25 February 2021

News Flash

..आणि ‘कूस’ धन्य झाली

गर्भाशयात दोष असणाऱ्या स्त्रियांना गर्भाशय रोपणाने मूल जन्माला घालण्याची एक वाट दाखवली.

प्रतिनिधिक छायाचित्र

डॉ. स्मिता दातार drsmitadatar@gmail.com  

गर्भाशयात दोष असणाऱ्या स्त्रियांना गर्भाशय रोपणाने मूल जन्माला घालण्याची एक वाट दाखवली. आता तर मृत व्यक्तीचं गर्भाशय वापरून मिळालेल्या यशाने ही वाट प्रकाशमान झालीये. अशाच गर्भाशय रोपणातून जन्माला आलेल्या ब्राझीलमधील मुलीचा आज, १५ डिसेंबर पहिला वाढदिवस. हा शोध म्हणजे अनेक निपुत्रिक मातांच्या टाहोला उत्तर म्हणावं लागेल. देश कुठलाही असला तरी मातृत्वाची आस सारखीच असते. अशा स्त्रियांना आशेचा किरण दिसू लागलेला आहे.

एक प्रचलित दंतकथा आहे, ग्रीक पुराणातली पॅन्डोरा पृथ्वीवर येते. तिच्याकडे एक पेटी असते. ती पेटी उघडायची नाही हे माहीत असूनही ती पेटी उघडते. त्यातून क्रोध, मद, मत्सर यांसारखे सात राक्षस बाहेर पडतात आणि बाहेर पडते आठवी -होप-आशा. ‘आशा’ बघता बघता सगळ्यांना जिंकून घेते. याच आशेच्या जोरावर आजही नवे नवे शोध लागताहेत. माणूस निसर्गापुढे जात एकेक क्षेत्र काबीज करतोय. नुकतीच बातमी आलीये की मृत स्त्रीचं गर्भाशय, दुसऱ्या स्त्रीमध्ये यशस्वीपणे रोपण करून डॉक्टरांनी तिला मातृत्व बहाल केलं त्या मुलीचा आज पहिला वाढदिवस आहे.

काही स्त्रियांना जैविक मातृत्वाशिवाय पूर्णत्व आल्यासारखं वाटत नाही. जगात वंध्यत्वाचं स्त्रियांमधलं प्रमाण आहे १५ टक्के, त्यातल्या ५०० पैकी एका स्त्रीला गर्भाशयात दोष असल्याने गर्भधारणा होत नाही. गर्भाशयाचा क्षयरोग, गर्भाशयाचा कर्करोग, गर्भाशय व योनिमार्ग जन्मत:च लहान असणं किंवा अजिबात नसणं (मेयर रोकीटान्स्की कुसर होशर सिण्ड्रोम), एशरमन सिण्ड्रोम (गर्भाशयाची अंत:त्वचा इन्फेक्शनमुळे चिकटणं) अशा दोषांमुळे गर्भाशयात बीज रुजून बाळ तिथे मोठं होऊ  शकत नाही.

ब्राझीलच्या ‘साव पावलो’ विद्यापीठातले संशोधक डॉक्टर डॅनी एझनबर्ग आणि डॉक्टर वेिलग्टन अन्द्ऱ्युज यांनी अशा स्त्रियांसाठी चमत्कार घडवलाय. १९६४ पासून प्राण्यांवर प्रयोग झाले. २००२ मध्ये स्वीडनमध्ये एका जिवंत स्त्रीचं गर्भाशय दुसऱ्या स्त्रीवर रोपण करण्याचा पहिला यशस्वी प्रयोग झाला. २०१२ मध्ये स्वीडनमध्ये पहिल्या गर्भाशयरोपणातून जन्म झालेल्या बाळाची नोंद झाली. पण हाही प्रयोग आईने मुलीला जिवंतपणी गर्भाशय दान केल्यानंतर झाला. यात दाता स्त्री आणि घेणारी स्त्री दोघींच्या जिवाचा धोका अटळ होता. दोघींवर अवाढव्य खर्च होत होता. आपणहून गर्भाशय दान करणाऱ्या, रक्तगट जुळणाऱ्या स्त्रिया सहजी उपलब्ध न होणे अशी संकटं येत होती.

आणि २०११ मध्ये टर्की या देशात डेरया सर्ट या स्त्रीवर पहिल्यांदा मृत स्त्रीचं गर्भाशयरोपण करण्यात त्यांना यश आलं. तिला गर्भधारणाही झाली, पण दोन महिन्यांत तिचा गर्भपात झाला. २०१६ मध्ये मात्र डॉक्टर एझनबर्गनी ब्राझीलच्या एका ३२ वर्षे वयाच्या स्त्रीवर एका मृत स्त्रीचं गर्भाशयरोपण केलं. या स्त्रीला ‘रोकीटांस्की सिण्ड्रोम’ होता. जाणिवा सगळ्या स्त्रीच्या, पण निसर्ग गर्भाशय द्यायला मात्र विसरलेला. तिच्यासाठी एक ४५ वर्षांची स्त्री मात्र देवदूत ठरली. ४५ वर्षांची ही मृत स्त्री तीन मुलांची नैसर्गिक प्रसूती केलेली आई होती. तिला मेंदूत रक्तस्राव होऊन मृत्यू आल्याने तिचं गर्भाशय या ३२ वर्षे वयाच्या ब्राझीलियन स्त्रीला मिळालं. आठ तास ते गर्भाशय ऑक्सिजनविना विशिष्ट तापमानात ठेवून त्याचं रोपण करण्यात आलं. साडेदहा तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्या स्त्रीला तिच्या आयुष्यातली पहिली मासिक पाळी दोन महिन्यांनी सुरू झाली. तापलेल्या जमिनीवर पावसाचे पहिले थेंब पडल्याचा आनंद डॉक्टरांना झाला. सात महिन्यांत ही नव्या गर्भाशयाची जमीन बीजरोपणासाठी तयार झाली. या ब्राझिलियन स्त्रीचे आठ गर्भ आधीच आय व्ही एफ तंत्राने तयार करून प्रयोगशाळेत गोठवून ठेवलेले होते. ते जणू आईच्या गर्भाशयाची वाट बघत होते. डॉक्टरांनी त्यातला एक गर्भ तिच्या उदरात सोडला. तो चक्क रुजला. आणि १५ डिसेंबर २०१७ ला ३५ आठवडय़ांच्या सहा पौंड वजनाच्या मुलीला सिझेरियन करून डॉक्टरांनी या जगात आणलं. आधुनिक तंत्रज्ञानाने जन्मलेल्या या मुलीचा  आज, १५ डिसेंबरला पहिला वाढदिवस.

या आधी जीवित दात्याकडून घेतलेल्या गर्भाशय रोपणाचे जगात ५३ प्रयोग झाले होते. त्यातून १३ बाळे जन्माला आली. यातल्या एका बाळाची नोंद भारतातल्या डॉ. पुणतांबेकरांच्या नावावर आहे. पण अशी दाता स्त्री अवयवदान कायद्याच्या जाचक अटी पाळून मिळवणं कठीण आहे. सरोगेट आई (भाडोत्री गर्भाशय) म्हणजे मूल जैविक आई-वडिलांचंपण वाढतंय दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयात. हेही धर्म, खर्च, कायदा, उपलब्धता, भावनिक गुंतागुंत यामुळे तितकंसं सोपं नसतं. त्यात स्वत: आई होण्याचा आनंदही स्त्रीला मिळत नाही. काहींना मूल दत्तक घेणं हा उपाय नकोसा वाटतो, कारण ते मूल जैविक आई- वडिलांचं नसतं आणि मूल हवंसं वाटतं तेच मुळी स्त्री-पुरुषाचं अद्वैत बघण्यासाठी, वंश वाढवण्यासाठी.

या पाश्र्वभूमीवर गर्भाशयात दोष असणाऱ्या स्त्रियांना गर्भाशय रोपणाने एक वाट दाखवली. आता तर मृत व्यक्तीचं गर्भाशय वापरून मिळालेल्या यशाने ही वाट प्रकाशमान झालीये. यात मृत स्त्रीचं गर्भाशय दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून गर्भाशय घेणाऱ्या स्त्रीत रोपित केलं जातं. तंत्रज्ञानाच्या मदतीने तिचा वेळ, खर्च, जिवाची जोखीम कमी केली जाते. दाता मृत असल्याने, दाता मिळण्याची शक्यता वाढते.

पण या वाटेवर काटेही आहेत. मृत दाता स्त्रीचं वय प्रजननक्षम असेल तरच ते गर्भाशय उपयोगी ठरतं. गर्भाशयाला काही जंतुसंसर्ग, कर्करोगाचं आक्रमण असेल तर घेणाऱ्या स्त्रीसाठी ते धोकादायक ठरू शकतं. गर्भाशयरोपण झाल्यावर इम्युनोसप्रेसंट (रोपण केलेलं इंद्रिय शरीराने त्यागू नये म्हणून शरीराची प्रतिकारशक्ती दुर्बल करणारी औषधे) औषधं घेत राहणे, त्यांचा बाळावर होणारा परिणाम हा अभ्यासाचा विषय आहे. हे रोपित गर्भाशय जेमतेम एक बाळ जन्माला घालू शकतं, त्यामुळे जन्मलेल्या बाळाच्या जिवाला धोका झाल्यास पुन्हा हा सव्यापसव्य करणे मुश्कील. गर्भाशय रोपण हे सध्या तरी अतिशय खर्चीक आहे. गर्भाशयरोपण करून घेणाऱ्या स्त्रीला एकदा रोपणाची, मग सिझेरियनची आणि नंतर ते गर्भाशय काढून टाकण्याची अशा कमीत कमी तीन शस्त्रक्रियांना सामोरं जायचं आहे. हे तंत्र अजूनही प्रयोगशील अवस्थेत आहे. याचा विचार अपत्यप्राप्तीसाठी उत्सुक आई-वडिलांनी करायचा आहे.

काही देशांनी ‘मोन्ट्रीयल क्रायटेरिया’ बनवला आहे. ते म्हणतात की, ज्यांना मूल होण्याचे किंवा मिळवण्याचे सगळेच मार्ग (अगदी सरोगसी आणि दत्तकसुद्धा) बंद आहेत, गर्भाशयरोपण फक्त त्यांच्यासाठीच आहे. तर यामुळे अवैध मार्गाने जीवित किंवा मृत गर्भाशय दाते निर्माण केले जातील का, अशी एक भीती व्यक्त होतेय. किन्नर आणि समिलगी व्यक्तींना ‘राइट टू जेस्टेट’ (गरोदरपणाचा हक्क) देण्यासाठी गर्भाशयरोपण करू द्यावं का, हा प्रश्न न्यायव्यवस्थेपुढे उभा राहील. एरवी अवयवदान करून जीव वाचवला जातो, पण गर्भाशयरोपणाने एक आयुष्य धोक्यात घालून नवा जीव जन्माला येतोय का याचीही  शहानिशा केली जातेय.

एखाद्या साय फाय कादंबरीत शोभेल अशी घटना घडलीये खरी. डॉक्टर एझेनबर्गचा मेलबॉक्स मृत दात्याकडून होणाऱ्या गर्भाशयरोपणाच्या विनंतीअर्जानी भरून गेला असेल. अनेक निपुत्रिक मातांचा टाहोच त्यांना संशोधन करायला ऊर्मी देत असेल. देश कुठलाही असला तरी मातृत्वाची आस सारखीच असते. आपल्यासारख्या देशात सामाजिक अवहेलनेचा काचही असतोच. अशा स्त्रियांना मात्र आशेचा किरण दिसतोय.

४० वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या लुईस ब्राऊन या पहिल्या टेस्ट टय़ूब बेबीनेसुद्धा असेच अनेक प्रश्न उपस्थित केले होते. काळाने आणि तंत्राने त्यावर उत्तरही शोधली. याही तंत्राला वेळ द्यायला हवाय. शास्त्राची ही दुधारी तलवार परजायची कधी आणि म्यान कधी करायची हे हुशार मानवच ठरवतो. तोपर्यंत बाईची ‘कूस’ धन्य करणाऱ्या, पॅनडोराच्या पेटीतून बाहेर आलेल्या या होपचं, आशेचं आपण स्वागत करू या.

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 1:30 am

Web Title: uterine transplants hope for women having intrauterine infections
Next Stories
1 अवैध मानवी वाहतूकविरोधी कायदा : साधकबाधक चर्चेची गरज
2 परंपरेचे बळी कुरमाघर
3 विजयाचा ध्वज ‘उंच’ धरा रे ‘उंच’ धरा रे
Just Now!
X