परिस्थितीनं अल्पवयीन पूजाला स्वप्नातही विचार करू नये अशा संकटात लोटलं; पण स्वत:च्या धिटाईनं ती त्यातून बाहेर पडली. परिचारिकेचं शिक्षण घेऊन आज एका नामांकित रुग्णालयात काम करते आहे. आमिर खानबरोबर ‘सत्यमेव जयते’च्या व्यासपीठावर भाषण देणारी पूजा आज अनेकींचा आधार बनली आहे. बलात्कारित महिलांच्या आधारगटाला संघटित करणाऱ्या तसंच अत्याचारित महिलांना सर्वतोपरी मदत करणाऱ्या पूजा गायकवाड यांना आमचा मानाचा मुजरा!
पाच-सहा वर्षांपासूनच परिस्थितीचे चटके खात, वडिलांबरोबर गावोगाव फिरायला लागलेली, कधी उपाशीपोटी हॉटेलमध्ये धुणीभांडी करणारी, माणसांच्या विकृतीचा अगदी बालवयात अनुभव घेणारी ती दहा वर्षांची छोटीशी मुलगी, परिस्थितीमुळे पोहोचली कुंटणखान्यात, परंतु धाडसानं तिनं आपली सुटका करून घेतली नि ‘स्नेहालया’त पोहोचली. आज ती परिचारिका आहे. स्वत:ला मोठं करत तिनं आपल्यासारख्या अनेकींच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे. अनेकींची आधार बनलेली ती धाडसी मुलगी म्हणजे पूजा रतन गायकवाड.

नगर जिल्हय़ातील श्रीरामपूर इथल्या एका दलित कुटुंबात तिचा जन्म झाला. वंदना आणि रतन गायकवाड या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेली ही एकुलती एक मुलगी. पाच वर्षांची असताना श्रीरामपूरमध्ये पाण्याचा प्रश्न फारच बिकट झाला. त्यामुळे तिचं कुटुंब मनमाडला स्थलांतरित झालं. तिथं तर पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होता. तिथं तिचे वडील बस स्थानकातील हॉटेलवर कामासाठी जात. पूजाला बालवाडीत टाकलं गेलं. पाणी भरण्यावरून गल्लीमध्ये नेहमीच बाचाबाची, भांडणं व्हायची. असंच एके दिवशी पाणी भरण्यावरून तिच्या आईचं दोन बायकांबरोबर भांडण झालं. त्या दोघींनी पूजाच्या आईच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं. ९९ टक्के भाजलेली तिची आई ३-४ दिवसांतच मरण पावली. सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर तिच्या वडिलांनी मनमाड सोडण्याचा निर्णय घेतला नि मूळ गावी श्रीरामपूरला आले. एका हॉटेलमध्ये कामाला जाऊ लागले. दरम्यानच्या काळात पूजा शाळेत जाऊन लिहायला-वाचायला शिकली होती. नंतर काकांच्या सांगण्यावरून ते दोघेही उल्हासनगरला आले. तिचे बाबा गवंडी कामाला जाऊ लागले. त्यातच त्यांना दारूचं व्यसन जडलं.

मध्येच एका अपघातात त्यांचा पायही दुखावला. पूजा आणि तिच्या बाबांमुळे काका-काकूमध्ये भांडणं व्हायला लागली. एकदा ती इतकी वाढली की, दोघांनी तिथून निघायचं ठरवलं. तिच्या बाबांना चालताही येत नव्हतं. कित्येक दिवस ती दोघं पोटभर जेवलीही नव्हती. लहानगी पूजाच त्यांचा आधार बनली होती. परतीच्या तिकिटासाठी पैसे नव्हते. रेल्वे स्टेशनवर भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता. काहींनी पसे दिले, तर काहींनी थट्टा केली. भीक मागणाऱ्या मुलींना रस्त्यावर जे सहन करावं लागतं ते सर्व तिनं त्या दरम्यान अनुभवलं. ‘‘आज ते आठवायलाही नको वाटतं,’’ असं पूजा सांगते. भीक मागून ५०-६० रुपयेच जमा झाले. त्यातून तिनं वडिलांना पोटभर खाऊ घातलं. जेमतेम ३० रुपये शिल्लक राहिले. रेल्वेने ते कसेबसे श्रीरामपूरला त्यांच्या घरी आले. पायामुळे बाबांना काही काम करणं शक्य नव्हतं. तिचं वय अवघं १०. घर कसं चालवायचं? हा तिच्यासमोर मोठा प्रश्न होता. अशी परिस्थिती मुलांना प्रौढ, रूक्ष बनवते. पूजाचं बालपण तर केव्हाच संपलं होतं. तिचे बाबा ज्या हॉटेलमध्ये काम करायचे त्याच्या जवळच्या हॉटेलमध्ये ती भांडी धुण्याचं काम करू लागली. तिथं मिळणाऱ्या पोटभर जेवणाचंच तिला अप्रूप होतं. त्याबरोबरच तिनं भंगार गोळा करायलाही सुरुवात केली. ते विकून तिला थोडे फार पसे मिळायचे. सकाळी १० वाजता घरात बाहेर पडलेली पूजा संध्याकाळी ७ वाजता घरी परतायची. बाबांचं दुखणं वाढलं तसं भंगारातून मिळालेले पसे तसेच शेजारील काकूंकडून उसने पसे मिळवून ती बाबांना दवाखान्यात घेऊन गेली. त्यांच्यासाठी औषधं आणली.

तिच्या बाबांचा पाय आता बरा होऊ लागला होता. हॉटेलवाला देत असलेल्या डब्यात त्या दोघांचं रात्रीचं जेवण भागायचं. वडिलांच्या मित्राच्या भावाचं बाभळेश्वर इथं मोठं हॉटेल होतं. त्यांच्या सांगण्यावरून ती दोघंही कामासाठी बाभळेश्वरला गेले. तिचे बाबा आणि ती एकाच हॉटेलमध्ये काम करत होते. बाभळेश्वरमध्ये ते २ वष्रे राहिले. तिथं एक वाईट प्रसंग घडला. थंडीच्या दिवसांत वडिलांच्या कुशीत झोपलेल्या पूजाला पाहून हॉटेलच्या मालकाने बाबांवर भलतेच आरोप केले. बाबा मनाने खचलेच. या घटनेचा अधिक त्रास होऊ नये म्हणून पूजानं राहुरीला कामासाठी जाण्याचा निर्णय घेतला.

राहुरीला हॉटेलमध्ये काम करताना तिची रेखा नावाच्या बाईंशी ओळख झाली. नगर येथील नागापूरमधल्या चाळीत त्या दोघी भाडय़ानं राहू लागल्या. पूजा तिथल्याच सावेडी भागातील एस.टी.डी. बूथवर काम करायची. एक दिवस एक बाई शेवगाववरून रेखाला भेटायला आली. रेखाला म्हणाली, ‘‘तू अजून किती दिवस या पूजाला सांभाळणार आहेस? तिच्या भविष्याचा काही विचार केला आहेस की नाही? इथं खूप टुकार पोरं आहेत. तू तिला माझ्याकडे शेवगावला पाठव. तिथं ती माझ्या घरी एस.टी.डी. बूथवर काम करील. महिन्यातून कधी तरी तुला भेटायला येत जाईल. पुढं हिच्या लग्नाचं मीच बघेन.’’

सध्या पूजा नगरमध्येच स्वतंत्र खोली घेऊन राहते. सध्या तिच्यासोबत अन्य पाचजणी आहेत. त्यांनाही परिचारिकेचे शिक्षण घेण्यासाठी तिनं प्रवृत्तही केलं आणि मदतही केली. पूजाचा हा परिवार तिच्या सामाजिक जाणिवेची साक्ष देतो. एकटय़ा राहणाऱ्या अशा मुलींना अनेक मवाली, भामटे त्रास देतात. तेव्हा एरवी वरवर शांत वाटणारी पूजा मात्र प्रसंगी दुर्गेचं रूप धारण करून चार ठोसे लगावयालाही मागे-पुढे पाहत नाही. ती या मुलींची ढाल बनून उभी उभी आहे. ज्या दु:ख आणि वेदनांना आपण तोंड दिले, ते दुसऱ्या कुठल्याही मुलीच्या नशिबी येऊ नये हेच पूजाचे जीवनध्येय बनले आहे.

पूजाला त्या बाईबरोबर जावं लागलं. तिसऱ्या दिवशी त्या बाईने फिरण्याच्या बहाण्याने पूजाला शिवनगर या लालबत्ती भागात आणलं. तिथले कुंटणखाने पाहून पूजा थिजून गेली. त्या बाईच्या चेहऱ्यावरचे क्रूर भाव पूजाच्या काळजाचा ठोका चुकवून गेले. पूजाचे डोळे समोर काय वाढून ठेवलंय याची कल्पना येऊन पाझरू लागले. मागे परतायचे सर्व मार्ग बंद झाले होते. अखेर तिनं वास्तव स्वीकारलं..

पूजा तिथून पळून जाऊ नये म्हणून सतत तिच्यामागे मुलं उभी असायची. तिथं जे चाललं होतं, ते तिथल्या मुलींच्या मनाविरुद्ध होतं. ही परिस्थिती आणि अत्याचार कोणीच बदलू शकत नाही, अशी त्या सर्वाची खात्री होती. कारण माणसातील विकृतीचं, क्रूरतेचं आणि दांभिकतेचं जळजळीत वास्तव तिथं अनुभवायला मिळत होतं. पूजानं मात्र त्याही स्थितीत सुटकेची आशा जिवंत ठेवली होती.

एकदा कडक पहाऱ्यात सर्व मुलींना कपडे आणि सौंदर्य प्रसाधनांच्या खरेदीसाठी बाजारात नेलं होतं पूजानं संधी साधली आणि देवळात जाण्याच्या बहाण्यानं तिथून सटकली आणि एस.टी.डी. बूथवरून रेखाशी संपर्क साधला. तिला सर्व परिस्थिती सांगितली. पश्चात्ताप झालेल्या रेखानं ‘स्नेहालय’ संस्थेची मदत मागण्याचं ठरवलं.

‘स्नेहालय’चे कार्यकत्रे रेखाला ओळखायचे. एक १४-१५ वर्षांची अल्पवयीन मुलगी देहव्यापाराच्या दुष्टचक्रात अडकल्याचं लक्षात आल्यावर ‘स्नेहालय’च्या मुक्तिवाहिनी पथक आणि चाइल्डलाइनच्या टीमनं त्वरित कामाला सुरुवात केली. त्यांनी खूप पाठपुरावा केल्यावर शेवटी पोलीस कारवाईला तयार झाले. मध्यरात्री १ वाजता पोलीस व ‘स्नेहालय’च्या कार्यकर्त्यांनी अगदी नाटय़मयरीत्या तिची सुटका केली. या स्वयंसेवकांनी पूजाला ‘आता तू मुक्त आहेस’ असं सांगितलं. तिचा तिच्या सुटकेवर विश्वासच बसत नव्हता. ‘‘आमच्या गाडय़ा शेवगावबाहेर पडल्यावर लागलेल्या थंड हवेनं मला स्वातंत्र्याची जाणीव करून दिली,’’ असं पूजा सांगते.

या सगळ्या प्रवासानंतर पूजानं जीवनाबद्दल प्रथमच गांभीर्यानं विचार सुरू केला. नव्यानं आयुष्य सुरू करायचं ठरवलं. तिला स्वत:च्या पायावर उभं राहायचं होतंच. ‘स्नेहालय’नं तिला तिच्या आवडीनुसार परिचारिकेचं काम शिकवलं. रुग्ण साहाय्यक म्हणून ती आज एका नामांकित रुग्णालयात काम करते आहे. पुढे ‘स्नेहालय’ संस्थेतून बाहेर पडून तिनं मत्रिणींसोबत रुग्णालयाच्या शेजारीच राहायला सुरुवात केली. स्नेहालयातून बाहेर पडणाऱ्या मुलींना मानसिक बळ देणं, रोजगाराच्या संधी शोधून देणं, त्यांना धोक्यात वेळीच सावरणं, विचार करण्याची योग्य पद्धत शिकवणं, ही कामं आता पूजा स्वेच्छेनं करते आहे. हा स्नेहालयाच्या कामाचा तिच्यावर झालेला परिणाम आहे. स्नेहालयानं तिला जेवढय़ा प्रमाणात मदत केली, तशीच मदत समाजातील इतरांना करणं आता तिला तिचं कर्तव्य आणि जीवनध्येय असल्याचं वाटतं.

‘प्रज्वला’ संस्थेनं २०११ मध्ये हैदराबाद इथं देशातील देहव्यापारातून बचावलेल्या बळी मुलींचं पहिलं राष्ट्रीय संमेलन आयोजित केलं होतं. ‘स्नेहालय’नं पूजाची कहाणी ‘प्रज्वला’ संस्थेच्या डॉ. सुनीता कृष्णन यांना कळवली. या संमेलनाची उद्घाटक म्हणून दीपप्रज्वलनाचा प्रथम मान पूजाला मिळाला होता. मोडक्यातोडक्या िहदीमध्ये तिनं आपलं अनुभवकथन केलं. त्यामुळे भारावलेल्या सभागृहानं उभं राहून तिला अभिवादन केल्याची आठवण पूजा आवर्जून सांगते.

२६ जानेवारी २०१३ रोजी अभिनेते आमिर खान स्नेहालयात आले होते. ‘सत्यमेव जयते’च्या डी.व्ही.डी. संचाचा उद्घाटन सोहळा स्नेहालयात झाला. तेव्हा आमिर खाननं पूजाच्या धडाडीचं आवर्जून कौतुक केलं. १ मे २०१३ रोजी ‘सत्यमेव जयते’च्या पहिल्या वर्धापन दिनी ‘अनतिक मानवी वाहतूक’ या संदर्भात राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या वेळी पूजाला आमिर खानसोबत व्यासपीठावर बसता आलं. तिचं भाषण त्यांनी ऐकलं होतं, याचंही तिला अप्रूप आहे.
सध्या पूजा बलात्कारित महिलांच्या आधारगटाला संघटित करण्याचं तसंच अत्याचारित महिलांना कायदेशीर मदत देण्याचं काम ‘स्नेहाधार’मार्फत करते. तिचं जीवनध्येय आता तिला सापडलं आहे.. तिचं आवडतं तत्त्वज्ञान तिच्या जगण्याचा भाग झालं आहे,.. ‘ज्यांच्या मनातील आशा आणि स्वप्न जिवंत राहतात, त्यांना मुक्ती आणि परिवर्तन अशक्य नसतं.’
(संपर्क स्नेहालय- ०२४१-२७७८३५३)
chaturang@expressindia.com
=====