विचारसरणीमध्ये बदल हवा
‘मग पुरुषांच्या प्रवेशाचं काय? हा मंगला सामंत यांचा लेख वाचल्यानंतर लक्षात आलं की गेल्या काही वर्षांत कित्येक मंदिर संस्थानांच्या विश्वस्तांनी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत देवदर्शनाच्या सोहळ्याचे करोडो रुपयांची उलाढाल करणाऱ्या धंद्यात रूपांतर केले आहे. जुनाट रूढीचा आधार घेत स्त्रियांना गाभाऱ्यात प्रवेश करू न देण्याच्या कालबाह्य़ परंपरेचा निषेध करण्यासाठी समस्त महिलावर्गाने अशा ठिकाणांवर बहिष्कार घालावा. पुरुषांनी देखील अशा मंदिरांमध्ये प्रवेश करण्याचे नाकारून स्त्रियांच्या कृतीला पाठिंबा द्यावा. असे केल्याने साहजिकच देवळांच्या व्यवस्थापनाला प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागेल आणि कुठल्याही तर्कावर आधारित नसणाऱ्या विचारसरणीमध्ये बदल करावा लागेल.
– केतन र. मेहेर, विरार (पूर्व)

स्त्रियांना धार्मिक बनवत आहोत का?
मंगला सामंतांचा लेख वाचला आणि काही प्रश्न निर्माण झाले. मी स्पष्ट करते की मी नास्तिक आहे. काही व्यक्तिगत गोष्टी सांगणे गरजेचे आहे म्हणून सांगते. आमच्या जन्मदात्यांची ते मरेपर्यंतची सेवा मी व माझ्या बहिणी करीत होतो. आमच्या सुदैवाने आम्हाला भाऊ नाही. आमचे वडील मरणाच्या दारात असताना आमच्या मातोश्रींनी सुचवले की आम्ही आमचे वडील वारल्यावर मृत्यूनंतरचे विधी करण्यासाठी कोणा पुरुष नातेवाइकाला बोलवावे. ही गोष्ट आम्ही मानली नाही. आम्ही म्हणालो की, जर इतकी र्वष त्यांची सेवा आम्ही केलेली आहे तर या विधींसाठी पुरुष लागत असेल तर आम्ही हे विधीच करणार नाही. पारमार्थिक विचार करताना आम्ही पूर्णपणे ऐहिक विचार केला आणि पारमार्थिक विचारांना तिलांजली दिली. आम्ही तिघी स्मशानात गेलो आणि मृतदेहाला भडाग्नी दिला. आईच्या मृत्यूवेळीही आम्ही हेच केले. आमच्या बाबतीत तर आम्ही मरणोत्तर देहदान केलेले आहे.
सांगायचा मुद्दा इतकाच की मंदिर प्रवेशासाठी हट्ट धरून आपण स्त्रियांना धार्मिक बनवू पाहात आहोत का? शनिमंदिराच्या चौथऱ्यावर स्त्रियांना प्रवेश मिळण्या न मिळण्याने स्त्रियांच्या रोजच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे? मला वाटते की यापेक्षा स्त्री संघटनांनी खेडोपाडी होणारे हुंडाबळी, बालविवाह हे थांबवण्यासाठी जास्त श्रम घ्यायची गरज आहे.
-स्मिता पटवर्धन, सांगली</p>

‘प्रथा सोडून द्यायला हव्यात’
‘मग पुरुषांच्या मंदिर प्रवेशाचं काय?’ हा २३ जानेवारीच्या चतुरंगमधील मंगला सामंत यांचा अभ्यासपूर्ण लेख वाचला. ज्या शरीरधर्मामुळे स्त्रीला मातृत्व प्राप्त होतं आणि मानववंश चालू ठेवण्याचं महत्त्वाचं काम तिच्याकडून होतं, ते पुरुषाला शक्य नसल्यामुळे ‘कोल्ह्य़ाला द्राक्षे आंबट’ या मानसिकतेतूनही स्त्रीला ‘त्या’ काळात अपवित्र ठरवले गेले असावे. स्त्री ही कायम आपल्यापेक्षा खालच्या स्तरावरच असली पाहिजे ही पुरुषाची मानसिकता अजूनही कायम आहे, स्त्रीकडे एक ‘मालकी हक्काची वस्तू’ म्हणून बघण्याची पुरुषाची नजर बदललेली नाही. त्यामुळे प्रत्येक बाबतीत आपल्याकडे कमीपणा घेऊन चुकीच्या प्रथा चालु ठेवण्याची पराभूत मनोवृत्ती स्त्रियांनी सोडून दिली पाहिजे.
– उज्ज्वला सूर्यवंशी, ठाणे<br />नवा दृष्टिकोन
२३ जानेवारीची ‘चतुरंग’ पुरवणी अतिशय वाचनीय होती. ‘मग पुरुषांच्या प्रवेशाचं काय’ हा लेख एक नवा दृष्टिकोन दाखवून गेला. तरीही असं वाटलं की ज्या देवाचं दर्शन घेण्यास बंदी आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी बायकांनी धडपड तरी का करावी? त्याकडे दुर्लक्ष करून त्या दर्शनाचं महत्त्वच कमी करून टाकावं हेच बरं! आपल्या घरातल्या पुरुष मंडळींनासुद्धा या देवळात न जाण्यासाठी प्रवृत्त करावं.
‘विश्वम् स्पृशं दीप्तम्’ स्त्रियांना, भारतीय लष्कर हाही करिअरसाठी एक चांगला पर्याय आहे हे पटवून देतो. ‘स्त्रियांचं मनस्वी योगदान’ या लेखाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या इतिहासाला उजाळा दिला. एकूण, येत्या वर्षांत ‘चतुरंग’ वाचकांना बरंच काही देणार हे नक्की! आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.
– लता प. रेळे, मुंबई</p>

निराळी नजर मिळाली
डॉ. अरुणा ढेरे यांचा ‘आदिमाय द्रौपदी’ हा लेख वाचला. स्त्री-शक्तीची पूजा करताना आपण पार्वती मातेच्या अनेक रूपांचा विचार करतो पण मनाला शक्ती व स्वाभिमान शिकवणाऱ्या द्रौपदीकडे देवी म्हणून पाहण्याची निराळी नजर मिळाली. रक्ताभिलाषि द्रौपदी व कृष्णसखी द्रौपदी वाचून थरारून जायला होतं. यापुढे शक्तीची पूजा करताना द्रौपदीचे स्मरण होईल यात शंका नाही.
– अश्विनी काळे

सामाजिक समस्या निकालात निघतील
३० जानेवारीला प्रसिद्ध झालेला गौरी कानिटकर यांचा ‘ओळखीचं गाठोडं’ हा लेख अगदी मनापासून पटला. क्षुल्लक गोष्टीत प्रतिष्ठेचा प्रश्न करून आयुष्यभराची जोड तोडायला निघतात आजची मुलं, खूप वाईट वाटतं. नोकरीच्या जागी, घराबाहेरच्या जगात आवश्यक तिथे जमवून घेणारी ही पिढी घरात अशी अतिरेकी का वागत असेल?
मुलांच्या संसारात नकोइतकं लक्ष घालणारे आई-वडील (दोघांचे) हा तर आता फार मोठा विषय होतोय. पण या संदर्भात एक वेगळा मुद्दा सुचवावासा वाटतो. घर जर मुलाच्या आई-वडिलांनी घेतलेलं असेल आणि सगळी एकाच घरात राहत असतील, तर मुलांना कितीही स्पेस द्यायची ठरवली तरी एका मर्यादेनंतर ते करता येत नाही. अशा वेळी दुसरं घर घेण्यातून कौटुंबिक बाबींबरोबर सामाजिक नुकसान आपण करतो. हे टाळण्यासाठी या सगळ्यांचं प्रबोधन करण्यासाठी काही करता आलं तर? दोन्ही बाजूंनी काही गोष्टींचा स्वीकार होण्याची गरज वेळीच त्यांच्यासमोर अधोरेखित करायला हवी.
अपवादात्मक असलेल्या या गोष्टी जेव्हा वारंवार आणि घरोघरी घडायला लागतील, तेव्हा किती तरी कौटुंबिक आणि सामाजिक समस्या आपोआप निकालात निघतील. – राधा मराठे