News Flash

अन्नधान्य चुकतंय का काहीतरी?

ती एक सुशिक्षित, जागरूक ग्राहक.

काही ठिकाणी तकाकी येण्यासाठी कॉलीफ्लॉवरसारख्या भाज्या विषारी, घातक कीटकनाशकाच्या द्रावणातून बुडवून काढतात. ऑक्सिटोझिन या संप्रेरकाचा वापर गाय, म्हैशींसाठी होऊन ते दुधात उतरते व तेथून आपल्या शरीरात जाऊन अनेक दुष्परिणाम होतात. गहू, तांदूळ, भाज्या, फळे, मासे वगैरे उत्पादन वाढावे, ते अधिक टिकावे यासाठी गेल्या काही दशकांत आपण विविध रसायनांशी सोयरीक केली. अन्न प्रक्रिया करण्याची विविध रसायने असतील, चव वा रंग वाढवणारे घटक असतील, अन्न टिकविण्यासाठीचे ‘प्रिझर्वेटिव्हज’ असतील. अशी एक ना अनेक रसायने आपल्या पोटात जात असतात. ती मान्यताप्राप्त नसतील तर अतिसारापासून कर्करोगापर्यंत वेगवेगळे आजार होऊ शकतात. म्हणूनच आपण खात असलेला प्रत्येक घास हा काळजीपूर्वकच घ्यायला हवा..

ती एक सुशिक्षित, जागरूक ग्राहक. आरोग्य, पर्यावरण याबाबतीत बऱ्यापैकी माहीतगार व संवेदनशील! तत्संबंधी वाचन करणारी, मित्रमंडळीत आवर्जून चर्चा करणारी. जीवनशैली उत्तम ठेवली तर अनेक आजारांना आपण दूर ठेवू शकतो, हे तिला पुरेपूर पटले होते. जंक फूड, फास्ट फूड, अतिसाखरमिश्रित ज्युस वगैरेंना तिने बऱ्याच वर्षांपूर्वीच सोडचिठ्ठी दिली होती. रस्त्यावर उभे राहून गाडीवरचे खाद्यपदार्थ खाण्याची मजा महाविद्यालयीन काळात अनुभवली तेवढीच. त्यानंतर मात्र रस्त्यावरचे किंवा कोणत्याही अस्वच्छ दिसणाऱ्या ठिकाणचे खाणे ती कटाक्षाने टाळत असे. ठरावीक काही पॅकेज्ड फूड, नामवंत ब्रँडचेच, लेबल वाचून घेण्याचा तिचा शिरस्ता होता. घरातच ताजा व चौरस

आहार घेण्याकडे तिचा कल होता. त्यासाठी अगदी भाज्या-फळे कशी धुवावीत किंवा स्वयंपाक करताना स्वच्छता कशी व का पाळणे महत्त्वाचे हेही तिने समजावून घेतले होते. एकंदर आपण बऱ्यापैकी ‘सेफ झोन’मध्ये आहोत, असा सुखद विचार तिच्या मनात यायचा. पण..

गेल्या काही वर्षांत काहीतरी चुकतंय, ‘ऑल इज नॉट वेल’, असं तिला जाणवू लागलं होतं. विविध अन्नपदार्थातील भेसळ, त्यासाठी वापरले जाणारे आरोग्यास धोकादायक नवनवीन पदार्थ वाचून ती अस्वस्थ होत होती. ‘रिफाईंड’ व ‘प्रोसेस फूड’च्या जगातही सारे आलबेल नाही, त्यातील प्रक्रियेसाठी लागणारी रसायने, अनेक फूड अ‍ॅडिटीव्हज याबाबतीतही मनात शंका निर्माण होत होत्या. पिठांमध्ये सर्रास वापरले जाणारे पोटॅशियम क्रोमाईडचा अंश ब्रेडमध्ये सापडल्याने व हे रसायन अत्यंत घातक, कर्करोगासाठीही कारणीभूत ठरू शकणारे असल्याने त्यावर बंदी घातली होती, हे वाचून तिला बरे वाटले. पण गेली अनेक वर्षे ते वापरात होते व ब्रेड, पाव, बन वगैरेतून ते लोकांच्या शरीरात गेलेच, त्याचे काय? एका संस्थेने तत्संबंधी अभ्यास केला म्हणून  हे सर्व बाहेर आले. अन्यथा त्याचा वापर चालूच राहिला असता का? अशी इतर रसायने आहेत का, जी आता वापरली जात आहेत, पण पुढे जाऊन आपल्याला त्यांचा धोकादायकपणा समजणार आहे, असे अनेक प्रश्न तिला भंडावून सोडायचे.

अलीकडे आइस्क्रीम व फ्रोजन डेझर्ट बनवणाऱ्या दोन नामवंत उत्पादकांमधील वाद वाचल्यावर प्रथमच तिला या दोन्हीमधील फरक समजला. दोन्ही दुधापासून बनवलेले पदार्थ, पण आइस्क्रीममध्ये स्निग्धांश हा दुधातील फॅट असते, तर फ्रोजन डेझर्टमध्ये वनस्पती तेल वापरले जाते, हा तो फरक. लेबलवर नाव, घटकपदार्थ नमूद केलेले असतात. आइस्क्रीम किंवा आइस्क्रीमसारखे सर्व पदार्थ हे पूर्ण दुधाचेच बनलेले असतात, अशी आपली साधारण मानसिकता असते व आपण लेबल नीट वाचत नाही किंवा घटक पदार्थ पुरेसे ठळक लिहीत नसावेत, असे तिला वाटून  गेले. पूर्वी न पाहिलेला ‘सत्यमेव जयते’मधील आमीर खानचा कीटकनाशकांवरील कार्यक्रम ‘टॉक्सिक फूड ऑन युवर प्लेट’ तिने इंटरनेटवर पाहिला व रासायनिक कीटकनाशकांचे जमीन, पर्यावरण व मानवी आरोग्यावरील दूरगामी दुष्परिणाम पाहून ती हबकलीच. हे कमी की काय म्हणून काही ठिकाणी (सर्व ठिकाणी नव्हे) कॉलीफ्लॉवर सारख्या काही भाज्या मॅलाथीयॉनसारख्या विषारी, घातक कीटकनाशकाच्या द्रावणातून बुडवून काढतात, असे तिला भाजीपाला व्यवसायाशी संबंधित एका मित्राने सांगितले. असे करण्याचे कारण काय तर म्हणे त्यामुळे भाजीला तकाकी येते, भरगच्च दिसते. कॅलारिअम कार्बाईडसारखे घातक कारसिनोजन काही  ठिकाणी आंबे, केळी कृत्रिमरीत्या पिकविण्यासाठी वापरले गेले हे सर्व वाचून ती अधिकच व्यथित झाली. आपण जो व्यवसाय करतोय त्याचा संबंध  थेट लोकांच्या आरोग्याशी आहे, याचे भान काहीजणांना नसते का? अज्ञानामुळे किंवा आर्थिक लाभासाठी काहीही केले जाते, हे तिच्या लक्षात आले. मोसमाच्या आधी फळे खा वगैरे हौस कशासाठी? मुळात आपण कृत्रिमरीत्या फळे  पिकवून  निसर्गाशी फारकत घेतोय का, असेही तिला वाटायचे. अँटिबायोटिक्सचा मारा पशू-प्राण्यांमध्ये केला जातो व त्यामुळे मांस, अंडी, दूध यात अँटिबायोटिक्सचा अंश उतरतो व हेही कारण आज अनेक अँटिबायोटिक्स निष्प्रभ होण्यासाठी आहे हे तिच्या लक्षात आले. ऑक्सिटोझिन या संप्रेरकाचा वापरही गाय, म्हशींत होऊन ते दुधात उतरते व तेथून आपल्या शरीरात जाऊन अनेक दुष्परिणाम होतात. हे सर्व वाचून हे सगळं काय चालू आहे, कुठे निघालो आहोत आपण असे तिच्या  मनात  यायचे.

दुधात पाणी, भाज्यांमध्ये अळ्या, धान्यांत खडे, बाजारातील भाज्या अस्वच्छ पाण्याने धुतलेल्या असतात हे पूर्वीचे सर्वश्रुत प्रकार आता तिला बऱ्यापैकी ‘किरकोळ’ वाटू लागले. फ्लॉवर/ मटारमधील अळ्या परवडल्या, या स्वत:च्या विचाराचे तिला हसू यायचे. सॅलड, कोशिंबिरी, भाज्या, मोड आलेली कडधान्ये खाण्यासाठी पहिल्यापासूनच तिचा आग्रह असायचा, पण आताशा हे खाताना आपण जीवनसत्त्वे, खजिने, नैसर्गिक साखर अशी छान पोषणमूल्येच नक्की खातो की कीटकनाशकं वा इतर रसायनांचा डोस नकळत पोटात जातोय या विचाराने तिची चलबिचल व्हायची. नेमके खावे तरी काय, हा प्रश्न तिला सतवायचा. ‘पुरे झाले गं तुझे, फार संशय घेतेस. फोबियाच झालाय तुला’, हे नवऱ्याचे, कुटुंबीयांचे म्हणणे तिला थोडे पटायचे. म्हणजे हे खरंच की भेसळ किंवा रसायनांचा अंश काही टक्के अन्नात असणारच, सर्वच अन्न काही दूषित, कमी प्रतीचे किंवा असुरक्षित नसते, हे तिला पटत होते. पण नेमके आपण जे खातो ते सुरक्षित आहे ना, हे कसे समजावे, याचे उत्तर तिला निश्चित असे मिळायचे नाही. या बाबतीत चित्र फार धूसर वाटायचे तिला. नैसर्गिकरीत्या पिकवलेली भाजी, फळे, घाण्यावरचे तेल, प्रत्येक सीलबंद पदार्थावरील लेबल पूर्ण वाचणे, एफएसएसएआय वा तत्सम लोगो, रजिस्ट्रेशन आहे ना, हे बघणे असे काही उपाय ती करू लागली. तरी मनात शंका अर्थातच कायम होत्या.. हवेतील पाण्यातील प्रदूषण, टूथपेस्ट, साबण, जेवणाचे ताट या सर्वातूनच  दिवसभर केमिकलचे कॉकटेल शरीरात जातेय का, हा विचार अस्वस्थ करणारा  होता तिला.

वाढत्या आयुर्मानासोबत अनारोग्याचे ओझेही वाढले. अन्न, वस्त्र, निवारा यासारखीच औषधेही अनेकांसाठी मूलभूत गरज ठरली. आधुनिक औषधे ही अत्यंत प्रभावी, पण मोठी दुधारी शस्त्रे. जिथे परिणाम, तिथे दुष्परिणाम हे त्यांचे वैशिष्टय़. आजारी पडून औषधाच्या कुबडय़ा आयुष्यभर वापरण्यापेक्षा जीवनशैली उत्तम ठेवून शक्य तेवढे आजारपणाला दूर ठेवता येईल तेवढे ठेवू, उपचारापेक्षा प्रतिबंधावर भर देऊ, Pharmacy पेक्षा Farmacy वर भर देऊ या, असे विचार काही वर्षांत रुजू लागले. ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ हे आपल्या पूर्वजांनी पुरातन काळीच सांगितले होते. ‘यूवर फूड इज युवर मेडिसिन’ (उत्तम आहार हेच खरे औषध) हे आधुनिक वैद्यकाचा जनक हिप्पोक्रेटनेही चक्क हजारो वर्षांपूर्वीच नमूद केले होते. अर्थात या साऱ्या विचारधारेत अन्न हे पोषक, दर्जेदार, सुरक्षित असावे, असते हे गृहीतच मानले गेले आहे. पण गेल्या काही वर्षांत या गृहीतकाला छेद देणारी परिस्थिती आपल्या भोवताली निर्माण झाल्याचे दिसतेय. जागतिक आरोग्य संघटनेनेही २०१५ मध्ये जागतिक आरोग्य दिनाचे ब्रीदवाक्य ठेवले होते-फ्रॉम फार्म टू प्लेट कीप युवर फूड सेफ. दक्षिण आशियाई देशांतील फूड सेफ्टीबद्दल विशेष काळजीही व्यक्त केली होती. २०१४-१५ च्या फूड टेिस्टगच्या मोहिमेत अनेक राज्यांतून भाजीपाला, धान्ये, मसाले, दुधातले पदार्थ याचे ६० हजार नमुने तपासले  गेले. यातील १२ हजार, म्हणजे २० टक्के नमुने हे काही ना काही निकषांवर निकृष्ट ठरले, सदोष आढळले. यात काही ‘सबस्टँडर्ड’ म्हणजे ठरावीक मानांकनापेक्षा यातील घटक/ पोषकमूल्ये कमी होती. म्हणजे खाद्यपदार्थ असुरक्षित होते असे नाही, पण त्याचा दर्जा कमी प्रतीचा असल्याने ती ग्राहकांची फसवणूकच होती. काही नमुन्यांमध्ये विविध रसायनांची भेसळ होती व ते आरोग्यास हानिकारक होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांतून मोठय़ा प्रमाणावर हे नमुने गोळा केले होते. महाराष्ट्रात सदोषतेचे प्रमाण १७ टक्के आढळले. या अहवालावर लोकसभेत चर्चा करताना आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनीही ही परिस्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले होते. यातील सर्वात महत्त्वाची, लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे हे सर्व नमुने परवानाधारी व रजिस्टर्ड (नोंदणीकृत) अन्न उत्पादक, हॉटेल्स, बाजारपेठेमधून घेतलेले होते. याखेरीज फार मोठय़ा प्रमाणावर नोंदणी न केलेले रस्त्यावरील  खाद्यविक्रेते, इतर कमी छोटे घरगुती, अन्न व्यावसायिक अशी एकंदर इन्फॉर्मल वितरण व्यवस्थाही आपल्याकडे आहे. जर सॅम्पलिंग या बिगरनोंदणीकृत सेक्टरमधून केले असेल तर बहुधा सदोषतेचे प्रमाण बरेच जास्त असते.

मध्यंतरी राज्यात दुधाच्या दर्जाचे सर्वेक्षण केले गेले. त्यातील ६८ टक्के नमुने हे काही ना काही निकषांवर समाधानकारक नव्हते. ४६ टक्के नमुन्यांमध्ये स्निग्धांश कमी होते. २० टक्क्यांमध्ये साखर मिसळलेली होती. ५ टक्के नमुने चक्क डिर्टजट पावडर होती. काहींमध्ये युरिया होता. मुंबई ग्राहक पंचायतीनेही केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष साधारण वरीलप्रमाणेच होते. एक मोठे सर्वेक्षण कीटकनाशकांचे होते. विविध अन्नपदार्थातील अंश तपासण्यासाठी गोळा केला गेला. यात १९ टक्के नमुन्यांमध्ये कीटकनाशकाचा अंश होता व ३ टक्के नमुन्यांमध्ये हा अंश धोकादायक पातळीवर होता.

गहू, तांदूळ, भाज्या, फळे, मासे वगैरे उत्पादन वाढावे, ते अधिक टिकावे, ते आकर्षक दिसावे, झटपट अन्नपदार्थ बनवता यावे या व अशा अनेक सोयींसाठी गेल्या काही दशकांत आपण विविध रसायनांशी सोयरीक केली. मग ती रासायनिक खते, कीटकनाशके असो, अन्न प्रक्रिया करण्याची विविध रसायने असतील, चव/रंग वाढवणारे घटक असतील, अन्न टिकविण्यासाठीचे ‘प्रिझर्वेटिव्हज’ असतील. अशी एक ना अनेक  रसायनं. ही सर्व रसायने जी मान्यताप्राप्त आहेत, तीच वापरायला हवीत. योग्य त्या मर्यादेतच वापरायला हवीत आणि मुख्य म्हणजे योग्य त्या पद्धतीने त्यांचा वापर करणे, म्हणजे ‘गुड मॅन्युफॅक्चिरग प्रॅक्टिस, गुड अ‍ॅग्रिकल्चरल प्रॅक्टिस’ पाळणे हे खरे तर अत्यावश्यकच. तसे सगळीकडे कडकपणे पाळले जाते असे नाहीच. कीटकनाशके किंवा जड धातू (शिसे, अर्सेनिक वगैरे) हे शरीरात चिवटपणे ठाण मांडून बसतात, सडत जातात व दूरगामी परिणाम करतात. एकंदरच अशा रसायनांचा अंश, जंतूप्रादुर्भाव किंवा भेसळीसाठी वापरलेल्या अनेक पदार्थामुळे अतिसारापासून कर्करोगापर्यंत वेगवेगळे आजार होऊ शकतात. पचनसंस्थेचे विकार, प्रजनन संस्थेचे विकार,  मानसिक बदल, हार्मोनल बिघाड असे एक ना अनेक दुष्परिणाम त्वरित वा कालांतराने दिसू शकतात व यासंबंधी नवनवीन संशोधन बाहेर येत आहे.

रस्त्यांवर उघडय़ावर विकले जाणारे अन्नपदार्थ हा  प्रकार आपल्याकडे फार व्यापक प्रमाणात दिसतो आहे. देशात एक कोटी फेरीवाले असावेत, असा अंदाज आहे व हा गट दुर्लक्षून चालणार नाही. झटपट, स्वस्त, सोयीचे, चविष्ट व रात्री-बेरात्री कधीही खायला मिळत असल्याने फार मोठय़ा प्रमाणावर सर्व वयोगटाचे लोक रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांकडे आकृष्ट होतात. आरोग्याची काळजी, स्वच्छता हा विषय इथे फारसा नसतो. मध्यंतरी दिल्लीमध्ये दक्षिण व मध्य दिल्लीतील विविध खाद्यपदार्थाची (पाणीपुरी, मोमो, बर्गर, सामोसा वगैरे) पाहणी केली गेली. यात मोठय़ा प्रमाणात ई-कोलाय हा मुख्यत: पचनसंस्थेला संसर्ग करणारा व मानवी विष्ठेतून दूषित पाण्याद्वारा पसरणारा जीवाणू सापडला. एकंदरच आपल्याकडे बाहेर खाणे, मग ते हॉटेल वा रस्त्यावर कुठेही असो आणि पोट बिघडणे हे समीकरण अंगवळणी पडले आहे.

देशातील अन्न व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रस्थानी एफएसएसएआय, म्हणजे फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया आहे. अन्न सुरक्षा आणि मानांकन कायदा-२००६ आणि नियम २०११ हे फूड सेफ्टीसाठी आपण टाकलेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. डब्ल्यू.एच.ओ.नेही २०१५ च्या आरोग्यदिनानिमित्ताने परिपत्रकात एफएसएसएआय ही एक अत्यंत महत्त्वाची व स्वागतार्ह घडमोड (डेव्हलपमेंट) आहे, असा उल्लेख  केला होता. प्रत्येक राज्यातून अन्नविषयक कायद्याची अंमलबजावणी हे मुख्यत: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) करीत असते. देशातील अवाढव्य अशा अन्न व्यवसायावर सक्त नजर ठेवणे, नियंत्रण ठेवणे हे एक मोठे आव्हानात्मक काम आहे, हे नक्की. एफएसएसएआयच्या संकेतस्थळाला भेट दिलीत तर त्यांच्या कामाचा प्रचंड परीघ लक्षात येतो. विविध खाद्यपदार्थासाठी तयार केलेले स्टँडर्ड्स, फूड अ‍ॅडिटिव्हची यादी, त्यांचे योग्य प्रमाण, कामाच्या आदर्श पद्धतींबाबत नियमावली, केले गेलेले विविध सव्‍‌र्हे हे सर्व आपल्याला या वेबसाईटवर दिसतात.

अन्न उत्पादक, शेतकरीपासून ते रस्त्यावरील, रेल्वेमधील, खाद्यविक्रेत्यांचे प्रशिक्षण करण्यासाठीही प्रशासन प्रयत्नशील असते. ‘क्लीन स्ट्रीट फूड’ असा एक उपक्रमही चालवला जातो. ग्राहकांसाठी मार्गदर्शनपर पुस्तिकाही उपलब्ध आहेत. अन्न उत्पादक कारखाने, हॉटेल्स, दुकाने यांची तपासणी, फूड टेस्टिंगचे कामही चालू असते. अन्न भेसळीवर नजर ठेवणे, भेसळ प्रतिबंधक कायद्यानुसार कठोर कारवायाही चालू असतात. भाजी, फळे यांची मोठी बाजारपेठ यावरही नजर ठेवली जाते. असे विविध प्रयत्न शासन, प्रशासनातर्फे चालू असतात. आपला अन्न सुरक्षा कायदाही सर्वसमावेशक व उत्कृष्ट आहे. पण अत्यंत परिणामकारक अंमलबजावणीसाठी सर्व यंत्रणा मजबूत, अधिक सक्षम होणे गरजेचे आहे. देशातील अवाढव्य अन्न व्यवसायाच्या मानाने या यंत्रणेकडे असलेले मनुष्यबळ, टेस्टिंग लॅब इत्यादी कमी आहे. याकडे तातडीने लक्ष देऊन निरीक्षक, प्रयोगशाळा, त्यातील आधुनिक उपकरणे, टेस्टिंगसाठी लागणारे तज्ज्ञ यांचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे.

फूड टेस्टिंगच्या पद्धतीमध्ये देशभर एकवाक्यता आणणे (आज विविध राज्यांत वेगवेगळ्या असू शकतात), ज्या फूड अ‍ॅडिटिव्हबद्दल शंका, गोंधळ असेल, उदा. मोनोसोडियम ग्लुकामेट, एमएससी ऊर्फ अ‍ॅजिनोमोटो अशा घटक पदार्थासाठी त्वरित मार्गदर्शक नियम बनवणे हेही महत्त्वाचे आहे. आज ग्राहकांना जर एखाद्या उत्पादनाबद्दल शंका असेल, म्हणजे एखाद्या पदार्थात भेसळ आहे किंवा त्यात जे घटक अपेक्षित आहेत तेच नक्की आहेत ना, याची पडताळणी करून घ्यायची असेल तर त्यासाठी सुलभ अशी यंत्रणा हवी. हेल्पलाईन, तक्रार करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक, वेबसाईट सुविधा, टेस्टिंग लॅब हे सर्व आजही आहे, पण ते अधिक सोपे, लोकाभिमुख व्हायला हवे. तक्रारींची त्वरित दाद घेण्यासाठी ही सर्व यंत्रणा अधिक कार्यक्षम, सुसज्ज व्हायला हवी, जेणेकरून ग्राहकांना आपले शंकानिरसन करून घेणे जिकिरीचे  होणार नाही व यंत्रणेबद्दल विश्वास वाटेल.

कीटकनाशकांचा अतिरेकी वापर झालेले पंजाब ते पूर्णत: नैसर्गिक शेती करणारे ऑरगॅनिक सिक्कीमही आपली दिशा निश्चित सकारात्मक व स्वागतार्ह आहे. याचा प्रसार झपाटय़ाने इतर राज्यांत व्हावा यासाठी अनुकूल धोरणे, सोयीसुविधा, प्रशिक्षण हे वेगवान रीतीने व्हावयास हवे. आपला घातक केमिकल डोस बंद करण्यासाठी हे पाऊल निश्चित महत्त्वाचे आहे.

अन्न व्यवसायातील सर्व छोटय़ा-मोठय़ा व्यावसायिकांना, अगदी रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांनीही परवाना घेणे वा किमान नोंदणी करणे (त्यांच्या व्यवसायाच्या स्वरूपाप्रमाणे) अत्यावश्यक असते. या सर्व फॉर्मल व इन्फॉर्मल सेक्टरमधील व्यावसायिकांनी आपला व्यवसाय हा ग्राहकांच्या आरोग्यावर थेट परिणाम करणारा आहे. हे आरोग्यभान बाळगावयास हवे. त्यासाठी त्यांचे अधिक प्रशिक्षण, प्रबोधन होणे गरजेचे आहे. ग्राहक म्हणून आपण सतर्क राहणे, पदार्थाची अंतिम मुदत बघणे, लेबल नीट वाचणे, अन्नाचा दर्जा, स्वच्छता याबाबतीत आग्रही असणे, अगदी वाण्याच्या-भाजीच्या दुकानापासून हॉटेलपर्यंत. हा आपला आग्रह व अपेक्षा व्यावसायिकांना जाणवून देणे नक्कीच परिणामकारक होईल. अस्वच्छपणे, कमी प्रतीचा माल वापरत व्यवसाय करणाऱ्यांकडे पाठ फिरवली तर त्यांच्यात सुधारणा होण्यास मदत होईल. ग्राहक हाच ‘राजा’ आहे हे खरेच!

आज जे अन्न, खाद्यपदार्थ उपलब्ध आहे ते सर्वच सदोष आहे, असे मुळीच नाही, पण या क्षेत्रात बरीच अधिक काळजी घेणे, सुधारणा होण्यास वाव आहे.

फूड सेफ्टी हा फार मोठा व व्यापक विषय आहे. आपण त्यातील काही महत्त्वाच्या मुद्दय़ांवर इथे चर्चा केली. सकस, दर्जेदार, सुरक्षित अन्न यासाठी सर्व घटकांनीच प्रयत्नशील असणे, संवेदनशील असणे व एकत्रित काम करणे हे गरजेचे आहे. खाद्यपदार्थाच्या सुरक्षेचा थेट संबंध केवळ देशाच्या सुआरोग्यासाठीच नाही तर सामाजिक, आर्थिक विकासाशीही आहे. स्वस्त किंवा मोफत औषधे, डायलिसिस सेंटर्स, मोफत शस्त्रक्रिया/ उपचार ही धोरणेही महत्त्वाची व स्वागतार्ह आहेतच, पण हे सर्व अनारोग्य झाल्यानंतरचे उपाय आहेत. मुळात आजारांचे वाढते आलेख रोखण्यासाठी मूलभूत पातळीवर सर्वंकष प्रयत्न होणे गरजेचे आहे व त्यासाठी शुद्ध सकस अन्न याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

रस्त्यांवर उघडय़ावर विकले जाणारे अन्नपदार्थ हा प्रकार आपल्याकडे फार व्यापक प्रमाणात दिसतो.  देशात एक कोटी फेरीवाले असावेत, असा अंदाज आहे व हा गट दुर्लक्षून चालणार नाही. झटपट, स्वस्त, सोयीचे, चविष्ट व रात्री-बेरात्री कधीही खायला मिळत असल्याने फार मोठय़ा प्रमाणावर सर्व वयोगटाचे लोक रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांकडे आकृष्ट होतात. आरोग्याची काळजी, स्वच्छता हा विषय इथे फारसा नसतो. मध्यंतरी दिल्लीमध्ये दक्षिण व मध्य दिल्लीतील विविध  खाद्यपदार्थाची (पाणीपुरी, मोमो, बर्गर, सामोसा वगैरे) पाहणी केली गेली. यात मोठय़ा प्रमाणात ई-कोलाय हा मुख्यत: पचनसंस्थेला संसर्ग करणारा व मानवी विष्ठेतून दूषित पाण्याद्वारा पसरणारा जीवाणू सापडला. एकंदरच आपल्याकडे बाहेर खाणे, मग ते हॉटेल वा रस्त्यावर कुठेही असो आणि पोट बिघडणे हे समीकरण अंगवळणी पडले आहे.

खाद्यगृहांची आरोग्यतपासणी व ग्रेडेशन

अनेक देशांमध्ये प्रत्येक हॉटेल, रस्त्यावरील फूड स्टॉल्स, सुपरमार्केट्स यांची आरोग्य विभागातर्फे वारंवार तपासणी होते व स्वच्छता किंवा इतर काही बाबतीत नियमांचे उल्लंघन केलेले दिसल्यास ते हॉटेल तात्पुरते किंवा कायमचे बंद केले जाते. याची  माहिती ठळकपणे समाजापर्यंत पोहोचवली जाते. रेस्टॉरंट वा फूड मार्केट चालू आहे, ओपन आहे, म्हणजे तिथे नक्कीच सर्व व्यवस्थित आहे याची खात्री ग्राहकांना असते. अनेक देशांत दर्जानुसार ए, बी, सी अशा ग्रेड्स देण्यात येतात. डेन्मार्कमध्ये सवरेत्कृष्ट खाद्यगृह वा दुकानाला Elite smiley चा दर्जा मिळतो. गिऱ्हाईकांना बघण्यासाठी इन्स्पेक्शन रिपोर्ट्स खुले ठेवणे, किचन पाहायचे असल्यास ते पाहू देणे, ग्राहकाभिमुख नियम काही देशांत आहेत. आपल्याकडेही असे ग्रेडेशन सर्टिफिकेट्स मिळाल्यास आवडेल व ते आम्ही ग्राहकांसाठी अभिमानाने डिस्प्ले करू, असे या व्यवसायातील काहीजणांनी सांगितले. पण आजही काळजीपूर्वक, जबाबदारीने व्यवसाय करतो, ग्रेडेशनसाठी उगाच जाचक अटी किंवा ग्रेड मिळवणे/ टिकविणे यासाठी ‘देवघेव’ असे काही असू नये, अशी प्रतिक्रियाही काही व्यावसायिकांची होती.

काही महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक /संकेतस्थळे

  • फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (एफएसएसएआय) fssai.gov.in
  • टोल फ्री क्रमांक १८००११२१०० एसएमएस व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक ८६८६८६८६८
  • The Pink Book – Your Guide for Safe and Nutritions Food at Home- FSSAI- संकेतस्थळावर उपलब्ध jagograhakgago.com
  • अन्न व औषध प्रशासनाची हेल्पलाइन- १८००२२२३६५
  • सीलबंद अन्नपदार्थाच्या लेबलवर पुढील माहिती आहे का पाहावे-
  • अन्न पदार्थाचे नाव, घटक पदार्थ व पोषणमूल्य
  • उत्पादनाची तारीख व अंतिम तारीख, बॅच नंबर, विशेष आवश्यक
  • शुद्ध शाकाहारी असल्यास हिरवा ठिपका
  • मांसाहारी असल्यास ब्राऊन ठिपका

अन्न पदार्थाचे वजन व किंमत, उत्पादनाच्या प्रकाराप्रमाणे उत्पादकाचे नाव, माहिती

  • (पुढील लोगो पहावेत.)

सर्व पॅक्ड फुड आणि शीतपेयांसाठी

सर्व सीलबंद पिण्याच्या पाणी बाटल्यांवर व काही इतर प्रोसेस्ड फूड

कृषीविषयक उत्पादनांसाठी

 

– प्रा. मंजिरी घरत

manjeerig@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:05 am

Web Title: what does healthy eating mean
Next Stories
1 आशेचा दिवा
2 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब मुलांच्या कथा-व्यथा
3 आता तरी बोलायला हवंच..
Just Now!
X