‘होय, मी बंडखोरी केली’ हा विषय वाचकांना दिला आणि खूप भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रत्येकीने आपल्या आयुष्यातल्या बंडखोरीच्या कहाण्या सांगितल्या. गंमत वाटली की आजही मासिकपाळीचा बाऊ करणाऱ्या समाजातल्याच काही जणींनी अगदी ६०-६५ वर्षांपूर्वीच ते नाकारायची बंडखोरी केलीय. अर्थात अनेकींना वेगवेगळ्या प्रकारची बंडखोरी करावी लागली. कुणाला शिकण्यासाठी, कुणाला नोकरी करण्यासाठी, कुणाला आंतरजातीय वा आंतरधर्मीय लग्न करण्यासाठी. एकीला कुटुंबनियोजनासाठी तर दुसरीला सहजीवनाचा निर्णय घेण्यासाठी बंडखोरी करावी लागली. स्त्रीने वेगवेगळ्या स्तरावर ही बंडखोरी केली आणि स्वत:चं आयुष्य सोप्पं केलं. पण तो विचार कृतीत आणणं सोपं नव्हतच. त्यासाठी आधी काही गोष्टीला नाही म्हणणं भाग होतं. थोडं प्रवाहाच्याविरुद्ध पोहावं लागलं. त्याचा शारीरिक आणि जास्त मानसिक त्रास झालाच. पण आमच्या अनेक वाचक मैत्रिणींनी तो अनुभवला, सहन केला आणि म्हणूनच पुढच्या पिढीतल्या काहींची वाट सुकर झाली. काहीचा प्रवास आजही त्या अवघड वाटेवरून सुरू आहे. बंडखोरी आत्मसन्मानासाठी असेल, कुणाचं अहित चिंतणारी नसेल तर पुढे जायलाच हवं, हेच ही बंडखोरी दाखवून देते. आमच्या या तमाम बंडखोर मैत्रिणींना सलाम!

शिक्षणासाठी आजही बंडखोरी करते आहे
एका खेडेगावतील सामान्य घरातील मी मुलगी. घरात कोणीच फारसं शिकलेलं नसल्याने कोणालाही शिक्षणाची फारशी आवड नव्हती. घरात जेमतेम १२वी झालेले एक दोघेच. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्व काय हे कोणाला माहीत नाही. घरात सगळे जीर्णमतवादी विचारांचे. गावाकडे मुलीने फक्त १०वी ते १२वी एवढंच शिक्षण घेतलं पाहिजे. जास्तीत जास्त १५वी तेही चांगला व श्रीमंत ‘वर’ मिळावा यासाठी. मुलीने जास्त शिक्षण घेतलं म्हणजे ती वाया जाते अशा विचारसारणीच्या लोकांमध्ये राहणंच माझ्यासाठी एक आव्हान आहे.
मी सध्या एलएल.बी.चं शिक्षण घेत आहे. हे शिक्षण घेण्यासाठी मला घरातून खूप विरोध होत आहे. १५वी शिकली ना मग अजून शिकून काय करणार आहे? वकिली करून काय ज्ञान पाजळणार आहेस माहीत आहे? हिच्यामुळे घरातल्या बाकीच्या मुलींची लग्ने होणार नाहीत. हिला वेळीच अडवले पाहिजे नाही तर हातातून जाईल असे अनेक उपदेश करणारे नातलग घरी येऊन गेल्याने आई-बाबासुद्धा म्हणाले, ‘बस नको आता शिक्षण! तू लग्न कर आणि सासरी जा म्हणजे आम्हीही मोकळे, मग लग्नानंतर तू शिक.’ त्यांच्या अशा बोलण्याने थोडी खचले मी. असं वाटलं सगळंच हरून बसले. पण ही लढाई मला एकटीलाच लढायची आहे हे लक्षात आलं. माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय घेऊन मी खरोखर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत आहे.
आज मी केवळ २५ वर्षांची आहे. सध्या माझ्या शिकण्यावर बंदी घालण्यासाठी नातलगांमध्ये सभा भरवल्या जात आहेत. वेगवेगळ्या कल्पना लावून मला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना मी प्रतिकार करत आहे. आमच्याकडे मुलींच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नावर जास्त खर्च केला जातो. म्हणून मी मुलींना लग्नापेक्षा शिक्षणाचे महत्त्व हे पटवून देत आहे. त्यामुळे आता ‘आमच्या मुलींना नको ते शिकवते’ म्हणून माझ्याशी सगळ्यांनी बोलणंच बंद केलंय. शिक्षण घेणं, समाज परिवर्तनाचं स्वप्न पाहणं माझी ‘बंडखोरी’ असेल तर मी करते बंडखोरी आणि पुढेही करत राहणार.
– उषाकिरण पाटील

अन् मी गणपती उठवला
या गणपतीतलीच गोष्ट.. पहिले पाच दिवस सर्वानी मिळून गणपतीची पूजा-आरती केली. पाचव्या दिवशी सुतक पडले. तसे लांबचे होते पण आई रूढी-परंपरांना मानणारी त्यामुळे धरले सुतक. मुलगी म्हणजे परक्याचे धन म्हणून मला मुभा मिळाली पूजा करण्याची. मग मीच बाकीचे दिवस नित्यनियमाने पूजा केली. विसर्जनाच्या दिवशी आरती करून गणपती उठवणार तर आई म्हणाली की, ‘‘मुली गणपती उठवू शकत नाही, म्हणून बाजूच्या घरातील काकांना गणपती उठवायला बोलावते.’’
मी म्हणाले, ‘‘माझी पूजा चालते, नैवेद्य चालतो, मागचे काही दिवस मीच पूजा करत आहे मग मी उठवू का शकत नाही. दुसऱ्यांच्या घरातील व्यक्ती चालते पण स्वत:च्या घरातील व्यक्ती चालत नाही का?’’ अन् मी आरती करून गणपती उठवला व घरातील परंपरा मोडली. एक कळलं की, हक्क दिले जात नाही तर वेळप्रसंगी भांडून घ्यावे लागतात.
– वर्षां जेजुरकर, औरंगाबाद</strong>

बंडखोरी कुटुंबनियोजनाची
आपल्या देशात अनेक लोकांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी, समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट करण्यासाठी बंडखोरी केली त्यासाठी बलिदान दिले. तुरुंगवास भोगला. त्यांच्या बंडखोरीने त्यांच्या कुटुंबीयांना त्रास झाला. त्या मानाने माझ्यासारख्या सामान्य गृहिणीच्या बंडखोरीचे मूल्य काहीच नाही. तरीपण मी केलेल्या बंडखोरीने माझ्या कुटुंबीयांनी त्रास करून घेतला नि बंडखोरी लिहाविशी वाटली.
लग्न होऊन ज्या घरात आले त्या घरातील वयोवृद्ध माणसे अतिशय सनातनी विचारांची होती. आमचे परांजपे कुटुंबात सर्वाचे व्यवसाय होते. माझे सख्खे सासरे तेवढे ओव्हरसीअर होते. माझे पती बी.एस्सी., बी.एड. होते. पण त्या शिक्षणाचा, त्यांच्या विचारांचा घरातील मंडळींना काहीही अभिमान नव्हता. माझ्या सासूबाईंना, त्यांच्या १७ खेपांमध्ये, दोनदा जुळ्यांसह एकूण १९ मुले झाली. मलाही ११ भावंडे होती. त्याकाळी मुलांच्या संख्येला काहीच बंधन नसे. त्यातील जगत किती? मरत किती? याच्याशी काही देणे-घेणे नव्हते. त्यामुळे मुलांच्या वैयक्तिक विकासाचा काहीही विचार होत नसे.
आम्ही उभयतांनीही तीन अपत्ये झाल्यानंतर कुटुंबनियोजनाचा विचार केला. आम्ही उभयंता
डॉ. र. धों. कर्वे यांच्या ‘कुटुंबनियोजन व शल्यक्रिया’ या विचाराने प्रभावित झालो होतो. त्यानुसार तशी वेळ आली तेव्हा आम्ही कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रियेचाच विचार वरिष्ठांकडे बोलून दाखवला. त्यावर घरातील सर्वजण भडकले. चुलत सासरे म्हणाले, (हे विनापत्य होते) ‘‘मंगला, हे बघ तुला तुझ्या सासूसारखी १९ नाही २० मुले होऊ दे. मी त्यांचे संगोपन करेन. तू काही काळजी करू नकोस.’’ त्यावर हे म्हणाले, ‘‘काका, अहो मी शाळा मास्तर. १६५ रुपये पगारात मी संसार करू शकत नाही. तसे तर मंगलाही सशक्त नाही. तिला बाळंतपणे सोसणार नाहीत.’’ त्यावर माझ्या सासूबाई उसळल्या म्हणाल्या, ‘‘काही होत नाही. देव त्या त्या वेळी शक्ती देतो सहन करण्याची इत्यादी इत्यादी.’’ ज्या बाईने इतक्या वेळा या यातना भोगल्या तिची तरी संमती मिळेल ही आशाही फोल ठरली.
पण नशिबाने यांची बदली संस्थेच्या, विटा शाळेकडे झाली (यांची सांगली शिक्षण संस्थेत नोकरी होती). नवीन बिऱ्हाडाची मांडामांड करण्यापूर्वी त्या छोटय़ा गावात चौकशी करून डॉ. देशचौगुले यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करायला त्वरित होकार दिला. कारण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये अशी पाहिलीच शस्त्रक्रिया होणार होती. त्यामुळे डॉक्टर स्वत:, कर्मचारी व आम्ही उभयता उत्साही होतो. सर्व व्यवस्थित पार पडले. बदली झाल्यामुळे आम्हाला संधी मिळाली. त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतल्याने बंडखोरी सफल झाली. आता बंडखोरीची शिक्षा भोगायची होती. सांगलीला सर्वानी अबोला धरला. संबंध तोडले. आम्ही एकाकी झालो. अशी काही वर्षे बहिष्कृत जगलो.
नंतर मात्र या बंडखोरीची सुंदर फळे, बक्षिसे मिळू लागली. माझी चारही मुले अतिशय हुशार, शालेय व महाविद्यालयीन जीवनामध्ये अव्वल होती. खेळातही प्रावीण्य मिळवणारी, अष्टपैलू विद्यार्थ्यांचे बक्षीस मिळवणारी होती. पुढील जीवनात मोठी मुलगी पीएच. डी., होऊन सोमय्या शैक्षणिक संकुलमध्ये संस्कृतपीठम्ची प्राचार्या झाली. नुकतीच निवृत्त झाली. मोठा मुलगा उत्तर भारतात ३५ वर्षे एनटीपीसीमधील सव्‍‌र्हिससमध्ये उच्चपदावरून निवृत्त होऊन महाराष्ट्रात आला. कोकण विकासात सहभाग घेण्याच्या उद्देशाने जयगड येथे स्थायिक होऊन तिथे आपल्या वीजनिर्मिती व्यवस्थेतील कौशल्य, नव्या कल्पना अमलात आणत आहे. दुसरी मुलगी व दुसरा मुलगाही उच्च विद्याविभूषित होऊन आपआपल्या व्यवसायात कार्यरत आहेत. वेळीच जागे होऊन कुटुंब मर्यादित ठेवल्याने मुलांना उच्चशिक्षित करता आले. बंडखोरीची चांगली फळं मला मिळाली.
– मंगला परांजपे, सांगली

इंग्लंडला पोहोचले
सुसंस्कृत, मध्यमवर्गीय, ब्राह्मण कुटुंबात १९३७ मध्ये माझा जन्म झाला. हट्टी व उनाड तरीसुद्धा अभ्यासात बरी होते. मी नेहमी घरातील एक काळजीचा विषय होते. नाटकांत काम करणे, कॉलेजमधील विषय निवडणे वगैरे बाबतीत मला घरच्यांबरोबर कायम वादविवादास तोंड द्यावे लागे. या सर्वाला कंटाळून बी.ए. झाल्यावर मीच माझा मार्ग शोधला. घोडेगाव तालुका, जि. पुणे येथे मुख्य सेविकेची जागा रिक्त होती. माझे वय अवघे २२, शहरात वाढले, फग्र्युसन कॉलेजमध्ये शिकले, त्यामुळे माझ्या नेमणुकीबद्दल बरीच चर्चा बोर्डात झाली. माझी मुलाखत यमुताई किलरेस्कर यांनी घेतली. खेडेगावात नळ नाहीत, विजेचे दिवे नाहीत. शौचालय, सिनेमे वगैरे नाहीत. तुला तिथे राहणे फार कठीण जाईल. विचार कर. असे सांगितल्यावर मला ‘आवडेल’ असे मी त्यांना ठाम उत्तर दिले. समाज विकास योजनेचे अधिकारी माझ्या नेमणुकीवर फार नाराज होते. घरातूनही तर प्रचंड विरोध झाला. गावात बांगडय़ा व कुंकूविरहित मला बघून तिथल्या स्त्रियांनी तर मला विधवाच ठरवले. त्यामुळे बांगडय़ा भरल्या व कुंकू लावले.
मला खूप बदलावे लागले. मला १९६१ मध्ये ‘मुख्य सेविकेच्या’ प्रशिक्षणासाठी बडोदा येथे पाठवण्यात आले. त्यात मी पहिली आले. तेथील शिक्षकांच्या उत्तेजनामुळे मी एम.एस.ला (मास्टर ऑफ सोशल वर्क) प्रवेश घेऊन १९६४ साली पदवी घेतली. तिथे पण मी चांगली प्रगती केली. त्यानंतर मी अहमदाबादला बी.एम. इन्स्टिटय़ूट ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये सोशलवर्कचे काम केले. त्यांनी मला १९६९ मध्ये इंग्लंडला अभ्यासक्रम करायला पाठवले. तेथे मी अडीच र्वष काम केलं. तेथे मला मानसिक व शारीरिक कष्ट फार करावे लागले. पुढे मी १९९७ सालापर्यंत सामाजिक कार्य केले. त्या सर्व काळांत, वर्णभेद, बदलणारी हवा, भिन्न वातावरण यांच्याशीही सामना करावा लागला. माझी बंडखोरी वेगवेगळ्या पातळ्यांवर चालू होती.
माझा विवाह माझ्या ३७व्या वर्षी इंग्लंडमध्ये झाला. माझे पती डॉ. कामत उच्चविद्याविभूषित होते. नऊ वर्षांच्या सुखी वैवाहिक जीवनानंतर त्यांचे आकस्मिक निधन झाले. माझी मुलगी त्या वेळी फक्त आठ वर्षांची होती. मी भारतात परत यावे, अशी माझ्या हितचिंतकांची इच्छा होती. परंतु माझ्या मुलीच्या भविष्याचा विचार करता मी इंग्लंडलाच स्थायिक झाले. मी स्वत:च्या कर्तृत्वावर इंग्लंडला शिकावयास गेले, हीच माझ्या बंडखोरीची कमाई.
– नलिनी कामत-निंबकर

..आणि बदल घडला
वर्ष २०००. अंजनगाव सुर्जी (विदर्भात) आमच्या स्वकुळ साळी समाजाचे मोठे त्रवार्षिक अधिवेशन होते. तिथे मला एकपात्री कार्यक्रम ‘वऱ्हाडी चटका’ यासाठी खास निमंत्रण होते. या कार्यक्रमाला जाण्यासाठी आधी घरातूनच, मुलगा आणि नवऱ्याने विरोध केला. पण आमंत्रण स्वीकारले होते. हातात जेमतेम जाण्या-येण्याचेच पैसे होते. पण मी निघालेच. गीतांजली एक्स्प्रेसने जायचं होतं. कल्याणला सकाळी पावणेसातला येणारी गाडी थोडा थोडा वेळ म्हणता दुपारी दीड वाजता कल्याण स्थानकात आली. घरच्यांच्या रागात मी काही खायलाही घेतलं नव्हतं. बाहेर खाणं मला आवडत नव्हतं आणि परवडणारंही नव्हतं. मी जनरल डब्यात शिरले. अकोल्यात दुपारी तीन वाजता पोहोचणारी गाडी रात्री दहाला पोहोचली. अकोला जवळ आलं तशी मी सामान घेऊन निघाले, पण मनात धाकधूकच होती. एवढय़ा रात्री मी अंजनगावला कशी जाणार? सोबतीला कोणी नाही. दाराशी आले तेव्हा चार माणसं दारात उभी होती. मी एकेकाचे चेहेरे न्याहाळू लागले आणि त्यातल्या एका तरुणाला विचारले, कुठे जाणार? त्यालाही नेमकंअंजनगाव सुर्जीतच जायचं होतं. पण अंजनगावला जाणाऱ्या त्या दिवसाच्या सर्व बस निघून गेल्या होत्या. आता सकाळपर्यंत त्या गावात जाणारी गाडीच नव्हती. शेवटी त्या तरुणानेच जेवणाची, रात्रीच्या निवासाची तजवीज केली. रात्री झोपले नाही आणि त्यालाही झोपू दिलं नाही. सकाळी सात वाजता आम्ही बससाठी आलो. लगेच बस मिळाली. तिकीटही त्यानेच काढलं.
माझा कार्यक्रम त्याच रात्री होता. ‘वऱ्हाडी चटका’ हा माझा वैदर्भीय बोलीतला कार्यक्रम तिथे सादर करणार होते. तो करायला मी मंडपात आले. माझं नाव घेताच व्यासपीठावर गेले. जाताना स्टेजच्या बाजूला बोर्ड लावलेले मी सवयीनेच वाचले. त्यावर लिहिलं होतं, स्त्री व पुरुषांना समान अधिकार, समान हक्क दिले जातील. स्टेजवर गेल्यावर समोर मंडपात नजर टाकली. मंडपात पुरुषांच्या बाजूला गाद्या, लोड टाकलेले होते आणि स्त्रियांच्या बाजूला केवळ ताडपत्री टाकलेली होती. त्यावरून चालतानासुद्धा खडे बोचत होते. त्या खडय़ांवरच बायका बसल्या होत्या, त्यात त्यांची मुलं मांडीवर उडय़ा मारत होती. त्यांना ते खडे किती बोचत असतील, याचा विचार कोणाच्याच कसा लक्षात आला नसेल! पण मी त्या कार्यक्रमाला सुरुवात करतानाच वैदर्भीय बोलीतूनच वाचलेले बोर्ड आणि समोरची परिस्थिती उलगडून सांगितली. मी म्हणाले, एक तर हे सगळे बोर्ड-पाटय़ा काढून टाका नाही तर स्त्रियांनाही लोड, तक्के, गाद्या बसायला द्या. तुम्ही त्यांच्यासारखंच बसून पाहा मग कळेल त्यांचं दु:ख काय आहे ते. आजच्या अधिवेशनात हा बदल व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करते. असं म्हणून मी कार्यक्रम सादर केला. मला वाटलं होतं आता मोठे पदाधिकारी माझ्यावर चांगलंच तोंडसुख घेतील. आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी मंडपातली बैठक व्यवस्था स्त्री-पुरुषांना सारखीच केलेली दिसली. त्यामुळे सगळ्या बायका खूष होत्या. त्यांनी माझं खूप कौतुक केलं. माझी कार्यक्रमाला विरोध असूनही यायची आणि गप्प न बसता न्याय बोलायची बंडखोरी यशस्वी झाली.
– मंदा खापरे, डोंबिवली

फक्त हाती हात होते
चाळीस वर्षांपूर्वी आक्रमक होत, मी स्वत:च्या कुटुंबात, धर्मात, समाजात बंडखोरी करीत, आंतरधर्मीय विवाह केला. स्वखुशीने धर्मातर करून प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा माझा निर्णय योग्यच ठरला. आज मी चौसष्टीला आहे.
विशीत असताना माझ्या घरात माझ्या लग्नाचे वेध लागले. वर संशोधन सुरू झाले. पण मला घरी सांगण्याची हिंमत होत नव्हती. एकटी आई माझ्या बाजूने होती. ५ डिसेंबर १९७६ ला रजिस्टर व वैदिक पद्धतीने विवाह करण्याचे ठरवले आणि आमच्या ख्रिश्चन कुटुंबात, समाजात स्फोट झाला. असंतोषाचे वातावरण पसरले. त्या वेळी आंतरधर्मीय विवाह स्वीकारण्याची मानसिकता बिलकूल नव्हती.
भाऊ-भावजयीने जीव नकोसा केला. म्हणाले, ‘‘घरातून चालती हो. हिंदू धर्म स्वीकारायचा नाही. मेल्यावर जाळतील वगैरे वगैरे..’’ मी घर सोडले. दिलीपच्या, माझ्या पतीच्या घरीही विरोध झाला. त्याच्या आजी होत्या. त्यांचं सोवळं होतं. ख्रिश्चन मुली चांगल्या नसतात वगैरे मताच्या त्या होत्या. निष्कांचन अवस्थेत त्यानेही घर सोडले. लग्न करून एका झोपडीत अंबरनाथला संसार थाटला. दिवा व मेणबत्तीच्या प्रकाशात माहेर-सासरचं पाठबळ नसताना संसार सुरू केला.
अंबरनाथ नगरपालिकेत माझी नोकरी होती. क्वार्टर मिळाली. दिलीपला सरकारी नोकरी लागली. एक वर्षांच्या आत कन्यारत्न झाले. नंतर मुलगा झाला. माझे सासरे उच्च विचारसरणीचे होते. आमचे कर्तृत्व, स्वभाव, गोड मुलं पाहून विरोध मावळला. दोन्ही समाजांनी आपलंसं केलं. देशस्थ ब्राह्मण समाजाने ‘समाजभूषण’ देऊन सन्मानित केलं. दोन्ही मुलं करिअर व संसारात सुखी आहेत. आज हा सुखी संसार त्या वेळी केलेल्या बंडखोरीमुळे अनुभवायला मिळत आहे.
– मोनिका कुवर, अंबरनाथ

मौनं सर्वार्थ साधन्म
आजची तरुणी हॅपी टू ब्लीड म्हणत मोठय़ा अभिमानाने मिरवताना पाहून खूप कौतुक वाटते. वैचारिक प्रगल्भतेचीच ती नांदी आहे. पण साधारण ४०-४५ वर्षांपूर्वी स्त्री मनावर पारंपरिक रूढी वर्चस्वाचे एवढं दडपण होतं की, मनात असूनही ती ते झुगारून टाकू शकत नव्हती.
आमची एकत्र कुटुंबपद्धती. त्यातही चार भावांची कुटुंबे वेगवेगळी पण एकाच इमारतीत राहात असल्याने बराच वावर सामूहिक होता. त्यात माझी नोकरी. सकाळी पावणेसातलाच घराबाहेर पडावे लागे. एरव्ही घरातली सगळी मंडळी आरामात सात वाजेनंतर उठत. पण मासिक पाळीच्या त्या ४-५ दिवसांत मात्र नाइलाजास्तव त्यांना लवकर उठावे लागे. पिण्यासाठी पाणी, चहा, आंघोळीला पाणी-कपडे आदी गोष्टी आदळआपट करीत दिल्या जायच्या. त्या तीन-चार दिवसांत तर घरात रजस्वलेला स्नानाचीही मुभा नव्हती. पण मी दुराग्रहाने ती मिळवली होती. थेट मागीलदारी जाळीजवळ आंघोळ करावी लागे. तिन्ही ऋ तूंत! एकदा हे सारे असह्य़ होऊन मी खूप आजारी पडली. ‘यापुढे मी बाथरूममध्येच आंघोळ करणार’ असे निक्षून सांगितल्यावर भरपूर कटकटी, आकांडतांडव होऊन एकदाची मागीलदारीची आंघोळ बंद झाली.
माझी मुलगी वयात आल्यावर मात्र चार दिवस बाजूला बसण्याला मी विरोध केला. त्यावरून बरेच महाभारतही घडले. कोणी आजारी पडले वा एखादी दुर्घटना घडली, तर खापर माझ्यावर फोडले जाई. ‘कालवाकालव केल्यानेच ही फळं आम्हाला भोगावी लागतात,’ असे वाग्बाणही अविचारीपणाने अंगावर येत. पण मी मख्ख!
संसारातील आसक्ती न सुटलेल्या आणि पारंपरिकतेतील फोलपणा ध्यानात न घेणाऱ्या या जुन्या विचारांच्या सहवासात राहताना ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ हे तत्त्व अंगीकारत आजही मी यथामती, यथाशक्ती बंडखोरीचे प्रयत्न करतेच आहे.
– उषा, नाशिक

पाळीतच लग्नविधी पार पाडले
सध्या माझे वय ८२ आहे. पण जेव्हा मुलीचे लग्न झाले तेव्हा तिचे लग्न देवक वगैरे धार्मिक विधी करून कन्यादान मी केले त्या वेळी माझी मासिक पाळी चालू होती. माझ्या, आमच्या मागे जबाबदार कोणीही मोठे माणूस, बाई माणूस नव्हते. माझी आई नव्हती. सासू असून त्रयस्थासारखी लग्नाच्या आदल्या दिवशी गावाहून आली. दडपणामुळे व भीतीमुळे माझी मासिक पाळी लग्नाचे आदल्या दिवशी चालू झाली. मनावर दगड ठेवून घरात नवऱ्यालाही न सांगता मुलीचे लग्न लावले. पहिले वर्षभर मुलीचे सर्व चांगले होईल ना? या भीतीत गेले. पण अगदी आजही माझ्या मुलींचा संसार सुखाचा चालू आहे. तशी मी इंग्रजी दुसरीत असताना तेव्हा आमची ट्रिप जोगेश्वरीच्या गुंफे त गेलेली होती. मी मासिक धर्म चालू असतानाही शंकराच्या गाभाऱ्यात गेले होते. मुलांना जशी दाढी तशी मुलींना मासिक धर्म हा प्रकृतीचा एक नियमच आहे. त्याचा बाऊ केला नाही, हे बरंच असं वाटतं.
– लीलावती कापरेकर, मुंबई

पुनर्विवाहाचा निर्णय
मी विज्ञान शाखेची प्राणीशास्त्र विषयातील पदवीधर. बी.एड., वडील रयत संस्थेत माध्यमिक शिक्षक. मी त्यांची ज्येष्ठ कन्या. त्यांनी शिक्षण देऊन लग्न करून दिले. नवऱ्याला आधीपासून किडनीचा त्रास होता. लग्नानंतर वर्षांच्या आतच दोन्ही किडन्या निकामी होऊन त्याचा मृत्यू झाला. माझे त्या वेळी वय होते २५ वर्षे. त्यातच मी विना अपत्य, विधवा झालेली, कपाळकरंटी वगैरे वगैरे.
मला एक बहीण व दोन भाऊ, सर्वजण अविवाहितच. मला पुनर्विवाह करायचा होता पण माझ्या बहीण-भावांच्या लग्नाचे काय? घराण्याला बट्टा लागेल, नातेवाईक, समाज काय म्हणेल? याचीच सर्वाना चिंता लागलेली. पण थोरले दीर पोपटराव देशमुख (आण्णा) आणि यशवंतराव मोहिते (भाऊ) महाराष्ट्राचे थोर विचारवंत व समाजसुधारक यांनी माझे पुन्हा लग्न करून देण्याचा ठाम निश्चय केला.
दरम्यान, भारती विद्यापीठ, कडेगाव येथे मला शिक्षिकेची नोकरी मिळाली. जून १९९४ला विधवा झाले. याच काळात धर्म-जात, व्रतवैकल्ये, कुंडली-भविष्य, देव-दानव हे संपूर्ण खोटं व तकलादू आहे याची खात्री झाली. त्यातच मी शास्त्र शाखेची पदवीधर. पूर्णपणे नास्तिक बनले. कारण लग्नापूर्वी एकाही भविष्यवेत्याला मुलाच्या कुंडलीचा अभ्यास करताना मुलाचे अल्पायुषी जीवन दिसले नाही.
विधवा झाल्यावरचा सवाष्ण स्त्रियांचा त्रास किती व्हावा याची गणतीच नाही. तसेच प्रथम पतीच्या संपत्तीवर सर्वजण हक्क सांगायला लागले. त्याच काळात मला खऱ्या अर्थाने माणसे जवळून वाचता आली. पुनर्विवाहाचा निर्धार पक्का होताच. पुनर्विवाह झाला. आज आम्ही उभयतांना एक मुलगी व एक मुलगा अशी अपत्ये आहे. माझ्या गर्भारपणात मी कसलीच प्रथा परंपरा पाळल्या नाहीत. तरीपण दोन्ही अपत्ये व्यंगविरहित आहेत. सध्या आम्ही उभयता भारती विद्यापीठात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मी माझ्या जीवनात व १८ वर्षे वैवाहिक जीवनात संघर्ष करीत आनंदाने जगत आहे. त्याकाळी माझा पुनर्विवाह ही बंडखोरी होती, परंतु माझं आयुष्य आनंदाने जगायचा मला अधिकार का नसावा?
– विद्या जाधव, सांगली

‘मुक्ता’ची बंडखोर आई
१९८०मध्ये मी बारा वर्षांची होते. ‘नेहमीप्रमाणे’ हरितालिकेचा उपास करायचा होता. चांगला नवरा मिळावा म्हणून उपास करायचा? ज्या स्त्रिया हा उपास करतात त्यांना चांगला नवराच मिळालाय का? त्या वयात मला या विचारांनी घेरल्यावर मी शांतपणे जाहीर केलं, ‘मी उपास करणार नाही.’ या माझ्या बंडाला फक्त सुरुवात ही अशी झाली. ‘कर’ म्हणून सांगितल्यावर किंवा ‘करायचं असतं’ म्हणून जे करतो ते नाकारणं म्हणजे बंडच. मग माझे स्वत:हून शोध सुरू झाले. स्त्रिया परंपरा आहे म्हणून काय काय करीत राहतात? माणूस कोणत्या परंपरा पाळत राहतो? सामाजिक परंपरा तंतोतंत पाळणारे सुखी का नाहीत? असे फार मोठे प्रश्न वयाच्या बाराव्या वर्षीच्या ‘त्या’ बंडानंतर मी सोडवू लागले. त्यामुळे झाले काय की ‘ही काही तरी जगावेगळं करते, करणार’ असा शिक्का बसला. आई-वडील, सख्खे, नात्यातले, मैत्रीतले, ओळखीचे किंवा अनोळखीसुद्धा माझ्या वागण्याला ‘एक वेगळी केस’ म्हणून बघतात. वयाच्या अडतिसाव्या वर्षी मुस्लीमधर्मीयाशी पाहून, बोलून, ओळखीतून, ठरवून लग्न केले. हरितालिकेचा उपास न करता स्वत:ला आणि इतरांना आणि मलादेखील ‘माणूस’ म्हणून ओळखणारा नवरा केला. जन्मानंतर नामकरण केलेच होते म्हणून मी जी मंजुश्री जोशी होते ती आजही मंजुश्री जोशीच आहे. निसर्ग म्हणतो मी एक आई आहे. समाज म्हणतो मी ‘मुक्ता काझी’ची बंडखोर आई आहे.
– मंजुश्री जोशी, ठाणे

माणूस म्हणून जगले
माझा जन्म १९२८ मध्ये कुडाळदेशकर ब्राह्मण घरात कोकणातल्या विरण या खेडेगावी झाला. घरी शिक्षण सोडून सर्व तऱ्हेची समृद्धी होती. मी १० वर्षांची होऊनही शिक्षणाचा थांगपत्ता नव्हता. वडिलांना शिक्षणाचे महत्त्व नव्हते, पण आईला आवड होती. तिच्या संमतीने मालवणला आजीकडे राहून कन्याशाळेत नाव दाखल केले आणि विरणच्या घरातील सोवळे-उपास-शिवाशिव हे विषय विसरून गेले. कशीबशी मॅट्रिकपर्यंत मजल गेली. परीक्षेचे सेंटर सिद्धार्थ कॉलेज, मुंबई. मॅट्रिक परीक्षेच्या निमित्ताने मालवणहून बोटीने एकटी मुंबईत आले ती १९४८ साली. १९५०मध्ये सर्वाचा विरोध पत्करून पुन्हा मुंबईत येऊन नोकरी पकडली. १९५० ते १९५७ पर्यंत मुंबईत एकटीच राहिले. नोकरीत असताना एक सहकारी मुस्लीमधर्मीय होता, त्यांची मी माझा जीवनसाथी म्हणून निवड केली आणि माझा १९५७ साली आंतरधर्मीय विवाह झाला.
लग्नाआधी कट्टर हिंदू चाली-रीती, परंपरा आणि लग्नानंतर मुस्लीम चाली-रीती, परंपरा मी पाळल्या नाहीत. मला सासरी घरातील नवरा सोडून बाकीच्या स्त्रियांनी बराच विरोध केला. सर्व परंपरांना मी विरोधासाठी विरोध म्हणून नाही तर मला त्या पटत नव्हत्या म्हणून केल्या नाहीत. नवऱ्याने माझ्या वागण्याला विरोध केला नसला तरी मूकपणे नाराजी ठेवली. प्रत्यक्ष त्यांच्या कोणत्याही कार्यक्रम, समारंभ यांना बरोबर घेऊन न जाता, पण त्याकडे मी दुर्लक्ष करून माणूस म्हणून जगले. ना स्त्री म्हणून, ना हिंदू म्हणून, ना मुस्लीम म्हणून.. हीच माझी आजच्या क्षणापर्यंतची बंडखोरी.
– शमा काझी, ठाणे

 

आमच्या लग्नाची गोष्ट!
आमची ही गोष्ट आहे ४५-४६ वर्षांपूर्वीची! तसा आमचा प्रेमसंबंध जवळजवळ ३ वर्षे होता. दोघांच्याही घरी प्रेमाची कुणकुण लागलेली. लग्नाला दोघांच्याही घरून विरोध. कारण पती गुजराथी आणि मी महाराष्ट्रीय. ‘रीतसर लग्न’ शक्यच नव्हतं. त्यामुळे न्यायालयात नोटीस देऊन आम्ही लग्न करण्याचं ठरवलं. आम्ही दोघंही पुण्याचेच. माझ्या पतींची नोकरी भिवंडीला म्हणून १९ मे १९७० रोजी ठाणे न्यायालयात अर्ज केला. लग्नासाठी १९ जून हा दिवस नक्की केला. हुरहूर लागलेली. सर्व सुरळीत होईल नं?
मी पुण्यात आणि हे भिवंडीला. पण दैवाने साथ दिली, माझ्या मामेबहिणीचं लग्न १८ जूनला मुंबईत होतं. त्यामुळे आम्ही घरचे सर्वजण मुंबईला लग्नाला जाणार होतो. मग आम्ही योजना आखली. हे भिवंडीहून मुंबईला-खारला येणार आणि मला घेऊन ठाणे कोर्टात जाणार. मला घ्यायला यांचे सहकारी रमेश मेहता घराजवळ आले. पण मी तर कोणालाही ओळखत नव्हते. त्यांनी आमच्या दोघांचा एक फोटो आणला होता. तो दाखवून स्वत:ची ओळख पटवून दिली. मग मी त्यांच्याबरोबर साधारण एक फर्लागभर दूर असलेल्या जीपकडे पळत गेले. आम्ही सर्वजण ठाण्याला कोर्टात २ वाजेपर्यंत हजर झालो आणि शुभमंगल झाले! आज ४५ वर्षे झाली या गोष्टीला. सासरी-माहेरी दोन्हीकडे चांगले संबंध आहेत. पण लग्नासाठी मात्र मला बंडखोरी करावी लागली.
– नीना पोरवाल, पुणे.

 

देवी दर्शन
आमच्या घरी पाळीचं मोठं स्तोम होतं. त्या दिवसात खाली जमिनीवर झोपायला लागायचं. देवघरात प्रवेश करायला मनाई होती. एकदा मी देवघरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यावर माझ्या काकीने मला चांगलाच ‘प्रसाद’ दिला होता. माझ्या शाळेतील शिक्षिकेने मला पाळीबद्दल आणि तिच्याबद्दल समाजामध्ये असणाऱ्या गैरसमजांबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे पुढे एकदा काकीबरोबर गोंदिया येथे नवरात्रीमध्ये सार्वजनिक देवींचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेथे मला पाळी आली, मात्र ही बाब मी काकीला सांगितली नाही. रात्रभर आम्ही देवीदर्शन घेतले. मात्र दुसऱ्या दिवशी तिला ही बाब मी सांगितली. तिला या गोष्टीचा खूपच राग आला. घरातील ज्येष्ठांच्या कानावर तिने ही बाब घातली. मी मात्र मी कोणतीही चूक केली नसून त्यामागचं कारण स्पष्ट केलं. माझ्या वागण्याचा सर्वानाच राग आला होता. केवळ माझी लहान बहीण माझ्या पाठीशी होती. आताही मी या खुळचट परंपरांविषयी मैत्रिणींमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.
– नलिनी खडसे, नागपूर.

 

नोकरी करण्याचं स्वातंत्र्य
माझं लग्न १७ व्या वर्षी झालं. लग्नानंतर आम्ही पती-पत्नींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मला लग्नानंतर शिक्षण घ्यायचं होतं. माझ्या स्वत:च्या पायांवर उभं राहायचं होतं. मात्र माझ्या नवऱ्याला मुलींनी चूल आणि मूल यातच समाधान मानावं असं वाटे. त्यावरून आमच्यात अनेकदा वाद होत. मारहाणही झाली. मला एक मुलगी झाल्यावरही माझी शिक्षणेच्छा काही गप्प बसू देईना. म्हणून मी नर्सिगचा कोर्स करण्याचं ठरवलं. मात्र नवऱ्याने ‘तुला शिक्षण करायचं असल्यास घर सोडावं लागेल’ अशी धमकी दिली. जिथे वर्तमानपत्रं घेण्याचा, टीव्हीवर आवडणारे समाजप्रबोधनपर कार्यक्रम पाहण्याचं स्वातंत्र्य नाही, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नाही तिथे का राहावं? शेवटी मी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. सध्या मी माझ्या मुलीपासूनही दूर झाले आहे. मात्र, विचारांचं, धर्माचं आणि नोकरी करून स्वत:च्या पायावर उभं राहण्याचं स्वातंत्र्य उपभोगत आहे.
– वंदना घरडे, अमरावती.

 

सोवळं सोडलं
आयुष्याच्या डोंगरावरल्या साठाव्या पायरीवर मी पाऊल टाकलं आहे. मागे वळून बघितल्यावर जाणवतं इथवर यायला कितीतरी वेळा बंडखोरी करावी लागली आहे. अडतीस वर्षांपूर्वी देशपांडेंचा उंबरठा ओलांडून पाऊल ठेवताच जाणवलं ते सासूबाईंचा जमदग्नीचा अवतार. सासरच्या घरात खूपच सोवळं होतं. कामवाल्या छबूताई स्वच्छ भांडे घासत. सोवळं म्हणून ती भांडी परत घासावी लागत. आमच्याकडे दत्ताचं मंदिर होतं. त्या मंदिरातही सरसकट सर्वाना प्रवेश नव्हता. कामवाल्या छबूताईंनाही नव्हता. मंदिराचं, घरचं सगळं काम करणाऱ्या बाईला देवदर्शनापासून वंचित ठेवणं मला अजिबात पटत नसे. शेवटी एकदा दत्त जयंती उत्सवादरम्यान मी त्यांना घेऊन गाभाऱ्यात गेले. सासूबाईंनी जमदग्नी अवतार धारण केला, पण मी तो सहन केला. तीच गोष्ट सोवळ्याच्या पाण्याबद्दल. क्षुल्लक गोष्टींमुळे घरातील पाणी फेकून देणं ही बाब पाणीटंचाईच्या काळात कशी चुकीची आहे, हे मला त्यांना सांगावं लागलं. सवाष्ण सुटीच्या दिवशी बोलावणं, लहानांचेही विचार मान्य करणं अशा अनेक गोष्टींसाठी मला घरात बंडखोरी करावी लागली. मात्र त्यामुळे आजपर्यंत आनंदी आणि कृतार्थ जीवन जगता आलं.
– प्रतिभा देशपांडे, डोंबिवली.

 

शिक्षण हेच ध्येय
माझं माहेर सांगली जिल्ह्य़ातलं माळगाव. आमच्या गावात हायस्कूल असूनही सातवीच्या पुढे कोणतीच मुलगी शिकलेली नव्हती. मुली हायस्कूलला गेल्या की बिघडतात असा त्यावेळी समज होता. मला मात्र पुढे शिकायचं होतं, म्हणून मी वडिलांकडे हट्ट केला. आर्थिक स्थिती आणि गावातील लोकांच्या दबावामुळे मनात असूनही वडील तयार नव्हते. शेवटी मी स्वत: हायस्कूलच्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना जाऊन भेटले. माझी एक मैत्रीणही पुढे शिकण्यास तयार असल्याने मुख्याध्यापक स्वत: घरी आले आणि त्यांनी स्वत: आमची जबाबदारी घेत वडिलांना राजी केलं. शाळा सुरू झाली आणि मला त्याकाळची अकरावी म्हणजेच मॅट्रिकपर्यंत शिकता आलं. मला पुढे एस.टी.सी. करायचं होतं. मात्र शहरात राहून शिकण्याचा विचार करणं एक स्वप्नच होतं. मी पुन्हा वडिलांकडे पुढच्या शिक्षणासाठी हट्ट घरला. माझा एक चुलतभाऊ सांगलीत राहायचा. त्यांनी त्यावेळी माझी जबाबदारी स्वीकारली. मात्र एका काकांच्या विरोधामुळे वडिलांची दोलायमान स्थिती झाली. अखेर मला काकांशी बोलावं लागलं. मी त्यांना सांगितलं की, ‘‘मी काही तुमच्या नावाला कलंक लावणार नाही, विश्वास ठेवा.’’ अखेर त्यांनी परवानगी दिली. पुढे शाळेत नोकरी करता करता उच्च शिक्षण घेतलं. आज निवृत्त होऊन १४ वर्षे झाली. मी बंडखोरी केली नसती तर कदाचित.. विचारही करवत नाही.
– चेलनादेवी खुरपे, सांगली.

 

शिक्षणाने धाडस
शालेय शिक्षणाच्या शेवटच्या पायरीवर असताना लग्न झालं. दहा माणसांचं कुटुंब. शिक्षण बाजूला राहिलं. संसार सुरू झाला. माझे पती पोलीस दलात कार्यरत होते. दोन मुलगे झाले. आजारपणामध्ये पतीचं निधन झालं. वयाच्या पस्तिशीत वैधव्याचं दु:ख आणि माझी दोन मुलं यांचं भवितव्य आता माझ्या हाती. हताश व सुन्न अवस्था! त्यात माहेरीही कोणीच नाही. यांच्या निधनानंतर माझं मंगळसूत्र काढण्याच्या प्रकारांना मी ठाम नकार दिला. सर्वामध्ये मी आगावू असे भाव. पण माझी मुलं माझ्यासोबत होती. मी ठरवलं होतंच लढायचं पण मुलांच्या पाठबळामुळे हत्तीचं बळ आलं. माझे मामे सासरे, तसंच जवळचे नातेवाईक यांची मला मोलाची साथ मिळाली. मी सदैव त्यांची ऋ णी आहे.
त्यानंतर मी टिळक विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. शाळा सोडल्यावर एकवीस वर्षांनी अभ्यास सुरू केला. वाटत होतं या दु:खात आपण कसा काय अभ्यास करू शकू? नापास झाले तर. मुलंही हसतील. पण मी बी. ए. (समाजशास्त्र) पदवीधर झाले. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण हा माझ्या धाकटा मुलगा व मी एकाच वर्षी पदवीधर झालो. फार समाधान वाटलं. हसं झालं नाही.
मी कोणत्याही अलंकाराचा त्याग केला नाही. त्यामुळे खूप मानहानी, हेटाळणी सहन केली. माझी दोन्ही मुले शिकून चांगली मार्गी लागली. मोठा पोलीस दलात गेला. कारण त्याला वडिलांच्या खाकी वर्दीचं खूप आकर्षण होतं. माझा धाकटा मुलगा सनदी लेखापाल (सी.ए) झाला. सुखाचे दिवस असतानाच माझा मोठा मुलगा आकस्मिक या जगातून निघून गेला. आता मात्र मी कोसळले. पण धाकटय़ा मुलाकडे पाहून दु:ख गिळले. त्याचं लग्न ठरलं. आम्ही दोघांनीही आमच्या व्याह्य़ांना सर्व विवाहविधी मीच करणार असं सांगितलं. तेही आनंदाने तयार झाले. खूप पाठिंबा दिला त्यांनी. सर्व काही मला मिळालं. सर्व अपमान, हेटाळणी, कुजकट बोलणी सहन केली. ते सार्थकी लागलं. ही बंडखोरीच ना. वाचनाच्या छंदाने मला तारलं.
– समिधा गोसावी, भांडुप (प.)

 

आज समाधान देणारी ‘ती’ बंडखोरी
आमच्या विवाहाला नुकतीच पन्नास वर्षे पूर्ण झाली. याचा अर्थ माझ्या बंडखोरीला कमीत कमी पाव शतक उलटून गेलं आहे. मुलं मोठी होत असताना घरातील वयस्क पिढीच्या ‘गावंढळपणा’च्या संकल्पना मोडीत काढणं ही मात्र खरंच बंडखोरी होती. मी घरी काही मोजके सण समारंभ सुरू केले. त्यामागचं महत्त्वाचं कारण आम्हा सर्वाची एकजूट व्हावी. सर्वानी मिळून कामं करावीत. काही वेळा निर्णय घेणं ही मुलांची जबाबदारी होती आणि ते निर्णय एकत्रितपणे अमलात येत असत.
सत्यनारायण, दिवाळी इत्यादी सणांत मी माझी पाळी सुरू असेल तरी नैवेद्य, प्रसाद करणं सुरू ठेवलं. मुलगी मोठी होत असताना माझ्या पाळीच्या दिवसात मी तिला घेऊन मुद्दाम देवळात जात असे. मुलीची पाळी सुरू झाल्यावर देवळात जाणं, घरच्या देवांची पूजा करणं तिला करावयास सांगे. आमचं चौघांचं कुटुंब, देवदेव, कर्मकांड यावर विश्वास ठेवणारं नाही. पाळीच्या दिवसातील कठोर नियम इत्यादी कसे चूक आहे हे मुलीला समजावं म्हणून हा खटाटोप केला. परंतु माझी पाळी सुरू असताना, प्रसाद करणं, पूजा करणं हे जेव्हा मी माझ्या शेजारणी, मैत्रिणी यांना सांगितलं तेव्हा तीर्थप्रसाद, हळदी- कुंकू अशा समारंभात माझ्याकडे येणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण एकदम कमी झालं.
मुलं थोडी मोठी झाल्यावर माझं पुढचं, वेगवेगळ्या वाटेनं जाणारं शिक्षण सुरू केलं. ही माझी मोठी बंडखोरी होती. घरातील जेष्ठांना त्यांची सेवा करणं सोडून घराबाहेर पडणं मान्य नव्हतं. माझं शिक्षण मी पुरं केलं आणि बधिर-मूक मुलांची विशेष भाषा शिक्षिका म्हणून काही र्वष काम केलं.
निवृत्त झाल्यानंतर काय करावं हा प्रश्न माझ्यापुढे आ वासून उभा राहिला. शेवटी मनाचा कौल योग्य ठरवून मी मास्टर्स इन सोशल वर्क केलं. पुढील बारा र्वष तीन स्वयंसेवी संस्थांमार्फ त महिला आरोग्य या विषयात शहरे, खेडी, वाडय़ा-वस्त्या या ठिकाणी काम केलं. ही माझ्या आयुष्यातील तिसरी इनिंग मला फार मोठं समाधान देऊन गेली. थोडं घरच्या विचारांच्या विरोधात काम केलं पण त्याचं आज समाधान आहे.
– सिंधू जोशी, ठाणे.

 

मिळाला बेदम मार
खरं म्हणजे संस्कृती, रीतीरिवाज, परंपरा, रीतभात, मर्यादा, काळाबरोबर बदलणं यापैकी काहीही न समजण्याचं वय होतं, ते अर्थात ५० वर्षांपूर्वीचं. एकदा आई म्हणाली, अगं सर्वच स्त्रियांना मासिक धर्मातून, त्यासाठी बाहेर बसण्यातून जावं लागतं. मी विचारलं, अगं मग देवी पण स्त्रीच होती ना? तिला पण..फक्त मार बसला. उत्तर नाही मिळालं. मग मात्र मन बंड करू लागलं. एक दोन वेळा पाळी सुरू असताना देवळातपण जाऊन आले. कोणालाच कळलं नाही. देवाचा कोप वगैरे झाला नसावा. कारण मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते.
असेच एकदा एका मैत्रिणीकडे पूजेला गेले होते. खूपच आग्रह झाल्याने पंगतीत बसून जेवले. हळदी कुंकू लावून घेतलं. आईला कळू नये म्हणून घरी येताना सर्व खुणा पुसून टाकल्या. पण दुसऱ्या दिवशी शाळेत बाजूला बसणाऱ्या मैत्रिणीने हळदी कुंकूसाठी गेलेल्या मैत्रिणीला सांगितलेच की हिची पाळी सुरू असतानाही ही तुझ्याकडे आली. आता मात्र युद्ध पेटणार हे नक्की. तसंच झालं. दुसऱ्या दिवशी तिच्या आईने भर रस्त्यात मला बेदम मार दिला. खरं म्हणजे मी शांतपणे तिला सांगणार होते की, देव आणि मासिक पाळी याचा काहीही संबंध नसतो. पण माझं काहीच न ऐकता ती मारत राहिली. घरी जाईपर्यंत अंग चांगलंचं दुखू लागलं. पण आईला सांगितलं तर यापेक्षा जास्त मार आणि तोही वेताच्या काठीचा, म्हणून मग..
आता ६५ व्या वर्षी माझी मते ठाम आहेत. मी माझ्या घरी विधवांनाही हळदीकुंकूला बोलावते.
– प्रतिभा भिसे, ठाणे.

 

सहजीवनाचा निर्णय
मी माझं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्या दरम्यान माझी एका सिव्हील इंजिनीअर मात्र कॉलेजमध्ये प्रोफेसर असलेल्या व्यक्तीशी ओळख झाली. काही महिन्यांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात होऊन आम्ही दोघं विवाहबद्ध झालो. मी कोकणस्थ ब्राह्मण व ते ९६ कुळी मराठा असल्याने आमच्या लग्नाला सासरहून खूपच विरोध झाला. माहेरहून आईवडिलांनी समजूतदारपणा दाखवून वैदिकपद्धतीने लग्न लावून दिलं. मुलं झाली. संसार चांगला झाला. पण ७१ व्या वर्षी हे आजारपणाने वारले. मी ६३ वर्षे वयाची. तशी मी एकटी नव्हते. मला मुलं, सुना, नातवंडं, भाऊ-बहीण सर्व आहेत. पण जीवनसाथी गेल्यावर एकटेपणा जाणवतो व गत आठवणींनी जीव नकोसा होतो.
काही महिन्यांनी मी सावरले व मैत्र सहजीवन जगण्याचा निर्णय घेतला. एक रजिस्टर संस्थेतर्फे मी व आताचे माझे जीवनसाथी एकत्र आलो. त्यांनाही मुलं नातवंडं व सून आहे. तेही विधुर आहेत. दोघेही समदु:खी असल्यामुळे एकमेकांना समजून घेऊन आनंदी व समाधानी जीवन जगत आहोत.
– सरला, कळवा (ठाणे).

 

घर सोडलंच
मी विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षांत असताना आईबाबांनी माझा विचार न घेता माझं लग्न करून दिलं. मला नवऱ्याविषयी काहीच माहिती नव्हती. मी रडतरडत लग्न केलं. सासरी मानसिक छळ सोसावा लागला. नवऱ्याने तर कधीच माझी बाजू घेतली नाही. मी कॉलेजला जाण्याचा निर्णय घेतला. तर घरातल्या सगळ्यांनी मला विरोध केला. संशय घेऊन सगळेच टोचू लागले. आई-बाबांना सांगितलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. मी एकटीच पडले. तरी मी अ‍ॅडमिशन घेतलं बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षांला. दिवाळीपर्यंत मला कोणीही कॉलेजला जाऊ दिलं नाही. एका मैत्रिणीच्या मदतीने कॉलेजच्या प्रिन्सिपलची परवानगी काढून वार्षिक परीक्षेस बसण्याची परवानगी मिळवली. खूप धावपळ केली. गुपचूपच. पण पूर्ण वर्ष कॉलेज केलं नसल्याने कशी पास होणार? झाले नापास.
पण हार नाही मानली. सगळ्यांना सांगून टाकलं. मी तुमचे कोणाचेही पैसे मागत नाही. नोकरी करते. कॉलेज पूर्ण करते. खूप मेहनतीने बी.एस्सी. पूर्ण केलं. सासरी खूप छळ होई. नवराही काम करत नसे, सर्वाचे खापर मात्र माझ्यावरच. आई-बाबांच्या कानावर पण घातले. त्यांनी पण दुर्लक्ष केलं. शेवटी कंटाळून वेगळं व्हायचा निर्णय घेतला. विरोधाला बळी पडले नाही. एकदाचा मोकळा श्वास मिळाला, पण तोही एकदा आत्महत्येचा प्रयत्न करून.
आता मी स्वतंत्र, एकटीच राहते. नोकरी करते. घर सोडण्याचा बंडखोरपणा मला करावाच लागला. त्याची खूप मोठी किंमत दिल्यानंतर.
– सुजाता पाटील, सातारा.

 

लोण पसरले
१८ वर्ष पूर्ण होऊन मी मुंबई महापालिकेत शिक्षिका म्हणून नोकरीस लागले ते वर्ष १९५१. अकरा वाजता भरणाऱ्या शाळेकरिता दहा/ सव्वादहाला निघावेच लागे. दहा पन्नासला हजर असणे आवश्यक असायचे. नवीन नोकरी. त्यामुळे वेळ पाळणे महत्त्वाचे. नोकरी लागून महिना होत होता; मासिक पाळी आली. त्या काळात त्याचा विटाळ मानला जाई. घरात वेगळे बसावे लागे. प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागे. एकदा शाळेत पोहोचायला अकरा दहा झाले. हेडमास्तरांनी परिस्थिती जाणून लेट माफ केला. पण पुन्हा लेट झाल्यास एक दिवसाची बिनपगारी रजा होईल व त्याचा पुढच्या नोकरीवर परिणाम होईल असेही बजावले. मी घरी आल्यावर आई-वडिलांना सर्व सांगितले. चाळीतील डबल रूम, सार्वजनिक नळ, घरात आठनऊ माणसे. त्यामुळे वेगळं बसण्याचा खूप त्रास होई. नाइलाजाने पुढच्या पाळीचे वेळी घरात कुणालाच सांगितले नाही. बाजूला बसले नाही. कारण पुन्हा उशीर परवडणारा नव्हता. दोन दिवसांनी ही गोष्ट आईच्या लक्षात आली.
घरच्या परिस्थितीत माझ्या नोकरीची घराला आत्यंतिक गरज होती. तेव्हा नोकरी सांभाळणे महत्त्वाचे हे तिला पटवले. घरात विटाळ कालवला म्हणून आजीने आकांडतांडव केले. मात्र माझ्या या बंडखोरीचा फायदा मला व माझ्या बहिणींना झाला. हे लोण हळूहळू शेजारीही पसरले. त्या घरांतील मुलीही बाजूला बसण्यास नकार देऊ लागल्या. अपेक्षित परिणाम झाला. याचा आनंद झाला.
– प्रभा सारंग, पुणे.

 

डॉक्टर असल्याचा फायदा
मी डॉक्टर असल्याने पाळी येण्याचे वैज्ञानिक कारण मला ठाऊक आहे. मी स्वत: देवकार्यात किंवा अगदी सणावरांना देखील ‘पाळी आहे’ म्हणून दूर राहिले नाही. माझ्या रुग्णांनादेखील जेव्हा शक्य असेल तेव्हा हाच सल्ला देते. सदसद्विवेकबुद्धीला न पटणाऱ्या प्रथा मी केव्हाच मोडून दिल्या.
– डॉ. सुजाता मराठे

 

परंपरा मोडल्या
माझा जन्म अहमदपूर तालुक्यातील माळ्याची खंडाळी या गावचा. वर्ष होते १९४५! बाराव्या वर्षी मासिक पाळी सुरू झाली. घरात सांगण्याची चोरी. घरात सांगितले की ‘मोठी’ झाली म्हणून शिक्षण बंद झाले असते. ते नको होते. कपडे स्वच्छ धुवून ते पुन:पुन्हा वापरून घरात राहत असे.
मैत्रिणीबरोबर मंदिरात जाणे, पूजा करणे हे चालतच असे. मनात कुठलीच शंकाकुशंका नव्हती म्हणूनच की काय, काही झाले नाही. इतकेच नव्हे तर पाळीत पापड केले, लोणचे घातले, अनारसेसुद्धा तळले. ना पापड काळे झाले ना लोणचे नासले. लग्न झाले. गर्भवती असताना सासूबाईंनी निक्षून सांगितले. ‘ग्रहणात नखे काढू नका. ग्रहणात जाऊ नका. भाजी चिरू नका. पण मी ऐकते का? बंडखोरी अंगात भिनलेली. नको म्हणालेले सर्व केले. बाळ झाल्या झाल्या त्याचे सर्व अवयव बरोबर व्यवस्थित आहेत ना ते पाहिले. ते व्यवस्थित होते आणि आजही आहेत.
मुलांची लग्ने झाली. परभणी, नांदेड, लातूर जिल्ह्य़ांत काही गावांत मराठा समाजात नवरी मुलगी लगेच घरी आणत नाहीत. मंदिरात, शेजारी किंवा पाहुण्यांकडे ठेवतात. मी याबाबतीतही बंडखोरी केली. माझ्या सुना पहिल्याच दिवशी घरी आणल्या. काहीही झाले नाही. सर्व मजेत आहेत. मुलामुलींच्या लग्नात पत्रिका नाहीतर रक्तगट पाहून लग्न केले. मुलं आजही यशस्वी संसार करीत आहेत. आणखी काय हवं.
– जी. एस. पतंगे-खोमणे

 

प्रेमाने बंडखोरीवर मात
४७ वर्षांपूर्वीचा तो काळ. डिसेंबर १९६८ ला माझं लग्न झालं. मी, माझे पती व सासूबाई आम्ही तिघेच मुलुंडला राहात होतो. थोडय़ाच दिवसानंतर माझी महिन्याची अडचण आली. आमच्या माहेरी काहीच सोवळंओवळं कडक नसल्यामुळे हे दिवस पाळणे वगैरे मला माहीत नव्हते आणि जमणारेही नव्हते. परंतु सासूबाईंना सांगितल्यावर त्यांनी मला जबरदस्तीने ते पाळायला लावले. पण त्याच दिवशी पक्के ठरवले की आता एक वेळ मी हे सहन केले, पण येथून पुढे मी हे करणार नाही. आणि मग पुढच्या महिन्यापासून चक्क सासूबाईंना सांगितलं मी हे काही पाळणार नाही. मला खूप रागवल्या त्या. पतीने थोडी मध्यस्थी केली तेव्हा सासूबाई शांत झाल्या. एकदा माझ्या भाचीचे लग्न देवळात होते नेमकी त्यावेळी माझी अडचण आली. मी देवळात गेले नाही. आमच्या घरी सर्व नणंदा आल्या तेव्हा मी पोळ्या करत होते. सर्वानाच आश्चर्य वाटले की ही अडचण म्हणते आणि पोळ्या कशी करते? सर्वानी मला बोलून बोलून नकोसे केले व माझ्या हातचा चहासुद्धा न घेता निघून गेल्या. मात्र मी त्यानंतरही प्रेमाने सर्वाचे करत राहिले आणि त्यातून सर्वाची मनं जिंकली.
– कल्याणी बिदनूर, नवीन पनवेल.

 

सहलीची मजा लुटली
माझं माहेर तसं सुधारकच! माझी आई विशेष कर्मकांड करीत नसे. पण रोजची साधी देवपूजा करत असे अन् चार दिवसांत ती बाजूला बसत नसली तरी पूजामात्र करायची नाही. आईला रोज सकाळी धांदल फार म्हणून मी रोजची पूजा करू लागले. फक्त
माझ्या चार दिवसांत आई ती करायची. मग मी विचार केला, खरंच पाळीच्या दिवसात बाईनं देवाजवळ का नाही जायचं? मी निर्णय घेतला आणि आईला सांगितलं, माझ्या पाळीतही मीच पूजा करणार आहेत. त्यात काही पाप नाही, हे मला पटलंय. आई दुराग्रही नव्हती अन् परंपरेचा बोजा वागवणारीही नव्हती तिनं संमती दिली. नंतर दक्षिण भारताच्या टूरला गेलो होतो. दक्षिणेत खूप देवस्थानं, अन् अगदी बघण्यासारखी.
मी नि:शंकपणे देवदर्शनाला गेले. आणि सहलीची
मजा लुटली.
– डॉ. सुरेखा बापट, नागपूर.

 

 

यांचीही पत्रे मिळाली
शलाका कुलकर्णी, अंजली प्रधान, विद्या चव्हाण-जाधव, शुभदा कुलकर्णी , सीमा परिहार, अंजू निमसरकार-कांबळे, अनुराधा केळकर