18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

पुस्तकातून : इतरांना आपलेसे करण्याचे फायदे!

एक सुविचार : आपल्या वाटय़ाला येणारा आनंद इतरांना आपण दिलेल्या आनंदात असतो.

शर्वरी जोशी | Updated: April 20, 2017 11:34 AM

कधी काळी गौतम बुद्ध हेदेखील आपल्यासारखेच फक्त स्वत:चा आनंद जाणणारे असे होते

जीवनात वाटय़ाला येणारे दु:ख आपल्या स्वार्थी, आत्मलोलुपतेचे कारण आहे आणि विश्वकल्याणाचा भाव असणे हेच आपल्या सुखाचे, आनंदाचे निधान आहे. अस्तित्वाच्या खालच्या आणि वरच्या पातळीवरदेखील जे दु:ख आपल्या वाटय़ाला येते, आध्यात्मिक क्रियांमध्ये तसेच निर्वाणाच्या वाटेवर जे अडथळे आपल्याला जाणवतात, ते सर्व आपल्या सुखासीन, स्वार्थी वृत्तीमुळे येते.

एक सुविचार : आपल्या वाटय़ाला येणारा आनंद इतरांना आपण दिलेल्या आनंदात असतो. केवळ स्वत:ला मिळणारा आनंद हा दु:खाचे कारण बनतो.

असे का असावे बरे?

तर स्वत:ला आनंदी ठेवण्याचे आपले प्रयत्न बरेचदा इतरांवर अन्याय करणारे असतात. आपल्याला नेहमी दिसून येत असलेल्या हत्या, चोऱ्यामाऱ्या, असहिष्णुता यांचे हेच कारण असते.  केवळ स्वत:ला खूश करण्याच्या आपल्या स्वभावामुळे कौटुंबिकच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक प्रकारच्या संघर्षांना आपल्याला सामोरे जावे लागते.

मग इतरांना खूश करण्याचे काय फायदे असू शकतात? ज्यांना आपल्याला आनंदी बघायला आवडते, त्यांना आपण कधीच हानी पोहोचवत नाही. हे आपल्या दीर्घायुष्यासाठी पोषक असते. जेव्हा आपण इतरांचे सुख किंवा आनंद चिंतत असतो, तेव्हा आपले मन मोकळे असते आणि त्यांच्याविषयी आपण अधिक संवेदनशील असतो. आपले मन उदार असते. आपल्या याच सकारात्मक कर्माची फळे भविष्यातही आपल्यासोबत राहतात. कोणी आपल्याला हानी पोहोचवत असेल, त्रासदायक वागत असेल आणि तरीदेखील तुम्ही त्याच्याविषयी प्रेम आणि करुणेचाच भाव ठेवून असाल तर नक्कीच तुमचे भविष्य उज्ज्वल आणि सुंदर असेल. आपण इतरांसाठी केलेल्या सत्कर्मामुळे आणि इतरांविषयी बाळगलेल्या सद्भावनेमुळे एका सकारात्मक कर्माची आपण निर्मिती करीत असतो. यामुळे जे काही मंगल, पवित्र आणि सुखदायी असे आपल्या जीवनात येते ते सर्व आपले या इतरांचे भले चिंतण्याच्या सत्कर्मामुळेच येत असते. हीच सत्कर्मे आणि त्यातून होणारी परिस्थिती आपल्याला निर्वाणाकडे आणि बुद्धत्वाकडे घेऊन जाते.

हे कसे घडते?

निर्वाणापर्यंत पोहोचायचे असेल तर आपल्याला नैतिक शिस्त, चिंतनशीलता आणि विवेकाची कास धरणे या तीन बाबींवर अतिशय उच्च पातळीवरून प्रावीण्य मिळवायला हवे. यातली पहिली गोष्ट म्हणजे नैतिकता! हिचे जर व्यवस्थित पालन केले तरच पुढील दोन गोष्टींचा विचार करता येऊ शकतो. नैतिक आचरणात शिस्त याचा अर्थ दुसऱ्याला ज्यामुळे दु:ख होईल असे आचरण टाळणे! जर आपण स्वत:पेक्षा इतरांना जपायला शिकलो तर हे साधणे अवघड नसते. आपल्या अशा सत्कर्मामुळे आपले चित्त शांत होत जाते, स्थिरावत जाते, ज्यायोगे आपण उत्तम प्रकारे ध्यान करू शकतो आणि विवेकबुद्धीचा वापर करू शकतो!

खरं तर इतरांविषयी अशा प्रकारचा उदार भाव बाळगणे आणि त्यांचे सदैव हित कसे होईल ते बघणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आपल्या या जीवनात जे जे म्हणून काही आपल्याला सामोरे येते, ते इतरांच्या कृपेनेच येत असते. आपण बाहेरून अन्नधान्य विकत घेतो अथवा वस्त्रे विकत घेतो आणि ज्या घरात आपण राहतो ते घरही; असे सारेच इतरांच्या मदतीशिवाय आपल्याला उपलब्ध होत नसते आणि आपले अंतिम ध्येय म्हणजे निर्वाण आणि बुद्धत्व हे तर इतरांच्या सहकार्याशिवाय अशक्यच असते! त्यांच्याशिवाय आपण प्रेम, विश्वास याविषयी चिंतन करू शकत नाही आणि आध्यात्मिक अनुभवही घेऊ शकत नाही. आणि हो, जे ध्यान किंवा चिंतन आपण करतो आहोत, त्याचे प्रशिक्षणदेखील गौतम बुद्धांपासून आपल्यापर्यंत अशाच अनेक दयाळू सज्जनांनी पोहोचवले आहे. गौतम बुद्धांनी ध्यान आणि चिंतन आदी हे या सज्जनांना दिले, जेणेकरून तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकेल. जर ज्ञानग्रहणक्षम अशी ही मंडळी अस्तित्वातच नसती तर गौतम बुद्धांनी हे ज्ञान कोणाला दिले असते?

बोधिसत्त्वाचार्य अवतारात शांतिदेव (आठव्या शतकातील बौद्ध संत) म्हणतात, दयाळू असल्यानेच ही ज्ञानग्रहणक्षम सज्जन जे आपल्यापर्यंत बुद्धाचे ‘ध्यान’ पोहोचवतात, ते प्रतिबुद्धच आहेत. कधी कधी असेही दिसून येते की, गौतम बुद्धांच्या प्रति निरतिशय आदर असणाऱ्या माणसांना ही सज्जन माणसे तितकीशी आदरणीय वाटत नाहीत. आपण हे टाळले पाहिजे. ज्याप्रमाणे गौतम बुद्ध आपल्याला प्रिय आणि आदरणीय आहेत त्याचप्रमाणे हेही असायला हवेत.

जर आपण आपल्या वाटय़ाला आलेल्या आनंदाचा आणि इतरांशी असलेल्या सुसंवादाचा विचार केला तर आपल्याला त्यातील वैश्विक संबंधाचा प्रत्यय येतो आणि हे विश्व आपली किती काळजी घेते हेही जाणवते. आपल्या वाटय़ाला येणरे दु:ख, अवहेलना आणि इतरांबद्दल अप्रीती ही आपल्या स्वार्थी वृत्तीमुळे असते.

कधी काळी गौतम बुद्ध हेदेखील आपल्यासारखेच फक्त स्वत:चा आनंद जाणणारे असे होते; पण त्यांनी ही वृत्ती त्यागली आणि विश्वाच्या कल्याणाचे उद्दिष्ट ठेवून बुद्धत्वाच्या वाटेने प्रवास सुरू केला. आपल्या अशाच आत्मलोलुप वृत्तीमुळे आपण संसारात गुंतून पडतो, ज्याचा फायदा ना आपल्याला होतो ना इतरांना!

एका जातककथेमध्ये (बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा) असे सांगितले आहे की, एका जन्मात गौतम बुद्ध हे एक महाकाय कासव होते. एकदा एक जहाज समुद्रात बुडत असताना त्यांनी त्यातील लोकांना आपल्या पाठीवर लादून किनाऱ्यावर आणले आणि त्यांचे प्राण वाचवले. या श्रमांनी दमलेल्या कासवाला (बुद्धांना) किनाऱ्यावरच इतकी गाढ झोप लागली की, हजारो मुंग्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या दंशांमुळे होणाऱ्या वेदनांनी कासवाला जाग आली; पण आपण हालचाल केली तर या हजारो मुंग्या आपल्या देहाखाली चिरडून मरतील असे वाटून ते तसेच पडून राहिले आणि आपला देह त्या मुंग्यांना अन्न म्हणून सुपूर्द केला. अशा तऱ्हेने इतर जीवजंतूंना आनंद देताना आपले जीवन अर्पावे लागले तरी बेहत्तर, हा परम करुणामयी भाव त्यांचा असे. आपल्यापेक्षा इतरांचा आनंद, त्यांचे कल्याण करण्याचाच भाव त्यांचा सदैव राहिला असे अनेक जातकथांमधून दिसून येते. ‘कल्पतरू’ या पुस्तकात तर १०८ अशा कथा आहेत.

जीवनात वाटय़ाला येणारे दु:ख आपल्या स्वार्थी, आत्मलोलुपतेचे कारण आहे आणि विश्वकल्याणाचा भाव असणे हेच आपल्या सुखाचे, आनंदाचे निधान आहे. अस्तित्वाच्या खालच्या आणि वरच्या पातळीवरही जे दु:ख आपल्या वाटय़ाला येते, आध्यात्मिक क्रियांमध्ये तसेच निर्वाणाच्या वाटेवर जे अडथळे आपल्याला जाणवतात, ते सर्व आपल्या सुखासीन, स्वार्थी वृत्तीमुळे येते. त्याउलट आपल्या वाटय़ाला येणारा आनंद, सुख इत्यादी इतरांना दिलेल्या आनंदामुळेच आपल्याकडे परतून येत असते.

(रिया पब्लिकेशन्सच्या ‘बिकमिंग बुद्धा’ या पुस्तकात दलाई लामांच्या अप्रकाशित व्याख्यानासह इतर पूज्य लामांचा उपदेशांचा संग्रह आहे. संपादन रेणुका सिंग यांचे असून अनुवाद शर्वरी जोशी यांचा आहे.)

शर्वरी जोशी  sharvarijoshi10@gmail.com

First Published on April 15, 2017 3:01 am

Web Title: unrecorded lecture by the dalai lama includes in book becoming buddha