|| निमिष साने

गेले तेरा स्वातंत्र्यदिन माझं वास्तव्य अमेरिकेत होतं. तेही प्रामुख्यानं पूर्व किनाऱ्यावरील वॉशिंग्टन डी. सी. ते बॉस्टन या पट्टय़ात. आधी विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रात पीएच. डी. आणि मग विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यापीठं व खासगी कंपनीत काम ही माझी पाश्र्वभूमी आहे. या काळात भारताशी, भारतात घडणाऱ्या घटनांशी व बदलांशी संपर्क असला तरीही हल्लीच इथे पुन्हा वास्तव्याला आल्यापासून मी नव्या नजरेनं या देशाकडे पाहतो आहे. अर्थातच अतिशय प्रगत देशात शिकताना, काम करताना ‘आधुनिक’ (आधुनिकोत्तर?) समजल्या जाणाऱ्या पाश्चिमात्य सभ्यतांशी झालेल्या संपर्कातून आलेला मूल्यविचार या नजरेचा मोठा भाग आहे. माझं शिक्षण आणि काम विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील आहे. मी सामाजिक शास्त्रांचा विद्यार्थी नाही. त्यामुळे स्वतंत्र भारतातील आधुनिकतेच्या आलेखाचं विवेचन व त्यातून सिद्धांतन करणं, हा माझा प्रांत नाही. मात्र, या लेखातून मी माझी काही निरीक्षणं नोंदवणार आहे.

२००९ मध्ये एका संगणक विषयाचा शिक्षक साहाय्यक असताना मी आणि माझा इजिप्शिअन सहकारी त्या विषयाच्या शेवटच्या परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षण करत होतो. करायला तसं काहीच काम नसल्याने आम्ही आपले गप्पा मारत बसलो होतो. ‘अरब स्प्रिंग’ अजून व्हायचं होतं. गप्पा इकडून तिकडून राजकारण, समाजकारण या विषयांवर आल्या. नासीर, अलिप्त राष्ट्रांची चळवळ इथपासून होस्नी मुबारकच्या धर्मनिरपेक्ष हुकूमशाहीपर्यंत! सरतेशेवटी- पुढे काय करणार, भारतात परत जाण्याविषयीचा विचार, इत्यादीवर गाडी आली. त्यावेळी तो म्हणाला, ‘‘तुम्ही जाऊ  शकता परत. तुम्हाला करता येईल  इथल्यासारखंच काम तिथेही! मी काय करू इजिप्तला जाऊन? मला काहीच संधी नाहीत.’’ नंतरच्या अनेक वर्षांत इराण, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका इथून आलेल्या लोकांसोबत बोलतानाही हेच जाणवलं. वसाहतवादी परकीय सत्ता, तिच्याविरुद्धच्या राष्ट्रवादी स्वातंत्र्य चळवळी, मग साठ-सत्तरच्या दशकांतील समाजवाद, पुढे नव्वदच्या दशकात आलेला खासगीकरण-उदारीकरणाचा रेटा आणि प्राचीन सभ्यतांशी नातं अशी वरवर बरीच साम्यस्थळं असणारे हे सगळे देश असले, तरीही ‘काय मग? परत जाणार की इथेच राहणार?’ हा विषय सतत चघळणारे लोक बहुतकरून अनिवासी भारतीयांच्या कित्येक पिढय़ांत दिसतील. हा फरक इतका लक्षणीय आहे, की त्यामुळे ‘गेल्या ७० वर्षांत..’ या तुकडय़ापासून सुरू करून कान किटेपर्यंत कटकट करणारे सगळे सुखवस्तू आवाज व त्यांचे प्रश्न मला फिजूल व अनेकदा असंबद्ध वाटतात. मात्र, असे आवाज आता बुलंद असल्याने त्यातला फोलपणा दाखवणारे काही आधुनिकतेचे पुरस्कर्तेही नाहक १९७५ पूर्वीच्या भारतात मग्न दिसतात. आधुनिकतेला प्राधान्य देणारी धोरणं स्वातंत्र्योत्तर सुरुवातीच्या काळात आखली गेली हे मान्य केलं, तरी अशा धोरणांचीही समीक्षा करायला काय हरकत आहे? ती आज जशीच्या तशी लागू पडतात काय?

एकाच वेळी अनेक शतकांत जगणारा आपला देश.. आणि काळाचा कुठलातरी एक अगम्य तुकडा सोन्याचा मानून हळहळणाऱ्या लोकांत ‘आपण आज कुठे आहोत?’ याचा आढावा घेण्यासाठी भारतीय ‘स्वातंत्र्यदिन’ हा आरंभबिंदू मानण्याबाबत जवळपास एकवाक्यता आहे, ही फारच आश्चर्याची गोष्ट आहे. अमेरिकेत मात्र दर स्वातंत्र्यदिनाला ‘गेल्या दोनशे-अडीचशे वर्षांत..’ अशा तुकडय़ापासून सुरू होणारे संवाद जाता-येता कानावर पडत नाहीत. आपलं स्वातंत्र्य अजून ताजं आहे म्हणून, की आपल्याला हा सोसच आहे? त्यामुळेच बहुधा अमेरिकेत जेव्हा ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (‘मागा’) हे ट्रम्पप्रणीत संभाषित कुठल्याशा मोघम, अमूर्त सुवर्णकाळाची साक्ष देऊ  पाहतं तेव्हा त्याचा प्रतिवाद करताना लोकांना आपली किंवा इतरांची जुनी धोरणं कठोरपणे तपासताना काहीच आडकाठी नसते. किंबहुना, अधिकाधिक समतावादी, मानवतावादी, शाश्वत समाजरचनेच्या मूल्यांवर श्रद्धा ठेवून आजच्या काळाच्या प्रश्नांची आजच्या काळाच्या आधारे उकल शोधण्यासाठी धोरणं मांडता येतात असं वाटतं.

आधुनिकतेत आधुनिकतावादी धोरणांचीही चिकित्सा झाली पाहिजे अशी माझी धारणा आहे. त्याप्रमाणे विवेकाच्या आधारावर आपल्याच आधीच्या धारणा तोडून नव्याने मांडणी करत जगणे, या ‘अनलर्निग- रिलर्निग’च्या खटाटोपात आपण व्यक्तीच्या आणि समूहाच्या पातळीवर कितपत यशस्वी झालो आहोत?

या अशा तुलनेत माझा रोख प्रामुख्याने अमेरिकेतील पूर्व-पश्चिम किनारपट्टीवरच्या आणि इतर काही शहरी/ मध्यम/ ‘आहे रे’/ वर्किंग प्रोफेशनल वर्गाकडे आहे. परंतु हाच वर्ग ‘आधुनिक’ म्हणता येईल अशा समाजजीवनाचा वाहक आहे आणि जगातील अनेक क्षेत्रांत मूलगामी बदल घडतील असं विज्ञान व तंत्रज्ञान यांचा निर्माता व पहिला उपभोक्ताही आहे. शिवाय, भारतीय समाजाच्या आकांक्षाही याच वर्गाकडे डोळे लावून बसलेल्या असल्याने मला ही तुलना अप्रस्तुत वाटत नाही. या वर्गातले अमेरिकी लोक आपल्या युरोपीय पूर्वजांनी अमेरिकेतील आदिवासी लोकांच्या केलेल्या शिरकाणाबद्दल खजील होतात. आपल्या वंशवर्चस्ववादी इतिहासाबाबत त्यांना अभिमान नसतो. हिटलरच्या ‘माईन काम्फ’चा मराठी अनुवाद चांगला खपतो असं आपण सांगितलं की ते स्तिमित होतात. आपल्या कामाच्या जागी वर्ण, वंश, वर्ग, लिंगभाव, धर्म अशा अनेक आधारांवर वैविध्य असावं यासाठी ते सजग असतात. आपल्या युद्धखोर परराष्ट्र धोरणाबाबत राष्ट्रवादाची लाट असतानाही आणि ओसरल्यावरदेखील या वर्गातला अमेरिकी त्यावर बिनबोभाट टीका करतो. त्याला ‘कॅनडात राहायला जा.. इतकं असेल तर!’ असं कुणीही म्हणत नाही, हे एक आहेच; परंतु मुख्य असं की, राजकारणातही लोक उभयपक्षी आपल्या पूर्वीच्या पिढय़ांचं तथाकथित राष्ट्रप्रेमी धोरण नाकारायला वा तपासायला कबूल असतात. अशी अनेक उदाहरणं देता येतील. पण मुदलात या समाजात आपल्या भूतकाळाविषयी काहीच आस्था, अस्मिता नाहीत. जे जन्मानं आपल्याला लाभलंय त्याविषयी वृथा अभिमान नाही. आणि दैनंदिन जीवनात ‘काल’पेक्षा ‘आज’ व ‘उद्या’च्या चर्चेला महत्त्व आहे.

हे सर्व काही आलबेल आणि परफेक्ट आहे असं नव्हे. किंबहुना,        या समाजजीवनाला आव्हान देणाऱ्याही अनेक घटना/ चळवळी घडत असतात. त्यात ‘मागा’सारख्या विचारांचं वाढलेलं प्राबल्य, व्यवस्थात्मक वर्णद्वेषाविरुद्ध न्याय मागणारी ‘ब्लॅक लाइव्हज् मॅटर’सारखी चळवळ आणि वातावरणीय बदल अधोरेखित करणारी पर्यावरणवादी चळवळ या तीन प्रमुख प्रातिनिधिक गोष्टी म्हणता येतील. पैकी पहिल्याला थेट विरोध, दुसरीविषयी सुप्त सहानुभूती आणि तिसरीविषयी कृतिशील विचार असा साधारण या वर्गाचा या तीन गोष्टींबाबत प्रतिसाद ढोबळपणे दिसतो.

हा सर्व विचार औद्योगिकीकरणानंतरच्या, उत्पादनाच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाल्यानंतरच्या समाजजीवनाचा आहे, असा जो तर्क दिला जातो त्यात तथ्य आहेच. मी हा लेख लिहिताना कुतूहल म्हणून भारतीय संविधानात ‘आधुनिक’ हा शब्द आला आहे का, हे पाहिलं. तर तो मला केवळ एका कलमात सापडला! मार्गदर्शक तत्त्वांतील ‘कलम ४८’ आधुनिक व वैज्ञानिक आधारावर शेती व पशुसंवर्धन यांच्या रचनेसाठी प्रयत्न करण्याचे दिशानिर्देश देतं आणि त्याच संदर्भात गाईंसह दुभत्या जनावरांच्या संवर्धनासाठी व कत्तली रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचेही!

मात्र, आधुनिकतेचा बोजवारा उडालेल्या आपल्या आजच्या समाजात काय दिसतं? पशुसंवर्धन आणि शेतीच्या अर्थकारणाशी तिळमात्र संबंध नसणाऱ्या झुंडी प्रतीकांचे, अस्मितांचे झेंडे नाचवत गोरक्षक म्हणून लोकांचे जीव घेत आहेत आणि सरकार त्याबाबतीत मौन आहे. दुसरीकडे वैज्ञानिक, आधुनिक व्हायचं म्हणजे पर्यावरणाला धाब्यावर बसवून सरसकट बेसुमार औद्योगिकीकरण करायचं, अशीही एक धारणा दृढ झालेली दिसते.

मोठे सिंचन प्रकल्प आणि रासायनिक शेतीच्या जोरावर झालेली हरितक्रांती हे भारताच्या अन्नविषयक स्वावलंबनाचं मोठं पाऊल आपण मानतो. या हरितक्रांतीच्या पोटात आज भटिंडय़ाहून बिकानेरला जाणारी ‘कॅन्सर ट्रेन’ आहे; तिची दखल आपण केव्हा घेणार आहोत? जर आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो होतो तर अजूनही अन्न- सुरक्षिततेबाबत कायदे का करावे लागत आहेत? अनेक ठिकाणी कुपोषणाची समस्या गंभीर का आहे? आणि आपली भूजलपातळी घसरते आहे ती धरणांमुळे की धरणांशिवाय? हायब्रीडपासून रासायनिक शेतीपर्यंत जर सगळी विज्ञान-तंत्रज्ञानाची आणि ते बनवणारे कारखाने, प्रयोगशाळा ही जर आधुनिकतेचीच प्रतीकं होती, तर मग आज शेती आतबट्टय़ाची का झाली आहे? एका बाजूला रासायनिक, जनुकीय बदल केलेल्या (जीएमओ) बियाण्यांच्या शेतीची कंठाळी स्तुती आणि दुसरीकडे सेंद्रियतेला काहींनी दिलेला अनाकलनीय व अनावश्यक आध्यात्मिक मुलामा- या दोहोतल्या परस्पर विसंगतीचं आकलन काही केल्या होत नाही. एका परदेशी ब्रँडच्या टूथपेस्टचंही नाव आता ‘वेदशक्ती’ आहे! मात्र, हे काही त्या कंपनीच्या टूथपेस्टविषयक ज्ञानात आपण भर घातल्याचं द्योतक नाही. तसं असतं तर तो ब्रँड इतर देशांतही त्या कंपनीने विकला असता. वास्तविक ते इथल्या ग्राहकाला व समाजाला कसली भुरळ पडली आहे, याचं द्योतक आहे.

शेती, शेतकरी, अन्नसुरक्षा, आपल्या अन्नावर नियंत्रण व सार्वभौमत्व, पर्यावरणीय ऱ्हास या आणि अशा गोष्टींबाबत आधुनिक शिक्षणाची फळं चाखणारा, आधुनिकतेतून उंचावलेलं राहणीमान जगणारा आणि स्वत:ला आधुनिक म्हणवणारा इथला ‘आहे रे’ वर्ग काय विचार करतो?

अमेरिकेतला समकक्ष वर्ग चाचपडतो आहे. कॉर्पोरेटाइज्ड शेती व पशुउत्पादन, जीएमओ अन्न यांविषयी तो साशंक आहे. सेंद्रिय अन्नाकडे त्याचा ओढा आहे. पण जेव्हा त्याचीही ‘कॉर्पोरेट चेन’ उभी राहते तेव्हा सेंद्रिय खावं की स्थानिक शेतकऱ्याने पिकवलेलं खावं, हा गुंता तो सोडवू पाहतो. कॉर्पोरेटाइज्ड शेती व पशुउत्पादन यामुळे पर्यावरणावर पडणारा ताण, प्राण्यांवर होणारे अत्याचार यामुळे आपण आपला आहार दुग्धजन्य पदार्थविरहित पूर्ण शाकाहारी करावा की कसं, असे प्रश्न तो स्वत:लाच विचारतो. या वर्गाची ये-जा असते अशी राष्ट्रीय उद्याने सांभाळणारी ‘नॅशनल पार्क सव्‍‌र्हिस’सारखी सरकारी संस्थाही (सरकार व राष्ट्राध्यक्ष हे वातावरणीय बदल खोटे म्हणत असले तरीही!) बिनदिक्कत लोकांचं त्याविषयी प्रबोधन करत असते. इथे ‘आधुनिकता की परंपरा’, ‘पर्यावरण की उद्योग’, ‘सेंद्रिय की जीएमओ’ असा वाद नाही, तर काल जे आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचं प्रतीक म्हणून गणलं गेलं त्याला विज्ञानातूनच झालेलं भवतालाचं, पर्यावरणाचं आजचं आकलन बाद ठरवत आहे. आणि समुचित तंत्रज्ञानाने त्याला प्रतिसाद देणं अपेक्षित आहे, हा विचार दिसतो. त्यामुळेच की काय, हा वर्ग आपल्या शहराबाबत, भवतालाबाबत केल्या जाणाऱ्या धोरणांबाबत (त्याच्या मर्यादा मान्य करूनही) अधिक सजग दिसतो.

बॉस्टनमध्ये ‘मार्च फॉर सायन्स’च्या एका मोर्चात एका डॉक्टर- शास्त्रज्ञाने असा दावा केला, की कर्करोगावर इलाज म्हणून जगभर शोधल्या जाणाऱ्या औषधांपैकी तब्बल ५५ % पेटंट फक्त बॉस्टन शहराच्या आसपास असणाऱ्या कंपन्या, प्रयोगशाळांकडे आहेत. भारतात सर्वात जास्त प्रादुर्भाव असणाऱ्या आजारांविषयी आणि इथल्या विषम आरोग्यसेवांविषयी आपण काय करतो आहोत? कुपोषित मुलांना अंडे न खाण्याचा पर्याय असू शकतो; पण त्यांना जेवणात शाळांनी अंडे पुरवणे वा न पुरवणे हा पोषणमूल्यांचा प्रश्न आहे, की तथाकथित शाकाहारी परंपरांचा? सरकारचं उद्दिष्ट आहार नियंत्रण आहे की सुदृढ आरोग्य? आपली शहरं आधुनिकतेची नव्हे, तर बकालीची प्रतीकं आहेत, हे आपण कधी मान्य करणार आहोत? शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्याशिवाय प्रदूषणावर नियंत्रण अशक्य आहे, हे आपल्याला मान्य नाही काय? कुणीतरी मैला वाहून नेण्यावर आपलं आरोग्य अवलंबून आहे याची आपल्याला लाज वाटत नाही काय? आपल्याला पुरेसं स्वच्छ पिण्याचं पाणी मिळावं ही बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्यांची नव्हे, तर शासनाची जबाबदारी आहे, हे आपल्याला मान्य नाही काय? हल्लीचे काही शोधनिबंध नजीकच्या भविष्यात गंगा-यमुनेची खोरी कोरडी पडतील असं मत मांडतात, हा आपला प्रश्न नाही काय? यात एक तर आम्ही अमेरिकेच्या वाटेनं जाऊ आणि त्यांना आज जे वाटतंय तिथवर पोहोचल्यावर आम्हीही उद्या तसंच वाटून घेऊ , असा तरी विचार असावा किंवा आपल्याला आपल्या स्वार्थाचं भान नसावं अथवा आपल्या प्रीव्हिलेजेसच्या जोरावर आपण नेहमीच सुपात असू अशी काहीतरी खात्री तरी असावी.

अमेरिकेतील भारतीय समवयस्क लोकांशी बोलताना एक बाब सातत्याने पुढे येत असते, ती ही की, पश्चिमेतील तरुण, शिक्षित वर्गाला समकक्ष भारतीय वर्ग समाजकारण, राजकारण याबाबत बरोब्बर उलट भूमिका असणारा का दिसतो? प्रश्न गेल्या ७० वर्षांच्या पूर्वार्धात झालेल्या आणि उत्तरार्धात न झालेल्या आधुनिकीकरणाचा नाही, तर आजच्या तुमच्या-आमच्या जगण्यात आधुनिक मूल्यांना असणाऱ्या स्थानाचा आहे. भारतात परत आल्यावर, अमेरिका सोडून इथे आल्याबद्दल अविश्वास व्यक्त करणाऱ्यांपासून मूर्खात काढणाऱ्यांपर्यंत अनेक जण भेटले.. भेटतात. ज्या क्षेत्रात माझी ऊठबस आहे त्यात परदेशी जाण्यासाठी आसुसलेले लोक चिक्कार आहेत. त्यात आश्चर्यकारक काहीच नाही आणि गैरही काही नाही. त्यांना संधी मिळो व जायचं त्यांनी जावो; पण तिथे गेल्यानंतर सुरुवातीची एक-दोन र्वष नाक मुरडल्यानंतर हे सगळे जण ज्या संस्कृतीचे, वर्गजाणिवांचे, समाजजीवनाचे आणि मूल्यांचे वाहक होणार आहेत, तीच मूल्यं त्यांनी तोवर इथे जपली तर काय हरकत आहे?

nimishsane@gmail.com