रजनी लिमये यांना राष्ट्रपती पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, ‘लोकसत्ताचा सर्व कार्येषु सर्वदा पुरस्कार’, किती तरी पुरस्कार मिळाले. पण त्या लाल डब्यातून प्रवास करणाऱ्या, लोकलचे धक्के खात शाळेसाठी देणग्या मागणाऱ्या, बिडाच्या शेगडय़ा वापरणाऱ्या, कुणाचाही हेवा, मत्सर न करणाऱ्या  साध्या-सुध्या लिमयेबाईच राहिल्या. मरणोत्तर नेत्रदान, देहदान करणाऱ्या रजनीताईनी गेली ४० वर्षे नाशिकमध्ये मतिमंदांसाठी संस्था सुरू करून सुमारे ४०० मुलांवर आपल्या अनोख्या मातृत्वाची सावली पसरली. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली.

आक्काची गोष्ट सांगताना मन सारखे भरून येते. आम्हा पाचही भावंडांची ती अतिशय लाडकी होती. आपला अवघा जीवनप्रवास मतिमंदांसमवेत व्यतीत करताना तिला स्वत:चे वेगळे विश्व उरलेच नाही. ध्यानीमनी ‘प्रबोधिनी’!

मला आठवते, मी इयत्ता तिसरीत होते. एसएससीचा बक्षीस समारंभ! सुप्रसिद्ध साहित्यिक मालतीबाई बेडेकर अध्यक्ष.. आक्का पहिली आलेली! तिला आठपैकी सात विषयांची पहिली बक्षिसे, पनवेलचे के. व्ही. कन्या विद्यालय टाळ्यांनी दुमदुमत होते अन् मग नगराध्यक्ष आबा पन्हाळे यांनी रजनी दातीरला बक्षीस जाहीर केले. १९५४ मध्ये १०० रुपये बक्षीस खूपच मोठे! मग अन्य सात लोकांनी बक्षिसे दिली. मालतीबाई म्हणाल्या, ‘मला वाटलं, रजनीची बक्षिसे संपतात की नाही?’ किती आनंदली होते मी! मी आणि निरुताई, आक्का ९ वर्षांनी मोठी!

आम्ही बक्षिसाचे पैसे घेऊन आलो नि जिन्यातच थबकलो.. माझे बाबा परचेस ऑफिसर म्हणून कार्यरत होते. आख्खा कुलाबा जिल्हा फिरत. त्यांना सरकारी गाडी, पट्टेवाला असा थाट होता. पण मुलाबाळांना फिरवायला त्यांनी स्वत:ची गाडीही घेतली होती. पण त्या दिवशी आम्ही आईचा सौम्य नि बाबांचा फटाका आवाज ऐकला. ‘‘चार मुले बरोबरीने शिकतायत. बेबी तेवढी छोटी. भागत नाही हो! ती गाडी काढून टाका. आम्हाला नको हौसमौज!’’

त्यावर ‘‘मी आहे तोवर करा मौज’’ बाबा म्हणाले. आम्ही दोघी धावत वर गेलो. आईचे डोळे पुसत आक्का म्हणाली, हे घे पैसे. आता भांडू नका.’’ किती सहजता.

पण पुढे पुण्याचे सिटी मॅजिस्ट्रेट असलेले माझे बाबा अचानक देवाघरी गेले. मी सहावीत! आक्का इंटरला. दोघे भाऊ ग्रॅज्युएट होऊन पोस्ट ग्रॅज्युएट करीत होते. पण एस.पी. कॉलेजचे प्राचार्य घरी येऊन काय म्हणाले? ‘रजनीला कॉलेजातून काढू नका’ पण बेचाळीस वर्षांची गृहिणी असलेली माझी आई हतबल होती. बँकेत शिल्लक? फक्त तीन हजार! दोघे भाऊ तेरावे करून कामावर सुरू झाले नि आक्काने नागेश लिमये यांचेशी विवाह केला. दादावर ओझे नको. सहा महिन्यात निरुही विवाहिता झाली. मोठय़ा घरात राहिलेली, गाडी घोडय़ाची सवय असलेली, भरपूर सामान बघितलेली आक्का अहमदाबादेत २ खोल्यांचे मोकळे घर बघून म्हणाली, ‘‘आपले फर्निचर कुठाय?’’

‘‘घेऊ ना हळूहळू,’’ नागेशराव समजूत घालीत म्हणाले.

हळूहळू तिला कळले की नागेशराव आई, बहिणीची हौस पुरविता निर्धन झाले होते. पण माणूसपणात ते कोणासही हार जाणारे नव्हते. या साध्या टेलिग्राफिस्ट माणसाने आक्काला बी.ए., एम.ए., बी.एड.पर्यंत शिकविले. तिला अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून घरकाम स्वत: केले. आजच्या जमान्यातही बायकोच्या हुशारीचे इतके कौतुक करणारा नवरा अभावाने मिळेल. तिनेही त्या सर्व कष्टांचे चीज केले. आक्का सर्व परीक्षांमध्ये पहिली आली. उच्चतम यश! अत्युच्च ध्येय! १०१ टक्के प्रयत्न.

तिला गीतांजली ही गोड मुलगी झाली, नि चोविसाव्या वर्षी तिला स्तनाचा कर्करोग झाला. डॉ. बोर्जेसनी तिला बरे केले. त्यांनाच ती देवस्वरूप मानत असे. गोरीपान, नाकेली, मायाळू आक्का मी इंटरला उत्तमातले उत्तम गुण मिळविले तरी म्हणाली, ‘विजू, तू डॉक्टर होण्याचा हट्ट सोड. फार महागडा कोर्स आहे. दादा तुला शिकवतोय. पटकन बी.एस्सी. हो. लग्न कर नि मग शिक हवी तेवढी. दादाला किती वर्षे खर्चात पाडणार गं? तुला सांगू? तुझं शिक्षण चालूय म्हणून बाळ होऊ देत नाही तो. किती थांबावं? सांग!’ मी मुकाटय़ानं बी.एस्सी.ला गेले. पुढे सासू कृपेने पीएच.डी. झाले. तेव्हा आपल्या कानातल्या कुडय़ा आक्काने माझ्या कानात घातल्या.

ती म्हणजे कामाचा डोंगर होती. पस्तिसाव्या वर्षी द्वितीय अपत्याचा विचार केला नि गौतम झाला. माझी दुसरी बहीण निरू बालवर्ग चालवी. ती दोन सव्वादोनच्या गौतमला पाहात होती. एकदा त्याने रांगोळी विस्कटली. ती म्हणाली, ‘आक्के, हे बरे नाही. चिमण्याशा जिवासही सौंदर्य नासवू नये हे कळते. त्याला डॉक्टरला दाखव.’ अन् मग डॉ. गिंडे यांनी तो मतिमंद आहे हे जाहीर केले. आक्काच्या पायाखालची जमीन सरकली. तेव्हा ती ‘पुण्यावती’मध्ये नाशकात शिक्षिका होती. ‘हे बघा, तुम्ही नाशिकला शिक्षिका आहात ना? मग मतिमंदांची विशेष शाळा काढा. ओनली यू कॅन डू इट.’ ते म्हणाले.

आणि तिने ते केलं. वर्ष १९७७. दारोदार फिरून तिने मतिमंद मुले हुडकली. ४ मुले, पाचवा गौतम! पत्र्याच्या शेडमध्ये शाळा. कुमुदताई ओकांचे सहकार्य! आपल्या मतिमंद मुलाचे ‘उणेपण’ बघून न रडता लढणारी माझी आक्का! आज ‘प्रबोधिनी’ विद्यामंदिर ही ४०० मतिमंद मुलांना शिक्षण देणारी संस्था नाशकात दिमाखात उभीय. रजनी नागेश लिमये यांच्या अथक प्रयत्नांना आलेले घवघवीत यश! संस्थापक- संचालक- अध्यक्ष! रजनीताई लिमये वयाच्या ४४ व्या वर्षी विशेष बालकांचा कोर्स पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण!

कॅनडाचे जगन्नाथ वाणी यांनी घसघशीत पन्नास लाख रुपयांची देणगी दिली नि आक्काने त्यातून सातपूरला सुनंदा केले यांच्या नावाने मतिमंदांसाठी दुसरी शाळा उभी केली. शासनाने ४ एकरचा प्लॉट दिला नि मतिमंदांसाठी हॉस्टेल उभे राहिले. जगन्नाथ वाणींनी आक्काला अमेरिका, कॅनडा इथल्या विशेष बालकांच्या संस्था दाखविल्या नि तिची व्याख्याने तेथे ठेवली. सारा सात्त्विकतेचा विजय! आनंदोत्सव.

आक्काला राष्ट्रपती पुरस्कार, हिरकणी पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, ‘लोकसत्ता’चा सर्व कार्येषु सर्वदा पुरस्कार’, किती किती मानाचे तुरे मिळाले. पण ती लाल डब्यातून प्रवास करणारी, लोकलचे धक्के खात शाळेसाठी देणग्या मागणारी, बिडाच्या शेगडय़ा वापरणारी, पांढरी सुताडं  वापरणारी, कुणाचाही हेवा मत्सर न करणारी साधी-सुधी लिमयेबाईच राहिली. गतवर्षी तिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ लाख रुपये शाळेस देऊन गौरविले. साधना आमटेंसोबत ‘अनोखे मातृदैवत’ म्हणूनही तिचा गौरव झाला होता.

पण आक्काचे पाय सदैव जमिनीवर राहिले. खरे तर लेखनकलेचा वारसा मला आक्काकडून मिळाला. पण ‘तिला’ लेखन वाढवायला वेळ मिळाला नाही. अष्टौप्रहर प्रबोधिनी- प्रबोधिनी- प्रबोधिनी.

‘हा असा घेतला अष्टौप्रहरी ध्यास

अन् केला हौसे अथक प्रचंड प्रवास

मतिमंदांसाठी आखली मोठी वाट

अन् त्यांच्या जीवनी आणिली प्रसन्न पहाट!’

असे तिच्याबद्दल म्हणावेसे वाटते. गौतमसारख्या ४०० बालकांना तिने जगण्याचा नवा आयाम दिला. ‘मतिमंदत्व हा रोग आहे. तो कोणतेही गंडेदोरे, उपासतापास, साधू-बैराग्याचे आशीर्वाद यांनी बरा होत नाही. आपल्या बालकातील वैगुण्य धैर्याने स्वीकारा आणि त्याला अधिकाधिक स्वावलंबी करा.’ ती सर्व निराश पालकांना धीर देई. त्यांचे समुपदेशन करी.

तिलाच का सारे पुरस्कार मिळाले, मान-सन्मान मिळाला, पण खूपदा अपमानित केले गेले. पण ती कचरली नाही. परत परत ताठ उभी राहिली.

ती आक्का आता नाही. मला एस.एस.सी.ला गणित शिकवणारी, माझे लांब मऊ केस मायेने धुणारी, विंचरणारी, माझ्या साहित्यिक, अक्षरयात्रेचं कौतुक करणारी, माझ्या लग्नात दादा-नानाबरोबर आईस पैसे देणारी, माझे बाळंतपण करणारी माझी आक्का आता नाही. १६ जानेवारी २०१८! अखेरचा श्वास.

शेवटी प्रत्येकालाच विश्रामधामात जायचेय. पण रजनी लिमयेबाईंनी नेत्रदान केलं, देहदान केलं. आपल्या लाडक्या, सहा महिने सतत भक्त पुंडलिक बनून सेवा करणाऱ्या गीतांजलीचा मुका घेतला नि देह ठेवला. आक्का, तुझ्यासारखे कर्मयोगी तपस्वी कधीच मरत नाहीत गं! त्यांचं काम त्यांच्या पाऊलखुणा जपत राहातं! उरीपोटी!

डॉ. विजया वाड

vijayawad@gmail.com

chaturang@expressindia.com