सीमा महाजन यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली ती आपल्या छंदातून रंगवलेल्या पणत्या विक्रीपासून सुरू झालेला हा व्यवसाय क्रिस्टलची फुले, एलईडीचे दिवे, फॅन्सी दिवे, तरंगणारे दिवे व रांगोळी, तोरणं, भिंतीवरील फ्रेम, वॉल हँगिंग यांच्या विक्रीने चांगलाच वाढला आहे. अवघ्या काहीशे रुपयांनी सुरू केलेला हा व्यवसाय आज लाखो रुपयांची उलाढाल करतोय.

दिवाळी म्हटलं की दिव्यांची आरास, रांगोळी, उटणं, आकाशकंदील आणि प्रसन्न वातावरण! शहरातली दिवाळी मात्र गावाकडील दिवाळीपेक्षा थोडी वेगळी आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आनंद, प्रसन्नता तीच, फक्त जागेची आणि वेळेची कमतरता इथल्या दिवाळीला थोडं वेगळं ठरवते एवढं नक्की. जागेच्या आणि वेळेच्या कमतरतेमुळे इथं मोठय़ा रांगोळ्या घालणं, फराळ करणं नोकरदार गृहिणीला जमतंच असं नाही. त्यामुळे आटोपशीर, सुंदर तयार रांगोळ्या आणि चवदार फराळ विकत आणण्याचा पर्याय इथं स्वीकारला गेला. सीमा महाजन यांनी हीच गरज ओळखून सुंदर रांगोळ्या, आकर्षक दिवे, तोरणं तयार करायला सुरुवात केली आणि त्यातून उभी राहिली एक उद्योजिका आणि तिचा व्यवसाय!

सीमा ही मूळची जळगावची. तिथंच तिचं पदव्युत्तर शिक्षण झालं. एम. एस्सी. (बॉटनी) झाल्यावर तिचा विवाह मुंबईतील नितीन महाजन यांच्याशी झाला. तोपर्यंत एकत्र कुटुंबात वाढलेल्या सीमाच्या मनात अर्थार्जन करून कुटुंबाला हातभार लावावा, असा विचार कधी डोकावला नव्हता. मुंबईतील, तुलनेनं महानगरांतील स्थिती वेगळी आहे, हे इथली जीवनशैली आत्मसात करता करता तिच्या लक्षात आलं. इथं सगळ्यांनीच काम करीत कुटुंबाला मदत करण्याची गरजही तिच्या लक्षात आली. परंतु संपूर्ण दिवसभर बाहेर राहून काम करणं काही रुचणारं नव्हतं. मग तिने घरच्या घरीच काही व्यवसाय करता येईल या दृष्टीने छोटे छोटे कला, हस्तकलांचे अभ्यासक्रम पूर्ण केले. रेहेजा महाविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण करताना तिला ‘सर्वोत्तम विद्यार्थिनी’चं पारितोषिकही मिळालं होतं.

अभ्यासक्रम पूर्ण झाले. सीमामधला कलाकार तिला स्वस्थ बसू देत नव्हताच, पण आता त्याच्या जोडीला तिच्यातली उद्योजिकाही तिला शांत बसू देत नव्हती. मात्र एकदम मोठी उडी घेण्यापेक्षा छोटय़ा भांडवलातून व्यवसायाला सुरुवात करायची असं ठरवत तिने २००७ मध्ये पणत्या रंगवून विकल्या. त्या पणत्या होत्या अवघ्या पाचशे-सहाशे रुपयांच्या. आकर्षक रंगसंगती आणि सजावट यामुळे तिच्या सगळ्या पणत्या हातोहात विकल्या गेल्या. शिवाय घेणाऱ्यांचे कौतुकाचे शब्द तिचा हुरूप वाढवून गेले. मग सीमाने कटवर्कचे दिवे, कलश गरबा विक्रीसाठी ठेवले. उत्पादन खर्च, मेहनत आणि तुलनात्मक बाजारभाव या सर्व बाबी लक्षात घेऊन सीमाने आपल्या वस्तूंच्या किमती निश्चित केल्या होत्या. त्या सर्वसामान्यांना परवडण्यासारख्याच असल्याने एकदा वस्तू नेलेला ग्राहक खात्रीने त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा येऊ लागला. कोणतीही जाहिरात न करता केवळ तोंडी प्रसिद्धीमुळे ग्राहकांची संख्या वाढतच गेली.

व्यवसायातील बारकावे आणि बाजारपेठेचा अंदाज आल्यानंतर सीमाने व्यवसायाच्या कक्षा वाढवल्या. क्रिस्टलची फुले, एलईडीचे दिवे, फॅन्सी दिवे, तरंगणारे दिवे व रांगोळी, धातूचे सोनेरी दिवे, तोरणं, भिंतीवरील फ्रेम, लटकन, वॉल हँगिंग, कर्टन हँगिंग, कार हँगिंग अशी उत्पादने तयार करून जास्त भांडवल लागणाऱ्या वस्तू तिने बनवल्या. हे करत असताना या वस्तूंच्या विक्रीसाठी केवळ ओळखीच्या लोकांवर अवलंबून न राहता वेगवेगळी प्रदर्शनं, मेळावे, उत्सव यांच्यामध्येही ती सहभागी व्हायची. त्यातून मिळणाऱ्या प्रतिसादातून आपली उत्पादनं आणि भाव रास्त असल्याचं तिला समजत होतं. सीमाने स्वत: काही दुकानदारांची भेट घेऊन तिथे तिने केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवायला सुरुवात केली. तिथंही तिच्या उत्पादनांना चांगलीच मागणी होती आणि आहेही. त्यामुळे आत्मविश्वास वाढल्याचं सीमा सांगते.

ओळखीतून, प्रदर्शनात सहभागी झाल्यानं तिला मोठमोठय़ा दुकानदारांकडून ऑर्डर मिळायला सुरुवात झाली. या ऑर्डर काही हजार वस्तूंच्या असल्यानं आता सीमा वर्षभर कामात गुंतलेली असते. आज सीमाकडे अनेक कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिवाळीसाठीच्या गिफ्ट बॉक्सची ऑर्डर असते. त्या ऑर्डर पूर्ण करणं साहजिकच आता एकटीनं शक्य नाही. तिच्या सासूबाई नलिनीताई, पती नितीन यांची त्यासाठी तिला मोठी मदत होते. शिवाय ती राहत असलेल्या वरळी कोळीवाडा परिसरातील महाविद्यालयीन विद्यार्थिनींना प्रशिक्षण देऊन त्यांची मदत सीमा घेते. यातून तिला मदत होते आणि त्या मुलींचाही शिक्षणाचा खर्चही भागतो.

सीमाने ‘आकृती महिला बचत गट’ स्थापन केला असून त्यांच्या माध्यमातूनही ती महिलांना रोजगार मिळवून देण्याचा आता प्रयत्न करते. एका महिला उद्योजकांसाठी आयोजित मार्गदर्शनपर मेळाव्यात तिची ओळख मीनल मोहाडीकर यांच्याशी झाली. त्यांच्या परिचयातून दिल्लीतल्या आय.आय.टी.एफ.मध्ये तिला सहभागी होता आलं. त्यातून महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांतून, व्यापाऱ्यांकडूनही तिच्या वस्तूंची मागणी होऊ लागली. सारस्वत बँकेच्या उर्वशी धराधर यांच्या मार्गदर्शबद्दलही सीमा भरभरून बोलते.

आज सीमाने तयार केलेल्या कलात्मक वस्तू वर्ल्ड ट्रेड सेंटर, वरळीचे ब्ल्यू सी, ठाण्याचे टिप टॉप प्लाझा, सत्यम अशा मोठमोठय़ा दुकांनांमध्ये विक्रीसाठी असतात. त्याचप्रमाणे नागपूर, कोकण विभाग, दिल्ली येथील दुकानदारांनाही ती वस्तू पुरवत असते. अवघ्या पाचशे-सहाशे रुपयांपासून सुरू केलेला तिचा व्यवसाय लाखांच्या घरात पोहोचला आहे. ‘व्यवसायात टिकून राहायचे असेल तर प्रामाणिकपणा, चिकाटी आवश्यक आहेच. त्याप्रमाणे बाजारपेठेवर नजर ठेवून वस्तूंचा दर्जा आणि विविधता राखणे गरजेचे ठरते’, सीमा तिच्या यशाचे गमक सांगते.

  – रेश्मा भुजबळ
reshmavt@gmail.com