग काढला पाहिजे, आततायीपणा करण्यात अर्थ नाही, असा सबुरीचा मुद्दाही काही तरुण स्त्रियांनी मांडलेला दिसतो.

मला आठवले की केंद्रीय विद्यापीठ आयोगाच्या वतीने आम्ही उच्चशिक्षण व्यवस्थेतील प्राध्यापक स्त्रियांसाठी नेतृत्व शिबिरे घेत होतो. त्यामध्ये पदोन्नती मिळवायची असेल, महाविद्यालयाच्या व्यवस्थापनात भाग घ्यायचा असेल तर एक आवश्यक गुणवत्ता म्हणजे संशोधन करून पीएच.डी. मिळविणे, असे आम्ही आग्रहपूर्वक मांडत होतो.

आजकाल महाविद्यालयाने प्रिन्सीपॉल पदासाठी पीएच.डी. सक्तीची केली आहे. स्त्रिया व्यवस्थापकीय पदावर आल्याशिवाय प्रगती नाही हे आम्ही मांडत असताना अनेक स्त्रिया त्यांच्या संशोधन प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींचा पाढा वाचायच्या. घरच्या अडचणी तर नित्याच्याच. पण मार्गदर्शकाकडून होणाऱ्या अडवणुकीच्या अनेक कहाण्या पुढे येत गेल्या. अगदी ढसाढसा रडणाऱ्या स्त्रियाही आम्ही पाहिल्या, विशेषत: ग्रामीण भागातील, जिल्ह्य़ाच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयांमधील. गुरूची प्रतिमा किती मलिन असू शकते हे आम्ही अनुभवत होतो.

थोडक्यात काय ‘बेटी बचाओ’ असा नारा देऊन थांबणे आता शक्य नाही. ही बेटी जिवंत राहिली की तिला आवाज फुटणारच आहे. परंतु त्याची दखल घेतली जाणार आहे की नाही, हा प्रश्न मोलाचा ठरणार आहे.

छाया दातार

chhaya.datar1944@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2017 5:16 am

Web Title: metoo goes viral on social media as women raise voice against sexual abuse
Next Stories
1 पालकत्वाचे सार्वत्रिक आव्हान
2 ‘बॉयकोड’ पुरुष घडवताना
3 इन्शुलिनचा रंजक इतिहास
Just Now!
X