कलात्मक नजर असल्यानेच स्वाती कोकीळ यांच्या डिझायनर रांगोळ्या तयार करण्याच्या छंदाचं आज तीन वर्षांत मोठय़ा व्यवसायात रूपांतर झालं आहे. गणपती ते दिवाळी या सणांच्या काळात त्यांचा हा व्यवसाय अखंडपणे सुरू असतो. त्यांच्या या छंद-व्यवसायाबद्दल..

कलासक्त नजर असेल आणि काही तरी करून दाखवण्याची इच्छा असेल तर बघता बघता त्याचं व्यवसायात रूपांतर होऊ शकतं, हे स्वाती कोकीळ यांच्या उदाहरणावरून नक्की म्हणता येईल. स्वातीताई सुमारे तीन-साडेतीन वर्षांपूर्वी एके ठिकाणी जेवायला गेल्या होत्या. जेवणाच्या ताटाभोवती सुंदर नक्षीच्या रांगोळीची सजावट केली होती. त्यांना वाटलं, ‘हे मलासुद्धा नक्की घरी करता येईल.’ घरी आल्यावर हे विसरून न जाता त्यांनी तशाच प्रकारच्या पुन:पुन्हा वापरता येण्याजोग्या रांगोळ्या तयार करण्याचा ध्यासच घेतला. आज तीन वर्षांनी या छोटय़ाशा, एखादा छंद वाटावा अशा गोष्टीचं मोठय़ा व्यवसायात रूपांतर झालं आहे. दोनच आठवडय़ांपूर्वी, त्यांनी आपलं पहिलं दुकानही पुण्याच्या बाणेर येथे उघडलं आहे. त्यांना भेटायला त्यांच्या दुकानात मी पोचले तेव्हा तिथे काम करणाऱ्या १० ते १५ कलाकारांना मान वर करून पाहायलाही वेळ नव्हता.

स्वाती कोकीळ यांनी कलेचं कोणतंही व्यावसायिक शिक्षण घेतलेलं नाही, पण कोणती गोष्ट कुठे शोभून दिसते याची नजर मात्र त्यांच्याकडे नक्की आहे. या सर्व वस्तू तयार करायला सुरुवात केली तेव्हा त्याची व्याप्ती एवढी मोठी असेल याची कल्पनाही त्यांना नव्हती. प्रथम त्यांनी काही वस्तू तयार केल्या आणि त्यांच्या आप्तेष्टांना दिल्या. सर्वानाच त्या फार आवडल्या. पण ते आपलेच नातेवाईक आपलं कौतुक करणारच, असं त्यांना वाटलं. पण जेव्हा त्या तशाच वस्तू इतरांनाही देऊ  लागल्या तेव्हा त्यांच्याकडूनही त्यांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. आपण करतोय ते काही तरी चांगलं करतो आहोत, याची खात्री त्यांना पटली. अशाच प्रकारे तोंडी प्रसिद्धीने त्यांच्याकडे येणारा ग्राहक वाढत गेला. आधी कोणाकडून तरी भेटवस्तू म्हणून अशा रांगोळ्या लोक वापरायला लागले. त्यानंतर त्यांच्या घरी सणाच्या निमिताने सजावटीसाठी अशा वस्तूंची मागणी वाढू लागली. लहान-मोठय़ा रांगोळ्यांबरोबरच त्या गणपतीच्या सजावटीसाठी मखरदेखील तयार करू लागल्या. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून, मागणी लक्षात घेऊन त्यांनी ‘स्वरा क्रिएशन्स’ची व्याप्ती वाढवली. मग रांगोळ्या आणि इतर सजावटीचं साहित्य तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल मिळवणे, प्रत्यक्ष वस्तूचा आकार, डिझाइन, रंगसंगती अशा गोष्टी ठरवणे या कामासाठी त्यांना त्यांची धाकटी मुलगी राधिका हिची खूपच मदत झाली. राधिका प्रत्यक्ष व्यवसायात जरी सहभागी नसली तरीही तिने चित्रकलेच्या काही परीक्षा दिल्या आहेत. तिलाही तिच्या आईप्रमाणे स्वत: काहीना काही करत राहण्याची सवय आहे. त्यामुळे राधिकाची खूपच मदत प्रत्यक्ष साहित्य तयार करण्यात झाली, असं त्या सांगतात. सुरुवात स्वाती आणि राधिका यांनी केली असल्यामुळे त्यांनी त्यांच्या क्रिएशनचं नाव ‘स्वरा’ असं ठेवलं गेलं.

व्यवसाय जसजसा वाढत होता तसं ठिकठिकाणी प्रदर्शनात भाग घेणं, व्यवसायाचं, वस्तूंचं मार्केटिंग करणं हा सगळा भाग महत्त्वाचा ठरू लागला. त्यासाठी त्यांना त्यांचे पती राम कोकीळ यांचीही खूप मदत झाली. ते स्वत: जाहिरात व्यावसायिक, ‘स्वरा’ला चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी त्याचा खूपच उपयोग झाला. ‘स्वरा’ची आता पुण्याबाहेरही अनेक ठिकाणी प्रदर्शने भरतात. सगळीकडेच स्वाती यांना स्वत: जाता येत नाही. म्हणूनच आता मुंबईमधल्या सर्व प्रदर्शनांची आणि तिथल्या सर्व विक्रीची जबाबदारी त्यांची मोठी मुलगी स्नेहा हिने घेतली आहे. स्नेहाचा वस्तू बनविण्याकडे फारसा कल नाही, पण त्यांच्या विक्रीची जबाबदारी ती उत्तम प्रकारे पार पाडते. राम म्हणतात की, ‘‘‘स्वरा’ हा खरं तर त्यांचा मुख्य व्यवसाय नाही. स्वातीला आवड होती. त्यातच मुली मोठय़ा झालेल्या त्यामुळे तिच्याकडे वेळही होता. त्या वेळेत तिला आवडेल असं काम करता यावं म्हणून ‘स्वरा’ची सुरुवात झाली. पण आता ‘स्वरा’चा व्याप चांगलाच वाढला आहे. त्यामुळे आता हाही आमचा मुख्य व्यवसाय असंच म्हणावं लागेल असं दिसतंय!ं’’

‘स्वरा’चा सध्या सगळ्यात लगबगीचा काळ आहे. साधारण गणपतीपासून ते दिवाळीपर्यंत हा काळ विविध सणांचा असल्याने, व्यवसायाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असतो. गणपतीमध्ये लहान ते मोठय़ा आकाराच्या गणेश मूर्तीसाठी फोल्डिंग मखर तयार करण्याचं काम त्या करतात. मखरांची मागणी फक्त पुण्यातून नाही तर आता मुंबईमधूनही वाढायला लागली आहे. त्यानंतर दिवाळीसाठी रांगोळ्या आणि इतर सजावटीच्या सामानासाठी गडबड सुरू होते. या सहा महिन्यांच्या तयारीसाठी गणपतीआधीचे सहा महिनेही सध्या कमी पडतात. त्यामुळे वर्षभर अव्याहतपणे काम सुरूच राहातं. या कामामुळे त्यांचा कर्मचारीवर्गही आता त्यांच्या कुटुंबाचा एक भाग बनला आहे.

हे वर्ष ‘स्वरा’च्या वाटचालीमध्ये खूपच महत्त्वाचं ठरलं आहे. यावर्षी ‘स्वरा’ने पहिल्यांदाच मुंबईच्या प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र व्यापारी पेठेच्या ६० दिवसांच्या प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ‘स्वरा’च्या रांगोळ्या जातच होत्या, पण यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर, हैदराबाद येथे यांच्या वस्तू विक्रीसाठी पोहोचल्या आहेत आणि तिथेही त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. याबरोबरच आता ‘फ्लिपकार्ट’ आणि ‘स्नॅपडील’वरही त्यांच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. या मास प्रॉडक्शनच्या जगात हाताने केलेल्या वस्तूंना एवढा प्रतिसाद मिळतो हे चित्र खूप आशादायी आहे असं त्यांना वाटतं. चारचौघांप्रमाणे सजावट करण्याऐवजी आजही अनेक चोखंदळ ग्राहक आहेत की जे थोडी जास्त किंमत लागली तरी चालेल, पण हाताने तयार केलेल्या वस्तूच वापरू असं म्हणतात आणि मेहनतीला मान देतात. अशा ग्राहकांमुळेच ‘स्वरा’ यशस्वी झालं आहे, असं स्वाती कोकीळ म्हणतात. यापुढे हॉटेलच्या लॉबीमध्ये लावण्यासाठी मोठय़ा रांगोळ्या तयार करणे आणि दागिने तयार करण्याचा त्यांचा मानस आहे.

अतिशय उत्साहाने त्या आपल्या वाटचालीबद्दल सांगत असतात. स्वाती जेव्हा ‘स्वरा’बद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात आपोआपच एक चमक येते. आपल्या छंदाचं यशस्वी व्यवसायात रूपांतर करताना झालेल्या स्वप्नपूर्तीची ती चमक असते, यात शंकाच नाही.

 -प्रज्ञा शिदोरे  
pradnya.shidore@gmail.com