14 August 2020

News Flash

पणत्यांच्या प्रकाशात उजळला व्यवसाय!

शरद ऋतूतलं वातावरण तसं उबदार! तेजोमय आनंददायी दिवाळीचा सण. दिव्यांची आरास म्हणजे दिवाळी.

नंदाताई नलावडे, यांना व्यवसाय करायचा होता, पण नेमका कोणता हे समजत नव्हतं.

मुंबईच्या नंदाताई नलावडे यांनी स्वत:सोबतच इतर स्त्रियांच्या आयुष्यात पणतीच्या ज्योतीतून स्वावलंबनाचा प्रकाश निर्माण केला. पणती रंगवण्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय नंतर डिझायनर पणत्या, मेणबत्त्या तयार करत करत आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत झेपावणार आहे.

शरद ऋतूतलं वातावरण तसं उबदार! तेजोमय आनंददायी दिवाळीचा सण. दिव्यांची आरास म्हणजे दिवाळी. त्यातच पणती म्हणजे तेजाचं प्रतीक. इवलुशा पणतीचं कर्तृत्व मोठं! धनत्रयोदशीला दीपदान केल्यानं इतरांचंही आयुष्य प्रकाशात उजळू शकेल, या भावनेचा हा सण. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या या पणतीला आपली मार्गदर्शक बनवून नंदा नलावडे यांनी उद्योगाचा पाया रचला आणि आज त्यांचा व्यवसाय लाखो रुपयांची उलाढाल करतो आहे.

नंदाताई नलावडे, यांना व्यवसाय करायचा होता, पण नेमका कोणता हे समजत नव्हतं. त्या इच्छेला त्यांनी जोड दिली आपल्या कलेची. बदलत्या काळाच्या मागणीनुसार पणत्या तयार करण्याचं त्यांनी ठरवलं. साधारणत: २००१ चा तो काळ होता. प्रथम त्यांनी  पणत्या विकत आणून त्या रंगवून वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये विक्रीला ठेवल्या. अगदी कमी भांडवलात प्रदर्शनात भाग ध्यायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी

मीनल मोहाडीकर यांच्या ५ दिवसांच्या प्रदर्शनात भाग घेतला. त्यात त्यांना मोठं यश मिळालं आणि उद्योगाची सुरुवात झाली.

परंतु तत्पूर्वी त्यांनी वेगवेगळ्या प्रदर्शनांतून या व्यवसायाची माहिती घेऊन त्याचा अभ्यास केला. नंदाताई सांगतात की, आमच्या व्यवसायाची सुरुवात अगदी सहजतेनं झाली. वेळेचा सदुपयोग व्हावा म्हणून सुरू केलेला व्यवसाय आता मोठय़ा प्रमाणात फोफावला आहे. आज हा व्यवसाय माझ्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच बनलाय. पणती व्यवसायात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी मी भांडूप येथे इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये जागा घेऊन कामाला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना मी मेहंदी, हस्तकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता त्याची या व्यवसायासाठी मला भरीव मदत झाली. ‘महाराष्ट्र व्यापारी पेठ’ किंवा ‘ग्राहक पेठ’मध्ये भाग घेतल्यानं मला ग्राहकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या गरजेनुसार काम करता आलं. त्यामुळे पणतीचे प्रकार व त्यावर करायची कलाकुसर याबद्दल वेगवेगळे प्रयोगही करता आले. आमच्या पणतीचं वैशिष्टय़ म्हणजे न गळणारी आणि धुता येईल अशी पणती! सुरुवातीच्या काळात आम्ही पणती काळी पडू नये म्हणून तिला वात लावण्यासाठी स्टीलचे पाइप बसवून द्यायचो, म्हणजे पणती काळी पडत नाही रंग व डिझाइनही खूप चांगली राहते. आता आम्ही मागणी तसा पुरवठा म्हणजे डिझायनर पणत्याही बनवतो.’’

पणत्या बनवत असताना नंदाताईंना मेणबत्ती बनवून देण्याची विचारणा झाली. तसेच वेगवेगळ्या आकारच्या पणत्यांमध्ये तेलाऐवजी मेण घालून पणत्या विकाव्या असा विचार त्यांच्याही मनात डोकावला. त्यातूनच मग त्यांनी मेणबत्ती बनवण्याच्या व्यवसायतही शिरकाव केला.

नंदाताई सांगतात, ‘‘माझे पती इंजिनीयर असल्यानं त्याचा उपयोग मेणबत्ती व्यवसायात झाला. फुलांचे व इतर वस्तूंचे मेणाचे साचे बनवायची जबाबदारी त्यांनी घेतली. अर्थात हळूहळू व्यवसाय वाढला आणि आता या सर्व कामासाठी आमच्याकडे १५ जणी कायमस्वरूपी कामाला आहेत. सणांच्या काळामध्ये ही संख्या वाढते. ज्या स्त्रियांना घरच्या घरी काम हवं असतं अशांना आम्ही मेणबत्तीच्या वाती बनवण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून काम करवून घेतो.’’

मेणबत्ती बनवण्याचं काम खूप जबाबदारीनं करावं लागतं. त्यामुळे रंग कसा करावा, त्याच्या छटा कशा असाव्यात याचं बारकाईनं काम करावं लागतं. त्यामुळे त्यांना प्रशिक्षणही काळजीपूर्वकच द्यावं लागतं. काही जणींना ते करण्याचा आत्मविश्वास नसतो. त्यांच्याकडून मग काचा लावणं, कुंदन चिकटवणं ही कामं करवून घ्यावी लागतात. हळूहळू त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन त्या रंगवायचं कामही करू लागतात. आता त्यांच्याकडे काम करणाऱ्या या स्त्रिया एवढय़ा कुशल झाल्या आहेत की नंदाताईंना त्यांच्या कामाकडे फार लक्ष द्यावं लागत नाही. तसंच या स्त्रियांना मेणाचं वजन करून दिल्यावर पुढील प्रक्रियाही त्या सरावाने शिकतात. पणतीचं डिझाईन व रंगछटा दाखवल्या की त्या आकर्षकरीत्या पॅकिंगही करतात.

व्यवसाय म्हटलं की चढउतार हे आलेच. त्या चढउतारांविषयी नंदाताई म्हणतात की, ‘‘आपल्या उद्योगात कुठलीही गोष्ट चांगली असो वा वाईट ती एक संधीच असते. एकदा एका नामांकित फार्मास्युटीकल कंपनीची मेणबत्तीची ऑर्डर आम्हाला मिळाली. १५ दिवसांत ऑर्डर पूर्ण करण्याचं आम्ही कबूलही केलं. पण उत्साहाच्या भरात आमच्याकडून मोल्ड बनवण्यात थोडीशी चूक झाली आणि आमचं डिझाइन चुकलं. एवढय़ा मोठय़ा कंपनीची ऑर्डर त्यात कच्चा मालही मोठय़ा प्रमाणात आणलेला. दिवस कमी आणि काम जास्त होतं. मात्र धीर न सोडता आम्ही पुन्हा मोल्ड बनवले. त्या वेळी जागेची अडचण होती. जागा लहान असल्यानं एकाच वेळी मेणबत्त्या तयार करणं आणि त्यांचं पॅकिंग करणं शक्य नव्हतं. त्यामुळे सकाळी कर्मचारीवर्ग मेणबत्ती बनवायचा आणि मी, माझे पती व मुलगा रात्रभर पॅकिंग करायचो. अशा प्रकारे सर्वाच्या साथीने आम्ही ही ऑर्डर पूर्ण केली. यात खूप मानसिक व शारीरिक त्रास झाला, मात्र ऑर्डर पूर्ण केल्यावर मिळालेल्या समाधानात सर्व शीण निघून गेला.’’

एकदा एका फार्मास्युटिकल कंपनीला लठ्ठ व्यक्ती सडपातळ होणारी गोळी बाजारात आणायची होती. त्यासाठी त्यांना औषधाच्या रंगानुसार मेणबत्तीचा सेट हवा होता. त्यात दोन लठ्ठ आणि दोन सडपातळ अशा मेणबत्त्या हव्या एवढंच सांगून, ‘तुम्ही सॅम्पल आणून द्या!’, असं त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. नंदाताईंनी विचारपूर्वक मेणबत्तीचा मोल्ड तयार केला. एकाच उंचीचा फक्त डोकं, खांदा, कंबर असलेला मोल्ड त्यांनी तयार केला. त्यात जाड, कमी जाड, बारीक आणि सडपातळ अशा चार मेणबत्त्या तयार केल्या आणि त्या अधिकाऱ्यांना सॅम्पल दिलं. प्रेझेंटेशनच्या वेळी बघताच क्षणी त्यांना ते इतकं आवडलं की, कोणतेही प्रश्न न विचारता ती ऑर्डर नंदाताईंना मिळाली. असे कित्येक अनुभव या १४ वर्षांत त्यांना आले व सर्वाच्या साथीने त्यांनी त्यातून मार्गही काढला.

त्यांच्या उत्पादनात व बाहेरील उत्पादनात फरक काय असं विचारलं असता, त्या सांगतात त्यांच्याकडे अद्ययावत यंत्र आहेत. त्यामुळे बाहेरून मोठय़ा प्रमाणात कच्चा माल आणून आम्ही पशांची बचत करतात. त्यामुळे उत्पादन शुल्क कमी होतं. उत्तम दर्जा, रास्त किंमत हा फरक पडतो.

नंदाताई नवनवीन डिझाइनचे साचे बनवतच असतात. शेकडो पणतीच्या डिझाइनस् त्यांनी आजवर बनवल्या आहेत. आपली पणती सर्वसामान्यांना किमतीच्या दृष्टीने परवडणारी कशी होईल याकडे त्या खूप बारकाईने लक्ष देतात. त्याच्या मते १० वस्तू जास्त किमतीत विकण्यापेक्षा १०० वस्तू रास्त भावात विकल्या तर त्यांना जास्त समाधान वाटतं.

नंदाताईंनी छोटेखानी सुरू केलेल्या पणती उद्योगाची वार्षकि उलाढाल ६० लाख रुपयांपर्यंत आहे. भविष्यात त्यांची सर्व उत्पादने थेट अमेरिका व ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा त्यांचा मानस आहे. जेणे करून त्यांचा उद्योग वाढून त्यांच्याकडील मुलींना वर्षभर रोजगार उपलब्ध होईल.

नंदाताई नलावडे, स्वत:सोबतच इतर स्त्रियांच्या आयुष्यात पणतीच्या ज्योतीतून स्वावलंबनाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या. समाजभान राखून आपल्या व्यवसायातील संकटांना संधी म्हणून पाहत सतत नवनवीन गोष्टींचा पाठपुरावा करत आपल्या मनातील कलाकृतींना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या. त्या कल्पनेतच त्यांच्या व्यवसायाचं यश सामावलेलं आहे. ल्ल

– चैताली चव्हाण
chaituchavan98@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2015 12:08 am

Web Title: woman entrepreneur nandatai nalawade
Next Stories
1 डिझायनर रांगोळी ठरला व्यवसायाचा पाया!
2 स्वयंपूर्ण करणारी चकली
3 व्यवसाय आणि छंदाची सांगड
Just Now!
X