एखादा माणूस वाचनवेडा असतो. मिळेल ते वाचत जातो. वाचायचं मिळवत जातो. रसिकांसाठी हळूहळू एक मापदंड बनून जातो. आणि कधीतरी मग आपल्या वाचनाची कहाणी उलगडून सांगतो. निरंजन घाटे यांच्या ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’ या अलीकडच्या पुस्तकाची ही पाश्र्वभूमी. हा वरवर दिसतो तसा सोपा प्रकार नाहीये. हिमनगाचं टोक ही अगदीच नेहमीची उपमा झाली; पण घाटे यांचं वाचनप्रेम इतकं अफाट आहे, की ते खरोखरच एका पुस्तकात मावण्यासारखं नाही. तरीही समकालीन प्रकाशनाच्या या अडीचशे पानी पुस्तकाने हे शिवधनुष्य चांगल्या तऱ्हेने पेललेलं आहे.

घाटे यांनी हे पुस्तक जगातल्या तमाम वाचनवेडय़ांना अर्पण केलं आहे. आणि ते समस्त वाचनवेडे या पुस्तकावर उडय़ा मारत आहेत! कारण सरळ आहे : आपल्या या अनोख्या वेडाला शब्दबद्ध करताना लेखकाने सगळ्या वाचनवेडय़ांना एक आवाज दिला आहे.. एक चेहरा दिला आहे.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप

आज चाळिशीच्या पुढे असलेल्या पिढीच्या तारुण्यात टीव्ही, संगणक, मोबाईल अशा दृश्य माध्यमांचा जम बसलेला नव्हता. त्यांना वाचनातूनच आपली स्वत:ची दृश्यसृष्टी उभी करायची होती. त्यातून पुस्तकं मिळण्याचे मार्ग थोडे. ना अमॅझोनवरून हवं ते छापील पुस्तक घरबसल्या मागवण्याची सोय, ना किंडलवर डाऊनलोड करून ई-बुक वाचण्याचं तंत्र. अशावेळी पुस्तकांच्या अफाट तहानेचं काय करायचं?

मग वाचनालयं, मासिकांची वर्गणी, कोणाच्या घरी बसून वाचलेली पुस्तकं, झालंच तर सेकंडहँड मिळवलेला खजिना या सगळ्याचं भयंकर अप्रूप असायचं. घाटेंच्या या कहाणीतून त्यांचं हे पुस्तकप्रेम फारच छान प्रकारे उलगडत जातं. ग्रंथवाचन व ग्रंथप्रेमामुळे त्यांचा निरनिराळ्या प्रकारच्या माणसांशी संबंध कसा आला, तेही या पुस्तकात खुसखुशीतपणे येतं.

घाटे विज्ञानविषयक आणि विज्ञानकथा- लेखक म्हणून परिचित आहेत. ते मुळात एक सिद्धहस्त लेखक आहेत. उत्तम संशोधन, रसाळ, ओघवतं लेखन, शब्दांवर प्रभुत्व यामुळे ते रहस्यकथा, नवकथा, चित्रपटविषयक लेखन आदी सर्वच प्रकारांत उत्तम लिहितात. त्यांना अमुक एका विषयाचं वावडं असं नाही. हा मोकळा दृष्टिकोन त्यांच्या वाचनातही दिसतो. विज्ञानविषयक लिहिणारे खरं तर परामानसशास्त्र वा ज्योतिषशास्त्र यांच्याकडे फिरकतही नाहीत. पण घाटे हे विषयही आवर्जून वाचतात. आणि वाचल्याचं प्रामाणिकपणे सांगतात. हे भारी दुर्मीळ!

साहसकथा असो, विनोद असो, की टॅबू विषय असोत; घाटे सगळ्या प्रकारचं लेखन मनापासून वाचतात. त्यात वेगळे संदर्भ मिळाले की त्यांचा पाठपुरावा करून आणखी वाचतात. आवडलेल्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून पुढे ते त्या, त्या विषयांत अव्वल लेखन करतात. हा सगळा प्रवास अत्यंत रंजकपणे या पुस्तकात येतो. वाचताना घाटेंची अभ्यासू वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. इंग्रजी आणि अमेरिकन लेखकांची तुलना म्हणा, किंवा चरित्र-आत्मचरित्रांचं विवेचन म्हणा, ते यात सहजगत्या येत राहतं.

‘शब्दकोश’ हा घाटे यांचा अतिशय आवडता विषय. तुम्ही-आम्ही शब्दकोश बघतो तो शब्दांचा वापर समजण्यासाठी. पण शब्दकोश ‘वाचणाऱ्या’ घाटेंना दोन-चार शब्दकोश पुरत नाहीत. एकदा गोडी लागल्यावर ते बायबलमधले शब्द, वैद्यकीय भाषा, भारतीय इंग्रजी, अशिष्ट भाषा, शब्दोच्चार.. असे आगळे कोश मिळवण्याचा सपाटा लावतात. ‘शब्दकोश ही ज्ञानसागराकडे पाहण्याची एक समृद्ध खिडकी आहे..’ हा घाटे यांचा प्रगल्भ दृष्टिकोन आपल्यापर्यंत अचूक पोहोचतो. आणि मग त्यांच्याकडच्या सुमारे दोनशे शब्दकोशांची समृद्धी आपल्याला मोहवून टाकते. हे प्रकरण जसं मुळातून वाचण्यासारखं आहे, तसंच आहे- ‘काही झंगड पुस्तकं’ असं वेगळ्या शीर्षकाचं प्रकरण. फल्रे मोवॅट, अ‍ॅन मुस्टो अशा साहसवीरांच्या अचाट अनुभवांची पुस्तकं घाटे यांना वाचक आणि लेखक म्हणून मोहिनी घालत असतील यात नवल नाही. लिंबूवर्गातली फळं, हिस्टरी ऑफ सेलिबसी, ग्रंथालयांचे अनुभव, बुद्धिझम अशा तऱ्हेतऱ्हेच्या झंगड वाचनातून घाटे अक्षरश: स्थल-कालाची सीमा ओलांडून जग फिरून आले आहेत. हातात घेतल्यावर एका बठकीत संपवण्याइतकं सुखद वाचन आहे हे. शिवाय आपल्या वाचनाला एक दिशा देण्याची ताकद या पुस्तकात आहे.

‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’- निरंजन घाटे,

समकालीन प्रकाशन,

पृष्ठे- २४५, मूल्य- ३०० रुपये.

मेघश्री दळवी meghashridalvi@hotmail.com