20 March 2019

News Flash

‘आईपणा’च्या शोधात मातृदिन

आई ही व्यक्ती असली तरी आईपण ही वृत्ती आहे, भावना आहे.

|| आरती कदम

आई ही व्यक्ती असली तरी आईपण ही वृत्ती आहे, भावना आहे. ती भावना जेवढी व्यापक होत जाईल तितकं तिच्यामध्ये प्रेम, शांतता, बंधुत्व, सहृदयता, एकोपा सामावत राहील..पण आज त्याचीच वानवा आहे. बाजारीकरण झालेल्या ‘मदर्स डे’चा निषेध त्याची जन्मदात्री अ‍ॅना जार्विसनंही केला होता. काय आहे ‘मदर्स डे’चा जगव्यापी अर्थ.. उद्याच्या जागतिक मातृदिनानिमित्ताने..

‘‘सॉरी, खरंच सॉरी, मला पश्चात्ताप होतोय, मी का हा ‘मदर्स डे’ सुरू केला. मला अपेक्षित ‘मदर्स डे’ हा नाही. हा एका आईचा नाही तर आईपणाचा उत्सव असायला हवा. मातृत्वाच्या भावनेचा सोहळा असायला हवा, पण त्याचा आज जो काही धंदा झाला आहे तो पाहता त्यातलं पावित्र्य नष्ट झालंय. आईला फक्त शुभेच्छा कार्ड, कॅन्डीज् आणि फुलं पाठवून तो नाही साजरा करता येत. त्याच्यापलीकडे जाता आलं पाहिजे. हा दिवस खरंच रद्द झाला पाहिजे.’’

‘मदर्स डे’ची आई असणाऱ्या अ‍ॅना जार्विसचं (१८०४-१९४८) हे म्हणणं आजही अगदी तंतोतंत लागू पडतं. प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण करणाऱ्या भावनांचंही भांडवल करणाऱ्या आजच्या व्यवहारी जगात मातृत्वातल्या व्यापक भावनेला जपणं कमी होत चाललेलं आहेच. उरलाय तो व्यक्तीकेंद्री स्वार्थ, म्हणूनच की काय आपल्या देशात किंवा अगदी जगभर हिंसाचाराचं थैमान सुरू आहे. त्यासाठीच मातृदिनामागची खरी प्रेरणा जाणून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तो सोहळा खऱ्या अर्थाने सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अ‍ॅनाने आपल्या आईच्या, अ‍ॅनच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘मदर्स डे’ सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले खरे, पण त्याची रुजवात तिच्या आईनेच करून ठेवली होती. एकोणिसाव्या शतकात अमेरिकेत जन्माला आलेल्या अ‍ॅन रीव्हज् जार्विसचं (१८३२-१९०५)आयुष्य तसं सरळ सुरू होतं. मात्र पुढच्या राजकीय, सामाजिक उलथापालथीने तिच्या आयुष्याला वेगळ्या वाटेवर आणून सोडलं. अकरा मुलांना जन्म देणाऱ्या अ‍ॅनला सात मुलांचा मृत्यू बघावा लागला. तिचं मातृहृदय विव्हळलं खरं, पण जेव्हा मातृहृदय परपीडा जाणत वैयक्तिक दु:खाच्या पलीकडे जात विशाल होत जातं तेव्हा हातून खूप काही मोठं घडतं. तिच्याबाबतीत तेच घडलं. आजूबाजूची परिस्थती चिंता निर्माण करणारीच होती. अ‍ॅनने परिसरातील सगळ्याच समदु:खी आईंसाठी काम सुरू केलं. मुलं अल्पवयात दगावू नयेत, त्यांची योग्य देखभाल व्हावी यासाठी संघटना तयार केली आणि त्याला नाव दिलं, ‘मदर्स फ्रेंडशिप क्लब’. दरम्यान, अमेरिकेतील नागरी युद्धाने (१८६१-१८६५) जोर धरला. कोणतंही युद्ध जीवितहानी करणारच, पुन्हा एकदा तिच्यातल्या मातृहृदयाने अनेकांना साद घातली. तिला प्रतिसाद देत तिच्या क्लबने सैनिक कोणत्याही बाजूचा असो, निष्पक्षपणे सेवा करत अनेकांचे प्राण वाचवले. पण तेवढं पुरेसं नव्हतंच. युद्ध संपल्यावर त्यांचे प्रयत्न सुरू झाले ते प्रेमाचे, मैत्रीचे बंध निर्माण करणारे. युद्धामुळे विभागल्या गेलेल्या कुटुंबीयांना एकत्र आणण्याचे प्रयत्न! तिने त्या दिवसाला नाव दिलं, ‘मदर्स फ्रेंडशिप डे’. कुटुंबाला बांधून ठेवणारी आईच असते. भावंडांमधला दुवा तीच असते, हीच भावना जागती ठेवत सर्व आईंना एकत्र करणं, बंधुत्व निर्माण करणं आणि पुढे जात या आईपणाचा गौरव करणं तिने आपलं जीवितकार्य ठरवलं. युद्धापेक्षा ती प्रेमाचा, शांततेचा पुरस्कार करत राहिली. आईपण म्हणजे काय याचा वस्तुपाठच तिनं घालून दिला त्या काळात.

तिच्या निधनानंतर आईचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटली ती अ‍ॅना. जगात शांतता, सलोखा, अनुकंपा आणायची असेल तर आईचा, आईपणाचा सन्मान, आदर व्हायलाच पाहिजे, ही तिची भावना. त्याला व्यापकत्व द्यायचं तर आईपणाचा गौरव करण्यासाठी ‘मदर्स डे’ मोठय़ा प्रमाणावर साजरा करायची कल्पना तिने मांडली आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न सुरू केले. तिच्या आणि तिच्या समर्थकांच्या प्रयत्नांना यश आलं आणि १९१४ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष व्रुडो विल्सन यांनी त्याला मान्यता दिली ती, आई- देशाची शक्ती आणि स्फूर्तीचा महत्त्वपूर्ण स्रोत असते, अशा गौरवास्पद शब्दांत! दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी (अ‍ॅनच्या स्मृतीदिनानिमित्ताने) राष्ट्रीय रजा देऊन तो साजरा करायचं ठरलं, अनेक देशांमध्ये ‘मदर्स डे’ साजरा होऊ  लागला, पण याचा वेगळाच अर्थ लावला गेला. ‘आईपणा’च्या गौरवापेक्षा आईचा, तिच्या त्यागाचा, कुटुंबावरील प्रेमाचा सन्मान अशा व्याख्येत ‘मदर्स डे’चं व्यापकत्व वैयक्तिक होत संकुचित झालं. साहजिकच त्याला व्यावसायिक रूप येऊ  लागलं. एका कार्यक्रमाला तिला जाता आलं नाही म्हणून तिने उपस्थित आईंना वाटण्यासाठी तिच्या आईला आवडणारी, शांततेची निदर्शक पांढरी कार्नेशनची फुले तिने पाठवून दिली. तिच्या मते, कार्नेशनची फुले पाकळ्या गाळत नाहीत, ते कोमेजतं, पण शेवटपर्यंत सगळ्या पाकळ्या धरून ठेवतं, जे आई करत असते, म्हणून हे फूल. पण पुढे ‘मदर्स डे’ म्हणजे कार्नेशनची फुलं, असं समीकरण झालं आणि या फुलाचा बाजार सुरू झाला. ‘मदर्स डे’ आला की या फुलांच्या किमती नको तितक्या वाढू लागल्या. त्याच्या रंगांना अर्थ आले. अनेकांनी या दिवसाचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी फंड गोळा करण्यासाठी सुरू केला. गिफ्टस, शुभेच्छा कार्डस् यांच्या धंद्याला बरकत आली. (आज जगभरात या दिवशी १६ कोटी शुभेच्छा कार्ड विकली जातात म्हणे.) भावनेचा असा मांडला गेलेला बाजार अ‍ॅनाला सहन होईना. तिच्या म्हणण्यानुसार  तो असा वैयक्तिक साजरा करायचा तर आईला नुसत्या कॅन्डीज, कार्ड पाठवून प्रेम दाखवण्यापेक्षा तिला मोठी पत्र लिहा, तिला जाऊन भेटा, तिच्या सहवासात राहा, पण ते होत नव्हतं. अखेर तिने त्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. इतका की एका मोठय़ा कार्यक्रमात शांतता भंग केला म्हणून तिला अटकही करण्यात आली. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने हा दिवस रद्द करावा म्हणून कोर्टात धाव घेतली. (१९२३) तरीही दरवर्षी मातृदिनाचा एकदिवसीय सोहळा रंगू लागला आणि कोटय़वधींची उलाढाल होत संपूही लागला. त्यामागचं पावित्र्य, आदर, कुटुंबांमधला स्नेह, माणसामाणसांतील प्रेम, बंधुत्व, सगळ्यांचं एकत्र येणं सारं सारं पैशांच्या वावटळीत उडून गेलं.

स्वत: कधीही आई न बनू शकलेली अ‍ॅना ‘मदर्स डे’ची आई झाली खरी, पण अखेर एकटी पडली. कफल्लक झालेल्या आजारी अवस्थेतल्या अ‍ॅनाला आधार मिळाला तो तिथल्या आरोग्याश्रमाचा. असं म्हणतात की ‘मदर्स डे’मुळे श्रीमंत झालेल्या फुलांच्या व्यापाऱ्यांनीच तिच्या तिथल्या सगळ्या खर्चाची जबाबदारी उचलली. पैशांचा झगमगाटात एका सच्च्या भावनेचा अस्त झाला. पण हेच आजचं वास्तव नाही का? पैशांच्या, सत्तेचा माज इतका वाढतो आहे की माणूस माणसाला ओळखायला विसरतोय, तिथे ही मातृत्वाची साद कोण ऐकणार?

युद्ध असो की रोजच्या जगण्यातला माणसामाणसांमधला संघर्ष, तो नुकसानच करत असतो. एकमेकांविषयी तिरस्कार, अपरिहार्यपणे दुखं, वेदना आणि ऱ्हासच जन्माला घालतो. तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाने आपल्यातलं आईपण जपलं पाहिजे. आईपणातल्या मातृत्वाला, सहृदयतेला जपलं पाहिजे तरच आजूबाजूला स्वार्थासाठी चाललेली, सत्तेसाठी चाललेली, जाती-धर्माच्या नावाखाली आपल्याच माणसांची हत्या थांबवू शकू. आज आईपणामागचा व्यापक अर्थ नव्याने जाणून घेण्याची वेळ आली आहे. कारण जगात शांतता, बंधुत्व, एकोपा नांदणं ही काळाची गरज आहे.

आई ही व्यक्ती असली तरी आईपण ही वृत्ती आहे, भावना आहे. ती भावना जेवढी व्यापक होत जाईल तितकं तिच्यामध्ये प्रेम, शांतता, बंधुत्व, सहृदयता, एकोपा सामावत राहील. उद्याच्या मातृदिनाचा तरी तोच सांगावा आहे..

arati.kadam@expressindia.com

chaturang@expressindia.com

First Published on May 12, 2018 12:13 am

Web Title: world mothers day