12 August 2020

News Flash

समानतेच्या नावाने चांगभलं!

जवळ जवळ गेली २० र्वष मी ज्ञान प्रबोधिनीचं काम ग्रामीण स्त्रियांसाठी करण्याच्या निमित्तानं ग्रामीण भागात फिरते आहे

chatu1स्त्रियांमधील शिक्षणाचे, सुधारणेचे वारे महानगरांतून निमशहरांकडे जोराने वाहताना दिसत आहेत. तेथील स्त्रियांनाही आपली अस्मिता खुणावते आहे. आपण शिक्षण घेतले, कमावते झालो तर आपल्या शब्दांना किंमत मिळते हे ती प्रत्यक्ष अनुभवत आहे. राजकारणातील प्रवेशापासून बचत गटांतल्या उद्योगिनीपर्यंतची तिची झेप यात आता काही औत्सुक्यही उरले नाही. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या अजूनही महानगरांबाहेरच आहे. त्यामुळे तेथील स्त्रीचा विकासही तेवढाच महत्त्वाचा. रूढीपरंपरेत पिचलेली ही आजची स्त्री हळूहळू का होईना त्यातून बाहेर पडते आहे. तिने बाहेर पडावे यासाठी शहरातल्या स्त्रियांनीही तिला मदतीचा हात, विचारांची साथ द्यायला हवी. त्यांना शिकवायला हवे. कारण सुधारणेला खूप खूप वाव आहे. येत्या ८ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामीण, निमशहरी स्त्रियांची मानसिकता दाखवणारा एक लेख आणि स्वच्छता अभियानातील तिचा ठसठशीत सहभाग दाखवणारा दुसरा लेख.. स्त्रियांची ताकद आणि तिच्या स्वप्नांना जागवले तर तिच्यात देश बदलण्याची ताकद आहे, हेच दाखवणारा. सगळ्यांनाच महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

जवळ जवळ गेली २० र्वष मी ज्ञान प्रबोधिनीचं काम ग्रामीण स्त्रियांसाठी करण्याच्या निमित्तानं ग्रामीण भागात फिरते आहे, ‘ती’च्या सोबत राहाते आहे, वावरते आहे, एवढंच काय पण ‘ती’च्या सोबतच मीही वाढते आहे. मी थोडीफार शिकले आणि लहान वयापासूनच शिकलेल्या माणसांमध्येच वावरले, त्यामुळे मला अनेकदा ग्रामीण स्त्रियांची खरी परिस्थिती कळायला खूप अवघड गेलं. अनेकदा असं लक्षात आलं की आम्हाला एकमेकींचं बोलणंच समजत नाही. भाषा येत नाही हे कारण नव्हतं तर असं का बोललं, वागलं जातं आहे ते न समजल्यानं..सारं घडत होतं!

असं कोडय़ात सांगण्यापेक्षा उदाहरणच देते. म्हणजे, एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात मला गावातल्या स्त्रियांनी ‘बसा’ म्हटलं की मी पटकन खुर्चीवर बसायची. पण ती खुर्ची कार्यक्रमाला येणाऱ्या एखाद्या पुरुषासाठी बायांनी मुद्दामहून आणलेली असायची आणि मी स्त्री असल्याने त्यावर बसणं त्यांना अपेक्षित नसायचं. सरपंच म्हटलं की त्यांना केवळ पुरुषच माहिती असायचा, त्या उलट मी विचारायची, ‘‘सरपंच बाई आहे का पुरुष?’’ त्यांना आश्चर्य वाटायचं. एकदा मी माझ्या स्कूटरवर एका स्त्री बँक मॅनेजरला घेऊन गेले नि बचत गटातल्या स्त्रियांना ओळख करून दिली तर त्या हसायलाच लागल्या. ‘‘काय झालं?’’ विचारलं तर म्हणाल्या, ‘‘बाया कुठे बँकेत साहेब असतात होय? अडाणी पडलो म्हणून काही पण मजा करतेस होय आमची!’’ असं एकदा नाही, दोनदा नाही तर अनेकदा झालं! पण माझं एरवी त्यांच्यात मिसळणं इतकं प्रामाणिक असायचं की माझ्या तोंडावर सुद्धा असं सारं बोलायला त्यांना काही संकोच वाटायचा नाही. असं काही घडलं की मी विचार करायची का बरं एकमेकींचं समजायला वेळ लागतोय? तर उत्तर होतं की माझ्या मनातली नि त्यांच्या मनातली गृहीतकंच वेगळी होती. मी स्त्री-पुरुष समानता अनुभवत वाढले, पण त्यांच्यासाठी मात्र समानता ही केवळ स्वप्नातली एक कल्पना होती. त्यांच्या मुलांसाठी समानता हे केवळ नागरिक शास्त्रातल्या पुस्तकातलं मूल्य होतं, त्याचा व्यवहाराशी काहीही संबंध नव्हता. बचत गटाच्या निमित्तानं गावात अगदी नियमित जाणं व्हायचं तेव्हा खूप गप्पा व्हायच्या. मग निवडणूक आली की मी सांगायची, ‘‘कोणालाही द्या गं, पण मत द्या! तुम्ही ठरवा कोणाला द्यायचं ते, पण मत द्या! हा तुम्हाला मिळालेला हक्क आहे!’’ एरवी कर्तव्याच्या गोष्टी ऐकणाऱ्या या बायांना हक्काच्या गोष्टी प्रथमच ऐकायला मिळायच्या. १९९५ नंतरची गोष्ट मी सांगते आहे  म्हणजे स्वातंत्र्य मिळून अवघी ४८ र्वषच झाली होती. त्यांना प्रश्न पडायचा ‘मत कोणाला द्यायचं हे तर नवरा ठरवतो, मग मी कसं ठरवणार?’ हे तिच्यासाठीचं वास्तव होतं. घर-नवऱ्यात ‘ती’ इतकी गुरफटलेली असते की स्वत:चं ‘त्याच्या’ शिवायचं अस्तित्वही ती कल्पू शकत नाही. आमची शकू रिकामटेकडय़ा नवऱ्याला पोसायची. तीच कमवायची नि घरी आल्यावर दारूला पैसे देत नाही म्हणून नवऱ्याचा मारही खायची. कशासाठी तर तिचा संस्कार होता ‘पती परमेश्वर!’ कशी समजणार तिला समानता? एकदा मी एकीला म्हटलं, ‘‘एवढी खपतेस, तर चार पैसे बँकेत का नाही ठेवत? तुझ्यापाशी पैसे नसलेच की तो कसे घेईल? बँकेत खातं काढून तुझे पैसे सुरक्षित का ठेवत नाहीस?’’ तर तिचा प्रश्न, ‘‘ताई खातं काढायचं तर फॉर्म भरावा लागणार ना? त्यात माझं नावं लिहावं लागणार. मग बँकेला कळणारच ना तो माझा नवरा आहे. इथे निदान मी पैसे देते, मला कळतं तरी किती दिले. त्याने बँकेतून परस्परच काढले तर किती काढले ते कळणार पण नाही.’’ मग तिला उपाय म्हणून ‘एकटीचं खातं काढ’ असं सांगितलं. तरी तिचं पुन्हा तेच म्हणणं, ‘‘ताई माझं पूर्ण नाव.. त्याचं नावं लिहिल्याशिवाय पूर्ण होतच नाही. मग?’’ परत तिला समजावल्यावर माझ्या लक्षात आलं की ती स्वत: एक स्वतंत्र व्यक्ती आहे हेच तिला    समजत नाहीये. तिच्या मनात ‘ती’ म्हणजे ‘त्याची बायको.’ शेवटी बँकेच्या कामाची पद्धत समजावत तिला सांगितलं, की भले तो तिचा नवरा असू दे, पण तिच्या सहीशिवाय तिच्या एकटीच्या खात्यातून तो दमडीसुद्धा काढू शकणार नाही. हे मी सांगितलेलं कानानं ऐकू आलं तरी तिला मनातून पटतच नव्हतं, म्हणून समजत नव्हतं. परत तिचा प्रश्न, ‘‘असं कसं? एखाद्या वेळी नडीला मीच त्यांना पैसे आन म्हटलं तरी बँक देणार नाही माझे पैसे त्यांना? त्यासाठी सुद्धा माझी सही लागेलच का?’’ ती तर अशा परिस्थितीची कल्पना सुद्धा करू शकत नव्हती. सारं जगणंच नवऱ्याभोवती गुंफलेलं असल्याच्या मानसिकतेतून मुक्तता अशा एखाद्या ५-१० मिनिटांच्या चर्चेतून होत नाही. मी तिला पुन्हा पुन्हा ‘हो!’ ‘हो!’ असंच सांगत होते. शेवटी ती एकदाची समजून बोलल्यासारखं म्हणाली, ‘‘मंजे मी साहेबीन होणार! माझ्या सहीवाचून अडणार! मी त्यांच्या पासून मोठ्ठी होणार!’’ हे ऐकल्यावर मला समजलं की मला काय म्हणायचं आहे ते तिला आता नक्की समजलं! बुद्धीनं पटलं तरी ‘ती’चं मन मानत नव्हतं, नुसत्या या कल्पनेनेही ती हुरळून गेली.

अशीच एकदा बचत गटात जन्मतारखेबद्दल चर्चा सुरू होती. अनेकींना त्यांची जन्मतारीखसुद्धा माहीत नसते.  मला बसलेल्या धक्कय़ाचं नवल वाटून तर एक जण सहज म्हणाली, ‘‘कशाला कोण लक्षात ठेवेल आम्ही कधी जन्मलो ते? मुलगी ना.. कधी एकदा जाते ही पिडा असंच म्हणत वाढवलं मला घरच्यांनी.’’ तिच्या बोलण्यात बालपणाची एकही सुखद आठवण नव्हती! एरवी जन्मतारीख आणि वाढदिवस हे मला समानार्थी शब्द वाटायचे. पण ग्रामीण स्त्रियांनी मला शिकवलं की जन्मतारीख ही माहिती भरताना लागते आणि वाढदिवस माहीत असणं ही सुखकर गोष्ट..साजरा करण्याशी संबंधित आहे! अशी एखादीची जन्मतारीख घरात कोणाला तरी माहिती असणं म्हणजे ‘अस्तित्वात आहे’ हे स्वीकारण्याची पहिली पायरी आहे हे मला नव्याने त्यांच्यासाठी काम करताना समजलं.

एका गावातली बचत गटाची पहिलीच बैठक होती. मी गटात आलेल्या स्त्रियांची नावे लिहीत होते. गावात एकाच आडनावाची बरीचशी कुटुंबं असतात हे एव्हाना मला माहिती झालं होतं. पण नाव लिहिताना माझ्या लक्षात आलं की, मधलं नाव नि आडनाव हे दोन्हीसुद्धा एकच आहे, अशा दोघी जणी आहेत. ‘बरोबर आहे ना?’ मी शेजारचीला विचारलं. तर ती सहज म्हणाली, ‘‘त्या सख्या बहिणी सवती-सवती आहेत.’’

आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात ‘सवत’ हा शब्द फक्त चित्रपटात, गोष्टीत नाहीतर वर्तमानपत्रातल्या बातम्यांत ऐकला होता. द्विभार्या प्रतिबंधक कायदा तर १९५६ मध्येच झाला होता. पण गटात बसलेल्या या सवती खऱ्या होत्या. काही कारण नसताना उगाचच मला अपराधी वाटायला लागलं. या मानसिक धक्कय़ातून सावरायला मला २-४ दिवस लागले. मग मी पुन्हा गृहभेट द्यायचं ठरवलं. मोठी भेटली. त्या दोघी एकाच घरात शेजारी शेजारी राहात होत्या. थोरली म्हणाली, ‘‘लग्नाला ३ र्वष झाली, मला मूल होत नव्हतं. मग उगाच चर्चा सुरू झाली. दुसरं लग्न करायची बोलणी सुरू झाली. मग मीच म्हटलं माझ्याच बहिणीशी तरी लग्न कर, म्हणजे मी तरी जगू शकीन.’’ तोच दोघींना पोसतो. दुसरीला तीन मुलं झाली. त्यामुळे पहिली तिच्याच घरात क्षुद्र झाली. मी न राहावून तिला विचारलं, ‘‘दवाखाना केला का?’’ त्यावर ‘देवाकडं गेलो होतो, खूप उपास केले. पण तरी काही घडलं नाही. तेव्हा ते मुंबईला होते. दुसरं लग्न केल्यापासून इथेच असतात, पण तेव्हापासनं माझ्याकडे येनच टाकलं त्यांनी.’’ माझा प्रश्न आणि तिचं उत्तर कुठेच जुळत नव्हतं. तिचा नवराही इथे राहात नव्हता आणि उपासानं मूल व्हावं असं तिला वाटत होतं. ती सांगतच होती, ‘‘..गटामुळे मला आता चार बायकांत यायची संधी मिळाली. मी ही ‘अशी’, मग लग्न कार्यात कशी जाणार? कष्ट हेच आता माझं जगनं झालंय, गटानं जगण्याला पालवी आली. या गटात जेवढे पैसे आहेत तेवढीच माझी इस्टेट.’’ ती सांगतच होती, पुस्तकातल्या २००-२५० रुपयाचं तिच्या आयुष्यातलं महत्त्व! तोवर मला वाटत होतं की मी एका आर्थिक उपक्रमाची रचना उभी करते आहे! या तपशिलातल्या मुलाखतीनं मला ‘ग्रामीण स्त्रिया’ अजून अस्तित्वाचीच लढाई कशी कशी लढत आहेत हे शिकवलं. या अशा घटनांवर एखाद्याच्या आयुष्याचं ‘अस्तित्व’ अवलंबून असणं हे माझ्या समजेबाहेरचं होतं! समानता तर त्यांच्यापासून कोसोदूर असणं स्वाभाविकच नाही का?

जिथं अस्तित्वच पणाला लागलेलं असतं, तिथं ‘ती’च्या मनात उपकृततेची भावना असणं स्वाभाविक असतं. ही भावना इतकी प्रबळ असते की मग मारणाऱ्या नवऱ्यासोबत संसार करताना अगतिकतेपोटी ‘ती’ कधी बंड करून उठत नाही. मला सांगा अशा विचारानं नि अस्तित्वानं व्यापून गेलेल्या ‘ती’ला कशी शिकवायची समानता? लोकशाही यशस्वी होण्यासाठी आधी ‘माणूस’पणाकडे प्रवास व्हायला हवा ना? त्याचा विचार करू. कारण लोकशाहीचं आधारभूत मूल्य समानता शिकवणं ही केवळ शाब्दिक कसरत नाही तर समानता शिकणं ही अनुभवाशी संबंधित गोष्ट आहे, हेच आपण ‘शिकलेली’ मंडळी एव्हाना विसरून गेलो आहोत!

– सुवर्णा गोखले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2016 1:29 am

Web Title: womens day special artical womens equality
Next Stories
1 स्वच्छतेची सप्तपदी
2 ‘कर्ती करविती’ बोलती होणार..
3 प्रिंटिंग मशीन…
Just Now!
X