|| बालाजी सुतार

Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber and men of straw. They will have sweet tongues and silly hearts. They will fight amongst themselves for power and India will be lost in political squabbles. A day would come when even air and water would be taxed in India.

– Winston Churchill

‘पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसांत मात्र चतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचे, एका युगाचा शेवट होत असतानाचे आणि पिचलेले राष्ट्र स्वत:चा उद्धार करतानाचे, असे क्षण इतिहासात खूप कमी वेळा येतात. या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारत, भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणे योग्य ठरेल.’

– पं. जवाहरलाल नेहरू

 

‘गोरं घालविलं अन काळं आणलं. आमचं चुकलंच जरा! खुच्र्याच जाळायला पाहिजे होत्या त्या. मग खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं असतं. आज माझं वडील जिवंत असतं तर त्यांनी तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस हे सरकार ठिवलं नसतं. कधीच त्याला बाजार दाखवला असता.’

– हौसाबाई पाटील

 

वरील तीन अवतरणांपकी पहिलं अवतरण इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी कथितपणे केलेलं विधान आहे. ‘त्यांनी असं म्हटलं नव्हतं, त्यांच्या तोंडी घालण्यात आलेलं ते वक्तव्य आहे,’ असंही अनेकदा म्हटलं जातं. हे चर्चिल यांनी म्हटलं नसेल तर ज्या कुणाच्या डोक्यातून हे प्रकटलं असेल तो नक्कीच द्रष्टा असणार. दुसरं अवतरण हे १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री दिल्लीमध्ये घटनासभेत भारताचे पहिले नियोजित पंतप्रधान नेहरूंनी केलेल्या प्रसिद्ध भाषणाची सुरुवात आहे. आणि तिसरं क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्यासाठी स्वत: झुंजलेल्या मुलीने अगदी कालपरवा बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत उच्चारलेलं आहे. नेहरू आणि हौसाबाई यांची ही वक्तव्ये १९४७ ते २०१८ या सत्तर वर्षांत आपण कुठून कुठे आलेलो आहोत याची अत्यंत वास्तव अशी निदर्शक आहेत. आणि चर्चिल यांचं कथित विधान आपल्या समाजाचं चरित्र, चारित्र्य आणि चेहरा दाखवणारं आहे.

सबंध जग झोपलेले असताना ‘स्वातंत्र्य’ नामक एक गोष्ट आपण मिळवली, त्यावर आता सत्तर वष्रे उलटली आहेत. दरम्यानच्या काळात ‘आपण काय साध्य केलं?’ असा एक प्रश्न हल्ली अनेकदा विचारला जातो आणि ‘काहीही नाही..’ असं या प्रश्नाचं उत्तर स्वत: विचारणारेच देऊनही टाकतात. खोल जंगलात अगदी आदिम शैलीत जगणारे कुणी आदिवासी- ज्यांच्यापर्यंत पारतंत्र्य किंवा स्वातंत्र्य हे शब्दच कधीही पोहोचलेले नसतात, ते लोक – हा प्रश्न विचारत नाहीत, उत्तरही देत नाहीत. स्वातंत्र्याचे यच्चयावत लाभ ज्यांना मिळालेले आहेत असे केंद्रीय सत्तेत बसलेले लोक ही प्रश्नोत्तरे करतात, तेव्हा त्या प्रश्नोत्तरांबाबत गंभीरपणे काही विचार करणे क्रमप्राप्त ठरते.

भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू हे अतिशय आधुनिकतावादी, सर्वस्तरीय प्रगतीवादी विचारांचे होते. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेही फार दूरदृष्टीचे मुख्यमंत्री होते. या मुखंडांनी घालून दिलेल्या वाटेचे पुढे काय झाले, याचा शोध फार विदारक रंजक असू शकेल. नव्हे, तो तसा आहेच.

स्वातंत्र्योत्तर काळात देशभर खूप मोठमोठे प्रकल्प उभे राहिले. छोटय़ा छोटय़ा उद्योगांची बलशाली साम्राज्ये निर्माण झाली. वीज आली. रस्तेनिर्माण आणि वाहतुकीचे देशव्यापी जाळे विणले गेले. भाक्रा-नांगल किंवा इकडे कोयना धरणासारखे अवाढव्य जलप्रकल्प अस्तित्वात आले. राजकीय राजधानीसोबतच आर्थिक-औद्योगिक राजधान्याही भरभराटीला येत गेल्या. हरित, धवल वगरे प्रकारच्या क्रांत्या झाल्या. नव्वदोत्तर काळात अर्थव्यवस्थेत क्रांती झाली. अगदी परवा परवा झालेल्या नोटबंदी किंवा जीएसटीसारख्या ‘प्रकरणां’नाही ‘क्रांती’ असंच संबोधलं गेलं!

आधीच्या व्यवस्थेला समूळ उन्मळून टाकून नव्या विधायक बीजांचं रोपण होणं, एका अधिक चांगल्या व्यवस्थेला जन्माला घालणं- असा ‘क्रांती’ या संकल्पनेचा ढोबळ अर्थ असतो.

आता इतक्या सगळ्या क्रांत्या होऊन गेल्यानंतरचं चित्र काय प्रकारचं आहे? सत्तर वर्षांनंतरही इथे एक सक्षम व्यवस्था उभी राहू शकलेली नाही. ‘एक देश’ म्हणून आपण नकाशावर अस्तित्वात आलेलो असलो तरी आपल्या याच एका देशात कितीतरी देश प्रत्यही दिसत असतात : आदिवासी, मागास, सवर्ण, दरिद्री, गरीब, श्रीमंत, महाश्रीमंत.. या प्रत्येक वर्गाचे कायदे, प्रथा, परंपरा, उत्सव आणि सजा प्रचंड वेगवेगळ्या आहेत. एकाचंही काही जैविक असं नातं दुसऱ्या घटकाशी नाही. ‘विविधतेतली एकता’ असं म्हणत याच चिरफळ्यांचे आपण ढोल वाजवत राहतो. सहअस्तित्वाचा तोंडी पुरस्कार करतानाच सहअस्तित्वाबाबत अधिकाधिक तिरस्कार निर्माण होईल अशाच दिशेने एकुणात चाललेला प्रवास पाहिला तर विविधतेतली ती एकता आपण किती फोल मानत असतो हेच दिसून येईल.

जाती-धर्माच्या भिंती अधिकाधिक भयावह चिरेबंद झाल्या आहेत. वर्तमानात राहणं साफ नाकबूल करून लोक ऐतिहासिक विभूतींना दिमतीला घेऊन आपला भूतकाळ किती दिव्य होता, हेच रेटून सांगताना दिसत आहेत. हे विज्ञान-तंत्रज्ञानाचं युग आहे, असा सतत घोष करताना इथल्या गावागावांत विज्ञान प्रशिक्षण शिबिरे भरायला हवी होती. त्याऐवजी या-त्या भंपक महाराजाचे-बाबाचे दर्शन सोहळे आयोजित केले जातात. गावोगाव जत्रांमधून नवस फेडण्यासाठी देवतांना बळी दिले जातात. ‘असं करू नका’ हे सांगण्यात ज्यांची सबंध हयात गेली त्या खुद्द गाडगेबाबांचेच विधिवत मंदिर उभे केले जाते, ही गोष्ट आपण विज्ञानयुगात वगरे नसून मध्ययुगातच आहोत, हे पक्केपणी अधोरेखित करणारी आहे.

ग्रामीण भागातले सगळे प्रश्न सत्तर वर्षांपूर्वी होते तितकेच, किंबहुना अधिक तीव्रतर झालेले आहेत. जलसाक्षरता आणि हजारो कोटींच्या सिंचन प्रकल्पांच्या गोष्टी करता करताच वर्षांनुवष्रे गाव-शिवार क्रमश: कोरडाठाक होऊन गेलं त्याला आता काही दशकं झाली आहेत. दुष्काळ हा नेमेचि येणारा प्रकार होऊन नुसतं शिवारच नाही, तर माणसांची मनंही उत्तरोत्तर रखरखीत होत गेल्याचं दिसून येत आहे. दुष्काळाचं एक स्वतंत्र राजकारणच घडवलं जातं; ज्यातून संबंधितांना बऱ्याच लाभांची प्राप्ती होते. ज्यांनी पाण्याच्या प्रश्नावर काही मूलभूत आणि ठोस काम करण्याची गरज असते, किंबहुना ते ज्यांचं कर्तव्यच असतं ते सत्ताकारणी लोक केवळ हजारो कोटींचे आकडे उच्चारण्याच्या, ते लाटण्याच्या कामात व्यग्र आहेत. आणि ज्यांचा पाणी, दुष्काळ, शेती असल्या विषयांशी काहीएक संबंध नाही असे सिनेमातले कोटय़धीश नट उन्हात तळतळून काम करताना दिसतात. दुष्काळ संपवणं किंवा पाण्याची सोय करणं किंवा जगण्यातलं ऊन अस होऊन गळ्यात दोर अडकवून कुणी कुणबी मरून गेला आहे, तर त्याच्या बायका-पोरांची चिंता करणं ही काही नटांवरची जबाबदारी नाही. ही जबाबदारी सत्तेच्या खुच्र्या उबवणाऱ्यांची असते. माझ्या टीचभर लांबी-रुंदीच्या गावात मागच्या वीस वर्षांत मोठा खर्च करून दोन पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्या.. ज्यातून लोकांना आजही फारच क्वचित पाणी मिळतं.

साहेबराव करपे या माणसाने १९ मार्च १९८६ या दिवशी सबंध कुटुंबासहित आत्महत्या केली. ‘भूदान’ चळवळीचे प्रणेते विनोबांच्या पवनार आश्रमात जाऊन पत्नी व चार मुलांसहित करपेंनी सहा जीव ‘दान’ करून टाकले. नापिकी, दुष्काळ, कर्ज फेडण्याची, वीजबिल न भरू शकण्याची क्षमता ही त्यांच्या सुसाइड नोटमध्ये त्यांनी नोंदवलेली काही कारणे. काही न नोंदवलेली कारणेही असतील; ज्यांची आपण कल्पना करू शकतो. शब्दांमध्ये सगळंच नोंदवता यावं एवढी चतुराई मरू घातलेल्या कुणब्याकडे नसतेच.

बायको-पोरांसोबत जीव देऊन टाकताना साहेबराव करपेंच्या मनात काय आणि किती दाटून आलेलं असेल? जिथं जन्मलो, ज्या भूमीत राबलो, घाम गाळला, त्याच भूमीत, त्याच गावात आपले सगळे आधार संपलेले आहेत, ज्याच्याकडे मन उकलावं असा कुणीही आपल्या भवतालात नाही, या भूमीने आपल्याला मुळापासून उखडून मृत्यूच्या कडेलोटाप्रत आणून ठेवलेलं आहे आणि आपल्या सबंध वंशासह इथे आपण मरून जातो आहोत हे मनात येऊन त्या भल्या कष्टाळू माणसाच्या मेंदूच्या चिंधडय़ा उडाल्या असतील आतल्या आत. माणसांनी गजबलेल्या या भवतालात कुणीच आपलं नाही, ही भावना केवढी जीवघेणी असेल! करपेंच्या आत्महत्येनंतर आजवर हजारो, कदाचित लाखो शेतकरी आत्महत्या घडल्या असतील. चार दिवस माध्यमांतून बातम्या येतात आणि नंतर सारं कसं शांत शांत होऊन जातं. या कृषिप्रधान देशात मागच्या सत्तर वर्षांत आपण कमावलेला हा रखरखाट आहे. शास्त्रशुद्ध राजकीय, सामाजिक, आर्थिक सिद्धान्तांच्या आदर्श वाटेवर प्रयत्नपूर्वक चालणं सोडाच; अतिशय साध्या साध्या मानवी संवेदनांना आपण पारखे झालेलो आहोत. मुर्दाड भवताल, कोरडी रखरखीत नोकरशाही आणि केवळ खुच्र्या मिळवण्याच्या लालसेने बरबटलेली मनं मुखवटय़ाआड दडवून संभावितासारखे वावरणारे राजकारणी हे बळीवंशाच्या या आत्मघाती परंपरेचे प्रणेते झालेले आहेत.

‘जात’ हा प्रकार पूर्वी सामाजिक आधार म्हणून वापरला जायचा. आता ती केवळ एक विषवल्ली होऊन उरलेली दिसते आहे. संपर्कात गेलं की माणूस निव्वळ विखारी होतो- अशी विषवल्ली. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावांचा नित्यपाठ करत, ‘पुरोगामी महाराष्ट्र’ वगरे फुका आत्मगौरवी पाठ थोपटून घेत असतानाच प्रत्येक जातीचा एकेक अभेद्य किल्ला तयार झालेला पाहायला मिळणं, हा त्या भेदविरहित समाजाच्या निर्माणासाठी झटलेल्या सगळ्याच महापुरुषांचा घोर अवमान आहे याची जाणीवसुद्धा फारशी कुठे दिसत नाही. उलट, ‘जातीसाठी माती खावी’ हीच उक्ती अधिकाधिक सशक्त होताना दिसते. जातीला चिकटून राहिल्यावर सामाजिक प्रतिष्ठेपासून राजकीय सत्तेपर्यंत काहीही मिळवता येणे शक्य आहे, याची जाणीव झालेला भारतीय समाज कधीकाळी जातीधर्माच्या भिंतीपार जाऊ शकेल अशी कल्पनाही आता करता येत नाही.

शुभम मुस्तापुरे नावाचा सनिक होता. सीमेवर कुणाच्या तरी लहरीपायी आणि अदृश्य दिशेने आलेल्या गोळीने तो मरून गेला. अवघं वीस वर्षांचं वय. आई-वडील, भाऊ-बहिणी, शाळा-दोस्त, गाव-शिवार, तिथली माणसं, झाडं-पार, आड-विहिरी आणि डोह-नदी अशा युद्धाला अजिबात थारा नसलेल्या कितीतरी कोवळ्या गोष्टी वर्ष-दोन वष्रे आधीपर्यंत त्याच्या आयुष्यात असतील. पण सनिक झाल्याबरोबर एका कवडीमोल गोळीने तो मरून गेला. सन्यात तो सुखासुखी नक्कीच नसेल गेला. गरजा असतात, दारिद्रय़ असतं. घर चालवायचं जू अचानक कोवळ्या खांद्यावर येऊन पडतं आणि अठरा-एकोणीस वर्षांचा हा पोरगा सन्यात जाऊन मरून जातो. इथपर्यंतची कहाणी जगरहाटी म्हणून ठीकच आहे. पण त्याच्या मरणाचं वृत्त येतं त्याच दिवशी सलमान खानने हरीण मारल्याच्या खटल्याचा निकाल लागतो आणि देशकार्याखातर एक कोवळा पोर मरून गेल्याचं दु:ख सरसकट झुगारून देऊन त्या जरठ नटाने कोणत्या रंगाची जीन्स घातलेली होती, जेलमध्ये तो कशावर झोपला वगरे सांगण्याची, वारंवार सांगत राहण्याची जी मूर्ख अहमहमिका माध्यमांवर चालू होती, तो प्रकार केवळ माध्यमांचंच नव्हे, तर या देशातल्या समस्त प्रजेचंही चारित्र्य आणि तिचा पसंतीक्रम केवढा उथळ आणि बटबटीत आहे, हे दाखवून देणारा असतो.

‘जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकण्याचे’ जे सूतोवाच नेहरूंनी पहिल्या स्वातंत्र्याच्या क्षणी केले होते, ते नवे आयुष्य आज कुठेही कसल्याही स्वरूपात अवतरलेले नाहीये. उलट, अत्यंत ढोंगीपणे लोकशाहीचा उद्घोष करत केवळ झुंडींच्याच सत्ता अभिषिक्त होत आलेल्या दिसत आहेत.

पंधराएक वर्षांपूर्वी माझ्या छोटय़ा गावातल्या एका छोटय़ाच निवडणुकीला मी उभा राहिलो तेव्हा गावातल्या एका आडदांड माणसाने मला ‘का? गावात राहायचं नाही का?’ अशी विचारणा केली होती. तो शाहरुख खान काही बोलतो तेव्हा त्याला ‘देशात राहायचं नाही का?’ असा प्रश्न विचारला जातो. आणखी दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी नावाचे कुणी असतात, त्यांना ‘जिवंत राहायचं नाही का?’ असा प्रश्न विचारला जातो. किंबहुना, त्यांना जिवंत ठेवलंच जात नाही. हेच या सत्तर वर्षांच्या कालपटाचं चरित्र आहे.

majhegaane@gmail.com