नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नागालॅण्डमधील चेसेझु येथील कॅम्पची दखल कोणा इतिहासकारांनी घेतलेली नाही. १९४४ मध्ये नेताजींचे येथे काही काळ वास्तव्य होते. नेताजींच्या जीवनातील या दुर्लक्षित कालखंडावर टाकलेला झोत..

‘‘मी तेव्हा १६ वर्षांचा होतो. दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा तो धामधुमीचा काळ होता. आदल्याच दिवशी आमच्या गावाच्या आसपास जपानी सैनिक दाखल झालेले होते. नेमकं काय होतंय, हे आम्हा गावकऱ्यांना कळत नव्हतं. ब्रिटिशांनी आमच्या गावात असलेला डाक बंगला रिकामा केला होता. ४ एप्रिल १९४४ ची ती सायंकाळ मला आजही  आठवतेय. मध्यम उंचीचा, गोळीबंद शरीरयष्टीचा, चेहऱ्यावर हास्य व तजेला असलेला एक उमदा घोडेस्वार आपल्या सहकाऱ्यांसह आमच्या गावात दाखल झाला. लष्करी गणवेशातील त्या हसतमुख योद्धय़ाच्या कमरेला तलवार लटकत होती. शिवाय एक पिस्तुल खोचलेलं होतं आणि दोन हॅन्डग्रेनेडही लटकत होते. सोबतीला गणवेषातील पंजाबी आणि बंगाली सहकारी होते. आम्हाला लवकरच त्या घोडेस्वाराचं नाव सुभाषचंद्र बोस असल्याचं समजलं..’’ नागभूमीच्या फेक जिल्ह्यतील आज जेमतेम पाच हजारांची वस्ती असलेल्या चेसेझु गावातील वेझो सुरो हे ८९ वर्षांचे गृहस्थ आपल्या आठवणी सांगत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘नेताजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आम्ही सामोरे गेलो तेव्हा आम्हा गावकऱ्यांचा असा समज झाला होता, की हा जपानचा राजा असावा! पण ते भारतीय आहेत, हे त्यांच्या दुभाषाकडून कळलं तेव्हा आम्हाला आनंद झाला. नेताजींनी मला कोंबडय़ाचा आवाज काढून हाताने भाताच्या गोळ्याचा आकार करून दाखवला आणि ‘चिकन राइस मिळेल का?’ अशी विचारणा केली. सोबत त्यांचा बर्मी कूक रंगाही होता.’’

‘‘नेताजींना सर्वजण ‘साहेब’ म्हणत असत. त्यांच्यासाठी आम्ही जेव्हा खायला काही फळं वगरे घेऊन जात असू तेव्हा ते अगोदर आम्हाला खायला देत आणि नंतर स्वत: खात. ते जुन्या ब्रिटिश रोडने जसामीकडून (इंफाळ-मणिपूर) फेकला आले होते. तिथून रुंगझुमाग्रे आमच्या गावी पोचले होते.’’

नेताजींच्या दिनक्रमासंबंधी वेझो यांनी सांगितले, ‘‘ब्रिटिशांनी बांधलेल्या गावातील डाक बंगल्यात ते जास्त वेळ थांबत नसत. बहुतेक वेळ ते गावापासून डोंगराच्या खालच्या अंगाला असलेल्या ‘Shophi Dzukhu’ (झुकू म्हणजे झरा) लष्करी कॅम्पवरच असत. तिथे बंकर तयार केलेले होते. जपान्यांचा वेगळा कॅम्प होता. आम्हा स्थानिक युवकांना घेऊन ते सुदो पीकवर जात असत. (आता या जागेला ‘नेताजी पीक’ म्हणतात.) तेव्हा त्यांच्यापाशी मोठी दुर्बीण आणि वायरलेस असे. तिथून ३० गावांवर नजर ठेवता येत असे. एकदा त्यांना कोहिमात मोठा गोळीबार झाल्याचे समजले. त्यांनी मला दुर्बिणीतून बघायला सांगितले. आणि मी त्यातून बघून चक्कर येऊन पडलो होतो.’’

कॅम्पच्या आठवणी सांगताना वेझो म्हणाले, ‘‘कॅम्पवर आल्यावर ते सुंदर अक्षरात दैनंदिनी लिहीत असत. त्यांच्या कॅम्पजवळ असलेल्या एका छोटय़ा झऱ्याचे पाणी ते एकटेच वापरीत. इतर सैनिक वरच्या अंगाच्या मोठय़ा झऱ्याचे पाणी वापरत असत.’’ नेताजींच्या गावकऱ्यांशी असलेल्या संबंधांबाबत वेझो यांनी सांगितले की, ‘‘नेताजींनी गावात आल्यावर लगेचच गावातील वयस्कर लोकांची मीटिंग बोलावली होती. त्या मीटिंगमध्ये नेताजींनी गावकऱ्यांना आपल्या सहकाऱ्यांसाठी अन्नधान्याची शक्य ती रसद उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले होते. आणि त्यांनी आपण युद्ध जिंकल्यावर गावात रस्ते, शाळा, दवाखाना आणि राइस मिल बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्यांनी शेतीची आधुनिक अवजारे देण्याचेही आश्वासन दिले होते.’’

नेताजींचे व्यक्तिमत्त्व जसे उमदे होते, तसेच ते मिश्किलही होते. वेझो सांगतात- ‘‘नेताजी मधेच दोन-तीन दिवस गायब व्हायचे आणि परत आले की दुभाषाला गावकऱ्यांना आमच्या ओटय़ावर गप्पा मारायला बोलावण्यासाठी निरोप द्यायला सांगत. आजही तो ओटा आणि ज्यावर नेताजी बसायचे तो दगड तिथे आहे. गावातील आम्हा युवकांना घेऊन ते जसे सुदो पीकवर जायचे, तसेच गावातूनही फेरफटका मारायचे. त्यांना हातमागावर कपडे विणताना बघतानाचे दृश्य आवडायचे. ते इथे आले होते तेव्हा आवळ्यांचा बहर होता. नेताजींना आवळे खूप आवडत. आम्ही त्यांना आवळे द्यायचो.’’

१९४४ च्या एप्रिल आणि मे महिन्यात नेताजी चेसेझु आणि परिसरात काही काळ होते. नेताजींच्या चेसेझु कॅम्पमधून माघारीच्या आठवणी सांगताना वेझो म्हणाले, ‘‘आम्ही काहीजण नेहमीप्रमाणे कॅम्पवर नेताजींना भेटायला गेलो होतो. तेव्हा अचानक ब्रिटिश रॉयल एयर फोर्सच्या काही विमानांनी बॉम्ब टाकणे सुरू केले. एक विमान तर एकदम खाली आलेले दिसले. आम्ही गावाकडे पळण्याचे ठरवले होते, पण नेताजींच्या सनिकांनी आम्हाला बंकरमध्ये ओढत नेले. नंतर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही गावात गेलो. ब्रिटिशांनी फक्त नेताजींच्या कॅम्पवरच हल्ला केला होता. रात्री केव्हातरी गावातील डाक बंगल्यावरही ब्रिटिश आर्मीने हल्ला केला होता. आम्ही गावकरी सकाळी घाबरत घाबरत तिथे गेलो तर नेताजींच्या फौजेतील दोन बंगाली सनिकांचे मृतदेह तिथे पडले होते. ते मृतदेह दफन करण्यासाठी नेताजींच्या सहकाऱ्यांपकी कुणीतरी गावकऱ्यांना पैसे दिले होते. त्या रात्री रात्रभर दोन्ही बाजूंनी हल्ले चालू होते. सकाळी गोळीबाराचे आवाज येईनासे झाल्यावर आम्ही कॅम्पकडे गेलो तर तिथं कुणीही नव्हतं. गवत व झाडंझुडपं करपली होती. काही मृतदेह झऱ्यांजवळ रचून ठेवले होते असं बुजुर्ग सांगत होते. पुढची दोनेक वर्ष गावातील लोक तिकडे जात नव्हते. दोनेक वर्षांनंतर दोन झऱ्यांच्या मधल्या जागेत नरकंकाळ आढळले होते..’’

नंतर वेझो सातवी पास झाले. १९५४ साली प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागले आणि १९८६ साली सेवानिवृत्त झाले. आजही ते जिथं नेताजी गावकऱ्यांशी संवाद साधायचे त्या त्यांच्या घरासमोरील कट्टय़ावर जाऊन बसतात. काही वर्षांपूर्वी वेझोंचा राज्यपालांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला होता.

नेताजींच्या तिथल्या वास्तव्याला आता ७३ वर्ष होऊन गेलीत. गेल्या काही वर्षांत येथील काही सजग युवकांनी ‘नेताजी सोसायटी’ स्थापन केलीय. ‘नेताजी पीक’वर एक मनोरा आणि शेड उभारलीय. गावाजवळच्या एका डोंगरावर रंगमंच आणि अर्धवर्तुळाकार प्रेक्षागारही उभारलंय. तिथं नेताजींच्या स्मरणार्थ वस्तुसंग्रहालय बांधून तयार आहे. नेताजी कॅम्पवर जिथं राहायचे त्या जागेवर अखंड शिळेत खोदलेला नेताजींचा बसलेल्या अवस्थेतील पुतळा तीन वर्षांपासून अनावरणाची प्रतीक्षा करतोय. ते ज्या झऱ्याचं पाणी प्यायचे तो झरा आणि सनिकांसाठी असलेला झरा- दोन्ही आज ७३ वर्षांपूर्वीच्याच अवस्थेत आहेत. नेताजी ज्या डाक बंगल्यात उतरत तो अजूनही बऱ्या अवस्थेत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या चेसेझु येथील कॅम्पची दखल इतिहासाच्या पानांमध्ये घेतली गेलेली नाही. नागभूमीच्या कोहिमा या राजधानीपासून ५५ कि.मी. दूर असलेल्या चेसेझुला जायला साडेतीन-चार तास लागतात. निसर्गाचे अद्भुत सौंदर्य लाभलेल्या व नेताजींचे काही काळ वास्तव्य केलेल्या या स्थळाला भेट देणं म्हणजे इतिहासापाशी विनम्र होणं होय!