23 September 2020

News Flash

आजही अडवतंय काचेचं छत?

योगाचा वर्ग सुरू होता. प्रत्येक जण त्यात मग्न होता. आणि अचानक मानसी चक्कर येऊन खाली पडली.

कुटुंब म्हटलं की घरच्या स्त्रीवर त्याची मुख्य जबाबदारी येते, यात नवीन काहीच नाही. कुणीतरी ती घेतलीच पाहिजे अन्यथा त्याचे नकारात्मक परिणाम त्या कुटुंबालाच नव्हे तर समाजालाही भोगावे लागतात. मात्र बदलत्या काळात प्रश्न उभा राहतो की ती जबाबदारी फक्त स्त्रीनेच घ्यावी का? ़निसर्गाने दिलेली जबाबदारी ती पाळतेच आहे, पण त्यानंतरची भूमिका घरातल्या पुरुषानेही घ्यायला काय हरकत आहे? मुलांचीच नव्हे तर कुटुंबांची जबाबदारी एकत्रितपणे निभावणं ही काळाची गरज नाही का? घरातल्या स्त्रीच्याही क्षमतांचा, गुणवत्तेचा योग्य वापर होणं महत्त्वाचं नाही का? आणि सर्वात महत्त्वाचं, उद्याच्या लिंगभेदविरहित समाजासाठी ही भूमिका महत्त्वाची असणार नाही का?

योगाचा वर्ग सुरू होता. प्रत्येक जण त्यात मग्न होता. आणि अचानक मानसी चक्कर येऊन खाली पडली. तिचा तोल गेलेला पाहून तिच्या शेजारी असलेल्या केतकीनं तिला सांभाळलं. हे सगळं बघताच घाबरलेल्या आम्ही योगा थांबवत मानसीकडे धाव घेतली. काय करावं, हे कोणालाच ्समजत नव्हतं. ‘‘आज काही खाऊन आली नाहीस की काय? की वजन कमी करायचं फारच मनावर घेतलं आहेस?’’ गंभीर झालेलं वातावरण जरा हलकं करण्यासाठी मी म्हणताच इतर सर्व जोरात हसल्या, मात्र तिचं उत्तर ऐकताच गारही झाल्या. मानसी खरच जेवलेली नव्हती, पहाटे ४ वाजता उठून कामाला लागलेली मानसी संघ्याकाळचे पाच वाजले तरी जेवलेली नव्हती.

हळूहळू एक एक गोष्ट ती सांगत गेली, एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका असणारी मानसी घर आणि शाळा दोन्ही ‘छान’ सांभाळत होती. घरात सासू, सासरे, नवरा आणि ७ वर्षांच्या मुलीसह तिचं ‘मस्त’ चालू होतं. खरंतर ‘छान, मस्त’ या शब्दांचा अर्थच या घटनेत बदलत होता. नवरा चांगल्या पगारावर असला तरी वेळेची त्याच्याकडे प्रचंड कमतरता होती, आणि सासू-सासऱ्यांच्या प्रचंड अपेक्षा. मुलीला उत्तमोत्तम गोष्टी देत वाढवण्याचा अट्टहास तिचाच आणि स्वत:ला सिद्ध करण्याचाही. या सगळ्यात तिची ओढाताण होतच होती. सकाळी उठून घरातलं, मुलीचं आवरून शाळेला जायचं, तिथून आलं की, मुलीचा हा क्लास तो क्लास करत ने-आण करावी लागे. मग रात्री अभ्यास आणि उद्याची तयारी आलीच. सुट्टीच्या दिवशी तर सासू-सासरे पै-पावणे बोलवून आपल्या मुलाची कर्तबगारी दाखवत. मात्र यात भरडली जात होती ती मानसी. मशीन बनलेल्या मानसीला कधी १० मिनटंही शांत बसता येत नव्हतं. त्यातच ‘नोकरी करणं हा तुझा हट्ट आहे तर तो तू पुरव,’ असा सगळ्यांचाच सूर, याच सुरामुळे मानसीचं स्वत:कडे लक्ष नसे. याचाच परिणाम आज चक्कर रूपात समोर आला. या सगळ्यात तिला शाळेत मुख्याध्यापिका बनण्याची संधी चालून आली होती. पण २४ तासांत आणखी काही तास वाढवणं तिच्या हातात नसल्यानं हताश होत तिने इच्छा असूनही चालत आलेली संधी लाथाडली होती. हे सगळं सांगताना तिला रडूच कोसळलं आणि आम्हालाही तिची समजूत कुठल्या शब्दात काढावी हे समजेनासं झालं.

अशा अनेक मानसी केवळ माझ्याच नाही तर आपल्या सर्वाच्या आजूबाजूला वावरताना दिसतात, या मानसी नेहमीच्या व्याख्येत बसणाऱ्या अत्याचारग्रस्त नाहीत, पीडित नाहीत, मात्र तरीही त्यांना असंख्य प्रश्नांनी ग्रासलं आहे. पण त्यांच्या या प्रश्नांना समाजात प्रश्न म्हणून पाहिलंच जात नाही, त्याकडे पाहिलं जात असेल ते केवळ बाईचा अट्टहास म्हणूनच. माझ्यात गुणवत्ता आहे, पण मी उच्च पद स्वीकारावं का? ती जबाबदारी मला पेलवेल का? मी त्याला न्याय देऊ शकेन का? हेच प्रश्न तिला आजही मागे खेचत राहतात. स्त्रीवादात ग्लास सीलिंग वा काचेचं छत या संकल्पनेत हेच प्रश्न मांडलेले आहेत. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर आजही शैक्षणिक गुणवत्ता असूनही आणि सर्व प्रकारच्या क्षमता असूनही स्त्रिया बहुसंख्य प्रमाणात उच्चपदापर्यंत किंवा तेथील निर्णयप्रक्रियेत सहभागी होत नाहीत, हे वास्तव आहे.
काही पारंपरिक, कौटुंबिक जबाबदाऱ्यांबरोबरच सामाजिक जबाबदाऱ्यांचेही ओझे या सुशिक्षित स्त्रिया वाहत असतात आणि त्यामुळे अनेक पदांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असूनही त्यांना काचेच्या भिंतीतच समाधान मानावे लागते. ‘द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या जागतिक संघटनेने तयार केलेल्या ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट २०१५’ नुसार सादर केलेल्या माहितीच्या आधारे अनेक मुद्दे उलगडले गेले आहेत. त्यानुसार कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित होण्यासाठी २१३३ उजाडावा लागेल म्हणजे अजून ११७ र्वष लागतील. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे भारतात मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण हे

९० टक्के (शहरी-सुशिक्षित वर्गात) आहे, मात्र देशाच्या श्रमशक्तीत (श्रमाची व्याख्या- ज्याचा आर्थिक मोबदला मिळतो ते श्रम) त्यातील फक्त ४० टक्केच मुली भागीदार आहेत. उच्च शिक्षण घेण्याचं प्रमाण आणि आर्थिक श्रमात असलेली तफावत इतकी मोठी का आहे, हे खरं तर आपणच आपले सहज शोधू शकतो. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळून ८० वर्षांपेक्षाही जास्त र्वष उलटून गेली आहेत, तरीही आर्थिक हक्काबाबत आपण अजूनही जागरूक नाही की जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे? याचा विचार व्हायलाच हवा, कारण हे प्रमाण स्त्रियांसाठीही धोक्याचं आहे. जागतिक स्तरावरही ही धोक्याची घंटा ओळखली गेली आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत.
घराबाहेर पडून अथवा घरात राहून काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या या स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत. बढतीच्या वेळी पुरुषांना बढतीबाबत विचारणा झाली तर बहुसंख्य पुरुष तयार असतात, मात्र हाच प्रश्न जेव्हा स्त्रियांना विचारला जातो त्या क्षणी ५० प्रश्न तिच्या डोक्यात थैमान घालतात. त्यामुळे बढती घ्यायची का, त्यानंतर वाढणारे कामाचे तास, वाढणारे मानसिक ताण आणि बऱ्याचदा बदली यासाठी अनेक स्त्रिया तयार होतीलच असे नाही. यातील बहुतांशी कारणे ही कौटुंबिक असतात. खरंतर हे प्रश्न म्हणजे परंपरेनं चालत आलेल्या जबाबदाऱ्या असतात, जसे की मुलांना वेळ देता येईल का? घराचं रूटीन बिघडेल का? माझी गैरहजेरी चालू शकेल का? घरातील ज्येष्ठ मंडळी कसे जुळवून घेतील? त्याचा माझ्यावर येणाऱ्या ताणाचे काय? आदी. वरवर बघता हे प्रश्न पुरुष आणि स्त्रियांचे दोघांचे वाटतात, मात्र स्त्रियाच या प्रश्नाचा विचार जास्त करताना दिसून येतात आणि अर्थातच त्यामुळे स्वत:च्या करिअरचा विचार अनेकदा बाजूला ठेवतात असे दिसून येते.

स्त्रिया या उत्तम लीडर असल्याचे व्यवसाय जगतात सांगितले जात असले तरी लीडर म्हणून वरच्या पदावर पोहोचल्यानंतरचा तिचा संघर्ष असतो. कारण ते पद तेवढय़ाच कुशलतेने निभावायचं असतं. त्यावर संवेदनशीलतेने विचार करण्याऐवजी अनेक कंपन्या ती जागा पुरुषांना देणं योग्य समजतात. रस्त्यावर खूप खड्डे आहेत तर कशाला खड्डे बुजवा, त्याऐवजी दुसरा रस्ता पकडू, ही मानसिकता आपल्याला दिसून येते. याच मानसिकतेमुळे काचेचं छत तयार झालेलं आहे. जे फोडून बाहेर पडणं अजून तिला शक्य झालेलं नाही.

‘द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या जागतिक संघटनेने तयार केलेल्या ‘ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट २०१५’नुसार २००६ मध्ये १५० कोटी स्त्रियांचे जागतिक श्रमात योगदान होते तर पुरुषांचे प्रमाण होते २२५ कोटी. याबरोबरच स्त्रियांचे वार्षिक उत्पन्न
६ हजार डॉलर म्हणजे ४ लाख रुपये तर पुरुषांचे वार्षिक उत्पन्न ११ हजार डॉलर म्हणजे ७ लाख रुपये होते. २०१५ मध्ये जागतिक श्रमात १७५ कोटी स्त्रियांचा तर २७५ कोटी पुरुषांचा सहभाग होता. स्त्रियांचे वार्षिक आर्थिक उत्पन्न ११ हजार डॉलर म्हणजे ७.५० लाख रुपये तर पुरुषांचे २१ हजार डॉलर म्हणजे १४ लाख रुपये झाले. गुंतागुंतीची वाटणारी ही आकडेवारी स्त्रियांबाबतची असमानता अगदी सहज दाखवते. पुरुषांइतके वार्षिक उत्पन्न कमवण्यासाठी स्त्रियांना अजून दहा र्वष लागतील. असे विधान करताच सामान्यपणे प्रश्न पडतो की जो जितके काम करेल त्यानुसार त्याचे वार्षिक उत्पन्न ठरेल, मग यात कुठे आली स्त्री-पुरुष असमानता? मात्र या आकडेवारीच्या मधला अर्थ आणि विरोधाभास आपण समजून घेतला पाहिजे. ९७ देशांत स्त्रियांचे उच्च शिक्षण घेण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. स्त्रिया शिक्षण घेत आहेत, मात्र त्या प्रमाणात आर्थिकदृष्टय़ा कमवत्या नाहीत याची कारणे शोधली पाहिजेत. ही कारणे आपल्या आयुष्यात रोजच डोकावणारी असतात आणि त्याचे पडसाद जागतिक स्तरावर उमटतात, उमटू लागले आहेत म्हणूनच अलीकडे पुरुषांइतकाच पगार किंवा मानधन स्त्रियांनाही मिळालं पाहिजे, या मागणीचा जोर धरू लागला आहे आणि त्यात नामवंत व्यक्ती उतरल्या आहेत.

अलीकडेच मुंबईत झालेल्या जागतिक महिला परिषदेत ‘ब्रेकिंग ग्लास सीलिंग’ या विषयावर ऊहापोह केला गेला. देशविदेशातील अनेक मान्यवर स्त्रिया त्यासाठी एकत्र जमल्या होत्या. त्या स्त्रियांशी चर्चा केल्यानंतर काही मुद्दे समोर आले. जागतिक स्तरावर काम करणाऱ्या या स्त्रिया ‘यशस्वी’ म्हणून समोर आल्या असल्या तरी त्यांनीही या काचेच्या छताचा अनुभव घेतलेला आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी स्वत:ला यशस्वी ठरवलं आहे. क्षमता असूनही रोजच्या जगण्यातले स्त्री म्हणून येणारे अडथळे त्यांनाही जाणीवपूर्वक दूर करावे लागले आहेत. राजोल मेहता ही इस्त्रायली पुरस्कार विजेती कलाकार सांगते की, ‘‘छंद आणि त्याचे व्यवसायात रूपांतर करताना स्त्रियांना ज्या प्रश्नांना समोरे जावे लागते ते प्रश्न घराबाहेर पडून काम करणाऱ्या स्त्रियांसारखेच असतात. मात्र या प्रश्नांवर विचार करून व्यवस्थित नियोजन केले तर हे प्रश्न सुटणे कठीण नाही.’’ ‘गोदरेज’ची फराह सांगते की दोन मुले झाल्यानंतर केवळ मुलांना सांभाळण्यात अडचणी येऊ लागल्याने आपल्या पतीसह ती भारतात परतली. आपल्या आईच्या मदतीने आता ती करिअर आणि मूल अशी तारेवरची कसरत करते आहे. वयाने आणि अनुभवाने मोठय़ा रिचा अरोरा सांगतात की स्त्रियांना कुठल्या टप्प्यावर काय हवंय याची सुस्पष्टता असेल तर तो आनंद मिळवणं सोपं जातं. मात्र आपण स्त्रियांना त्यासाठी तयारच करत नाही. अमेरिकेसोबतच भारतात ‘मायक्रोसॉफ्ट’मध्ये नोकरी करत असलेली अरुणा सांगते की कामाच्या वेळा खरंतर निश्चित नसतात, कधी अचानक जेवणाच्या वेळी महत्त्वाच्या बैठकांसाठी बोलावणं येतं, मात्र ती तुमच्या कामाची गरज असते. त्यामुळे तुम्ही तयार राहायला हवं. त्यासाठी कामाच्या ठिकाणी तसेच घरीही सपोर्ट सिस्टिम आधीच तयार करून ठेवणे हे महत्त्वाचे आहे नाहीतर सतत स्वत:ला दोषी ठरवत स्त्रिया जगत राहतात आणि मिळणाऱ्या कुठल्याच गोष्टीचा आनंद निखळपणे मिळवू शकत नाहीत. या सगळ्या सत्रात ‘मावा’ संघटनेचे अध्यक्ष हरीश सदानी यांनी आता खरंतर पुरुषांना हे सगळं पटवून देण्याची गरज निर्माण झालेली आहे हा महत्त्वाचा मुद्दा मांडला.

‘अवतार’ संकेतस्थळाच्या संस्थापिका सौंदर्या राजेश म्हणाल्या ‘‘आपण स्त्रियांना सतत कुटुंब आणि नोकरी-व्यवसाय यामधला समतोल साधण्यास सांगतो. काम आणि कुटुंब यांचा सहसंबंध प्रस्थापित करण्याकडे आपला सर्वाचा कल असायला हवा आणि तोच गायब आहे. कुटुंबही सर्वाचीच जबाबदारी हे गृहित न धरल्याने हा ताण वाढतो आहे. अशा वेळी पुरुषांसाठीही ‘मुलांसोबत काम,’ ही संकल्पना का पुढे येत नाही? कार्यालयात स्त्रियांसह पुरुषांनाही मुलं आणण्यास परवानगी का मिळू नये. (पाळणाघर संकल्पना) किंवा जेष्ठांच्या काळजीसाठी ‘घरून काम’ ही संकल्पना का स्वीकारली जाऊ नये? मुळात ही जबाबदारी आहे, ओझे नाही. कुटुंबासाठी काम करताना या कामातून कुटुंबाला वगळले जाऊ नये. ते साऱ्यांचे आहे. आपण अद्याप फक्त स्त्रियांनाच तारेवरची कसरत करायला लावतो आहोत.’’

अर्थात बदल होतो आहे, पुरुषही घरकामात हातभार लावायला लागले आहेत, मात्र ती मदतच असते. आणि हे प्रमाण फारच कमी आहे.
उच्चशिक्षित आसावरी गुपचूप सांगते, ‘‘मूल लहान होतं तेव्हा मी हट्टानं काम केलं, तो हट्ट माझाच होता, मलाच सिद्ध करण्याचा. रात्री उशिरा असाइन्मेंट करायचा. दिवसा मुलीला वेळ द्यायचा आणि त्याबरोबरीने नोकरीसुद्धा करायची हा सगळा उद्योग स्वत:साठी होता. त्या वेळेस कुटुंबातील इतर व्यक्तींना त्रास द्यायचा नाही, हे ठरवलेलं होतं. पण स्वत:ला सिद्ध केलं. मी काहीतरी करू शकते, हे पटलं आणि माझ्या आवडत्या क्षेत्रात प्रवेश करू शकले, मात्र त्यामध्ये खूपच ओढाताण झाली हे नक्की. ३७ वर्षांची छाया गोलटकर सांगते की एलएलएम केल्यानंतर लग्नानंतर औरंगाबादहून पुण्यात आल्यावर एका विद्यापीठात नोकरी केली. मात्र लांबचा प्रवास, नंतर गर्भाारपण यामुळे ती सोडली. सतत काहीतरी करत राहणं हा स्वभाव असल्यानं मूल लहान असलं तरीही नवीन नवीन गोष्टी जाणवून शिकत गेले, आता मूल मोठं, ६ वर्षांचं झाल्यानंतर नक्की काय काम करायचं, असा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान, पुढे निघून गेलेल्या जगाशी स्पर्धा करण्यासाठी काही व्यवस्थाच उपलब्ध नसल्याने आवडत्या विषयात काम सुरू करायचं ठरवलं आणि त्यामुळे ‘बाल संगोपन केंद्र’ सुरू करायचं ठरवलं. जी अडचण मला नोकरी करताना आली ती इतर स्त्रियांना येऊ नये, मुलांच्या जबाबदारीसाठी त्यांनी नोकरी सोडू नये, यासाठी हा प्रपंच. ४१ वर्षांची सोनाली घैसास सांगते, ‘‘फ्रीलान्स काम करत असल्यामुळे, किती काम स्वीकारायचं हे सहज ठरवता येतं, १८ र्वष एकाच क्षेत्रात असल्यानं आता इथेच रमते, मुलीच्या अगदी जन्मापर्यंत जोरदार काम सुरू होतं, तेही घरनं, मात्र मुलीच्या जन्मानंतर ४ र्वष ब्रेक घ्यावा लागला. मात्र तो साथीदाराने आणि मी विचार करून मिळून घेतल्याने फार वाईट वाटले नाही, परत काम करणार हे मात्र स्पष्ट होतं. आपल्याला सपोर्ट सिस्टीम नाही हे माहिती असल्याने मी मनाची तशीच तयारी केली होती, कामावर परतणं सहज शक्य झालं ते केवळ समजूतदारपणा आणि कामाच्या लवचीकतेनं.’’

नवऱ्याची नोकरी फिरतीची असेल वा बदली झाली की अनेकदा कुटुंबासह तिथं जाण्याकडे कल असतो. त्यामुळे ती स्त्री नोकरी करत असली तरी अनेकदा तिला ती सोडून त्याच्याबरोबर जावं लागतं. ३८ वर्षीय मेधा कुलकर्णी सांगतात, ‘‘लग्न, दोन मुलांचा जन्म, नवऱ्याची सतत फिरतीची कामं यामुळे नोकरीची सतत धरसोड झाली, काही वेळा काही ठिकाणी मुलासह एकटीनं वास्तव्य करावं लागलं. या सगळ्या गडबडीत नोकरी नाही केली असे नाही आणि केली असेही नाही. मात्र इतकी र्वष फिरल्यानंतर भारतात परत आल्यावर काहीतरी आवडीचं काम नक्की करेन असं वाटतंय, कारण आता ती करणं ही माझी स्वत:ची गरज आहे. आय.टी.चा जॉब सोडून इतर काही सापडतं आहे का ते पाहिलं, पण नक्की काय ते माहीत नसल्याने मिळत नाहीए. शोधते आहे पण पर्याय फारसे दिसत नाहीत.’’

या केवळ काही प्रातिनिधिक स्त्रिया आहेत ज्या आपल्याला कोठेही वेगवेगळ्या नावाने भेटतात. भक्कम सपोर्ट सिस्टीम नसणं अशा समस्यांना कमी-अधिक प्रमाणात सर्वच स्त्रियांना सामोरे जावं लागत आहे. काही जणी पाळणाघर तसेच घरात मदतनीस ठेवण्याचा प्रयत्न करतात मात्र या संस्थांना कुठलीही विश्वासार्हता नसल्याने तो प्रयत्न फसूही शकतोच, अशा स्थितीत मनाला मुरड घालत आपल्या नोकरी, व्यवसायावर अनेक स्त्रिया पाणी सोडतात किंवा उच्च पद नाकारतात. आणि अर्थातच त्यामुळे त्यांच्या कामाच्या अनुभवात सातत्य नसल्याने त्यांच्या आर्थिक उत्पन्नावर थेट परिणाम होतो. मात्र बदलत्या अर्थव्यवस्थेचा विचार करता स्त्रियांना कामाचे विविध पर्याय उपलब्ध करून देणे सहज शक्य आहे. भारतात श्रमशक्तीमध्ये जर स्त्रियांची संख्या फक्त १० टक्क्यांनी जरी
वाढली तरी जीडीपीमध्ये मोठय़ा संख्येने वाढ होऊ शकते. त्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे. वयाच्या तिशीत मुलांसाठी ब्रेक घेतलेल्या स्त्रियांना कामावर परतण्यास सहज पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी काही स्त्रियांनी प्रयत्न सुरू केले job for her, her second innings, sheroes, Avatar या काही साइट, विविध प्रकारे स्त्रियांना मदत करत आहेत. मात्र ही मदत तंत्रस्नेही स्त्रियांपर्यंतच पोहोचू शकते. या व अशा असंख्य प्रयत्नांची आपल्या सर्वाना
गरज आहे, त्यामुळे आपला देश सक्षम म्हणून जगासमोर येईल.

घरी बसून कामाचे पर्याय, अथवा कामाच्या ठिकाणी मुलांना घेऊन जाण्याच्या सुविधा अशा विविध पर्यायांचा शोध घेतला पाहिजे आणि सवार्ंत महत्त्वाचे म्हणजे घर आणि काम यांच्या सहसंबंधांचा विचार करायला कंपन्यांनी तयारी करायला हवी. कोरिया आणि जपान या देशात स्त्रियांना बाळाच्या जन्मानंतर आधार मिळावा म्हणून पुरुषांनाही पॅटर्निटी लीव्ह घेण्याचा अधिकार दिला आहे.
या सर्व पर्यायावर आपण नजर टाकली तर एक गोष्ट आपल्या ल्क्षात येईल की अमेरिकेत काम करणाऱ्या स्त्रिलाही तोच प्रश्न सतावतो जो प्रश्न भारतातील स्त्रीला सतावतो. एकत्र कुटुंबामुळे भारतातील स्त्रियांना काहीसा दिलासा मिळतो हे चित्र जरी रम्य वाटत असले तरी त्याची खात्री नाही, आणि त्यातल्या नोकरदार स्त्रीला त्यासाठी किती तडजोडी कराव्या लागतात, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. मूल ही सर्व कुटुंबाची जबाबदारी आहे ही मानसिकता अजूनही भारतीयांमध्ये विकसित झालेली नाही. कुटुंब व्यवस्था, बदलत असलेली जीवनशैली तसेच अर्थव्यवस्थेत होणारे मोठे बदल या सर्वाचाच आतंरसंबंध स्त्रियांसाठी असलेल्या काचेच्या छताशी आहे. त्यावर मात करत स्त्रियांनी आकाशाला गवसणी घालावी, असं जर वाटत असेल तर या सर्व आंतरसंबंधांचा विचार करणं गरजेचं आहे.

आजची ही स्त्री काम आणि संसार या दुहेरी बोजाचे ओझे कमी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर असंघटित क्षेत्रात उतरत आहेत. क्षमता असूनही स्वत:ला अपात्र करण्याकडे स्त्रिया जात आहेत. कारण वरच्या पदावर जाणे म्हणजे जबाबदारीचे काम असते, तिथल्या निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हावे लागते, त्यासाठी वेळेची गरज असते. काही वेळा अपेक्षीत ताण घेण्याचीही गरज असते. मात्र दोन्ही जबाबदाऱ्या पेलवतील का या प्रश्नचिन्हात ती स्वत:ला मागे खेचून स्वत:च्या क्षमतांच्या विरोधात अनेक छोटी मोठी कामं करत राहाते. पदं नाकारते. हा दुहेरी बोजा कमी करणं सहज शक्य आहे जर घरातल्या पुरुषांनी स्वत: सहभाग नोंदवला तर. मात्र अजूनही ८० टक्के पारंपरिक पद्धतीने विवाह करणाऱ्या भारतीय समाजात मुलांमध्ये विवाह म्हणजे काय? सहजीवन म्हणजे काय याची सुस्पष्ट जाणीव नसते. त्यासाठी पुरुषसत्ताक पद्धतीने विचार करत असलेल्या कुटुबांना बदलण्याची गरज आहे. बदलत्या जीवनशैलीनुसार संस्कार तसेच मानसिकतेत बदल होणं स्त्रीबरोबरच कुटुंबहिताचं ठरणार आहे.

कुटुंब, त्यातील नातेसंबंध हे स्त्रीबरोबरच पुरुषाचीही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी दोघांनी सामंजस्यानं वाटून घेणं ही काळाची गरज होत चालली आहे. ही गरज न ओळखल्यानेच आजही कुटुंबात कलह उत्पन्न होताना दिसत आहेत. तसेच बालपणापासून खंबीरपणे आपली मते मांडण्याचे संस्कार मुलीवर न झाल्यानेही मुलींमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आढळतो. कदाचित पुढच्या पिढय़ा यातून बाहेर पडतील, अशी आशा करायला हरकत नाही. यूटय़ूबवर आणि वॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेल्या एका जाहिरात व्हिडीओत बाबा आपल्या मुलीची माफी मागत सांगतात की तू लहान असताना घरातली कामं ही तुझ्या एकटीची जबाबदारी नाही हे तुला पटवून द्यायला हवं होतं, मात्र मी ते केलं नाही आणि ना तुझ्या पतीच्या वडिलांनी. त्यामुळे तुझ्यावर पडणाऱ्या दुहेरी जबाबदारीला मी कारणीभूत आहे. मात्र आता मी स्वत:ला बदलेन आणि तुझ्या आईला शक्य तेवढी मदत करेन.

हा व्हिडीओ खूपच मार्मिक भाषेत स्त्रीच्या काचेच्या छताबरोबरच कुटुंबव्यवस्थेवर टिप्पणी करतो. त्या व्हिडीओतील वडिलांप्रमाणे सर्व पुरुषांनीच नाहीतर सर्व कुटुंबाने विचार करणं गरजेचं आहे. कौटुंबिक जबाबदारी ही केवळ मुलीची जबाबदारी नसून संपूर्ण कुटुंबाची आहे हे संस्कार सगळ्या वयात झाले पाहिजे. माणूस म्हणून मिळणारे सगळे हक्क स्त्रीलाही आहेच, ती सबला आहेच. हा विचार बालपणापासूनच मुलींच्या मनात रुजवला गेला पाहिजे. हा बदल म्हणजे केवळ समजसुधारकांचे काम नाही तर ही जबाबदारी सामूहिकरीत्या आपल्या सर्वाची आहे.

एक पुरुष यशस्वी झाला म्हणजे त्याच्यामागे एक स्त्री असते. तसं एक स्त्री यशस्वी झाली की तिच्यामागे एक खंबीर स्त्री मदतनीस असते. हा रूढ झालेला वाक्प्रचार आपल्याला बरंच काही सांगून जातो. स्त्रियांना खंबीर व विश्वासार्ह सपोर्ट सिस्टीम न मिळणं हे अखिल विश्वाच्या अपयशाचं द्योतक आहे, असं म्हणता येईल. हा बदल आपण आपल्या घरापासून सुरू करू शकतो. तरच येणारी पिढी ही काचेचं छत सहज पार करू शकेल.

कळवा तुमचे अनुभव
कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नोकरी सोडणाऱ्या किंवा अधिकारीपद न घेणाऱ्या अनेक जणी आपल्या अवतीभवती दिसतात. तुमच्याही आजूबाजूला आहेत अशा काही जणी? की तुम्हीच आहात त्या? गुणवत्ता असूनही, शिक्षण घेऊनही, महत्त्वाकांक्षेला मुरड घालावी लागली आहे? मुले मोठी झाली, आता काहीतरी स्वत:साठी करायचे आहे, पण पर्याय सापडत नाही? आपणच निर्णय घेतला तरीही घुसमट होते आहे का?
किंवा अशाही परिस्थितीतून तुम्ही काढला असेल सुवर्णमध्य. कुटुंबाची जबाबदारी सर्वानी मिळून घेण्यासाठी तुम्ही वा तुमच्या घरातल्यांनी घेतली असेल एखादी प्रगल्भ भूमिका, तर आम्हाला कळवा. काय केलं पाहिजे ही कोंडी सोडवण्यासाठी? मानसिकता बदलण्यासाठी? तुमच्या अनुभवातून काही वाचकांना त्यांचा मार्ग सापडेल किंवा वाचकांना प्रेरणाही
मिळतील. सामाजिक परिस्थिती अथवा प्रशासकीय प्रक्रियेत जेव्हा बदल होतील ते होतील, मात्र आपण एक पाउल नक्की
टाकू शकतो. तुमचा अनुभव हे त्यातीलच पहिले पाऊल ठरू शकते. त्यासाठी
पत्ता- ‘काचेचं छत’, चतुरंग, लोकसत्ता,
ईल १३८, टीटीसी इंडस्ट्रिीयल एरिया, महापे, नवी मुंबई, ४०००७१० किंवा
पाठवा chaturang@expressindia.com  या इमेलवर – सब्जेक्टमध्ये
‘काचेचं छत’ लिहाच.
स्त्रीला काचेचं छत फोडता येत नाहीए, उच्च पदावर पोहोचणाऱ्या स्त्रियांची संख्या अद्याप कमी आहे, या मागे कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक परिस्थिती ही कारणे आहेच. मात्र त्याच बरोबरीने लहानपणापासून तिच्यातले नेतृत्व गुण न जोपासणे, कर्तेपण न देणं ही कारणं देखील आहेत का? पुरुषांच्या तुलनेत ही स्त्री आजही स्वत:ला कमी लेखते आहे का? तिचा आत्मविश्वास कमी पडतो आहे का? उच्च पदाबरोबर येणारे अधिकार पेलवण्याची आणि ताण सहन करण्याची तिची क्षमता कमी आहे का? या विषयावरही चर्चा व्हायला हवी. ती पुढील अंकात.

 

– प्रियदर्शिनी हिंगे 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 1:16 am

Web Title: women can lead
Next Stories
1 कृत्रिम गर्भधारणा करताना..
2 गोठवलेली गुंतवणूक
3 ‘उत्कृष्ट राहा; मधुमेहावर मात करा!’
Just Now!
X