15 August 2020

News Flash

‘झीनिया’: कविमनाचे फुललेले स्वप्न

‘ख’ म्हणजे आकाश आणि ‘खपुष्प’ म्हणजे आकाशफूल

प्रतिभावंत साहित्यिकांचे द्रष्टेपण आजवर अनेक वेळा सिद्ध झाले आहे. अंतराळात फुललेले ‘झीनिया’चे फूल केशवसुतांच्या खपुष्पाची आठवण करून देणारे आहे. तर त्याही पूर्वी रूकय्या हुसेन या लेखिकेने केलेली सौरऊर्जेची कल्पना प्रत्यक्षात आलेली आहे. प्रतिभावंतांचे स्वप्नरंजन हे असे स्वप्नसंजीवनाच्या पातळीवर उतरलेले दिसते.

 

वर्तमानपत्रात नुकत्याच आलेल्या एका बातमीने माझे लक्ष अगदी वेधून घेतले. ती बातमी म्हणजे १७ जानेवारी २०१६ ला अंतराळात ‘झीनिया’चे फूल फुलले’, ही होय. त्याशेजारीच नारिंगी रंगाच्या त्या फुलाचे सुंदर छायाचित्रही होते. अमेरिकेच्या अवकाश संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांच्या अविरत प्रयत्नांमुळे एका कवीचे स्वप्नच जणू साकार झाले आहे. तो कवी म्हणजे कविवर्य केशवसुत- आधुनिक मराठी कवितेचे जनक. केशवसुतांच्या ‘झपूर्झा’ या गाजलेल्या कवितेतले शेवटचे कडवे असे आहे.
‘सूर्यचंद्र आणिक तारे
नाचत सारे हे प्रेमभरे
खुडित खपुष्पे फिरति जिथे
आहे जर जाणे तेथे
धरा जरा नि:संगपणा
मारा फिरके मारा गिरके
नाचत गुंगत म्हणा म्हणा-
झपूर्झा! गडे झपूर्झा!’
यातील ‘खुडित खपुष्पे’ ही कल्पना आज प्रकर्षांने आठवते. ‘ख’ म्हणजे आकाश आणि ‘खपुष्प’ म्हणजे आकाशफूल. शब्दकोशात ‘खपुष्प’ हा शब्द अशक्यप्राय गोष्टीसाठी वापरावयाचा शब्द म्हणून नोंदवला गेला आहे. मात्र केशवसुतांच्या कविप्रतिभेला अशक्यप्राय गोष्टही कल्पनेच्या पातळीवर शक्य वाटली होती. म्हणूनच त्यांनी अंतराळात खपुष्पे खुडण्याचे विलोभनीय दृश्य पाहिले. इतकेच नव्हे, तर तिथे जायचा मार्गही सांगितला. तो मार्ग अर्थातच कवी, शास्त्रज्ञ, चित्रकार अशा नवनिर्मितीच्या ध्यासाने झपाटलेल्या साऱ्याच प्रतिभावंतांसाठी होता. तो मार्ग विलक्षण उत्कटपणे झोकून देऊन काम करण्याचा होता. ज्ञानाचा हेतू आणि सौंदर्य जाणून घेऊन अनुभवण्याची इच्छा धरणाऱ्या साऱ्यांनाच तो मार्ग अवलंबण्याची गरज त्यांनी या कवितेत सांगितली आहे. (या कवितेचे लेखन आहे १८९३ मधले!) तरच ‘न नांगरलेल्या भुई’तून एखादी वनमाला आणता येईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. आज ते खपुष्प उमलले आहे. द्रष्टय़ा कवीच्या बाबतीत ‘वाचमथरेड नुधावति’- शब्दामागून अर्थ धावतो- हे वचन कसे खरे ठरते, याची प्रचीती येत आहे.
मुळात ‘झपूर्झा’ हा शब्द हीदेखील केशवसुतांची नवनिर्मिती होती. अनुप्रासातून निर्माण झालेल्या नादवलयामुळे या शब्दाच्या उच्चारासरशी झिम्मा खेळणाऱ्या मुलींची गिरकी घेण्यातली लय जाणवते. हा शब्द उत्कट तन्मयतेची आणि आनंदाची प्रतिमाच बनतो. त्यामुळे ‘नासाच्या’ शास्त्रज्ञांची मन:स्थितीही जणू ‘झपूर्झा’ अशीच झाली असेल!
प्रतिभावंत साहित्यिकांचे असे द्रष्टेपण आजवर अनेक वेळा सिद्ध झाले आहे. ‘रामाला ग चंद्र हवा’ असे जणू रामायणापासून लोक गात आलेले स्वप्न प्रचंड काळानंतर का होईना पूर्ण झाले. एके काळी स्वप्नरंजन वाटावे असे एखादे प्रभावी चित्र पिढय़ानुपिढय़ा लोकांच्या मनाला चेतना देत राहते आणि मानवजातीच्या सामूहिक कर्तृत्वाच्या गुणाकारामुळे सिद्धही होऊ शकते. अशा वेळी स्वप्नरंजन हे स्वप्नसंजीवनाच्या पातळीवर पोहोचलेले असते. आजकाल ‘फिक्शन’पेक्षा ‘फॅक्ट्स’ना वाचकांची मागणी दिसते. त्यामुळे कल्पित साहित्याची निर्मितीही मंदावली आहे. ही खरे तर मानवजातीची सांस्कृतिक पातळीवरची हानीच आहे. या दोन्ही प्रेरणा साहित्यनिर्मितीसाठी समान दर्जाच्या आहेत. म्हणूनच येथे आणखी काही साहित्यिकांनी केलेल्या कल्पनांची स्वप्नवत् वाटाव्या अशा गोष्टींची आठवण करून द्यावीशी वाटते.
राम गणेश गडकरी ऊर्फ बाळकराम यांनी ‘संपूर्ण बाळकराम’ या पुस्तकात ठकीच्या लग्नासाठी काढलेल्या मोहिमेच्या विनोदाच्या अंगाने मार्मिक चित्रण केले आहे. त्यातली त्यांची एक विनोदी कल्पना अशी आहे. ठकीच्या लग्नाच्या खटपटीत बाळकरामांचे नाजूक हृदय उपयोगी नाही, म्हणून ते लिहितात :- ‘माझे हृदय कापून काढून त्याच्या जागी त्या मृत दरोडेखोराचे उफराटे हृदय सुलट करून चिकटवून दिले आणि त्याची क्रिया अव्याहत चालण्यासाठी एक रास्कोप सिस्टीम लिव्हरवॉच कायमची किल्ली देऊन त्यावर बसवले. याप्रमाणे हे ऑपरेशन सुखरूप पार पडले.’ त्या काळी गडकरी यांनी कल्पनेने वर्णन केलेली ही हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया म्हणजे अतिशयोक्ती अलंकार वाटला होता. त्यांचा जीवनकाळ होता १८८५ ते १९१९. आणि जगातील पहिली हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली १९६७ मध्ये! यावरून गडकऱ्यांच्या अलौकिक कल्पनाशक्तीची झेप कळते.
येथे एका भारतीय लेखिकेचाही मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ती लेखिका म्हणजे रूकय्या हुसेन. या बंगाली मुस्लीम लेखिकेने मुस्लीम स्त्रियांच्या अज्ञानाचा ‘पर्दा’ दूर होण्यासाठी शाळा काढण्याचे कामही केले होते. तिच्या ‘सुलतानाज् ड्रीम’ या १९०५ मध्ये लिहिलेल्या इंग्लिश कथेतल्या काही कल्पना आगळ्यावेगळ्या आहेत. त्यात तिने आपल्या समाजातल्या स्त्रीच्या बंधमुक्ततेचे स्वप्न तर पाहिले आहेच, शिवाय इतरही काही स्वप्नवत् कल्पनांचे सुंदर जाळे विणले आहे. त्यातली एक कल्पना आज प्रत्यक्षात आली आहे. तिच्या त्या कल्पित राज्यातल्या स्त्रिया सौरऊर्जेवर स्वयंपाक करत असल्याचे वर्णन आले आहे. विशेष म्हणजे महिला विद्यापीठातल्या संशोधनाद्वारे त्या स्त्रियांनी अवकाशातून सूर्याची उष्णता मिळवण्याचे तंत्र आत्मसात केले असल्याचे त्यात नमूद केले आहे. (अर्थात त्या कल्पित राज्यातल्या पुरुषांनीसुद्धा या प्रकाराची नोंद ‘सेन्सेशनल नाइटमेअर’ अशी खिल्ली उडवत केली आहे!) आज सौरऊर्जा हे वास्तवातल्या ऊर्जेचे एक महत्त्वाचे साधन ठरले आहे. त्यामुळे लेखिकेच्या कल्पनेला दाद द्यावीशी वाटते. पाऱ्यासारखी वाटणारी काही स्वप्नेही कधी कधी आतला चैतन्याचा पारा जराही घरंगळून जाऊ देत नाहीत आणि कालांतराने साकार होतात, याची प्रचीतीच या कथेमधल्या या तपशिलाने येते.
एकंदरीत ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ उडी मारण्याचे बळ कल्पनाशक्तीने येत असते. त्यामुळे कल्पनाशक्तीची धार आणि झेप कायम टिकवून ठेवण्याचे आव्हान आपण दुर्लक्षित करता कामा नये. झीनियाच्या उमलण्याचा हाच भावार्थ आहे.

nmgundi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2016 1:53 am

Web Title: zynia flower in space and keshavsut poems
Next Stories
1 टेक्नोसॅव्ही मुलांचे ‘अशिक्षित’ पालक
2 आदिमाय द्रौपदी
3 ओळखीचं गाठोडं
Just Now!
X