वैचारिक मतभेद आहेत, असं सांगत आज अनेक जोडपी वेगळी होताना दिसत आहेत. खरंच हे मतभेद तेवढे टोकाचे असतात का की उसवलेला धागा पुन्हा घट्ट करताच येऊ नये. नवरा-बायकोच्या नात्यात विभक्त होणं शक्य असतं परंतु त्यात मनाची, आरोग्याची पडझड होतेच. महत्त्वाची वर्षे वाया जातात. आणि पुन्हा दुसरा नातेसंबंध जोडायचं ठरवलं तरी त्यात सुख मिळेल याची काय खात्री? त्यापेक्षा पहिल्या नात्यातलं आपल्या दु:खाचं ओळखीचं गाठोडंच आपण उचलायचं ठरवलं, आपल्याच दु:खाचं कारण शोधलं तर किती तरी आयुष्य सुखी होतील.. फक्त प्रयत्न करायला हवा..
कुठेतरी एक गोष्ट वाचलेली आठवतेय.. एकदा काही माणसे स्वर्गात जातात. प्रत्येकाच्या पाठीवर त्याच्या त्याच्या दु:खाचं एक गाठोडं असतं. काही मोठी काही छोटी. ते सगळे जण चित्रगुप्ताकडे जातात आणि तक्रार करतात की तू आम्हाला किती दु:ख दिलंस. कंटाळा आलाय या दु:खांचा. त्यांना चित्रगुप्त म्हणतो, ‘‘सगळ्यांनी आपापली दु:खाची गाठोडी ठेवा तिथे कोपऱ्यात.. आणि या बघू मस्त चक्कर मारून. बघा तरी स्वर्ग आहे कसा..’’ सगळे जण आपापली गाठोडी ठेवतात आणि जातात. बराच वेळ इकडे तिकडे फिरून स्वर्गातलं सुखद वातावरण पाहून आनंदी मनाने परततात.

चित्रगुप्त म्हणतो , ‘‘तुम्हा सगळ्यांना फक्त सुख देणं हे काही माझ्या हातात नाही. पण माझ्या हातात एक गोष्ट मात्र नक्की आहे आणि ती म्हणजे तुम्ही तिथे ठेवलेली जी दु:खाची गाठोडी आहेत त्यातलं कोणतंही गाठोडं उचलू शकता. लहान-मोठं तुम्हाला जे हवं ते. सगळ्यांना सुरुवातीला खूप आनंद झाला. पण क्षणभरानंतर प्रत्येक जण विचारात पडला आणि शेवटी सगळ्यांनी आपापली गाठोडीच उचलली. चित्रगुप्त मनोमन हसला पण वरकरणी त्यांना म्हणाला, ‘‘अरे असं का केलं सगळ्यांनी?’’
सगळे म्हणाले, ‘‘आम्हाला आमच्या दु:खांची ओळख आहे. इतरांची दु:खे आमच्यासाठी नवीन आहेत. ती कशी हाताळायची हे आम्हाला माहीत नाही. त्यापेक्षा आमचीच दु:खं आम्हाला बरी.’’ असं म्हणून सगळ्यांनी आपापली गाठोडी घेऊन परत एकदा पृथ्वीवर प्रयाण केलं.

Village culture of bhavki
मदतीला धावून येणारी भावकी! गावात जपली जाते आपली संस्कृती, VIDEO होतोय व्हायरल
Personality Traits
तुमची जन्मतारीख ३, १२, २१ किंवा ३० आहे का? जाणून घ्या, कसा असतो अशा लोकांचा स्वभाव…
Loksatta samorchya bakavarun IT CBI ED Polling stations EVM election
समोरच्या बाकावरून: थोडे थांबा.. धीर धरा ‘अच्छे दिन’ येतच आहेत..
korean skincare, K-beautyUnlock the secrets
तुम्हालाही हवीये Glass skin? कोरियन लोकांच्या सौंदर्याचे काय आहे रहस्य? तज्ज्ञांनी सांगितल्या टिप्स

ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे सध्या मोठय़ा प्रमाणात वाढलेला नातेसंबंधांमधला ताण. नवरा-बायकोच्या तेही, अगदी तरुण जोडप्यांमधला ताण अधिक वाढल्याचं दिसत आहे. नुकत्याच झालेल्या एका पाहणीनुसार तर देशात घटस्फोटांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. मी जेव्हा कुटुंब न्यायालयातील अनेकांशी बोलले तेव्हा लक्षात आलं, फसवणूक, व्यसन, लैंगिक प्रश्न, मानसिक आजार लपवणं, विवाहबाह्य़ संबंध इत्यादी दिसणाऱ्या आणि वैवाहिक जीवनावर थेट परिणाम घडवणाऱ्या कारणांसाठी होणाऱ्या घटस्फोटांची संख्या २० ते २५ टक्क्यांपेक्षा जास्त नाही. उरलेले घटस्फोट हे वैचारिक मतभेद किंवा सहमतीने होणारे घटस्फोट असतात. त्या मागची खरी कारणं स्पष्टपणे डोळ्यासमोर येत नाहीत. कारण जी काही कारणे सांगितली जातात ती पाहता त्यांना खरंच वैचारिक मतभेद म्हणावं का, हाही प्रश्न येतो. लग्नाच्या पहिल्या एक-दोन वर्षांत, जेव्हा खऱ्या अर्थाने एकमेकांची ओळख झालेली नसते तेव्हा वैचारिक मतभेद आहेत हे कसं समजतं? आपण आपल्या स्वत:ला तरी पूर्ण आयुष्यात खऱ्या अर्थानं ओळखू शकतो का? एखादी घटना घडून गेल्यानंतर देखील आपलंच वागणं आपल्याला नाही पटलं तर अशी कशी मी वागले, असंही त्या वेळी वाटून जातं नं? नुकतीच विशाखा माझ्याकडे आली होती. लग्नाला चार-पाच महिने झाले होते. तिचं आणि तिच्या नवऱ्याचं सुमेधचं अजिबात पटत नव्हतं. कारण विचारलं तर तिला ठोस असं कारण सांगता येईना. वैचारिक मतभेद (?) आहेत, असं सारखं म्हणत होती. जरा तिच्याशी अवांतर गप्पा मारल्यावर हळूहळू ती बोलायला लागली. म्हणाली, ‘‘तो फार व्यवस्थित आहे. जरा जास्तच. त्याला सगळं जागच्या जागेवर लागतं. मला काही सवय नाही इतकी नीट नेटकेपणाची. त्यातून त्याची आईपण अगदी काटेकोर व्यवस्थित. मग काय भांडणाला तोच विषय आणि आठवडय़ात फक्त एक रविवार मिळतो त्यात काय मी घराची स्वच्छता करत बसू का? त्याला आवडते स्वच्छता तर त्याने करावं घर स्वच्छ. मला अगदी कंटाळा आला आहे. त्यामुळे मला वाटतं नकोच हे लग्न पुढे न्यायला. आत्ताच पटत नाही तर पुढे काय पटणार? अजून आम्हाला मूल नाही तोवरच थांबू. माझ्या आईशी बोलले तर म्हणाली की, तू ठरवशील ते. तू काही आम्हाला जड नाहीस. घर तुझंच आहे. तू अगदी खुशाल राहू शकतेस. पण मनाविरुद्ध सासरी अजिबात राहू नकोस.’’

सुमेधशी माझं बोलणं झालं तेव्हा तो म्हणाला की, मला सगळं नीटनेटकं लागतं आणि ती शेवटी बायको आहे नं, मग तिने केलीच पाहिजेत नं घरातली कामं. माझ्या आईने नाही का गेली पस्तीस वर्षे घर आणि नोकरी दोन्ही सांभाळलं, मग तिला का जमू नये? जरा काम जास्त पडलं की तिची चिडचिड होते. मला वैताग आला आहे. मला नाही वाटत आम्ही एकत्र राहू शकू असं.’’

अलीकडे सातत्याने अशा अनेक घटना समोर येत आहेत. तसंच विवाह संस्थांमध्ये नोंदवल्या जाणाऱ्या पुनर्विवाहाच्या स्थळांमध्ये अनेकदा कारण असते ते वैचारिक मतभेदाचं. हे वैचारिक मतभेद काय प्रकरण असावं? असं काय घडत असेल की इतक्या टोकाचा निर्णय घ्यावासा वाटतो? अगदी कितीही म्हटलं की हल्ली घटस्फोट घेण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि आमचा घटस्फोट परस्पर सहमतीने झाला असंही सांगितलं तरीही मानसिक पडझड त्यात होत असतेच. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडत असतात. समाजाच्या दृष्टिकोनातूनही बघायचा ‘नजरिया’ बदलतो. कायद्याची भाषा सर्वसाधारण माणसांना झेपणं तशीही अवघडच असते. शिवाय आयुष्यातली अतिशय महत्त्वाची आणि उमेदीची वर्षे वाया जातात ती निराळीच. घटस्फोट म्हटलं म्हणजे आपल्या आयुष्यातून एका माणसाला आपण वजा करत असतो. एखाद्याला आपल्या आयुष्यातून काढून टाकत असतो. घरातल्या जुन्या झालेल्या वस्तूदेखील असू देत होईल कधी तरी उपयोग असं म्हणून परत परत जपून ठेवत असतो. त्यामुळे एका माणसाला आपल्या मेंदूतून काढून टाकणं हे इतकं सोपं असतं? असू शकतं? वाद टाळण्यासाठी काही युक्त्या वापरू शकतो का? ही मानसिक भावनिक पडझड आपण थांबवू शकतो का?

खरं तर तरुणांच्या या नात्यांच्या जपवणुकीत पालकांची भूमिका संयमाची हवी. जबाबदारीची हवी. ते असं कसं काय म्हणू शकतात की तू आम्हाला जड नाहीस. तू खुशाल इथे येऊन राहा. हे वाक्य तर अनेक पालकांच्या तोंडून मी ऐकलं आहे. वैवाहिक सुखापासून ती वंचित राहणार हे पालकांना का कळत नसेल? सहजीवन हे खूप काळासाठी आहे. निर्णय घाईने घेऊ नको, असं पालक का सांगत नसतील? सगळं लगेच कसं घडेल आपल्या मनासारखं?

नात्यांमध्ये एकमेकांना समजून घेणं, ते आहेत तसे स्वीकारणं हा महत्त्वाचा नियम असायला हवं खरं तर, पण इथे अगदी काही काळाच्या सहवासानंतर आयुष्यभरासाठी म्हणून एकत्र आलेले हे दोघे एकमेकांना एकदम नकोसेच का वाटू लागतात. आपल्या जोडीदारामध्ये एखादी जरी कमतरता जाणवली तरी तो माणूसच नकोसा वाटायला लागतो. असा कसा तो माणूस नकोसाच होतो? एका माणसावर आपण पूर्ण फुली कशी मारू शकतो आणि कोणत्या किमतीच्या बदल्यात? हे सगळं करताना केवढी जबर किंमत घरातल्यांना, आपल्याशी संबंधितांना द्यावी लागते, हे अनेकदा त्या वेळी लक्षातच घेतले जात नाहीत. म्हणूनच गरज आहे ती वेळीच थांबून विचार करण्याची. चहाच्या कपातली वादळं तिथल्या तिथेच थोपवता येऊ शकतील का? हे जे छोटे छोटे वादविवाद आहेत ते घरच्या घरी टाळता येऊ शकतील का? हा विचार करणं गरजेचं आहे.

नात्यात सर्वात आड येतो तो अहं. छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये इगो दुखावताना दिसतो. तर कधी एखाद्याच्या काही सवयी आवडत नाहीत. सुजय रोज सकाळी दात न घासताच चहा प्यायचा. बेड टी ही त्याची आवडती संकल्पना. त्याच्या नुकत्याच लग्न झालेल्या स्वरालीला ते अजिबात आवडायचं नाही. मग त्यावरून दोघांचे रोजच वाद व्हायचे. स्वराली म्हणायची की, ‘‘माझ्या आईनं नाही शिकवलं मला असं. आमच्या घरात शिस्त आहे. तुला तुझ्या आईनं वळण नाही लावलं.’’ परिणामी त्या दोघांमधला वाद एकमेकांच्या आई-वडिलांना नावे ठेवण्यात व्हायचा.

सुजय म्हणायचा, ‘‘माझ्या आईला नावं ठेवायची गरज नाही. माझ्या आईने मला कसं वाढवलाय ते मी पाहिलं आहे. जी माझ्या आईचा मान ठेवत नाही अशा मुलीबरोबर आयुष्यभर राहण्याची माझी इच्छा नाही.’’ अशा अनेक सवयी आहेत की ज्या पटल्या नाहीत तर थेट विभक्त होणं हाच पर्याय असतो का?
विकास ताट हातात घेऊन घरभर फिरत जेवायचा. शीतल रोज सकाळी ९ शिवाय आणि रविवारी ११ शिवाय उठत नाही. गायत्री स्वत: इतकी स्थूल आहे पण काहीच व्यायाम करत नाही आणि बाहेर खायची खूपच आवड आहे. सारंगला फारच शॉपिंगची आणि त्यातल्या त्यात परफ्युम्सची आवड आहे. घरात दोन डझन परफ्युम्सची रांग लागली आहे. सुखदा रोज बेडवर जेवायला बसते, हे पाहिलं की केदारच्या ती डोक्यात (?) जाते. आर्याला रोज आवरायला एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो. यश रोज घरी आला की फेसबुकवर पडीक असतो.

एक ना दोन, अशी अनेक कारणं नातेसंबंधांच्या आड येत आहेत. नातेसंबंध टिकवण्याच्या पाश्र्वभूमीवर या इतक्या क्षुल्लक असू शकणाऱ्या विविध सवयींशी जुळवून घेता का येत नसेल? आणि त्याच्या उलट आपल्या जोडीदाराला एखादी सवय आवडत नसेल तर ती सवय सोडण्याची निदान त्याचे प्रमाण कमी करायची तयारी का नसावी? दोघंही आपापल्या मतांवर ठाम राहिले की मग सगळ्याच गोष्टींत ते मतभेद वाढायला लागणारच.

सुरुवातीची ही छोटी वाटणारी कारणे विलक्षण गंभीर स्वरूप धारण करतात. समजा एखादी सवय आवडली नाही तर ती त्रागा न करता त्याला/तिला सांगता का येत नसेल? किंवा माझ्यात असं ओपननेस आहे का की मी ऐकून घेऊ शकेन? अशा वेळी घरच्या घरी ही पेल्यातली वादळं शमवता येणार नाहीत का? शिवाय दोघांच्याही आई-वडिलांची आपल्या मुलांच्या संसारात ढवळाढवळ हे कारण तर घटस्फोटासाठी फार सबळ असं कारण ठरत आहे.

शीला रोज ऑफिसमधून येताना वाटेवरच असलेल्या आईच्या घरी जायचीच. दीड-दोन तास थांबून आईकडे चहा खाणं उरकून मगच घरी जायची. अशा वेळी तिच्या आईने कौतुकाने मला सांगितलं की दमून येते नं, मी आहे तोवर करीन, नंतर तिचं तिलाच करायचं आहे.’’ शीला तीस वर्षांची. घरातल्या इतरांची जाऊ दे पण स्वत:ची जबाबदारी कधी घेणार? स्वप्निलला हे आवडायचं नाही. तो तिला म्हणाला, ‘रोज रोज तू का जातेस आईकडे, मग यायला, आवरायला उशीर होतो,’ असं म्हणताक्षणी ठिणगीच पडली आणि भांडणांना सुरुवात झाली.

नवीन लग्न झालेली अनेक मुले-मुली माझ्या पाहण्यात आहेत की ती खूप दमलेली थकलेली असतात. ऑफिसमधून घरी आल्यावर काहीही करण्याची एनर्जी त्यांच्यात नसते. एकमेकांना वैवाहिक सुख देण्याची/ घेण्याची ऊर्मीही नसते कित्येक वेळा. खरं तर शारीरिक जवळिकीमधून नातं दृढ व्हायला मदत होत असते. स्पर्शाची देवाण-घेवाण व्हायला हवी. जी कमी झालेली जाणवते. एकमेकांमधला प्रत्यक्ष संवाद वाढवायला हवा. तो आता वॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून व्हायला लागलाय अनेकदा ते टाळायला हवं.

एके सकाळी फोन आला अमेरिकेतून चैत्रालीचा. एक वर्षांपूर्वीचं तिचं लग्न झालं होतं. आता तिला एम.एस. करायला अ‍ॅडमिशन मिळाली होती त्यामुळे नुकतीच ती त्या विद्यापीठाच्या जवळच्या शहरात राहायला गेली होती. तिचा नवरा केतन मात्र त्याच्या नोकरीच्या ठिकाणीच राहात होता. साहजिकच भारतात राहणाऱ्या केतनच्या आईने विचार केला की, केतनचे जेवणाचे हाल नकोत व्हायला त्यामुळे त्या म्हणाल्या की, मी काही महिने येऊन राहते. चैत्रालीचा पारा त्यामुळेच चढला होता. तिचं म्हणणं असं होतं की, पूर्वी शिकत असताना करत होता की स्वत:च्या हाताने जेवण! मग आताच असं काय घडलं की, आईने यायलाच हवे त्याची काळजी घ्यायला. झालं! या एका गोष्टीनं बिनसलं आणि केतन म्हणाला की, अशा मुलीशी मी कसं काय आयुष्यभर जुळवून घेणार?

लग्न झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन-तीन वर्षांतच जास्त कुरबुरी झालेल्या दिसून येतात. या सुरुवातीच्या वर्षांना ‘टिथिंग पीरिएड’ म्हटलं जातं. छोटय़ा बाळाला जसे दात येताना त्रास होतो तसा हल्ली या नवीन पिढीतल्या जोडप्यांना त्रास होतो. मला या सगळ्यांची मुळातूनच शंका वाटायला लागते की, यांना संसार करायचाय की नाही? आणि यांचं नातं इतक्या डळमळीत पायावर उभं आहे? लगेच मोडायची भाषा कशी काय करू शकतात? किती तरी वेळा असं लक्षात येतं की, तुलनेनं मुलग्यांना बदलायला जड जातंय आणि आई-वडीलही त्यांना काय सांगतात यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

सारा आणि अभिषेक नुकतंच आठ-दहा महिन्यांपूर्वी लग्न झालेलं जोडपं. सारा विलक्षण खर्चीक. एकदा मोठय़ा मॉलमध्ये गेली की सहजपणे वीस-पंचवीस हजार खर्च करायची. शिवाय स्वत:च्या पगाराचा आकडा सांगितलेलाच नाही. याबद्दल अभिषेकने तिला विचारला असता तिचा विलक्षण संताप झाला. म्हणाली, ‘‘माझी लाइफस्टाइल अशीच आहे. मला लागतातच एव्हढे पैसे. लग्न कशाला केलंस मग माझ्याशी? बघायची होतीस एखादी झोपडीतली मुलगी.’’ एक दिवस त्यांचं कडाक्याचं भांडण जुंपलं. अभिषेकने खूप काळजी घेऊनदेखील भांडणाचा आवाज बेडरूमच्या बाहेर आलाच. अभिषेकचे आई-वडील अगदी साधे बाळबोध घरातले. मध्यमवर्गीय संस्कारातले. नोकरी करावी, पैशांची बचत करावी, अंथरूण पाहून पाय पसरावेत, कर्ज काढू नये आणि सुखात राहावं अशा विचारधारेचे. आपल्यासारख्यांच्या घरात अशा स्वरूपाचे वाद हे त्यांच्या कल्पनेपलीकडचं होतं. अभिषेकचे वडील खचलेच. त्यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. अभिषेक हवालदिल झाला. एका बाजूला आई-वडील आणि दुसऱ्या बाजूला सारा अशा विचित्र कात्रीत तो सापडला. त्याचे त्याच्या कामाकडे लक्ष लागेना. रात्रीची झोप उडाली. लग्नाच्या आधी त्याला स्वत:चा अभिमान वाटत होता. स्वत:वरच तो खूश होता. चांगल्या मार्कानी एम.बी.ए. पूर्ण करून एका मोठय़ा बँकेत फायनान्स मॅनेजर म्हणून तो काम करत होता. पण लग्नानंतरच्या या समस्यांनी तो हैराण झाला. मी कमी पडलो अशी भावना त्याला सतत खात होती. त्याला निराश वाटू लागलं.

पण अशा वेळी साराच्या आईने विलक्षण संयमाने साराला आणि अभिषेकला समजावलं. ती म्हणाली, ‘‘लग्न मोडणं खूप सोपं आहे. इतक्या छोटय़ा गोष्टींमुळे तुम्हा दोघांमध्ये अंतर पडू शकतं. आणि ते तुमच्या सहजीवनासाठी घातक ठरू शकतं. नीट बसून एकदा पैशाचं नियोजन करा. एकमेकांचं ऐकायला शिका. प्रत्येक महिन्यात खर्च किती करायचा आणि पैशाचं नियोजन कसं करायचं ते ठरवा. तुम्ही दोघेही शिकलेले आहात. शिक्षणामुळे आपली प्रगती व्हायला हवी. शिवाय दोघेही चांगल्या पदावर काम करीत आहात. त्यामुळे पैशाची चणचण जाणवणार नाही. अर्थात नियोजन केलेत तरच आणि सारा, तू माझ्याकडे सल्ला विचारायला आलीस तर जरूर ये पण तक्रारी सांगणार असशील तर येण्यापूर्वी दहा वेळा विचार कर आणि अभिषेक प्रत्येक बायकोला असं वाटतं की, नवऱ्याने माझं ऐकावं, तेव्हा तूही याचा विचार कर. अधूनमधून ऐकावं तिचं. काही दिवसांनंतर तुलाच अंदाज येईल तिच्या स्वभावाचा. हा अवधी दोघांनीही एकमेकांना द्यायला हवा.’’ दोघांनाही आपली चूक उमगली. अशा तऱ्हेचं त्या ठिकाणी थांबणं आणि विचारपूर्वक वागणं हे करायला हवं. मग ही वैचारिक मतभेदाची पोकळ पुंगी मोडली जाऊ शकते.

लग्न हे एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी नसून ते एका कुटुंबाचं दुसऱ्या कुटुंबाशी होत असतं. माझ्याकडे काय नाही यापेक्षा काय काय आहे याची यादी करणं याचाही उपयोग अशा वेळी होत असतो. कोणत्याही छोटय़ा कारणांमुळे विभक्त होण्यापूर्वी याचाही नक्की विचार करायला हवा. तोडून टाकणं हे तुलनेनं सोपं आहे. प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांच्या १९६१ मध्ये लिहिलेल्या ‘‘प्रेमा तुझा रंग कसा?’’ या नाटकातले निळूभाऊ या पत्राच्या तोंडी घातलेले एक वाक्य आहे, ‘‘अरे संसार म्हणजे काय पत्त्यांचा पोरखेळ समजलात की मनासारखी पाने हातात नाही आली तर दिला डाव उधळून.. अरे हातात येतील ती फतरी पाने घेऊन हा डाव जिद्दीने खेळला पाहिजे. त्यालादेखील अंगात हिम्मत असावी लागते.’’ त्या काळी लिहिलेली ही वाक्ये आज अधोरेखित करून परत परत शिकवण्याची गरज भासू लागली आहे, असं जाणवतं.

या नातेसंबंधातला कळीचा मुद्दा म्हणजे या विभक्त होणाऱ्यांना पुनर्विवाह करायचा असतोच. पुन्हा कधी लग्न करणार नाही अशी ‘भीष्मप्रतिज्ञा’ करणार असू आणि ती निभावून नेणार असू तर गोष्ट वेगळी. पण परत एकदा नव्याने पुन्हा सगळा संसाराचा डाव मांडायचा आणि परत नव्याने तडजोड करत राहायचं आणि त्यातही सगळं मनासारखंच मिळेल याची काय खात्री? आणि त्या नवीन माणसात वेगळे दोष असणार नं? परत नव्या तडजोडी.. नवीन गणितं.. आणि जर परत सगळं करायचं असेल तर आहे त्याच जोडीदाराबरोबर जुळवून घेता येऊ शकतं का, याचा विचार का करू नये? आपल्या जोडीदाराचे जाणवणारे दोष आता माहितीचे नाहीत का? स्वत:शीच थोडे थांबून विचार करता येऊ शकतो का? असं का घडतंय? दुसरा माणूस असा वागतोय त्यामागचा त्याचा विचार काय आहे? सहजपणे मला माझ्यात डोकावता येईल का? मला माझ्याशीच संवाद साधता येईल का? मीच मला स्वत:ला उलगडत नेऊ शकते का? आपण सांगत असलेलं क्षुल्लक कारणच मतभेदाच्या मुळाशी आहे की त्यामागे आणखी काही खोल दडलेलं आहे. खरं तर हेच काम शिक्षणाचं आहे. दोन दोन पदव्या घेतलेली ही मुले-मुली अशा रीतीने वागताना पहिली की, त्यांच्या शिक्षणाबद्दल शंका वाटायला लागते.

इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, ‘ल्ल६ल्लीि५्र’ ्र२ ुी३३ी१.. आपलंच दु:खाचं गाठोडं आपल्या ओळखीचं नाही का? आणि दु:ख काय आणि सुख काय शेवटी हे तर मानण्यावरच असणार ना? मग नवीन माणूस शोधायचा जोडीदार म्हणून आणि नव्याने त्याच्यातले दोष हुडकायचे.. त्यापेक्षा.. आधीच्याच जोडीदाराशी थोडं जुळवून घेता आलं तर? कारण ‘परफेक्ट पार्टनर’ ही एक कवी कल्पनाच आहे. तुम्हाला काय वाटतं?

– गौरी कानिटकर
gauri@anuroopwiwaha.com