घराशी निगडित असलेल्या सर्व बाबींप्रमाणे रांगोळीही स्त्रीच्या हाती सुरक्षित राहिली आहे, इतकी की तिचा हात आणि जमीन यांच्यामध्ये कुंचला किंवा तत्सम कोणताही अडसर नसतो. असतो तो निखळ हस्तस्पर्श आणि या सर्व निर्मितीच्या क्षणभंगुरतेचा विनाअट स्वीकार! जीवनाच्या नश्वरतेचे प्रतीकच जणू..

रंगावली म्हणजे रंगांची ‘आवली’, किंवा ओळ. मानवसंस्कृती स्थिरावल्यावर अचपळ बुद्धीला कलेचे पंख फुटू लागले. तेव्हा हाताशी होती जमीन, मोठय़ा आवडीने उभ्या केलेल्या घरकुलाभोवतीची. तेव्हा तोच झाला त्या रंगरेषेसाठीचा पहिलावहिला पट. मानसिक उत्क्रांतीची ही पहिली खूण भारतभरामध्ये सर्वत्र दिसून येते आणि भारतीय संस्कृतीचं ‘अनेकत्वातून एकत्व’ हे वैशिष्टय़ अधोरेखित करते. महाराष्ट्रातली ‘रांगोळी’  गुजराथेत ‘साथिया’ राजस्थान आणि मध्य प्रदेशात होते ‘मांडणा’, उत्तर प्रदेशात ‘चौकपूर्णा’, बिहारमध्ये ‘अरिपना’,  बंगालमध्ये ‘अल्पना’ तर ओरिसामध्ये ‘ओसा’ किंवा ‘झुंटी’. द्रविडबहुल दक्षिण भारतातही रांगोळीची नावे प्रांतवार बदलतात. तामीळनाडूमध्ये ‘कोलम’, आंध्रात ‘मुग्गुलू’, कर्नाटकात ‘रंगावली’ आणि केरळमध्ये ‘पूविडल’ किंवा ‘पूकोलम’. इतकी विविध नावे असूनही ‘रंगोली’ हाच उल्लेख कोणत्याही झटपट भूसजावटीसाठी केला जातो. इतक्या प्रचंड विविधतेच्या सुसूत्रीकरणासाठी वर्गवारी करण्याआधी त्यामागील सामान्य, एकात्म सूत्राचा शोध घेणे अधिक उचित ठरेल.

मुख्यत: पावित्र्याचे प्रतीक असलेली रांगोळी म्हणजे परमेश्वराला केलेले आवाहन आणि अर्पिलेले पवित्र आसन होय. एखाद्या व्रताची सुरुवात जशी ईश्वर आवाहनाने होते तशीच वास्तूच्या शुद्धीकरणानेही होते. तसेच अमंगळाला दूर ठेवण्यासाठी रक्षकांची स्थापना करणे हे सर्व रांगोळीच्या माध्यमातून केले जाते. मूलत: ग्रामीण संस्कृतीमध्ये उगम पावलेल्या रांगोळीचे कृषी आणि जानपद परंपरा यांच्याशी अभिन्न नाते आहे. घराशी निगडित असलेल्या सर्व बाबींप्रमाणे रांगोळीही स्त्रीच्या हाती सुरक्षित राहिली आहे, इतकी की तिचा हात आणि जमीन यांच्यामध्ये कुंचला किंवा तत्सम कोणताही अडसर नसतो. असतो तो निखळ हस्तस्पर्श आणि त्यातून झरणारा तिचा भाबडा भाव आणि तिचा कल्पनाविष्कार आणि या सर्व निर्मितीच्या क्षणभंगुरतेचा विनाअट स्वीकार! दिवसभर असंख्य पावलांनी विस्कटलेली नक्षी उद्या पुन्हा नव्या हुरूपाने रेखण्याचा दुर्दम्य उत्साह! अशी ही रांगोळी जीवनाच्या नश्वरतेचे प्रतीकच जणू.

म्हणूनच रांगोळीचे प्रथम स्थान म्हणजे घराचे प्रवेशद्वार असते. सणासुदीला आजूबाजूच्या मोक्याच्या ठिकाणी हे सुशोभन होते. देवाच्या आसनाभोवती, स्वयंपाकघरात, ओटीवर तसेच अंगणात, तुळशीवृंदावनाभोवती रांगोळी रेखली जाते. देवळांमध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्यालयामध्ये रांगोळी काढलेली असतेच. रांगोळीच्या उगमाबद्दल विचार करता सहज सुचते ते म्हणजे धूळ किंवा तत्सम पूड पसरून त्यामध्ये बोटांनी चित्र/ नक्षी काढणे ही रांगोळीची पहिली नैसर्गिक पायरी असावी. जसे- महाराष्ट्रातील ‘धूळपाटी’. १६२३ मध्ये इटालियन प्रवासी पिएट्रो डेलाव्हाल याच्या दक्षिण भारत भ्रमणादरम्यानच्या नोंदीमध्ये अशा तऱ्हेने जमिनीवर धूळ पसरून त्यावर लिहून अक्षरे शिकविण्याची पद्धत शाळांमध्ये सर्रास वापरली जात असल्याचा उल्लेख आहे. ही परंपरा अगदी नजीकच्या भूतकाळापपर्यंत चालत आलेली दिसते. अशी नोंद नीळकंठ शास्त्री यांच्या ‘अ हिस्ट्री ऑफ साउथ इंडिया’ या पुस्तकात आढळते.

जमीन शृंगारल्यानंतर जेव्हा भिंती किंवा स्तंभ शृंगारण्याची वेळ आली, तेव्हा मात्र या सरकत्या माध्यमांसाठी थोडा बदल करणे प्राप्त ठरले, पुडीमध्ये पाणी घालून लेपनाच्या नक्षीचा पर्याय निवडला गेला. हे सर्व पाहता रांगोळी हीच सर्व कलांची सुरुवात होती हा तर्क बहुतांशी योग्य ठरतो. भारतीय लोककलांसंबंधीच्या लिखाणांमध्ये सर्वत्र या दोन्ही नक्षींचा उल्लेख ‘रांगोळी’ किंवा ‘रंगावली’ असाच पुरेशा बोलक्या संज्ञांमध्ये केलेला दिसतो.

तरीही ‘भूचित्रे’ आणि ‘भित्तिचित्रे’ यांमधील मुख्य फरक म्हणजे पहिले ‘क्षणिक’ तर दुसरे ‘टिकाऊ’. भूचित्रांमध्येही ‘रसचित्र’ म्हणजे ओल्या लेपाने काढलेले चित्र अणि ‘धूलचित्र’ म्हणजे भुकटीने काढलेले चित्र, यांमध्ये टिकाऊपणाचा फरक असणे अध्याहृत आहेच, परंतु दोन्हींच्या साधनांमधील फरकही गृहीत आहे.

भूचित्रे विशेषकरून प्रतीकांची असतात. तर भित्तिचित्रांमध्ये प्राणी-पक्षी-वनस्पती-मानव अशा सर्व रूपांत निसर्ग दिसतो. याचे ठळक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील वारली चित्र, ज्यांमध्ये त्रिकोणांपासून भिंतीवरील मानवचित्रण तर ‘भोवरा’ नामक वर्तुळाकृतींमधून जमिनीवरील रंगावली चित्रे दिसून येतात. अशाच तऱ्हेने राजस्थानातही भित्तिचित्रांमध्ये वाघ-मोर आदी प्राणी-पक्षी  तसेच भगवंताची विविध रूपे असतात तर भूचित्रांमध्ये सर्वच प्रतीकात्मक असते. एकूण भूचित्रे आणि भित्तिचित्रे यांच्यामध्ये माध्यम, तंत्र, टिकाऊपणा आणि चित्रविषय या सर्वामध्येच स्पष्ट फरक असतो.

प्रगत होताना आदिमानवाला जसा अनेकानेक नवीन साधनांचा शोध लागू लागला तशी स्वनिर्मित साधनांवर स्वत:ची मोहोर उमटविण्याची निकडही तीव्रपणे भासू लागली. आजूबाजूच्या निसर्गातून त्याने स्वत:च्या आवडीच्या गोष्टी निवडल्या व आपल्या आयुधांवर चित्रित केल्या. या सर्व चित्रांमधून ठळकपणे समोर येते ती मानवाची जिगिषा त्या सर्वशक्तिमान पंचमहाभूतांवर अंतिम विजय मिळवून मृत्यूच्या अटळतेला नाकारत अमरत्वाचा मार्ग शोधण्याची त्याची धडपड! व्याकूळ करणारी भूक आणि खच्ची करणारा दुष्काळ यांसारख्या नकारात्मकतेवर मात करीत वैपुल्य आणि समृद्धीसारख्या सकारात्मक स्वप्नांची आस!

त्या धडपडीतून, त्या आशेतून त्याला मिळाला एक दिलासा- कदाचित काल्पनिक, की अशी एखादी जादू हस्तगत होऊ शकते, जी आपल्या आवाक्याबाहेरच्या धोक्यांभोवती पाश आवळून त्यांना हतप्रभ करील. त्या जादूच्या शोधादरम्यान त्याला उमगली काही प्रतीके जी जीवनाच्या अनिश्चिततेला ठामपणे पुरून उरतील आणि स्थैर्य, निश्चिती देतील. अशा प्रतीकांनिशी तो आदिमानव उग्र प्रतिकूलतेला टक्कर द्यायला सज्ज झाला. आणि ही प्रतीकंरूपी आयुधे स्वत:च्या अवतीभवती निर्माण करून त्याने स्वत:चे सुरक्षावलय निर्माण केले. त्या वलयाची पहिली अभिव्यक्ती दिसून येते ती अमंगळाला आव्हान देणाऱ्या रंगावली प्रतीकांमध्ये!

रंगावलीची अधिक माहिती तुम्ही माझ्या ‘रांगोळी – कलात्मक सौंदर्याचा वेध’ या राजेंद्र प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पुस्तकात वाचू शकता.

डॉ. नयना तडवळकर     

अनुवाद- ज्योत्स्ना नेने