14 August 2020

News Flash

गोडवा चिरोटय़ाचा, भरारी यशाची!

नृत्यकलेचं उत्तम करिअर सुरू असताना अगदी सहजच म्हणून बनवलेल्या चिरोटय़ांना एवढी प्रसिद्धी मिळाली

धनश्री आपटे खरे तर भरतनाटय़म नर्तिका! गुरू मीनाक्षी व्यंकटरमन यांच्याकडून वयाच्या आठव्या वर्षांपासून नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले.

नृत्यकलेचं उत्तम करिअर सुरू असताना अगदी सहजच म्हणून बनवलेल्या चिरोटय़ांना एवढी प्रसिद्धी मिळाली की त्यातून ‘आपटे फूडस्’ची निर्मिती करावी लागली. आज चिरोटय़ांची मागणी टनांवर पोहोचली असून ‘आपटे फूडस्’ने परदेशवारीही केली आहे. त्याच्या यशाची ही कहाणी.

आपण कधी तरी सहजच एखाद्या गोष्टीची सुरुवात करतो आणि ध्यानीमनी नसतानाही त्यातून काही तरी खूप मोठे निर्माण होते. असेच काहीसे झाले मिरजेच्या धनश्री आणि महेश आपटे यांच्याबाबतीत. अगदी सहज म्हणून बनवून दिलेल्या चिरोटय़ांनी त्यांना एवढी मोठी दाद आणि ग्राहक मिळवून दिले की त्यांना ‘आपटे फूड्स’चीच निर्मिती करावी लागली.

धनश्री आपटे खरे तर भरतनाटय़म नर्तिका! गुरू मीनाक्षी व्यंकटरमन यांच्याकडून वयाच्या आठव्या वर्षांपासून नृत्याचे प्रशिक्षण घेतलेले. त्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळालेली. गाण्याचीही आवड. नृत्य आणि गाणे हेच करिअर म्हणून निवडलेले. शिवाजी विद्यापीठात नृत्य विभागात त्यांनी जवळपास १० वर्षे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. सध्याही ‘कलावर्धिनी ट्रस्ट’च्या माध्यमातून मिरज आणि सांगली येथे भरतनाटय़मचे वर्ग त्या घेत असतात. त्यांचे नृत्याचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आणि उत्सवांमधून होत असतात. धनश्री यांची ही एवढी मोठी ओळख मग अचानक ‘आपटे फूड्स’ कुठून आले?

‘‘त्याचे असे झाले की साधारणत: १२ वर्षांपूर्वी माझ्या आत्याने चिरोटे बनवून देणार का, असे विचारले आणि मी सहजपणे ‘हो’ म्हटले. त्याला कारण माझ्या सासूबाई मीना आपटे. माझ्या सासूबाई अगदी अन्नपूर्णाच. वेगवेगळे पदार्थ करण्यात त्यांचा हातखंडा. पदार्थाची चव, मापे, रंग याचे त्यांना अचूक ज्ञान. त्यांच्या या अनुभवातूनच माझीही पाककला विकसित झालेली. त्यातूनच मी आत्याबाईंना ‘हो’ म्हटले ’’धनश्रीताईंच्या या एका ‘हो’ तून पुढचा इतिहास घडला.

धनश्रीताई आणि त्यांच्या सासूबाईंनी आत्याबाईंना चिरोटे बनवून दिले. त्यांच्याकडून त्या चिरोटय़ांचा गोडवा त्यांच्या नातेवाईकांपर्यंत, शेजारपाजाऱ्यांपर्यंत पोहोचला. मुळात चिरोटे करायला तसे अवघडच. कधी ते फुलत नाहीत तर कधी त्यांच्या कडक पुऱ्याच होऊन जातात. असे असताना अगदी खुसखुशीत, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारे चिरोटे बनवून मिळणार असतील तर.. वाह.. अगदी अशीच दाद मिळून धनश्रीताई आणि त्यांच्या सासूबाईंना चिरोटय़ाच्या आर्डर्स मिळू लागल्या.

सुरुवातीला वर्षभर धनश्रीताई आणि त्यांच्या सासूबाई दोघीच चिरोटे बनवून द्यायच्या. अगदीच गरज पडली तर धनश्रीताईंची दोन्ही मुले, त्यांच्या नणंदा, त्यांचे पती त्यांच्या मदतीला येत. हळूहळू मागणी वाढत गेली आणि चिरोटे बनवणे हे काम घरगुती राहिलेले नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यातूनच २००४ मध्ये ‘आपटे फूड्स’चा प्रारंभ झाला.

‘घरगुती व्यवसायातून व्यावसायिकपणे सर्व हाताळताना अनेक गोष्टींचे, सरकारी नियमांचे भान राखावे लागते. त्यासाठी माझे पती महेश आपटे यांचा आणि त्यांच्या उद्योगाविषयीच्या अनुभवाचा फार फायदा झाला. त्यांनी पॅकिंगकडेही बारकाईने लक्ष पुरवले. पॅकिंग केवळ आकर्षक करून उपयोग नाही तर त्याद्वारे पदार्थ त्याच्या मूळ रूपात आणि चवीत राहिला पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. त्यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरही तग धरेल आणि मान्यता असेल, असे ‘पुनेट पॅकिंग’ करण्यास सुरुवात झाली.’’ धनश्रीताईंनी सांगितलं.

‘‘घरी एखादा पदार्थ करणे आणि तोच पदार्थ मोठय़ा प्रमाणात इतरांकडून तितक्याच निगुतीने आणि चवीत, रंगरूपात फरक न करता तयार करून घेणे हे आव्हान होते. आज आमच्याकडे १५ ते २० जण काम करतात. त्यांना प्रशिक्षण देऊन तरबेज करण्यात आलं आहे. त्यामुळे चवीमध्ये कोणताही बदल आढळणार नाही,’’ त्या खात्रीपूर्वक सांगत होत्या.

चिरोटय़ांबरोबरच मग फराळाचे इतर काही पदार्थ बनवून देणार का, अशी त्यांच्याकडे विचारणा झाली. त्यातूनच आता ‘आपटे फूड्स’मध्ये चकली, बेसन लाडू, करंजी, डिंक लाडू, गूळपोळी, शेव, तीळवडय़ा अशा उत्पादनांची मालिका वाढली आहे. उत्पादन आणि कामाची व्याप्ती वाढली असली तरी पदार्थाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड केली जात नाही. चिरोटे, लाडू किंवा अन्य पदार्थ तयार करण्यासाठी खासकरून साजूक तुपाचा वापर केला जातो. त्यातही कोणत्याही प्रकारची भेसळ नको म्हणून ‘चितळे’ यांचे तूप वापरले जाते. शिवाय इतरही पदार्थ तपासूनच वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितलं.

या पदार्थाच्या विक्रीसाठी सुरुवातीला सांगली, मिरज, कोल्हापूर आणि महामार्गावरील काही दुकाने यांच्याकडेच ते ठेवले होते, मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे-मुंबईतही ते लोकप्रिय झाले. आता तर परदेशातूनही ‘आपटे फूड्स’ची मागणी येऊ लागली आहे. ‘‘आम्ही गणपतीनंतर ऑर्डर्स घेणे बंद करतो, कारण त्यानंतरच्या ऑर्डर्स पूर्ण करणे शक्य होत नाही. साधारणत: एक ते दीड टन पदार्थ दसरा-दिवाळी या सणांच्या काळात विकले जातात. सुदैवाने सुरुवातीला ऑर्डर्स देणारे जवळचेच असल्याने कधी फसगत झाली नाही. आताही आमचे दुकान असे नाही. ऑर्डर घरपोच देण्याची व्यवस्था आहे किंवा लोकं येऊन घेऊन जातात.’’ त्या सांगतात.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या एका स्नेह्य़ाने लतादीदींच्या वाढदिवशी त्यांना ‘आपटे फूड्स’चे चिरोटे भेट म्हणून दिले. ते त्यांना एवढे आवडले की, लता मंगेशकर यांच्याकडून ‘तुमचे चिरोटे खाऊन मंगेशकर कुटुंबीयांचे आत्मे तृप्त झाले आणि तुम्हाला आमचे आत्म्यापासूनचे आशीर्वाद’ असा निरोप आला. त्यांच्याप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही धनश्रीताईंना चिरोटय़ांसाठी कौतुकाची थाप मिळाली आहे. सुधा मूर्ती, अभिनेते बोमन इराणी, नाना पाटेकर अशी चिरोटय़ांनी ज्यांची रसना तृप्त केली अशांची यादी फार मोठी आहे. अनेकजण त्यांच्या पदार्थाच्या बॉक्सवर असलेल्या दूरध्वनीवर फोन करून आवर्जून दाद देतात, त्यांचे कौतुक करतात. ही मोठी पावती असून आपले काम योग्य मार्गावर चालले असल्याचे समाधान त्यातून मिळाल्याचे धनश्रीताई सांगतात. त्यांच्या या व्यवसायासाठी भिलवडीचे नानासाहेब चितळे यांचे बहुमोल मार्गदर्शन त्यांना लाभल्याचा उल्लेखही त्या आवर्जून करतात. त्यांचा कर्मचारीवर्ग आणि ग्राहक यांचा या उद्योगवाढीत मोठा वाटा असल्याचेही त्या नमूद करतात. हाताला चव असणे आणि ती चव टिकवणे, हे ज्याला जमते त्याला व्यवसायाचे गणित जमले,असे म्हणता येईल. ‘आपटे फुड्स’च्या बाबतीत हेच लागू होते.

– प्रज्ञा तळेगावकर
pradnya.talegaonkar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2015 12:09 am

Web Title: woman entrepreneur dhanashri apte
Next Stories
1 पणत्यांच्या प्रकाशात उजळला व्यवसाय!
2 डिझायनर रांगोळी ठरला व्यवसायाचा पाया!
3 स्वयंपूर्ण करणारी चकली
Just Now!
X