आम्ही गायक जेव्हा गातो, तेव्हा आमची ती तपश्चर्याच असते. अवघं आयुष्य पणाला लावून मैफिलीचा पहिला सालावण्यासाठी आम्ही धडपडत असतो. तो जेव्हा लागतो, तेव्हा स्वर्गप्राप्तीचा आनंद होतो आणि त्यानंतर आम्ही त्या आनंदसागरात पोहू लागतो आणि त्याचा तळ शोधू लागतो. त्यानंतर काळ-वेळेचं भान हरपतं आणि आम्हाला गवसलेली स्वरांची क्षितिजं रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू होतो..  आम्ही दोघं, मी आणि परवीन जेव्हा एकत्र गातो तेव्हा ती खऱ्या अर्थाने जुगलबंदी असते. जुगलबंदी ही गायन-वादनाची नसावी. जुगलबंदी कोणाची व्हावी तर ती गुरू-शिष्य, भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ, बहिणी-बहिणी, पती-पत्नी यांच्यात व्हावी, कारण त्यांची सांगीतिक घराणी सारखी असतात. तिथे जुगलबंदीचा खरा अर्थ कळतो..

माझ्यात संगीताचं वेड कधी व कसं झिरपलं ते सांगता येणार नाही. पण एवढं मात्र नक्की की, माझ्या दृष्टीला ही सृष्टी दिसण्यापूर्वी ते झिरपलं असणार. माझी आई, भवानी दासगुप्ता ही त्या काळात ऑर्गन वाजवून गाणं गायची. पिताजी प्रफुल्लकुमार दासगुप्ता हे आज बांगला देशात असणाऱ्या खुलना जिल्ह्य़ाचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते. पण कोलकत्यातील ‘झंकार आर्ट सर्कल’चे ते अध्वर्यू होते. पिताजींना त्या कायद्याबरोबरच संगीताचा कायदाही कळायचा. दादा, बुद्धदेव सरोदवादक होता. अशा सांगीतिक वातावरणात मी घडत गेलो.

daughters become guests in their own father house after marriage
नातेसंबंध : माहेर उपरं करतं?
boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..

‘झंकार आर्ट सर्कल’ला पिताजींनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रतिष्ठा मिळवून दिली होती. झंकारमुळेच आमच्या घरी संगीतातील दिग्गजांचं येणं जाणं असायचं. सलामतअली खाँसाहेब, विलायतखाँसाहेब, आमीर खाँसाहेब, बडे गुलाम अली खाँसाहेब, पं. राधिका मोहन मित्राजी,

पं. ग्यानप्रकाशजी, पं. रवीशंकरजी असे सर्व महानतम संगीतज्ज्ञ मला लहानपणी घरातच पाहता आले. मी त्यांचा रियाज पाहत असे, त्यांच्या चर्चा ऐकत असे. काही कळो न कळो, पण त्या वातावरणात असणं हे किती सुदैवी आणि महत्त्वाचं होतं, हे मला आज कळतंय. देवानं योग्य घरात मला जन्म दिला. त्याहून महत्त्वाचं म्हणजे मला, ते सारं समजून घेण्याची उपजत शक्ती दिली.

पिताजींनी वयाच्या पाचव्या वर्षी पं. ज्ञानप्रकाश घोष यांच्याकडे मला तबलावादनासाठी सोपवलं. मी मनापासून तबला शिकू लागलो. ज्ञानप्रकाशजी म्हणजे तबल्याचा साक्षात कोश होता. पण मला, बालसुलभ वृत्तीमुळे विविध गोष्टी खुणावत असत. मी एकाच वेळी अनेक गोष्टींनी भारावून जात असे. मनात येईल ते करत असे, त्यामुळे मला ‘शैतान’ हे टोपणनाव पडलं होतं. तबला शिकता शिकता माझ्यावर गायनाचीही मोहिनी पडू लागली. मी बारकाईनं गाणं ऐकत असे. कोणाचंही गायन ऐकताना त्यातील राग कोणता हे मला सहजपणे ओळखता येत असे. कोणाच्याही गायनाची नाही तर, गायनशैलीची मी हुबेहूब नक्कल करत असे. उस्ताद सलामतअलीखाँसाहेब तर मला म्हणाले की, ‘‘तू तो पागल है। कुछ भी कर लेता है और समझ भी लेता है.’’ खरं, म्हणजे सलामतअलीखाँसाहेबांनी मला ‘बिघडवलं’ होतं. तबल्याकडून माझा कल त्यांच्यामुळे गायनाकडे झुकला आणि एके दिवशी मी उस्ताद फैझ अहमद खाँसाहेब यांचं गायन ऐकलं न् मला साक्षात्कार झाला, की मला यांच्याकडेच शिकायला हवं. घरात कोणालाही न सांगता ती मैफल संपल्यावर मी त्यांचे पाय धरले व विनंती केली की, ‘‘मला गंडाबंद शागीर्द बनवा.’’ त्यांनी तासभर माझी हरतऱ्हेनं परीक्षा घेतली. त्यांनी काही गायला सांगितलं ते गायलो, त्यांनी स्वत: काही गाऊन दाखवलं, तर ते तसंच मी साकारू शकलो. अखेरीस ते प्रसन्न झाले व त्यांनी मला त्यांचा गंडाबंद शागीर्द करून घेतलं आणि मी गुरुवर्य उस्ताद नियाझ अहमद खाँसाहेब व उस्ताद फैझ अहमद खाँसाहेब यांचा शिष्य झालो. आयुष्याला एक कलाटणी मिळाली.

आमच्या घरी संगीताचं वातावरण असलं तरी, पिताजींची शिस्त कडक होती. ते स्वत: अत्यंत हुशार होते. शैक्षणिक आयुष्यात त्यांनी कधीही दुसरा क्रमांक मिळवला नाही, कायम पहिलेच! त्यामुळे त्यांच्या आमच्याकडून त्याच अपेक्षा होत्या. मी व दादा सेंट झेव्हिअर्स शाळेत, अभ्यासात नेहमी पहिले आलो. आमच्या घराचे दरवाजे रात्री लवकर बंद होत. पण संगीताच्या मैफिली ऐकण्यासाठी मी घराच्या मागच्या पाइपावरून उतरून पळून जात असे व पहाटे घरी गुपचूप येऊन झोपत असे. आईला अर्थात हे कळे, पण तिनं नेहमी सांभाळून घेतलं. शाळेत मी गात वगैरे नसे. मी शिकत होतो फक्त. पुढे मी मरीन इंजिनीअिरग केलं. त्या वेळी साडेतीन हजार विद्यार्थ्यांत मी पहिला आलो होतो. माझा साधा हिशेब होता, की मी जहाजावर चोवीस तास असेन. बाह्य़ जगाशी कोणताही संबंध नसेल. आठ तास डय़ुटी व सोळा तास संगीत! झोपेतही मला संगीताचीच स्वप्नं पडत. बोटीच्या इंजिनरूममध्ये इंजिनाचा ‘सा’ मला मिळायचा, मग डय़ुटी करतानाही रियाझ सुरूच असायचा. जहाजाच्या डेकवर पडल्यावर वारा कानात गाणं म्हणायचा, समुद्राची गाज सतत रुंजी घालत असायची, आकाशातले तारे संगीताच्या खोलीचा प्रत्यय द्यायचे. मी अक्षरश: माझ्या जगात रमलेला असायचो. कशाचंही भान नसायचं. काम मात्र मनापासून करायचो. आपण केलेल्या कामात मन घातलं नाही तर, ते काम, एक ओझं वाटू लागतं. त्या क्षेत्रात मग मी सहा पदव्या मिळवल्या. मरीन इंजिनीअिरग संस्थेचा मी फेलो झालो, स्टीम इंजिनीअिरग, डिझेल इंजिनीअिरग, एम. आय. मेकी, एम. आय. मारी आणि चार्टर्ड इंजिनीअिरग अशा सहा पदव्या. सगळीकडे पहिलाच आलो. त्या वेळी ‘बुडत्या जहाजांना वाचवणारा’ म्हणून माझी ख्याती होती. जहाजाची इंजिनं माझ्याशी बोलायची. त्यांचं दुखणं मला कळायचं. जहाजांना मन असतं, असं मला वाटायचं. स्वरांत प्राण भरणं आणि जहाजाच्या इंजिनांत प्राण भरणं हे मला सारखंच वाटायचं. काही जहाजं मी वाचवू शकलो, तर तीन जहाजं वाचवता आली नाहीत. त्यातून मी वाचलो, ती संगीताची सेवा करण्यासाठी! जहाजांमुळे मला एकलकोंडा राहायची सवय लागली, ती आजतागायत.

उस्ताद फैज अहमद खाँसाहेबांकडे शिकताना, त्यांनी मला हातचं काहीही राखता शिकवलं नाही. त्यांना मी ‘पप्पा’ म्हणायचो. पप्पा म्हणायचे की, ‘‘तीन र्वष यमन शिक, तीन र्वष तोडी शिक आणि तीन र्वष मालकंस शिक. मग तुला हवं ते तू गाशील.’’ ते सांगायचे, ‘‘रियाज करोगे तो राज करोगे.’’ माझं आयुष्यच एक रियाज बनलं आहे. मी संगीत भरपूर ऐकतो. पाश्चात्त्य संगीत, अतिपूर्वेचं संगीत, आफ्रिकी संगीत, दक्षिण अमेरिकी संगीत. कारण, ‘संगीत ऐकणं हेही मोठं शिक्षण आहे,’ असं गुरू सांगायचे. मी उंचापुरा होतो. भरपूर खायचो, भरपूर व्यायाम करायचो, वेट लिफ्टिंग करायचो, कुस्ती खेळायचो, क्रिकेट खेळायचो तेही पी. सी. घोष यांच्याबरोबर! एके दिवशी गुरुजींनी मला वेटलिफ्टिंग करताना पाहिलं व म्हणाले, ‘‘आजपासून हे सारं बंद कर, फक्त संगीतच करायचं!’’ ‘का’ असा प्रश्न न करता, मी बंद केलं. आई, वडील व गुरू या तिघांपेक्षा कोणीही मोठा असू शकत नाही.

गुरुजी सांगायचे, ‘सतत चिंतन कर. चिंतनाखेरीज काहीही नाही.’ तुमच्या प्रत्येक कृतीमागे विचार पाहिजे. नुसत्या भावना असून चालत नाही, नुसते विचार असून चालत नाही. कोणत्याही प्रकारच्या संगीतामध्ये भावनायुक्त विचार हवा. गायन कोरडं असून चालत नाही. पुस्तकात अक्षरं छापलेली असतात. पण त्यांना जीवन मिळतं ते, ती अक्षरं वाचणाऱ्या जिवंत माणसामुळे! तसंच संगीताचं आहे. नुसते स्वर गाऊन चालणार नाही, त्यांची रचना करून चालणार नाही तर तिच्यात विचारपूर्णतेनं प्राण भरावा लागतो. प्रत्येक स्वराचं जे वजन असतं, त्याचे सहा प्रकार असतात. अतिदुर्बल, दुर्बल, दुर्बलसमान, समान, समानप्रबल आणि अतिप्रबल, हे कळलं नाही तर संगीताचा आत्मा कसा गवसणार? प्रत्येक रागाची स्वतंत्र पकड असते – तोडी असेल, मालकंस असेल किंवा आणखी कोणता राग; प्रत्येकाचं स्वतंत्र चलन आहे. ते प्रत्येक गायकाला वेगळं समजतं, ते एकाच वेळी व्यक्तिसापेक्ष आहे आणि व्यक्तिनिरपेक्षही आहे. रागांचं हे स्वतंत्र रूप समजलं पाहिजे, त्यांच्यातील अस्फुट सीमारेषा समजल्या पाहिजेत. संगीत हे पूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. फक्त ते व्यक्तिमत्त्व समजून घेण्याची पात्रता मिळवावी लागते. गायकाचंही एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. ते व्यक्तिमत्त्व ओतूनच तो गात असतो, म्हणूनच त्याचं गाणं वेगळं होतं.

परवीन (सुलताना) माझी शिष्या आहे, माझी पत्नी आहे, तिच्या गाण्यातून माझी गायकी दिसतेच, पण तिचं सांगीतिक व्यक्तिमत्त्व वेगळं आहे. गायकानं त्याच्या स्वत:च्या दर्जापासून कधीही खाली उतरू नये, श्रोत्यांना तिथपर्यंत घेऊन जावं. गायकाला कळलेल्या संगीताच्या सर्वश्रेष्ठ दर्जापर्यंत रसिकांना घेऊन जाण्याचं गायन हे माध्यम आहे, हे ओळखून गायकानं गायलं पाहिजे. श्रोत्यांचा अनुनय करण्यापेक्षा संगीताचा अनुनय करत श्रोत्यांचं उन्नयन केलं पाहिजे. गायन ही जशी साधना आहे, तशीच ते ऐकणं हीसुद्धा एक साधना आहे.

आम्ही गायक जेव्हा गातो, तेव्हा आमची ती तपश्चर्याच असते. अवघं आयुष्य पणाला लावून मैफिलीचा पहिला ‘सा’ लावण्यासाठी आम्ही धडपडत असतो. तो जेव्हा लागतो, तेव्हा स्वर्गप्राप्तीचा आनंद होतो आणि त्यानंतर आम्ही त्या आनंदसागरात पोहू लागतो आणि त्याचा तळ शोधू लागतो. त्यानंतर काळ-वेळेचं भान हरपतं, ब्रह्मानंदी टाळी लागते, आम्हाला गवसलेली स्वरांची क्षितिजं रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू होतो. कधी तो यशस्वी होतो, कधी अयशस्वी होतो. पण तो प्रयत्न करणं आपल्या हाती असतं. गुरुजी म्हणायचे, ‘‘आम्ही जेव्हा गातो तेव्हा तेव्हा आमचा उजवा हात रियाज दाखवतो, तर डावा हात बुद्धी दाखवतो.’’ गायक गाताना जेव्हा दोन्ही हातांचा वापर करतात, तेव्हा ते ज्या हाताचा वापर करतात, तेव्हा तुम्हाला या गोष्टीचा प्रत्यय येईल. आत्मस्तुतीचा दोष पत्करून अभिमानानं सांगेन, उस्ताद नियाज अहमद खाँसाहेब म्हणत, ‘‘तुझे दोन्ही हात खतरनाक आहेत!’’ यापेक्षा वेगळी दाद कोणती असावी?

माझी पहिली मैफील झाली ती, वयाच्या सतराव्या वर्षी, अर्थात झंकारमध्ये! तो अनुभव फारसा स्मरणीय नव्हता. दादानं मला त्या वेळी मारवा व केदार गायला सांगितले. त्याच्या सांगण्यावरून मी ते गायलोही. त्याची आज्ञा कशी मोडणार! पण ठीक ठाक गायलो. मला दिलेल्या वेळेपैकी दहा मिनिटं उरली होती, त्या वेळेत मी गायलो तो मालकंस! तो बाकी मी रंगून गायलो, कारण तो माझा राग होता. त्यानंतर माझा सांगीतिक प्रवास सुरू झाला. आमचं जहाज ज्या बंदरावर लागेल त्या बंदरावरील शहरात मी गात असे. त्या वेळी मुंबईत मी घरगुती मैफलींत गात असे. पण माझी स्वतंत्र मैफल अशी नव्हती झाली. १९७४ मध्ये मात्र पहिल्यांदा ‘कल के कलाकार’ या कार्यक्रमात माझं गाणं झालं. भास्कर तिवसकर तबल्यावर होता आणि वासंती म्हापसेकर संवादिनीवर होती, त्या दिवशी माझ्या अंगात १०२ ताप होता, पण मैफील रंगली. मुंबईत माझं नाव झालं. भास्कर नंतर अनेक वर्षे आमच्याबरोबर तबल्याची साथ करत असे. माझ्याजवळ सहा तारांचा तानपुरा आहे. (तानपुऱ्याला चार किंवा पाच तारा असतात, खूप कमी गायक असा तानपुरा वापरतात.) गुरुजींनी मला असा तानपुरा वापरायला सांगितला. तो करायला गेलो, तर जवळ पैसे नव्हते. पप्पा म्हणाले, ‘‘मी आहे ना. काळजी कशाला करतोस.’’ तेव्हापासून मी तो वापरतो. या तानपुऱ्यामुळे संगीतातले उत्तर व दक्षिण ध्रुव एकत्र आणता येतात. नुसतं गाणं गाऊन पुरत नाही. आपली वाद्ये कशी बनतात, हे माहिती असायला हवं. माझ्या घडणीच्या काळात कोलकत्यात हेमेन रॉय सरोद बनवत असत. भारतातले सर्वश्रेष्ठ कलाकार त्यांच्याकडून वाद्ये बनवून घेत असत. मीही त्यांच्यासमोर बसून ते वाद्ये कशी बनवतात ते शिकत असे. ते माझी एकतानता पाहून हसून म्हणत, ‘‘उगाच का तुझं नाव शैतान ठेवलंय.’’ मी त्यांच्याकडेच तानपुऱ्याची जवारी लावायला शिकलो. आजही माझ्या तानपुऱ्याची जवारी मीच लावतो. एकदा एका रेकॉर्डिग स्टुडिओमध्ये माझं रेकॉर्डिग सुरू होतं, तिथं साक्षात लतादीदी आल्या व म्हणाल्या, ‘‘बाहेर सहा तारांचा तानपुरा दिसला, मग म्हटलं, तुम्हीच आहात, चला भेटावं तुम्हाला’’

माझी जहाजावरची नोकरी मस्तपैकी चालू होती. त्या काळात (१९७२) मला दोन लाख रुपये पगार होता. पण, एके दिवशी असं वाटलं की हे आपण काय करतोय. आता काहीही होवो, आपण फक्त शास्त्रीय संगीतच करू या. क्षणात नोकरीचा राजीनामा दिला. मुंबईत कलानगरमध्ये कोणाचा तरी पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो. एक खोली, तीही शेअिरगवर घेतलेली. त्या खोलीत तानपुरा, एक हार्मोनिअम, एक स्वरमंडल, काही पुस्तके होती फक्त.  त्याच वेळी माझं गाणं रेडिओवर होतं.

अनिमा रॉय नावाच्या एका मैत्रिणीकडे एक नवोदित गायिका ते गाणं ऐकत होती. तिनं, हा आवाज कोणाचा असं विचारलं. अनिमानं माझं नाव सांगितलं. ती गायिका मला भेटली, आमची ओळख झाली. ती नंतर वारंवार भेटत गेली. मला गाणं शिकवाल का म्हणाली, मीही तयारी दाखवली, तिला गाणं शिकवायला लागलो, हळूहळू आम्हाला एमकेकांचा सहवास आवडू लागला. आम्ही छचोरपणा केला नाही, कोर्टिग करत भटकलो नाही, मी तिच्या मैफलींना जात असे आणि ती माझ्या. आमच्यातल्या गप्पांचा विषय म्हणजे मैफलीत कसं गायलो, कसं गायला हवं होतं असं. अनिमा आमची साक्षीदार आहे. एकेचाळीस वर्षांपूर्वी आम्ही लग्न केलं. परवीन सुलताना आणि दिलशाद खान यांचा संसार सुरू झाला. परवीन म्हणते की, तिला समजून घेणारा, तिच्या सांगीतिक कारकिर्दीला नीटस आकार देणारा जोडीदार तिला हवा होता, तो तिला माझ्यात दिसला. मी उंच आणि परवीन तशी ठेंगणी, आजवर आम्ही कोणताही संघर्ष न करता, आमच्यात ‘अभिमान’ न होता, आनंदानं एकत्र आहोत. आमची मुलगी शादाब सुंदर आहे, उत्तम गाते, खूप शिकली आहे आणि आता अभिनयात करिअर करायची तिची इच्छा आहे. आर. डी. माझा सेंट झेव्हिअर्सपासूनचा वर्गमित्र! आम्ही खूप धमाल केलीय. संगीतावर खूप गप्पा मारल्यात. रात्री-बेरात्री भटकलोय. मी ‘आश्रय’ नावाच्या एका चित्रपटाला संगीत दिलं होतं. तो प्रायोगिक व लो बजेट चित्रपट होता. त्या वेळची अनेक पारितोषिकं त्या चित्रपटानं पटकावली. त्यानंतर काही चित्रपटांना संगीत देण्याच्या मागण्याही आलेल्या. पण, चित्रपटाच्या त्या बेगडी दुनियेत मी रमू शकलो नाही. आर.डी.बरोबर मात्र माझं मैत्र सुरूच होतं. तो ‘१९४२- अ लव्ह स्टोरी’च्या संगीतामुळे खूप खूश होता. त्याचं संगीत करून झाल्यावर रात्री तो घरी आला व आम्हाला म्हणाला की, ‘‘पुढच्या चित्रपटाची गाणी तुम्हा दोघांकडूनच मी गाऊन घेणार आहे.’’ या गोष्टीला महिना होतो ना होतो तोच, एके सकाळी आशाताईंचा फोन आला, ‘‘आपका दोस्त नहीं रहा, वो हमें छोड के चला गया.’’ फार मोठा धक्का होता तो..

एक आठ़वण सांगतो. आमचं लग्न झालं आणि त्यानंतर आम्ही उभयता अफगाणिस्तानमध्ये ‘जश्न फेस्टिवल’मध्ये गायला गेलो होतो. त्या दिवशी आम्ही असे गायलो की बस! एक वाघ आणि एक वाघीण अशी ती जुगलबंदी झाली. सलामतअली खाँसाहेबांनी आमची दृष्ट काढली. आम्ही दोघं जेव्हा एकत्र गातो तेव्हा ती खऱ्या अर्थाने जुगलबंदी असते. जुगलबंदी ही गायन-वादनाची नसावी. ते वेगळेच प्रकार आहेत. जुगलबंदी कोणाची व्हावी तर ती गुरू-शिष्य, भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ, बहिणी-बहिणी, पती-पत्नी यांच्यात व्हावी, कारण त्यांची सांगीतिक घराणी सारखी असतात. तिथे जुगलबंदीचा खरा अर्थ कळतो. मी व परवीन, आम्ही दोघं जेव्हा जुगलबंदी गातो तेव्हा आधी ती अर्धा तास गाते, मग मी अर्धा तास गातो नंतर तासभर आम्ही एकत्र जुगलबंदी सादर करतो. तेल-पाणी कधी एकत्र होतं का? मग गायन-वादनाची एकत्र जुगलबंदी कशाला?

आम्ही सत्य साईबाबांचे भक्त. आमच्याबरोबर तिथे एम. ए. सुबलक्ष्मीही यायच्या. बाबांनी मला आज्ञा केली की, ‘‘तुम्ही चाल लावून अम्माकडून एक भजन गाऊन घ्या.’’ अम्मा तयार होईनात. त्या म्हणाल्या, ‘‘आमच्या शैली वेगळ्या आहेत. ऐंशीच्या घरात नवं कसं गाऊ?’’ पण बाबांची आज्ञा मोडवेना. त्यांनी मला सांगितलं, ‘‘बाबा रे, तू जटिल असं काही करू नकोस. मला झेपेल असं दे.’’ अम्मांच्या आवाजाला काहीही झेपणारं होतं. मी भजन तयार केलं. त्या ते गायल्या व नंतर त्यांनी ते रेकॉर्डही केलं.

आम्ही जगभर फिरलो. भारत महोत्सवात गायलो. एअर इंडियात ज्यांचं संगीत ऐकवलं जातं असे आम्ही पहिले गायक आहोत. विविध देशांत आमचा सन्मान झाला आहे. मॉस्कोमधील ‘दैनिक रोस्तॉव्ह न्यूज’मध्ये स्वाक्षरी प्रसिद्ध झालेला मी पहिला भारतीय संगीतकार आहे. अमेरिकन टी. व्ही. चॅनेल सी. एन. एन.वर मुलाखत झालेले आम्ही पहिले भारतीय गायक आहोत. किती तरी वेळा आम्हाला देशविदेशात कर्टन कॉल्स मिळतात. हरियाणा सरकारने मला ‘संगीत मरतड’ हा पुरस्कार दिला, ज्या महाराष्ट्रात मी राहतो त्या महाराष्ट्राने ‘महाराष्ट्र गौरव’ आणि ‘सूर्य दत्त जीवनगौरव पुरस्कार’ दिला.

माझा  स्वभाव फटकळ असूनही रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. पण, हे पाहिल्यावर वाटतं, की हा गौरव माझा नाहीच, तो हजारो वर्षांच्या सांगीतिक परंपरांचा आहे. मी रसिकांच्या चरणांशी लीन आहे.

 

शब्दांकन : प्रा. नीतिन आरेकर

nitinarekar@gmail.com