21 September 2020

News Flash

बेडर कार्यकर्ती

अस्मा जहांगीर यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा प्रथम मनात आले

अस्मा जहांगीर यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा प्रथम मनात आले, की हा काही घातपाताचाच तर प्रकार नसेल ना? शंका येण्याचे कारण, पूर्वी तशा प्रसंगातून त्यांना जावे लागले होते. नंतर बातमी आली की, त्यांचा मृत्यू हृदयविकारामुळेच झालाय. वय अवघे ६०. आठवण आली त्यांना प्रत्यक्ष भेटल्याची. दहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये एका चर्चासत्राच्या निमित्ताने त्यांना भेटण्याची, त्यांची सविस्तर मुलाखत घेण्याची संधी मिळाली होती. तेव्हा त्यांची एक सवय लक्षात आली होती, अस्मा सतत तंबाखू खायच्या आणि सिगरेटी नाही, तर विडय़ा ओढायच्या.. पण त्याहीपेक्षा लक्षात राहिला त्यांचा बेडर स्वभाव आणि वागण्यातला ठामपणा!

अस्मा म्हणजे एक अत्यंत धारिष्टय़वान व्यक्तिमत्त्व. पाकिस्तानसारख्या देशात मानवाधिकारांसाठी सातत्याने लढा देणारी,  अन्याय, अत्याचार, दहशतवाद, पिळवणूक, दडपशाही यांच्याविरोधात लढणारी व्यक्ती. सर्वसामान्य नागरिक, कामगार, शेतमजूर, स्त्रिया, मग त्या हिंदू आणि मुस्लीम, ख्रिस्ती, अल्पसंख्याक, राजकीय कैदी, वकील अशा कोणावरही अन्याय झाले की, त्या त्याच्याविरोधात उभ्या राहात. वकील म्हणून त्यांची बाजू घेत. कायद्यालादेखील आव्हान देत. आयुष्यभर माणसाच्या मूलभूत हक्कासाठीच त्या धडपडत राहिल्या.

त्याची सुरुवात झाली तेव्हा त्या १८ वर्षांची विद्यार्थिनी होत्या. त्यांचे वडील मलिक गुलाम जिलानी, हे नामवंत वकील. त्यांनी जनरल याह्य़ा खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली होती, की याह्य़ा खानने लोकांनी निवडून दिलेले सरकार हटवून सत्ता काबीज केली आणि लष्करशाही चालू केली. जिलानींची तुरुंगात रवानगी झाली. न्यायालयात केस चालू झाली, तेव्हा न्यायालयात अपरंपार गर्दी व्हायची. निकाल देताना न्यायाधीशाने सांगितले की, काळाची गरज म्हणून जनरल अयुब खानला लष्करशाही चालू करावी लागली होती; पण या वेळी कसलीही गरज नसताना याह्य़ा खानने लष्करशाही चालू केली, म्हणून ती बेकायदा ठरते. या निकालामुळे जिलानींची तुरुंगातून सुटका झाली. पाठोपाठ बांगलादेशाची निर्मिती झाली आणि याह्य़ा खानना सत्ताभ्रष्ट व्हावेच लागले होते.

त्या वेळी न्यायालयातील कामकाज अस्मा यांनी पाहिले आणि निर्णय घेतला, आपणही वडिलांसारखेच वकील व्हायचे आणि मग त्या अ‍ॅडव्होकेट झाल्या. ‘‘मीदेखील बाबांप्रमाणेच वागले. जनरल मुशर्रफ यांनी जेव्हा सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरी यांना पराभूत केले तेव्हा मी त्याविरोधात न्यायालयात केस दाखल केली आणि किती तरी वकिलांनी रस्त्यावर येऊन मुशर्रफ यांच्याविरोधात आंदोलन सुरू

केले. आम्ही वकील मंडळींनी त्यांच्याविरोधात  घोषणाही दिल्या त्याशिवाय आय.एस.आय.च्या (पाकिस्तान गुप्तहेर संघटना) विरोधातदेखील घोषणा दिल्या.  केसचा निकाल आमच्याच बाजूने लागला. आम्हाला एवढा आनंद झाला की, आम्ही सगळे वकील, इतर लोकदेखील रस्त्यावर येऊन भांगडा नाचून आनंद व्यक्त करीत होतो. मीदेखील भांगडा केला.. रस्त्यावर! हे म्हणजे केवढे तरी अद्भुतच होतं,’’ अस्मा हसतच म्हणाल्या, ‘‘लेकिन बहोत मजा आया!’’

वडिलांचा वारसा चालवताना अस्मा यांच्याबरोबर त्यांची वकील बहीण हीना जिलानी होत्या. दोघी मानवाधिकारासाठी सतत लढत राहिल्या आणि हीच गोष्ट अनेकांना खुपत होती. राजकीय, धार्मिक, लष्करी, सामाजिक क्षेत्रांतील सत्ताधीशांना अस्माजी नकोशाच वाटत होत्या. म्हणूनच एकदा जनरल झियाने अस्माजींवर न्यायालयात केस दाखल केली होती. कारण त्यांनी एक इस्लामविरोधी वक्तव्य केले होते; पण न्यायालयात काहीच सिद्ध झाले नाही. तुरुंगातून सुटका झाली तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘जेलमध्ये राहाणं म्हणजे एक वेगळाच अनुभव होता, खूपच थरारक!’’ असं म्हणणाऱ्या अस्माजी बहुधा  एकटय़ाच असतील. आणि याच ब्लासफेमी मुद्दय़ावर त्यांनी एका लहान मुलाची केस लढवली होती. सलामत मसिहा हा ११ वर्षांचा ख्रिस्ती मुलगा. सलामत आणि त्याचे दोन काका यांच्यावर न्यायालयात केस केली होती. त्यांच्यावर आरोप होता की, त्यांनी छोटय़ाशाच गावच्या मशिदीच्या भिंतीवर इस्लामविरोधात काही लिहिले होते. केस चालू असतानाच दोन्ही काकांचा कोणी तरी गोळ्या घालून खून केला होता. सलामत मसिहाची केस चालू होती. त्या एवढय़ाशा मुलाला न्यायालयात काय म्हटलंय ते कळत नव्हतं, काही बोलताही येत नव्हतं. अस्माजींनी त्याचं वकिलपत्र घेतलं होतं. साक्षीपुरावे झाले. अस्माजींनी सिद्ध केलं की, तो मुलगा निरक्षरच आहे. त्याला लिहिता-वाचता येतच नाही. त्याची सुटका करावीच लागली न्यायाधीशाला. त्यानंतर न्यायाधीशालाही मारून टाकण्यात आलं आणि मग अस्माजींना मारण्यासाठी हातात पिस्तूल घेऊन काही लोक त्यांच्या बंगल्यावर गेले, पण ते चुकून शेजारच्या, त्यांच्या आईच्या बंगल्यावर गेले. पाहिलं तर अस्माजी तिथे नव्हत्याच. वेगळीच माणसं पाहिल्यावर ते लोक निघून गेले. योगायोगानेच अस्माजींचा जीव वाचला होता. त्यानंतर मग त्यांनी आपल्या मुलांना बोर्डिग स्कूलमध्येच दाखल केलं. त्यांना कोणी मारू नये, पळवून नेऊ नये म्हणून.

जनरल झिया उल हक यांनी लष्करशाही चालू केल्या-केल्याच ‘हदूद’चा कायदा केला. तो कायदा म्हणजे स्त्रियांची पूर्णपणे मुस्काटदाबीच. या कायद्यामुळे स्त्रियांच्या सर्वार्थाने पिळवणुकीला उधाणच आले. पाठोपाठच ४० हजारांच्या वर स्त्रिया तुरुंगात खितपत पडल्या. अस्मा आणि हीना या बहिणी त्या बायकांची बाजू घेऊन मोठय़ा हिमतीने उभ्या राहिल्या. हदूद कायद्यालाच त्यांचा विरोध होता. त्यांना बऱ्याच वकिलांचा पाठिंबादेखील मिळाला. झियाने त्या सगळ्यांवर नजर ठेवली, गुप्तहेरांकडून. त्यांना मारून टाकण्याची शक्यता होतीच. अस्मा आणि हीना, त्यांचे पाठीराखे वकील आणि कित्येक स्त्रियांनी झिया यांच्याविरोधात मोर्चा काढला, घोषणांचे आवाज घुमत होते. त्यांच्यावर पोलिसांनी लाठीमार करायला सुरुवात केली. पुढे जाऊन पोलिसांनी अस्मांनादेखील धक्काबुक्की करायला सुरुवात केली. अनेकांचे कपडे फाटले. अस्माजींवरदेखील ती वेळ आलीच. त्या वेळी त्यांची मुलगी मुनिझा ही दूरचित्रवाणीची पत्रकार म्हणून त्या मोर्चाचे वार्ताकन करीत होती. आपल्या आईची ही अवस्था पाहून मुनिझाला काय वाटलं असेल? त्याच दरम्यान अस्माजींनी पुढाकार घेऊन ‘विमेन्स अ‍ॅक्शन फोरम’ या संस्थेची स्थापना केली. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणे, लोकांच्या मनात ईर्षां, जाणिवा निर्माण करणे हे त्या संस्थेचे कार्य, ते अजूनही सुरू आहे.

मानवाधिकारांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रांतील सत्ताधीशांविरोधात कोर्टासारख्या पुरुषी वातावरणात कायद्याला धरून लढा दिला आणि त्याच वेळी रस्त्यावर उतरून मोर्चे काढून वातावरण घुसळून काढले, न्यायासाठी आव्हान देत राहिल्या. त्यासाठी पाकिस्तानातून मोठय़ा प्रमाणावर त्यांना पाठिंबा मिळालाच आणि जगभरातून मान्यता मिळाली; पण त्यासाठी त्यांच्यावर पाकिस्तानातील अनेक टीका करणारेही होतेच. कारण त्यांच्या हक्कांवर गदा येत होती. अस्माजींवर आरोप झाले की, त्या अमेरिकेच्या एजंट आहेत. त्यांना अमेरिकेकडून पैसा मिळतोय. जगभर प्रसिद्धी मिळावी म्हणून ही बाई हे सगळं आक्रस्ताळेपणानं करते आहे.

‘‘आमची चळवळ राजकीय चळवळ नाही, तर आम्ही न्यायासाठी भांडतो. आमचा समाज कायमच कुणा ना कुणाच्या भीतीखालीच जगतोय. मुल्ला-मौलवींची, लष्करी हुकूमशाहीला आमचे लोक वैतागलेत. आम्हाला लोकशाही हवी आहे, त्यासाठीच आम्हाला तुमची सगळ्याच भारतीयांची मदत हवी आहे. कोणत्याही पक्षाचे असले तरी तुमचे सरकार, नोकरशहा, जनता सगळ्यांचा पाठिंबा हवा आहे. आमची सरंजामी जमीनदारी, लष्कराचे वर्चस्व, राज्यकर्त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी पोसलेले इस्लामी कट्टरपंथी, दहशतवादी यांच्यापासून आम्हाला सुटका हवी आहे. ती गोष्ट अजून फार कठीण आहे याची जाणीव आहे आम्हाला. सुटका झाल्याशिवाय खरी लोकशाही येणार कशी? त्यासाठीच आम्हाला तुमची मदत हवी आहे.’’ हे सगळे माझ्याशी बोलताना त्यांचा चेहरा तणावग्रस्त दिसत होता.

हा तणाव घालविण्यासाठी मग त्यांनीच विषय बदलला. त्यांना महागडय़ा बनारसी साडय़ा, वेगवेगळ्या प्रकारच्या बांगडय़ा घेऊन जायच्या होत्या, परत पाकिस्तानला गेल्यावर कुणाकुणाला देण्यासाठी, मग चित्रपट कोणते चांगले ते त्यांना पाहायचे होते. आम्ही ‘खामोश पानी’ हा पाकिस्तानी, तर ‘पिंजर’ या भारतीय चित्रपटाबद्दल बोललो. दोन्हींचा विषय एकच. फाळणीच्या वेळी भारतातून हिंदू मुलींना पकडून नेऊन त्यांचा धर्म बदलून त्यांच्याशी जबरदस्तीने लग्ने लावली होती. ‘पिंजर’मधील नायिका पाकिस्तानीशी जमवून घेते, प्रेमापोटी पाकिस्तानातच राहते, तर ‘खामोश पानी’ची नायिका जमवून घेतेच, पण तरीही तिला तिचाच मुलगा ‘काफर’ ठरवतो. अखेरीस ती विहिरीत जीव देते. अस्माजींना ‘पिजर’ अधिक आवडला. मला आश्चर्य वाटले, कारण त्यांनी पाकिस्तानातीलच हिंदू मुलींवर अशी जबरदस्ती झाल्यानंतर त्यांच्या बाजूने न्यायालयात वकिलीदेखील केली होती. त्यांना मग ‘खामोश पानी’च्या नायिकेच्या मनातील यातना कळल्याच नाहीत का? पण त्या मुलींनादेखील, आपण विरोध केला तर आपला माहेरच्या लोकांनाच भोगावं लागेल हे माहीत होतंच. म्हणूनच अस्माजींनाच माघार घ्यावी लागली होती.

‘खामोश पानी’पेक्षा ‘पिंजर’ आवडून घेणं हासुद्धा एक तऱ्हेचा त्या विषयामुळे येणारा तणाव विसरण्याचाच प्रयत्न असावा, अस्माजींचा!

– प्रतिभा रानडे

ranadepratibha@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2018 3:41 am

Web Title: pakistani human rights lawyer asma jahangir
Next Stories
1 जेव्हा मेंदू असहकार पुकारतो..
2 हसणाऱ्या स्त्रियांना कोण घाबरतं?
3 एक पाऊल स्वच्छतेकडे..
Just Now!
X