एड्सने आपला नवरा गेलाय आणि आपल्यालाही एचआयव्हीची बाधा झालीय हे सत्य रेणुकाताईंना कळलं त्याच वेळी त्यांच्यासाठी आयुष्य थांबलं होतं, मात्र त्यातूनही त्या जिद्दीने उभ्या राहिल्या आणि आज त्या एचआयव्हीबाधित मुलांची आई होऊन त्यांना सांभाळत आहेत. आपल्या दुखऱ्या आयुष्याला दुसऱ्यांच्या जखमा भरण्यासाठी वेचणाऱ्या रेणुका दहातोंडे यांना आमचा मानाचा मुजरा.

सुजीत, अत्यंत हुशार मुलगा. नित्यनियमानं अभ्यास करायचा. आजारी पडल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. नाकात नळ्या घातलेल्या, हाताला सलाइन लावलेलं, औषधं सुरू होती. पण अशाही अवस्थेत दहावीची परीक्षा द्यायची आहे ही त्याची जिद्द. मला जगायचंय, शिकून मोठं व्हायचंय, असं तो सारखं म्हणायचा. एचआयव्हीबाधित सुजीतला मेंदूचा क्षयरोग झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. पण जगण्याची अपार जिद्द आणि आत्मविश्वास या जोरावर तो बरा झाला. उपचारानंतर ताई त्याला पुन्हा संस्थेत घेऊन आल्या.

व्यंकटेश, हाही एचआयव्हीबाधित. समाजानं झिडकारलेला व्यंकटेश एड्स, एचआयव्हीग्रस्त मुलांसाठी नगरला संस्था आहे, असं कळल्यावर संस्थेत आला. संस्था हेच त्याचं सर्वस्व! तिथंच लहानाचा मोठा झाला; शिकला. ताईच्या मदतीने तो आज स्वत:च्या पायावर उभा राहिलाय. कंपनीत काम करतो. सुजीत, व्यंकटेश ही केवळ दोन प्रातिनिधिक उदाहरणं. अशी किती तरी एड्सग्रस्त आणि एचआयव्हीबाधित मुलं आज अहमदनगर येथील ‘स्नेहालय’ संस्थेच्या ‘स्नेहआशा’ केंद्रात इतर सर्वसामान्य मुलांबरोबर गुण्यागोविंदाने नांदताहेत. या सर्व मुलांना सांभाळण्याचं प्रसंगी त्यांची आई आणि ताई होण्याचं, या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून त्याचं पुनर्वसन करण्याचं महत्त्वाचं काम रेणुका दहातोंडे गेल्या आठ वर्षांपासून संस्थेच्या मदतीनं अखंडपणे करीत आहेत.

बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यातील सालेवडगाव हे रणुकाताईंचं सासर. लग्नानंतरचं त्यांचं आयुष्य छान आनंदात चालू होतं. आणि अचानक रेणुकाताईंचे पती आजारी पडले. त्यांना बरं वाटावं म्हणून गंडा-दोरा, ताईत, कोंबडाही कापून झाला. पण दिवसेंदिवस त्यांचं आजारपण वाढतच गेलं. मग बऱ्याच रुग्णालयांमध्ये तपासणी केली. त्यांना त्यात टायफॉइड झाल्याचं कळलं. रक्ततपासणी केल्यावर कळलं त्यांना एड्स झालाय. म्हणजे नेमकं काय झालं? काय आहे हा आजार? हे डॉक्टरांकडून समजल्यावर रेणुकाताई गर्भगळीत झाल्या. महिनाभरातच पतीचं निधन झालं. हा रोग आपल्याला होऊ शकतो याची कल्पना आल्यानंतर त्यांनी स्वत:हून रक्ततपासणी केली. त्यात त्याही एचआयव्हीबाधित असल्याचं निदान डॉक्टरांनी केलं.
तो क्षण रेणुकाताईची सत्त्वपरीक्षा पाहणारा होता. त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.. न केलेल्या चुकीची किंमत त्यांना आता आयुष्यभर चुकवायला लागणार होती. एका रात्रीत त्याचं आयुष्य आमूलाग्र बदलून गेलं. आपली म्हणणारी माणसंही दुरावत गेली. सासरची माणसं रेणुकाताईंनाच दोष देत होती. त्यांच्या पतीचा दोष होता आणि त्यांच्याचमुळे रेणुकाताईंना ही बाधा झाली याचा जणू त्यांना विसर पडला. पण रेणुकाताईंची आई, वडील, भाऊ, बहीण यांना मात्र त्यांची काळजी वाटू लागली. त्यांच्या वडिलांनी चौकशी केल्यावर ‘स्नेहालय’ संस्थेविष़ी कळलं आणि त्या ‘स्नेहालय’च्या स्नेहदीप रुग्णालयात दाखल झाल्या. दहा महिने त्या अंथरुणाला खिळून होत्या. रुग्णालयातल्या सगळ्यांनीच त्यांची मनापासून सेवा केली. त्यांच्या या नि:स्वार्थी प्रेमानं आणि आपण यातून निभावून जाऊ शकतो या विश्वासावर त्यांना आपल्या जगण्याची उमेद वाटू लागली. पण आपलं भवितव्य काय.. तिथे त्यांना काळोखच दिसत होता. संस्थेतल्या अनिल गावडेंना त्यांचं हे दु:खं जाणवलं. रेणुकाताईंना या निराशेतून बाहेर काढायलाच हवं होतं. त्यांनी त्यांना दाखवले, समोरच खेळणारे एचआयव्हीबाधित मुलांचे हसरे चेहरे, जीवनऊर्जेच्या बळावर मनसोक्त खेळणारे.. जसं आहे तसं आयुष्य भरभरून जगणारे.. समजावलं की, ‘ती लहान मुलं आहेत. त्यांना माहीतही नाही त्यांना काय आजार आहे तो. त्यांना तू आपलंसं केलंस. त्यांची होऊन राहिलीस तर त्यांनाही आधार मिळेल आणि तुलाही..’ त्यांचे शब्द रेणुकाताईंना स्पर्शून गेले आणि त्यांना जगण्याचा मार्ग सापडला..
भीड चेपल्यावर रेणुकाताई संस्थेतील भोजनशाळेत काम करू लागल्या. अगदी स्वयंपाक करण्यापासून ते भांडी घासणं, साफसफाईपर्यंत. हळूहळू तिथल्या मुलांशी गप्पागोष्टी सुरू झाल्या. त्यांच्यातलं अंतर दूर व्हायला लागलं आणि मुलंही त्यांच्याशी इतकी मिसळून गेली की परकेपण केव्हा नाहीसं झालं ते कळलंही नाही. कुणाच्या त्या आई झाल्या तर कुणाच्या ताई. त्यांचं सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणं लक्षात घेऊन संस्थेचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी त्यांना मुंबईला चाइल्ड डेव्हलपमेंटच्या एक वर्षांच्या अभ्यासक्रमासासाठी पाठवलं. त्या ७३ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्या . आता त्या प्रशिक्षित होत्या.. या एचआयव्हीबाधित मुलांसाठी ठोस काही करू शकणार होत्या..

ch14
स्नेहालय संस्थेतील स्नेहआशा केंद्रातील मुलांसमवेत रेणुकाताई दहातोंडे.

एड्सग्रस्त आणि एचआयव्हीबाधित मुला-मुलींचं, मोठय़ांचं समुपदेशन ही एक जिकिरीची गोष्ट असते. अनेकांना आपण याचे शिकार झालेले आहोत हे किंवा आपला मृत्यू स्वीकारणं शक्य होत नाही. २५ ते ३५ वयोगटातील अनेक मुली-महिला निराश मन:स्थितीत अश्रू ढाळत बसतात. त्यांना समजवताना त्या सांगतात, ‘कोणीच अमरत्व घेऊन आलेलं नाही. एड्स असो नाही तर नसो सगळ्यांनाच एके दिवशी मरायचं आहेच. मग प्रत्येक क्षण अर्थपूर्ण आनंदानं जगायला काय हरकत आहे?’ त्या सगळ्यांना अशी जगण्याची उमेद देतात.

संस्थेत नगरला परतल्यावर एचआयव्हीबाधित मुलांसाठी असलेल्या ‘स्नेहआशा’ केंद्रात त्यांची गृहमाता म्हणून नेमणूक करण्यात आली. गेली आठ वर्षे त्या एचआयव्हीबाधित मुलांसाठी काम करतात. सध्या या केंद्रात १६ एचआयव्हीबाधित व १३ सर्वसामान्य मुलं एकत्र राहत आहेत. एचआयव्हीबाधित मुलांना खरी गरज असते ती प्रेमाची, आपुलकीची. खरं तर रेणुकाताई १२ ते १८ वयोगटांतील एचआयव्हीबाधित मुलांसाठी काम करतात. पण एकदा चार वर्षांच्या मृण्मयीला ती एचआयव्हीबाधित असल्याचं समजल्यावर तिच्या पालकांनी संस्थेत आणून सोडलं. साहजिकच तिला रेणुकाताईंकडे सोपवलं गेलं. छोटी मृण्मयी या मुलांमध्येच असायची. केंद्रातल्या दिनेशला ती रोज रेणुकाताईंच्या कुशीत झोपलेलं बघायची. एक दिवशी ती रेणुकाताईंजवळ आली. म्हणाली, ‘मलाही तुमच्या जवळ झोपायचंय.’ तिला हवं असलेलं प्रेम, आपुलकीचा स्पर्श रेणुकाताईंना जाणवला आणि तेव्हापासून त्यांच्या कुशीत ती गाढ झोपी जायची. मृण्मयीच्या मामानं तिला संस्थेत दाखल करताना, ‘ही फार जगायची नाही. मरेल लवकरच,’ असं भाकीत केलेलं होतं. पण आज मृण्मयी संस्थेच्या शाळेत चौथीत शिकते आहे. एक आयुष्य मार्गी लागलं आहे..

संस्थेतल्या या मुलांना वेळवर उठवणं, नाश्ता देणं, वेळप्रसंगी अंघोळ घालणं, त्यांना शाळेत पाठवणं, क्लासला नेणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्या औषधांच्या वेळा सांभाळून त्यांना औषध देणं, कधी कोणी आजारी पडलं तर त्याला रुग्णालयात दाखल करणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना विविध प्रकारचे खेळ शिकवणं आणि वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणं हे सारं काही रेणुकाताई करतात. ही सगळीच मुलं जणू अनाथच आहेत. कुणाचेही पालक त्यांना ना उन्हाळ्याच्या सुट्टीत न्यायला येत ना दिवाळीच्या. काही मुलांच्या पालकांचा ठावठिकाणाही माहीत नसतो. पोलिसांनीच त्यांना संस्थेत दाखल केलेलं असतं. त्या मुलांना सणांचा आनंद उपभोगता यावा म्हणून रेणुकाताई दिवाळी व इतर सुट्टीत विविध कार्यक्रम आयोजित करतात. संपूर्ण केंद्राची सजावट ही मुलं करतात आणि काही दिवस वेगळ्या आनंदात घालवतात.
रेणुकाताईंनी मृत्यू खूप जवळून पाहिला आहे. नवऱ्याच्या निधनानंतर स्वत:चाही मृत्यू समोर दिसत असताना त्या ‘स्नेहालया’त आल्या आणि त्यांना नवजीवन मिळालं. पण ‘स्नेहालया’तही मृत्यू त्यांच्या आजूबाजूला असतोच. एड्स झालेल्या किती तरी बालकांचा मृत्यू अगदी त्यांच्या हातात झाला आहे. पण या बाबतीतही त्यांना माणुसकीहीन अनुभव येतोच. मृत्यूच्या अगदी दारात असलेल्या मुलांच्या पालकांशी जेव्हा त्या संपर्क साधून त्यांना बोलावून घेतात तेव्हा निराशाच पदरी येते. ‘तुमचा मुलगा गंभीर आहे. त्याच्या शेवटच्या दिवसात तरी तुम्ही त्याच्या जवळ राहा,’ अशी विनवणी करूनही पालक येत नाहीत. इतकंच कशाला मुलाचा मृत्यू झाल्यावर पालकांशी संपर्क साधला तरी ‘तुम्ही त्यांचे अंतिम संस्कार करा, आम्हाला येणं शक्य नाही,’ अशी उत्तरं जन्मदात्या आई-वडिलांकडून कधी पालकांकडून मिळतात. मग रेणुकाताई आणि संस्थेतील स्वयंसेवकच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतात. आपल्याबरोबरचा, लळा लागलेला एक मुलगा असा अचानक कायमसाठी निघून जातो हे पाहणं, अनुभवणं प्रत्येक वेळी रेणुकाताईंसाठी कठीण जातं.

संस्थेतली अर्धीअधिक मुलं ही एचआयव्हीबाधित आहेत तर उरलेली नॉर्मल. त्यामुळे या मुलांना स्वत:ची काळजी घेण्याचं योग्य प्रशिक्षण दिलं जाणं गरजेचं असतं त्याची योग्य खबरदारी रेणुकाताई घेतात. सगळीच मुलं एकत्र खेळतात. पण खेळताना एचआयव्हीबाधित मुलाला लागलं, जखमेतून रक्त आलं तर तो नॉर्मल मुलाला लांबच ठेवतो. लगेचच केंद्रात जातो. रेणुकाताई, तेथील डॉक्टर्स किंवा स्वयंसेवक त्याला मलमपट्टी करतात तर कधी तो स्वत:च मलमपट्टी करतो आणि पुन्हा खेळायलाही जातो. नॉर्मल मुलांबरोबर ही मुलं शाळेत, कॉलेजातही जातात. या मुलांची सहलही रेणुकाताई काढतात. एचआयव्हीबाधित असणं हे काही जग पाहण्याचा, निसर्गाचा आनंद लुटण्याच्या आड येऊ शकत नाही, हे रेणुकाताई आणि संस्थेतील सगळेच जाणतात.

आज रेणुकाताई काम करीत असलेल्या ‘स्नेहआशा’ केंद्रातील १४ एचआयव्हीबाधित मुलं आपल्या पायावर उभी राहिली आहेत. कोणी कंपनीत, कोणी डबे पोहोचविण्याचं काम करतात. वयाच्या १८ वर्षांनंतर या मुलांना संस्थेच्या ‘हिंमत ग्राम प्रकल्पात’ पाठवलं जातं. तिथं राहून ही मुलं इच्छा असेल तर संगणक वा इतर व्यवहारविषयक अभ्यासक्रम करतात. तर काही जण संस्थेतच काम करतात. त्यानंतर या मुलांची इच्छा असेल तर त्यांच्या विवाहाची जबाबदारीही संस्था घेते. आज एचआयव्हीबाधित तीन जोडपी ‘हिंमतग्राम’ प्रकल्पात राहून आपापल्या परीनं आनंदानं जगताहेत.
एड्सग्रस्त आणि एचआयव्हीबाधित मुला-मुलींचं, मोठय़ांचं समुपदेशन ही एक जिकिरीची गोष्ट असते. अनेकांना आपण याचे शिकार झालेले आहोत किंवा आपला मृत्यू स्वीकारणं शक्य होत नाही. २५ ते ३५ वयोगटातील अनेक मुली-महिला निराश मन:स्थितीत अश्रू ढाळत बसतात. त्यांना समजवताना त्या सांगतात, ‘कोणीच अमरत्व घेऊन आलेलं नाही. एड्स असो नाही तर नसो सगळ्यांनाच एके दिवशी मरायचं आहेच. मग प्रत्येक क्षण अर्थपूर्ण आनंदानं जगायला काय हरकत आहे?’ त्या सगळ्यांना जगण्याची उमेद देतात.

इथे येणाऱ्या प्रत्येक मुलाला प्रेमाचा आधार हवा असतो. नव्यानं केंद्रात आलेला मुलगा सुरुवातीच्या काळात गप्प गप्पच असतो. एकाकीच राहतो. त्याला बोलतं करणं, सगळ्यांशी परिचय करून देणं, अशा गोष्टी करून त्या त्याच्यात विश्वास निर्माण करतात. लहान मुलांपेक्षा किशोरवयीन, तरुण मुलांना समजून घेणं, त्यांच्या कलेनं वागून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम अनेकदा आव्हानाचं असतं. पण आता तेही काम त्या जिव्हाळ्यानं करतात.
सामान्य माणसांनीही अशा मुला-मुलींना आपलं म्हणावं, निदान भेदभाव करू नये, हेच त्यांचं लोकांकडून मागणं आहे. म्हणूनच रेणुकाताईंनी आपलं भागधेय ठरवलंय. एड्सग्रस्त आणि एचआयव्हीबाधित मुला-मुलींसाठीच मी आयुष्यभर काम करणार आहे, असा त्यांचा निर्धार आहे. कारण याच संस्थेत त्यांना खरी नाती सापडली, प्रेम, जिव्हाळा सापडला. तोच इतरांनाही मिळावा यासाठी आता त्यांची धडपड सुरू आहे.. आणि ती अखंड चालू राहणार आहे.
(या लेखातील मुलांची नाव बदलली आहेत.)
(संपर्क क्रमांक : ७३५०८९३००३)
शिल्पा रसाळ – shilpa.rasal1@gmail.com