अलीकडेच कर्करोगावरची कविता वाचली. कुणाची आहे माहीत नाही. पण उद्याच्या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ज्या चार जणींशी बोलले त्यांच्या जिद्दीची, त्यांच्या विजिगीषु वृत्तीची ती प्रतीक वाटली. कविता अशी आहे –

I l m Cancer Survivor

Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
Gold Silver Price
Gold-Silver Price on 9 April 2024: गुढी पाडव्याच्या दिवशी सोनं महागलं; चांदीच्या दरातही वाढ, पाहा आजचा भाव
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू

I Walk,

Because l lm a cancer survivor.

I run to give someone else

The love and strength and hope

that was given to me

I walk,

For all the mothers and daughters

Aunts and grandmothers

Sisters and friends

Whose lives have been

touched by cancer

And whose hearts mourn the loss

Of someone dear

I walk,

Because I want to be the inspiration

I run because I believe

I BELIEVE IN CURE!

या सगळ्याच जणींनी क्युअर अर्थात रोगमुक्तीवरच विश्वास ठेवला आणि म्हणूनच आज त्या त्यांची सेकंड इनिंग जोरदारपणे खेळत आहेत. त्यांची वयं वेगवेगळी आहेत. त्यांनी जे भोगलं त्याच्या कहाण्या वेगवेगळ्या आहेत. पण त्यांच्यात एक धागा समान आहे आणि तो म्हणजे त्यांनी कर्करोगासमोर हार मानली नाही. त्या लढल्या. त्यांनी आलेलं प्राक्तन स्थिर बुद्धीने स्वीकारलं आणि ते हलाहल हसत हसत पचवलंही!

मानसी राघव कुलकर्णी ही त्यातली वयाने सगळ्यात लहान. ती अवघी दहावीत असताना, त्या फुलपाखरासारखं भिरभिरण्याच्या वयात तिला ल्युकेमिया वा रक्ताचा कर्करोग झाला. ती म्हणाली, ‘‘मला आलेल्या साध्या तापाचं निमित्त झालं आणि नंतर असंख्य तपासण्यांनंतर त्याचं निदान झालं की ल्युकेमिया.. रक्ताचा कर्करोग. मला आई-बाबांनी आधी सांगितलं नव्हतं. पण तो रिपोर्ट मी वाचला. क्षणभर सुन्न झाले. अनेक संमिश्र भावना उमटल्या. पण दुसऱ्या क्षणी विचार आला की मला तर हे माहीत नव्हतं. पण हे माहीत असूनही ते मला कळू नये म्हणून चेहऱ्यावर हास्य ठेवून मला हसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्या आई-बाबांसाठी तरी मला सावरायला हवं. जे आहे ते जसंच्या तसं स्वीकारायला हवं. दुसऱ्या दिवशी मी माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉ. बक्षींशी बोलले. त्यांनी मला नीट समजावून सांगितलं. मी त्यांना पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलं. मग सुरू झाले ते जीवघेणे उपचार! पण मला खरोखरच माझे आई-बाबा, माझा दादा, माझे मित्र-मैत्रिणी, डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटलचा स्टाफ यांनी इतकं सांभाळून घेतलं, आधार दिला की तो काळ पटापट सरला. विशेषत: केमोनंतर ब्लड काऊंट खूप कमी होतात. मग चिडचिड वाढते. पण माझ्या घरचे, माझ्या मैत्रिणी वगैरे माझी एवढी काळजी घ्यायच्या की मला चिडूच द्यायच्या नाहीत. या काळात माझा ‘सेल्फ टॉक’ सतत चालू असायचा, की अजून किती काळ? मग मीच मला समजावयाची, ‘बस. आता हे थोडंसंच राहिलं.’ त्या काळात मला रोगसंसर्गाच्या भीतीने बाहेर जाता यायचं नाही. पण मग माझे छंद माझ्या मदतीला आले. मला वाचनाचा जबरदस्त छंद आहे. मी खूप वाचायची. गाणी ऐकायची. मला लिहायला आवडतं. त्यामुळे मी लिहीत गेले. त्याचंच मग पुस्तक झालं. ‘आकाश कवेत घेताना.’ कर्करोग  म्हटल्यावर माणूस आधीच मनाने खचून जातो. शरीराच्या वेदना वा शरीराला होणाऱ्या यातना नंतरच्या. आधी मनावरच तो जास्त आघात करतो. पण ‘हे मला का, माझ्याच वाटय़ाला हे का आलं असले त्रासदायक व ज्यांना काही अर्थ वा उत्तर नाही असे प्रश्न मनातून काढून टाकले तर या रोगाशी दोन हात करण्याचं धैर्य आपोआप येतं. मी त्यातून बरी झाले.’

मात्र कर्करोग पूर्ण बरा झाला तरी त्याने मानसीच्या शरीरावर केलेले आघात कायम होते. ती बारावीत असताना साधं पडल्याचं निमित्त झालं आणि तिचा पाय फ्रॅक्चर झाला. ती म्हणाली, ‘‘स्टेराईडस व औषधांच्या माऱ्याने माझी हाडं इतकी ठिसूळ झाली होती की साधं पडल्यानेसुद्धा त्यांचा अक्षरश: भुगा झाला. तब्बल सहा महिने माझा पाय प्लॅस्टरमध्ये होता. मला कधी चालता येईल की नाही याचीच शंका वाटत होती. कारण प्लॅस्टर काढल्यानंतरसुद्धा चार महिने मला धड चालता येत नव्हतं. शेवटी एक दिवस मला इतका कंटाळा आला की मी उठले. वॉकर वगैरे सगळं उचलून फेकून दिलं. बेडवरून उठले आणि उभी राहिले. दोन पावलं महाप्रयासाने टाकली. पण ती दोन पावलं मला टाकता आली तेव्हा मला झालेला आनंद शब्दातीत आहे.’’

या सगळ्या शारीर यातना सोसत असतानाच मानसीने दहावीत ८५ टक्के तर बारावी आर्ट्सला ७४ टक्के गुणही मिळवले व आज ती लंडनच्या सिटी युनिव्हर्सिटीमध्ये ‘हेल्थ सायकॉलॉजी’ या विषयात एम.एस्सी. करते आहे. ती म्हणाली, ‘‘मला सायकॉलॉजी याच विषयात करिअर करायचं होतं. या आजाराने तो निर्धार पक्का झाला. कारण मी जशी बरी झाले तसे तिथले डॉक्टर्स व नर्सेस मी इतर कर्करोगग्रस्तांना समुपदेशन करावं म्हणून माझ्याकडे आशेने बघायला लागले. मला ते नवीन होतं. पण जमलं. असे भयानक आजार जेव्हा कुणाला होतात तेव्हा मानसिक आरोग्य फार महत्त्वाचं ठरतं. आता एम.एस्सी.नंतर याच विषयात डॉक्टरेट करून मग पुढे भारतात येऊन इथल्या कर्करोगग्रस्तांसाठी हॉस्पिटल काढायला आवडेल. दुसरं म्हणजे आपल्या देशात इंग्लंडसारखी काही सशक्त अशी आरोग्य धोरणं असणं गरजेचं आहे. इथे लंडनमध्ये ते बघताना मला ते फार प्रकर्षांने जाणवतं. त्याही दिशेने काम करायला मला आवडेल.’’

मानसीला तिच्या ‘आकाश कवेत घेताना’ या पुस्तकासाठी असंख्य पुरस्कार मिळालेत. त्याच्या २ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत आणि त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून तिने आत्तापर्यंत १४ गरीब कर्करोगग्रस्तांना आर्थिक मदतही केलीय. या सगळ्या उपचारांच्या दरम्यान ती ज्यांना आदर्श मानते असे कविवर्य मंगेश पाडगावकर तिच्या घरी तिला भेटायला आले. त्यांनी तिच्या पुस्तकाला तर प्रस्तावनारूपी आशीर्वाद दिलेच, पण तिला खूप धीरही दिला. ‘‘तो मला सकारात्मकता देणारा सगळ्यात मोठा क्षण होता’’ असं ती कृतज्ञतेने सांगते.

शिक्षणतज्ज्ञ विमला नंदकुमार यांची सेकंड इनिंग अशीच जबरदस्त आहे. त्या आज ६३ वर्षांच्या आहेत. पण त्यांच्याकडे, त्यांच्या उत्साहाकडे बघून त्यांनी कर्करोगच नव्हे तर शस्त्रक्रियांची हॅट्ट्रिक सहन केलीय यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. त्या सांगत होत्या, ‘‘२००९ मध्ये म्हणजे माझा मेनापॉज झाल्यानंतरही एकदा मला रक्तस्राव झाला. एकच दिवस. त्यामुळे मला त्यात काही विशेष वाटलं नाही. त्यानंतर अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या आर्य क्रीडा मंदिरमध्ये मी २०१० मध्ये प्राचार्य पदावर रुजू झाले. तिथल्या नियमानुसार वैद्यकीय चाचण्या करताना असं लक्षात आलं की माझ्या गर्भाशयात गाठ आहे. मग पहिली शस्त्रक्रिया झाली आणि माझं गर्भाशय काढून टाकण्यात आलं. त्या गाठीच्या बायोप्सीमध्ये लक्षात आलं की ती गाठ कर्करोगाची होती. ही ऑक्टोबर २०१० ची गोष्ट आहे. मात्र ते कळल्यावर मला खरंच तसं काहीच नाही वाटलं. माझ्या मनाची शांती अजिबात ढळली नाही. हेही देवाचे उपकारच म्हटले पाहिजेत. मी डॉक्टरांना विचारलं की आता पुढे?

डॉक्टर म्हणाल्या की, ‘‘पुन्हा एक शस्त्रक्रिया करावी लागेल.’’ मला भटकायला खूप आवडतं. त्यामुळे मी व माझ्या कुटुंबीयांनी ठरवलं की पुन्हा शस्त्रक्रिया करायचीच असेल तर त्याआधी भटकून येऊ या. त्याप्रमाणे आम्ही स्पेन व दुबईला भटकून आलो. आल्यावर प्रसिद्ध ऑन्कॉलाजिस्ट डॉ. टोणगावकर यांच्याकडे गेले. ते म्हणाले, ‘‘या कर्करोगाचा उगम गर्भाशयातच आहे की तो आणखी कुठून तिथे आला आहे हे समजण्यासाठी आणखी एक शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. ही पहिल्यापेक्षाही जास्त भयानक होती. त्यांनी या शस्त्रक्रियेच्या दरम्यान माझ्या पोटातील नव्‍‌र्हज विजेचे  शॉक देऊन बधिर केल्या होत्या. त्यामुळे हे ऑपरेशन पार पडल्यानंतरही माझा डावा पाय कामच करेना. मात्र या शस्त्रक्रियेत जो लिम्फ नोड काढला गेला त्याची टेस्ट निगेटिव्ह आल्याने तोच जरा काय तो दिलासा होता. कर्करोगापासून मला पूर्ण सुटका मिळाली होती. मनोधैर्य टिकवण्याचं सगळ्यात मोठं आव्हान होतं ते याच काळात. पण व्यायाम, रोज पोहणं हे सगळं करत करत मी सहा महिन्यांत बरीचशी पूर्व पदावर आले. पाय तितकासा ठीक नव्हता. पण चालता यायला लागलं होतं. मग आम्ही ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडलाही भटकून आलो. त्यामुळे माझा पूर्वीचा उत्साहही परत आला.

मात्र या दोन शस्त्रक्रियांनंतर माझ्या पोटात सतत दुखत असे. त्याचं निदान झालं हर्निया. त्यामुळे मला पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं. पण मी माझ्या स्वभावानुसार तेही सहज घेतलं. जरा विश्रांती व सुधारणा झाल्यावर आम्ही कंबोडीयाला फिरून आलो. कंबरेला पट्टा लावून मी सगळी मंदिरं बघितली. मात्र एक नक्की. या सगळ्या काळात मला एकदाही ‘मलाच हे का?’ हा प्रश्न पडला नाही. कारण या प्रश्नामागे फारच स्वार्थी विचार आहे, असं मला वाटतं. सगळे आनंदात आहेत व मीच यातना भोगतेय याची असूया त्यातून डोकावते असं मला वाटतं. त्यामुळे तो विचार खरोखरच माझ्या मनात आला नाही. माझ्या आयुष्याची पहिली इनिंग फार छान पार पडली होती. त्यानंतर हे जीवघेणं वादळ माझ्या आयुष्यात आलं. त्याचा माझ्या शरीरावर विपरीत परिणाम झाला. पण माझं मन, माझा उत्साह तसाच कायम होता. आता या सेकंड इनिंगमध्ये समाजासाठी काही तरी परत करायची इच्छा तीव्र होऊ लागली. त्यातूनच मी ‘शक्ती’ ही स्वयंसेवी संस्था काढली. समाजातला जो ‘नाही रे’ हा वर्ग आहे, त्या वर्गातल्या मुलींसाठी आम्ही या ‘शक्ती’तर्फे ‘आफ्टर स्कूल प्रोग्राम’ चालवतो. नोकरी करताना आपले हात बांधलेले असतात. आता मी स्वतंत्र आहे. त्यामुळे या मुलींच्या सर्वागीण विकासासाठी मीच अभ्यासक्रम तयार केलाय. आम्ही विविध उपक्रम राबवतो. ‘हावरे बिल्डर्स’च्या उज्ज्वला हावरे यांनी त्यासाठी खारघरमध्ये जागा दिलीय. तीही आता कमी पडायला लागलीय इतका मुलींचा प्रतिसाद उत्तम आहे.

मला एकच वाटतं, आता  कर्करोग असाध्य राहिलेला नाही. अगदी तिसऱ्या व चौथ्या स्टेजचे लोकही बरे होतायत. फक्त सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. भूतकाळाबद्दल खंत नाही, वर्तमानकाळ सतत बदलत असतो. त्यामुळे भविष्यासाठी काही तरी अत्यंत आकर्षक अशी योजना करून त्यात मन गुंतवलं तर यातून नक्की बाहेर पडता येतं.’’ विमला नंदकुमार यांनी ही खूणगाठ मनाशी बांधली म्हणून त्या त्यातून बाहेर येऊ शकल्या.

तशाच संध्याताई तांबट. मूळच्या डोंबिवलीच्या असणाऱ्या, आयुर्विमा महामंडळात काम करणाऱ्या संध्याताई तांबट त्याबद्दल सांगतात की त्यांचे कुटुंबीय, त्यांचे सहकारी, अधिकारी व संपूर्ण एलआयसी परिवार हा खंबीरपणे उभा राहिला म्हणून यातून बाहेर पडणं कमी वेदनादायी झालं. त्या म्हणाल्या, ‘‘माझ्या छातीत गाठ लागली. मी त्यासाठी जी एफएनएसी ही टेस्ट असते ती केली. पण दुसऱ्या दिवशी लॅबकडून रिपोर्ट मिळेना. तेव्हाच मनात पाल चुकचुकली. मग माझ्या जिवलग मैत्रिणीने तिथे फोन केला. तिला त्यांनी साधारण कल्पना दिली. ते ऐकून माझ्या मैत्रिणी कासावीस झाल्या. सगळ्या माझ्या टेबलाशी जमून मला धीर द्यायला लागल्या. शेवटी मीच विचारलं की ती पॉझिटिव्ह आलीय का? मला त्याचं होकारार्थी उत्तर देताना माझ्या मैत्रिणींच्याच डोळ्यात पाणी आलं. पण मी विचार केला की मी जर आत्ता कोसळले तर मी यातून उभी नाही राहू शकणार. जे माझ्या वाटय़ाला आलंय त्याचा मुकाबला तर मला करावाच लागणार. त्यामुळे मी फार काही विचारच केला नाही. डॉ. संजय शर्मा हे त्यातले उत्कृष्ट डॉक्टर आहेत असं मला कळलं. मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला. अर्थात इच्छा असूनही माझे स्तन वाचवू नाही शकले. कारण तोपर्यंत कर्करोग दुसऱ्या पायरीवर पोहोचला होता. पसरला होता. शेवटी मी ते स्वीकारलं. मंगळवारी रिपोर्ट आले आणि शुक्रवारी माझी शस्त्रक्रियाही झाली होती. ही शस्त्रक्रिया किरकोळ होती. केमोचा थोडा त्रास झाला, पण स्तन काढूनच टाकल्याने रेडीएशन घ्यावं लागलं नाही. हा माझा मोठ्ठा फायदा झाला. मात्र या सगळ्या काळात ईश्वर पावला पावलावर मला भेटला. तो माझे कुटुंबीय, सहकारी, वरिष्ठ अगदी माझ्या घरातल्या स्वयंपाकीण बाई, मैत्रिणी या सगळ्यांच्या रूपात. केमोनंतर खायची इच्छा मरते. त्या काळात माझ्या स्वयंपाकीण बाईंनी हे खाऊन बघा, ते खाऊन बघा म्हणून इतके पदार्थ करून घातले.. तसंच मला डॉक्टरांनी लगेच कामावर रुजू व्हायला आणि मी जितकं काम करेन तितकी लवकर बरी होईन, असं सांगितलं होतं. त्यामुळे मी गुरुवारी केमो झाली की सोमवारी हजार व्हायची. ‘माझी कामं ठेवून द्या’ असं मी सांगितलेलं असायचं. त्यामुळे टेबलवर खूप काम असायचं. तेही माझ्या वरिष्ठांनी मला आवडेल असं दिलेलं असायचं. त्यामुळे त्यात माझा वेळ छान जायचा. या सगळ्यांच्या रूपात तो ईश्वरच मला आधार देत होता.’’

‘‘त्यामुळे यातून बाहेर आल्यावर मी देवाची पूजा, अभिषेक करणं सगळं थांबवलं व ज्या रूपात तो मला भेटला त्याच मानवी रूपातल्या ईश्वराची पूजा बांधायला सुरुवात केली,’’ त्या सांगतात होत्या, ‘‘मुंबईत बाहेर गावाहून जे कर्करोगग्रस्त येतात त्यांना राहायला जागा नसते, पैसे नसतात. कर्करोगग्रस्तांची सर्वात भीषण परिस्थिती पाहायची असेल तर मुंबईत दादर पश्चिमेला जी गाडगे महाराज धर्मशाळा आहे तिथे जाऊन पाहावं. मी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या माझ्या सहकाऱ्यांबरोबर तिथे जाऊन त्यांची सेवा करायला सुरुवात केली. पण त्याचाही पुढे पुढे मला खूप त्रास व्हायला लागला. ते दु:ख सहन नाही होत. सध्या ते काम थांबवलंय पण जमेल तशी आर्थिक मदत करते आणि कर्करोगग्रस्तांचं समुपदेशन करते. एक मात्र झालं, या रोगामुळे माझा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय.’’

कर्करोग  झाला म्हटल्यावर माणूस मनाने आधी खचतो. पण ते मनच हार मानायला तयार नसेल, विजिगीषु वृत्तीचं असेल तर तुम्ही काळालाही परतवू शकता. नाशिकच्या वंदना अत्रे या त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांना एकदा नव्हे तर तब्बल तीनदा कर्करोग  झाला. पण त्या त्यावर मात करून ठाम उभ्या आहेत एवढंच नव्हे तर या तीन अनुभवांतून त्यांना जे शिक्षण मिळालं ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या आता कार्यशाळा घेतायत.

त्या म्हणाल्या, ‘‘मला  कर्करोग  पहिल्यांदा झाला तो २००८ मध्ये. तेव्हा माझं पोट ९ महिन्यांच्या गर्भवतीसारखं फुगलं होतं. निदान झालं की मला बीजांड कोशाचा म्हणजे ओव्हरीजचा कर्करोग आहे. तो तोपर्यंत चौथ्या टप्प्यावर जाऊन पोहोचला होता. जेव्हा त्याची शस्त्रक्रिया झाली तेव्हा लक्षात आलं की तो ओव्हरीजचा नाही तर फॅलोपियन टय़ूबचा कर्करोग  आहे. हा एक अत्यंत दुर्मीळ स्वरूपाचा कर्करोग. तेव्हा म्हणजे २००८ मध्ये जगभरात त्याचे फक्त १७ हजार रुग्ण होते. त्यातली मी एक. तेव्हा फार्मसीच्या दुसऱ्या वर्षांला असलेल्या माझ्या मोठय़ा मुलाने, सागरने धीर दिला आणि मी निर्धास्तपणे केमोसाठी हात पुढे केला. पण पहिल्याच केमोत लक्षात आलं की हे साधं सोपं प्रकरण नाही. पण त्या काळात क्रीडा जगताचे लाडके भीष्मराज बाम यांनी मला खूप शिकवलं. त्यांचं एक लॉजिक मला पटलं. ते म्हणायचे की, ‘माणसं एक तर भूतकाळात रमतात किंवा अडकतात किंवा भविष्यकाळाची चिंता करत बसतात. पण जी जी आव्हानं, संकटं येतात ती वर्तमानकाळातच येत असतात. त्यामुळे वर्तमानात राहायला हवं.’ त्यांनीच मला मनाची शक्ती वाढवण्यासाठी प्राणायाम शिकवला. मी आपल्याकडे जी व्हिज्युअलायझेशनची उपासना आहे ती करायची. म्हणजे मला जे व्हायला हवं आहे ते घडलंय असं समजून त्याचं चिंतन करायची. त्यामुळे सकारात्मकता तर वाढतेच. पण हा तापदायक कालखंड अल्पकालीन आहे, लवकरच संपणार आहे हा विश्वास निर्माण होतो. तसंच कर्करोग हा एकटय़ाने सामोरं जायचा विषयच नाही. त्यासाठी तुमचे कुटुंबीय, मित्र परिवार, डॉक्टर, नर्सेस अशी मोठ्ठी टीम लागते. माझी ही जी टीम होती ती फारच ठाम, कणखर होती. त्यांनी मला उगाच काळजीने पांगळं केलं नाही. मी म्हणायची की माझी मला एकटीला केमो घ्यायला, रेडीएशन घ्यायला जाऊ द्या. माझं मला सगळं करू द्या. ते स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. मी माझा लॅपटॉप घेऊन जायची. त्यामुळे या काळात माझी तब्बल १० पुस्तकं झाली. त्यातलच एक ‘आशेचा अंकुर’ हे कर्करोगातून बाहेर पडलेल्यांच्या धैर्याच्या कथा सांगणारं आहे.’’ मात्र हा प्रवास त्यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. त्यात खचून जाण्याचे अनेक प्रसंग आले.

त्या सांगत होत्या, ‘‘मी प्राणायाम, योगासने, व्यायाम वगैरे सगळं करत असतानाही २०१४ मध्ये मला दुसरा कर्करोग  झाला तो मोठय़ा आतडय़ाचा. तो मला समजलाच नाही. वजन कमी होत गेलं मग भीषण बद्धकोष्ठ झालं आणि त्यानंतर रक्ताचे जुलाब झाले. मग मी घाबरले. निदान झालं पुन्हा कर्करोगच. मग मात्र मी खचले, की एवढं सगळं मी करतेय तरी पुन्हा का? पण तरीही स्वत:ला समजावून मी मला त्यातून बाहेर काढलं. माझ्या नशिबाने तो ‘लोकल’ निघाला. पण ती जागा अवघड होती. त्यामुळे तेही ऑपरेशन महत्वाचच होतं. मग पुन्हा केमो -रेडीएशन.. आता पुन्हा केस जाणार. मग मीच माझं डोकं पूर्णपणे भादरून घेतलं. त्यातून बाहेर आले तर २०१७ मध्ये स्तनाचा कर्करोग  झाला. अगदी गव्हाएवढी गाठ होती. मग त्याचं ऑपरेशन. पुन्हा केमो रेडीएशन.

आता मी त्यातून पूर्णपणे बाहेर पडलेय. खचण्याच्या वेळा अनेकदा आल्या. पण माझ्या लेखनाने मला सावरलं. मी संगीत शिकले आहे. त्याने सावरलं. आता या अनुभवातून इतरांना उभं करण्यासाठी मी दोन दिवसांची ‘ कर्करोग  जीवनशैली कार्यशाळा’ सुरू केली आहे. त्यात किमान १५ रुग्णांना आम्ही घेतो. सगळे तज्ज्ञ माझ्याबरोबर विविध सत्रे घेतात. त्याचा चांगला परिणाम होताना दिसतो आहे. त्यामुळे आता मला हेच काम करत राहायचंय. कर्करोगाला घाबरून कुणी पळ काढू नये, हात पाय गाळू नये ही इच्छा त्यामागे आहे!’’

या चौघींचे हे अनुभव ऐकताना नवल वाटत होतं आणि या सगळ्यांना सलाम ठोकावासा वाटत होता, त्यांच्या धाडसासाठी आणि मुख्य म्हणजे वेदनेवर मात करत त्यातून निर्माण केलेल्या कार्यासाठी!

– जयश्री देसाई

jayashreedesaii@gmail.com

chaturang@expressindia.com