04 August 2020

News Flash

पौष्टिक मूल्यसंपन्न मिलेट्स

विविध अन्नउत्पादनांमध्ये मिलेट्सचा समावेश करण्यासाठी मी भारतीय उद्योजकांसोबत काम करत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अमृता हाजरा – amritah@gmail.com

आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो चांगला आहार. आपण जसे खातो तसे घडतो. आपल्या आहारात पोषणमूल्यांचा योग्य समतोल असेल तर आपल्याला शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राखता येते आणि आजारांना दूर ठेवता येते तसेच बरे करता येते. मी पुण्यातील ‘इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ अर्थात आयसरमध्ये शास्त्रज्ञ म्हणून काम करते. माझे प्रयोगशाळेतील काम आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न दोहोंचा भर असतो तो अन्नाबाबत वैज्ञानिक माहिती प्राप्त करण्यावर आणि समाज व विज्ञानाला परस्परांशी जोडण्यावर.

निसर्गातील वनस्पती आणि सूक्ष्मजीव जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) कशी तयार करतात याचा शोध माझी पुण्यातील आयसरमधील प्रयोगशाळा घेते. जीवनसत्त्वे हा आपल्या आहाराचा एक अत्यावश्यक भाग आहेत आणि चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहेत. मधुमेहासारख्या जीवनशैलीशी निगडित आजारात किंवा पार्किन्सन्स आणि अल्झायमरसारख्या न्यूरोडिजनरेटिव्ह (चेतासंस्थेच्या कार्यातील बिघाडामुळे झालेल्या) आजारांच्या कारणांमध्येही जीवनसत्त्वांची कमतरता हे कारण आढळून आले आहे. निरोगी राहण्यासाठी जीवनसत्त्वे थोडय़ा प्रमाणात पण नियमितपणे घेणे आवश्यक असते. मात्र, मानवप्राणी त्याला लागणारी जीवनसत्त्वे स्वत: संश्लेषित (सिंथेसाइज) करू शकत नाही, त्यामुळे त्याला जीवनसत्त्वे मिळवण्यासाठी अन्नावर अवलंबून राहावे लागते. याउलट, वनस्पती आणि सूक्ष्मजीवांमध्ये स्वत:ची जीवनसत्त्वे संश्लेषित करून घेण्याची क्षमता आहे. या ज्ञानाचा वापर करून मानवी आरोग्यासाठी अत्यावश्यक अशा जीवनसत्त्वांचे व्यावसायिक पातळीवर संश्लेषण करण्यासाठी अधिक चांगले मार्ग शोधले जाऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे, जैवसंश्लेषणाचे मार्ग केवळ जीवाणू व सूक्ष्मजीवांमध्ये आढळत असल्याने नवीन औषधांच्या- प्रतिजैवकांच्या विकासासाठी ते उपयुक्त ठरतात.

याच्याशी दृढ संबंध असलेला दुसरा एक प्रकल्प म्हणजे ‘मिलेट प्रकल्प’ (www.themilletproject.org) .  मिलेट्स या तुलनेने कमी माहिती असलेल्या पिकांच्या लागवडीची व त्यांचा आहारात समावेश करण्याची परंपरा नव्याने शोधून काढण्यासाठी मी २०१५ मध्ये हा प्रकल्प सुरू केला. सोगरम (ज्वारी), पर्ल मिलेट (बाजरी), िफगर मिलेट (नाचणी/रागी) आणि फॉक्सटेल मिलेट (कांग/नवाणे) या सर्व बारीक धान्यांच्या पिकांसाठी मिलेट ही संज्ञा एकत्रितपणे वापरली जाते. मिलेट्समध्ये ग्लुटेन (गव्हातील चिकट घटक) नसते आणि ती प्रथिने (प्रोटिन्स), क्षार (मिनरल), जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटकांनी समृद्ध असतात. मिलेट्सची पिके अत्यंत कमी पाण्यात घेतली जाऊ शकतात आणि यासाठी खते व कीटकनाशके अत्यंत कमी प्रमाणात वापरली जातात किंवा वापरण्याची आवश्यकताच भासत नाही. या पिकांची जीवनचक्रे लहान म्हणजे ९० ते ११० दिवसांची असतात. याशिवाय मिलेट्समध्ये मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक जैवविविधता अस्तित्वात असते. मिलेट्सची पिके शेतीच्या विविध परिस्थितीत तसेच वेगवेगळ्या हवामानात घेतली जाऊ शकतात. आधुनिक समाजाला भेडसावत असलेल्या समस्यांपैकी बऱ्याच समस्या सोडवण्यात मिलेट्सची लागवड आणि वापर मदत करू शकेल.

तुलनेने कमी माहीत असलेल्या मिलेट्ससारख्या पिकाची लागवड व वापर करून शेती तसेच आपल्या आहारामध्ये विविधता आणण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. २०१५ मध्ये आम्ही हा प्रकल्प सुरू केला तेव्हा कॅलिफोर्नियामध्ये तीव्र दुष्काळाचे सलग चौथे वर्ष होते. मिलेट्सना अन्य अन्नधान्याच्या पिकांच्या तुलनेत खूप कमी पाणी लागते तसेच ही पिके कमी कालावधीत पिकतात. उत्तर कॅलिफोर्नियातील सहा शेतकरी-सहयोगींनी त्यांच्या शेतात मिलेट्सची लागवड करून आम्हाला साथ दिली. मिलेट्सच्या विविध प्रकारांच्या वाढीसाठी चांगल्या परिस्थिती कोणत्या हे यातून निश्चित केले जाणार होते. आम्ही स्थानिक शेफ्स आणि स्टोअर्सच्या सहयोगाने मिलेट्सचा समावेश असलेले खाद्यपदार्थ आणि पेयेही तयार करून घेतली आणि बे एरिआमधील आमच्या समुदायाला या पदार्थ-पेयांचा परिचय करून दिला.

त्यानंतर मी भारतात आले आणि २०१६ पासून मी भारतात मिलेट प्रकल्पावर काम सुरू केले आहे. विविध अन्नउत्पादनांमध्ये मिलेट्सचा समावेश करण्यासाठी मी भारतीय उद्योजकांसोबत काम करत आहे. पुण्यातील ‘ग्रेट स्टेट अलेवर्क्‍स’चे संस्थापक नकुल भोसले यांच्यासोबत मी मिलेट्सपासून बीअर ब्रू करण्यावर काम करत आहे. ‘ओपन पॅलेट’च्या संस्थापक गायत्री देसाई यांच्यासोबत मी मिलेट्सवर आधारित कल्पक खाद्यपदार्थ तयार करण्यावर काम करत आहे, मिलेट्सची शेती लोकप्रिय करण्यासाठी अन्नदाताच्या सदस्य नीलिमा झोरावर यांच्यासोबत काम करत आहे त्याचप्रमाणे भारतातील छोटय़ा शेतकऱ्यांसाठी मिलेट्सवर प्रक्रिया करण्याच्या पद्धती सुधारण्याबाबत मी ‘बोर्न टेक्नोलॉजीज्’चे संस्थापक विक्रम शंकरनारायणन यांच्यासोबत काम करत आहे. भारत हा मिलेट्सचा सर्वात मोठा उत्पादक आहे आणि आपल्याजवळील या ज्ञानाचा प्रसार आपण जगातील अन्य देशांमध्ये केला पाहिजे असे मला प्रकर्षांने वाटते. मिलेट प्रकल्पाबद्दल आणि मिलेट्स उत्पादन व प्रसारामध्ये भारताने जगाचा मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावावी याबद्दल मी यापूर्वीही बोलले आहे. गेल्या दोन वर्षांत मिलेट प्रकल्पाने भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील मिलेट्सशी संबंधित अनेकांशी संबंध जोडले आहेत.

मिलेट्स बऱ्याच प्रकारांनी वापरता येतात. मिलेट्सपासून कुकीज, डोसे, ब्रेड आणि मिलेट-बेस्ड हेल्थ ड्रिंक्स तयार करणे ही याची काही उदाहरणे झाली. माझ्या मते मिलेट्स ही घरात सहज आढळणारी धान्ये झाली पाहिजेत. आपण प्रत्येक जेवणात तांदूळ आणि गहू ज्याप्रमाणे खातो, त्याप्रमाणे आपल्या जेवणात मिलेट्सचा समावेश नियमितपणे झाला पाहिजे. असे झाल्यास आपला आहार वैविध्यपूर्ण आणि आरोग्यकारक होईल आणि कृषीक्षेत्राच्या विस्तारातही हे निर्णायक ठरेल.

(अमृता हाजरा या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्य एज्युकेशन अ‍ॅन्ड रिसर्च (आयसर) येथे संशोधक म्हणून कार्यरत आहेत. ) 

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2018 1:59 am

Web Title: scientific information about food foods for health world food day
Next Stories
1 तू तरी पत्र पाठवशील का..
2 देणे समाजाचे
3 नादिया
Just Now!
X