अमेरिकेत मराठी आणि तेही मालवणी पदार्थ रुजवायचे म्हणजे अग्निदिव्यच होतं. मात्र अनुसया माणगावकर यांच्या ‘न्यू इंडिया’ रेस्टॉरंटने त्यातून लखलखीतपणे बाहेर पडत भारतीयच नव्हे, तर अमेरिकी लोकांनाही मालवणी पदार्थाची चटक लावली आहे. कारण त्यांच्याकडे येणारे ९० टक्के खवय्ये हे अमेरिकी आहेत. या यशामुळे त्यांनी पुढचं पाऊल टाकत मालवणी पदार्थच देणारं ‘नशा इंडिया’ हे रेस्टॉरंटही उघडलं आहे. त्यामुळे आता अमेरिकेतही रुजलाय अस्सल मालवणी पदार्थाचा ठसका.

अमेरिकेत राहणारी गार्गी रोजच्या रोज स्वत:च स्वयंपाक करून कंटाळली होती. ती राहात असलेल्या डलास शहरात अनेक भारतीय रेस्टॉरंटस् होती, पण तिला अस्सल मराठमोळ्या पद्धतीचं जेवण जेवायचं होतं. तिला तिच्या मित्रानं मराठमोळं जेवण ऑस्टिनला मिळेल असं सांगितलं. ती त्याने दिलेला पत्ता शोधत तिथवर गेली आणि चकित झाली. कारण तिला केवळ मराठमोळं, महाराष्ट्रीय जेवण नव्हे तर चक्क अस्सल मालवणी जेवण मिळालं. तिची जिव्हा तर तृप्त झालीच, पण परदेशात घरगुती चवीच्या जेवणाचा आनंद काय असू शकतो हेही तिनं अनुभवलं. हा चवीचा अनुभव अनुसया माणगावकर यांच्या ‘न्यू इंडिया’ रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर मिळतो, तो केवळ भारतीयांनाच नव्हे तर अमेरिकी नागरिकांनाही. विशेष कौतुकाची बाब म्हणजे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवणारे ९० टक्क्यांहून अधिक लोक अमेरिकी आहेत.

ऑस्टिन शहरात गेली सहा वर्षे त्यांचं हे रेस्टॉरंट सुरू आहे. अस्सल मालवणी आणि महाराष्ट्रीय जेवण ही त्यांची खासियत. इथलं जेवण भारतीयांप्रमाणे अमेरिकी किंवा इथे येणाऱ्या जगभरातील कुणाही ग्राहकाला रुचेल, पटेल आणि पचेल अशाच पद्धतीने बनवलं जातं. त्यामुळे अगदी गर्दीच्या वेळी आणि सुटीच्या दिवशी दीडशे ते दोनशे लोक त्यांच्या रेस्टॉरंटला भेट देतात. अमेरिकी लोक व्हिगेन आणि ग्लुटन फ्री जेवणाला जास्त पसंती देतात. तसं जेवण बनवायचं तर मग मैद्याला फाटा देणं आलंच. अनुसया सांगतात, ‘‘अमेरिकी लोकच नव्हे तर एकंदर सर्वासाठी ‘हेल्दी’ जेवण म्हणजे आपल्याकडील सर्व धान्यांपासून बनवण्यात येणाऱ्या भाकऱ्या. येथील ग्राहक आरोग्याबाबत जागरूक असल्याने मग मी त्यांच्यासाठी पंचधान्याची भाकरी बनवते. त्यात खास अळशी वाटून टाकते. त्यामुळे ती अधिक पौष्टिक होते. त्याबरोबरच अस्सल मालवणी मसाल्यात बनलेले माशांचे सर्व प्रकार, चिकन, मटण, सोलकढी, साधा भात आणि भाताचे इतर प्रकार ही इथली खासियत आहे.’’ त्यांच्याकडे बनवलेले सर्व पदार्थ खास कणकवलीतून मागवलेल्या मसाल्यांतच बनतात. अर्थात सोलकढी आणि मालवणी जेवण असल्याने त्यासाठी लागणारे ताजे नारळ फोडणे, तो खवणे, इतर मसाले भाजणे अशा गोष्टी मात्र इथल्या किचनमध्येच केल्या जातात.

अनुसया सांगतात, ‘‘मी मुंबईकर. लहानपण वरळीतील बीडीडी चाळीत गेलेलं. माझी आई रेडीची तर वडील सावंतवाडीचे. मात्र बालपण, शिक्षण सगळं मुंबईतच झालं. आमच्या शेजारी बहुतांशजण मुस्लीम होते. माझी शाळा होली क्रॉस, त्यामुळे घरी हिंदी आणि बाहेर इंग्रजीतूनच संभाषण होई. आई सुगरण होती. मालवणी जेवण ही तिची हातोटी. त्यामुळे मालवणी जेवणाची चव लहानपणापासूनच चाखलेली, परिचयाची. त्याचप्रमाणे चाळीतल्या वातावरणामुळे तिथल्या मुस्लीम घरांमध्ये होणारे पदार्थही आवर्जून घरी पाठवले जायचे. त्यामुळे विविध चवींची, पाककृतींची, त्यातल्या मसाल्यांची माहिती मिळत होती. मात्र मला जेवण बनवण्याची विशेष आवड त्या वेळी तरी नव्हती.’’

‘‘मी खालसा महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयातून बीएसस्सी केलं. त्यानंतर मॅक लॅब्रॉटरीमध्ये काही दिवस नोकरी केली. त्यानंतर

११ वर्षे पंजाब सिंध बँकेत नोकरी केली. या दरम्यान माझी महेश शिंदे यांच्याशी ओळख झाली आणि आम्ही विवाहबद्ध झालो. महेश यांना प्रथमपासूनच परदेशात जाऊन व्यवसाय करण्याची इच्छा होती. त्यामुळे आम्ही २००० मध्ये अमेरिकेला आलो. व्यवसायाच्या दृष्टीने महेश यांनी सर्वेक्षणच केलं. त्यात त्यांच्या लक्षात आलं की इथे भारतीय जेवणाचा अभाव अनेकांना जाणवतो. मग त्यातच व्यवसाय करायचं ठरलं. अर्थात परदेशातले नियम, कायदेकानू इथल्यापेक्षा वेगळे आणि अतिशय कडक. त्यामुळे प्रथम लहान प्रमाणात व्यवसाय सुरू केला. प्रथम सँडविच शॉप मग इंडियन चायनीज रेस्टॉरंट अशी. डलास, कोलंबस (ओहयो), कॅलिफोर्निया, ऑस्टिन आदी ठिकाणी व्यवसाय करायला सुरुवात केली. इथे व्यवसाय करताना आम्ही अनुभवच गाठीशी बांधत होतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्रत्येक ठिकाणी नियम, लोकांच्या आवडीनिवडी, व्यवसायाची जागा, ग्राहक, पदार्थाची निवड याविषयी शिकत होतो. अनेकदा जागा मोक्याच्या ठिकाणी नसल्याने बराच तोटा झाला. अशा वेळी ते रेस्टॉरंट बंद करणे हिताचे ठरले. कित्येकदा प्रथम फायदा झाला, मात्र स्पर्धक वाढल्यानेही व्यवसायावर परिणाम झालेला सहन करावा लागला. यातूनच मग वेगळं, वैशिष्टय़पूर्ण असं काही तरी करायचं असा ध्यास निर्माण झाला आणि अनेक शहरांतील अनुभवानंतर आम्ही ऑस्टिनला स्थिरावलो.’’ त्या सांगत होत्या.

वेगळं काही करताना महाराष्ट्रीय जेवण आणि त्यातही मालवणी जेवण का निवडावंसं वाटलं याविषयी त्या म्हणाल्या, ‘‘भारतीय जेवण म्हटलं की रोटी, पनीर, टिक्का मसाला असेच पदार्थ मुख्य जेवण म्हणून तर इडली, डोसासारखे पदार्थ मधल्या वेळचं खाणं म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत, म्हणजे विशेषत: पंजाबी आणि दाक्षिणात्य पदार्थ. पण खरंच असं आहे का? तर नक्कीच नाही, त्यापेक्षाही खूप वेगळे पदार्थ भारतीय जेवणात असतात. त्याची ओळख व्हावी, तेही प्रसिद्ध व्हावेत यासाठी मालवणी, महाराष्ट्रीय जेवण देणारं रेस्टॉरंट आपण सुरू करायचं हे पक्कं केलं. त्यानुसार ‘न्यू इंडिया’ची सुरुवात झाली.’’

‘‘प्रत्येक टेबलवर इथला मेन्यू हा मराठीत ज्या नावाने ओळखला जातो त्या नावानेच लिहिलेला असतो; म्हणजे सोलकढी, कोबीची भाजी, भाजकं, भरलेले वांगं किंवा माशांचे जे प्रकार कोकणात प्रसिद्ध आहेत तेच नाव इथेही वापरलेले आहे. हेतू केवळ हाच की आपल्याकडील पदार्थ त्यांच्या मूळ नावानेच प्रसिद्धी व्हावेत. अर्थात त्याचे इंग्रजी विश्लेषण बरोबर दिलेले असतेच. अमेरिकी लोकांच्या तोंडून आपल्या मराठी पदार्थाची ऑर्डर ऐकायला खूप छान वाटतं.’’ अनुसया यांच्या शब्दांत भारतीय, महाराष्ट्रीय जेवणाचा अभिमान जाणवत होता. त्यांचा आणखी अभिमानाचा विषय म्हणजे शिवाजी महाराज. त्यांनी सुरू केलेल्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये शिवाजी महाराजांचा फोटो हा असणार म्हणजे असणारच.

खासकरून मालवणी जेवण बनवण्यासाठी त्यांनी काही खास प्रशिक्षण घेतलं नाही. अनुसया सांगतात, ‘‘प्रेमाने खाऊ घालणं किंवा स्वयंपाक करणं हे भारतीय स्त्रीच्या स्वभावाचाच एक भाग आहे असं मला वाटतं. माझ्या आईने मला जे मालवणी खाऊ घातलं ते मला करता येण्यासाठी विशेष परिश्रम घेण्याची गरज नव्हती. कारण ती चव कधीच विसरता न येणारी अशीच आहे. त्यात मी ते पदार्थ माझ्या लहानपणापासून खात होते. त्यामुळे मालवणी पदार्थ मीच बनवणे सुरू केले. बिर्याणी वगैरे प्रकार मला आमच्या बीडीडी चाळीतील मुस्लीम शेजाऱ्यांमुळे येत होते.’’

‘‘अर्थात सगळ्या गोष्टी मोठय़ा प्रमाणात करायच्या तर मी एकटी त्यासाठी पुरी पडणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मी अमेरिकेतील लोकांनाच हे पदार्थ बनवण्याचं प्राथमिक प्रशिक्षण दिलं आणि त्यांच्याकडूनच मदत घेतली. सध्या आमच्याकडे ४० जणांचा कर्मचारी वर्ग आहे. आम्ही दोघं म्हणजे मी आणि महेश सोडले तर कुणीच भारतीय नाही. अर्थात इथले कामगारांच्या बाबतीतील कायदे अतिशय कडक असल्याने तसेच इथे भारतीय लोक या व्यवसायात काम करण्यासाठी मिळाले नसल्याने स्थानिकांचीच मदत घ्यावी लागली. परंतु अगदी नारळ खवण्यापासून ते मसाले भाजण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्याच निगुतीने केल्या जातात. म्हणूनच असेल इथल्या लोकांना कोबीच्या भाजीपासून, मासे, मटण सगळे पदार्थ आवडतात.’’

‘‘डेझर्ट किंवा भारतीय गोड पदार्थाची यादी तशी खूप मोठी आहे. त्यात गुलाबजाम, रसमलाई असे पदार्थ इथे आवडीने खाल्ले जातात हे अनुभवाने माहीत होते. म्हणून त्यांच्या जोडीला आपला शिरा आणि तांदळाची खीर देण्याचा प्रयोग मी करून पाहिला आणि तोही तितकाच पसंतीस उतलाय हे त्याच्या मागणीवरून समजते. इथल्या लग्नांच्या अमेरिकी, भारतीय आणि अन्यही, बिझिनेस लंच किंवा विशेष समारंभांसाठी आम्ही ऑर्डर घेतो. विशेष म्हणजे अमेरिकी लग्नांमध्येही भारतीय जेवणाचा शिरकाव आता होतोय.’’ अनुसया कौतुकाने सांगत होत्या. त्यांच्या रेस्टॉरंटची ख्याती आता चांगलीच पसरली आहे. गोवा, कोकण परिसरातून अमेरिकेत येणारे लोक आवर्जून आपल्या नातेवाइकांना मालवणी खिलवण्यासाठी इथे घेऊन येत असतात. त्यांनी दिलेली दाद आपल्यासाठी उत्साह देऊन जाते, असे त्या सांगतात.

त्यांच्या पतीने आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी पतीच्या बरोबरीने मेहनत घेतली आणि त्याचे फळ आता त्यांना मिळाले आहे. त्यामुळे साऊथ काँग्रेस इथेही त्यांनी मालवणी पदार्थ देणारेच ‘नशा इंडिया’ नावाचे रेस्टॉरंट सुरू केले असून तेही चांगले चालले आहे. मालवणी जेवणाचा ठसका अर्थातच कुणालाही हवाहवासा असाच आहे हे कोकणात आणि ‘न्यू इंडिया’ आणि ‘नशा इंडिया’ला भेट दिलेले कोणीही मान्य करेल.

प्रज्ञा तळेगावकर pradnya.talegaonakr@expressindia.com