16 January 2019

News Flash

श्लील-अश्लीलतेच्या पलीकडचे ‘न्यूड’

आसपासचा समाज नग्न अंगावर कपडे गुंडाळूनही नंगाच दिसतो, एवढा तो वासनेने विचलित झालेला आहे.

अस्मिता धुळे यांचे तैलरंगातील चित्र. 

संजय सावंत

आज २१ व्या शतकात, डिजिटल जगातही समाजाचा न्यूडचित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बुरसटलेलाच आहे. समाज हा सार्वजनिक जगात वेगळा वागतो आणि खासगीत वेगळा. श्लील-अश्लीलतेच्या विळख्यात अडकलेला आधुनिक भारतीय समाज यामुळेच बहुधा उत्कृष्ट न्यूड पेंटिंग देऊ शकलेला नाही. क्वचितच काही अपवाद केल्यास कलेतील हा नग्नपणा न झाकता येण्यासारखा आहे. का आहे न्यूड स्टडीचा अंदाज बांधणे आणि त्याचा अनुभव घेणे यात जमीन-अस्मानाचा फरक? त्यासाठी का गरज आहे नग्न व नग्नता यातील फरक समजून घेण्याची..

भारतीय संस्कृती जेवढी विशाल, तेवढीच गुंतागुंतीची आहे. एकाच वेळी त्याबाबतची विचारधारा उदात्त व संकुचित अशी दोन्ही टोकांचीही वाटू शकते, त्यामुळेच सबंध जीवनात कोणताच ठाम निष्कर्ष सुसूत्रपणे लागू होत नाही. पौराणिक संदर्भ असो वा अकबरकालीन सर्वसमावेशक तत्त्व असो वा समकालीन धर्माध राजकीय दबावाचे धोरण असो ते वारंवार कलाकारांच्या प्रतिभेवर व कलाकृतींवर परिणाम करतात.

आसपासचा समाज नग्न अंगावर कपडे गुंडाळूनही नंगाच दिसतो, एवढा तो वासनेने विचलित झालेला आहे. मला आठवतंय, मुंबईतील सांताक्रूझ एअरपोर्टजवळील पूर्वीच्या सेंटॉर हॉटेलसमोरील हायवेलगतच्या हॉटेलच्या जवळ पाश्र्वनाथ महावीराचे मोठय़ा आकाराचे उभे नग्नरूपी प्रतिकृती शिल्प होते. खूप र्वष ते सर्वाना सहजपणे पाहण्यासाठी खुले होते. मग काही वर्षांनी अचानकपणे एका समाजाने एकूण समाजाची अश्लीलता झाकण्यासाठी महावीराच्या कमरेपर्यंत १० ते १२ फुटांची मोठी िभत उभी करून देवदेहाला नजरबंद करून टाकले. आजच्या इंटरनेटच्या जगात सर्वत्र सहजपणे नग्नता उपलब्ध होत असताना शासनमान्यतेच्या सभ्य व भ्याड चौकटी मात्र समाजातील आक्रमक लोकांचा हट्ट पुरवतात. सेन्सॉरच्या कात्रीने समाजाचे खरे प्रतििबब असलेल्या परंतु न उलगडलेल्या आशयपूर्ण साहित्य, चित्र, शिल्प, फोटोग्राफी, नाटय़-चित्रपट इत्यादी कलाकृतींची काटछाट करून वा बंद पाडून मुस्कटदाबी केली जाते.

चित्रकलेत जगप्रसिद्ध एम. एफ. हुसेन,

एफ. एन. सुझा, अकबर पदमसी यांनी न्यूड चित्रकलेबद्दल भलीमोठी शिक्षा भोगल्याचे इतिहास सांगतो. हे आठवण्याचे कारण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला चित्रकार व चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट. या वर्षीच्या गोवा चित्रपट महोत्सवात उद्घाटन सोहळ्याचा शुभारंभ न करता येणारा हा तेव्हा वादग्रस्त ठरलेला चित्रपट. शासनाने पूर्वी मान्यता देऊन, शुभारंभाचा शो जाहीर केल्यानंतरही श्लील-अश्लीलतेच्या दबावाला बळी पडून तो दाखवण्यास नकार देण्यात आला. रवी जाधव यांनी आजवर दिलेल्या इतर दर्जेदार कलाकृतींमुळे त्यांचा हा चित्रपट तरला व त्यास ‘अ’ सर्टििफकेट मिळून तो महाराष्ट्रात सर्वत्र झळकला. चित्रकलेच्या बाबत मात्र चित्रकारांच्या मागे कलाजगताचाच पािठबा नसल्यामुळे कलाकाराची न्यूड कलाकृती अभिव्यक्तिस्वातंत्र्यापासून दूर राहते. ‘जहांगीर आर्ट गॅलरी’त प्रत्येक चित्रप्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी पोलिसांनी केलेली कलाकृतीबाबतची श्लील-अश्लीलतेची तपासणी बंधनकारक असते. असो.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट.. मी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये ज्येष्ठ मॉडेल्सना देण्यात येणाऱ्या ‘मॉडेल पारशीण स्मृती जीवन गौरव पुरस्कार’ सोहळ्यासाठी चाललो होतो. वाटेतच लक्ष्मी भेटली, नमस्कार करून तिने मुद्दय़ालाच हात घातला. ‘‘सर, तुम्ही मला या वर्षी पारितोषिक द्यायला पाहिजे होते. मी सर्वात ज्येष्ठ मॉडेल आहे.’’ ती ज्येष्ठ असली तरी तिच्यापेक्षा जास्त ज्येष्ठ मॉडेल होते. आरई, फर्नाडिस बाई, मोरेकाका या ज्येष्ठ मॉडेल्सबद्दल सांगितल्यावर तिला माझे म्हणणे पटले. रवी जाधव यांच्या ‘न्यूड’ या मराठी चित्रपटाचा धक्कादायक गोवा वृत्तांत तोपर्यंत मला कळला होता. पण चित्रपटाचे कथानक कोणावर आधारित आहे हे माहिती नव्हते. लक्ष्मी म्हणाली, ‘‘सर ती माझीच गोष्ट आहे.’’ त्यावर मी तिला म्हणालो, ‘‘हे उत्तमच झाले, तुला २०१९ चा पुरस्कार नक्कीच मिळणार, त्यावेळेला तुझ्यासह इतर सर्व मॉडेल्सचाही सत्कार करू.’’ त्यावर तिचे समाधान झाले. तीन वर्षांपूर्वी, २०१५ मध्ये लक्ष्मीशी भेट झाली होती, जे. जे.च्या वार्षकि संमेलनाच्या वेळी. थोडे विस्तृत करून सांगतो, जे.जे. स्कूलची परंपरा सुमारे १६० वर्षांची आहे, गेल्या दीड शतकात येथे ‘व्यक्तिचित्रण’ हा सर्वासाठीच अध्यात्म पातळीवर गेलेला विषय ठरला आहे. या व्यक्तिचित्रणात -संपूर्ण मानवी देहाचं चित्रण करण्याची उज्ज्वल परंपरा आहे. शंकर पळशीकर, वासुदेव गायतोंडे, पद्मशाली, गोपाळ देऊसकर, बाबूराव सडवेलकर, संभाजी कदम, एम.आर. आचरेकर, सावळाराम हळदणकर अशा अनेक दिग्गजांनी त्याला अभिजाततेचा दर्जा व परंपरा मिळवून दिली. या सर्वानीच मानवी शरीराचा अभ्यास केला व ते करण्यासाठी स्त्री-पुरुषांच्या नग्न देहांचे बारकाव्यानिशी अभ्यास करून चित्रण केले. जे.जे.च्या वा एकूणच कला अभ्यासात शरीरशास्त्राचा अभ्यास व त्यावर आधारित चित्ररचना मूलभूत मानली जाते. जसे निसर्गचित्रण करण्यासाठी निसर्गात फिरावे लागते, त्या वातावरणाचे चित्रण करावे लागते किंवा मनात निसर्ग साठवावा लागतो, तसंच मानवी देहाचे अंतर्बाह्य़ सौंदर्यअनुभव चित्रात व्यक्त करण्यासाठी त्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी, विविध मॉडेल्सची सोय केलेली आहे, मानवी देहाच्या शरीरशास्त्रीय सौंदर्य आणि भाव आविष्कारासाठी लागणाऱ्या अध्ययनाचा एक सजीव पाठ असतो त्याला चित्रकार, शिल्पकार मॉडेल म्हणतो आणि श्लील-अश्लीलतेच्या पलीकडच्या निखळ सौंदर्य वेदनांना प्रकट करणाऱ्या नग्न मनाच्या देहाला आम्ही चित्रकार न्यूड म्हणतो व त्या अभ्यासाला ‘न्यूड स्टडी’ म्हणतात. यात स्त्री-पुरुष विविध बांध्यांच्या, रंगांच्या, वेशभूषांच्या मॉडेल्स वस्त्रधारी (ड्रेपरी) सेमी न्यूड (अर्धनग्न) फुल न्यूड (पूर्ण नग्न) पद्धतीने अभ्यासासाठी खास पद्धतीने उभ्या, बसलेल्या, झोपलेल्या, पहुडलेल्या अवस्थेत मांडल्या जातात. आकाराचे रूपदर्शन अवलोकन करणे हे अभिप्रेत असते. बऱ्याचदा या मॉडेल्सच्या यादीत पिढीजात चेहरे तर काही वेळेस नवनवीन चेहरे पाहायला व अनुभवायला मिळतात.

अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून आयुष्याच्या खडतर प्रवासाचा मोठा पल्ला गाठून आलेले त्यांचे मन-शरीर ‘जे.जे.’च्या वातावरणात अधिक सुरक्षित आणि सन्मानाने जगत असते. त्यांना फक्त माणूस म्हणून वागणूक आणि त्यापेक्षाही आपल्या शिक्षणासाठीचा पाठ याच भावनेने त्यांच्याकडे पाहिले जाते. फिगर ड्रॉईंगच्या क्लासमध्ये आर्टििफशियल ड्रेपरी दिली जात नाहीत, ते जसे खऱ्या आयुष्यात जगतात तसेच त्यांना चित्रचौकटीत साकारले जाते. ही सर्व मॉडेल्स पूर्वीपासूनच खऱ्या जीवनातील खरी मॉडेल्स होती व आहेत. अत्यंत तुटपुंज्या पशाने पोटाची खळगी कशी भरायची याची भ्रांत उरामध्ये असूनही ती झुगारून फक्त निखळ सेवाभावाने मॉडेिलग / न्यूड मॉडेिलग करणारी ही सर्व मंडळी खरोखरच कलाकारांसाठी देवदूत आहेत.

असेच एक अनोखे व्यक्तिमत्त्व असलेली पारशी मॉडेल. १९८८ मध्ये साधारण ६८ ते ७० वष्रे असलेली अतिशय देखणी, गोरीपान, छोटय़ा चणीची, परंतु स्वाभिमानी व बोलकी होती. तिचा मॉडेिलगचा जॉब असो वा नसो ती आम्हाला नित्यनेमाने भेटायला येई. तिच्या इवल्याशा मुठीतून गुपचूप सुकामेवा, चॉकलेट द्यायची. तिच्यातील प्रेम तिच्या डोळ्यांत, आवाजात, स्पर्शात, वागणुकीत, देहबोलीत सर्वासर्वातून व्यक्त व्हायचे. तिची रंगीबेरंगी वेशभूषा तिला आकर्षक करायची व आम्हालाही चित्र काढण्यास स्फूíतदायी ठरायची. तिच्या मी केलेल्या एका महत्त्वपूर्ण पोर्टेटला १९८९ मध्ये ‘जे.जे.’चा सन्माननीय पुरस्कारही जाहीर झाला. कलावंत मानवी देहाचे सौंदर्यपूर्ण चित्रशिल्प साकारतो, कलाकृती घडते, रसिकमान्य होते. कलाकार आणि कलाकृती अजरामर होतात, पण त्या स्फूर्तीमय मानवी प्रतिमेचे काय? ज्यामुळे कलाकार प्रतिभेला साकारतो व प्रतिभावंत ठरतो, त्या स्फूर्तीमय मानवी देहाच्या उत्कट प्रकटीकरणाशिवाय कलावंताची प्रतिभा केवळ अशक्यच, अशी सक्षम प्रेरणा त्या निश्चल व्यक्तिमत्त्वात असते. याचे भान ठेवून २०१५ पासून दरवर्षी मी ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’च्या वार्षकि कला प्रदर्शनात सर्वात ज्येष्ठ व अनुभवी मॉडेल्ससाठी ‘मॉडेल पारशीण स्मृती जीवन गौरव पुरस्कार’ देण्याचे ठरविले. या पुरस्कारात त्यांच्या नावे सन्मानपत्र, रोख रक्कम आणि त्यांच्या काढलेल्या उत्कृष्ट चित्रांचे एकत्रित प्रदर्शन आणि त्याच चित्रांच्या पोर्टफोलिओची भेट दिली जाते, असा हा सन्माननीय पुरस्कार हा सर्वच कलावंत आणि कलाविद्यार्थ्यांच्या वतीने सर्वच मॉडेल्सबद्दलचे प्रेम कृतज्ञतेचे प्रतीक आहे.

२०१५ मध्ये पहिला पुरस्कार दीर्घकाळ सेवा करणारी स्त्री-न्यूड मॉडेल ‘आरई’ हिला देण्यात आला. तिची काळीभोर कांती, टपोरे डोळे आणि नाकातील चमकदार फुल्ली, कानातील कुडी अत्यंत विलोभनीय दिसायची. विशेषत: हेड स्टडी किंवा पोर्टेट पेंटिंग करण्यासाठी अतिशय कठीण मॉडेल होती ती. तिच्या काळ्याभोर कांतीमुळे चेहऱ्याची रचना समजणे व रंगविणे आव्हानात्मक व्हायचे, पण तितकीच न्यूड ड्रॉईंग पेंटिंगसाठी रेखीव-बांधेसूद व लयबद्ध अंगकाठी होती. या ‘आरई’ची पुरस्कारासाठी निवड एकमताने झाली होती. ‘आरई’ सध्याची सर्वात जुनी अनुभवी न्यूड मॉडेल आहे आणि तिच्यामागे (धन) लक्ष्मी, शांती, सुनीता, सुधा अशी परंपरा चालत आली आहे. गेल्या ३४ वर्षांच्या इतिहासात ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्ये अनेक मॉडेल्स रंगवताना पाहिल्यात, मीदेखील माझ्या विद्यार्थीदशेत शांती, लक्ष्मी, अमुल, सविता, सुधा, मिसेस फर्नाडिस,

मुस्लीम अम्मा, राजम्मा इत्यादी स्त्री न्यूड मॉडेल्स रंगवल्या. काही वेळा या मॉडेल्स साडी, परकर, चोळी अशा सर्वसामान्य वेशभूषेमध्येही मॉडेिलग करायच्या, त्यामुळे वस्त्रधारी देहाच्या आतील छुप्या सौंदर्याचे लेणे व त्याचा रूपबंध समजण्यास मदतच झाली.

न्यूड स्टडीचा अंदाज बांधणे आणि अनुभव घेणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. नग्न व नग्नता यातील फरक यासाठी समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दृश्यकला नग्नतेला साकारते व या साकारण्याचा अभ्यास विविध पद्धतीने घ्यावा लागतो. रेषा, रंग, आकार, घाट, पोत, रचना, आकृतिबंध, छायाप्रकाशाचा खेळ, वास्तव, भास, प्रतिमा, भावना, संदर्भ, तंत्र, शैली, अनुभव आणि आकस्मिक शोध या सर्वाचा कसदार मेळ साधावा लागतो.

मी जेव्हा तिसऱ्या वर्षांला होतो तेव्हा दोन-तीन ड्रेप मॉडेलनंतर न्यूड अ‍ॅन्टीक स्टडी झाल्यावर न्यूड ड्रॉईंगचा वर्ग होता. सर्व विद्यार्थ्यांना त्याची आगाऊ कल्पना दिली गेली होती.. सोमवारी सकाळीच संपूर्ण क्लास कधी नव्हे तो इन टाइम आणि पूर्ण संख्येनिशी हजर होता. आमच्या वर्गात मुलगे-मुलींची संख्या सारखीच होती. एक किडक्या बांध्याची छोटीशी मुलगी हातात एक पिशवी घेऊन आत शिरली व भिरभिरल्या चेहऱ्याने सर्वाकडे पाहू लागली.. ती स्क्रीनच्या मागे गेली व हळूहळू आपले कपडे काढू लागली व नंतर अगदी संयमाने सरांनी ठरविलेल्या ठिकाणी अलगद येऊन पोझ देऊ लागली.. सरांनी अभ्यासात कोणकोणत्या शरीररचनेचे अवलोकन करायचे, तसेच रंगांचा, छाया-प्रकाशाचा कसा विचार करायचा हे समजावले. आयुष्यात प्रथमच नग्न स्त्रीदेह पाहात होतो.. अचंबित नजरेने तिला पाहून झाल्यावर अजून कोण कसे पाहतेय, याचीही निरीक्षणे झाल्यावर लक्षात आले की मुले अडखळत होती तशा मुलीही अडखळत होत्या.. सुरुवातीला आम्हाला पेन-पेन्सिलने स्केचेस करायच्या होत्या व नंतर पेन्सिलमध्ये टाइम स्केच.. ते शरीर टिपणारे माझे डोळे जसजसे कागदावर चित्र काढण्यात त्या मॉडेलचे शरीर न्याहाळू लागले तसतसे माझ्यातील वासना गळून जाऊ लागली.. माझ्यासमोर छाया प्रकाशाने लपेटलेला एक सुंदरसा जीव, आकृतिबंध होता व त्याच्या गोलाईचे सौंदर्य मला चित्रबद्ध करायचे होते.. श्वास रोखून श्वासाचं ते शरीर रेषेने रेखाटताना माझ्यात एक अद्भुत शक्ती काम करते आहे याची मला जाणीवही झाली नाही.. मी फक्त निखळ रूपाचे दर्शन-चित्र काढण्यात गुंग झालो होतो.. मनातून नग्नता पार दूर गेली होती अन् शुद्धतेचे नग्न रूप कळू लागले होते..

३० मिनिटांनंतर ५-७ मिनिटांची विश्रांती असायची. एवढय़ा कमी अवधीतही मॉडेल पुन: स्क्रीनच्या मागे जाऊन कपडे चढवून आमच्यात फिरू लागली.. आपले नग्न दर्शन कसे रेखाटले आहे हे न्याहाळताना तिच्या चेहऱ्यावर निरागस भाव होता.. आपण कसे सुंदर दिसतो याचबरोबर विद्यार्थी आपल्या देहातून काय शिकले असावेत, हा प्रश्न तिच्या चेहऱ्यावर होता.. पण माझ्या शेजारच्या मत्रिणीला एवढे अवघडल्यासारखे झाले होते की तिचे ड्रॉईंग चुकले.. सरांना बोलावून ते विचारण्यासही ती तयार नव्हती. शेवटी मलाच तिने विचारले.. दृश्य घटकांच्या भाषेत सांगून तिला मी चित्रातील अनावश्यक शरीर रबराने खोडून पेन्सिलीने बरोबर करून दाखवले. हळूहळू लक्षात यायला लागले की लज्जेपोटी मुलींची चित्रे बिघडायची तर मुलांची चित्रे अधिक आकर्षक होऊ लागली..

या मॉडेल वर्गात वेगळ्या वागायच्या, पण वर्गाबाहेर इतर मॉडेलसोबत बसून डबा खात असत.. अतिशय नम्र, कृतज्ञ भावनेने त्या एकत्र जमायच्या. ज्या समाजात राहायच्या त्या समाजात त्यांचे अस्तित्व हे मॉडेल म्हणून मान्य नसल्यामुळे ते त्यांची ही ओळख पार बदलून जगत होत्या. त्यांचं सावट आपल्या कुटुंबावरही येऊ नये म्हणून काळजीने आपले मॉडेिलग जपले.. अगदी सख्यांपासून नवरा-मुलांपर्यंत ते गुपितच ठेवले. या सर्व मॉडेल्स कधी ड्रेपरीमध्ये कधी सेमी न्यूड तर कधी न्यूड अशा तिन्ही प्रकारच्या पद्धतीने अभ्यासाला उपलब्ध होत होत्या. १९९० च्या सुमारास त्यांचे मानधन रुपये अनुक्रमे २४, ४८ व १०० रुपये असे  होते. आज ते साधारण रक्कम ३००, ६०० व १२०० पर्यंत असावे, परंतु महिन्यातून फक्त जास्तीत जास्त ७ ते ८ दिवसच त्यांना हे काम मिळते. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त ‘सर. जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स’मध्येच न्यूड स्टडीची उपलब्धता व परंपरा आहे.. मुंबई व महाराष्ट्रात इतरत्र हेच मॉडेल्स अभ्यासासाठी आमंत्रित केले जातात. ती आदर्श मॉडेल्स आहेत असे मुळीच नाही, परिस्थितीमुळे त्यांच्या बांध्यातही बेढबपणा व तोच-तोचपणा दिसायला लागतो. तरीही आमच्यासाठी त्या महत्त्वाच्या आहेत. तुटपुंजा पशात अधिक आकर्षक मॉडेल्स मिळणे फार कठीण. खरे तर किती सहजपणे त्या देहविक्री करून खूप पसे कमवू शकतात, पण तसे न करता देहाच्या सन्मानात जगतात.

आज २१ व्या शतकात, डिजिटल जगातही समाजाचा न्यूड चित्रांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बुरसटलेलाच आहे. या समाजाच्या भीतीपोटीच बरेचदा प्रसिद्ध मासिकाचे संपादक कित्येक पुस्तके मुखपृष्ठावरील नग्न चित्रांमुळे प्रकशित करायला धजत नाहीत. अगदी दृश्य परंपरेच्या प्रसिद्ध कोशातही चित्रकारांच्या इतर प्रसिद्ध चित्रांचा समावेश करतात, परंतु न्यूड चित्रांच्या प्रतिमांचा समावेश नसतो. श्लील-अश्लीलतेच्या विळख्यात अडकलेला आधुनिक भारतीय समाज यामुळेच बहुधा उत्कृष्ट न्यूड पेंटिंग देऊ शकलेला नाही. क्वचितच काही अपवाद वगळल्यास कलेतील हा नग्नपणा न झाकता येण्यासारखा आहे. शुद्ध नग्नतेने प्रभावित होऊन अभिजात चित्रकार्य करणाऱ्यांची यादी फारच तुरळक आहे. नग्न देहाचा कोणी शरीरशास्त्र म्हणून तर काहींनी त्यापासून स्फूर्ती घेऊन भावनाविष्कार म्हणून तर काहींनी मानवी शरीराचे निव्वळ निखळ सौंदर्य म्हणून कलाकृतीत समावेश केला आहे.

माझ्या मते, भारतात गेल्या शतकात हेमेन मुझुमदारांची चित्रे ही याविषयीची अधिक परिणामकारक व रसप्रधान कलाकृती वाटतात. त्यांनी साकारलेली ओलेती स्त्रीची चित्रे ही एकाच वेळी िहदू संस्कृतीची शालीनता तसेच नग्नता यांचा सुंदर मेळ घालणारी आहेत. त्याचबरोबर दृश्यातील कल्पकता आणि अभिजातता याचेही उदाहरण आहे. ओल्या अंगाला चिकटलेल्या वस्त्राला जो शरीराचा आकार प्राप्त होतो त्या शरीरसौंदर्याच्या विविधतेला साकारण्यासाठी केलेला प्रकाशाचा खेळ हा अत्यंत विलोभनीय आहे. यानंतर एकटय़ा कृष्णाजी आरा या प्रोग्रेसिव्ह ग्रुपच्या चित्रकाराने नग्न स्त्रीदेहाचे सौंदर्य अधिक वेळा, अधिक तऱ्हेने आविष्कृत केलय, तेही कोणत्याही सामाजिक संज्ञा अर्थाशिवाय. तसेच रवी वर्मा व एस. एम. पंडितांनी पौराणिक विषयांच्या चित्रांसाठी निव्वळ स्त्री प्रतिमांचा अभ्यास म्हणून केलेला आढळतो. सूझांच्या चित्रात स्त्री-पुरुष नग्न देहाला कामुक भावनाविष्काराची भूक अफाट असल्याची जाणवते..  लैंगिक वासनेचे जटिल रूप यात दिसते.. मनू पारेखांच्या चित्रात शृंगाराला अधिक महत्त्व आहे. थोर कला शिक्षक व चित्रकार शंकर पळशीकरांच्या ‘कोळणी’ या एका चित्रातून भारतीय वेशभूषेची परंपरा तसेच शालीनतेचे दर्शन घडवताना आदिम शृंगारही व्यक्त होतो. या चित्रातील अंधाराचा आणि त्यावर पडलेल्या मोजक्या परंतु विलोभनीय प्रकाशाचा सुंदर खेळ त्यांनी यात प्रकट केला आहे. अलीकडच्या काळात गोगी सरोज पाल आणि रेखा रोढविद्या यांनी स्त्रीदेहाला स्त्रीवादी भूमिकेने आविष्कृत केले आहे. अमृता शेरगील या प्रसिद्ध चित्रकर्तीने बऱ्याच प्रमाणात या देहांना उत्कटपणे चित्रित केले आहे त्यांनी उत्कृष्टपणे सेल्फ न्यूडही रंगविलेली आहेत. त्यांच्यात धक्कादायक अभिजात न्यूड पेंटिंग तसेच सेल्फ न्यूड पेंटिंगचे बीज पाश्चिमात्य समाज व कलेच्या संस्कारातून रुजले व वाढले. तशी मान्यता मिळण्यासाठी समाज, कलाविश्व राजाश्रय अधिक व्यापक मुक्त विचारांचा व जबाबदार असावा लागतो. स्वीडन देशाचा गेल्या शतकातील प्रख्यात चित्रकार एॅन्ड्रेस झॉर्नने आयुष्यभर न्यूड पेंटिंग, ड्रॉईंग, फोटोग्राफी आणि फिल्म केली आहे. त्याचे मोठे म्युझिअम स्टॉकहोम येथे आहे. एवढी अलौकिक मान्यता मिळण्यासाठी न्यूड कलेबद्दलचा दृष्टिकोन संपन्नच असावा लागतो.

माझ्या वर्गात शिला दुबे नावाची उज्जनची चित्रकर्ती होती. अतिशय संवेदनशील व सुंदर जशी चित्रातील एक सुंदर स्त्री प्रतिमाच. तिच्या चित्रांना स्वंतत्र ओळख तर होतीच, पण त्याचबरोबर करुणा व सौंदर्यही होते. तिने १९९०-९१ च्या दरम्यान स्वत:च्या न्यूड चित्रांचे प्रदर्शन ‘जहांगीर आर्ट गॅलरी’मध्ये भरवले होते. ही चित्रे भव्य आकाराची तर होतीच परंतु अतिशय मोजक्या रंगात व रेषाप्रधान होती. माझ्या मते हे एकमेव सेल्फ न्यूडचं प्रदर्शन असावं.

पाश्चिमात्य कला व भारतीय कलेचा इतिहास यामुळे माझाही दृष्टिकोन न्यूडतेबद्दल विकसित होत गेला. मीदेखील १९८७-८८ दरम्यान काही सेल्फ न्यूडची ड्रॉईंग व वॉटर कलर्स पेंटिंग केली. तीही माझ्या रहात्या घराच्या आरशात पाहून.. जेव्हा मी सेल्फ न्यूड करीत होतो तेव्हा.. मी माझ्यातून मलाच मुक्त करीत होतो.. आणि जसे ते पूर्ण झाले तसे मी संपूर्ण मुक्त झाल्यासारखे वाटले. लज्जा, तमा न बाळगता ‘स्व’चा स्पर्श यांत अंतर्बाह्य़ अनुभवताना फिरणारी पेन्सिल ही निव्वळ एक स्पर्शमाध्यम होती मलाच मी जाणण्यासाठीची! असे काहीसे वाटले..

नग्नदेह-नग्नचित्र, शिल्प, नग्नतेचे सार्वजनिक ठिकाणाचे प्रदर्शन समजायला, समजून घ्यायला १०० वष्रे पुढे जाण्याची गरज नाही. भारतीय संस्कृतीने खजुराहोच्या मंदिरातून, शिविलगातून, लज्जागौरीतून.. अकबरकालीन, कांग्राशैलीतील लघुचित्रातून अजिंठा, वेरूळ, तंजावर पेंटिंगमधून ती रसपूर्णतेने सौंदर्याकित झालेली दिसते. अशी कैक उदाहरणे याविषयीची शाश्वत मूल्ये प्रकट करून आहेत. पाश्चिमात्य समकालीन कलेतील  चित्रशिल्प कलाकृतींचा आवाका व दर्जा अभिजात आहेच परंतु तो सार्वकालीनही आहे. तेथील कलावंताने शरीरशास्त्रातून मानवी देहाचा, मनाचा, निसर्गाचा आणि चित्रकलाकृतीच्या रचनेचा वेध घेतलेला आहे. अ‍ॅडम आणि ईव्हची चित्ररचना हे त्याचेच आरंभिक उदाहरण आहे. व्हॅन गॉखने नग्न पत्नीचे केलेले ‘सॉरो’ हे रेखाचित्र प्रसिद्ध आहे. यात गुडघ्यात डोके घालून हुंदके देत रडणारी पत्नी त्याने दाखविली. फक्त एका रेषेने केलेले तिचे रेखाटन तिच्या नग्नतेचे एकटेपण दर्शवते.. एडवर्ड मुंकचे ‘लज्जा’ हे चित्र जगप्रसिद्ध आहे. वयात आलेल्या मुलींच्या मनातील लज्जाभाव दाखवताना चित्रकाराने कल्पकतेने बंद खोलीत बसलेली नग्न कुमारी दाखविली आहे. अचानक पुरुषी नजरेने उघडलेला दरवाजा पाहून घाबरते व आपले यौवन झाकताना ते सुरक्षितपणे सांभाळण्यासाठी आलटून पालटून ठेवलेल्या हाताची हालचाल, रचना तसेच तिच्या चेहऱ्यामागील पुरुषी गडद सावलीचा परिणाम चित्राचा विषय व आशय आणि अभिजात दर्जा सामावून प्रगटतो. चित्रकार आंग्रेच्या चित्रातील नग्न स्त्री नुकतीच हमाम घेऊन शुचिर्भूत होऊन आलेली वाटते.. इतकी त्याने तिची कांती अंतर्मनापर्यंत स्पर्शमय करून ठेवली, तीही नुसत्या अचूक शरीर प्रमाणाने आणि रंगाने. मऊ स्त्रीदेहाचा स्पर्श नुसत्या दृष्टीने सहज टिपता येतो एवढी कलाकृती थेट मनाला भिडते. शिल्पकार रोदॅने घडवलेली न्यूड शिल्प म्हणजे खरोखरच देहाच्या साच्यातून काढलेली रिप्लीकाच असावी एवढी ती त्याने तंतोतंतपणे भावनाविष्कारित केलेली आहेत. गोयाचं ढगाशी शृंगार करणाऱ्या नग्न स्त्रीचं चित्र स्वप्नमय वाटते.

जगप्रसिद्ध हेन्री मातीस या चित्रकाराने एकाच मॉडेलच्या पहुडलेल्या अवस्था ६५ वेळा रंगवलेल्या आहेत. यात स्त्रीदेहाचे सौंदर्य, भावनिक उत्कटता दाखवताना त्याने,  चित्रत्वाचाही फुलोरा साधलाय ही सर्व चित्रे आकाराने सात-आठ फुटांची भव्य आहेत. एकूणच स्त्रीदेहाचे नग्नसौंदर्य जितक्या प्रभावीपणे सहजपणे, वैविध्यपणे विविध माध्यमांत संदर्भात चित्रित केलेय तेवढे पुरुषदेहाचे नग्न रूप दाखविण्याचे धाडस समाजातील कलावंतात अजूनही कित्येक काळापासून आलेले नाही. क्वचितच काहींनी अपवादात्मक ते केलेले आहे. परंतु त्यात सातत्य नाही. पुरुषप्रधान दृष्टीचा संकुचित कॅनव्हास याला कारणीभूत आहे.

कोणत्याही देशाची समकालीन कला ही त्या देशाची समकालीन संस्कृती अधोरेखित करते. पूर्वइतिहास, प्रभाव यांच्या परिणांमुळे ती ढवळून निघते व हळूहळू निवळ वरती यावा तसे ती स्थिर होते, या स्थिरपणातच संस्कृतीचे रुप व मूल्ये कळतात.

भारत देशाची कला संस्कृती घडण्यासाठी कला व समाजातील स्त्री-पुरुषाचं स्थान अधिक मोकळं, समंजसपणाचं व समभावाचे राहून त्याच्या नग्नतेला अनुभव, आविष्कार आणि सौंदर्यदृष्टीने अभ्यासण्याची गरज आहे. त्यासाठी स्त्री व पुरुष कलावंतांनी पुरुषांच्या नग्न  कलाकृतीच्या आविष्कारासाठी न्यूड स्टडी उपलब्ध होण्यासाठी बंड पुकारले पाहिजे. विशेषत: स्त्री कलावंतांनी त्यासाठी सर्वाचे मन वळवले पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने स्रोत, सत्त्व, त्रिकाल याचं प्रतीक असलेली ‘स्त्री’ उलगडेल. यामुळे शीलहरणास सामोऱ्या जाणाऱ्या सद्य काळातील अनेक द्रौपदी, अहिल्या आणि अनसूयांचं यामुळे बिटंबन थांबेल आणि त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचे महत्त्व जाणून समाजाची नग्न रुग्णतेतून मुक्तता होईल.

xsunsawant@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on May 26, 2018 7:19 am

Web Title: nude drawing modern indian society