कामाच्या रेटय़ात विश्रांती म्हणून थोडे मोकळे दिवस मिळतात, ते दर वर्षी माहेरी जाऊन कशाला घालवायचे? आईला दगदग, भावजय, भावाला तोशिस कशाला? वेळ कुणाला आहे? त्यांचंही वेळापत्रक कोलमडतच अशानं. भेटावंसं तर वाटतंय, मग सगळ्यांनी मिळून कुठे गेलं तर? अगदी दोन-चार दिवसांच्या, दोन पिढय़ांच्या वा बहिणी-भावंडांना एकत्रित झेपतील अशा सहली हा आता सर्वानाच आवडेल असा पर्याय होतोय. कुटुंबाच्या बदलत्या नातेसंबंधात असंही घडू लागलं आहे..

‘‘आई-बाबांच्या लग्नाला पन्नास र्वष पुरी झाली म्हणून आम्ही पानशेतला रिसॉर्ट बुक केलं आणि दोन दिवस खूप मजा केली.’’
‘‘दिवाळीला आम्ही सगळे बहिणी-भाऊ मिळून मडिकेरीला गेलो, मस्त वाटलं.’’
‘‘यंदाच्या इंडिया ट्रिपला मी घरी पुण्याला जाणारच नाहीये. दिल्लीचं तिकीट काढलंय, घरच्या सगळ्यांना तिथेच बोलावलंय. मग उत्तरांचलला जातोय आम्ही.’’
ही आणि अशी वाक्यं आता वरचेवर कानी पडू लागली आहेत. याला नेमकं काय म्हणायचं? स्त्रिया माहेरी जाऊन तळ ठोकण्यापेक्षा भटकायला जाणं पसंत करताहेत? माहेराची जागा पर्यटनानं घेतलीय का?
‘माहेरपण’- बायकांची हक्काची रजा, ‘प्रिव्हिलेज्ड लीव्ह’. परंपरेनं आलेला हा जिव्हाळ्याचा विषय. पूर्वी ‘सासुरवास’ या शब्दाला एक विशेष अर्थ होता, माहेरचं बोलवणं कधी येतंय याची बायका आतुरतेने वाट पाहात राहात. बदलत्या समाजव्यवस्थेत आता निदान शिकलेल्या आणि कमावत्या शहरी स्त्रियांच्या बाबतीत तशी स्थिती उरलेली नाही हे खरं, पण म्हणून काय झालं? सासरी एकत्र कुटुंबात असो की स्वतंत्र असो, नवरा-मुलांबरोबर राहणं म्हणजे आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी बाजूला ठेवून घर चालवणं हे आलंच. महिनोन्महिने असे गेले की स्त्रीला ओढ लागते ती माहेराची.
काय काय अंतर्भूत आहे यात? लेक माहेरी आलीय म्हणून आई-बाबांच्या तोंडावर फुललेलं हसू, भाऊ -वहिनीने केलेलं स्वागत, भाचरांनी भोवती घोटाळणं, खास आपल्या आवडीचे चार पदार्थ आवर्जून केलं जाणं, सिनेमा-नाटकाचे कार्यक्रम, भावाकडून आपल्या पसंतीच्या साडी/ड्रेसची हक्काची वसुली आणि मुख्य म्हणजे सांसारिक विवंचना डोक्यात न आणता दिवसरात्र टाइमपास करणं. मग त्यात आईशी हितगुज आलं, बहीण किंवा वहिनीबरोबर कुठे तरी जाणं आलं, अंगणात-गच्चीवर निवांत बसून बाबांशी गप्पाटप्पा आल्या. जुन्या मैत्रिणी, जुनी फिरण्याची ठिकाणं, पूर्वी नेहमी जायचो तो भेळ-पाणीपुरीवाला, थोडक्यात काय, माहेर म्हणजे पुन्हा एकदा लहानपणाला, लग्नाआधीच्या अर्निबध आयुष्याला कडकडून भेटणं, जुन्या आठवणी ताज्या करून ती शिदोरी बांधून घेऊन पुन्हा सासरची वाट धरणं.  पण थांबा, हे चित्र असंख्य मराठी भावगीतांप्रमाणे गोड गोड असलं, तरी त्यात बारीकसारीक खुसपटं निघतात बरं का! काही आता काळ बदलला तसं प्राधान्यक्रमही बदलले. वेळ ही महत्त्वाची गोष्ट ठरली त्यामुळे वेळेचं नियोजन हीसुद्धा. त्यामुळे आपला माहेरला जाण्याचा प्लॅन माहेरच्या मंडळींना अडचणीचा नाही ना हे बघावं लागतं. आपल्या शाळकरी मुलांच्या परीक्षा झाल्यात, पण तिकडे सी.ई.टी., बारावी असं वातावरण असू शकतं. आईच्या महिला मंडळाचं वासंतिक संमेलन नेमकं तेव्हाच येतं किंवा वहिनीच्या भिशी ग्रुपला त्या दरम्यान कुठे तरी जायचं असतं. तसं पाहिलं तर आपणही आपल्या कामात गुंतलेले असतो. दोन-चार दिवस ठीक आहे, पण त्यात सगळ्यांना चालेल अशा तारखा काढणं अवघड. कारण नाही म्हटलं तरी या माहेरपणात खर्चाचा प्रश्न आहेच. मोठय़ा ताईचे जे लाड झाले, ते मला मिळालं नाही म्हणून रुसणारी धाकटी बहीणसुद्धा आहे. निवृत्त झाल्यानं मोजक्या पैशात आपलं सांभाळून राहणारे वडील आहेत आणि वयपरत्वे सुनेच्या हाती सगळी सूत्रं दिलेली आईसुद्धा आहे. ही माहेरपणाची संकल्पना बदलायची वेळ आलीय का? कालबाह्य़ झालीय का? जरा आजूबाजूला पाहाल तर हे लक्षात येईल.
मग आता यात बदललं काय? एक तर संपर्क साधनं वाढल्यामुळे दिवसातून अगदी चारदाही आईशी बोलता येतं. गावातच असेल तर घाईघाईत का असेना चक्कर मारता येते, स्काइप-हँग आऊटसारख्या सुविधांमुळे थेट बघताही येतं. कामाच्या रेटय़ामुळे जे काही थोडे दिवस मोकळे मिळतात, ते माहेरी जाऊन घालवायचे कशाला? आईला दगदग, भावजयीला त्रास, भावाला तोशिस कशाला? वेळ कुणाला आहे? भेटावंसं तर वाटतंय, मग सगळ्यांनी मिळून कुठे गेलं तर? अगदी दोन-चार दिवसांच्या, तीन पिढय़ांना झेपतील अशा सहली हा आता सर्वानाच आवडेल असा पर्याय होतोय. तिथे कोणी कुणाचा पाहुणचार करायचा नाही. सर्वानी मिळून खर्च करायचा. पॅकेजप्रमाणे प्रत्येक कुटुंबाने आपापले पैसे भरायचे की सगळे पर्यटक म्हणून मजेत. फार तर छोटय़ा मुलांची किंवा थकलेल्या वृद्धांची थोडी काळजी घेतली म्हणजे झालं. वेळ आणि पैशाच्या उपलब्धतेनुसार जवळ किंवा लांबच्या सहलींना जाणं आता पुष्कळ कुटुंबांना आवडू लागलंय. अगदी देवस्थानांच्या सहलींपासून परदेशांतल्या अनेक प्रेक्षणीय स्थळांपर्यंत. त्यासाठी वर्षभर पैशांचं नीट नियोजन करणं अनेकांना जमू लागलं आहे.
हे झालं कौटुंबिक सहलींबद्दल. पण आताच्या शहरी स्त्रियांना आपल्या समानशील सख्यांबरोबर भटकंती करणं खूप आवडायला लागलंय. पुरुषी संरक्षणाशिवाय ‘बायका-बायकांनीच’ प्रवास करणं याची पूर्वी कल्पनाही करता येत नव्हती. पण आता चांगल्या नावाजलेल्या पर्यटन संस्था खास स्त्रियांसाठी देश-परदेशच्या सहली आयोजित करायला लागल्या आहेत. चार-सहा जणींच्या ग्रुपने अशा सहलीत सामील होणं ही अगदी सर्वसामान्य गोष्ट झालीय.
साहसी फिटनेस फ्रिक तरुण-तरुणींचे गट मग त्यात बहिण-भाऊही असतात. एकदम ‘हटके’ ठिकाणं निवडताना दिसतात. कुठेही दुर्गम प्रदेशात, वाळवंटात, समुद्रात, डोंगर-दऱ्यांमधे जाताना दिसतात. स्कूबा डायव्हिंग, राफ्टिंग, मोटारबायकिंग असल्या रोमांचकारी गोष्टी करणाऱ्या तरुण मुलींची संख्या वाढते आहे.
काय मिळतं स्त्रीवर्गाला सहलींना जाऊन? बघा ना, सहलीला निघण्यापूर्वीच तो मूड येतो. त्या कल्पनेनं उत्तेजित वाटतं. उत्साह येतो. त्या भरात नव्या कपडय़ांची, इतर वस्तूंची खरेदी होते. बरोबर खाऊ काय घ्यायचा, पॅकिंग या गडबडीत दिवस पळतात. समवयस्क, समान आवडीच्या लोकांबरोबर नवे अनुभव, हास्य-विनोद, रोजच्या चाकोरीतून मुक्तता, नेहमीचा संकोच बाजूला ठेवून काही नवीन गोष्टी, वेगळ्या स्टाइलचे कपडे वापरून पाहिले जातात. फोटोग्राफी करताना आपलेही खूप फोटो काढून घेऊन स्वत:वर प्रेम केलं जातं (ते करायला तरी एरवी कुठे वेळ असतो?). त्या क्षणी आकर्षक वाटलेल्या बिनगरजेच्या वस्तूंची खरेदी होते. एरवी टाळले जाणारे पिझ्झा, आईस्क्रीमसारखे पदार्थ मोहात पाडतात. फारसं अपराधी न वाटता खाल्लेही जातात. कारण नसताना खूप हसणं, संधी मिळेल तेव्हा बॉलीवूड गाणी गाऊन घसा बसवणं यात वेगळीच गंमत असते. आजूबाजूला अनोळखी माणसं असतात. त्यामुळे नावं कोण ठेवणार? कानात वारं भरलेल्या वासरांसारखं हुंदडता येतं.
विचार करा, पूर्वीचं पारंपरिक माहेरपण आता इतिहासात जमा झालंय. परिस्थितीच अशी आहे की पोरा-बाळांसह महिना महिना माहेरी मुक्काम टाकणं आता शक्य नाही. मात्र माहेरची ती मोकळीक, ते लाड करून घेणं, त्या सांसारिक विवंचनांना काही दिवसांपुरतं विसरून जाणं आणि तोच मधुर आठवणींचा मेवा गोळा करणं हे सगळं आता स्त्रिया मिळवताहेत भटकंतीतून. त्यांच्यासाठी ठरतं आहे पर्यटन एक संजीवनी!
drlilyjoshi@gmail.com

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता