19 January 2019

News Flash

प्लास्टिक ‘भान’

भारतातही प्लॉस्टिक क्रांती स्वीकारली गेली. अगदी खेडय़ापाडय़ांतही झपाटय़ाने प्लास्टिक पोचले आणि हंडे-कळशीही रंगीबेरंगी प्लास्टिकच्या दिसू लागल्या.

सौजन्य : थिंकस्टॉक

मार्च मध्ये प्लास्टिक पिशव्या, डिस्पोसेबल वस्तू, थर्मोकोल, सूक्ष्म प्लास्टिक यावर बंदी घालणारी नवी अधिसूचना जारी करण्यात आली आणि ती जूननंतर पूर्णत: लागू होणार असल्याचे सांगितले जाते. यात उल्लेख असलेल्या सर्व प्लास्टिक प्रकारांवर बंदी असावी वा नसावी त्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा याचा आपले पर्यावरण, आपले आरोग्य यावर होणाऱ्या परिणामाचा विचार करणे अगत्याचे आहे, त्यानिमित्ताने..

हितगुज एक:

प्लास्टिकची एक अगदी छोटी, अशक्त दिसणारी पिशवी आणि एक मोठी भक्कम पिशवी यांच्यातील संवाद:

छोटी पिशवी : काय गं, आपले राज्य संपणार का खरंच? सारखे नवनवीन नियम येताहेत ना. (अगं, आता ना सगळे मला बघूनच कुजबुजतात.)

मोठी पिशवी: चल गं, असं होतं का कधी? आणि (हळूच कानात) तुला माहितीये का, तुझ्यावर तर पूर्वीपासूनच बंदी आहे. थोडासा परिणाम झाला त्यामुळे तुझ्यावर, पण तरी तू अनेक ठिकाणी बागडते आहेसच ना! तुझी निर्मिती कमी झाली का?

छोटी पिशवी:(खुदकन हसत) हो तेही खरंच!

मोठी पिशवी: इथले खूप कमी लोक नियम पाळणारे असतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, लघवी/शौच करू नये, महामार्गावर हेल्मेट घालावे असे कितीतरी नियम आहेत, त्यांच्याच भल्यासाठी, सुरक्षेसाठी, आरोग्यासाठी केलेले. पण लक्षात कोण घेतो? स्वयंशिस्त, सामूहिक शिस्त हेही तसे कमीच दिसते. त्यामुळे आपले फावते बघ. लोकांनी मनावर घेतले ना तर मग नियमांची सुद्धा खरं तर गरज राहाणार नाही.

छोटी पिशवी: मग आपण संपलोच की (उसासा टाकत छोटी उद्गारली. आणि तेवढय़ात आलेल्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर अनिश्चिततेच्या गर्तेत चिंतातुर होऊन उडाली.)

हितगुज दोन –

काचेची बाटली, कापडी पिशवी, कागदी पिशवी/खोका यांची बैठक जमली होती.

‘‘काय ना, आपला टीआरपी एकदम डाऊन आहे कित्येक वर्ष’’, काचेची बाटली म्हणाली.

‘‘हो ना, काय ते प्लास्टिक आले कानामागून, आणि तिखट झाले. जो तो प्लास्टिकच्याच वस्तू वापरतो. पिशव्या, डबे, खेळणी, बाटल्या काय काय विचारू नको.

पण काही म्हणा तसे आहे ना प्लास्टिक बहुगुणी,’’  कापडी पिशवी म्हणाली.

‘‘अगं, पण किती कचरा करते ते. आणि आपल्यासारखे सहज अनंतात विलीनदेखील नाही होत. वर्षांनुवर्ष या पृथ्वीचा भार होवून राहाते ते.’’ कागदी पिशवी म्हणाली..

हे मात्र खरंय हं, सारे एका सुरात म्हणाले.

सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. आपण चर्चा करतोय प्लास्टिक वापराची! सहज कोणताही आकार घेणारे आणि अत्यंत लवचीक असे एक मटेरिअल १९०७ मध्ये कृत्रिम धाग्यांपासून बनले गेले ते म्हणजेच प्लास्टिक. पॉलि इथिलिन, पोलिप्रापिलिन, पॉलिस्टायरीन, पोलीविनाइल क्लोराईड, असे पॉलीमर्सने प्लास्टिक बनते. चिवट, मजबूत, वजनाने हलके. पाणी, दमटपणा याचा परिणाम न होणारे, आकर्षक, तुलनेने स्वस्त अशा या प्लास्टिकला ‘‘मटेरियल ऑफ थाऊझंड युझेस’’ असे त्याकाळीच म्हटले गेले. अमेरिकेत दोन्ही महायुद्धात प्लास्टिकचा उपयोग पॅराशूट, दोरखंड बनवण्यापासून पॅकिंगसाठी  झाला आणि त्यानंतर त्याचा वापर वाढतच गेला आणि इतर जगातही पसरला. पिशव्यांपासून पुढे काम्प्युटर्स, शेती, कार, विमाने या अनेक क्षेत्रांत प्लास्टिकने बस्तान बसवले. आणि पारंपरिकरित्या वापरले जाणारे स्टील, लाकूड, अ‍ॅल्युमिनियम, काच यांना पार मागे टाकले. पॅकेजिंगमध्ये तर प्लास्टिकने अक्षरश: क्रांती केली. आणि तुलनेने सर्व वस्तू स्वस्त झाल्याने सामान्य माणसांच्या आवाक्यात आल्या आणि भौतिक समृद्धी प्राप्त होण्यास मदत झाली.

भारतातही प्लॉस्टिक क्रांती स्वीकारली गेली. अगदी खेडय़ापाडय़ांतही झपाटय़ाने प्लास्टिक पोचले आणि हंडे-कळशीही रंगीबेरंगी प्लास्टिकच्या दिसू लागल्या. सुटसुटीत, सोयीचे, हलके, स्वस्त प्लास्टिक सर्वानाच हवेहवेसे झाले. ते आले त्याने पाहिले, त्याने जिंकले असेच काहीसे झाले. या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करताना आपल्याला तारतम्य राहिले नाही. सर्वत्र छोटय़ा-मोठय़ा प्लास्टिक पिशव्या, एकदाच वापरायच्या ‘डिस्पोझेबल’ वस्तू यांचा नुसता सुळसुळाट झाला. पाण्याच्या पॅकबंद बाटल्यांचाही वापर प्रचंड वाढला. हे सर्व चालू असताना या साऱ्याचा पर्यावरणावर काही विपरीत परिणाम होईल का याचे भान कुणालाच फारसे राहिले नाही, मुळात प्लास्टिकचे इतर पारंपरिक मटेरियल्सपेक्षा वेगळे असणे लक्षात घेणे महत्त्वाचे होते.

प्लास्टिकचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. वर्षांनुवर्षे ते नष्ट होत नाही. डिस्पोझेबल प्लास्टिक विषयी बोलताना युरोपीयन युनियनच्या प्रवक्त्याचे उद्गार बोलके आहेत. ‘तुम्ही वापरणार वस्तू पाच मिनिटे आणि पर्यावरणाला भार म्हणून नंतर ती राहणार पाचशे वर्षे’ म्हणजे प्लास्टिकचा हा गुणधर्म लक्षात घेता त्याची हाताळणीही धोरणानेच व्हायला हवी होती. प्लास्टिकचे विघटन रासायनिक प्रक्रिया करून करता येते. व त्यापासून उपयुक्त इंधनही बनवता येते. म्हणजेच पुनर्वापर रिसायकलिंग शक्य आहे. पण त्यासाठी वेगळी यंत्रणा हवी. मुळात आपल्याकडे घन कचरा व्यवस्थापनासाठी भक्कम सुनियोजित, व्यवस्था नाही. त्यात या भरमसाठ प्लास्टिकची भर पडत गेली. यातील बराचसा कचरा मग नदी-नाले, गटारे, सांडपाणी आणि समुद्रात जमा होत राहिला. साचत राहिला. मग कृत्रिम पूर येणे, समुद्रातील माशांनी प्लास्टिक खाऊन मृत्यू पावणे, वादळ येऊन गेल्यावर प्लास्टिकच्या कचऱ्यांनी भरलेले विद्रुप किनारे नजरेस पडणे, गावाबाहेर रस्त्याच्या दुतर्फा प्लास्टिक पिशव्या/बाटल्यांचे साम्राज्य दिसणे हे नित्यनेमाचेच झाले. गायी, म्हशी, कुत्रे इत्यादी प्राण्यांनी रस्त्यात आणि कचराकुंडीतील प्लास्टिक पिशव्या खाणे आणि त्यांच्या पोटात प्लास्टिक साठून त्यांचा मृत्यू होणे हेही दिसू लागले. समुद्रातील माशांनी खाल्लेले प्लास्टिक माशांतर्फे आपल्या जेवणाच्या ताटातही येवू लागले. याशिवाय साबण, फेशिअल स्क्रब, टुथपेस्ट यात सूक्ष्म प्लास्टिक (काही मायक्रॉन आकाराचे प्लास्टिकचे कण) वापरले जाते, तेही अखेरीस पाण्यात मिसळून पुन्हा जैविक साखळीत येवू लागते. एकंदरीत  प्लास्टिकच्या अर्निबध वापराने पर्यावरणाचे आणि आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले.

प्लास्टिकचा भरमसाठ वापर आणि विल्हेवाटीसाठीच्या व्यवस्थेचा अभाव यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न बिकट होत आहे. परदेशांत याबाबत अनेक उत्तम उपाययोजना केल्या गेल्या आहेत. नागरिकांमध्ये जगारूकता, पर्यावरणाविषयीची संवेदनशीलता आहे. कचरा वर्गीकरणाचे कडक नियम आणि त्यांची अंमलबजावणी आहे. प्लास्टिक रिसायकलिंगसाठी सुलभ सुविधा उपलब्ध आहेत. बहुतांशी  देशात प्लास्टिक पिशव्यांसाठी पैसे मोजावे लागतात. याचा परिणाम प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करण्यास निश्चित झाला आहे. उदा. स्वीडनमध्ये पूर्वीपेक्षा ४९ टक्के वापर कमी झाला आहे. जाड प्लास्टिकच्या पिशव्या स्वीडिश माणूस चार-पाच वेळा तरी वापरतो. कापडी पिशव्यांचा वापर मनापासून करतो. प्रत्येक  निवासी भागात कागद, प्लास्टिक, धातू, कॅन्सच्या रिसायकलिंगची सुविधा आहेत. इंग्लंड व इतर युरोपियन देशांमध्ये डिस्पोसेबल वस्तू उदा. स्ट्रॉवर बंदी घातली आहे. अलीकडेच चीनने कचरा रिसायकलिंगसाठी आयात करण्याचे बंद केले. पूर्वी युरोपातून बराचसा प्लास्टिकयुक्त घनकचरा चीनला जात असे. पण आता युरेपिअन युनियनने रिसायकलिंगसाठी मोठय़ा प्रमाणावर युरोपमध्येच केंद्रे उभारण्यावर भर दिला आहे. स्वित्झर्लंडमध्येही प्लास्टिक पिशव्यांवर सुपरमार्केटमध्ये शुल्क आकारले जाते. पण यातून मिळणारे उत्पन्न आम्ही पर्यावरणीय उपक्रम, प्रकल्पांना देवू, असे मारगो आणि कूप या मोठय़ा चेन्सनी जाहीर केले आहे. आपल्या आसपासच्या देशांनीही प्लास्टिकचा पर्यावरणाला असलेला धोका ओळखून पूर्वीच पावले उचलली आहेत. बांग्लादेशमध्ये प्लास्टिकने नदी, गटारे तुंबून १९९८-९९ मध्ये पूर आले. २००२ पासून हलक्या वजनाच्या प्लास्टिक  पिशव्यांवर बांग्लादेशमध्ये बंदी आहे.

आपल्याकडे मात्र काही वर्षांपूर्वी प्लास्टिकच्या वजनाने हलक्या (५ मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या) पिशव्यांवर राज्यात बंदी घातली गेली. पण त्याचा म्हणावा तितका दृश्य परिणाम दिसला नाही. या पिशव्यांची निर्मिती, आयात वापर होतच राहिला. नियमांची कडक अंमलबजावणी का झाली नाही? अलीकडे मार्च २०१८ मध्ये प्लास्टिक पिशव्या, डिस्पोसेबल वस्तू, थर्मोकोल, सूक्ष्म प्लास्टिक यावर बंदी घालणारी नवी अधिसूचना जारी झाली आहे. आणि जूननंतर ती पूर्णत: लागू होणार असल्याचे सांगितले जात आहे. प्लॅस्टिकसमस्येवरच्या प्रत्येक प्रयत्नाचे स्वागत आहेच मात्र या अधिसूचनेत उल्लेख असलेल्या सर्व प्लास्टिक प्रकारांवर बंदी असावी वा नसावी किंवा एकंदर त्याबद्दल चर्चा करणे हा आपला इथे हेतू नाही.  त्यापलीकडे जावून पर्यावरण, आपले आरोग्य याचा विचार करणे अगत्याचे आहे.

गेल्या दहा वर्षांत प्लास्टिकचा आपल्या येथील वापर प्रचंड वाढला आहे, असे स्टॅटिस्टिक्स सांगते. प्लास्टिकशिवाय आपण पूर्वी जगत होतोच ना? जेथे शक्य आहे तेथे प्लॅस्टिकचा वापर कमी करत पर्यावरणपूरक पर्याय वापरणे, कचऱ्याचे वर्गीकरण करून प्लास्टिक रिसायकलिंगसाठी देणे हे कामही अत्यंत श्रद्धेने, मनापासून करण्याची गरज आहे. डोंबिवली, ठाणे, पुणे अशा आणि इतर शहरांत एनजीओंनी याबाबत घेतलेला पुढाकार व त्यास नागरिक देत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे उत्साहवर्धक आहे. पण प्लास्टिक कचरा विल्हेवाटीसाठी स्थानिक प्रशासनाने प्रत्येक गावात सुविधा उपलब्ध करणे, कचऱ्याचे वर्गीकरण नागरिकांनी केल्यावर तो एकत्र होवू न देता तो रिसायकलिंग साठी पाठवणे हे अत्यावश्यक आहे. यात प्लास्टिक उत्पादक, वितरक, दुकानदार, एनजीओस, नागरिक यांनीही सहभागी झाल्यास व्यापक यश मिळेलच्.

रिडय़ूस,रियुज, रिफ्यूज, रिसायकल, रिथिंक या पंचसूत्रीने आपण या समस्येसाठी मार्ग काढू शकतो.  असिमॉव्ह या शास्त्रज्ञाने आधुनिक जीवनावर केलेले भाष्य बरेच काही सांगून जाते. आजच्या काळातील सर्वात दु:खाची बाब म्हणजे विज्ञान वेगाने ज्ञान मिळवते. पण समाजाला येणाऱ्या शहाणपणाचा वेग मात्र त्याहून कमी असतो.. म्हणून गरजेचे आहे आता तरी भानावर येणे आणि प्लॅस्टिक समस्येवर तातडीने मार्ग काढणे.

symghar@yahoo.com 

chaturang@expressindia.com

First Published on April 14, 2018 12:21 am

Web Title: plastic issue plastic pollution environmental issue