|| मेघना वर्तक

परदेशात आणि देशात राहणाऱ्या आपल्याच मुलांमध्ये पडत जाणाऱ्या अंतरामुळे कुतरओढ होणाऱ्या आईवडिलांचा प्रश्न सध्या वाढत चालला आहे. त्यांची अवस्था अडकित्त्यातील सुपारीसारखी झाली आहे. काही चुकतंय का, नात्यांमध्ये, विचारांमध्ये?.. १५ मेच्या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनानिमित्त खास लेख…

How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
New Year Welcome Kalyan,
कल्याण, डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रांचा उत्साह; ढोल ताशांचा गजर, कलाकारांची उपस्थिती
नात्यातील ताण्याबाण्यांची गंमत
balmaifal story for kids why we celebrate gudi padwa as a new marathi year
बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा

मराठीत म्हण आहे, ‘साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा!’ बदलत्या काळाप्रमाणे या म्हणीत बदल करत म्हणावं लागतंय, ‘परदेशी मुले येती घरा, तोची दिवाळी दसरा!’ शहरातील सुखवस्तू घराघरांतून आज हेच चित्र दिसते आहे. सणा वाराला आईवडील घरात एकटेच असतात, पण परदेशातून मुले जेव्हा येतात, तेच दिवस सण म्हणून साजरे होतात. पण या सणाचा आनंद संपूर्ण कुटुंबाला एकत्र उपभोगता येतो आहे का?  रक्तातल्या नात्यात केवळ एक जण परदेशी आणि एक जण देशी राहात असल्याने कडवटपणा येतो आहे का? त्यामुळे आईवडिलांची अवस्था अडकित्त्यातील सुपारीसारखी झाली आहे का? त्यांच्या आयुष्याचा उत्तरार्ध तडजोडीतच जातो आहे का? काही चुकतंय का नात्यांमध्ये, विचारांमध्ये, अनुभवांमध्ये?

लेले यांच्या घरात आज दिवाळीच होती. नीता-सुजयचा धाकटा मुलगा अभिजीत अमेरिकेहून आला होता. नीताची महिनाभर आधीपासून धावपळ सुरू होती. अभिजीतला हे आवडतं, सुनेला ते आवडतं. नातवंडांसाठी तर काय काय पदार्थ तिने बनवले होते. तिच्यासाठी तर आज जणू लग्नघरच बनलं होतं. त्यांचा मोठा मुलगा नीरज मुंबईतच त्याच्या कुटुंबासह वेगळा राहात होता. भाऊ आलाय म्हणून आज तोही आला होता सहकुटुंब आईबाबांकडे! पण त्याची अस्वस्थता त्याच्या वागण्याबोलण्यातून समजत होती. आईवडिलांच्या प्रश्नाला तो धडपणे उत्तरही देत नव्हता. धाकटय़ा भावाचे कोडकौतुक तो बघत होता, मनात कोठे तरी कडवटपणा निर्माण झाला होता. आपण दुर्लक्षिले जात आहोत, हे काही काळापासून वारंवार त्याच्या मनात येत होते. त्यात बायकोच्या- वृंदाच्या बोलण्याची आणखी भर पडत होती. ती तर सारखी चिडून बोलतच होती. ‘‘तू काय इथेच आहेस, तुझा भाऊ काय अमेरिकेहून आला आहे. पैसे, शिक्षण सर्व त्याच्याकडे आहे. आम्ही आपले बसलो आहोत इथेच, आईवडिलांची सेवा करत. आम्हाला काही किंमतच नाहीऽऽऽ’’ आणि या सर्वामुळे बऱ्याच काळानंतर मुलगा भेटल्याच्या नीता-सुजयच्या आनंदावर विरजण पडत होते. निर्भेळ आनंद उपभोगता येत नव्हता. खरं म्हटलं तर नीता-सुजयने दोन मुलांत कधीच भेदाभेद केला नव्हता; पण धाकटा लांब होता, नेहमी जवळ नसतो, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत अभिजीतचेच नाव होते; पण याचमुळे दोन भावांत दुरावा निर्माण झाला होता.

सगळ्याच नाही पण बऱ्याच घरांत ही परिस्थिती बघायला मिळते आहे. खरं म्हटलं तर भारतात राहणारा मुलगाही चांगला नोकरीधंदा करतोय, त्याचे सर्व काही चांगले चाललेले असते. एरवी त्याचेच कौतुक होत असते; पण परदेशातील भाऊ  आला, की सर्वाच्या प्रेमाचा तो केंद्रबिंदू ठरतो. त्यांनी आणलेल्या भेटवस्तू, त्यांचे कपडेलत्ते, देशाबाहेर एकटे राहून वागण्या चालण्यात आलेला आत्मविश्वास, आलेला बेदरकारपणा नकळत दुसऱ्या भावंडांना सलू लागतो. भारतातील भावाचं वेगळं असं आतिथ्य होत नाही, तो महत्त्वाचा, त्याचे मत महत्त्वाचे, त्याचे कुटुंब महत्त्वाचे, असे विचार दुरावा निर्माण करतात. तसं पाहिलं तर भावंडांमध्ये कमीजास्त असतेच. हाताची पाच बोटे कधीच सारखी नसतात. त्यामुळे कळत नकळत तुलनाही होतंच असते; पण त्याची तीव्रता एवढी नसते. पण एक मूल परदेशात आणि त्यातही अमेरिकेत असेल तर आईवडिलांना कौतुक वाटते, पण  भावंडांमध्ये वेगळीच असूया निर्माण होते.

विसावे शतक उजाडले. इंटरनेटचा शोध लागला, जग जवळ आले. आयटी क्षेत्राने तर भारताचे रूपच पालटले. भारतातच मुलांना भरघोस पॅकेज मिळू लागले. नोकरीच्या निमित्ताने जगभर हिंडण्याची संधी मिळू लागली आणि मुख्य म्हणजे अमेरिका म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’ हे आजपर्यंत सर्वाच्या लक्षात आले आहे. सर्व कमाई टॅक्सेसमध्ये खर्च होते. भारतापेक्षा तिथे राहणीमान चांगले म्हणून सुरुवातीला ठीक वाटते, पण हळूहळू खाचखळगे जाणवू लागतात. कामाला माणसे मिळत नाहीत, सांस्कृतिक फरक अस्वस्थ करतो, कारण मुले मोठी होऊ  लागलेली असतात; पण परतीचा मार्ग बंद झालेला असतो. ‘ना घर का ना घाट का’ अशी अवस्था झाल्याने, तिथे आयुष्य घालवतात, नव्हे रेटतात आणि म्हणूनच अमेरिकेबद्दलची पूर्वीची स्वर्गाची कल्पना पार बदलली आहे. त्यांना भारतात राहणाऱ्याविषयी कौतुक वाटायला लागतं, पण इथे राहणाऱ्यांना त्याची फारशी कल्पना नसते. साहजिकच तुलना होत राहते आणि दुरावा येतच जातो. त्यात सर्वात मोठी कुचंबणा होते आहे ती आईवडिलांच्या जीवनात. लहानपणी एकमेकांसाठी खाऊ  राखून ठेवणारी, एकाला दुखलं तर दुसऱ्याच्या डोळ्यांत पाणी येणारी, एकमेकांसाठी दुसऱ्या मुलांशी भांडणारी हीच का ती भावंडे? कुठे लुप्त पावले ते प्रेम, तो जिव्हाळा? आईवडिलांची भिंत मध्ये आहे आत्ता, पण नंतर ते विचारतील का एकमेकांना, असे प्रश्न निर्माण होतात.

नुकतीच सुचिता भेटली होती. गप्प-गप्पच होती. खोदून खोदून विचारताच तिचा बांध फुटला. ‘‘अगं, लीना आणि जावई अमेरिकेहून सुट्टीवर येण्याची मी किती वाट बघत होते; पण त्या दिवशी समीरचे बोलणे ऐकले आणि वाटले, ही न आली तर बरे! कारण त्याचे म्हणणे एकच की, तिचे कोडकौतुक तू जास्त करतेस. मी तुझा मुलगा आहे की नाही अशी शंका येते. परदेशातून येते म्हणजे काय मोठे दिवे लावले का? तुम्ही माझ्या वेळी खर्च करायला तयार नव्हतात. नाही तर मीही गेलो असतो परदेशात. तुम्ही माझे नुकसान केलेत. त्याची बायको त्याची री ओढत होती. ‘त्यांना सांगा तुमची काळजी घ्यायला. दुखलं-खुपलं तर आम्हीच का करायचं? इथे तुम्हाला झाले तर, तुमचे करायला आम्ही. फारच फार तर तिकडून पैसे ट्रान्फर करतात. पैशाने गोष्टी होतात का?’ मुलगा- सुनेच्या या वागण्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी, असा सुचितासमोर प्रश्न पडलाय. कारण स्पष्ट बोललं तरी तेही मुलांना पटतं असं नाहीच.

खरं तर परदेशातील मुले तरी समाधानी असतात असे कुठे आहे? त्यांच्याही मनात कुठेतरी काहीतरी खुटखुटत असतेच. आणि तेही त्यांचा राग असमाधान आई-वडिलांजवळ व्यक्त करतातच. परदेशातील मुलांना नेहमी असेच वाटत असते की, भारतात राहणाऱ्या मुलांना आई-वडील सर्व मदत करतात, हवं-नको बघतात, त्यांच्या अडचणीला धावून जातात, आम्हाला इथे कोणाचीच मदत नाही, कामाला माणूस मिळत नाही, दिवसभर नुसते कामाच्या गाडय़ाला जुंपलेले असतो. नातवंडांना आजी-आजोबांचे प्रेमच मिळत नाही. मुले एकटीच घरी असतात किंवा लहान असतील तर डे-केअरमध्ये असतात. त्यामुळे भारतात आल्यावर या मुलांची अपेक्षा असते की आईवडिलांनी संपूर्ण वेळ आम्हाला दिला पाहिजे. नातवंडांना दिला पाहिजे. पण हीच मुले आई-वडील जेव्हा परदेशात त्यांच्या घरी जातात, तेव्हा त्यांना असतो का वेळ, एक दिवस तरी रजा घेऊन घरी बसायला? किंवा भारतात राहणाऱ्या मुलांकडेसुद्धा चार घटका आईवडिलांशी गप्पा मारायला वेळ असतो का? पण तरीही आई-वडील आपल्या परीने वेळ द्यायचा प्रयत्न करतातच. परदेशी जाणं न जाणं, तिथे कायमचे राहणे न राहणे, हा सर्वस्वी मुलांचा निर्णय असतो. त्यामुळे त्यावरून कुरकुर करून आईवडिलांना दोष देण्यात अर्थ नसतो, पण..

परदेशातील मुलीचं वा सुनेचं बाळंतपण करणं हे आणखी एक कर्तव्य आई-वडिलांना हसतमुखाने पार पाडावे लागते. खरं तर नातवंडांच्या आगमनाची ते आतुरतेने वाट बघत असतात. पण परदेशात बाळंतपण करणे हे खरोखर एखादे शिवधनुष्य पेलण्यासारखेच असते. पैसे खर्च केले तर आपल्या देशात कामाला चार बायका मिळतात, पूर्वी परदेशात तेही शक्य होत नसे. कारण तिथे ‘लेबर’ प्रचंड  महाग आहे. आज परिस्थितीत थोडा बदल झाला आहे. क्लीनिंग कंपनीची माणसे येऊन काम करून जातात. तसेच भारतीय बायकाच घरगुती जेवणाचे डबे बनवून देतात. या दोन्ही गोष्टींमुळे खूप मदत होते, पण त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. तो आवश्यक खर्च आहे. पण काही मुले तिथेही पैसे वाचवतात. आई असू दे किंवा सासू दोघींनाही वयानुसार कामे होत नाहीत, पण त्यांना गृहीत धरलं जातं. कदाचित पहिल्या बाळंतपणात चालून जातं कारण आई-वडीलही फार वृद्ध नसतात. पण नंतरच्या खेपेला किंवा दोनपेक्षा जास्त मुलांच्या घरी जायचे असेल तर मात्र दमछाक होतेच.

नुकताच घडलेला प्रसंग आठवला. माझी मैत्रीण, अनघा त्या दिवशी खूपच अस्वस्थ होती. अखेर मनावरचे दडपण असह्य़ होऊन ती सांगू लागली.. ‘‘माझ्या दोन्ही मुली दिव्या आणि सौम्या गरोदर आहेत. तुला माहीत आहेच, दोघी दोन टोकाला आहेत. एक बेंगळूरुला तर दुसरी जर्मनी. दोघींची डिलिव्हरी जवळपास एकाच वेळी येतेय. आता मी काय करू? हिच्याकडे जावे तर ती रागवेल आणि तिच्याकडे गेले तर ही. दिव्या आत्ता बोलणार काही नाही, नंतर स्वभावाप्रमाणे आयुष्यभर मला ऐकवत बसेल! सौम्या तोंडाने बोलणार नाही, पण कृतीतून दाखवत राहील आणि शेवटी आमचा ओढा कोणाकडे आहे याचा मापदंड ती स्वत:च ठरवून मोकळी होईल. यांना त्या देशाचे नागरिकत्व हवे म्हणून भारतात येऊन बाळंतपण करायला कोणी तयार नसते. पण यात आईची, सासूची किती फरफट होते याचा विचार या मुली करतात का? परदेशातल्या मुलीकडे जायचे ठरवले तर भारतातील मुलगी बोलणार, ‘हो! आमची कोणाला किंमत नाही. ती काय मोठी माणसं,  त्यांचे कौतुक जास्त.’ खरं तर मला परदेशातही जायचं नाही, कारण एवढा लांबचा प्रवास, तिथल्या हवामानाशी जुळवून घ्यायचे, स्वत:च्या घरातला मोकळेपणा तिथे नसतो, शिवाय कामाचा भार एकटीवर पडतो, पण मुकाटपणे उसने हसू तोंडावर आणून वावरावे लागतेच. पण जेव्हा अशी द्विधा परिस्थिती निर्माण होते,तेव्हा मनाची जी घालमेल होते, ती  या मुलींना कळणारच नाही का?’’ अनघाचं दु:ख पटणारं होतं. आपल्या मुली आई होणार आहेत ही बातमी खरं तर अतिशय आनंदाची. पण आनंदाआधीच हजार गोष्टींचे दडपण, चिंता आणि भीती त्यांचे मन पोखरून टाकते. आणि ही सर्व भीती ओठांच्या बाहेर डोकावणार नाही याची सतत काळजी घ्यावी लागते. बाळंतपणच नाही तर त्यानंतरही अनेक गोष्टी असतातच. माझी मैत्रीण नीलाला तिच्या मुलीचा, प्रियाचा फोन आला. ‘‘आई, मला प्रमोशन मिळत आहे. पण त्यासाठी मला सहा महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी दुसऱ्या स्टेटमध्ये जावे लागणार आहे. तुला ६ महिन्यांसाठी इथे येऊन राहावे लागेल, म्हणजे मला दोन्ही मुलांची काळजी राहणार नाही. कारण दीपक दिवसभर ऑफिसमध्ये असेल!’’ नीला एकदम थबकलीच! लेकीने तिला चक्क गृहीत धरले होते. सहा महिन्यांचा कालावधी मोठा होता आणि नीलाचा नवरा त्याचा बिझनेस सोडून एवढा काळ परदेशी राहू शकणार नव्हता. आता या वयात तब्येतीच्या दृष्टीने दोघांचीही फार काळ एकेकटे राहायची तयारी नव्हती. पण नाही म्हणायचीही सोय नव्हती. नाहीतर लागलीच बरेच काही ऐकावे लागले असते. कारण नुकतेच तिने चार महिने मुंबईतल्या नातवंडांना सांभाळले होते, मुलगा जेव्हा ‘बिझनेस टूर’वर गेला होता तेव्हा! बरोबरी तर झालीच असती. तिलापण समजत होते की मुलीला एवढी मोठी संधी आली आहे तर आपण मदत करावी. आयुष्यभर मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी तर प्रत्येक आई-वडील धडपडतच असतात. पण जसजसे वय वाढत जाते, गात्रे थकतात त्या वेळी प्रत्येक कामाला मर्यादा येते. मनातून कितीही इच्छा असेल तरी शरीर साथ देत नाही. शिवाय आयुष्यातील ही अशी वेळ असते की, आईवडिलांना एकमेकांची साथ द्यावयाची असते. संपूर्ण आयुष्य धावपळीत गेलेलं असतं. याच काळात थोडा निवांतपणा लाभत असतो.

एकमेकांना वेळ देणं, एकमेकांना समजून घेणं याच काळात खऱ्या अर्थी घडत असतं आणि त्यासाठी एकमेकांना भावनिक साथ लागते. पण ही गोष्ट मुलांच्या लक्षात येत नाही की लक्षात येऊनही ते दुर्लक्ष करतात हे त्यांचे तेच जाणे.

आईवडील मुलांचे हक्काचे असतात.  रुसायला, मनापासून प्रेम करायला, आनंदाचे, दु:खाचे क्षण त्यांच्या बरोबर शेअर करायला! पण जेवढय़ा हक्काने एखादी गोष्ट मागितली जाते तेवढय़ाच हक्काने मुलांकडून त्यांच्या सुखदु:खाची जाणीव ठेवली जाते का? हाही प्रश्न आहे. म्हणूनच एकटय़ा रहाणाऱ्या पालकांचा ‘एम्प्टी नेस्ट सिंड्रोम’चा प्रश्नही वाढत चालला आहे.

मान्य आहे की परदेशात जाऊन नवनवीन शिक्षण आत्मसात केलेच पाहिजे, कारण तरच स्वत:ची, महाराष्ट्राची, देशाची प्रगती होऊ  शकेल. पण त्याचबरोबर हे समजण्याची परिपक्वता आली पाहिजे की आत्तापर्यंत आई-वडिलांनी आधार दिला. त्यांचे बोट धरून आपण लहानाचे मोठे झालो, आता त्यांना आपल्या आधाराची गरज आहे. दुर्दैवाने आजही कोणतेच आईवडील स्वत:हून ही होत असलेली कोंडी, कुचंबणा जगापुढे मांडणार नाहीत. म्हणूनच मुलांनीच हे जाणून घेतलं पाहिजे, उद्याच्या ‘मदर्स डे’निमित्ताने आणि ‘आंतरराष्ट्रीय कुटुंब दिना’निमित्ताने अडकित्त्यात अडकलेल्या आई-वडिलांची आपणच सुटका करायला हवी. तेच या दिवसांचं खरं महत्त्व ठरेल.

meghana.sahitya@gmail.com

chaturang@expressindia.com