गेली चाळीस वर्षे यशस्वी फिजिओथेरपिस्ट म्हणून रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. मधुबेन गांधी. आज पंचाहत्तरीतही रुग्णांना वेदनामुक्त करण्याचे काम उत्साहाने करत सुफळ जगणं काय असतं, याचा आदर्श समोर ठेवणाऱ्या. त्यांच्याविषयी आजच्या जागतिक वृद्ध दिनानिमित्त.

काही माणसांचं वय होतच नाही असं वाटतं, म्हणजे वयाची सत्तरी, पंचाहत्तरी गाठली तरीही ते तारुण्यातल्याच उत्साहाने आपली कामे करत असतात, किंबहुना तेच त्यांच्या चिरतारुण्याचं रहस्य असावं. डॉ. मधुबेन गांधी या त्यापैकी एक. यशस्वी फिजिओथेरपिस्ट म्हणून त्यांनी मिळवलेला लौकिक आज पंचाहत्तरीतही त्यांनी कायम ठेवला आहे ते रुग्णांना बरं करण्याच्या यशस्वी तंत्रामुळे आणि लाघवी स्वभावामुळे. रुग्णाला रुग्ण म्हणून वागणूक न देता प्रेमाचे चार शब्द त्यांच्यातला आजार पळवून लावतो, याचा साक्षात्कार फार लवकर झाल्यामुळेच त्या आजही रुग्णसेवेत अखंड कार्यरत आहेत. वय हा फक्त आकडा असतो. मनानं म्हातारं होणं न होणं तुम्ही ठरवत असता, याचा आदर्शच मधुबेन यांनी यानिमित्ताने घालून दिला आहे.

मी त्यांना प्रथम भेटलो ते २५ वर्षांपूर्वी. माझ्या मान व खांदेदुखीवर उपचार करून घेण्यासाठी. मधुबेननी एक्सरे पहिला. म्हणाल्या, ‘‘काही विशेष गंभीर नाही. चार-पाच वेळा यावं लागेल फक्त.’’ त्यांनी केलेल्या उपचारामुळे मला बरं वाटू लागलं. असाच अनुभव नंतर येत गेला- मी घेऊन गेलेल्या नातेवाईकांना आणि मित्रांनासुद्धा. त्यामुळे आजही त्यांचा स्नेह कायम आहे. आता त्यांचे उपचार केंद्र विलेपार्ले (पश्चिम) येथे लाला लजपतराय रोडवर आहे. त्यांच्यासोबत प्रशिक्षण घेणाऱ्या चार- पाच मुलीही असतात. मधुबेनचं सर्व सहकाऱ्यांशी बोलणं मैत्रिणीसारखं असतं. एकत्र गप्पाटप्पा, हास्यविनोद, अल्पोपाहार. उपचार केंद्राचं वातावरण मनमोकळं व खेळकर असतं, त्याचा सकारात्मक परिणाम रुग्णांवरही होतो.

मधुबेनचे बहुसंख्य रुग्ण उच्च मध्यमवर्गीय, सुखवस्तू गृहिणी आहेत. काहींना गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखीसारख्या व्याधी असतात. काहीजणी शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरेपीसाठी येतात. अलीकडे वीस-बावीस वर्षांच्या कॉलेजात जाणाऱ्या नोकरी करणाऱ्या मुलीही उपचारासाठी आलेल्या पाहायला मिळतात. विशेष गरज भासली तर मधुबेन स्वत: उपचार करतात. कधी कधी व्याधीचे स्वरूप लक्षात घेऊन कोणते उपचार करायचे ते सहकाऱ्यांना समजावून सांगतात. माझ्यासारख्या पूर्वपरिचित रुग्ण आला की मधुबेन आवर्जून ‘‘बसा, पाच मिनिटांत एक्सरे बघते.’’ असं आश्वासक शब्दांत दिलासा देतात. मधुबेनना आकर्षक व्यक्तिमत्त्वाची देणगी लाभली आहे. उणीपुरी उंची, तेजस्वी गोरा रंग, प्रसन्न हसतमुख चेहरा असलेल्या मधुबेन बारकाईने एक्सरे बघतात. त्यांच्या चेहऱ्यावर रुग्णाबद्दलची आस्था  जाणवते. त्या हातातला एक्सरे सहकाऱ्याला दाखवतात आणि कोणते उपचार करावे लागतील ते सुचवतात, तिच्या मनाचाही अंदाज घेतात.

दुसऱ्या भेटीच्या वेळी प्रश्न, ‘‘आता कसं वाटतंय?’’ त्यांच्या सहकारी मुलीही हाच प्रश्न आवर्जून विचारतात. रुग्ण म्हणतो, ‘‘आता बरं वाटतंय, पूर्वीपेक्षा सुधारणा आहे.’’ मधुबेन मंदपणे हसतात. रुग्णाच्या हातावर हलकीशी चापटी मारतात. पुन्हा दुसरा रुग्ण- तीच प्रक्रिया सुरू राहते..

खूप वर्षांपासून त्यांना जाणून घ्यायची इच्छा होती. त्यांच्या करिअरची सुरुवात कशी झाली याबद्दल कुतूहल होतं म्हणून मी मधुबेनना विचारलं, ‘‘तुम्ही चाळीस- पंचेचाळीस वर्षे प्रॅक्टिस करता आहात. या व्यवसायाचं आकर्षण तुम्हाला का वाटलं?’’ त्यांनीपण गप्पा मारायला सुरुवात केली. ‘‘मी मूळची मुंबईकरच. मधुबाला मदनगोपाल वधवा. एका पंजाबी कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील मदनगोपाळ वधवा धाग्याचा -यार्नचा व्यवसाय करत. माझी आई आणि आजी कष्टाळू गृहिणी होत्या; समाधानी व आनंदी वृत्तीच्या होत्या. त्यांच्या जवळ उपजत विनोदबुद्धी होती. आमच्या घरी शिक्षणासाठी प्रोत्साहक वातावरण होतं. माटुंग्याच्या महर्षी दयानंद विद्यालयात माझं माध्यमिक शिक्षण झालं. पुढे रुईया कॉलेजात उच्च शिक्षण झाल्यावर मी के. ई. एम.मध्ये फिजिओथेरपीचा कोर्स पूर्ण केला. लग्नानंतर मी मधुबाला दिनेश गांधी झाले. यजमानांचा मखमलीच्या कपडय़ाचा स्वतंत्र व्यवसाय आहे. विशेष सांगायचं म्हणजे, फिजिओथेरपीचं उपचार केंद्र सुरू करायला माझ्या सासऱ्यांनी प्रेरणा दिली. आमच्या राहत्या इमारतीच्या खाली असलेल्या गॅरेजवजा जागेत १९७० मध्ये माझं उपचार केंद्र सुरू झालं.’’

‘‘या व्यवसायाचं आकर्षण वाटायचं कारण माझ्या बालपणीच्या अनुभवात आहे. माझ्या आजीला पॅरालिसिस झाल्यावर उपचार सुरू झाले. त्या वेळी एका फिजिओथेरपिस्टच्या उपचारांनी तिला बरं वाटू लागलं. परावलंबी असलेली आजी स्वावलंबी झाली. हिंडती- फिरती झाली. रुग्णाला वेदनामुक्त करणारा हा व्यवसाय मला आवडला. वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पाश्र्वभूमी किंवा परंपरा नसताना मी या व्यवसायात आले. रुग्णांच्या चेहऱ्यावरचं हसू हेच माझं आता जीवितकार्य झालं आहे.’’

‘‘मधुबेन, तुम्ही या व्यवसायाचं आव्हान स्वीकारलंत. हे आव्हान कोणतं?’’

‘‘व्यक्तीनुसार तिच्या दुखण्याचं स्वरूप बदलत जातं, रुग्णाचं वय, तिची आर्थिक परिस्थिती व मनाची ठेवण, आजाराची तीव्रता, रोगप्रतिकाराचे व प्रतिसादाचे स्वरूप, यामुळे प्रत्येक रुग्ण म्हणजे एक नवं आव्हान असतं; मी आव्हान स्वीकारते. उपचार करते. रुग्णाला बरं वाटलं की मला आनंद होतो.’’

‘गेली काही र्वष मी बघतो आहे- तुमची उपचाराची विशिष्ट पद्धत आहे. डायथर्मी लाइट, अल्ट्रा साउंड, टी. ई. एन. एस. या उपचारांबरोबर, रुग्णला शारीरिक ताण देणारे, विशिष्ट ठिकाणी दाब- प्रेशर देणारे, व्यायामासारखे प्रकार तुम्ही अमलात आणता. ही पद्धत कसरतीशी जवळची वाटते. हे वेगळं तंत्र तुम्ही कुठे आत्मसात केलंत?’

‘‘चांगला प्रश्न आहे. काही मोजके रुग्ण हा प्रश्न विचारतात. पन्नास- साठ वर्षांपूर्वी आतासारखे एम.आर.आय., एक्सरे, रक्ताच्या चाचण्या अशा तपासण्या नव्हत्या. वैयक्तिक अनुभव व निरीक्षणाला महत्त्व दिलं जात असे. त्यामुळे अवयवांच्या ठेवणीचा, त्यांच्या हालचालींचा, स्नायूंच्या कमकुवतपणाचा अभ्यास झाला. एकूणच, शरीरशास्त्राची खोलवर माहिती अनुभवातून झाली. बाह्य़ साधनांवर अवलंबून न राहता निदान करण्याचं तंत्र आपसूक अवगत झालं. कमी खर्चात उपचार करता आले.’’

‘अलीकडे तुमच्या उपचार केंद्रात उपचाराला येणाऱ्या तरुण मुलींची संख्या वाढत चाललेली दिसते, याची कोणती कारणं सांगता येतील?’

‘‘हल्लीची तरुण पिढी आरोग्याकडे पुरेसं लक्ष देत नाही. चंगळवादी समाजव्यवस्थेत कुणालाही आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असं वाटत नाही. पूर्वीसारखं लहान मुलांचं खेळणं- हुंदडणं तर दूरच राहिलं. मुलांची बसण्याची चुकीची पद्धत, व्यायामाचा कंटाळा, दप्तराचं ओझं वाहून नेण्याची जबाबदारी, टी. व्ही., मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅपचा अनिष्ट प्रभाव, घरातील सकस आहाराऐवजी ठेल्यावरच्या चमचमीत, तेलकट पदार्थाची आवड, अशा काही कारणांमुळे मुलामुलींच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. शरीर सुदृढ असण्यापेक्षा आपण सुंदर दिसावं, असं मुलींना वाटतं. या कारणांमुळे युवा पिढी व्याधींची शिकार बनते. हा कालमहिमा आहे!

तरुण पिढीच्या हलगर्जीकडे लक्ष वेधणाऱ्या गेल्या काही वर्षांच्या परिचयात मधुबेन गांधी यांचे स्वभावविशेष लक्षात आले. त्या आस्तिक आहेत. ईश्वरावर त्यांची श्रद्धा आहे. आपल्या यशामागे ईश्वरी अधिष्ठान आहे, असं त्या मानतात. प्रवासाची त्यांना आवड आहे. भारतातील व विदेशातील प्रेक्षणीय स्थळं त्यांनी पाहिली आहेत. संगीताची त्यांना आवड आहे. सहगल व गीता दत्त हे त्यांचे आवडते गायक आहेत. त्यांच्या मुलांनीही स्वत:चे स्वतंत्र व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांच्या मुलाने-आशीषने एम्.बी.ए. झाल्यावर स्वत:चा पॅकेजिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. तर मुलगी शीतल वास्तुतज्ज्ञ असून तिचाही स्वतंत्र व्यवसाय आहे.  एकूणच आयुष्याकडे आनंदीपणे बघण्याकडे मधुबेन यांचा कल आहे. कौतुकाची बाब म्हणजे माहेर-सासरच्या पंजाबी असल्यामुळे त्या पंजाबी-हिंदी भाषा उत्तम बोलतात. शिवाय इंग्रजी-मराठी-गुजराथी भाषेत रुग्णाबरोबर छान संवाद साधतात. वैद्यकीय व्यवसायकाला मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषांतही संभाषण करणे आवश्यक असते. हे मधुबेनचे ठाम मत आहे.

गेली पस्तीस-चाळीस वर्षांत मधुबेन यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन स्वतंत्रपणे व्यवसायात स्थिरावलेल्या सहकाऱ्यांपैकी काहींची कधीतरी भेट होते. मधुबेनशी गप्पा मारताना जुने सहकारी त्यांचे ऋ ण व्यक्त कतात. अशा वेळी मधुबेन नम्रपणे म्हणतात, ‘‘आपण कुणाच्यातरी प्रेरणास्थानी आहोत ही भावना माझ्या दृष्टीने मोलाची आहे.’’  नवीन फिजिओथेरपिस्टना मधुबेन आग्रहपूर्वक सांगतात, ‘‘नवोदितांनी कमर्शियल न राहता, फक्त पैसे मिळवणे हे ध्येय न बाळगता रुग्णांना वेदनामुक्त करावं; आपल्या व्यवसायाला सेवेची जोड द्यावी.’’

जवळजवळ ४५ वर्षे रुग्णसेवा करणाऱ्या मधुबेन गांधी नेहमी आनंदी असतात. याचे श्रेय त्या आपल्या विनोदी स्वभावाच्या आजीला व आईला देतात. आपल्या व्यवसायात त्या पूर्ण समाधानी आहेत. कृतार्थतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतात. त्या म्हणतात, ‘‘रुग्णाचं दु:ख निवारण करणाऱ्या ‘फिजिओ’ला आणखी काय हवं असतं?’’

पंचाहत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या मधुबेन यांची रुग्णसेवा करण्याची जिद्द व कामाची असोशी अजूनही पूर्वीसारखीच आहे. यामुळेच भविष्यकाळातही त्यांच्याकडून अशीच रुग्णसेवा घडो, हीच सदिच्छा.

(प्रस्तुत लेख लिहिण्यासाठी वैशाली आणि प्राजक्ता या सहकाऱ्यांनी साहाय्य केले आहे. मोबाइल क्रमांक – ९९२००६२८२१)

वि. शं. चौघुले