एकेकाळी स्त्रीच्या केंद्रस्थानी फक्त कुटुंब होतं. आज कुटुंबाच्या केंद्रस्थानी स्त्री आहे. हा बदल तिने स्वत:च्या कर्तृत्वाने, मेहनतीने, संघर्ष करत घडवला आहे. आधुनिक काळातल्या सुधारणांचा फायदा घेत स्वत:ला छान, फिट, अपडेट ठेवत आज स्त्रीने आत्मविश्वास,अभ्यासाच्या जोरावर स्वत:च्या प्रतिमेला बदलायला लावलं आहे. वय हा आता तिच्यासाठी फक्त बदलत राहणारा आकडा आहे. पंचेचाळिशी, पन्नाशीच नव्हे तर अगदी साठीला आलेल्या अनेक जणी आपलं प्रौढत्व सांभाळूनही छान ‘तरुण’ वाटतात. स्वत:ला फिट ठेवतात. काळाला असं थांबवणं आजच्या स्त्रीची गरज झालेली आहे. पुढे जायचंच हा निर्धार आजच्या स्त्रीला ‘सुंदर’ करतोय आणि तिचं जगणंही.. नवीन वर्षांत पदार्पण करताना या बदलत्या स्त्रीरूपाला ‘चिअर्स’ करतच पुढे जाणार आहोत..

मध्य मुंबईतून दीड तास ड्रायव्हिंग करून घरी पोहोचलेल्या ममता शेखचा रोजचा दिवस खूपच दगदगीचा असतो. प्रथितयश औषधकंपनीची मार्केटिंग हेड म्हणून काम करताना वैद्यकीय प्रतिनिधींसोबत घ्याव्या लागणाऱ्या बैठका, डॉक्टरांच्या भेटीगाठी, सेमिनार्स यातून घरी आलं की फ्रेश होऊन सर्वप्रथम ती आपल्या गोजिरवाण्या कुत्र्याच्या पिल्ल्याला कुरवाळते आणि त्याला घेऊन मोकळ्या हवेत फिरायला बाहेर पडते. तर ‘कॉर्पोरेट’ सुप्रिया कितीही उशीर झाला तरी शाळेतल्या मित्रमैत्रिणींच्या ‘व्हाट्स अ‍ॅप ग्रुप’ वर हजेरी लावते. दिवसभराचा शीण घालवण्याचा त्यांचा हा हुकमी इलाज असतो..
आपल्या व्यग्र जीवनशैलीतून निवांतपणा शोधण्याचे असे उपाय आजच्या आधुनिक स्त्रीने स्वत:च शोधलेले आहेत. कारण स्वत:शी प्रामाणिक राहून जगण्याचा निश्चय तिने केला आहे. आणि म्हणूनच तिच्या विचारधारेच्या केंद्रस्थानी ‘ती’ स्वत: आहे. प्राधान्य आहे ते तिच्या ‘ती’ असण्याला, आत्मसन्मानाला आणि तिच्या मनातील शाश्वत संस्कारमूल्यांना! त्यांची जपणूक करताना संसार, मूलबाळ, नातेसंबंध यांना बरोबर घेऊनच ती पुढे जाते आहे. आणि ते करत असताना तिच्या सर्वागीण प्रगतीच्या आड येणारी गोष्ट जाणीवपूर्वक दूर सारते आहे. अगदी तिचं वाढतं वयसुद्धा! आज वय हे तिच्यासाठी फक्त एक आकडा आहे. आकडय़ातील वय आणि शारीरिक-मानसिक वय यातली दरी जाणीवपूर्वक मिटवून टाकताना काळ जणू तिने थांबवून ठेवला आहे.
अर्थात हे स्थित्यंतर सहजगत्या घडलेलं नाही. त्यासाठी चार ते पाच पिढय़ा खर्ची पडलेल्या आहेत. सौंदर्य व सौष्ठव यांचा मापदंड असलेल्या स्त्रीची आत्मिक सौंदर्यापर्यंतची वाटचाल संघर्षमय आहे.  या स्थित्यंतराला सहाय्यभूत ठरली ती गेल्या शतकातील र. धों. कर्वे यांची क्रांतिकारी विचारधारा. गर्भनिरोधनाच्या चळवळीमुळे नेमाने येणाऱ्या गरोदरपण- बाळंतपणाच्या चक्रातून तिची सुटका झाली. डझनभर मुलांचं बाळंतपण, संगोपनातून स्त्री बाहेर पडली तशी हाताशी उरलेल्या वेळात ती आजूबाजूला भिरभिरत्या नजरेने पाहू लागली. स्त्री-शिक्षणाचे वारे वाहू लागले होतेच. महर्षी कर्वे, सावित्रीबाई फुल्यांनी तिच्यातील चेतनेचा अंगार फुलवण्यास सुरुवात केली होती. आनंदीबाई जोशींसारख्या स्त्रियांनी वैद्यकीय शिक्षणापर्यंत मजल मारून तिच्यापुढे शैक्षणिक प्रगतीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला होता. शिक्षणाच्या निमित्तानं स्त्रियांचं घराबाहेर पाऊल पडलं आणि स्वातंत्र्याच्या, समतेच्या विचारांनी झपाटलेल्या तत्कालीन काळानं तिच्यावरही हलकी फुंकर घातली. या पहिल्यावहिल्या फुंकरीने ती थरारली. तितकीच सुखावली. आजवर तिला ती दिसत होती पत्नीच्या, मातेच्या रूपात. मुलगी, सून, भावजय, जाऊ, नणंद अशा नात्यांच्या आरशात ती स्वत:चं रूप शोधत होती. आता पहिल्यांदाच आरशात तिला तिचं ‘स्वत:चं’ रूप दिसलं. ‘स्व’पलीकडील स्वत्वही गवसलं. आजवर बालपणात पित्याचं, यौवनात पतीचं आणि वृद्धत्वात पुत्राचं बोट धरून, त्यांच्या विचारांनुसार शरणागतीनं वाहत जाण्याचं स्वीकारलेलं भागधेय तिनं हळूहळू नाकारायला सुरुवात केली. मला माझं स्वतंत्र अस्तित्व आहे, मत आहे, स्वातंत्र्य आहे. तिला अस्मितेचा शोध लागला तसा शिक्षणामुळे फुललेल्या चेतनेच्या हलक्या ठिणगीतून चैतन्याचा अंगार उसळला.
स्त्रीशक्तीच्या या झुंजार आविष्कारापुढे समाजपुरुष हळूहळू नमत गेला. दबत गेला. तसतसं स्त्रीनं स्वत:च स्वत:ला अगतिक, शरणतेतून बाहेर काढण्यास सुरुवात केली. अर्थात असं झालं तरी ती पुरुषी वर्चस्वाला थेट आव्हान देण्याइतकी समर्थ झाली नव्हती. पण किमान बंडखोर विचारांचं बीज तरी तिच्या मनात निश्चितपणे रुजलं होतं. ‘हेही नसे थोडके’ असं म्हणत काळ पुढे सरकला. शिक्षणाने स्त्रीला मानसिकदृष्टय़ा सक्षम केलं. त्याच काळात विज्ञानानंही तिच्यावर मेहेरनजर केली. त्यातून स्वयंपाकघरात राबणं कमी झालं आणि फ्रिझने तर तिच्या दैनंदिन जगण्यात क्रांतीच घडवून आणली. अर्थात या सर्व वेगवान घडामोडींतून जात असताना मानसिक पातळीवर मात्र तिच्या मनाचे धागे अजूनही कुटुंबात, कौटुंबिक सण-समारंभ उत्सवांत व कर्मकांडातून गुंतून राहिलेले होते. त्यामुळे मधल्या काळातील स्त्रीनं सर्वाना सुखी समाधानी करण्याच्या प्रयत्नात आणि ‘सुपर वुमन’ बनण्याच्या नादात स्वत:ची बरीच फरफट करून घेतली. त्या काळात एकीकडे तिला बाह्य़ जगांतील संधी खुणावत होत्या तर त्याच वेळी कुटुंबीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचंही दडपण तिच्या मनावर येत होतं. परिणामी अनेकदा मुलांचं संगोपन, ज्येष्ठांच्या जबाबदाऱ्या, पतीची व्यावसायिक प्रगती यांना प्राधान्य देत ती स्वत:च्या प्रगतीच्या संधीकडे निग्रहाने पाठ फिरवत राहिली. किंबहुना स्वत:कडे दुय्यम स्थान घेत राहिली. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत राहिली. त्या काळात अपवादात्मक उच्चभ्रू स्त्रिया स्वत:ला सुस्वरूप, सौष्ठवपूर्ण ठेवत असत तेही त्यांच्या उच्चपदस्थ पतीला शोभेल अशी सहचारिणी म्हणून! पतीच्या व मुलांच्या कौतुकाची माफक अपेक्षा करणारी गृहिणी म्हणून! स्वत:चे पाककलेसारखे छंदही जोपासत होती ते कुटुंबीयांच्या सुखासाठी! तिच्या केंद्रस्थानी होतं ते फक्त कुटुंब, पण बदल घडत गेला..
आज विश्वभरातील व्यवसायांचं दार ठोठावणारी आधुनिक स्त्री वयालाही वळसा घालते आहे. त्यासाठी तिने अनेक नवनव्या सवयी स्वत:मध्ये मुरवल्या आहेत. सबलीकरण व सक्षमीकरणाच्या वाढत्या वेगाशी जुळवून घेत,  स्वत:मधील कार्यक्षमता विकसित केली. कार्यक्षेत्राला प्राधान्य देत असतानाही, स्वत:मधील उपजत संवेदनशीलता हरवू न देता, वाढते वय, सामाजिक र्निबध व कौटुंबिक मर्यादा यांच्याशी सुसंस्कृततेच्या चौकटीत राहून सामना केला आहे. परंपरेच्या चौकटीत राहूनही अनावश्यक कर्मकांडात स्वत:ला गुंतवून न घेण्याचं धाडस ती दाखवत आहे. म्हणूनच आपलं सतीसावित्रीपण सिद्ध करण्यासाठी, वटसावित्रीच्या सणाला वडाच्या पारंब्या तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करणं तिला मंजूर नाही, त्यापेक्षा पतीला संसारात आर्थिक हातभार लावणं, अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणं अशी सतीसावित्रीची भूमिका ती डोळसपणे निभावत आहे.
वाचन, विचार व व्यावसायिक दृष्टिकोन त्यातून स्त्रीचं संपन्न व्यक्तिमत्त्व आकाराला येत आहे. तिच्या बुद्धीला धार चढलेली आहे. स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचं नेमकं भान असल्याने बाह्य़ सौंदर्याची जपणूक करण्याचाही ती कसोशीने प्रयत्न करते. यासाठी सर्वप्रथम तिने वयानुसार येणाऱ्या शारीरिक मर्यादांवर मात करण्यास प्राधान्य दिलं आहे. सौंदर्य व सौष्ठव जपण्याची जागरूकता केवळ वाढत्या वयाची गरज नसून व्यावसायिक कारणांसाठीही आवश्यक बाब ठरत आहे. म्हणूनच नोकरदार, करिअरिस्ट स्त्रीने प्रेझेंटेबल असावं असाही विचार मूळ धरत आहे. त्याच वेळी कामाच्या जागा व वेळा या सर्वाचा विचार करून साडी, पंजाबी ड्रेस यापेक्षा जीन्स, टीशर्ट व ब्लेझर या वस्त्रप्रावरणांमध्ये स्त्रिया अधिक मोकळेपणाने वावरताना दिसतात. काम करताना त्या कामाला साजेशी वस्त्रप्रावरणं ल्यायली तर कामाची गुणवत्ता निश्चितच वाढते व कार्यालयातील वातावरणही उत्साहवर्धक होतं. नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर  यांच्या मते ढेपाळलेली स्त्री चांगलं काम करू शकत नाही. कामातील नैपुण्याचे अनेक पैलू आहेत. स्वत:कडे पुरेसं लक्षं देणं, त्यासाठी वेळ देणं, टापटीप राहणं, कामावरही तसंच राहणं, स्वत:वर काही नियमांचं बंधन घालणं या सर्वातून एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. एकदा अशी नीटनेटकं राहण्याची सवय जडली की मग ती आपली गरज ठरते. आणि हे पूर्णवेळ गृहिणी असणारीनेही स्वत:मध्ये आणायला सुरुवात केली.
बाह्य़ जगाने आपला स्वीकार करावा, आपला योग्य तो मान ठेवावा, किमान आपली दखल घ्यावी यासाठी बुद्धिमत्ता व वैचारिक प्रगल्भतेबरोबरच छान, टापटीप राहावं, फीट राहावं याचं नेमकं भान आज स्त्रीला आलं आहे. आपलं रूप निसर्गदत्त असतं. पण वयानुसार सैल पडलेल्या, निस्तेज होत चाललेल्या त्वचेला तजेला यावा यासाठी सौंदर्यप्रसाधने, फेशियल, मसाज असे अनेक उपाय स्त्रिया आज नि:संकोचपणे करत आहेत.   सौंदर्यतज्ज्ञ माया परांजपे या एका मोठय़ा स्थित्यंतराच्या साक्षीदार आहेत. त्यांच्या मते, दहा वर्षांपूर्वीचे स्कीन केअर, हेअर केअरसारखे शब्द आता पार जुने झाले आहेत. आता जमाना ‘मेकओव्हर’चा आहे. हे ‘मेकओव्हर’चं भान आपली इमेज न बदलण्याची काळजी घेत एखादी आयएएस अधिकारी, प्राध्यापिका वा डॉक्टरसुद्धा ठेवते. आणि तसाच मेकओव्हर करण्याची मागणी करते. कारण अशा सौंदर्याच्या जपणुकीतून ती सर्वासाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. म्हणूनच पंचेचाळिशी, पन्नाशी काय अगदी साठीला आलेल्या आपलं प्रौढत्व सांभाळूनही छान तरुण वाटतात. फीट राहातात. काळाला असं थांबवणं आजच्या स्त्रीची गरज झालेली आहे.
प्रत्येकाचं वय वाढत जाणारच आहे. पण वाढत्या वयातील संभाव्य धोक्यांशी सामना करण्याचे प्रत्येक स्त्रीचे मार्ग मात्र भिन्न आहेत. पण त्यामागील विचारांत सुसूत्रता आहे. ठाण्याच्या कलेक्टरपदाची धुरा सांभाळताना अश्विनी जोशी यांना अनेक स्थळी भेटी द्याव्या लागतात. रेतीच्या कारवाईसारख्या अवघड प्रसंगात सात ते आठ तास साइटवर उभं रहावं लागतं. तर परिवहन विभागाच्या डी.सी. पी. रश्मी करंदीकर यांना किंवा ‘वीणा वर्ल्ड’च्या प्रणेत्या वीणा पाटील यांना व्यावसायिक गरजेपोटी दूरवरचे प्रवास करावे लागतात. अशा वेळी शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्याला त्यांना प्राधान्य द्यावंच लागतं. मग त्यासाठी कोणी जिम, अ‍ॅरोबिक्सकडे वळतं, तर कोणी योगा किंवा चालण्याच्या पारंपरिक व्यायाम प्रकारांची निवड करतं. फिटनेस ट्रेनर लिना मोगरे यांचा असा अनुभव आहे की, अधिकाधिक स्त्रिया आता पर्सनल ट्रेनरच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतात. चाळिशीतील संप्रेरकांच्या बदलांची दखल घेऊन योग्य ते उपचार घेतात. एवढंच नव्हे तर कामानिमित्त खूप वेळ घराबाहेर राहायची वेळ आली तर जंकफूड न खाता स्वत:जवळ चॉकलेटस्, बिस्कीट्स वा फळे ठेवतात. एकूणच स्वत:ची आबाळ न होऊ देण्याची काळजी स्त्रिया आता घेत आहेत.
स्वत:मध्ये असा बदल आपण केव्हा करतो? आपण जेव्हा स्वत:वर प्रेम करू लागतो तेव्हाच! असं स्वत:वर प्रेम करू लागलं की जगच सुंदर वाटायला लागतं. कारण या बाह्य़ बदलाची सुरुवात अंतर्मनातून झालेली असते. वीणा पाटील याचं असं निरीक्षण आहे की स्त्रियांच्या मानसिकतेत धीम्या गतीने बदल होत आहे. पूर्वी कुटुंबातील सदस्यांची सोबत घेऊन येणारी स्त्री हळूहळू मैत्रिणी, जाऊ, नणंदांबरोबर येऊ लागली. आता विहिणी-विहिणीही सहलीला येतात. नात्यातील हा निकोपपणा स्त्रियांनी छान स्वीकारला आहे. पण तरुण पिढीतील स्त्रिया मात्र एकेकटय़ा वुमेन्स स्पेशल सहलींवर जाणं पसंत करतात. कारण आता प्रत्येकीला ‘स्पेस’ हवी आहे. मग ती घरात नाही मिळाली तर कॉफीशॉपमध्ये किंवा जिममधल्या तासाभराच्या वर्कआऊटमधून मिळाली तरी ती चालते. पिढय़ान्पिढय़ाची ही दबलेली गरज आज उफाळून वर येताना दिसत आहे. आर्थिक स्वातंत्र्यातूनच स्वत:चं खाजगीपण टिकवण्याची मुभा तिला मिळून गेली आहे. काही काळापूर्वी माहेराहून तिला आलेल्या खुशालीच्या पत्राचंही सासरी सार्वजनिक वाचन केलं जात असे. आज तिच्या हातात मोबाइल आहे. किंवा स्वत:चं खाजगीपण टिकू देणारा ‘पासवर्ड’ तिच्याकडे आहे. स्वायत्ततेच्या जपणुकीतून स्त्रीला माणुसपणाच्या एका टप्प्यावर अलगद नेलं आहे.
आज ती स्त्री-पुरुष लिंगभेदाच्या पार पल्याड पोहोचते आहे. म्हणूनच बाह्य़ जगात स्त्री म्हणून सवलती घेणं ती टाळू लागली आहे. कौटुंबिक पातळीवरसुद्धा दुय्यम स्थान घेणं तिला मान्य होत नाही. प्रगल्भ विचारसरणीतून जोडीदाराला समपातळीवर आणण्यात आजच्या तरुणी तरी नक्कीच यशस्वी झाल्या आहेत. क्वचित कार्यक्षेत्राची गरज म्हणून आजची तरुण स्त्री मातृत्वाच्या नकाराचा हक्कसुद्धा खुलेपणाने, त्याबद्दल ‘गिल्ट फील’ येऊ न देता बजावते. तर साठीची आजी मला माझं निवृत्तीचं आयुष्य माझ्या पद्धतीने जगू दे असं म्हणत राहून गेलेल्या गोष्टी करण्यात मनापासून रमून जाते.
असाच एक पन्नाशी उलटलेल्या स्त्रियांचा गट आहे. तारांगण लेडीज ग्रुप! या ग्रुपमधील सर्व स्त्रियांनी नृत्याची आवड जोपासत लावणी ते सालसापर्यंत सर्व नृत्यप्रकार आत्मसात केले. डॉक्टर वैशाली वावीकरांच्या मते आदर्श सून, सद्गुणी आई, शिस्तशीर मॅडम, अशा झुली उतरवून आम्ही जेव्हा डान्स फ्लोअरवर जातो तेव्हा रोजच कामाचं प्रेशर, डिप्रेशन यांच्याशी झुंजायचं बळ आमच्यात येतं. जयश्री स्वादींना ‘रचना संसद’मध्ये संगीताचं शिक्षण घेतल्यावर कर्करोगासारख्या व्याधीवर मात करण्याचं बळ लाभलं. वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी आयुष्याला नव्याने भिडण्याची ऊर्जा लाभली, असं त्याचं प्रांजळ मत असतं. मीना रेळेंना याच संगीत शिक्षणातून आत्मविश्वास व सभाधीटपणा लाभला. वयाच्या शहात्तराव्या वर्षी पॅरासेिलगचा थरार अनुभवणाऱ्या भारती मेहता आजही देशपरदेशात कथाकथनासाठी एकटय़ा फिरतात. अनेक पुस्तकांचं लेखन करतात. शहाऐंशी वर्षांच्या कुसुम जगलपुरे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व! गोळाफेक, भालाफेक, धावणे या ज्येष्ठांसाठी भरणाऱ्या क्रीडा महोत्सवांत सुवर्णपदकं मिळवतात. त्याचबरोबर गरीब व गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय मदत मिळवून देण्याचं काम करतात.
अशा समाजसेवेच्या कार्यातून खूप ऊर्जा मिळते असं व्ही.एस्.एम्. या गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत देणाऱ्या संस्थेच्या प्रमुख गीता शहा सांगतात. त्यांच्या मते, आजची स्त्री स्वत: इतकाच समाजाचाही विचार अग्रक्रमाने करते. माध्यमांमुळे अनेक विचारप्रणाली तिच्यापर्यंत पोहोचतात. त्यांतील ज्या कार्याशी, विचारांशी तिचे विचार जुळतील त्याची ती निवड करते. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही असं सामाजिक कार्य तिला आयुष्यात खूप शांती व समाधान मिळवून देतं. स्वत:साठी निर्मळ व निखळ आनंद शोधणारी प्रत्येक स्त्री आयुष्याचं मर्म आपापल्या परीने उलगडते. मनीषा म्हैसकर यांच्या मते वयाच्या व व्यवसायाच्या या टप्प्यावर आपली गीतेतील कर्मयोगावर श्रद्धा दृढ होते. माझं काम मी मिळणाऱ्या फलाची अपेक्षा न करता सर्वोच्च क्षमतेनं करावं, ही धारणा पक्की होते. कारण तुमचं आजचं चांगलं कर्मच तुमचं उद्याचं भवितव्य घडवत असतं.
प्रत्येक स्त्रीने वाढत्या वयाची प्रक्रिया ‘ग्रेसफुली’ स्वीकारली व आपलं मानसिक वय शारीरिक वयापेक्षा कमी ठेवलं तर स्त्रिया सर्वच वयोगटातल्या व्यक्तींशी आनंदाने संवाद साधू शकतील. ठाण्याच्या वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर याचं उत्तम विवेचन करतात. बाह्य़ क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या स्त्रीमध्ये पुढे आपोआप अहंकार वाढू लागतो. मी इतरांपेक्षा वेगळी आहे. वरचढ आहे ही भावना मूळ धरते. याचा अपरिहार्य परिणाम घरगुती व कार्यालयीन नातेसंबंधांवर होतो. वर्षांनुवर्षे जपलेली मैत्री धोक्यात येते. परिणामी एकाकीपणाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू होते. हे टाळायचं असेल, तर प्रत्येक स्त्रीने आपलं खाजगी व व्यावसायिक आयुष्य वेगळं ठेवायला हवं. व्यावसायिकदृष्टय़ा आपण कितीही उंची गाठलेली असली, तरी ‘माणूस’ म्हणून आपण सर्वजण ज्यात आपले कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, सहकारीच नव्हेत ज्यांच्यामुळे आपण आपली करिअर निधरेकपणे करू शकतो त्या ड्रायव्हर-कामवालींसारख्या व्यक्तीसुद्धा समपातळीवर असतात याचं स्मरण ठेवायला हवं. त्यांच्याप्रति कृतज्ञ असायला हवं.
स्त्रीने असं आंतरिक सौंदर्य जोपासलं तर तिचा चेहरा देखणा नसला तरी तिच्या विचारांचं, कर्तृत्वाचं तेज तिच्या चेहऱ्यावर झळकतं. माणूस म्हणून जगताना दया, क्षमाशीलता, कृतज्ञता अशा सद्गुणांच्या संकल्पना आपल्या मनात स्पष्ट असतील तर कोणत्याही क्षेत्रातील आव्हानांना स्त्री सक्षमपणे सामोरी जाते. वरिष्ठ पातळीवरील पदं आपल्यासाठी नाहीत तर आपण त्यांच्यासाठी आहोत हा विचार आपल्या मनात स्पष्ट असेल तर आपल्या वरिष्ठ पदाला आपण खरोखर न्याय देऊ शकतो. समाजाच्या कल्याणासाठी पदाचा उपयोग करण्याची मानसिकता दृढ असल्याने अश्विनी जोशी म्हणतात, ‘‘आपल्या मूल्यांशी व विचारधारेशी तडजोड न करता आपण जगायचं असं एकदा आपण निर्णय घेतला की काम करताना कितीही दबाव आले तरी योग्य निर्णय घेण्याची व परिणामांना सामोरं जाण्याची ताकद व सकारात्मक दृष्टिकोन आपल्यात आपोआप येतो!’’
हल्लीच्या स्त्रियांच्या वाटय़ाला येत असलेल्या धकाधकीच्या जीवनात मानसिकदृष्टय़ा स्थिर होण्यासाठी ध्यानधारणेची नितांत गरज आहे. असं बहुतेक जणींना वाटतं. कारण एकदा का स्त्रीचं मानसिक संतुलन बिघडलं की ती भावनिकदृष्टय़ा दुर्बल होते. त्याचा परिणाम तिच्या कुटुंबावर व करिअरवर होऊ शकतो. मध्यमवयातील स्त्री अनेक वेळा आई-वडिलांचे आकस्मिक मृत्यू, मुलांच्या वाढत्या जबाबदाऱ्या व करिअरमधील स्पर्धा व आव्हाने यामुळे खूप हळवी बनते. छोटय़ा छोटय़ा गोष्टींमुळे अस्वस्थ होते. अशा वेळी दिवसातला थोडातरी वेळ स्त्रीने स्वत:साठी, स्वत:शी संवाद साधण्यासाठी दिला पाहिजे. या संवादातून तिला स्वत:च्या हृदयाची हाक ऐकू येईल. त्या हाकेला प्रतिसाद देत एखादी शास्त्रज्ञ स्त्री—- परदेशी भाषा शिकू लागेल. वीणा भाटीया हाती सतार घेते. दिना पेंटिंगचा ब्रश घेईल. तर मंगला जोशींसारखी स्त्री कीर्तनकाराचा वेश परिधान करून हाती टाळचिपळ्या घेते.

How to Make Home Made Instant Chilli Rice Dhokla with Leftover Rice Not The Tasty And Quick Recipe
रात्री उरलेल्या भाताचे काय करायचं असा प्रश्न पडलाय ? मग ‘हा’ पदार्थ बनवून पाहा; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…

रश्मी करंदीकर म्हणतात तसं, ‘‘करिअरमधल्या ताणतणावांतून मुक्त होण्यासाठी ‘विंटर लडाख’ सारखे अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स मला खूप आनंद देतात. आयुष्यातले छोटे छोटे आनंद टिपण्याची वृत्ती मला खूप मोलाची वाटते. एखाद्या प्रवासात मला सूर्योदय बघायला मिळतो. मी आनंदते, कारण उगवणारा सूर्य माझ्यासाठी जगण्यासाठी निखळ ऊर्जा घेऊन येतो. तर मावळणारा सूर्य मला उद्याची नवी आशा देऊन जातो!’’
स्त्रीची ही संवेदनशीलताच तिच्या आनंदी जगण्याची किल्ली आहे आणि बदलत्या स्त्रीची गुरुकिल्ली!

ढेपाळलेली स्त्री चांगलं काम करू शकत नाही. कामातील नैपुण्याचे अनेक पैलू आहे. स्वत:कडे पुरेसं लक्षं देणं, त्यासाठी वेळ देणं, टापटिप राहणं, कामावरही तसंच राहणं, स्वत:वर काही नियमांचं बंधन घालणं या सर्वातून एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. एकदा अशी नीटनेटकं राहण्याची सवय जडली की मग ती आपली गरज ठरते.
    मनीषा म्हैसकर, सचिव (नगरविकास खाते)

‘‘करिअरमधल्या ताणतणावांतून मुक्त होण्यासाठी ‘विंटर लडाख’सारखे अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस् मला खूप आनंद देतात. आयुष्यातले छोटे छोटे आनंद टिपण्याची वृत्ती मला खूप मोलाची वाटते. एखाद्या प्रवासात मला सूर्योदय बघायला मिळतो. मी आनंदते कारण उगवणारा सूर्य माझ्यासाठी जगण्यासाठी निखळ उर्जा घेऊन येतो. तर मावळणारा सूर्य मला उद्याची नवी आशा देऊन जातो!’’
    रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त (ठाणे वाहतूक विभाग)

अधिकाधिक स्त्रिया आता पर्सनल ट्रेनरच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतात. चाळिशीतील संप्रेरकांच्या बदलांची दखल घेऊन योग्य ते उपचार घेतात. एवढंच नव्हे तर कामानिमित्त खूप वेळ घराबाहेर राहायची वेळ आली तर जंकफूड न खाता स्वत:जळ चॉकलेटस्, सुका मेवा वा फळं ठेवतात. एकूणच स्वत:ची आबाळ न होऊ देण्याची काळजी स्त्रिया आता घेत आहेत.
    लीना मोगरे, फिटनेस ट्रेनर

स्किन केअर, हेअर केअरसारखे शब्द आता पार जुने झाले आहेत. आता जमाना ‘मेकओव्हर’चा आहे. हे ‘मेक ओव्हर’चं भान आपली इमेज न बदलण्याची काळजी घेत एखादी आयएएस अधिकारी, प्राध्यापिका वा डॉक्टरसुद्धा ठेवते. आणि तसाच मेकओव्हर करण्याचा मागणी करते. कारण अशी सौंदर्याची जपणूक सकारात्मक ऊर्जा प्रदान करते.
    माया परांजपे, सौंदर्यतज्ज्ञ

आजच्या तरुणी एकेकटय़ा वुमेन्स स्पेशल सहलींवर जाणं पसंत करतात. कारण आता प्रत्येकीला ‘स्पेस’ हवी आहे. मग ती घरात नाही मिळाली तर कॉफी शॉपमध्ये किंवा जिममधल्या तासभराच्या वर्कआऊटमधून मिळाली तरी ती चालते. पिढय़ान्पिढय़ांची ही दबलेली गरज आज उफाळून वर येताना दिसत आहे.
    वीणा पाटील, व्यवस्थापकीय संचालक आणि संस्थापक (वीणा वर्ल्ड)

आपल्या मूल्यांशी व विचारधारेशी तडजोड न करता आपण जगायचं असं एकदा आपण निर्णय घेतला की काम करताना कितीही दबाव आले तरी योग्य निर्णय घेण्याची व परिणामांना सामोरं जाण्याची ताकद व सकारात्मक दृष्टिकोन आपल्यात आपोआप येतो!
    अश्विनी जोशी, जिल्हाधिकारी  (ठाणे)

वृद्धत्व शाप नाहीच
एकविसाव्या शतकातील स्त्री घर, मुलं, संसार आणि तिचं करियर अशा अनेक 02आघाडय़ांवर उभी आहे. अर्थात तिचं हे ‘उभं’ राहणं जगाच्या दृष्टीने तिची अचिव्हमेंट आहे, पण तिच्यासाठी ही तारेवरची कसरतच आहे. हे कसरत करण्यात कस लागतो तो तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा!
आर्थिक स्वातंत्र मला १८ व्या वर्षांपासून लाभलंय. पण या स्वातंत्र्यासाठीच्या माझ्या इतक्या प्रदीर्घ कारकीर्दीच्या कालावधीत मला अनेक मानसिक तणावांना सामोरं जावं लागलंय. माझं वैवाहिक आयुष्य चारचौघीसारखं कधीच नव्हतं! एशा आणि आहना यांची पालनपोषणाची जबाबदारी, त्यांना एक स्थिर आयुष्य देण्याची जबाबदारी मी मनापासून स्वीकारत गेले. त्याचा मी अगदी मनापासून स्वीकार केला आणि जीवनातील संघर्ष सोपा झाला! मानसिक द्वंद स्त्रियांचं वय वाढवतो. दिवस आणि रात्र जसं सृष्टीचे निसर्गचक्र आहे, तसंच आपल्याही जीवनाचं आहे, हे गृहीत धरलं, आशावाद मनात जागता ठेवला आणि जीवनाचा आनंदाने स्वीकार केला !
माझा फिटनेस मंत्र आहे दररोज किमान ३ लिटर पाणी पिणे. माझ्या दिनचर्येचा तो अविभाज्य भाग आहे. सकाळी ६ वाजता उठून गरम पाणी पिणे, (शरीरातील टॉक्सिन्स पाणी पिण्यामुळे शरीरात राहत नाहीत, हा माझा अनुभव आहे!) प्राणायाम – स्ट्रेचिंग हे माझे दररोजचे नित्यक्रम आहेत! माझ्या आजवरच्या निरोगी जीवनाचे रहस्य विचाराल तर सांगेन- माझं नृत्य! नृत्य हा माझा श्वास आहे! माझा स्टॅमिना टिकून राहतो तो केवळ आजवर जपलेल्या पॅशनमुळे! शाकाहारी भोजन हादेखील माझ्या नियमित आणि संतुलित जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे! मनाचा आनंद जपला तर ती प्रभा जीवनावर उमटतेच, हा माझा अनुभव आहे! माझे संचित आहे.
मुलाखत -पूजा सामंत