11 December 2017

News Flash

कलायात्रा : स्वत:ला ओलांडून जाताना..

यंदाच्या डॉक्युमेंटानं कलेचा जो इतिहास नव्याने लिहिला, तो वाचता येणारे अनेकजण असतील

अभिजीत ताम्हणे | Updated: June 18, 2017 4:21 AM

स्टेलिओस फैटाकिस यांनी ग्रीसच्या आर्थिक पडझडीनंतर २०१५ साली  केलेले  ‘फॉच्र्युनेटली अ‍ॅब्सर्डिटी इज लॉस्ट’ हे चित्र कलेतिहासाची कास धरणारे आणि भरपूर सोनेरी रंग वापरणारे असूनही त्यातील आक्रोश लपत नाही.

जर्मनीतील कासेल गावात १९५५ पासून दर पाच वर्षांनी डॉक्युमेंटाहे अवाढव्य कलाप्रदर्शन भरतं. कासेलसोबतच यंदा ग्रीसमध्ये अथेन्स शहरातही ४० ठिकाणी डॉक्युमेंटानं पडाव टाकला आहे. या प्रदर्शनांवर आधारित लेखांच्या लघुमालिकेतील दुसरा लेख..

‘‘माणूस आणि समाज यांच्यामधलं नातं आज विचित्र झालंय. समाज म्हणून माणसांना आज ‘आपण आणि ते’ असाच विचार करावासा  वाटतो आहे किंवा करावा लागतो आहे. जगण्याचं प्रत्येक अंग अनिश्चित झालं आहे आणि जागतिक स्तरावर तर अनिश्चितता इतकी आहे, की या अनिश्चिततेच्या चिंता-काळज्या विसरण्यासाठी लोक अज्ञानात सुख मानू लागले आहेत किंवा असलेल्या ज्ञानाकडे अगदी उत्सवपूर्वक दुर्लक्ष करणं, हे जगणं सुस करण्याचं साधन बनलं आहे. त्यातूनच मग, अर्धसत्यांचं  राज्य अख्ख्या जगावर सुरू आहे. उदाहरणार्थ, एक ट्रम्प येतो नि म्हणतो की पर्यावरणबदल हा मुद्दाच नाही, आणि जग ऐकून घेतं..’’

हे अशा शब्दांतलं भाषण एखाद्या चळवळीच्या व्यासपीठावर शोभलं असतं; ते जगात दृश्यकलेचा मोठा ‘इव्हेन्ट’ मानल्या जाणाऱ्या ‘डॉक्युमेंटा’ या महाप्रदर्शनाच्या उद्घाटनपर पत्रकार परिषदेत केलं गेलं. केवळ प्रश्न मांडून न थांबता, यावर इलाज काय हेही याच व्यासपीठावरून सांगितलं गेलं. हे डॉक्युमेंटा महाप्रदर्शन जर्मनीतल्या कासेल (आणि यंदा ग्रीसमधल्या अथेन्स) शहरात असलं तरी बोलणारा माणूस जन्मानं कॅमेरून या आफ्रिकी देशातला – जर्मनी ही कर्मभूमी असणारा – होता. बोनाव्हेंचर सोबेयेंग एन्डिकुन्ग या त्याच्या नावावरनं त्याचा धर्मबिर्म कुणा जिज्ञासूला कळणं मुश्कील होतं. ‘ओझोन थराला पडलेलं भगदाड हे थोतांड आहे’ असा काही युरो-अमेरिकी शास्त्रज्ञांकरिता केला जाणारा प्रोपगंडा या एन्डिकुन्ग यांना माहीत होता आणि पर्यावरणाच्या हानीत अमेरिकेचा वाटा किती याचा आकडाही माहीत होता. ‘जे आपला इतिहास विसरतात त्यांना इतिहास कधीच माफ करत नाही’ यासारख्या सुभाषितांवर उलट, ‘नेमका कुठला इतिहास? हा की तो?’ यासारखा प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचं एन्डिकुन्ग सुचवत होते आणि आजच्या या कुंठित करणाऱ्या स्थितीवर उपाय आहे, असं ठामपणे सांगत होते.

हा उपाय कठीण असला तरी अशक्य नाही, असं त्यांचं म्हणणं. त्यांच्या एकंदर बोलण्याचा रोख असा की, स्वत: बदलायला हवं. तो बदल आतून येण्यासाठी ‘मी कोण’ याकडे नव्यानंच पाहायला हवं. नव्यानं म्हणजे – आपण एरवी स्वत:बद्दल स्वत:ला आणि लोकांना माहीत असलेल्या गोष्टींतूनच स्वत:ची प्रतिमा घट्ट करत राहता, तसं नको; तर आपण आहेत त्यापेक्षा वेगळे काय काय किंवा कोण किंवा कसकसे असू शकलो असतो, हे शोधून तसं बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी निरनिराळ्या दिशांना पाहणं. अशा अवधानानं पाहिल्यास  आपल्याला इतिहासातल्या घोडचुकाही दिसतात; कुणीच कुणाला न सांगितलेला इतिहासही असेल कुठेतरी, तो शोधावासं वाटू लागतं; आदिवासींपासून ते फार प्रख्यात नसलेल्या चित्रकारांपर्यंत अनेकांचे इतिहास कोणी पाहातसुद्धा नाही हे कळू लागतं; आपल्याला जो इतिहास आपला वाटतो त्याकडे दुसरे / ‘परके’ लोक कसे पाहतात, हेही आता आपण समजून घेऊ लागतो..

या सगळ्याचा डॉक्युमेंटाशी कसा काय संबंध? एका शब्दातलं उत्तर आहे : ‘जवळचा.’ त्याहून मोठय़ा उत्तरासाठी मात्र डॉक्युमेंटातल्या काही कलाकृतींचा उल्लेख आवश्यक आहे. एन्डिकुन्ग यांचं हे भाषण ऐकायला मिळालं सात जूनला. त्यानंतरच्या आठवडाभरात, अथेन्स (ग्रीस) आणि कासेल (जर्मनी) या दोन शहरांमधली कलायात्रा ही त्या भाषणातलं मर्म जिवंत करणारी – किंवा किमान त्या मर्माचं दृश्यरूप दाखवणारी – ठरली.

काय होतं त्या दृश्यरूपात?

पहिलं म्हणजे, कागदावर किंवा कॅनव्हासवर, क्वचित पत्र्यासारख्या निराळ्याच साधनावर केलेली चित्रं होती.

राजेश वांगड, के. जी. सुब्रमणियन, गणेश हलोई, नीलिमा शेख, निखिल चोप्रा हे भारतीय चित्रकार, अल्बानियाचे एडी हिला, स्पिरो क्रिस्टो, हसन नलबानी आदी रंगचित्रकार, स्वित्र्झलडचे लुसियस बर्कहार्ड, १९५५ सालचा पहिला ‘डॉक्युमेंटा’ ज्यांच्या कल्पनेतून साकार झाला ते जर्मन चित्रकार आर्नोल्ड बोड, कोलंबियाचे अबेल रॉड्रिग्ज, मूळच्या स्विस पण गेली कैक र्वष ग्वाटेमालात राहणाऱ्या व्हिवियन सुटर, ग्रीसचे व्लासिस कानिआरिस, स्टाथिस लोगोथिइस, दिमित्रिस झामोरिन्स, जोर्गोस लाझोंगास आदी चित्रकार.. असे बरेच. ही नावं वाचताना अनोळखी वाटतील, त्यातल्या त्यात भारतीय चित्रकारांची नावं ओळखू येतील; पण नीलिमा शेख किंवा निखिल चोप्राचा अपवाद वगळता हे भारतीय काही गेल्या २० वर्षांत मोठय़ा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत हटकून असणाऱ्या भारतीयांपकी नव्हेत. ज्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल अजिबात शंका घेता येणार नाही, असे हे चित्रकार आहेत. आपापल्या चित्रपद्धतीचा विकास करण्यासाठी या चित्रकारांनी मोठीच मेहनत आणि त्याहीपेक्षा मोठी जोखीम घेतली आहे. म्हणूनच मग, के. जी. सुब्रमणियन यांच्या चित्रांत माणसं आहेत हे कळतं, पण चित्र नेमकं कशाचं याबद्दल प्रेक्षकांची कोणतीही कल्पना होण्यापूर्वी सुब्रमणियन यांच्या चित्रातला रंग-रेषा-आकारांचा सहज खेळ नजरेत साठवावा लागतो. ग्रीक चित्रकार स्टेलिओस फैटाकिस यांचं प्रचंड आकाराचं चित्र हे युरोपीय मध्ययुगीन ठसठशीतपणामुळे लक्ष वेधून घेतं, पण त्यानंतर त्यातला आíथक पडझडीनंरच्या ग्रीसचा – विशेषत: स्त्रियांचा – आक्रोश लक्षात आल्यावर तेवढाच स्मरणात राहतो. अल्बानियातले एडी हिला वगळता अनेक चित्रकार १९६० आणि ७० च्या दशकांत अगदी मनापासून जी चित्रं करत होते, ती त्यांच्याही नकळत आज समजा ‘प्रचारकी’ ठरत असली तरी या चित्रांमधलं स्त्री-स्वावलंबनाचं स्वप्न अद्याप जिवंतच आहे, हेही प्रेक्षकाला उमगतं. या साऱ्याच चित्रांना आपापल्या काळाचं भान आहे. बाकीची चित्रं तशी दिसत नसली तरी त्यात काहीएक प्रयोग निश्चितपणे आहे. हा प्रयोग चित्रातला नसून स्वत:वर केलेला आहे. उदाहरणार्थ, अबेल रॉड्रिग्ज यांनी एकाच झाडाच्या वाढीची चित्रं महिनोन्महिने केली. निखिल चोप्रा यांच्या चित्रांमध्ये निसर्गचित्रणाशिवाय काहीच दिसणार नाही; पण निखिलचा प्रयोग निराळा होता. अथेन्स ते  कासेल हा तीन हजार किलोमीटरचा रस्तेप्रवास करताना सर्बयिा, बोस्निया हर्जगोविना, स्लोव्हेनिया, हंगेरी अशा अनेक देशांतली माणसं जोडणं, त्यांच्या देशांत कलेपुढली आव्हानं काय हे समजून घेणं आणि ती परतवून लावण्याच्या तयारीत राहणं.. हे सारे निखिलनं केलंच. पण मुख्य म्हणजे, ‘मी निखिल चोप्रा नाही – दुसराच कोणीतरी आहे – जो चित्रं काढतोय’ अशा धारणेनं स्वत:पासून इतके दिवस अलिप्त आणि परात्म राहणं असा हा प्रयोग होता. स्वत:चं नेहमीचं अस्तित्व थांबवून दुसऱ्याच पद्धतीनं जगण्याचा प्रयोग व्हिवियन सुटर आणि त्यांची चित्रकार आई एलिसाबेथ वाइल्ड यांनी अगदी सखोलपणे वर्षांनुर्वष केला. या मायलेकी स्वित्र्झलडमधलं घरदार विकून ग्वाटेमालात राहू लागल्या आहेत. आधी व्हिवियन इथे आल्या. ग्वाटेमालातल्या चिखल-पुरानं त्यांची चित्रं होत्याची नव्हती केली. मग व्हिवियन यांची चित्रपद्धतच बदलून गेली. जमीन हाच त्यांचा चित्रविषय बनला. मुलीमुळे आयुष्याची दिशाच बदलून गेलेल्या एलिसाबेथ यांनी वयपरत्वे रंगचित्रं करणं थांबवलं. त्याऐवजी त्या आता चिकटचित्रं (कोलाज) करतात. ती सगळी चित्रं ‘आशा’ या एकाच विषयावर असतात. चित्राचा विषय किंवा चित्रातून काय सांगायचंय हे आतून सापडावं लागतं, याची खात्री या छोटेखानी चिकटचित्रांकडे पाहून पटते.

डॉक्युमेंटात काही केवळ चित्रं नाहीत. व्हिडीओकला आहे, मांडणशिल्पं आहेत, जुने फोटो आहेत, काही जुन्या चित्रकारांनी केलेल्या  १६ मी.मी. फिल्म इथं डिजिटल स्वरूपात आहेत, पाश्चात्त्य संगीतात १९३० ते १९६० या काळात जे प्रयोग युरोपात झाले त्यांची दखल अगदी साग्रसंगीत आहे.. हे सारं पाहून आणि ऐकून, कलेचा इतिहास हा बाजारावर आधारित होण्याच्या काळातच केवढेतरी चित्रकार किंवा कलावंत नवा इतिहास घडवत होते हे लक्षात येतं आणि प्रश्न पडतो की, आपण हा पर्यायी इतिहास मान्य करणार आहोत की नाही?

यंदाच्या डॉक्युमेंटानं कलेचा जो इतिहास नव्याने लिहिला, तो वाचता येणारे अनेकजण असतील; पण तो इतिहास पचवणं, स्वीकारणं आज कठीण आहे. भलभलते, अचाट अशा शब्दांत ज्या प्रयोगांची बोळवण केली जाते, त्या प्रयोगांची सांगोपांग गाथाच यंदाचा डॉक्युमेंटा मांडतो आहे, सांगतो आहे. तेवढंच न करता वर त्या कलावंतांनी जे केलं तशाच प्रकारे स्वत:च्या मर्यादा किंवा स्वत:मधला ठरावीकपणा ओलांडून जाण्यासाठी उकसवतो आहे, जणू काठय़ांनी ढोसतो आहे आपल्याला.

आपल्याला स्वत:ची अवज्ञा करणं जड वाटत असेल, त्यापेक्षा आजचं फसवं सुखच बरं वाटत असेल, तर फार काही करावं लागणार नाही. ‘डॉक्युमेंटातली कामं प्रभावी नव्हती यंदा’ अशी काहीतरी ठपकेबाजी करायची आणि बदलण्याची पहिली पायरी – समजून घेण्याची पायरी- तीसुद्धा नाकारायची! हे असं कदाचित होण्याची शक्यता आहे. असतेच ती.

पण जर का कुणीतरी स्वत:लादेखील ओलांडून जगाशी नव्यानं नाते जोडण्याच्या तयारीत असतील, तर मात्र यंदाच्या डॉक्युमेंटानं पुरेशी सामग्रीच दिली आहे.

abhijit.tamhane@expressindia.com

First Published on June 18, 2017 2:29 am

Web Title: abhijit tamhane article documenta art exhibition in germany