20 March 2019

News Flash

मार्च एन्ड सिन्ड्रोम

आर्या ही पंचेचाळिशीच्या आसपासची स्त्री!

‘जेव्हा शिकत होतो तेव्हा परीक्षेमुळे मार्च महिन्याची भीती असायची आणि आता कमवायला लागलोय तरी मार्च महिन्याची भीती आहेच.’ हे उद्गार वरकरणी गमतीदार वाटले तरी वास्तवात मार्च महिना किंवा ‘मार्चअखेर’ हा काळ अनेकांसाठी संयमाची कसोटी पहाणारा असतो, स्त्रियांसाठी सर्वाधिक. कारण, त्यांना दुहेरी कसरत करावी लागते. घरी आणि कार्यालयातही. एकीकडे कामाचा प्रश्न असतो तर दुसरीकडे नातेसंबंधांचा प्रश्न असतो. आजच्या ‘मार्च एन्ड’च्या निमित्ताने अनेक नोकरदार स्त्रियांशी बोलणं झालं तेव्हा त्यांची ही ठसठसती जखम उघडी पडली.

आर्या ही पंचेचाळिशीच्या आसपासची स्त्री! मुंबईत एका कॉर्पोरेट बँकेत ‘असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट’ या हुद्दय़ावर आहे. तिच्या मते ‘मार्च एन्ड’ च्या सगळ्या व्यवहारांसाठी उशिरापर्यंत बँकेत थांबावं लागणं हे विशेष नाही. तिला वर्षभरात अनेकदा कामानिमित्त उशिरापर्यंत थांबावं लागतं. पण ‘मार्च एन्ड’ तिच्यासाठी आणखी वाढीव तणाव घेऊन येतो. कारण तिच्या दोन्ही मुलांच्या परीक्षा तोंडावर आलेल्या असतात किंवा सुरू असतात. नेमका या महत्त्वाच्या दिवसांमध्येच तिचा मुलांशी प्रत्यक्ष संवाद होऊच शकत नाही. अनेकदा तिला त्यांच्या मेसेजेसना उत्तरही द्यायला वेळ नसतो. ती उशिरा रात्री परतते तेव्हा मुले झोपलेली असतात किंवा अभ्यासात असतात. थकलेल्या मनाने आणि देहाने उसनं अवसान आणून त्यांच्याशी अभ्यासाविषयी, प्रोजेक्टविषयी काही बोलावं म्हटलं तर फार संयम ठेवावा लागतो. त्यांच्यावर बरेचदा कारण नसताना रागावणं होतं. त्यामुळे मुलंही तिच्याशी बोलणं टाळू लागतात. लहानपणापासून आईनेच अभ्यास घेतला असल्यानं मुलांचं याबाबतीत वडिलांशी फार जमत नाही. एकंदरीत ऐन परीक्षेच्या मोसमात आपण मुलांना न्याय देऊ  शकत नाही, याची टोचणी तिच्या मनाला सतत लागून असते. आणि ती टोचणी ठेवून कामातही नीट लक्ष पुरवावं लागतंच.

अनन्या (३२) ही देखील एका कॉर्पोरेट बँकेत मोठय़ा हुद्दय़ावर काम करते. रात्री उशिरापर्यंत कामाच्या ठिकाणी थांबावे लागते तेव्हा तुमच्या सुरक्षिततेची काळजी बँक घेते का असे विचारले तेव्हा ती म्हणते, ‘‘मी मोठय़ा हुद्दय़ावर असल्याने मला ऑफिसतर्फे गाडी व चालक दिले गेले आहेत. त्यामुळे माझ्याबाबतीत रात्री उशिरा घरी परतताना फार अडचण येत नाही. पण माझ्याच हाताखाली कामाला असणाऱ्या स्त्रियांना मात्र ही सुविधा नाही. आडरात्री त्यांना उशिराच्या लोकलने उपनगरात पोहोचल्यानंतर तर काळी पिवळी टॅक्सी मिळणं देखील मुश्कील होत असे. आता त्यातल्या अनेक खासगी टॅक्सीचा पर्याय निवडतात. पण तिथेही संपूर्ण सुरक्षित वाटतं असं नाही. कारण या मुली किंवा स्त्रियांचे पगार फार नसल्याने त्या शेअर टॅक्सीचा पर्याय निवडतात. बरेचदा सहप्रवासी असणारी पुरुष मंडळी दारू प्यायलेली असू शकतात. अशा परिस्थितीत जीव मुठीत घेऊनच त्यांना घर गाठावं लागतं.’’

अनन्याने तिची आणखी एक अडचण बोलून दाखवली. ती सांगते, ‘‘मी उशिरा घरी परतताना अनेकदा माझा सामना आमच्या इमारतीमधील लोकांशी लिफ्टमध्ये वगैरे होतोच. त्यांच्या नजरा  संशयाने ग्रस्त असतात. या नजरांचा त्रास होतो. माझा नवरा, कुटुंबीय व इतर नातेवाईक या सर्वाना माझ्या कामाच्या स्वरूपाची चांगली कल्पना आहे. पण ज्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कार्यपद्धतीची कल्पनाच नसते अशांना तुम्ही कितीही समजावलं तरीही काही उपयोग नसतो. मला अनेकदा सुटीच्या दिवशीही बँकेत जावं लागतं. ‘रविवारी कसली आलीय बँक?’ असल्या चीड आणणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणं मी आता सोडून दिलं आहे. अशा महाभागांना टाळणं किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हेच मी करू शकते.’’

मनीषा ही ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’त कर्मचारी पदावरील तरुणी सांगते, ‘‘खाजगी बँकांच्या मानाने पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग (पीएसयू) बँकांमध्ये मार्च महिना किंवा एरवीसुद्धा कामाचा भार कमी असतो. पण हे देखील शाखा निहाय वेगवेगळं असतं. काही शाखा गर्दीच्या, मोठय़ा शहरांतल्या असल्या की अर्थातच कामाचा भर अधिक असतो. तुम्ही जसजसे वरच्या पदावर जाल तसतसा भार अधिक वाढत जातो. मी तालुक्याच्या ठिकाणीही काम केलंय. बराच वेळ अडाणी, अशिक्षित माणसे त्यांच्या आर्थिक गरजांसाठी आलेली असतात. आम्हालाही आमची मार्च एन्ड टार्गेट पूर्ण करणे गरजेचे असते. अशा वेळी अतिशय संयमाने त्यांचं ऐकून घेऊन त्यांच्या अडचणी सोडवताना अनेकदा खूप वेळपर्यंत बँकेत थांबावं लागतं. पण घरी जाताना त्या माणसांचे आनंदी चेहरे डोळ्यांपुढे तरळले की आपल्या अडचणी फार क्षुल्लक वाटू लागतात.’’

या तिघींच्या मानाने अर्पिता (३०) निवांत आहे. कारण ती एका सहकारी बँकेत काम करते. तिथे ‘क्लस्टर हेड’ म्हणून जरी काम करत असली तरीही तिथलं ‘वर्क कल्चर’ हे कॉर्पोरेट बँकांसारखं नाही. ‘‘आम्हाला कधीही सातच्या पुढे थांबवून ठेवलं नाही. जर कधी क्वचित थांबावं लागलं तर आमचे वरिष्ठ आमच्या सुरक्षित घरी पोहोचण्याची काळजी घेतात. आता तर प्रायव्हेट टॅक्सी आल्याने सोय झाली आहे.’’

काही कार्यालयांत मात्र काही वरिष्ठ अधिकारी आपल्या कनिष्ठ स्त्री सहकाऱ्यांना उशिरापर्यंत थांबवून ठेवतात. त्यांच्या घरगुती अडचणी समजून घेत नाहीत. मध्यम किंवा निम्न उत्पन्न गटातील स्त्रियांसाठी मार्च महिन्याचा अखेरचा काळ एका दु:स्वप्नासारखा असतो. मुंबईसारख्या शहरांत रात्री उशिरापर्यंत चाललेले काम आटोपून, पुढे लोकलने दूरच्या उपनगरांत आणि पुढे तिथून पायी चालत किंवा बसने अथवा रिक्षाने घरी जातात तेव्हा रात्रीचे ११-११.३० वाजून जातात. घरातली मंडळी समजून घेणारी असतील तर ठीक अन्यथा त्या बाईचे हालच होतात. कारण काही कुटुंबात खरच ते समजून घेतलं जात नाही. विशेषत: जेष्ठ पिढीकडून. नोकरीसोबत येणारे कामाचे वाढीव तास आणि ताणतणाव याविषयी क्वचित सहानुभूती दिसून येते. अनेक घरात स्त्रियाचं पैसे कमवणे गरजेचं मानलं जातच पण त्यांनी कुटुंबीयांच्या सेवेतही सदोदित राहाणं अपेक्षित असतं. अशा वेळी तिचं उशिरा येणं त्यांना आवडत नाही. काही वेळा न व्यक्त झालेला राग त्यांच्या शारीरभाषेतून कळत राहतोच. घरात एक वेगळाच ताण सतत जाणवत रहातो. अनेकदा ‘राष्ट्रीयीकृत बँकांची नियमावलीनुसार अशा तऱ्हेने उशिरापर्यंत काम करवून घेणे हा नियमभंग आहे’ असे बॉसला सांगण्याची हिंमत त्यांच्यातही नसते. आहे ती नोकरी काहीही करून टिकवायची तर हे सगळं सोसावं लागणार ही मनाची तयारी केलेली असते. या सगळ्यामध्ये तिचे ताण खूप वाढतात. ज्यांचा परिणाम अनेकदा तिच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावरही होतो. अनेकांना बँकेत नोकरी करणाऱ्यांविषयी एक वेगळीच असूया असते. यांना खूप रजा असतात. त्यांची काय मज्जा असते, असा तो सूर, पण जेव्हा कामाचा असा ताण वाढतो तेव्हा कुणाची सहानुभूती मिळत नाही. त्यामुळे ऑफिसमध्ये कामाचा भार वाढलेला आणि त्यात घरच्यांकडून कुठलंच सहकार्य नाही व मुले लहान असतील, घरात वृद्ध मंडळी असतील तर मुलांचे अभ्यास, वृद्धांची दुखणी खुपणी यामुळे ‘मार्च एन्ड’ या स्त्रियांसाठी कसोटीचा काळ असतो.

रात्री उशिरापर्यंत चालणारे कामकाज हा केवळ बँक क्षेत्रातील स्त्रियांचाच विषय नाही. आयटी (बीपीओ), टेलिव्हिजन व चित्रपट, पब्ज व हॉटेल्स, हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या स्त्रिया या सर्वासाठीच सुरक्षित प्रवास आणि कुटुंबीयांकडून सहकार्य या दोन्ही पातळीवर अनास्था दिसून येते.

विप्रा ही ३६ वर्षीय स्त्री १२ वर्षांपूर्वी एका प्रादेशिक न्यूज चॅनेलसाठी कोरोस्पॉन्डन्ट म्हणून काम करत होती. तिच्या कामाच्या वेळा सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२-१ पर्यंत अशा होत्या. कारण तिला फिल्मी पाटर्य़ाना जाऊन बातम्या गोळा कराव्या लागत. पाटर्य़ा उशिरापर्यंत चालत. लवकरात लवकर म्हटले तरीही रात्री ११पर्यंत पार्टीतून रशेस घेऊन निघायचे आणि चॅनेलच्या ऑफिसमध्ये व्हिडीओ एडिटर सोबत बसून फीड तयार करायची यात बराच वेळ जात असे. एकदा का ते सर्व नीट पार पडले की शेवटची लोकल पकडून ठाण्याला यायचे आणि तिथून बसने आपल्या घरी पोहोचेतोवर रात्रीचे अडीच-तीन वाजून जात. सुरुवातीला या क्षेत्रातलं ग्लॅमर बघून आई काही बोलली नाही. पण हळूहळू आजूबाजूचे लोक उशिरा येणारी मुलगी म्हणून हिच्याविषयी काहीबाही कुजबुजू लागले. तेव्हा मग सख्ख्या आईने जणू उभा दावा पत्करला. ‘‘आई बरेचदा दार उघडत नसे. आमच्या घराला लॅच नव्हते, त्यामुळे दुसऱ्या चावीचा प्रश्नच नव्हता. मी कित्येक रात्री इमारतीच्या वॉचमनच्या शेजारी बसून डुलक्या काढत घालवल्या आहेत. आईने नोकरी करू दिली याचंच समाधान होतं. पण प्रत्यक्ष आपलीच माणसे जेव्हा असहकार पुकारतात तेव्हा जगाला काय समजवायचे?’’ असे ती म्हणते. आता निदान प्रत्येक चॅनेल आपल्या गाडय़ा व ड्रायव्हर देतं उशिरा परतणाऱ्यांना. त्यामुळे ही समस्या फार राहिली नाही. पण तरीही चालक दारू पिऊन चालवत नाहीये ना, आपण केवळ एकटीच मुलगी आणि बाकी सारे पुरुष सहकारी असतील तर असुरक्षिततेची भावना असतेच, असेही विप्रा म्हणते.

ज्योतिका ही आता पस्तिशीत असलेली स्त्री दहा वर्षांपूर्वी जेव्हा एका चॅनेल वर न्यूज अँकर म्हणून रुजू झाली तेव्हा तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. आवडतं काम, मनाजोगता पगार आणि प्रचंड ग्लॅमर असलेल्या या क्षेत्रातले तणाव तिला तिचं लग्न होईपर्यंत जाणवलेच नाहीत. रात्री उशिरापर्यंत जरी ऑफिसमध्ये थांबावं लागलं तरी तिचा पगार आई वडिलांनाही तक्रार करू देत नसे. लग्न ठरवताना तिच्या होणाऱ्या नवऱ्याला व सासरच्या मंडळींना तिच्या या ग्लॅमरस करियरचं फारच कौतुक वाटलं होतं. पण लवकरच तिच्या या अशा कामाच्या वेळांची त्यांना अडचण होऊ  लागली कारण संध्याकाळी देखील सून सर्वाच्या सेवेसाठी धावाधाव करायला घरात नसायची. एकदा तर कहरच झाला. ती सांगते, ‘‘थोडे दिवस नवऱ्याने ऐकून घेतलं पण एकदा मी रात्री दोन वाजता घरी परतले तेव्हा त्यानेच दार उघडले. संतापाने फणफणत त्याने माझ्या एक मुस्काटात लगावली आणि माझी सुटकेस घराबाहेर फेकून देत धाडकन दरवाजा लावून घेतला.’’ ज्योतिकासाठी तिचा संसार या अवेळी घरी येण्यापायी पणाला लागला.

टीव्ही किंवा चित्रपटाचं ग्लॅमर दुरूनच बरं वाटतं. पण रात्री उशिरापर्यंत त्या बाहेर राहतात आणि हे नित्याचेच होणार आहे असे लक्ष आले की कुटुंबात कुरबुरी सुरू होऊ  लागतात. कुटुंबीयांशी समन्वय साधणे या स्त्रियांना अत्यंत जिकिरीचं होऊन जातं. चॅनेलवर रिपोर्टिंग करणारी एक तरुणी सांगत होती, ‘‘गुढीपाडव्याचा दिवस होता. आम्ही ‘सेलेब्रिटींचा गुढीपाडवा’ कार्यक्रम करत होतो. यानिमित्ताने सकाळी लवकर त्यांच्या घरी पोहोचावे लागे. त्यासाठी पहाटे उठून चॅनेल ऑफिसमध्ये जाऊन मेकअप वगैरे आटोपून कॅमेरामन सोबत घेऊन साइटवर जावे लागे. आईकडे होते तोपर्यंत काही वाटले नाही. पण सासरी मात्र घरचा सण सोडून लोकांकडे गुढय़ा काय उभारताय अशी हेटाळणी झाली. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मी, पण ज्या गोष्टीसाठी त्यांना मी आवडले होते तीच गोष्ट आता माझ्या नवऱ्याला आणि सासरच्यांना झेपेनाशी झाली होती.’’ सुनीताला आणि तिच्या नवऱ्याला तिच्या कामाच्या ‘ऑड’ वेळांपायी आपला संसार टिकवणं जमलं नाही. ते लवकरच विभक्त झाले.

सरकारी बँका, सहकारी बँका किंवा कॉर्पोरेट बँकामध्ये, बीपीओ किंवा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांत काम करणाऱ्या, टीव्ही व चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांच्या तणावाची पातळी निरनिराळी आहे. सिने-टीव्ही व कॉर्पोरेट क्षेत्रातले तणाव हे सर्वाधिक आहेत आणि स्त्रियांच्या बाबतीत तर घरातल्या जबाबदाऱ्यांची आणि अडचणींचीही त्यात भर पडते. पुरुषांच्या बरोबरीने पगार घेताय ना मग सवलती कसल्या मागताय, असला पावित्रा काही ठिकाणी घेतला जातो.

आयटी क्षेत्रातील स्त्रियांना काही कंपन्या घरून काम करण्याची सवलत देत आहेत. त्यांना हे शक्य आहे, कारण त्यांचे काम ऑनलाइन करता येणे शक्य आहे. परंतु जिथे कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर असणे अनिवार्य आहे अशा क्षेत्रात उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक मीडिया, तिथे मात्र कुटुंबीयांचा असहकार किंवा त्यांना वाटणारी सुरक्षिततेची काळजी आणि त्याहीपेक्षा मुलगी किंवा सून रात्री उशिरा घरी परतत असेल तर लोक काय म्हणतील या पायी तर कधी नवऱ्याला येणार संशय या कारणांनी या क्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रियांचे संसार चक्क मोडले आहेत.

भारतभरातून टीव्ही व चित्रपटात करिअर करायला मुंबईत येणाऱ्या असंख्य मुली व स्त्रियांची कामाच्या वेळांचा ताळमेळ आपल्या कौटुंबिक गरजांशी बसवतानाची लढाई जबरदस्त आहे. अशा ‘वर्क कल्चर’मध्ये स्वत:ला ‘अ‍ॅडजस्ट’ करताना येणारे ताणतणाव तेवढेच तीव्र आहेत. त्यातूनच कुटुंबांचे उद्ध्वस्त होणे, त्या पाठोपाठचा एकटेपणा, निराशा तर कधी व्यसनांची साथ या सर्व बाबी अनुषंगाने येतात.

कॉर्पोरेट बँक क्षेत्रात काम करणाऱ्या काही सूचना या क्षेत्रातील स्त्रियांनी केल्या आहेत. फ्लेक्सी-अवर्स म्हणजेच सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंतची कामाची वेळ विशिष्ट काळात जसे मार्च एन्ड दरम्यान निवडता यायला हवी, त्याचप्रमाणे शक्यतो राहण्याच्या जागेपासून जवळच्या ब्रांचला तिला काम करणे शक्य व्हावे. ऑफिस नरिमन पॉइंट आणि घर ठाणे, बदलापूर, कल्याण अशा ठिकाणी असेल तर प्रवासादरम्यान तिचा जो वेळ वाया जातो तो न जाता स्त्रिया आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही नीट पार पाडू शकतील. कार्बन फूट प्रिंट टाळणे हाही उद्देश आहेच. (पेट्रोल-डिझेलच्या अमर्याद वापराने होणारा पर्यावरचा ऱ्हास)

तिसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे ‘वर्क फ्रॉम होम’ ही सवलत जिथे म्हणून शक्य असेल तिथे तिच्या गरजेनुसार तिला मिळायला हवी. भारतात सर्वच क्षेत्रातील कंपन्या, बँका अथवा इतर आस्थापने यांनी आपल्या संस्कृतीचा विचार करून स्त्रियांना नोकरी करणे शक्य होईल, असे नियम बनवायला हवेत.

अजूनही जिथे प्रचंड वेळ व ऊर्जा यांची गरज असणारे सर्व सणवार, कूळ-कुळाचार साग्रसंगीत पार पाडले जातात आणि हे पार पाडण्याची जबाबदारी प्रामुख्याने कुटुंबातील स्त्रियांचीच असते व तिचे नोकरीतले स्थान लक्षात घेतले जात नाही अशा वातावरणात स्त्रिया नोकरीत टिकून कशा राहतील हा विचार प्रामुख्याने व्हायला हवा. स्त्रियांनीही स्वत:च्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक महत्त्व देऊन सण-वार, कुलाचार आदीमध्ये पुरुषांनाही बरोबरीने सहभागी व्हायला सांगून आपल्या जबाबदाऱ्या वाटून द्याव्यात किंवा हे सर्व सुटसुटीतपणे कसे करता येईल हे बघावे.

समाज काही एका रात्रीत बदलणार नाही. हळूहळू हा बदल घडवून आणून स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या जायला हव्यात किंबहुना त्याच्यापासून त्या हिरावून घेतल्या जाऊ  नयेत. आर्थिक स्वावलंबित्व आल्याखेरीज स्त्रियांना समानतेचा हक्क मिळणे अशक्य आहे. केवळ कामाच्या वेळा सोयीच्या नाहीत म्हणून जर कोणी स्त्री नोकरी सोडून देत असेल तर आपण आपल्या देशाचे ५० टक्के असलेले कुशल मनुष्यबळ वाया घालवू.

‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेच्या अहवालानुसार (२०१७) नोकरी करणाऱ्या पुरुषांची संख्या ९ लाखांनी वाढली त्याच वेळी स्त्रियांची संख्या मात्र २४ लाखांनी घटली. स्त्रियांची नोकरी सोडण्यामागची कारणे बघितली तर प्रामुख्याने पितृसत्ताक (पुरुषसत्ताक) पद्धतीचे अवडंबर आणि संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांना सदैव पुरुषांवर अवलंबित ठेवून तिच्यावर ताबा ठेवण्याची मानसिकता हेच दिसून येते. इतकंही करून ज्या स्त्रिया उच्चशिक्षित आहेत, त्यांना संधी आणि साधने उपलब्ध आहेत तरीही कामाच्या वेळा अडचणीच्या असल्याने त्यांना नोकरी सोडणे भाग पडते. पुरुषांसाठी हे अडसर क्वचित असतात पण स्त्रियांनी मात्र घरचं आणि घरच्यांचं सगळं करूनच नोकरीसाठी बाहेर पडायचं आणि पुन्हा घर आणि घरची माणसं यांच्या सेवेत सायंकाळच्या आत घरी परतायचं म्हणजे ती आदर्श भारतीय नारी मानली जाते.

आमच्या या सर्व सख्यांच्या समस्यांचे मूळ एकच दिसून येते ते म्हणजे रात्री उशिरापर्यंत कामावर थांबावे लागणे! स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कितीही नेत्रदीपक काम करून दाखवत असल्या तरीही त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या मात्र फारशा कमी होताना दिसत नाहीत. घरात स्वयंपाकी असेल तरीही सदासर्वकाळ घरच्यांना तिने जेवण वाढले पाहिजे, तिनेच सारी आवराआवर केली पाहिजे या अपेक्षांमधून तिची सुटका नाही.

यावर कडी म्हणजे अमकीढमकी एवढय़ा मोठय़ा पदावर आहे तरीही घरच्यांचं सारं कसं नीट करते हे दुसऱ्यांना ऐकवणाऱ्या आम्ही बायकाच असतो. मोठय़ा पदावर काम करणारा पुरुष घरकामात कसा पारंगत आहे हे मात्र कधी कोणाच्या तोंडून ऐकलं आहे का कोणी? स्त्रियांना आदर्शाच्या मखरात बसवून त्यांची पिळवणूक करण्यात अजूनही आम्हाला स्वत:ची संस्कृती जपल्याचा अहंकार बाळगता येतो यातच आपल्याला स्त्री-पुरुष समानता मानणारा समाज म्हणून सुधारण्यासाठी किती अवकाश आहे हे अधोरेखित होते.

कॉर्पोरेट बँक क्षेत्रात काम करणाऱ्या काही सूचना –

  • फ्लेक्सी-अवर्स म्हणजेच सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंतची कामाची वेळ, विशिष्ट काळात जसे मार्च एन्ड दरम्यान निवडता यायला हवी.
  • राहण्याच्या जागेपासून जवळच्या ब्रांचला तिला काम करणे शक्य व्हावे. ऑफिस नरिमन पॉइंट आणि घर ठाणे, बदलापूर, कल्याण अशा ठिकाणी असेल तर प्रवासादरम्यान तिचा जो वेळ वाया जातो तो न जाता स्त्रिया आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्याही नीट पार पाडू शकतील. कार्बन फूट प्रिंट टाळणे हाही उद्देश आहेच. (पेट्रोल-डिझेलच्या अमर्याद वापराने होणारा पर्यावरचा ऱ्हास)
  • ‘वर्क फ्रॉम होम’ ही सवलत जिथे म्हणून शक्य असेल तिथे तिच्या गरजेनुसार तिला मिळायला हवी. भारतात सर्वच क्षेत्रातील कंपन्या, बँका अथवा इतर आस्थापने यांनी आपल्या संस्कृतीचा विचार करून स्त्रियांना नोकरी करणे शक्य होईल, असे नियम बनवायला हवेत.
  • अजूनही जिथे प्रचंड वेळ व ऊर्जा यांची गरज असणारे सर्व सणवार, कूळ-कुलाचार साग्रसंगीत पार पाडले जातात आणि हे पार पाडण्याची जबाबदारी प्रामुख्याने कुटुंबातील स्त्रियांचीच असते व तिचे नोकरीतले स्थान लक्षात घेतले जात नाही. स्त्रियांनीही स्वत:च्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक महत्त्व देऊन सण-वार, कुलाचार आदीमध्ये पुरुषांनाही बरोबरीने सहभागी व्हायला सांगून आपल्या जबाबदाऱ्या वाटून द्याव्यात किंवा हे सर्व सुटसुटीतपणे कसे करता येईल हे बघावे.

‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेच्या अहवालानुसार (२०१७) नोकरी करणाऱ्या पुरुषांची संख्या ९ लाखांनी वाढली त्याच वेळी स्त्रियांची संख्या मात्र २४ लाखांनी घटली. स्त्रियांची नोकरी सोडण्यामागची कारणे बघितली तर प्रामुख्याने पितृसत्ताक (पुरुषसत्ताक) पद्धतीचे अवडंबर आणि संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांना सदैव पुरुषांवर अवलंबित ठेवून तिच्यावर ताबा ठेवण्याची मानसिकता हेच दिसून येते. इतकंही करून ज्या स्त्रिया उच्चशिक्षित आहेत, त्यांना संधी आणि साधने उपलब्ध आहेत तरीही कामाच्या वेळा अडचणीच्या असल्याने त्यांना नोकरी सोडणे भाग पडते. पुरुषांसाठी हे अडसर क्वचित असतात पण स्त्रियांनी मात्र घरचं आणि घरच्यांचं सगळं करूनच नोकरीसाठी बाहेर पडायचं आणि पुन्हा घर आणि घरची माणसं यांच्या सेवेत सायंकाळच्या आत घरी परतायचं म्हणजे ती आदर्श भारतीय नारी मानली जाते.

शर्वरी जोशी

sharvarijoshi10@gmail.com

First Published on March 31, 2018 1:51 am

Web Title: womens empowerment and year end target in corporate sector