पुरुष हे करिअर ओरिएण्टेड असतात आणि स्त्रिया तशा नसतात?  खरं म्हणजे असा कुठला कायदा? मी स्वत: बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी केल्या. आर्किटेक्चरशी संबंधित काम केलं, समीक्षा आणि इतर लिखाण केलं, पण पल्लवीने जसा तिच्या करिअरचा विचार केला, तसा मी केला नाही. तिला जशी चढती आर्क दिसली तशी मला दिसली नाही. आता यातही काही गैर नाही. पण मी असा आहे, मला असं असणं परवडू शकतं, ते ती ‘तशी’ असल्या कारणामुळेच.

पुरुषांच्या आयुष्यात  वेगवेगळ्या नात्याने अनेक स्त्रिया येत असतात. काही जवळच्या होतात तर काही अनोळखीच रहातात. काय असतं स्त्रीचं त्याच्या आयुष्यातलं स्थान? बदलती स्त्री त्याला जाणवतेय का? की तोही पारंपरिक नजरेनेच तिला शोधत राहातो? यातून त्याच्या हाती काय लागतं? सांगताहेत विविध क्षेत्रातील नामवंत पुरुष लेखक, दर पंधरवडय़ाने.

प्रभादेवीच्या सिग्नलला गाडी थांबली आणि पल्लवीच्या वडिलांच्या एकदम काही तरी डोक्यात आलं. म्हणाले, ‘‘इथे जवळच आर्किटेक्चरचं कॉलेज आहे. तुला करायचंय का?’’

‘‘म्हणजे?’’ तिला नीटसं कळलं नाही. बारावीनंतर पुढे काय करायचं, याचा तिने फारसा विचार केला नसावा. या कॉलेजबद्दलही तिला काहीच कल्पना नव्हती. मुंबईशी तिचा परिचय होता पण तो विशिष्ट परिसरांशीच. वडील नेव्हीत असल्याने तिची बरीच वर्षे भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी गेली होती. आता मात्र पुढली काही र्वष मुंबईत राहून शिक्षण पुरं करायचं असं ठरलं होतं. पण कसलं शिक्षण? एफवायबीएस्सीला तिने अ‍ॅडमिशन घेतली होती खरी, पण त्यानंतर काय?

आर्किटेक्चरला अ‍ॅडमिशन घेतल्यावरही (आणि ते नक्की काय हे कळल्यावरही) पहिले काही दिवस हा गोंधळ राहिलाच. ती तशी फार जणात मिसळायची नाही, पण वर्गात एक चांगली मैत्रीण मिळाली होती, हुशारही होती. दोघांचा बराच अभ्यास एकत्र चालायचा. माझी तिची ओळख झाली, ती याच सुमाराला. तिची ती मैत्रीण आणि माझा एक मित्र, यांची काही काळ खूपच मैत्री होती आणि त्या दोघांबरोबर राहून राहून आम्हा दोघांचीही बाय डिफॉल्ट मैत्री झालीच. त्यांची मैत्री टिकली नाही, आमची टिकली.

मी आर्किटेक्ट व्हायचं, हे तिच्यासारखं शेवटच्या क्षणी ठरवलेलं नव्हतं, मला ते चांगलं चौथी-पाचवीपासून माहीत होतं, कसं कोण जाणे! खरं म्हणजे शाळेच्या दिवसात ही एकच गोष्ट मला नक्की माहीत होती. एरवी मी अभ्यासात अगदीच सर्वसाधारण होतो आणि खेळाबिळाची तर आवड शून्यच. वाचायचो चिकार, पण लिहिण्याबिहिण्यातही अजिबात रस नव्हता. हे आर्किटेक्चरला जाणं तरी मला खरंच या क्षेत्रात इण्टरेस्ट असल्याने होतं का, केवळ तिला भेटण्यासाठीच होतं का, असा एरवी मला न शोभणारा सुडोरोमॅण्टिक-किंवा फ्री विल- डिटर्मिनिझमच्या वादात पडायचं तर फिलॉसॉफिकल, विचारही माझ्या डोक्यात येऊन गेलाच.

कॉलेजमधल्या तिच्या पहिल्या काही दिवसांत मी तिला बऱ्यापैकी मदत करायचो. आमच्या कॉलेजमध्ये, तसा मुलींचाच भरणा अधिक होता, वर्गात तर मुलांच्या दुप्पट मुली. बऱ्याच जणी, मुलांपेक्षा अधिक हुशार असं नाही, पण निदान अधिक कामसू. गंमत म्हणजे आत्ता प्रॅक्टिस करणाऱ्यांमध्ये मात्र मुलांचंच प्रमाण अधिक आहे. लग्नानंतर काम न करणाऱ्या मुली आर्किटेक्चरची सीट का फुकट घालवतात, असा एक सूर तेव्हा नेहमी ऐकायला यायचा, जो खराही होता. पण सीट्स काही मुलीच फुकट घालवतात असं नाही, मुलंही घालवतात. कॉलेजमध्ये मी तिच्यापेक्षा सीनिअर असल्यामुळेच ती तिसऱ्या वर्षांला असतानाच मी कॉलेजबाहेर पडलो आणि नोकरीनिमित्त गोव्याला जाऊन राहिलो. ‘लॉन्ग डिस्टन्स रोमॅन्सेस’ टिकत नसल्याचं आम्हाला दोघांनाही माहीत होतं, शिवाय आमच्या कॉलेजमध्येही लग्नापर्यंत पोचलेल्या जोडय़ा  कमीच होत्या. त्यातलीच आमची एक.

आम्ही जेव्हा लग्न केलं (तिच्या वयाच्या तेविसाव्या वर्षी आणि माझ्या पंचविसाव्या) तेव्हा ते इतक्या लवकर करण्याची आवश्यकता काय होती, हा मुद्दा आम्ही पुढे अनेकदा ‘रिव्हिजिट’ केला. आमच्यातल्या एकाने तरी उच्चशिक्षणासाठी बाहेर जाणं आवश्यक का मानलं नाही किंवा आम्ही स्वतंत्र करिअर्समधल्या प्रगतीसाठी वेळ का दिला नाही, हा विचारही नेहमी डोक्यात घोळायचा. आरामात रिलॅक्स्ड करिअर करण्यापेक्षा लग्नाची काय घाई. कारण ते करायचं, तर मिळेल त्या नोकऱ्या पकडणं आलं. आमच्या वर्गातली निम्मीअधिक मुलं या काळात परदेशात शिकत होती. बाकी पुरेसा वेळ घेऊन करिअरचा विचार करत होती. आम्ही मात्र चटकन सापडतील त्या नोकऱ्या केल्या. अर्थात, नोकऱ्या या केवळ आर्थिक कारणासाठी नाहीत. लग्नानंतर आपण घरी बसणार नाही, हे तिला माहीतच होतं. किंबहुना यावर आम्हा दोघांची किंवा आमच्या घरातल्यांची चर्चाही झाली नाही. ती करिअर करणार हे सर्वाना आधीपासूनच माहीत होतं.

त्या दिवसांत ती एका समाजसेवी संस्थेत काम करायची. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात मध्यस्थाचं काम करून प्रकल्पाला आकार देणारी ही संस्था होती. या तीन-चार वर्षांत तिने झपाटल्यासारखं काम केलं. माझी नोकरी त्यामानाने सोपी होती, इंटिरिअर डिझाइनशी संबंधित. तिचा मला लवकरच कंटाळा आला आणि आपल्याला चित्रपटसमीक्षा करता येते या नुकत्याच लागलेल्या शोधातच मी अधिक रमायला लागलो. पण ती दिवसरात्र काम करायची. पगार फार नसताना, त्याचा विचार न करता.

करिअर आधी सुरू करून लग्न पुढे ढकलण्याचे जसे फायदे असतात, तसे आधी लग्न उरकून टाकून पुढे हळूहळू करिअरला सलग वेळ देण्याचेही फायदे असतात असं आमच्या नंतर लक्षात यायला लागलं. स्त्रियांच्या करिअरसाठी याचा प्रमुख फायदा म्हणजे गर्भारपण आणि संगोपन हा भाग तुमचं करिअर ऐन भरात असताना येत नाही. लग्न/मूल आधी झालं, की करिअरमध्ये तुम्ही महत्त्वाच्या टप्प्यावर असताना, मुलं समजत्या वयाची झालेलीच असतात. अर्थात हे कळलं तेही अपघातानेच. याचा असा विचार आम्ही केलाच नव्हता. ती गरोदर असल्याचं आम्हाला कळलं तेव्हा तर परिस्थिती फारच चमत्कारिक होती. ती काम करत असलेल्या संस्थेत काही वाद झाले व तिला मनाविरुद्ध तिथून बाहेर पडावं लागलं होतं. एकदा अशा समाजोपयोगी कामांमध्येही घुसलेलं राजकारण पाहिल्यावर तिचं त्या कामावरचं मनच उडालं. गरोदरपणातला सगळा वेळ, तिने पुढे काय करायचं याचा नव्याने विचार करण्यात घालवला. या दिवसांत आम्ही स्वतंत्रपणे काही छोटी कामं केली. अलिबाग जवळच्या थळ या गावातलं आमचं घर बांधलं. या सगळ्यात तिने पुढाकार घेतला. मुलीच्या जन्मानंतर तिने आधीचं सारं विसरून कॉर्पोरेट क्षेत्रात जायचं ठरवलं आणि एका नव्या वाटेवरनं प्रवास सुरू केला. पुरुष हे करिअर ओरिएण्टेड असतात व स्त्रिया तशा नसतात, असं मी अनेकदा ऐकलंय. खरं म्हणजे असा कुठला कायदा? शेवटी तुम्ही कोणत्या दृष्टीने आपल्या करिअरकडे पाहाता हे तुम्ही व्यक्ती म्हणून कोण आहात याच्याशी जोडलेलं, पुरुष का स्त्री याच्याशी त्याचा फारसा संबंधच नाही. मी स्वत: बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी केल्या. वीसहून अधिक र्वष आर्किटेक्चरशी संबंधित काम केलं, समीक्षा, इतर लिखाण केलं, प्रत्यक्ष क्रिएटिव्ह क्षेत्रातही होतो, पण तिने जसा करिअरचा विचार केला, तसा मी केला नाही. तिला जशी चढती आर्क दिसली तशी मला दिसली नाही. आता यातही काही गैर नाही. मी आपला असा आहे. पण मी असा आहे, मला असं असणं परवडू शकतं, ते ती ‘तशी’ असल्या कारणामुळेच.

आता आमच्याकडे दोन ‘ती’ आहेत. मोठी ती, आपल्या गेमप्लानप्रमाणे ठरावीक वेगाने चालली आहे. एकेकाळी आपल्याला आर्किटेक्चर म्हणजे काय याची कल्पनाच नव्हती हे ती पूर्णपणे विसरून गेलीय. मी मात्र सध्या माझी आर्किटेक्चरची सीट फुकट घालवल्याचं जाहीर करून लिखाणच करतोय. तिचा ‘काय करायचं ते एकदा नक्की ठरव’ हा सल्ला मी मान्य केल्याचा आनंद मानून ती मला हवं ते करायला देते. ती भेटण्यासाठीच मी आर्किटेक्चरला गेलो की काय हा माझा समजदेखील अलीकडे बराच दृढ व्हायला लागला आहे. छोटी ती, अभ्यासात मी होतो तशीच निष्काळजी आहे, पण तिचा सगळा जोर आहे, तो फुटबॉलमध्ये. मला नसलेली ही खेळाची आवड तिने कुठून मिळवली कोण जाणे. पण मैदानी खेळ हीदेखील कन्वेन्शनली पुरुषांचीच मक्तेदारी. आता हे पुरुषांचं तर हे नाही, या संकेतांना आमच्याकडे तरी फारसा अर्थ नाही. खरं म्हणजे कधी नव्हताच.

आताही पल्लवीला कामं आवरून घरी यायला बराच उशीर होतो, माझं काम माझ्या गतीने सावकाश चालू असतं. कधी लवकर संपतं, तर कधी रात्री उशीर होतो. हे तसं अपेक्षितच. कधी तिला वाटतं की आपला बाहेर फार वेळ जातो. आपण घराकडे अधिक लक्ष द्यायला हवं वगैरे. पण त्यात काही खरं नाही. पारंपरिक मतांचा रेसिडय़ू. शेवटी महत्त्वाचं हे की जेव्हा आम्ही समोरासमोर येतो, तेव्हा एकमेकांना तसेच कॉमन ग्राऊंडवर भेटू शकतो ना, जसे पूर्वी भेटत असू? शेवटी महत्त्वाचं आहे ते तेच आणि तेवढंच.

गणेश मतकरी