शून्यातून विश्व निर्माण करणं तसं आव्हानात्मकच असतं. त्या शून्याला डावीकडे सरकवून त्याच्या पुढे १, २, ३ निर्माण करणं म्हणजे नुसती कल्पनेची भरारी वाटावी, नव्हे वाटतेच. खरं तर शून्य म्हणजे आपल्याकडे काहीच नाही ही गोष्ट कधी कधी फायद्याचीच असते आणि याच कल्पनेतून नवीन उद्योग सुरू करण्याची जिद्द उफाळून येते. अशाच एक उद्योगिनी शोभा सातर्डेकर!

दसरा आला की घराघरांतून गृहिणींची लगबग सुरू होते आणि गिरणीच्या बाजूने जरी गेलो तरी भाजणीचा वास दरवळू लागतो. मी सांगते हे चित्र आहे १०-१५ वर्षांपूर्वीचे; परंतु आजकाल आपण रोजच चकल्या खातो. काही वर्षांपूर्वी फक्त दिवाळी सणानिमित्त चकली बनवली जात असे. शोभाताई गेली २१ वर्षे फक्त चकली बनवतात. या त्यांच्या लघू उद्योगाची सुरुवात व्हायला घडली एक घटना. १९९० मध्ये शोभाताईंचं लग्न झालं. परिस्थिती तशी बेताचीच होती. त्यातच वर्षभरात पतीची नोकरी गेली. एका मत्रिणीच्या मदतीनं त्यांनी त्यांच्यातील पाककौशल्याचा वापर करून घरूनच उद्योग करायचं ठरवलं व आपल्या संसाराची जबाबदारी घेतली.

सुरुवातीला त्यांनी १ किलोच्या भाजणीच्या चकल्या केल्या. संपूर्ण बिल्डिंगमध्ये चाखायला दिल्या आणि शेजाऱ्यांना विनंती केली की, ‘तुम्ही ही चकली खाऊन मला प्रतिक्रिया द्याच, पण तुमच्या ऑफिसमध्ये सर्वाना चवीसाठी द्या. कारण मी आता चकलीचा उद्योग सुरू करणार आहे.’ अशा पद्धतीने त्यांना हळूहळू ऑर्डर मिळू लागल्या आणि त्यांचे व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ लागलं. काही दिवस त्या त्यांच्या मत्रिणीला या गृह उद्योगात मदत करायला जात होत्या. पण मुलांचे संगोपन करता यावं यासाठी त्यांनी हळूहळू चकली बनवण्याचे सर्व प्रयोग नणंद व पतीच्या मदतीने सुरू केले. त्यातूनच त्यांनी सर्व गोष्टींची पूर्तता केली. आपल्या दोन्ही मुलांना उत्तम शिक्षण दिलं.

शोभाताईंचा चकलीचा व्यवसाय वर्षभर चालू असतो. पण दिवाळीच्या वेळेला त्यांना इतकी ऑर्डर असते की, ६०० किलो चकल्या करूनही ती पूर्ण होत नाही. पण चकलीचा दर्जा, रंग, चव हे सगळं टिकवण्यासाठी त्या नव्या नव्या ऑर्डर घेण्याच्या मागे लागत नाहीत. त्यांचे नेहमीचे ग्राहक मात्र वर्षांनुर्वष तेच आहेत. हा व्यवसाय त्या गेली २१ र्वष करीत आहेत. तरीही सुरुवातीच्या चकल्या व आताच्या चकल्यात फरक नाही हीच त्यांची खरी ओळख आहे.

त्या आवर्जून सांगतात की, पीठ मळणं व चकल्या पाडणं या दोन्ही कृती त्या स्वत: करतात. चकल्या तळण्याचं काम त्यांचे पती करतात, तर चकल्यांच्या आकर्षक पॅकिंगच्या कामात त्यांची व नणंदेची मुलं मदत करतात. चकली बनवण्यापासून ते पॅकिंगपर्यंत दर्जा कमी होऊ नये म्हणून त्या स्वत: काळजी घेतात. म्हणूनच चकल्या शिल्लक राहणं हे त्यांना माहितीच नाही. उलट दुकानदारांकडून सतत मागणी असते जी त्यांना काही वेळा पूर्ण करता येत नाही.

शोभाताईंची भाजणी करण्याची जितकी क्षमता आहे त्या प्रमाणातच त्यांनी व्यवसाय करायचा ठरवला आहे. आज बाजारात तांदूळ, कॉर्नफ्लॉवर, टोमॅटो, बटर, सेझवान अशा विविध चवीच्या चकल्या मिळतात. पण अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या बनवून त्यांनी आपली ‘खासियत’ गमावलेली नाही.

गेली २१ वर्षे सातत्यानं चकली बनवण्याच्या व्यवसायात कधी तब्येतीच्या कुरबुरींमुळे किंवा अन्य कारणांमुळे बंद ठेवण्याची कधी वेळ आली आहे का असं विचारलं असता शोभाताईंनी सांगितलं, लग्नानंतर पहिल्या वर्षीच सुरू केलेल्या या व्यवसायावरच आमची उपजीविका अवलंबून होती. माझ्या दोन्ही गरोदरपणाच्या काळात मला तळण्याचा वास अजिबात सहन होत नव्हता. त्यावेळी तात्पुरता व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ ओढावली होती. मात्र, त्या काळात माझे पती आणि नणंद यांनी मदत केली. यांनी स्वत चकली तळण्याची जबाबदारी स्वीकारली.’’

शोभाताईंचा उद्योग हळूहळू तग धरत होता. अशातच त्यांच्या शेजाऱ्यांनीही चकलीच्या तळणाच्या वासाचा त्रास होत असल्याची तक्रार केली. यावर शोभाताईंनी युक्ती केली. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शेजार-पाजारचे सर्वजण जमले असताना त्यांनी चकलीचा व्यवसाय त्यांच्यासाठी किती गरजेचा आहे आणि त्यासाठी त्यांना शेजाऱ्यांची मदत हवी आहे, असं आवाहन केलं. त्यामुळे आपोआपची शेजाऱ्यांची मदत होऊ लागली. आणि त्यांच्या उद्योगाची वाट सुकर झाली.

आज त्यांनी विविध ऑफिसेस व परिसरातील दुकानांतही चकल्या विक्रीसाठी देण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे यश आहे ते कष्ट, अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळवलेले. स्वत:बरोबरच संपूर्ण कुटुंबाला चकली उद्योगाच्या जोरावर स्वयंपूर्ण करणाऱ्या शोभाताई यांची ही उद्योजकीय वाटचाल नवउद्योजकांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

– चताली चव्हाण
chaituchavan98@gmail.com