शीला साबळे. महाड व रायगड जिल्ह्य़ातील औद्योगिक क्षेत्रातल्या प्रथितयश उद्योजिका. त्या उद्योजिका होण्यासाठी कारणीभूत ठरली एक भयानक घटना. त्यातून सावरून आज त्या उभ्या आहेत ते त्यांचे कष्ट आणि जोडलेल्या विश्वासू माणसांमुळेच. व्यवसायाचा तोल आणि ताल सांभाळणाऱ्या शीलाताई यांची उद्योगगाथा..
नि हास हास माझ्या जीवा असा संसारात हास
इडा पिडा संकटाच्या तोंडावरती काळ फास
सर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या पोटातून ओठापर्यंत आलेलं हे जीवनातलं प्रवाही मर्म. छोटय़ा छोटय़ा संकटांवर मात करणारं. जेव्हा जीवन उद्ध्वस्त करणारं, मन:स्थिती विदीर्ण होणारं, संसाराच्या ठिकऱ्या उडवणारं दारुण संकट नशिबी येतं तेव्हा काय? वाट गुडुप्प अंधारात हरवून जाते. मात्र त्या वाटेलाही प्रकाशमय केलंय महाडच्या यशस्वी उद्योजिका शीलाताई साबळे यांनी!
‘डी. जी. साबळे एंटरप्रायझेस’ कंपनीच्या अंतर्गत हिंदुस्थान युनिलिव्हर या जगन्मान्य कंपनीच्या उत्पादनाचे वितरण त्या करत आहेत. लाख रुपयांनी सुरू झालेला हा उद्योग आज कोटी आकडय़ांवर पोहोचलाय. आयुष्याची वाटचालही आता सुखावह आहे. मात्र त्यापूर्वीचं वीसेक वर्षांपूर्वीचं जीवन
मात्र कसोटी पाहणारं होतं. किंबहुना आजची वाट घडवणारं होतं..
‘‘आजही रोज रात्री ८ वाजता माझ्या मनाची बेचैनी वाढते. मनाच्या कोपऱ्यात दबा धरून बसलेलं ते थरारनाटय़ उसळी मारून वर येतं.’’ हे सांगताना शीलाताईंचे डोळे भरून आले होते. २० ऑगस्ट १९९४ची राखी पौर्णिमा. रात्री मुलींना आजी-आजोबांकडे ठेवून महाडला स्वत:च्या घरी शीलाताई आणि त्यांचे पती आले. थोडय़ाच वेळात घरावर दरोडा पडला. ती रात्र काळरात्र ठरली. व्यवसायाचे सर्व पैसे दुपारीच भरल्याने पाच रुपयेही घरात नव्हते. ‘‘पैशाच्या लोभाने माझ्या डोळ्यादेखत दरोडेखोरांनी यांना ठार केलं. माझ्यावर सुरा धरून एकजण उभा होता. मी काहीच करू शकले नाही. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते क्रूर तांडव अजूनही डोळ्यासमोरून जात नाही.’’ शीला साबळेंच्या तोंडून हे एकताना पैसा एवढा घातक असतो हे ऐकून मन सुन्न झालं.
पोलादपूरला राहाणारं हे साबळे कुटुंब. मुलींच्या शिक्षणासाठी महाडला आलं होतं. शेखर साबळेंनी ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’ची एजन्सी घेतली होती. छानसं घर बांधलं होतं आणि पाच-सहा महिन्यांतच त्यांच्या जाण्यानं सगळा कारभार आटपला. या वेळी शीलाताईंचं वय होतं अवघं ३२ वर्षे. त्या म्हणाल्या, ‘‘व्यवसायातलं ओ की ठो माहीत नव्हतं. ते समजून घेण्याचा विचारच कधी मनात आला नव्हता. हे जाऊन पंधरा दिवस झाले नाहीत तो देणेकरी दारात हजर झाले. कोणी म्हणे १ लाख देणं आहे तर दुसरा सांगे ५० हजार तर तिसरा ४० हजार मागायला हजर होई. हे सर्व ऐकण्याची ताकदच नव्हती. आम्ही सर्वच एकमेकांना सांभाळत होतो. मुली तर फारच खचून गेल्या होत्या.’’ हे सर्व देणेकरी तुम्हाला फसवत होते का? असं मी विचारताच त्या म्हणाल्या, ‘‘छे. छे. यांनी घरासाठी पैसे घेतले होते. परमेश्वर स्वत:कडे घेऊन जाताना सूचना देतो की काय ठाऊक नाही. या घटनेच्या आदल्याच दिवशी त्यांनी मला जबरदस्तीने बसवून सर्व कागदपत्रे, व्यवहार समजावून सांगितला होता.’’ ज्यांच्याकडून पैसे उधार घेतले होते, त्या सर्वानाच एक वर्ष थांबायची त्यांनी विनंती केली. त्यांनीही मोठय़ा मनानं ते मान्य केलं आणि नंतर शीलाताईंनीही आपला शब्द पाळला.
प्रचंड नैराश्य, आर्थिक चणचण, मुलींसाठी हसऱ्या चेहेऱ्यानं उभं राहाणं अशी त्यांची भावनिक कसरत सुरू झाली. माहेरचं आर्थिक नव्हे, पण मानसिक पाठबळ होतं. पैसा उभारण्यासाठी नवऱ्याचाच व्यवसाय सुरू ठेवायचा हे त्यांनी ठरवलं. संगणक शिकणं, व्यवसायातील अगदी छोटय़ा-छोटय़ा गोष्टी जाणून घेणं असा प्रवास सुरू झाला. व्यवसाय सुरू ठेवायचा ठरवला तरी मोठी अडचण म्हणजे हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनी हा व्यवसाय एका स्त्रीला द्यायला तयार होईना. ‘‘पण ‘एक वर्ष तरी मला संधी द्या’ अशी मी केलेली विनंती कंपनीने मान्य केली.’’ शीलाताई सांगत होत्या. लगेचच त्यांनी बँक गाठली. बँकेनेही कर्ज मंजूर केलं आणि त्यांचं आत्मबळ वाढलं.
व्यवसाय सुरू ठेवल्यानंतरही संकटांचे मनोरे उभे रहातच होते. त्यांचं मन मात्र म्हणत होतं देवानं दरोडेखोरांच्या हातून वाचवलं, व्यवसायाची मुख्य अडचणही दूर झाली म्हणजे त्या जगत्नियंत्याला माझ्याकडून काही तरी करवून घ्यायचंय. सर्वात प्रथम त्यांनी निश्चय केला, आपण सत्शील, सत्प्रवृत्त मार्गानेच पुढे जायचं. आपला शांतपणा ढळू द्यायचा नाही. स्वाभिमान जपायचा.
महाडसारखं शहर. जुन्या रूढींचा पगडा, तरुणवय त्यात वैधव्य. नवरा नसताना ही बाई बाहेर पडतेच कशी? बँकेत, कंपनीत जाऊन पुरुषांशी व्यवहार करते हे योग्य आहे का? घरात पापड, लोणची करून पैसे मिळवता येत नाहीत का? त्यासाठी बाहेर मिरवायला कशाला हवं? लोकांच्या अशा अनेक शंकांना त्यांनी मनाआड केलं. घरातल्यांचा मात्र भक्कम आधार होता. दोन सानुल्यांचं भवितव्य घडवायचं होतं..
त्या स्वत: हुशार असूनही बारावी झाल्या झाल्या त्यांचं लग्न झालं होतं. त्याची पुनरावृत्ती मुलींबाबत नको होती. प्रथम मोठी बहीण व तिचे पती दोन र्वष त्यांच्याकडे राहायलाच आले. त्यांच्या येण्यानं भक्कम आधार मिळाला. ‘डी. जी. साबळे एंटरप्रायझेस’ची वाटचाल सुरू झाली. कामाच्या दृष्टीने महाडचे तीन भाग केले. रोजच्या लागणाऱ्या वस्तूंचं वितरण करायचं ठरलं. मालाच्या याद्या कंपनीकडे पोहाचवणं, आलेला माल बॉक्समध्ये भरायचा व टेम्पोमधून तो त्या त्या दुकानात पोहाचवायचा. दिवसभर हे काम पुरायचे. सकाळी ९.३० ते रात्री १० पर्यंत कसरत सुरू. महाडला भरपूर सुपर मार्केट्स आहेत. त्यांना माल पोहोचवल्यावर १५ दिवसांनी पैसे येतात. कंपनीत मात्र आधी पैसे, मग माल. माल ठेवायला चांगलं गोदाम लागतं. कंपनीच्या नियमाप्रमाणे जेवढी ऑर्डर आहे, त्याच्या निम्मा माल नेहमीच गोदामामध्ये हवाच. त्यांची माणसं केव्हाही अचानक भेट देतात. म्हणजे २५ लाख रुपयांची ऑर्डर असेल तर १२-१३ लाख रुपयांचा माल गोदामामध्ये हवा. माल भरण्यासाठी बँकेचे सहकार्य खूपच मिळते. काही दुकानदारही मदत करतात. अर्थात् शीलाताईही एखाद्याने महिन्याने पैसे दिले नाही तरी त्याचा माल अडवत नाहीत. तसंच कंपनी जेव्हा जास्त माल खपवण्यासाठी मागे लागते तेव्हा काही दुकानदार जास्त माल घेऊन ठेवायलाही तयार होतात.
स्थिरस्थावर झाल्यानं आता अनेक अडथळे दूर झाले आहेत. ‘तुम्हाला कोणी फसवलं का?’ विचारताच, ‘‘नाही. माझ्याकडे कामाला असलेल्यांपैकी कोणीही नाही,’’ शीलाताई सांगतात. एक लाखापासून सुरू केलेला हा व्यवसाय आज कोटींच्या घरात आहे. ६७५ उत्पादनांची त्या विक्री करतात. साबण, सौंदर्यप्रसाधन, खाद्यपदार्थ, तेल अशा अनेक विभागांतील मालाच्या त्या वितरक आहेत. व्यवसायाचा कल्पवृक्ष सांभाळण्यासाठी आता अनेक विश्वासू मदतीला हात आहेत. जुनीजाणती चार मुलं व नवीन चार मुलं सर्वच कारभार सांभाळतात. त्यांच्याकडे कुलूप हा प्रकारच नाही. विश्वास हेच अदृश्य कुलूप. सर्वच कारभार ही मुलं शिस्तबद्धपणे करतात. इतकंच काय त्या अमेरिकेला गेल्यावरही ही मुलंच सर्व सांभाळतात. तसंच त्यांचे मोठे दीर शिरीषभाईही खूप मदत करतात. जो स्वत:ला मदत करतो त्याला जग मदत करतं याचं शीलाताई या उत्तम उदाहरण आहेत. आज त्या कृतकृत्य, कृतार्थ आहेत. मोठी मुलगी शलाका
सी.ए., एम.बी.ए. झाली आहे. जावई इंजिनीअर. धाकटी स्नेहल व तिचे पतीही इंजिनीअर. दोघीही अमेरिकेत आहेत.
शीलाताई महाड व रायगड जिल्ह्य़ातील औद्योगिक व आर्थिक क्षेत्रात प्रथितयश उद्योजिका म्हणून नावाजल्या जातात. ‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या प्रमुख वितरकाचा परवाना त्यांच्याकडे आहे. याहून मोठी पावती ती काय? त्यांना आतापर्यंत विविध २२ पुरस्कार मिळाले आहेत. त्यात २०११ चा ‘आम्ही उद्योगिनी’ पुरस्काराचाही समावेश आहे. महाड को. ऑप. अर्बन बँकेच्या संचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सल्लागार असे अनेक पदाधिकार त्यांच्याकडे आहेत. या यशस्वी प्रवासात मुली व सासर, माहेरच्या सर्वाचीच सतत साथ मिळाली हे सांगताना त्यांच्या डोळ्यात प्रचंड कृतज्ञता दिसत होती. श्रेष्ठत्वाची जाण त्यांना होती तरी त्यात अहंभाव नव्हता. त्यांची यशोगाथा ऐकताना त्यांच्यातील असामान्य धैर्याची प्रचीती येते.
सुलभा आरोसकर- sulabha.aroskar@gmail.com