18 January 2019

News Flash

शाळा निवडताना..

जानेवारी महिन्याचे दिवस. स्नेहसंमेलनाची गडबड नुकतीच विरली होती.

|| रती भोसेकर

शाळा मुलांवर अभ्यासाचं दडपण आणत आहे का? याबाबत पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे. त्यासाठी एखादी शाळा भरपूर पुस्तकं लावून ती पूर्ण करवून घेते म्हणजे छान हा समज काढून टाकायला हवा. त्याला खऱ्या जगापासून शब्दांच्या जगात नेत आहोत हा धोका ओळखायला हवा. सजग विचार करणारे पालक आजही विरळाच, बहुतेक सगळे प्रवाहाबरोबर वेगाने जाणंच पत्करतात. ते मुलांच्या दृष्टीने घातक ठरतं. येत्या आठवडय़ात शाळा सुरू होत आहेत, त्या निमित्ताने..

जानेवारी महिन्याचे दिवस. स्नेहसंमेलनाची गडबड नुकतीच विरली होती. आता शाळेला वेध लागले होते नवीन प्रवेशाचे. नर्सरीचे प्रवेश. प्रवेश वय वर्ष तीन. यथावकाश सगळी प्रक्रिया पुढच्या चार आठवडय़ांत पार पडली. आणि प्रवेशाची यादी लागली. ज्यांच्या मुलांना प्रवेश मिळाला होता त्यांचे चेहरे आनंदाने फुललेले. हव्या त्याच शाळेत प्रवेश मिळाल्याचं समाधान चेहऱ्यावर झळकत होतं. ज्यांना प्रवेश मिळाला नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न. पहिला प्रश्न म्हणजे, ‘आमच्या मुलाने तर सगळी उत्तरं दिली होती. तरी त्याला का प्रवेश मिळाला नाही? अजून आम्ही त्याचं काय करून घ्यायला हवं?’

सर्वसाधारणपणे प्रत्येक घरात मूल दोन वर्षांचं झालं की त्याच्या प्रवेशाचे वेध सगळ्या घराला लागतात. असंही म्हणतात की मूल जन्माला येण्यापूर्वीच त्याच्या शाळेची चर्चा घरात सुरू होते. यातील विनोदाचा भाग सोडला तर खरोखरीच अशी परिस्थिती नसते, असं आपण म्हणू शकत नाही. पूर्वीपेक्षा हल्ली पालक मुलांच्या शिक्षणाबाबत जरा जास्तच जागरूक झाले आहेत, असं वाटण्याजोगी परिस्थिती दिसत आहे. शाळा निवडीसाठी अनेक पातळ्यांवर पालकांचे विचारविनिमय सुरू होतात. पहिला चर्चेचा विषय असतो तो म्हणजे माध्यम कुठलं? मग माध्यमाबाबत जर इंग्रजी हे नक्की असेल तर बोर्ड कुठलं? किंवा कुठल्या बोर्डाची कुठली शाळा छान आहे? त्याप्रमाणे त्या सगळ्या शाळांमध्ये अर्ज भरण्याची तयारी सुरू होते. शाळा चांगली याबाबत मात्र पालकांचा मुख्य जोर असतो तो जी शाळा मुलांची तयारी चांगली करून घेते ती शाळा उत्तम. तयारी म्हणजे अर्थातच लिहिणे, वाचणे प्रामुख्याने हे ओघाने आलेच. मग अर्ज भरले की प्रवेशासाठीच्या मुलाखतीची मुलाची तयारी सुरू होते. मुलांचा रंग, आकार, प्राणी, पक्षी, वाहनं या आणि अशा अनेक गोष्टींचा अभ्यास सुरू होतो. आणि त्यानंतर जर प्रवेश यादीत नाव लागलं नाही की वरच्या प्रश्नाने पालक अजून ग्रासून जातात. अजून काय ‘करवून’ घ्यायला हवं?

मला आठवतं, एक तरुण आई आणि वडील माझ्या कार्यालयात आले होते. त्याच्या मुलीला आमच्या शाळेत प्रवेश मिळाला नव्हता. ‘‘तिने उत्तरं खूप छान दिली होती. तरी तिला का प्रवेश मिळाला नाही?’’ असं त्यांचं व्याकूळ होऊन म्हणणं होतं. शेवटी म्हणाले, ‘‘बाई, कसंही करून प्रवेश द्याच. याच शाळेत घालायचं आहे आम्हाला. मराठीतून शिकवायचं तर याच शाळेत घालणार.’’ दोघेही मला आलटून पालटून हेच सांगत होते. मी माझं नेहमीचं उत्तर देत म्हटलं, ‘‘अहो, त्याच्या उत्तर देण्याचा आणि प्रवेशाचा खरोखरीच काहीही संबंध नसतो. मुलांना फक्त एकदा नजरेखालून घालायचं असतं. सगळी मुलं छानच असतात. पण सगळ्यांना नाही ना प्रवेश देता येत. एकूण फक्त एकशेवीस जागा भरायच्या म्हटलं की असं होतंच. दुसऱ्याही शाळा आहेत ना. तिथेही प्रवेश सध्या चालू आहेत.’’ यावर त्याच्यातील एक जण उत्तरला, ‘‘नाही बाई. याच शाळेत प्रवेश हवा आहे. नाही तर आम्ही तिला इंग्रजी शाळेत घालू.’’ मी चमकून त्यांच्याकडे बघितलं. ती मला त्यांनी दिलेली धमकीच वाटली. कारण एका लहान मुलाला मातृभाषेतून शिक्षण मिळण्यापासून मी आड येत आहे, असं काहीसं मला उगीचच वाटायला लागलं. स्वत:ला कसंबसं सावरून मी त्यांना पाठवून दिलं.

असे असंख्य पालक त्या काळात सतत भेटत असतात. कधी कधी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच मार्गदर्शनासाठी येतात. काही ठाम पण बहुतेक जण खूप गोंधळलेले. त्यातून पहिलंच पाल्य असेल तर पहिलटकरणीला मिळणाऱ्या सूचना सल्ले यांचा जो गोंधळ असतो, तशा खूप सूचना सल्ले मिळाल्यामुळे गोंधळलेले पालक असतात. माध्यम मराठी निवडलं असेल तर मग त्यांना आप्तांनी खूप भेडसावलेलं असतं. पुढे जाऊन त्यांच्या मुलाच्या इंग्रजीची काळजी त्यांना ग्रासून टाकत असते. त्याच्यात येणाऱ्या सो कॉल्ड न्यूनगंडाची काळजी वाटत असते. जे कोणी इंग्रजी माध्यम निवडतात त्यांना बोर्ड कुठलं असावं याची काळजी. कारण एस् एस् सी बोर्डापेक्षा इतर बोर्ड वरचढ असा जनमानसाचा रेटा. त्यामुळे तिथेही संभ्रमावस्था. बहुतेक पालकांची अशी विचारसरणी असते की अमुक एका बोर्डाची ही शाळा मिळाली पाहिजे किंवा एखाद्या माध्यमाची ही शाळा मिळाली तरच त्या माध्यमाची निवड करू. विशेषत: मातृभाषेचं माध्यम निवडायचे असेल तर ही विचारसरणी नक्कीच असते. एकूण कुठे जाऊ  आणि काय निवडू यात पूर्ण घर अडकून जातं.

बरं कित्येक वेळा अशी अपेक्षा असते की, मुलांना शाळेत घातलं ती एकदम चमत्कार होऊन त्यांच्यात आमूलाग्र बदल हवा असतो. त्यात लाखोंची फी भरलेली असेल तर मग तर हा चमत्कार झालाच पाहिजे हा अट्टहास असतो. ती अपेक्षा जर एखादी शाळा पूर्ण करू शकली नाही म्हणजे आपले पैसे फुकट गेले असं समजून मुलाला वेगळ्या शाळेत घातलं जातं. कारण हल्ली अनेक शाळा गल्लोगल्ली आहेतच. तिथे टाकलं की मुलांवर प्रयोग सुरूच. मूल नेमकं कसं शिकतं याचा विचार करायला ना त्या शाळेला फुरसत ना पालकांना. आणि ज्यासाठी हा आटापिटा चाललेला असतो तो आपल्या विश्वात स्वत:मध्ये मग्न असतो.

आता हे सगळं बाजूला ठेवून, शांतपणे जर विचार केला तर, तीन र्वष वयाचं मूल जेव्हा घर सोडून बाहेरच्या जगात पाऊल टाकतं तेव्हा त्याला नेमकं काय हवं असते? प्रेम, सुरक्षितता, मोकळेपणा? की बंधन, दप्तराचं ओझं, वह्य़ा किंवा वर्कशीटस् पूर्ण करणं. मूल शिकतं म्हणजे नेमकं काय होतं याचा आपण सखोल विचार करणं गरजेचं आहे. त्याला खरोखरच सगळ्या गोष्टी शिकवण्याची गरज असते का? खरं सांगायचं तर मूल आपलं आपण शिकत असतं. मला आठवतं, माझा पुतण्या अडीच तीन वर्षांचा होता. त्या वेळी तो अनेक गोष्टी त्याला मुद्दाम कुणी न शिकवता करत असे आणि आम्ही त्याला विचारलं, ‘‘अरे तुला हे कोणी शिकवलं?’’ की त्याचं उत्तर असे, ‘‘मी आपलेआप शिकला.’’ किती समर्पक उत्तर होतं त्याचं. ‘आपलेआप शिकला.’ किती समर्पक उत्तर होतं त्याचं. मूल आपल्याला त्याच्या प्रत्येक कृतीतून, त्याच्या आपल्या मते निर्थक खेळामधून हेच सांगत असतं की, ‘मी आपलेआप शिकत आहे.’ त्याच्यासाठी आपल्याला काहीही वेगळा प्रयत्न करण्याची गरज नसते. मूल जन्मतं तेव्हा आपलं पोट कसं भरायचं याचं प्रशिक्षण त्याला द्यावं लागत नाही. मातेने जवळ घेतल्याबरोबर ते आपलं काम करू लागतं. तीच गोष्ट त्याच्या पालथं पडण्यापासून प्रत्येक टप्प्यावरची. प्रत्येक वेळी ती ती समज आणि सक्षमता आली की मुलं त्या गोष्टी सहज करू लागतं. मग ती सहजता केव्हा हरवली जाते? मुलं त्याच्या या नैसर्गिक विकासमार्गपासून केव्हा भरकटलं जातं, हे आपलं आपल्यालाच कळत नाही.

त्याची सुरुवात त्याच्या शाळा प्रकरणात आहे असं मला वाटतं. कारण जेव्हा त्याला शाळेत घातलं जातं तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा वाढतात. त्याच्या वयाच्यापेक्षा पुढच्या गोष्टी त्याच्याकडून ‘पुढची तयारी’ या नावाखाली करवून घेतल्या जातात. तीन वर्षांच्या वयात त्याने अनेक गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत असा समज सर्वसाधारण सगळ्या समाजाचा झाला आहे की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती अनुभवयास मिळते. कारण ती त्याची पुढच्या शैक्षणिक टप्प्याची तयारी आहे असं सर्रास सगळ्यांना वाटतं. त्यासाठी अक्षरओळख, अंकओळख, वार, महिने, प्राणी-पक्षी या आणि अशा अनेक गोष्टी त्याला वर्कशीटस् स्वरूपात आल्या पाहिजेत म्हणजेच त्याला समजलं आणि तो अभ्यासात हुशार झाला असं समजलं जातं. ज्या शाळांमधून असं सगळं मुलांकडून करवून घेतलं जातं ती शाळा उत्तम. त्यात प्रवेश मिळालाच पाहिजे. म्हणजे आपले आणि आपल्या पाल्याचे जीवन सार्थकी लागले.

मला आठवतं दहा-बारा वर्षांपूर्वी आमच्या खालच्या मजल्यावरील एका साडेचार-पाच वर्षांच्या मुलाला त्याची आई माझ्याकडे घेऊन आली. तो मुलगा कुठल्याशा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सीनिअर केजीत शिकत होता. पण इंग्रजी विषयाची दोन, हिंदीचे एक, गणिताची दोन अशी पुस्तके घेऊन ती माऊली आली होती. ‘ती पुस्तके, तो अभ्यास आणि तो मुलगा’ यांचं काय करावं तिला कळत नव्हतं. मी शाळेत आहे आणि त्याच वयोगटाला ‘शिकवते’ असं समजलं म्हणून ती मोठय़ा आशेनं माझ्याकडे आली होती. पण मी तिला त्या वेळी काहीही मदत करू शकले नाही. कारण त्या पुस्तकांचा अभ्यास त्या वयातील मुलांकडून करवून घेणे हे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचं होतं. नंतर एक पालक मात्र असे भेटले की त्याच शाळेत त्यांचा मुलगा होता. पण तो अभ्यास पाहून त्यांनी माध्यम, बोर्ड सगळं बदलून मातृभाषेत शिकवण्याचा निर्णय घेतला.

पण अशी दडपण देणारी शाळा आपल्या पाल्याला नको असा सजग विचार करणारे पालक विरळाच. बहुतेक सगळे प्रवाहाबरोबर वेगाने जाणेच पत्करतात. परंतु अशा प्रकारे दडपण देणारी शाळा नको ही खूणगाठ प्रत्येक पालकांनी आपल्या मनामध्ये बांधली पाहिजे.

मध्यंतरी मी एका कार्यशाळेत गेले होते. आपल्या शिकण्याचा प्रवास ‘शब्दांच्या जगा’तून ‘प्रत्यक्ष जगा’पर्यंत कसा करायचा याचं एक छान प्रात्यक्षिक तिथे मला अनुभवायला मिळालं. ‘पान’ हा शब्द प्रथम आम्हाला त्यांनी लिहायला सांगितला. नंतर ‘पाना’चं चित्र काढण्यास सांगितलं. नंतर बाहेर जाऊन प्रत्यक्ष ‘पान’ पाहून, त्याला स्पर्श करून पानाचं चित्र काढायला सांगितलं. या तीन कृतींतून खरोखर नुसत्या शब्दापासून प्रत्यक्ष जगाकडे जाण्याची जादू झाली होती. एक अद्भुत अशी अनुभूती मिळाली होती. पहिल्या कृतीत अगदी सहज काहीही कळण्याच्या आत ‘पान’ हा शब्द लिहून आम्ही मोकळे झालो. दुसऱ्या कृतीत थोडा अवधी घेऊन आपल्या कल्पनेतील ‘पान’ साकारलं. पण जेव्हा बाहेर जाऊन प्रत्यक्ष पानाला हात लावून त्या झाडाच्या सान्निध्यात बसून पानाचं चित्र काढलं तेव्हा पानाच्या प्रत्येक कंगोऱ्याचं निरीक्षण केल्याचं जाणवत होतं. त्याचा बाक खालच्या बाजूला आहे की ते वरच्या अंगानं जात आहे. त्याच्या वरच्या रेषा कशा आहेत. त्याची जाळी कशी दिसत आहे. या सगळ्या सगळ्याचं निरीक्षण करण्याची आपली क्षमता आहे ही जाणीव मनाला सुखद धक्का देऊन गेली. सगळ्यात आधी कुठल्या झाडाचं पान आपल्याला काढायला जमेल हाही विचार केलेला जाणवला. म्हणजेच आपल्या क्षमतेचा विचार आणि त्याप्रमाणे निवड प्रत्येकाने केलेली होती.

या पार्श्वभूमीवर वाटतंय, खरंच नेमकं काय बघायला पाहिजे पालकांनी या मुलांच्या प्रवेशाच्या वेळी? एक पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख म्हणून जेव्हा मी हा विचार करते तेव्हा मला प्रकर्षांने वाटतं की मुलाला शिकवण्यापेक्षा वरील पद्धतीनं शिकतं करणारी शाळा आहे का याचा विचार पालकांनी प्रामुख्यानं करायला हवा. माध्यमाचा विचार अर्थातच महत्त्वाचा. मातृभाषेतून शिक्षण आणि त्याचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत.  वस्तुत: हे सगळ्यांना पटते, परंतु त्याची अंमलबजावणी फार प्रमाणात होताना दिसत नव्हती. या वर्षी मात्र त्याची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झालेली दिसली. एक सकारात्मक चित्र!

मातृभाषेतून शिक्षण या विचारासोबत दक्ष असायला हवं ते शाळेत मुलांकडून करवून घेण्यात येणाऱ्या अभ्यासाबाबत. त्यासाठी एखादी शाळा भरपूर पुस्तकं लावून ती पूर्ण करवून घेते म्हणजे छान हा समज काढून टाकायला हवा. त्यात आपण आपल्या पाल्याचं भलं नाही तर नुकसान करत आहोत हे लक्षात घ्यायला हवं. त्याला खऱ्या जगापासून शब्दांच्या जगात नेत आहोत हा धोका ओळखायला हवा.

शाळा कुठलीही निवडलेली असो, मी माझ्या पाल्यासाठी काय करू शकतो किंवा शकते हे महत्त्वाचं असतं. केवळ शब्दांच्या जगात न अडकवता प्रत्यक्ष जगाचा अनुभव देता येणारी शाळा निश्चितच छान. पण हा झाला आदर्शवाद. अशा शाळा प्रत्यक्षात कशा आणायच्या? पण एक पालक म्हणून आपण निश्चितच मुलांना हे वेगवेगळे अनुभव देऊ  शकू. त्यामुळे अगदी घराजवळच्या शाळेची निवड करून मुलाचा उगीगच चांगल्या शाळेकरता होणारा लांबचा प्रवास टाळू शकतो. त्याच्या आणि आपल्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. नुसते ‘कागदावरच्या वर्ड’मधले अर्थ आपल्या मुलाला समजावत बसायला नकोत. तर वर म्हटल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने त्या शब्दांमधील ‘खऱ्याखुऱ्या वर्ल्ड’चा अनुभव मुलांना घेऊन द्यायला हवा. आपला आपण. म्हणजे ते मुलं आत्मविश्वासाने पुढच्या आयुष्यात मार्गक्रमण करेल आणि म्हणेल, ‘मी आपले आप शिकला.’

ratibhosekar@ymail.com

chaturang@expressindia.com

First Published on June 2, 2018 12:11 am

Web Title: tips for choosing the best school for your child