विमानप्रवासात विमानाची गती जाणवू नये इतक्या अलगदपणे विमान पुढे सरकत असतं आणि कधीतरी अचानक खड्डय़ात पडल्यासारखं विमान हादरतं, तसं माझं आज झालं. फोन वाजला. फोनवर ‘राजश्री कुलकर्णी’ हे नाव दिसलं आणि फोन उचलायच्या आधीच नेहमीच्या अनुभवाने माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं. पण..

राजश्री कुलकर्णी म्हणजे सकारात्मक.. पॉझिटिव्ह शक्तीचा स्रोत! ही माझी माझ्यापेक्षा २० वर्षांनी लहान मैत्रीण! रक्ताचं नातं नसलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षा जवळचं असं निवडलेलं नातं ‘मावशी’ म्हणून तिने जोडलेलं. सामान्यांच्या कल्पनेपल्याडची धाडसं सतत करणारी, उत्तम प्रकृती, उदंड उत्साह, आनंद आणि सुदृढतेचं प्रतीक असणारी राजश्री! न्यू जर्सीतच नव्हे, तर उत्तर अमेरिकेतही अनेकांना परिचित असलेली. कुणाला तिच्या ‘बृहन्महाराष्ट्रवृत्ता’तील पंढरीच्या वारीवरील लेखांमुळे माहीत असलेली, तर कुणाला मॅरेथॉन धावपटू म्हणून! तिच्याकडून सतत काही ना काही आगळंवेगळं साहस ऐकायला मिळतं. कधी सांगते- स्काय डायव्हिंग करून आले, तर कधी वारी! चाळिशी उलटल्यावर मॅरेथॉन धावण्याचे रीतसर ट्रेनिंग घेऊन १२ हाफ मॅरेथॉन आणि नुकतीच न्यू यॉर्कची सुप्रसिद्ध २६.२ मैलांची मॅरेथॉन तिने पूर्ण केली. काही वर्षांपूर्वी तिने भारतात पंढरीच्या वारकऱ्यांसोबत पायी चालत १८ दिवसांत २६० कि. मी.ची वारी केली. मध्यम वयाच्याच काय, पण तरुण मुलींनाही लाजवेल असं तिचं हे कर्तृत्व. शिवाय  सांस्कृतिक कार्यक्रमांचे संचालन, ‘hidden gems’ या संस्थेच्या कामात पुढाकार घेऊन केलेले कार्यक्रम, ‘मराठी विश्व’च्या ‘रंगदीप’ मासिकाचे एका वर्षी संपादन आणि नंतर सातत्याने केलेलं संपादन साहाय्य अशा तिच्या अनेक गोष्टी सतत सुरू असतात. ‘मराठी विश्व’च्या ढोलताशा पथकात नाचायला राजश्री पुढे असणारच. अशी ही हरहुन्नरी, हौशी, आनंदी राजश्री. तिच्याकडून आता आणखी काहीतरी नवं ऐकायला मिळणार म्हणून मी उत्सुकतेनं फोन घेतला.

पण आजचा कॉल वेगळ्याच मूडमध्ये सुरू झाला. ‘‘मावशी, माझा मॅमोग्राम पॉझिटिव्ह आलाय. बाकीही टेस्ट झाल्या. मला ब्रेस्ट कॅन्सर झालाय..’’ राजश्री सांगत होती. मी शक्य तेवढं शांत राहायचा प्रयत्न करीत, ‘काळजी करू नकोस. हा बरा होणारा कॅन्सर आहे..’ आणि माझ्या ओळखीच्या कॅन्सर झालेल्यांची यादी सांगत राजश्रीची बातमी पचवण्याचा प्रयत्न करत होते. पण इतक्या उत्तम प्रकृतीच्या व्यक्तीला असं कसं काय होऊ  शकतं, हा किडा मनात वळवळत होता.

तिला कॅन्सर झाला ही बातमी खरोखरच धक्कादायक होती. तो कोणालाही होऊ  शकतो याची आता खात्री पटली. मी माहिती काढू लागले. कॅन्सरचं स्टॅटिस्टिक धक्का देणारं होतं. अमेरिकेत दर आठ स्त्रियांमागे एका स्त्रीला ब्रेस्ट कॅन्सर होतो. २०१७ मध्ये अशा २,५२,७१० केसेस आढळल्या. हा फक्त स्त्रियांनाच होतो असं नाही. गेल्या वर्षी २४०० पुरुषही याला बळी पडले होते. १९८९ पासून ब्रेस्ट कॅन्सरने मृत्यू येण्याचं प्रमाण दरवर्षी कमी होत असलं तरी गेल्या वर्षी जवळजवळ  ४०,००० स्त्रियांनी यात आपले प्राण गमावले आहेत. कुटुंबात कुणाला पूर्वी कॅन्सर झाला असेल (कौटुंबिक इतिहास असेल) तर तुम्हाला तो असण्याची/ होण्याची शक्यता दुप्पट होते. प्रत्येक स्त्रीने वयाच्या ४० व्या वर्षी आणि पंचेचाळिशीनंतर दरवर्षी मॅमोग्राम काढून घ्यायला पाहिजे अशी अमेरिकन कॅन्सर असोसिएशनची सूचना आहे. जितक्या लवकर तो झाल्याचं कळेल, तितका तो बरा होण्याची शक्यता वाढत जाते. ४० वर्षांच्या आधी घरीच स्तनात अशी एखादी गाठ आहे का, हे चाचपडून पाहण्याची स्वयंचाचणीही प्रत्येकीने करायला हवी.

राजश्रीचा ४५ व्या वर्षीचा मॅमोग्राम नॉर्मल होता. मात्र आता ४७ व्या वर्षी गाठ आणि लिम्फनोडमध्येही प्रादुर्भाव दिसत होता. तिचा कॅन्सर दुसऱ्या स्टेजमध्ये असल्याचे निदान झाले होते. त्यावर किमोथेरपीची आठ सेशन्स, नंतर ऑपरेशन आणि रेडिएशन अशी ट्रीटमेंट तिला घ्यायची आहे. पहिल्या किमोथेरपीनंतर राजश्रीचा टेक्स्ट आला : ‘‘२२ डिसेंबरला मी ‘हेड शेव्हिंग पार्टी’ ठेवली आहे. WCA, Princeton च्या ब्रेस्ट कॅन्सर रिसोर्स सेंटरमध्ये दुपारी ३ वाजता जरूर या.’’

‘‘बापरे! हे काय गं?’’ मी तिला फोनवरच विचारलं.

‘‘दुसऱ्या किमोनंतर केस जातात. जाणार तर आहेतच. But, I want it to happen, the way I want. फेसबुकवर माझा शेव्हिंग केलेला फोटो पाहून दोन-चारजणींना जरी मॅमोग्राम काढून बघावासा वाटला तरी ही पार्टी यशस्वी झाली असं मला वाटेल. लोकांमध्ये ‘अवेअरनेस’ यायला पाहिजे.’’ – इति राजश्री.

मला तिचं कौतुक वाटलं. कॅन्सर झाल्याचं कळल्यावर ती रडत बसली नाही. मलाच का सोसावं लागतं म्हणून निराश झाली नाही. यातून मला काहीतरी समाजकार्य करण्याची संधी मिळणार आहे असा तिला विश्वास आहे. इलाज सुरू केले आहेत आणि त्यातून आलेल्या संकटांना ती धैर्याने तोंड देते आहे. ‘हेड शेव्हिंग पार्टी’ या प्रकाराची माहिती काढण्यासाठी मी ‘गुगल’ गुरूची मदत घेतली.

दुसऱ्या किमोनंतर केस गळायला सुरुवात होते. म्हणजे पुंजकेच्या पुंजके उशीवर, बाथरूममध्ये, घरभर पडत असतात. कधी कधी एखादा झुपका मुळापासून सुटून आपल्या हातात येतो, तर कधी उशीवर गंगावन पडावं तसं केस तिथे आणि डोक्याचा एखादा भाग पूर्ण रिकामा झालेला असतो. कॅन्सरच्या दिव्यातून जात असताना केसगळतीमुळे डिप्रेशनमध्ये आणखीन भर पडते. यातूनच ‘हेड शेव्हिंग पार्टी’ची कल्पना जन्माला आली. कॅन्सरने तुमचे केस हिसकावून घेण्याआधी तुम्ही धैर्याने त्यास सामोरे जा आणि आधीच केस काढून मुंडन करा. २००५ मध्ये ‘सेंट बाल्डरिक्स’ या संस्थेने कॅन्सर झालेल्या लहान मुलांसाठी अशा पाटर्य़ा आयोजित करायला सुरुवात केली. पार्टीला आलेले त्या मुलाचे आई-वडील, कधी कधी पूर्ण कुटुंब, तर कधी सगळी मित्रमंडळी पेशंटला पाठिंबा म्हणून डोकं तुळतुळीत करतात. काही सहृदयी लोक कॅन्सर रिसर्चसाठी पैसे उभारण्यासाठी ‘हेड शेव्हिंग पार्टी’ करतात. केटलीन या दहा वर्षांच्या मुलीने निधी उभारणीसाठी मुंडन केलं आणि सात हजार डॉलर्स जमवले.

२००५ पासून आजवर केटलीनसारखी असंख्य धाडसी मुलं, स्त्रिया, पुरुष या उपक्रमात सामील झाले आहेत. ‘सेंट बाल्डरिक्स’ या एकाच संस्थेने हेड शेव्हिंगच्या या उपक्रमातून २३२ दशलक्ष डॉलर्स जमा केले आहेत. न्यू जर्सीत २०१५ मध्ये हउअ या संस्थेच्या ब्रेस्ट कॅन्सर रिसर्च सेंटरने अशा पाटर्य़ा आयोजित करायला सुरुवात केली. या आजारातून बऱ्या झालेल्या स्त्रिया तिथे स्वयंसेवक म्हणून काम करतात.

प्रिन्स्टनमधील रिसोर्स सेन्टरच्या छोटेखानी वास्तूत ही पार्टी होती. बाहेरच्या व्हरांडय़ातील खांबांना मोठमोठे गुलाबी रिबन्सचे (ब्रेस्ट कॅन्सरचे प्रतीक असलेले) बो बांधले होते. मी आत गेले. टेबलावर सुंदर डेकोरेट केलेल्या गुलाबी कपकेक्स आणि पिंक शॅम्पेन ठेवली होती. तिथे रेने नावाची कॅन्सरमधून बाहेर पडलेली एक स्त्री सपोर्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करते.

तीन वाजण्याच्या सुमारास राजश्रीच्या काही मैत्रिणी गुलाबी, पांढरे बलून्स घेऊन आल्या. आता पार्टी माहोल वाटायला लागला. नंतर राजश्री, तिचा नवरा राजेश, मुलगा कौस्तुभ आणि  बहीण आले. गुलाबी/ऑफ व्हाइट रंगांचे फॅशनेबल कपडे घालून नेहमीसारखी मस्त तयार होऊन आलेली राजश्री पार्टीची खऱ्या अर्थाने उत्साहमूर्ती बनून आली. ती आल्या आल्या प्रत्येकीबरोबर फोटो काढण्याचा कार्यक्रम झाला. तिच्या बहिणीने सर्वाना घरी तयार केलेल्या गुलाबी रिबन्सचे बो दिले. नेहमीप्रमाणेच गप्पागोष्टी, चेष्टामस्करी सुरू होती. राजश्री हेअरकटच्या चेअरवर बसली. ‘‘कुणाला काही बोलायचंय का?’’ असं राजेशने विचारल्यावर पाच-सहाजणींनी राजश्रीच्या धैर्याचं, सौंदर्याचं, तिच्या सकारात्मक स्वभावाचं आणि सतत काही ना काही नवीन उपक्रम करत राहण्याच्या वृत्तीचं कौतुक केलं. हसणाऱ्या चेहऱ्यामागे लपवलेले अश्रू अबोलपणे त्यांचं अस्तित्व जाणवून देत होते. पण ‘पार्टी’ मूड कायम ठेवण्याचा निर्धार प्रत्येकीच्या मनात होता.

हेअरकट सुरू झाला. आधी एका बाजूचे केस कापून फोटो काढला. मग ‘मोहॉक’सारखे फक्त मधे केस ठेवून तो फोटो. नंतर पूर्ण केस काढल्यावर फोटो. प्रत्येक पायरीवर मुळात सुंदर असणारी राजश्री आणखीनच सुंदर दिसत होती. आत्मविश्वासाचं तेज तिच्या डोळ्यांत चमकत होतं. फोटो झाल्यावर राजश्रीने मॅचिंग स्कार्फ फेटय़ासारखा बांधला. पुन्हा फोटो सेशन.

राजश्रीच्या पार्टीत तिचा मेडिकलला असणारा मुलगा कौस्तुभ यानेही मुंडन केलं. दोघंही सुंदर दिसत होते. एका कॅन्सरमुक्त स्त्रीने लिहिलं आहे, ‘‘डोकं तुळतुळीत केल्यावर माझ्या लक्षात आलं, हे केस म्हणजे मी नाही. मी म्हणजे या बा सौंदर्यापेक्षा बरंच काही आहे. हेड शेव्हिंगने मला अंतर्मुख व्हायला शिकवलं.’’

कॅन्सर म्हणजे the emperor of all maladiesl! सर्व दु:खांचा सम्राट!! त्याच्याशी झुंज घेणारी ही झाशीची राणी! या संघर्षांत तिला जिंकायचं आहे. किमोथेरपी, त्यानंतर कमी झालेला हइउ उ४ल्ल३ वाढवण्यासाठी घेतलेल्या ‘न्यूलास्टा’चे साइड इफेक्ट्स, मळमळ, अ‍ॅसिडिटी, अतिप्रचंड थकवा, माऊथ अल्सर/ तोंड येणे, घशाला कोरड पडणे, हाडं दुखणे, हात सुजणे, डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन, चक्कर येणे.. हे सगळं सहन करत करत तिला इंचाइंचाने पुढे सरकायचं आहे. या काही लढाया ‘तो’ जिंकेल; पण निदान केसांची लढाई आज तिने जिंकली होती. जणू काय ‘उदंड अमुची इच्छाशक्ती, अनंत अमुच्या आशा..’ म्हणत ती उभी होती. अंतिम विजय तिचा आहे.. तिला बरं व्हायचं आहे!

हेड शेव्हिंग पार्टीचे तेच यश आहे. ही कथा आहे जिद्दीने पुढे जाण्याची, खूप शिकण्याची, इतरांना शिकवण्याची.. आणि अंतर्मुख होण्याचीही!

नीलिमा कुलकर्णी

neelimakulkarni@yahoo.com