21 October 2018

News Flash

जेव्हा ती हसवते..

विनोद म्हटलं की आपल्याकडे त्याचे विषयही अनेकदा ठरलेले असतात.

आपण का हसतो? कधी हसतो? कोणावर हसतो? हास्य किंवा विनोद हा जरी वरवर दिसायला अत्यंत साधा वाटला तरी त्याचे असंख्य प्रकार असतात. लोकांना रडवणे सोपे असते, पण हसवणे कठीण हे सर्वश्रुत आहेच. प्रेक्षकांना, लोकांना विनोद आवडतात. आपली असंख्य विनोदी नाटके त्यांची पोचपावती आहेत, पण या नाटय़कृतीत संहिता असते, विविध पात्रे असतात. त्यातून मग वेगवेगळ्या अंगाने,  प्रसंगांमधून विनोद घडतो. थोडक्यात, लोकांना हसवण्याची जबाबदारी विभागलेली असते. चपखल शब्दयोजना, अभिनय, संवाद यातून स्मितहास्य ते सात मजली गडगडाट इथपर्यंत असंख्य प्रकार होतात.

पण कल्पना करा स्टेजवर एकच माणूस! नेपथ्य नाही, प्रॉपर्टी नाही, पार्श्वसंगीत नाही किंवा हल्ली आढळते तसे आधी ध्वनिमुद्रित केलेले असे काही नाही, जी व्यक्ती उभी आहे तिला काहीही रंगभूषा किंवा वेशभूषा नाही. प्रेक्षकांमधून कुणीतरी उठून स्टेजवर येऊन उभे आहे असं वाटावं इतकं साधं आणि त्याच्या साध्या साध्या संवादामधून प्रेक्षक हसायला लागतात. स्मित नव्हे चांगले गडगडाटी हास्य! याच प्रकाराला स्टँडअप कॉमेडी म्हणतात. प्रेक्षकांशी संवाद साधत, त्यांना प्रसंगी चिडवत, कधी सामील करून घेत चालणारी ही स्टॅण्डअप कॉमेडी सध्या प्रचंड लोकप्रिय होत आहे. धुमाकूळ घालते आहे म्हटलं तरी हरकत नाही.

विनोद म्हटलं की आपल्याकडे त्याचे विषयही अनेकदा ठरलेले असतात. अनेक सुमार हिंदी चित्रपटांमुळे विनोद हे यावरच व्हायला हवेत अशी आपली मन:स्थिती किंवा मानसिकता झालेली आहे. टेलिव्हिजनवर उदंड असणारे कॉमेडी शो त्यात भर टाकत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर पुरुषांनी बायकांचे कपडे घालणे, जाडय़ा बायकांवर विनोद, रंगांवर, विशिष्ट समूहावर विनोद याच्या पलीकडे फार पल्ला जात नाही. उच्च प्रतीच्या विनोदाला या कशाचीही गरज नसते. पण त्याबद्दल आपण पूर्ण अनभिज्ञ असतो. ठरावीक विषय ठरावीक पद्धतीने सादर केले की हुकमी हशा व टाळ्या मिळतात. मान्य आहे की या प्रकाराला प्रेक्षकवर्ग खूप आहे. तरीही यापलीकडे जाऊनही वेगळे काही असते याबद्दलचे अज्ञान मात्र आहे हे नक्की.

आता अशा वातावरणात अत्यंत सरळ साधा चेहरा म्हणजे ज्याला ‘स्ट्रेट फेस’ म्हणतात, ठेवून जर कोणी प्रेक्षकांना हसवत असेल तर? जर ती बाई असेल तर? आणि चारजणींसारखी सामान्य बाई किंवा चक्क तरुणी? त्याहीपुढे जाऊन जर ती फक्त स्त्रियांनाच येऊ शकणाऱ्या प्रामाणिक अडचणींबद्दल मख्ख चेहऱ्याने बोलत असेल आणि प्रेक्षक हसून वेडे होत असतील तर? कोणतेही वाईट शब्द नाहीत.. शिव्या नाहीत.. टीका नाही.. तरीही विनोद कसा काय होऊ शकतो? आणि तोही एका स्त्रीकडून? म्हणजे बाई विनोदाचा विषय असणे हे सामान्य आहे,  पण स्त्रियांकडून असे विनोद?

आदिती मित्तलने योग्य अंतर्वस्त्रे निवडताना सर्वसामान्य बायका-मुलींना येणाऱ्या अडचणींबद्दल ‘ब्रा शॉिपग’ ही स्टँडअप कॉमेडी केली. तेव्हा मरणाचे हसणाऱ्या प्रेक्षकांमध्ये असंख्य मुली आणि स्त्रियाच होत्या. त्या अत्यंत गंभीर विषयावर आदिती फार विनोदी पद्धतीने बोलली. पण प्रेक्षकांपर्यंत संदेश योग्य तऱ्हेने पोहोचला. सध्या स्त्रियांनी केली जाणारी स्टँडअप कॉमेडी ही इन-थिंग आहे. एक बाई लोकांना हसवू शकते याबद्दल शंका असणाऱ्यांनी कधीतरी या शोला हजेरी लावावी किंवा चक्क यूटय़ूबवर पाहावे. ‘वुमन स्टँडअप कॉमेडियन’ या सध्या इंटरनेट रेज् (Internet Rage) आहेत.

तृप्ती खामकर हे या क्षेत्रातील अस्सल मराठी नाव. परंपरागत मध्यमवर्गीय नोकरदार महाराष्ट्रीय घरातून आलेली तृप्ती सध्या स्टँडअप कॉमेडीचे क्षेत्र गाजवत आहेत. रूढार्थाने अभिनेत्रीला हवे तसे शरीर अथवा चेहरा नाही, यामुळे तृप्तीला या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामे मिळत नव्हती. घरच्यांशी संघर्ष पत्करून अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे तृप्तीने ठरवले. पण अथक प्रयत्नांनंतर यश साधे दृष्टिक्षेपातसुद्धा दिसत नव्हते. त्यातून आलेली एकटेपणाची भावना, आर्थिक तंगी, असुरक्षितता याने तिला नराश्य आले आणि हाच तिच्या आयुष्यातला टìनग पॉइंट ठरला. आपल्याला आलेले हे अनुभव, आपली धडपड, संघर्ष एवढेच काय पण आपले नराश्य हे तृप्तीने अत्यंत साध्या सोप्या भाषेत मांडायला सुरुवात केली. ती स्टेजवर येते तीच, ‘हे आहे हे असे आहे’ या आविर्भावात.. मला हे अनुभव आले, माझ्याकडून या चुका झाल्या, मला अशी नमुनेदार माणसे भेटली, याबद्दल तृप्ती मख्ख चेहऱ्याने जेव्हा बोलते तेव्हा तिला प्रेक्षकांकडनं सहानुभूतीची अपेक्षा अजिबात नसते. उलटपक्षी या सर्वाकडे ती चक्क विनोदी नजरेने पाहते. म्हणजे तू जाडी आणि काळी आहेस म्हणून तुला पडद्यावर पाहणे लोकांना आवडणार नाही, असे तिच्या तोंडावर एकाने ऐकवल्यावर तृप्ती खामकरला त्यामधील विनोद जास्त भावला. तो प्रेक्षकांना अत्यंत हसवून गेला. कदाचित हा अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी अनेकींना आलाही असेल आणि माझ्यामध्ये त्यांनी स्वत:ला पाहिले असेल, असे तृप्तीचे मत आहे. तृप्ती पारंपरिक मराठी किंवा मध्यमवर्गीय मुलगी या व्यक्तिमत्त्वात शो करते. शिव्या न देणे किंवा कोणावरही कसलीही टीका न करता प्रचंड वस्तुनिष्ठ पद्धतीने हशा वसूल करते.

टीग नोटरी या पाश्चिमात्य स्टँण्डअप कॉमेडियन कलाकार बाईचा आदर्श तृप्तीसमोर आहे. टीग स्वत: कर्करोगग्रस्त असतानाही  त्यावर तिने विनोद केले. यामधून तृप्तीला स्फूर्ती मिळाली. तिच्या मते उगाच स्वत:च्या दु:खाचा बाऊ न करता आयुष्य जगायला शिकणे हे आज गरजेचे आहे. त्यामधूनच कुठे ना कुठे विनोद घडत राहतो. शोधावे लागत नाही.

रोजचे विषय म्हणजे खरेदी. स्त्रिया आणि त्यांच्या खरेदीचा सोस यावर अनेक विनोद झालेत. पण ग्राहकांचे अनेकविध नमुने फक्त संवाद आणि शब्दफेकीमधून मल्लिका दुवाने ‘शीट पीपल से सरोजनी नगर’ या व्हिडीओतून दाखवले. किंवा ‘व्हॉट इंडिया थिंक अबाउट सेक्स’ हा व्हिडीओ वास्तव दाखवताना मनमुराद हसवतो. प्रख्यात पत्रकार विनोद दुवा यांची मुलगी मल्लिका. वडिलांच्या मिश्कील विनोदी स्वभावाचा तिच्यावर लहानपणापासून प्रभाव पडला. मल्लिका म्हणते की, ‘कोणाचीही टिंगलटवाळी करून हशे मिळवणे कठीण नाही. पण स्वत:कडे कमीपणा घेऊन किंबहुना स्वत:वर विनोद करणे हे सोपे नव्हे.’ जे मल्लिकाला पूर्ण जमलेले आहे.

मल्लिकाच्या मते, भारतीय प्रेक्षकांना विनोदाच्या या नव्या प्रकाराची ओळख इंटरनेटमुळे झाली हे निर्विवाद.. तिच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय माणूस फार पटकन दुखावला जातो, किंवा अपराधी होतो. भावना दुखावल्या जाणे हे इथे सर्रास आहे. अशा वातावरणात एक तरुणी म्हणून तुम्ही लोकांना हसवणे हे येरागबाळ्याचे काम नोहे. पण मल्लिकाने ते करून दाखविले. तिचा स्वत:चा स्टँडअप शो नाही. ती मुख्यत्वे यूटय़ूबवर असते. ए.आय.बी. (AIB) या ग्रूपसोबतचे तिचे व्हिडीओ तरुण वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. सर्वसाधारणपणे पाच ते सात मिनिटांच्या अवधीत मल्लिका हशा मिळवते. जाहिरात क्षेत्रात काम करताना तिला विनोदाचे महत्त्व कळले आणि भारतात असा उच्च विनोद नाही हेही जाणवले. अनेकदा ती स्वत: अशा दोन वेगवेगळ्या भूमिका करते. दिल्ली, दिल्लीकर तेथल्या भोचक आंटय़ा हे तिचे लाडके विषय.

अर्थात तृप्ती, आदिती, मल्लिका यांना जशी लोकप्रियता मिळाली. तसेच टीकेलाही सामोरे जावे लागले. विशेष करून तृप्ती खामकरला तर फार त्रास झाला. चित्रपटात कामे मिळत नाहीत म्हणून जोकर झालीच ना शेवटी? असे खोचक शेरेपण ऐकावे लागले. हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘तुम्हारी सुलु’ मध्ये  तृप्तीने साकारलेली टॅक्सी चालकाची भूमिका याला सणसणीत उत्तरं ठरली.

या तिघींच्या मते विनोदाच्या बाबतीत बहुतांशी भारतीय प्रेक्षक आजही बाळबोध असल्याने, मनात असूनही ज्याला मास अपील म्हणतात ते स्त्रियांच्या स्टँडअप कॉमेडीला मिळालेले नाही. त्यांचा प्रेक्षक अजूनही इंग्रजी बोलणारा आणि शहरी वर्गच आहे. आदिती मित्तलच्या शोसाठी गर्दी याच वर्गाची असते आणि तृप्तीकडे आहे कॉलेज क्राउड.

हा अडथळा दूर करण्याकरता अनेकदा हिंग्लिशचा आधार घेतला जातो. मल्लिकाच्या व्हिडीओत तर भाषेतला दिल्ली लहजा स्पष्ट जाणवतो. तिच्या मते लहानपणापासून या सर्वाकडे मी अत्यंत कुतूहलाने पाहायचे. म्हणजे ‘माता की चौकी’ किंवा पूजा ऐकायला येणारे लोक देवाकडे कमी, पण गॉसिपकडे अधिक कसे लक्ष देतात हे मला फार विनोदी वाटायचे. साहजिकच माझ्या शोमध्ये त्याचा अंतर्भाव होणे नैसर्गिकच होते. आदितीचे विषयपण असेच साधे सरळ असतात. अर्थात हिंग्लिशमध्ये कधी कधी अपरिहार्यपणे येणाऱ्या शिव्या (ज्याचा बाऊ केला जाऊ शकतो) ती सहजी देते. समोरचा वर्ग त्याच मानसिकतेचा असल्याने त्याला ते आपलेसे वाटते. तृप्ती मात्र शिव्या न देता मख्ख चेहऱ्याने स्वत: विनोद करते.   स्वत:वर जेव्हा तुम्ही विनोद करू शकता तेव्हा तुम्ही खरे, असे राधिका वाझ या स्टँडअप कॉमेडियनने आवर्जून सांगितले. न्यूयॉर्कला असताना राधिकाला एकटेपणा फार जाणवू लागला. त्यातून एक कॉमेडी कोर्स तिने केला आणि तिला नवा मार्ग मिळाला. राधिका फक्त स्टँडअप कॉमेडियनच नाही तर वृत्तपत्रात स्तंभलेखिका आहे.

तिचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. राधिकाला आजूबाजूच्या जगण्यातून भरपूर ‘मजकूर’ मिळतो. तिच्या मते साधे लिफ्ट वा एलेव्हेटरमधले वागणे किंवा सुपर मार्केटमधील लोक, कॉफी शॉपमधील गिऱ्हाईकं यावरही विनोद होऊ शकतो. तुम्ही त्याच्याकडे कोणत्या नजरेने पाहता हे महत्त्वाचे. तिच्या ‘शग्ज अ‍ॅण्ड फॅट’ या व्हिडीओमध्ये बुरखाधारी किंवा हिजाब घातलेल्या बायकांना जी ठरावीक वागणूक मिळते, यावर तिने भाष्य केलेले आहे.  या चारही जणांशी बोलताना एक जाणवले की विनोद समजून घेणे याबाबतीत आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे. केळीच्या सालावरून घसरणे किंवा जाडी बायको मरतुकडा नवरा अशा बालिश विनोदापलीकडे खूप जग आहे, विषय आहेत. पण तृप्ती आणि मल्लिकाच्या मते भारतीय प्रेक्षक आजही तेवढा प्रगल्भ नाही. आणि त्यामुळे स्टँडअप कॉमेडी आणि तीही एका स्त्रीने केलेली याला मर्यादा पडतात. त्यामुळे त्यांचे शो हे निव्वळ शहरी भागातच होतात. पण प्रतिसाद मात्र उदंड असतो. यूटय़ूबमुळे प्रेक्षकवर्ग आणखीन विस्तारला हे खरे.

स्टँड अप हा मोनोलॉग वा एकपात्री अभिनय नाही. विषय, मांडणी, शैली या साऱ्याच बाबतीत असणारी अनौपचारिकता किंवा उत्स्फूर्तता महत्त्वाची ठरते. उदाहरण द्यायचे म्हणजे रेडिओ जॉकी एफ.एम.वरून जसे चटपटीत आणि मुख्य म्हणजे साध्या भाषेत बोलतात तसे स्टँण्डअप कॉमेडीमध्ये अभिप्रेत असते. अनु मेननने खरं तर याची सुरुवात केली. ‘व्ही’ टीव्हीवरील लोला कुट्टी हे पात्र ती साकारायची, एकदम मल्याळी मुलगी, कुरळे, तेलकट केस, भला मोठा गजरा, चष्मा, केरळी साडी, या वेशभूषेत तिने ‘सिंबळी’ धम्माल उडवली. लोकप्रिय होण्यासाठी उत्तम देहयष्टी, चोख इंग्रजी, कपडे याची काही एक गरज नसते हे जणू यातून सिद्ध झालं.

थोडक्यात काय की समोरचा प्रेक्षक काय मानसिकतेचा असून कोणत्या गोष्टीला त्याची दाद जाईल हे भान ठेवावे लागते. महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांना भावतील असे विषय शोधावे लागतील. यात ताज्या घडामोडी आल्याच म्हणजे समजा, शो ठरलेला आहे आणि त्याच वेळी सकाळी बजेट सादर झाले, कोणी वादग्रस्त ट्वीट केले किंवा पुरस्कार दिले गेले तर ते आयत्या वेळेला घालावेच लागतात. आणि हो.. या सर्वाच्या मते या शोला येणारा प्रेक्षक अत्यंत चलाख आणि हुशार असतो. म्हणजे जर सादरीकरण आवडले नाही तर चक्क हुटआउट करायला मागेपुढे पाहात नाहीत. रंगभूमी पावित्र्य, नटाचा मान या सर्व गोष्टींना येथे महत्त्वाचे मानले जात नाही.

स्टँडअप क्षेत्रात पुरुषांची संख्या जास्त आहे. हिंदीत तर अधिकच. काही वर्षांपूर्वी नवीन प्रभाकरचा ‘पहेचान कौन’ हा तुफान लोकप्रिय शो स्टँडअप कॉमेडीचाच प्रकार होता. राधिका, मल्लिका, तृप्ती आणि आदिती यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्यांना या यशाची कल्पना नव्हती. सुमुखी सुरेश हीसुद्धा आपल्या स्टँडअप कॉमेडीसाठी फार प्रसिद्ध आहे, रूढार्थाने ज्याला स्टेज अपील म्हणता येईल असे काही एक नसतानाही ती निव्वळ विषय आणि तगडे स्क्रिप्ट यांच्या जोरावर अत्यंत भेदक भाष्य करते. किंबहुना या सर्वजणी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टी, त्यामधील विरोधाभास, लोकांची मानसिकता यावर फार सजग आणि गंभीर विचार स्लॅगमध्ये मांडतात. एका अर्थाने याला सामाजिक विश्लेषणही म्हणता येईल.

या सर्वजणी रूढार्थाने सुंदर, शिडशिडीत किंवा विनोदी तऱ्हेने लठ्ठ अजिबात नाहीत. आदिती तर कोपऱ्यावरच्या दुकानावर जावं तसे कपडे घालून, चष्मा लावून स्टेजवर येते. राधिका चक्क टीशर्ट आणि जीन्सवर. मेकअप नाही की काहीही नाही. पण एकदा का माइकचा ताबा त्यांनी घेतला की दुसऱ्या क्षणाला प्रेक्षक खदखदून दाद देतो.

एका अर्थाने ठरावीक परंपरागत चाकोरी या सर्वजणींनी मोडलेली आहे. यात दुमत नाही. ठरावीक विषयांच्या बाहेर जाऊन त्यांनी विषय निवडले. रोजच्या आयुष्यातले, मुंबईचे रिक्षावाले, ट्रेनमधली गर्दी, लग्नात भेटणारे नातेवाईक, उपवर मुलींची होणारी चाचपणी, परंपरांगत भारतीय पालक आणि त्यांची तरुण मुले, भारतीय संस्कृतीमधील विरोधाभास असे हे विषय असतात जे निखळ निकोप हसू आणू शकतात. हे या चौघींनी सिद्ध केलेले आहे. अर्थात त्यामागे प्रचंड मेहनत आहे. ठरावीक साचेबंद मार्ग नाकारून या चौघी स्वत:ची खरी ओळख करून देत आहेत. त्यांच्यासारख्या अनेक जणी असतील किंवा या क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न बाळगून असतील त्या अनेकांना यांनी उभारी दिली आहे. स्वत:कडे कमीपणा घेऊन कुणाचीही टिंगलटवाळी न करताही हास्य रस निर्माण होऊ शकतो. आणि असा निखळ निर्मळ विनोद हे समाजाच्या प्रगल्भ विनोदबुद्धीचा निर्देशांक मानायला हरकत नसावी. अर्थात असे विनोद ज्यांना आवडत नाहीत त्यांच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत म्हणा, जेथे आधीच रेकॉर्ड केलेले हसू (Canned) प्रेक्षकांना हसायला लावते.

अर्थात पाश्चिमात्य स्टँडअप कॉमेडीपेक्षा तुलनेत आपण बरेच मागे आहोत. म्हणजे राजकारणी आणि नेते जेव्हा आपल्यावरील टीका हसत हसत घेतील, ठरावीक पंथ, गुरू यांच्यावरील विनोदाने जेव्हा त्यांचे अनुयायी दुखावले जाणार नाहीत, तेव्हा आपण विनोदाला खऱ्या अर्थी समजू लागलो आहोत असे खुशाल समजावे. सध्या लोकांच्या भावना कशामुळेही दुखावतात. अशा वातावरणात जेव्हा अशी स्टँडअप कॉमेडी स्त्रियांकडून होते आणि लोकप्रिय बनते तेव्हा तिचे महत्त्व निर्वविाद ठरते यात वाद नसावा.

शुभा प्रभू-साटम

shubhaprabhusatam@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on January 13, 2018 6:29 am

Web Title: stand up comedy by female artists