मराठी माणसाला उद्योग जमत नाही हे गृहीतक आता इतिहासजमा झालंय. आता पुरुषच नाही तर अनेक मराठी स्त्रियांनीही उद्योग क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी केलीय; पण त्याही पलीकडे जात आता कल वाढतो आहे तो चाकोरीबाहेरच्या उद्योगांना साद घालायचा. यंदाच्या, नवीन वर्षांतल्या या पहिल्या अंकात अशाच काही मराठी उद्योगकर्तृत्वाची ही ओळख. वापरात नसलेल्या बंगल्यांना पर्यटनासाठी सज्ज करणे असो, ‘शॉर्ट हॉटेल स्टे’ असो, ज्येष्ठांना तंत्रस्नेही करणे असो की रिझ्युमे रायटिंग असो, या तरुणींनी वेगळ्याच क्षेत्रात आपली गरज निर्माण केलीय.. त्यांच्याविषयी..

चाकोरी मोडून वेगळं काही करायची आस धरणाऱ्या अनेक जणी असतात.. पण वास्तवात मात्र चित्र जरा वेगळंच असतं. शिक्षण आणि नोकरीची ठरावीक चाकोरी मोडून नवं काही करणाऱ्यांना आजही खुळे म्हणून पाहिलं जातं.. आणि त्यात जर त्या स्त्रिया असतील तर विचारायलाच नको आणि त्यातही त्यांनी अगदी वेगळा, रूढींना नाकारणारा व्यवसाय निवडला असेल तर मग टीका होतेच होते आणि जर स्वत:चा प्रस्थापित व्यवसाय सोडून हा मार्ग स्वीकारला असेल तर? म्हणजे शिक्षणाने सी.ए. आहे. चांगली उत्तम नोकरी आहे. असे असताना कोणी ती सोडून भारतभर वणवण करून पर्यटनाच्या क्षेत्रात काही वेगळे करण्याचं स्वप्न बाळगत असेल तर तिला काय म्हणाल? पण काही तरी नावाजण्याजोगं घडतं ते अशाच कलंदर मन:स्थितीतून.. प्रस्थापित मार्ग सोडून अनवट रानवाटा शोधल्या जातात आणि एक छान स्वप्न प्रत्यक्षात आकाराला येतं.

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

‘सॅफरॉन स्टेज्’  (saffron stays) नावाचं.. तेजस परुळेकर या सी.ए. तरुणीनं बघितलेलं आणि हळूहळू आकाराला येत असलेलं. काही वर्षांपूर्वी युरोपमध्ये फिरताना तेथील होम स्टेज् पाहून तेजसच्या मनात विचार आला की, भारतात असं का नाही? म्हणजे होम स्टेज् आहेत, पण त्या ठिकाणच्या परंपरांशी, संस्कृतीशी साधम्र्य साधणारे नाहीत. अनेक ठिकाणं आहेत ज्याचा वापर होऊ शकतो. विशेषत: केरळमध्ये फिरताना आणि तिथले पारंपरिक पद्धतीचे केरळी वाडे बघताना ही जाणीव प्रखर होत गेली. वर्षांतले जवळपास दहा महिने ते बंदच असतात. भारतात अनेक ठिकाणी कलोनियल बंगले/हवेल्या आहेत. त्याचा वापर करून संस्कृतीशी सांगड असणारे पर्यटन का नाही? तेजसनं  मग प्रथम महाराष्ट्रात काम सुरू केलं. माथेरान येथील पारशी बंगला.. कामशेतमधील दमदार वाडा.. महाबळेश्वर.. आदी ठिकाणी ‘सॅफरॉन स्टेज्’तर्फे वेगळं पर्यटन साधू पाहणाऱ्यांना ठिकाण उपलब्ध झालं.. येथे नुसतं राहणं नाही, तर त्या वास्तूशी संवाद साधणं आहे. त्या ठिकाणची संस्कृती जाणून घेण्याचा जिवंत रसरशीत अनुभव पर्यटकाला येतो. मग माथेरानच्या पारशी किल्ल्यातले टिपिकल बावा/पारशी फूड वर्कशॉप असो वा महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी खुडणे असो की मासेमारीसाठी गळ टाकून बसणं असो. तेजस आणि तिचा नवरा देवेंद्र प्रवासाला एका वेगळा अर्थ देतात. सुट्टय़ा संस्मरणीय करतात. अर्थात हे प्रत्यक्षात आणणं इतकं सोपं नाही. असंख्य अडचणी आल्या.. कटकटी झाल्या.. पण तेजसनं त्यावर मात करून काम सुरू ठेवलेय. फक्त पर्यटकांना नाही तर तेथील स्थानिकांनाही त्यात सामील करून घेतलय. अर्थशास्त्रात ज्याला मायक्रोआन्त्रप्रनरशिप म्हणतात ते ती करतेय. ‘सॅफरॉन स्टेज्’मध्ये पर्यटकांना स्वत:चं घर मिळतं. सर्वसाधारणपणे ग्राहक आणि हॉटेलमधील कर्मचारी यांच्यात एक अदृश्य भिंत असते आणि शिकवलेला त्रयस्थ नम्रपणा. ‘सॅफरॉन स्टेज्’मध्ये एक घरगुती अनुभव पाहुण्यांना येतो. घराची काळजी घेणारा जो कर्मचारीवर्ग असतो तोच सहज पाहुण्यांची सरबराई करतो. ऑर्डर केली आणि मिळालं हा प्रकार येथे नाही. घरातल्या मदतनीसाशी जसं आपुलकीनं वागलं जातं तसंच पाहुणे येथे वागतात. सकाळी उठा, न्याहरी करा आणि स्थळदर्शनाला निघा ही चाकोरी येथे तेजसनं ठरवून नाकारली आहे.

काही काही खट पर्यटक असे भेटतात की, बरंच शिकवून जातात. म्हणजे सांगायची ६ माणसं आणि आणायची १२. किंवा स्वत:चा महाराज घेऊन यायचा. हे जे राहतोय ते घर आहे, हॉटेल नाही ही जाणीव काही पर्यटक बिनदिक्कत नजरेआड करतात. उर्मटपणे वागतात. आपण एका ‘हेरिटेज वास्तू’मध्ये राहतोय याचे यित्कचितही अप्रूप त्यांना नसते. काही वेळा बिनदिक्कतपणे नासधूस करतात. त्यांना योग्य ती समज द्यावी लागते.  – तेजस परुळेकर

मदतनीस म्हणून ‘सॅफरॉन स्टेज्’च्या निवासस्थानात स्थानिक लोक सामावून घेतले जातात आणि त्यांच्याकडूनच येथे काय करावे, काय पाहावे, वेळ कसा घालवावा यांच्यावर छान मार्गदर्शन केलं जातं. व्यावसायिक गाईडपेक्षा पर्यटक हा पर्याय खूपच आवडीने स्वीकारतात. तेजस म्हणाली की, ‘‘हे वाटतं तेवढं सोपं नाही. काही काही खट पर्यटक असे भेटतात की, बरंच शिकवून जातात. म्हणजे सांगायची ६ माणसं आणि आणायची १२. किंवा स्वत:चा महाराज घेऊन यायचा. हे जे राहतोय ते घर आहे, हॉटेल नाही ही जाणीव काही पर्यटक बिनदिक्कत नजरेआड करतात. उर्मटपणे वागतात. आपण एका ‘हेरिटेज वास्तू’मध्ये राहतोय याचे यित्कचितही अप्रूप त्यांना नसते. काही वेळा बिनदिक्कतपणे नासधूस करतात.’’ तेजस आणि तिच्या नवऱ्याच्या सहनशक्तीची प्रचंड कसोटी या वेळी लागते पण हे असे अनुभव तेजसला अनेक गोष्टी शिकवून गेलेत. म्हणजे सिक्युरिटी डिपॉझिट घ्यायचे आणि जर नुकसान झाले असेल तर त्यातून वळते करायचे हा मोठा धडा तेजस शिकली. आपल्याकडे पर्यटन हे फार गंभीरपणे घेतले जात नाही. त्याचा प्रत्यय अनेक वेळेला तेजसला आलेला आहे. रोजचा दिवस तिला नवं काही शिकवून जातो. ‘सॅफरॉन स्टेज्’ची सुरुवातीची दर दिवशीची उलाढाल होती वीस हजार रुपये त्यातून आता दीड लाखांचा आकडा तेजसने गाठला आहे. न भांडता, ठामपणे नाही कसं म्हणायचं हे ती शिकली आहे. भविष्यात अनेक योजना आहेत. फक्त भारतात नाही तर परदेशातही. साचेबंद वाट नाकारून वेगळे करण्याच्या तेजस परुळेकराची जिद्द अफलातून!

तेजससारखीच पर्यटनाची भोक्ती प्रियांका कोथमिरे, यातलच पण जरा वेगळं क्षेत्र तिनं निवडलंय. ती पर्यटकांना त्यातही स्त्री पर्यटकांना तासांच्या बोलीवर चांगल्या हॉटेलमधले रूम्स उपलब्ध करून देते. अनेकदा असे होते की, आपण एखाद्या ठिकाणी जातो, परंतु तिथे संपूर्ण दिवस राहायचं नसतं. फक्त दोन-एक तासासाठी रूम हवी असते. कुठल्याही तीर्थक्षेत्री समजा पहाटे उतरलो तर फक्त फ्रेश होऊन आंघोळ करून दर्शन घेण्यापुरते हॉटेल हवं असतं किंवा एका ठिकाणी रात्रीचं उतरलोय, दुसऱ्या ठिकाणी जायचंय, पण अशा अडनिडय़ावेळी वाहन मिळणार नसेल तर राहायचं  कुठे, त्यासाठी हॉटेलचा आसरा घ्यावा लागतो. मग विनाकारण संपूर्ण दिवसाचं भाडं भरावं लागतं. प्रियांकाने तिचा FROTEL या कंपनीद्वारा अनेकांना असा ‘शॉर्ट स्टे’ उपलब्ध करून दिलाय. भारतातल्या ९२ शहरांत २१६ मोठय़ा हॉटेलसोबत प्रियांकाचे काम चालतं. एकटय़ा बाईनं वेळी-अवेळी रेल्वे स्टेशन, एस.टी., बस अड्डा इथे उतरून हॉटेल शोधणं वा वाट पाहणं अनेकदा जिकिरीचं व त्रासदायक होतं. अगदी अनेक जणींचा मोठा ग्रुप असला तरीही वाट पाहणं केव्हाही वाईटच. तेच सोबत लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक असले तर तो दुपटीने वाढतो. कदाचित विमानतळामधून एकदम पंचतारांकित हॉटेलात जाणं सोपं पडतं, पण ते सर्वानाच परवडतं असं नाही. नेमक्या याच परंपरागत भारतीय मानसिकतेला अचूक ओळखून प्रियांकाने या व्यवसायाला सुरुवात केली. ‘शॉर्ट स्टे’ यावर हे काम चालते. लग्नसमारंभ, खरेदी, पार्टी, देवदर्शन यासाठी अगदी थोडय़ा वेळेसाठी पण चांगली जागा हवी असते. अशा वेळी मदतीला येते ते ‘फ्रोटेल’. अनेकींना एका कार्यक्रमावरून दुसऱ्या कार्यक्रमाला जाण्यासाठी साडय़ा, कपडे बदलायचे असतात, मुलांचे नॅपी बदलायचे असतात. काहींना फक्त आंघोळ करायची असते वा एक डुलकी काढून फ्रेश व्हायचं असतं. या छोटय़ा गरजासाठी प्रियांकाची ही सेवा एकदम छान असते. आत्तापर्यंत तिला यासाठी उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. सध्याच्या स्पायकॅमच्या युगात अशा सुविधा जपूनच वापराव्या लागतात आणि प्रियांका या बाबतीत एकदम दक्ष आहे. बाईने नि:संकोचपणे राहावं, हाच तिचा हेतू आहे. अनेकांनी तिला तिच्या या सेवेचा फायदा अनतिक कामासाठी होऊ शकतो याचा इशारा दिला; पण तो तिनं गरसमजात बदलला. नामवंत आणि विश्वासार्ह हॉटेलसोबत तिने करार केले आहेत आणि ज्याला ग्राहक उत्तम मिळत आहेत. ‘इकॉनॉमिकल शॉर्ट स्टे’ हे तिचे ब्रीदवाक्य फक्त आíथकदृष्टय़ा उच्चवर्गीयांसाठीच नव्हे, तर समाजाच्या निम्नस्तरातील स्त्रियांसाठीही प्रियांका सोयी उपलब्ध करून देते. सुरुवातीला प्रियांकाला मोठमोठय़ा चांगल्या हॉटेल्सला ‘शॉर्ट स्टे’ म्हणजे नक्की काय? हे समजून सांगणे फार कटकटीचं ठरलं. अर्थात हॉटेल्सचाही दोष नव्हता, कारण असं काही सुरू केलं तर फक्त लग्न न झालेली जोडपी येतील आणि हॉटेलची प्रतिष्ठा डागाळली जाईल याची एक नसíगक भीती हॉटेलच्या व्यवस्थापनाला असणं गर नव्हतं. त्यासाठी प्रियांका अनेकदा स्वत: हॉटेलवर राहिलेली आहे आणि हळूहळू तिनं विश्वास संपादन केला. प्रियांकाने एक अनुभव सांगितला, एक आई म्हैसूरवरून बंगळुरूला जात होती आणि तिला फक्त साडी नेसायला आणि बाळाला दूध पाजायला हॉटेल हवं होतं. तिने ऑफलाइन संपर्क साधला आणि तिची सोय प्रियांकाने जातीने लक्ष देऊन केली. हे असे ग्राहक प्रियांकाच्या FROTEL ची चालती-बोलती जाहिरात झालेले आहेत. प्रियांकाची हॉटेल्स सगळीकडे आहेत, म्हणजे लोणावळ्याला भुशी डॅमला धुडगूस घातल्यावर एखाद्या ग्रुपला फक्त कपडे बदलायचे असतात तर कधी तिर्थक्षेत्रावरून दर्शन घेऊन लगेच निघायचं असतं, तर कोणाला महाबळेश्वरला फक्त सामान ठेवायचं असतं. हे सगळे ग्राहक पसे द्यायला तयार असतात पण संपूर्ण दिवसाचं भाडं भरणं त्यांना पटत नाही आणि परवडतही नाही. हॉटेलवाल्याकडे रूम असतात पण त्या १२ किंवा २४ तासांकरिता. यामधला सुवर्णमध्य प्रियांकाने शोधलाय. तुमच्या गरजेनुसार निवडा आणि तेवढेच पसे द्या. सुरुवातीला वेडगळ वाटणारा हा मनसुबा प्रत्यक्षात बदलला गेला आहे. आणि आधी बिचकणारे हॉटेलवाले (या अगदी टू स्टार ते सेव्हन स्टापर्यंत) सगळे आपणहून ‘फ्रोटेल’मध्ये सामील होऊ लागले आहेत. पुणे-मुंबईला लग्नाच्या मोसमात काका-माम्या, मत्रिणी यांना मेक-अप, साडी, तयारी यासाठी जागा मिळणे जिकिरीचे व्हायचे. पण ‘फ्रोटेल’ने हा प्रश्न सोडविलेला आहे. पुढच्या सहा महिन्यांत पूर्ण भारतभर या सेवेचे जाळे प्रियांकाला पसरवायचे आहे. हा प्रवास सोपा नाही. खूप फिरावं लागतं, निकष लावावे लागतात, पारखून घ्यावं लागतं आणि ही जबाबदारी प्रियांका आणि तिचे सहकारी सहज पार पाडत आहेत.

हॉटेलवाल्याकडे रूम असतात पण त्या  १२ किंवा २४ तासांकरिता. यामधला सुवर्णमध्य  मी शोधलाय. आधी बिचकणारे हॉटेलवाले आपणहून ‘फ्रोटेल’मध्ये सामील होऊ लागले आहेत. पुढच्या सहा महिन्यांत पूर्ण भारतभर या सेवेचे जाळे पसरवायचे आहे. हा प्रवास सोपा नाही. खूप फिरावं लागतं, निकष लावावे लागतात, पारखून घ्यावं लागतं, पण  त्यातही समाधान आहे. – प्रियांका कोथमिरे

आता समजा, अशा सेवेचा लाभ कोणा ज्येष्ठ नागरिकांना घ्यायचाय, पण त्यांना संगणक हाताळता येत नाही. सगळे शिकायचे नाहीए, पण निदान मोबाइल/स्मार्ट फोन हाताळणं.. अ‍ॅप्स वापरणं. नेटवरून बुकिंग करणं यांसारख्या गोष्टी ज्येष्ठ नागरिकांना कठीण जातात आणि अशा वेळी वैभवी रेगेचा उपक्रम त्यांच्या मदतीला येतो. वैभवी आजी-आजोबांना ‘नेटसॅव्ही’ करते. फेसबुक कसं वापरायचं, स्काइप कसं वापरायचं? ऑनलाइन बुकिंग कसे करायचं? नेटबुकिंग, अ‍ॅप्स कसे वापरायचे? मेल कसे पाठवायचे? तरुण पिढीला साध्या वाटणाऱ्या गोष्टी ज्येष्ठ नागरिकांना सहजासहजी जमत नाहीत. विशेषत: हल्ली एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढलीय आणि हे आधुनिक तंत्रज्ञान त्यांचे आयुष्य सुखावह करते, पण शिकवणार कोण? वैभवी रेगे अशा आजी-आजोबा, काका-मावशांकडे जाते आणि आठवडय़ाभरात नेट/टेक सॅव्ही करून टाकते आणि मग एखादी आजी आपण केलेल्या पुरणपोळीचे फोटो फेसबुकवर अपलोड करू शकते आणि आजोबा नाटकाचे ऑनलाइन बुकिंग करतात. मावशा-काका भिशी पार्टीला हवे ते रेस्टॉरंट बुक करतात. ऑनलाइन फूड ऑर्डर करतात. वैभवीने आतापर्यंत ३०० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना नव्या तंत्रज्ञानाशी परिचित करून त्यांना मेन स्ट्रीममध्ये आणलंय. ती मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांत शिकवते, तेही तुमच्या घरी येऊन. त्यामुळे होतं काय की, प्रौढांमधला न्यूनगंड कमी होतो. तेही आपल्या मुला-नातवंडांच्या बरोबरीनं काळाच्या बरोबर चालू शकतात. साहजिकच अनेक आज्यांची वैभवी फेव्हरेट नात झालीय. वैभवी सांगते, एका आजींकडे ती त्यांना शिकवायला गेली होती, त्यांच्या मुलानं आणून दिलेला अत्याधुनिक आयपॅड दीड र्वष वापराविना पडला होता. आजीनं, बघ यांचा काय उपयोग होतो काय, असं म्हणत वैभवीला तो दिला. आणि आठ दिवसांत आजी सफाईदारपरणे तो वापरायलादेखील लागल्या. परदेशात स्थायिक असलेल्या त्यांच्या मुलाचा विश्वासच बसला नाही. वरवर बघायला फार किरकोळ वाटणारे हे काम अगदी वेगळे आहे. समाजाभिमुख आहे. समाजातील मुख्य घटक असणाऱ्या ज्येष्ठांशी संवाद साधणारे आहे. पेशाने कमर्शियल आर्टिस्ट असणाऱ्या वैभवीनं  आपल्या आजीसाठी हे काम सुरू केले ते २००९ मध्ये आणि आता त्याची मागणी वाढतेच आहे.

वरवर बघायला फार किरकोळ वाटणारे हे काम अगदी वेगळे आहे. समाजाभिमुख आहे. समाजातील मुख्य घटक असणाऱ्या ज्येष्ठांशी संवाद साधणारे आहे. हे काम सुरू केले ते २००९ मध्ये आणि आता त्याची मागणी वाढतेच आहे. – वैभवी रेगे

संगणक सध्या परवलीचा शब्द आहे आणि मुले त्याच्याशी लहानपणापासून परिचित असतात; पण अनेकदा होते काय, की त्यांचा हा संपर्क फक्त संगणकावर खेळ खेळणं इतपतच राहतो. तो वन वे ट्रॅफिक होतो. निशिगंधा पळशीकरनं नेमकं  हेच हेरलं आणि मुलांच्या या ऊर्जेला तिनं अगदी पद्धतशीर मार्ग दिला तो ‘प्रोग्रामित्र’तर्फे. तिच्या या उपक्रमात मुलांना प्रशिक्षण देऊन त्यांना संगणकप्रणाली कशी निर्माण करावी यांचं प्रशिक्षण दिलं जातं. एमआयटीच्या अशा SCRATCH, GOGOLE Blocky  अशा प्रोग्राम आणि प्रणालीतून निशिगंधानं आपला प्रशिक्षण कार्यक्रम बेतलाय, ज्यात मुलं स्वत: संगणकाचे खेळ तयार करतात, अ‍ॅप्स डिझाइन करतात, रोबोला मॅनेज करतात. म्हणजेच स्वत: प्रणाली निर्माण करतात. त्याच्या बालसुलभ ऊर्जेला आणि क्षमतेला निशिगंधा ‘प्रोग्रामित्र’मधून योग्य चालना देते. असंख्य मुलं नवी जाणीव घेऊन यामधून बाहेर पडलीत. हे फक्त संगणक प्रशिक्षण नाही, तर स्वत: संगणकाला कसं प्रशिक्षित करायचं हे इथे शिकवलं जातं. मुलांना इथे कोडिंग शिकवतात. त्यात Compushak  नावाचा यंत्रमानव आहे ज्याला मुलं प्रशिक्षित करतात. संगणक आणि त्याचा वापर या इथे अधिक सजगपणे आणि जबाबदारीने होतो. फक्त खेळ खेळणं यासाठी संगणकाचा वापर न करता मुलांच्या बुद्धीला चालना मिळते. या प्रशिक्षणाचा एक आणखी भाग असा की, मुलांच्या पालकांनाही यात सहभागी केलं जातं. निशिगंधा स्वत: संगणक अभियंता आहे; पण नोकरीच्या ठरावीक चौकटीत न अडकता तिनं मुलांमध्ये हे प्रशिक्षण रुजवण्याचा स्तुत्य उपक्रम योजला आहे. दरवर्षी ज्यातून अनेक भावी शास्त्रज्ञ आपल्याला मिळू शकतील.

संगणकाच्या या युगामध्ये आजीच्या मांडीवर झोपून गोष्टी ऐकण्याची गंमत फार कमी जणांना मिळते. गोष्टी सांगणं हा आपला उद्योग होऊ शकतो का? अत्यंत विनोदी वाटणारा हा प्रश्न आहे. वैशाली कुलकर्णी २००६ पासून मुलांना फक्त गोष्टी सांगते. सुरुवातीला सतरंजीवर बसून गोष्टी सांगणाऱ्या वैशालीनं फक्त गोष्टी सांगायला एक स्वत:चं सेंटर उघडलेलं आहे. पेशाने ती चक्क फार्मासिस्ट पण रसायनांच्या बुडबुडय़ात न अडकता गोष्टींच्या जादूभऱ्या दुनियात ती रमली. घरी आई-वडील, आजी सगळेच दांडगे वाचक त्यामुळे तिला वाचनाची गोडी सुरुवातीपासूनच होती. मुलं वाचत नाहीत, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांना चांगलं काय द्यावं हे पालकांना समजत नाही. अनेक छान, सोपी अशी पुस्तकं असतात जी मुलांपर्यंत पोहचत नाहीत आणि मग त्याच त्या कार्टून आणि कॉमिक्समध्ये मुलं अडकतात. वैशालीला उत्तमोत्तम पुस्तकं वाचायला मिळाली आणि आपण गोष्टी छान रंगवून सांगू शकतो, हे तिला उमजलं. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये तिने आपल्या गोष्टी सांगायच्या उपक्रमाची सुरुवात केली आणि बघता बघता अनेक मुलांची साथ तिला मिळाली.

मुलं वाचत नाहीत, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यांना चांगलं काय द्यावं हे पालकांना समजत नाही. अनेक छान, सोपी अशी पुस्तकं असतात जी मुलांपर्यंत पोहचत नाहीत आणि मग त्याच त्या कार्टून आणि कॉमिक्समध्ये मुलं अडकतात. – वैशाली कुलकर्णी

वैशाली अस्खलितपणे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तमिळ या भाषांमध्ये वय वर्ष २ ते १५ या वयोगटासाठी अनेक गोष्टी सांगते. इसापच्या कथा, हितोपदेश किंवा पंचतंत्र इथपासून ते अगदी कराडी टेलस् पर्यंत सगळ्या कथा ती सांगते. नुसती गोष्ट सांगणं अभिप्रेत नाहीये इथे तर त्या गोष्टीतला उपदेश किंवा मर्म मुलांपर्यंत जाणं गरजेचं असतं आणि पुन्हा ते रटाळ, कंटाळवाणं होऊ नये तेही पाहावं लागतं. त्याच अनुषंगानं वैशाली गोष्टीची एक साखळी करते आणि एकामागून एक अशी एक जादूई दुनिया मुलांसमोर उलगडत जाते. वैशालीकडून गोष्टी ऐकून गेलेली अनेक मुलं आता स्वत: उत्तम वाचक बनली आहेत आणि गोष्टी सांगणारीसुद्धा. २०१५ मध्ये वैशालीनं स्वत:ची जागा घेऊन आपलं केंद्र सुरू केलं आहे, ‘दि स्टोरी स्टेशन.’ शाळांशाळांमधून ठिकठिकाणी जाऊन गोष्टी सांगणारी वैशाली आता एक गमतीशीर उपक्रम आयोजित करत आहे तो म्हणजे मुलं चक्क नाइट ड्रेसमध्ये संध्याकाळी केंद्रावर येतात आणि गरमागरम कोको घेत गोष्टी ऐकतात. सध्याच्या धावपळीच्या जगात मुलांनी नातेवाईकांकडे जाणे बंदच पडत आहे आणि त्यामुळे भावंडांनी एकत्र झोपून गप्पा मारणं किंवा गोष्टी ऐकणं हे तर आता आपण विसरूनच गेलो आहोत आणि वैशालीने नेमकं हेच हेरून हे सत्र सुरू केलं आहे. ७ वाजता सुरू झालेला हा गोष्टींचा कार्यक्रम साधारणपणे रात्री ९ ते ९.३० पर्यंत संपतो आणि मुलं एकदम खूश होऊन घरी जातात. बालसाहित्याचा मेळावाच वैशाली आयोजित करते. पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीतीपासून ते अगदी ग्रीम्स आणि हॅन्स अँडरसनच्या परीकथा वैशालीला काहीही वज्र्य नाही. अनेक स्वंयसेवी संस्था असंख्य प्रकारचे बालसाहित्य प्रकाशित करत असतात, जे फार कमी पालकांना माहीत असतं. नेहमीच्या ठरावीक चाकोरीतल्या बालसाहित्यापेक्षा अगदी वेगळं अशा प्रकारचं हे साहित्य वैशालीच्या ‘दि स्टोरी स्टेशन’मुळे अनेक मुलांना उपलब्ध झालेलं आहे. मुलांना गोष्टी सांगायच्या म्हणजे नुसता उपदेश करायचा नसतो. हे सूत्र येथे विसरलं जात नाही. पारंपरिक आणि नवे दोन्ही प्रकार वैशाली कुलकर्णी आवर्जून वापरते. तिच्याकडून गोष्टी ऐकून गेलेली मुलं अनेकदा स्वत: छोटय़ा मुलांना गोष्टी सांगायला येतात. कधी कधी मुलांबरोबर त्यांचे आई-वडीलही असतात. बघायला गेलं तर अगदी सामान्य वाटणाऱ्या या उपक्रमाने मुलांना आणि पालकांना संवादाचा एक वेगळा मार्ग उपलब्ध करून दिलेला आहे. गोष्टी ऐकून गेलेली मुलं सहजपणे वाचायला लागतात. हा वैशालीचा अनुभव आहे.

असं आपलं वेगळं काम आपल्याला छान मांडायचं असेल.. आपला अनुभव सांगून पुढे काही करायचं असेल तर? प्रत्येकालाच शब्दात मांडणं जमतं असं नाही. बायोडेटा, सीव्ही आणि रेझ्युमे हे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते तसेच लिहिले पाहिजेत; पण लिहिणार कोण? सुप्रिया आरोंदेकरने अशा अनेकांना मदत केलीय. आपले कौशल्य, क्षमता, योग्य शब्दांत मांडून त्याला एक ब्रॅण्ड बनवायचं काम सुप्रिया करते. तिची चाकोरीतली नोकरी होती. अनेक नोकऱ्या झाल्या, पण तिला काही तरी वेगळं करायचं होतं. त्याच ऊर्मीतून तिनं हे काम सुरू केलं. तुमचा सी.व्ही./रेझ्युमे ही तुमची जाहिरात आहे. त्यामुळे तो नेटक्या शब्दांतच हवा. सुप्रियाने असंख्य जणांना असं रेझ्युमे तयार करून देऊन नोकरी-व्यवसायात संधी उपलब्ध करून दिल्यात. तुमची कौशल्यं, क्षमता नेटक्या शब्दांत ती मांडते. भारताबरोबरच सिंगापूर आणि अमेरिकेत तिनं याचं अधिक प्रशिक्षण घेतलं. अगदी आगळावेगळा हा व्यवसाय सुप्रियाला खूप समाधान मिळवून देतो आणि तिच्या ग्राहकांनाही. साहजिकच त्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे.

एक आयटीमधली तरुणी लठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेती करायला लागली आहे आणि तीसुद्धा सेंद्रिय. the lady bug मध्ये तिला सामील केलं गेलं आणि आता तिचा स्वत:चा किचन स्टुडिओ आहे.
 – सायली गुप्ते      
– मेघना खामकर

याचसारखी आणखी एक उद्योगिनी म्हणजे ‘जॉमबॉय’ची सुरुची वाघ. २०१४ मध्ये एका प्रमुख इंग्रजी वृत्तपत्राने त्या वर्षीच्या प्रथम पाच महिला उद्योजकांमध्ये जिचा समावेश केला अशी उद्योजिका. मनुष्यबळ/एचआर क्षेत्रात सुरुचीचे काम आहे. लोकांना त्यांच्या कौशल्यामुळे नोकरी मिळते खरी, मात्र सुटते ती त्यांच्याच स्वभावामुळे. हा अनुभव सगळीकडेच येतो. उत्तम माणसं नेमून त्यांच्याकडून उत्तम काम करून घेणं हे आव्हानाचं काम. खास करून जेव्हा एखादा नवा व्यवसाय (स्टार्टअप) उभारला जात असतो, तेव्हा तर योग्य मनुष्यबळ अत्यंत कळीचं ठरतं. सुरुचीच्या ‘जॉमबॉय’मधून असं मनुष्यबळ शोधलं जातं. मालक आणि कर्मचारी या दोघांनाही अत्यंत फायदेशीर अशी आखणी सुरुची करते. फक्त शैक्षणिक प्रगल्भता नव्हे तर उमेदवाराची मानसिकता, संवेदनक्षमता इथे जोखली जाते. मूळची औरंगाबादकर असलेल्या सुरुचीनं अमेरिकेत शिक्षण आणि नोकरी करून नंतर ही झेप घेतली. अनेक कंपन्यांचं योग्य मनुष्यबळ शोधण्याचं आणि प्रशिक्षणाचं हे काम सुरुचीनं  हलकं केलंय. प्रवास सोपा नव्हता, पण आता असंख्य क्षेत्रांतील फॉरच्युन ५०० उद्योग सुरुचीचे क्लायंट आहेत ज्यांची संख्या उत्तरोत्तर वाढतच आहे.

लोकांना त्यांच्या कौशल्यामुळे नोकरी मिळते खरी, मात्र सुटते ती त्यांच्याच स्वभावामुळे. हा अनुभव सगळीकडेच येतो. उत्तम माणसं नेमून त्यांच्याकडून उत्तम काम करून घेणं हे आव्हानाचं काम. खास करून जेव्हा एखादा नवा व्यवसाय उभारला जात असतो, तेव्हा तर योग्य मनुष्यबळ अत्यंत कळीचं ठरतं.   – सुरुची वाघ

या अशा अनेक क्षेत्रांतील उद्योजिकांना एकत्र आणून त्यांच्यासाठी एक समान व्यासपीठ निर्माण करण्याचे मोठे काम करत आहेत, ‘द लेडी बग’च्या सायली गुप्ते आणि मेघना खामकर. दोघी उच्चविद्याविभूषित. काही काळ नोकरीही केली दोघींनी. मुलं-संसार यासाठी ब्रेक घेतला आणि नंतर ‘द लेडी बग’ सुरू केलं. काही तरी वेगळं करणाऱ्या आणि करू इच्छिणाऱ्या स्त्री उद्योजिकासाठी हे व्यासपीठ.. कम्युनिटी. तुमची कौशल्यं, वेगळेपणा आणि काम या सर्वाना मेघना आणि सायली नेमक्या शब्दांत मांडतात आणि जगासमोर आणतात. फक्त एवढंच नाही तर तुम्हाला काही मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण हवं असेल तर येथे मेंटॉर किंवा गुरू आहेत ज्यांच्यातर्फे मार्गदर्शन, सल्ला दिला जातो. हा एक परस्परावलंबी उपक्रम आहे. चाकोरीबाहेरच्या उद्योजिकांना प्रकाशात आणून त्यांना प्रसिद्ध करणं ही फक्त पी.आर. अ‍ॅक्टिव्हिटी नाही, तर त्यापलीकडचे अधिक काही यातून साधलं जातं. ‘द लेडी बग’मध्ये अनेक उद्योजिका आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या अगदी आगळंवेगळं काम करणाऱ्या आणि त्यात भर पडतेच आहे.

सायलीनं सांगितलं, एक आयटीमधली तरुणी लठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेती करायला लागली आहे आणि ती सुद्धा सेंद्रिय. ३ँी ’ं८ि ु४ॠ मध्ये तिला सामील केलं गेलं आणि आता तिचा स्वत:चा किचन स्टुडिओ आहे. असंख्य प्रकारच्या वेगळं करणाऱ्या अनेक जणींना सायली आणि मेघना हुडकतात आणि त्यांना प्रसिद्धी देतात.

परंपरागत वाटा नाकारून अगदी वेगळं करू पाहणाऱ्या आणि त्यात यश मिळवणाऱ्या या सगळ्या जणी.  सुरुवातीला धडपडल्या, ठेचकाळल्या.. संशयाला, विरोधाला सामोऱ्या गेल्या, पण नंतर त्यांना फक्त निखळ यशच मिळालं. अवघड वाटा निवडणं सोपं असतं, पण चालणं कठीण.. आणि यश मिळवणं तर त्याहून अप्राप्य, जे या सर्व जणींनी खरं करून दाखवलंय आणि भविष्यातही करणार आहेत. ‘चतुरंग’तर्फे त्यांना अनेक शुभेच्छा.

शुभा प्रभू-साटम – shubhaprabhusatam@gmail.com