डॉ. मीना वैशंपायन यांनी संस्कृत आणि मराठीमध्ये एम.ए. केले असून मराठी साहित्यात पीएच.डी. प्राप्त केली आहे. त्यांची समीक्षा, चरित्र, ललित, याबरोबरच  अनुवादित ,  स्त्री-अभ्यास विषयक – ‘दुर्गापर्व’, ‘ज्ञानकोशकार डॉ. केतकर’, ‘साहित्यवेध’ अशी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ‘दुर्गापर्व’ या पुस्तकाला राज्यशासनाचा उत्कृष्ट समीक्षा पुरस्कार मिळाला आहे. सध्या त्या ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ येथे मानद उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

साहित्याचं समाजशास्त्र जाणून त्याविषयी लिहिणाऱ्या, जाणिवांचं क्षितिज विस्तारणाऱ्या अनेक लेखिका आज लेखन करताहेत. गतकाळातील काही लेखिकांचं लेखन मात्र आजही अलक्षित राहिलं आहे. पुराणकथांचा आशय नव्यानं सांगणारी, नवनीता देव सेनचं साहित्य आपल्यापर्यंत फारसं पोचत नाही. व्हर्जिनिया वूल्फ हे नाव माहीत असतं, पण तिचं नेमकं वैशिष्टय़ माहीत नसतं. रहस्यकथाकार अगाथा ख्रिस्ती माहीत असते, पण तितकीच समर्थ रहस्यलेखिका पी. डी. जेम्स माहीत नसते. जगभरातील अशा अलक्षित लेखिकांच्या अनवट साहित्याची ओळख करून देणारं हे सदर दर पंधरवडय़ाला.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

विसावं शतक संपलं आणि बघता बघता एकविसाव्या शतकाचं दीड दशकही संपलं. काळाची गती जणू पूर्वीपेक्षा अधिकच वाढली की काय असा संभ्रम पडावा इतक्या वेगानं ही र्वष उलटताहेत. काळाबरोबर समाजही त्याच वेगानं बदलतोय का? असं म्हणतात की, समाज हा अजगरासारखा सुस्त असतो. तो हलायला, बदलायला खूप वेळ लागतो. हे तर खरंच. मात्र काही बाबतीत तरी समाजात झालेले बदल आता प्रकर्षांनं जाणवू लागले आहेत. ते बदल लक्षणीय आहेत, एवढंच नव्हे तर समाजावर दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत. जगभर स्त्रियांना मिळू लागलेलं शिक्षण आणि स्त्रीमुक्तीचळवळ यामुळे समाजचित्र आमूलाग्र बदललंय, बदलतंय असं दिसतंय. समाजघडणीत स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा ठरलाय. एकोणिसाव्या शतकाची ही जगाला मिळालेली मोठी देणगीच म्हणता येईल.

आपल्याकडचंच पाहा ना, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आपल्याकडे स्त्रीशिक्षणाचा वसा अनेक स्त्रीपुरुषांनी गंभीरपणे घेतला. त्याचं फलित विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दिसू लागलं. शतकानुशतकं आपलं मन मारून, पोटातलं ओठावर येऊ न देणारी स्त्री या काळात आपल्या भाव-भावना हळूहळू प्रकट करू लागली. ओव्या किंवा लोकगीतं यांच्या आधारे आपलं मन व्यक्त करणारी स्त्री तशी अनाम होती. मराठीत संतकवयित्रींच्या रचना आणि लोकसाहित्य यातून स्त्रीप्रतिभा व्यक्त होत होती, पण अगदी मर्यादित व बहुतांशी आध्यात्मिक स्वरूपात. लोकसाहित्यातून एका समूहमनाचा आविष्कार होत होता. विसाव्या शतकात मात्र ती एक व्यक्ती म्हणून आविष्कृत होण्याचा प्रयत्न करत होती. स्त्रियांना लिहिता-वाचता येणं आणि ते लेखन छापता येऊन जाहीर रीतीनं प्रसिद्ध करणं ही आपल्याकडेच नव्हे तर साऱ्या जगभरच मोठी क्रांतिकारक गोष्ट होती.

गंमत अशी की, समाजशास्त्रज्ञ व मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की, भाषेचा उपयोग स्त्रिया जितक्या समर्थपणे व सहजतेने करतात तितका पुरुष करू शकत नाहीत. लोकसाहित्यातील म्हणी, वाक्प्रचार, कोडी, उखाणे हे बहुतांशी स्त्रीनिर्मित असावेत असं एक मतही व्यक्त केलं जातं. काही म्हणी आठवून पाहिल्या, की हे पटतंच. पण आता आतापर्यंत या भाषाप्रभुत्वाचा वापर करून आपलं मन अभिव्यक्त करण्याची, साहित्यनिर्मिती करण्याची, ते लेखन प्रसिद्ध करण्याची मात्र स्त्रियांना बंदी होती.

आज आपण पाहतो की, जागतिक साहित्यात आणि भारतीय साहित्यातही स्त्रीलिखित साहित्याचं दालन लक्षणीय व समृद्ध आहे. आरंभी स्त्रीप्रतिभेचा आविष्कार तसा विरळा होता. स्त्रियांवर असणाऱ्या विविध दडपणांमुळे, सामाजिक बंधनांमुळे तिला बहुतेकदा आपली समाजप्रतिमा सांभाळतच लेखन करावं लागत असे. शिवाय तिच्याजवळ शिक्षणाचा अभाव होता. त्यामुळे जगभरच स्त्रियांची प्रतिभा, त्यांची लेखनक्षमता, यांची जाणीव आधी फारशी झालेली दिसत नाही. त्यांना स्वत:ला व्यक्त करण्यासाठी, लेखनाचा आधार मिळाला तो खऱ्या अर्थानं अठराव्या शतकानंतरच. इंग्रजी साहित्यात सतराव्या शतकातील ब्रिटिश कवयित्री, नाटककार अफ्रा बहन, हिचं ऋण मानलं जातं, कारण स्त्रीसंवेदनेचा उद्गार तिच्या लेखनातून प्रथम, सातत्याने उमटला आणि स्त्रियांचे अनुभव शब्दरूप घेत गेले. अफ्रा बहन ही आद्य व्यावसायिक स्त्री लेखिका मानली जाते.

व्हर्जिनिया वूल्फसारखी प्रसिद्ध ब्रिटिश लेखिका म्हणते, ‘अठराव्या शतकानंतर स्त्रिया सातत्याने लेखन करू लागल्या आणि त्यांनी एकापेक्षा एक सरस साहित्यकृती निर्माण केल्या. तोवर स्त्रियांकडे दुर्लक्षच केलं जात असे. स्त्रिया या केवळ परंपरेचा धागा मानल्या जात होत्या. त्यांच्याविषयी, त्यांच्या कर्तृत्वाविषयी काहीच माहिती लोकांना नसे. त्यांचे रूप ही एकच गोष्ट फक्त सविस्तरपणे नोंदवली जाई. एकोणिसाव्या शतकारंभी इंग्लंडच्या कायद्यांमध्ये बदल झाले आणि मग त्यांना कादंबरी लेखनाची मुभा मिळाली. त्यानंतर मात्र स्त्रियांनी जोमाने साहित्यनिर्मिती करण्यास आरंभ केला.’

भारतातही वेगळी परिस्थिती नव्हती. पण शिक्षणाचा प्रसार जसजसा वाढत गेला तसतसा बाहेरील जगाशी स्त्रियांचा संपर्क वाढला आणि त्यांच्या जाणिवांचा विकास होऊ  लागला. इंग्रजी राजवटीमुळे व सुधारकांच्या प्रयत्नांमुळे शिक्षणाबरोबरच, पाश्चात्त्य साहित्याचं वाचन होऊ  लागलं. या वाचनानं वाङ्मयनिर्मिती ही जितकी उत्स्फूर्त तितकीच जबाबदारीने, जाणीवपूर्वक करण्याची गोष्ट आहे याचं भान हळूहळू येऊ  लागलं, वाङ्मयप्रकारांची ओळख झाली.

गोष्टी सांगणं, ऐकणं ही माणसाची प्राथमिक आवड असते, असं म्हटलं जातं. त्यामुळे आरंभी जरी कथा, कविता, कादंबरी, नाटक, अशा ललित साहित्याची निर्मिती अधिक झाली असली तरी लवकरच साहित्याच्या इतर प्रकारातही स्त्रियांना रस वाटू लागला आणि प्रचलित लेखनप्रकारांना वेगळं वळण देण्याचं धाडस काहींनी केलं. इथे व्हर्जिनिया वूल्फ, पी.डी. जेम्स, मार्गारिट द्यूरास, यांच्याबरोबरच कमल देसाई  यांचीही आठवण होते. ललितेतर, वैचारिक स्वरूपाचं लेखन स्त्रिया करू लागल्या. आयरिस मरडॉक, आयन रॅन्ड काय किंवा आपल्या दुर्गाबाई, इरावतीबाई काय, त्यांच्या चिंतनशील लेखनाला साहित्यमूल्यही होतं आणि आहे. वेगवेगळी आंदोलनं, चळवळी यातून रिपोर्ताज, मुलाखती असे नवनवीन लेखनप्रकार स्त्रियांनी आत्मसात केले. लेखनाची नवीन वाट चोखाळताना ती रुळलेली नसल्याने संघर्ष अटळ होता. ती वाट रुळवणं, प्रशस्त करणं हे त्यांना कधी जमलं, कधी त्यांना हवं तेवढं यश मिळालं नाही. पण तरीही त्यांची लेखननिष्ठा कायम राहिली.

जसजसा काळ, जीवनशैली बदलत गेली तसतसं त्याचं प्रतिबिंब लेखनात उमटत गेलं. गेल्या शतकातील दोन महायुद्धांनी केलेल्या खोल जखमांनी पाश्चात्त्य जगातील लेखिकांचे विषय, लेखनाचा आशय, शैली वेगळी होत गेली. धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद, स्त्रीपुरुष असमानता यातून उभी राहिलेली आंदोलने, संघर्ष यांनीही स्त्रियांना अधिक सजग केलं. शिक्षण, नोकरी यांच्या संधी मिळाल्यामुळे अनुभवक्षेत्रंही बदलली. कुटुंब, संसार, स्त्रीपुरुष प्रेम एवढंच मर्यादित अनुभवविश्व असणाऱ्या स्त्रियांचं अनुभवविश्व विस्तारलं. व्यक्तिजीवनातील, नात्यांतील गुंतागुंत वाढली, ती आकलन करून घेताना अनेक प्रश्न उभे राहिले आणि अधिक खोलवर जाऊन उत्तरं शोधण्याचे प्रयत्नही लेखनातून होऊ  लागले.

आपलं मराठी साहित्यविश्व, व वाचकही आज जागतिक साहित्यविश्वाशी परिचित होण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडे इतर भाषांमधून मराठीत मोठय़ा प्रमाणावर अनुवाद होताना दिसतात. या माध्यमातूनही आपण नवीन लेखन, लेखक जाणून घेतो आहोत. अ‍ॅन अ‍ॅपलबॉम्, ख्रिस्तीन फेअर, मेरी अ‍ॅन व्हीवर या परदेशी लेखिकांचं आंतरराष्ट्रीय विषयांवरील राजकीय लेखन, वाचकांना आकर्षून घेत आहे. भाषेचं लालित्य आणि वाचनीयता कायम ठेवून आपल्या अभ्यासक्षेत्रांविषयी मराठीत लिहिणाऱ्या, डॉ. रूपा रेगे-नित्सुरे, अंजली जोशी किंवा डॉ. मृदुला बेळे अशा लेखिका जोमाने लिहिताहेत. पण कथा, कादंबरी, कविता अशा परिचित वाङ्मयप्रकारा पलीकडच्या लेखनाची- मग ते भारतीय लेखिकेचे असो वा अभारतीय लेखिकेचे, आपल्याला फारशी ओळख नसते. कधी कधी केवळ प्रसिद्ध लेखिकांच्या नावांशीच आपली ओळख असते. साहित्याचं समाजशास्त्र जाणून घेऊन त्याविषयी लिहिणाऱ्या, जाणिवांचं क्षितिज विस्तारणाऱ्या अनेक लेखिका आज लेखन करताहेत. गतकाळातील काही लेखिकांचं लेखन अलक्षित राहिलं असेल, राहिलं आहे. तत्कालीन वाङ्मयीन वातावरणात अनोखं, अनवट वाटणारं लेखन आज कदाचित विसरलं गेलं असेल. समाजाच्या धारणा बदलल्या की जुन्या गोष्टींचे अन्वयार्थही कधी कधी बदलतात, असंही लक्षात येतं. पुराणकथांचा आशय नव्यानं सांगणारी, इंग्रजी-बंगालीत सारख्याच सामर्थ्यांने लिहिणारी, आपल्याच इथली नवनीता देव सेन किंवा या ना त्या साहित्यबाह्य़ कारणाने प्रकाशझोतात आलेली, पण मुळात तीव्र संवेदनशील असणारी कमला दास, एखादी रोमिला थापरसारखी, इतिहासतज्ज्ञ लेखिका अशांचं साहित्य आपल्यापर्यंत कधी कधी पोचत नाही. कदाचित एखाद्या लेखिकेचं वेगळंच वैशिष्टय़ असतं जे आपल्या नजरेआड होत राहतं. व्हर्जिनिया वूल्फ हे नाव माहीत असतं, पण तिचं नेमकं वैशिष्टय़ माहीत नसतं. रहस्यकथांसारख्या आगळ्या साहित्यप्रकारातील लेखिका अगाथा ख्रिस्ती वाचतो, पडद्यावर तिच्या साहित्यकृतीवर आधारित मालिका पाहतो, पण तितकीच समर्थ रहस्यलेखिका पी. डी. जेम्स माहीत नसते. अशा अलक्षित फ्रेंच, रशियन, जर्मन लेखिकांच्या अनवट साहित्याची ओळख या निमित्तानं करून घ्यावी, असं मनात आलं. मराठीतलं वाचतो पण बाकीचं ‘देशी वाण’ आपल्याला बहुधा अपरिचितच राहतं, आणि एखाद्या राष्ट्रीय पुरस्कारानंतरच आपण तिकडे लक्ष देतो की काय अशी खंत वाटत राहते. अनेक लेखिका व त्यांचे लेखन दर्जेदार व वेधक असूनही आपल्यापासून काहीसं दूर आहे. या लेखिकांनी आपली लेखननिष्ठा कायम ठेवून साहित्यात भर घातली आहे. अथांग, विस्तृत साहित्यसागरातील, नव्या आणि जुन्याही अलक्षित, पण महत्त्वाच्या लेखिकांच्या या वेगळ्या, अनवट अक्षरवाटांचा हा मागोवा!

डॉ. मीना वैशंपायन meenaulhas@gmail.com